Pages

Wednesday, April 27, 2016

जुन्या गोड क्षणांतुन डोकावणारा गोडवा

संध्याकाळची वेळ. मी घरी एकटीच. बराच वेळ कॉम्प्युटरवर वेगवेगळी बटणे दाबत माझा निरर्थक टाईमपास सुरु होता. उगाचच नेटवरच्या बातम्या वाचणे , फेसबूक वरच्या मित्र मैत्रिणींची सध्याची प्रगती पाहणे , मध्येच स्वतःचेच प्रोफाईल उघडून स्वतःचेच फोटो नव्या उत्सुकतेने पाहणे असे अनेक उद्योग करत खरेतर आता कंटाळवाणे वाटू लागले होते. डोळ्यांसमोरची स्क्रीन सतत बदलत होती. पण कोपऱ्यामध्ये मघापासून उघडलेली एक छोटेखानी चाट विंडो अजून तशीच होती. राहवले नाही कि मीच अधूनमधून त्या हव्या हव्याशा संभाषणाची सुरुवात नव्याने करण्याचा प्रयत्न करत होते.

                    " Hey Hi !"
                    " Hi "
                    " Hello, r u there ?
                    " Kuthe aahes ata ? nighalas ka officemadhun ?
                    " kiti vajtil ghari pohochayla ?"
                    " Please reply…"

अशा कितीतरी लहानमोठया वाक्यांनी त्या छोटया जागेत सामावलेले ते एकपात्री संभाषण पुढे सरकत होते. पण तरी एखादया अनुस्वाराइतकाही प्रतिसाद समोरून येऊ नये. न राहवून पुन्हा पुन्हा status पाहत होते पण तिथेही तो हिरवा रंग कायम. मग शंका अजून चलबिचल होई.

शेवटी कॉम्प्युटरचा ध्यास सोडून मी मघापासून दुर्लक्षित असलेल्या मोबाईलकडे आपला मोर्चा वळवला. आज सर्वात अधिक प्रिय असलेल्या whatsapp वरचे messages पुन्हा पुन्हा वाचले , पुन्हा त्याच एकपात्री संभाषणाची पुनरावृत्ती इथेही झाली. पण परिणाम तोच… NO  REPLY. प्रत्येक प्रश्नानंतर शेवटच्या २ रेघा निळ्या होण्याची मी अगदी आतुरतेने वाट पाहत होते. पण त्या तशाच रंगहीन राहिल्या आणि माझे प्रश्नही अनुत्तरीत. गेल्या कित्येक दिवसांपासून LAST VISIT मध्ये ती एकच तारीख पाहून मन बचैन होई.

इतक्यात दारावरची घंटी वाजली आणि प्राणात प्राण आले. तशीच धावत जाऊन मी मोठ्या आशेने दरवाजा उघडला आणि समोर एका अनोळखी व्यक्तीला पाहून भ्रमनिरास झाला.

                " ताई , तुमचे पार्सल आले आहे "

मी काहीशा जड मनानेच थरथरत्या हाताने सही करत ते हाती घेतले. तो " Thank You !" म्हणत लगेच निघूनही गेला पण मी मात्र अजूनही तिथेच स्तब्ध उभी होते. कुणाची तरी वाट पाहत. पण समोर होता फक्त शेजारच्यांचा तो मुग्ध उभा स्तब्ध दरवाजा…. माझ्याकडे निर्विकारी नजरेने पाहत. फुलाफुलांचे केशरी तोरणही आता कोमेजल्या चेहऱ्याने हसण्याचा प्रयत्न करत होते. कोपऱ्यात दिसणाऱ्या जिन्याची सुरूवात काही केल्या हवे ते दाखवत नव्हती म्हणून उगाचच त्याच्यावर रागावून मी दार लावून आत वळले.

आणि माझ्या उजवीकडे पहाते तर काय ? मघापासून ज्याच्या वाटेकडे डोळे लावून तळमळत होते तो हा इथे भिंतीला पाठ टेकवून उभा. मी तसेच पार्सल बाजूला ठेवून त्याच्याकडे धावले.

              " अरे , तू कधी आलास?"
             " माहित आहे मी किती वाट पाहत होते ?"
            " होतास कुठे इतका वेळ…. न फोन न मेसेज…नेटवरही ऑनलाईन असून एक साधा रिप्लाय केला     नाहीस तू . का? रागावलास ?

पण पुन्हा तेच. एकाही प्रश्नाला उत्तर नाही. मुखाने उत्तर सोडाच साधा एक भाव नाही चेहऱ्यावर. तो तसाच समोर माझ्याकडे एकटक पहात… एक ओळखीचे अगदी हवेहवेसे स्मित घेऊन.

मी आणखी पुढे सरसावले. त्याच्या डोळ्यांत आज मला मी दिसत नव्हते. पण त्याच्या सर्वांगावर पडलेले माझे प्रतिबिंब आता मलाच अस्वस्थ करत होते. नजर जरा खालच्या दिशेला गेली आणि क्षणभरासाठी मीच गिफ्ट केलेला शर्ट पाहून त्या क्षणीही सुखावले. पण हळूहळू बरेच काही ध्यानात येऊ लागले. सकाळीच फोटोवर चढवलेल्या हारातील मोगरा आता बरेच काही सांगत होता. सभोवतालच्या वस्तू , तिथला कोपरा न कोपरा आता मला भानावर आणत होता. आठवणींचे असंख्य कुंचले एकाच क्षणी मनात खूप काही रेखाटत होते…समोरच्या काचेमध्ये ओघळणाऱ्या आसवांमध्ये पूर्वीचे आठवणारे आनंदाचे रंग नकळत मिसळून जात एक स्मित हळूच डोकावत होते. 

खरेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असा दुरावा निश्चितच कधीतरी येणारच असतो मग तो पती /पत्नीपासून असेल किंवा आईवडिलांपासून असेल किंवा आणखी कोणीही जो आपल्याला अधिक प्रिय आहे. त्यावेळी होणाऱ्या वेदना या इतर कोणत्याही यातनांपेक्षा खरेच खूप कठीण असतात. तेव्हा गत आठवणींसोबतच आणखी काही त्रासदायक असेल तर ते म्हणजे…. मनास राहून गेलेल्या गोष्टींची वाटणारी खंत. ' अरे हे करायचे राहूनच गेले ','मी असे करायला नको होते ', 'इतके दुर्लक्ष नको होते ', 'मी पुढच्या वेळी असे करणारच होतो पण त्याआधीच अपरिचित घडले ','मी वेळ द्यायला हवा होता ' …. अशा असंख्य चुकांची जाणीव कित्येकदा एखादी व्यक्ती हरवल्यानंतरच होते. त्या क्षणी उगाचच अपराधी असल्यासारखे वाटत राहते. म्हणूनच प्रत्येकाने सध्या आपल्यापाशी जे जे आहे त्याची योग्य किंमत जाणली पाहिजे. आईवडील,सहचारी असो वा आणखी कोणीही, जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत जे जे शक्य असेल ते ते सर्व करण्याचा प्रयत्न करायला हवा. नात्यांमध्ये 'पुढे करू' हे धोरण कमी अवलंबलेलेच बरे.फेसबूक, whatsapp सारख्या सोशल मिडियावर गरजेपेक्षा जास्त वेळेचा अपव्यय करण्यापेक्षा जे सोबत आहे त्यांच्यावर या वेळेची लयलूट करणे हा सुखाचा एक खरा मार्ग . कारण माणूस आज आहे आणि उद्या नाही.खरेतर प्रियजनांच्या तसबिरीवरचा हार फुलांचा असो व चंदनाचा तो कोणालाही आवडत नाही. क्षणात त्याला दूर करावेसे वाटते. पण त्यातून साध्य काहीच होणार नाही. त्यामुळेच आजचे क्षण पूर्णपणे स्वतःसाठी आणि प्रियजनांसाठी जगा म्हणजे सोबतीचे क्षण पूर्णपणे आनंदात घालवलेले असतील तर नंतर जेव्हा अशी एकाकी वेळ येईल तेव्हा खंत न वाटता त्या जुन्या गोड क्षणांतुनही एक नवा गोडवा पुन्हा आयुष्यात येईल….पुढे जगण्यासाठी चेहऱ्यावर हवी असलेली एक स्मितरेषा घेऊन .

 - रुपाली ठोंबरे.


Saturday, April 23, 2016

मृत्युंजय… एक उत्तम कलाकृती !


कुरुक्षेत्रावर सुरु असलेल्या कौरव-पांडवांच्या युद्धाचा तो सतरावा दिवस. वेळ जवळ जवळ सूर्यास्ताची. कौरव आणि पांडव या दोन्ही पक्षांतील योद्धे सारे स्तब्ध उभे. समोर जमिनीवर रक्तात न्हालेला महावीर कर्ण मृत्युच्या शेवटच्या घटका मोजत. इथे कर्ण मृत्युच्या दारात आणि आसपास सभोवताली पडला होता मृत सैनिकांचा रक्तबंबाळ झालेल्या प्रेतांचा खच.… इथे कर्णाचा शेवट पहात उभ्या योध्यांची मुग्ध शांतता आणि चहूकडे फक्त आकांत… त्या सैनिकांच्या स्वकीयांचा. कर्ण आपल्या मावळत्या पित्याला शेवटचा निरोप देत असतानाच त्याचे लक्ष वेधले गेले … एका पित्याच्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे … एका दीर्घ आकांताकडे … एका करुणामयी विनवणीकडे.

                 " अरे या कुरुक्षेत्रावर कोणी आहे का मला मदत करणारा. युद्धात मुलगा मारला गेला माझा. त्याच्या अंतिम कार्यासाठीही द्रव्य नाही माझ्याकडे. कोणी आहे का ? "

ही मदतीसाठी मारलेली हाक दानवीर कर्णाने ऐकली आणि त्याने त्या याचकास जवळ बोलावले. त्याला इच्छा विचारली तेव्हा खरेतर त्या याचकास देण्यासाठी त्या क्षणी कर्णाकडे स्वतःकडे काहीच द्रव्य नव्हते. पण तरीही कर्णाने आपला दानधर्म न त्यागता आपल्या मुलास जवळ बोलावले आणि त्या जखमी स्थितीतही तो म्हणाला,

                " पुत्रा , आयुष्यभर जे मजपाशी होते ते ते सर्व जेव्हा जेव्हा ज्याने मागितले मी त्यास दिले. पण         आज हा याचक असाच रिकाम्या हाताने माझ्यापाशी येऊन परत जाणार हे कदापि शक्य नाही. तू एक काम कर . तो पडलेला जमिनीवरचा दगड घे आणि माझ्या तोंडात असलेले हे २ सोन्याचे दात पाड आणि या दुःखी पित्यास दे . त्याच्या मुलाचा अंतिम संस्कार करण्यासाठी ते त्याच्या कामा येतील. "

आपल्या यमसदनी निघालेल्या पित्यासोबत असे निघृण कृत्य करण्यास न धजावणाऱ्या पुत्रास पाहून शेवटी कर्णाने त्यास तशी आज्ञा केली. तेव्हा रडत रडतच दुःखी अंतःकरणाने त्या पुत्राने आपल्या पित्याची ती आज्ञा मानली आणि दगडाच्या घावांनी कर्णाचे तोंड रक्तबंबाळ केले. त्या रक्तवर्णात मोतीमाळेतून अचानक निखळून गळावे तसे २ चमचम करणारे सुवर्णदातही लालसर झाले होते. असे दान कसे दयावे ? हा विचार करत कर्णाने त्यांस आपल्या डोळ्यांपाशी नेले . त्या नयनकमलांतून वाहणाऱ्या अश्रूजलात न्हाऊन पवित्र झालेले रद रेशीम कापडाने पुसून घेत हे शेवटचे दान त्या याचकास सुपूर्द करत कर्णाने कायमचे डोळे मिटले.

महाभारतातील असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या महावीर कर्णाच्या बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित "मृत्युंजय " कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी. 

 या कादंबरीचे एक पाहताक्षणीच नजरेस येणारे खास वैशिष्ट्य म्हणजे ही इतर कादंबऱ्याप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही आहे. तर महाभारतातील विविध पात्रांच्या मुखांतून पुस्तकाच्या प्रत्येक पानावर झरझर उतरणारा कर्णाचा जीवनपट आहे . कुंतीला मिळालेले असामान्य वरदान , त्यातूनच कर्णाचा झालेला असामान्य जन्म ,जगाच्या भीतीने कुंतीने घेतलेला कठोर निर्णय , गुरु द्रोण आणि पांडवांकडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधानासोबत जन्मास आलेले मित्रप्रेम , द्रौपदी वस्त्रहरण , कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्वच गोष्टी वरवर प्रत्येकास माहित आहेतच . पण या प्रत्येक गोष्टींत काही बारीक बारीक अशा कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत ज्या पुस्तक हाती घेण्याआधी आपल्या विचारांतही नसतात किंवा वर्षानुवर्षे आपण या प्रश्नांची उत्तरे शोधत आलो आहोत पण जी अजूनही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ कुंतीला ही पुत्रप्राप्ती नक्की कशी झाली ?सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे असेल? शोण म्हणून असलेला राधेचा मुलगा या कर्णासोबत कसा वागत होता? कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती…त्यांच्यातील प्रीतीचे क्षण कधी फुलले होते कि इंद्राला कवच कुंडल दान केल्यानंतर निस्तेज झालेल्या कर्णाप्रमाणे त्याचे प्रेमजीवनही कोमेजलेले होते? सूर्याचा पूत्र असूनही त्याने धर्माच्या विरोधात अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली… केवळ मैत्रीसाठी? द्रौपदी वस्त्रहरणात त्याने द्रौपदीचे रक्षण नक्की का केले नाही ? अभिमन्यूला धर्माविरुद्ध जात मारणाऱ्यात कर्ण का सामील झाला ? खरेच तो अधर्मी होता ? जर असे होते तर मग श्रीकृष्ण विरुद्ध पक्षात असतानाही त्याने या सूतपूत्राचा अंतिम संस्कार करण्यात रस का दाखवला? जसजसे आपण एकेक पान वाचत जावू तसतसा हा हळूहळू उलगडत जाणारा खुलासा आपल्याला जागीच खिळवून ठेवतो. 

अशा या महावीर राधेयच्या जीवनपटाला योग्य न्याय देत गुंफलेल्या शब्दांची सांगड वाचकाचे मन तासनतास गुंतवून ठेवते. मी एकदा 'मृत्युंजय' वाचताना सापडलेली सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्ये लिहून ठेवण्याचा ध्यास घेतला पण लवकरच माझ्या लक्षात आले कि यातला प्रत्येक शब्दच खूप महत्त्वाचा , अर्थपूर्ण आहे आणि थोडक्यात सांगायचे झाले तर 'मृत्यंजय ' हा एक उत्तम कलाकृतीचा नमूना जो आज विविध भाषांतही उपलब्ध आहे आणि तितक्याच आपुलकीने त्याने सर्वांनाच आपलेसे केले आहे.

- रुपाली ठोंबरे. 


Friday, April 15, 2016

मी ही होईन मर्यादापुरुषोत्तम

        " अगं आर्या, ते ओटयावर ठेवलेलं औक्षणाचं ताट आण बरे "

नुकतीच आंघोळ करून येणाऱ्या गुटगुटीत रामला पाहून खुर्चीतून उठत पदर सावरत गायत्रीआजीने रामच्या थोरल्या बहिणीला हाक मारली.

आजीनेच आणलेला मोतिया रंगाचा कुर्ता पायजमा घालून राम दुडूदुडू पळत दिवाणघरात पोहोचला. मागे त्याची आई हातात कंगवा घेऊन आली,

         " अरे बाळा, भांग तरी पाडून घे.आता सासूबाई घ्या. तुमच्याच हातून  विंचरून घ्यायचे आहेत याला "
म्हणत तिने कंगवा आजीच्या हातात दिला आणि कोपऱ्यातला पाट जमिनीवर मांडू लागली.आईला फुलवेलींची सुंदर रांगोळी पाटाभोवती काढताना पाहून शहाण्या मुलासारखा आजीसमोर उभा असलेला राम धावतच आईजवळ आला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून वाकून राम निरीक्षण करू लागला आणि तसे त्याचे कुतूहल वाढले.

          " ए आई, आज काय आहे गं खास ? मी करू का अशीच नक्षी?"

 म्हणत आपला छोटासा हात पांढऱ्या रांगोळीत घातला. तशी आजी कशीबशी उठत रामपाशी आली आणि प्रेमाने पण ओढतच पुन्हा पूर्वीच्या जागी आली. आपल्या सुरकुत्या हातांमध्ये फणी घेऊन ती पुन्हा आपल्या नातवाचे केस विंचरू लागली. त्यासोबतच तिचे कापरे बोल राम अगदी कुतूहलतेने ऐकून घेत होता.

      " अरे रामा , आज तू ५ वर्षांचा झालास. आता मोठा झालास, शहाण्यासारखं वागायचं.… "
तिच्या उपदेशाला मध्येच तोडत राम हसतच म्हणाला ,

      " अगं आजी , म्हणजे तुला माझा बर्थडे माहितच नाही वाटतं . माझा बर्थडे काही आज नाही . पुढच्या बुधवारी आहे.तेव्हा पार्टी आहे घरी. माझे सर्व मित्र येतील. बाबांनी छान ड्रेस पण आणला आहे .तेव्हा असशील ना तू इथे ?"

यावर सर्वांना क्षणभर हसूच आले. पण मग आजी पुढे बोलू लागली.

       " अरे राम नवमीचा खरा जन्म तुझा. असेल तुझा जन्मदिवस त्या इंग्लिश तारखेला . पण मी तर बाबा तिथीनुसारच मानीन.म्हणूनच तुझं नाव 'राम' ठेवले आहे आम्ही. राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.शब्द लहानच पण खूप शक्ती आहे 'राम' नामात. तू सेतूपूलाची गोष्ट ऐकलीस ना परवा. आता ऐक, आई औक्षण करेल बाळाचं. छान छान खाऊ देईल.कसली पार्टी-बिर्टी करतात तुम्ही. वाढदिवसादिवशी देवासोबतच सर्व मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे ही आपली खरी संस्कृती. बाबा रे , खूप मोठा हो … अगदी मर्यादापुरुषोत्तम रामासारखा."

         " राम तर मी आहेच की ? पण मर्यादापुरुषोत्तम म्हणजे?"
 रामच्या या त्वरित प्रश्नाला उत्तर देत आजीने रामलाच उलट प्रश्न केला ,

         "  अरे मी प्रभू श्रीरामाबद्दल बोलते आहे. तू सांग तुला काय काय माहित आहे रामाबद्दल ?"

आपल्या स्मरणशक्तीची कसोटीच आजी घेत आहे कि काय आणि आता सचोटीने यात पास व्हायलाच हवे या अविर्भावात राम पूर्वी सांगितलेल्या , ऐकलेल्या , पाहिलेल्या गोष्टींतून उत्तर बनवू लागला .

" प्रभू श्रीराम म्हणजे अयोध्येचा राजा.त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता.रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे. राजा दशरथ आणि कौसल्या राणीचा लाडका मुलगा. जसा मी , आईपप्पांचा.सीतेबरोबर त्यांचे लग्न झाले . मग कैकेयी नावाच्या दुष्ट काकूमुळे ते दोघे दूर जंगलात फिरायला जातात.पण तिथे रावण नावाचा राक्षस येतो आणि तो सीतेला पळवून त्याच्या गावी नेतो .त्याचे गाव अं …आठवले श्रीलंका. तिथे सीता नेहमी झाडाखाली रडत बसायची. तिला आठवण येत असेल ना रामाची ? मग रामाचा आवडता भक्त येतो… हनुमान. मला हनुमान खूप आवडतो, आजी. माझ्या रूम मध्ये पाहिलेस का हनुमानाचे मोठ्ठे चित्र आहे. मग वानरांची सेना , राम ,लक्ष्मण दूर रावणाच्या त्या समुद्रातल्या गावी जातात… 'राम'नाम लिहिलेल्या दगडांच्या सेतुपूलावरून . तिथे खूप मोठे युद्ध होते. इथून एक बाण येतो मग तिथून एक बाण , मग दोघांची टक्कर… आणि शेवटी रावण बाण लागून मरून जातो. मग सीता आणि राम आपल्या घरी येतात.दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले. बघ मला माहित आहे सर्व. टी वी वर पाहिलेय मी. अजून त्यांना लव आणि कुश नावाची मुलेपण होती हे पण माहित आहे मला .

           " हो रे हो . हुश्शार माझा बाळ "

 म्हणत आजी रामला कुशीत घेत पापे घेतच पुढे म्हणते ,

         " तुला तर सर्वच माहित आहे की. पण कैकेयी ही रामाची काकू नाही बरे का . रामाची सावत्र आई . दशरथाला ३ पत्नी होत्या. आणि हो राम आणि सीता काही फिरायला नव्हते गेले तिथे. ते वनवासात होते. वडिलांच्या वचनाचा अपमान होऊ नये म्हणून. राम हा एक मनुष्य म्हणून एक खूप मोठे व्यक्तिमत्त्व होते… कितीतरी गुणांनी समृद्ध जे एका आदर्श महापुरुषाचेच लक्षण आहे. राम नेहमी कोणत्याही परिस्थितीत त्याच्या वचनांशी एकनिष्ठ राहिला. पित्याचे वचन पूर्ण व्हावे यासाठी तो पत्नीसोबत १४ वर्षे वनवासात राहिला. एका वचनपूर्तीसाठी त्याने सर्वात प्रिय अशा बंधू लक्ष्मणालाही माफ केले नाही. "

आजी वेळ रामाबद्दल सांगत होती आणि राम समोर बसून ऐकत होता. आता आर्यादेखील त्याला सामील झाली होती. मध्येच आजीचे बोलणे काही क्षणांसाठी थांबले आणि मघापासून काहीतरी विचारायचे म्हणून प्रयत्नरत असलेल्या आर्याने आजीसमोर नवा प्रश्न उपस्थित केला,

         " अगं आजी , त्या काळात तर कितीतरी राजे एकापेक्षा अधिक बायकांशी लग्न करायचे ना ?
ही एक सामान्य गोष्ट होती. दशरथ राजानेही केले होते , आता तूच म्हणाली बघ. मग रामाने कधीच असा विचार केला नसेल का ?"

         " आर्या, म्हणूनच तर श्री रामाला मर्यादापुरुषोत्तम ही उपाधी दिली आहे. राम नेहमी एकपत्नीनिष्ठ राहिला. वाल्मिकींच्या रामायणातील बालकांडात असे म्हटले आहे कि राम आणि सीता सदैव एकमेकांच्या हृदयात राहायचे. परंतू प्रसंगी एका प्रजादक्ष राजाप्रमाणे त्याने व्ययक्तिक सुखासही अधिक थारा दिला नाही. असा कर्तव्यदक्ष ,नेहमी मर्यादेत राहणारा प्रजापिता 'न भूतो न भविष्यति ' असाच आहे. त्याने मैत्रीतही जे बरोबर त्याची नेहमी साथ दिली… मग तो मित्र विभिषणासारखा राक्षस कुळातला असो वा सुग्रीवासारखा वानर कुळातला. नेहमी दर्शनासाठी आसुसलेल्या प्रत्येक भक्तासाठी त्याच प्रेमाने वागला… मग ती शापित अहिल्या असो वा उष्टी बोरे देणारी शबरी असो.रावण जेव्हा सर्व हरला होता तेव्हा रामाने शांतीने युद्ध संपवण्याची तयारी दर्शवली होती. पण रावणच… मानला नाही आणि अखेर जीव गमावला. पण श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’ श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला.श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात."

आजीचे हे बोलणे ऐकून छोटया रामने टुणकन उडी मारली.
       
           "तर आजी मलाही आवडेल असे बनायला. मी ही होईन मर्यादापुरुषोत्तम "

आई आपल्या मुलाच्या चांगल्या बढाया ऐकत स्मित करतच म्हणाली ,

           " चल आता , लवकर पाटावर बस. तुझे औक्षण करू. आणि मग तू सर्वांचा आशीर्वाद घे. "

अशाप्रकारे रामचा जन्मदिवसाचा छोटा कार्यक्रम संपला. तसे रामने लगेच आजीपुढे हात पुढे केला ,
  
          " आजी, माझे गिफ्ट ?"

आजीने हसत हसतच रामरक्षेचे छोटेसे पुस्तक त्या चिमुकल्या तळातांवर ठेवले.

          " ही घे रामरक्षा. तुझ्या रक्षणासाठी.राम करेल तुझे रक्षण नेहमी. पण स्वतःचे प्रयत्न सदा चालू ठेवायचे. खरे रामराज्य निर्माण करायचे. पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते ."


- रुपाली ठोंबरे .

   



Thursday, April 14, 2016

संग तुझाही प्रिय तो भुणभुणणारा

कधी कधी आपला मित्र किंवा नात्यातलाच कुणी जिवलग संकटात असतो तेव्हा बहुतेकदा आपण काय करतो? कित्येकदा कधी चुकुन तर कधी जाणून आपण त्याच्याकडे पाठ फिरवतो.का? तर, जास्त सहानुभूती दाखवत राहिलो तर पुढच्या क्षणी हा काय मागून बसायचा.उगाच काही भलतेच मागितले तर आपली पंचाईत होईल.आणि शेवटी नातेही विसकटायचे. इथे आपलेच आपल्याला उमजत नाही. कुणी सांगितले नसते व्याप डोक्याला लावून घ्यायला.असा विचार करून वरचेवर आपल्या नात्यातला मुलामा तसाच ठेवून प्रत्यक्षात मात्र त्याच्याकडे केवळ दुर्लक्ष करतो.पण कदाचित तो  सोबतीपेक्षा जास्त अपेक्षा करतच नसेल तर? जर त्याची अपेक्षा इतकी शुल्लक असेल कि आपण ती सहज पूर्ण करू शकू.कदाचित आपण न मागताही ती देणार असू पण मनातल्या अशा व्यर्थ भीतीमुळे आपण तेही देण्यास कचरत असू. कधीकधी जे इतरांस किंवा वरवरून त्रासदायक वाटत असते त्यातही आनंदाचा झरा वाहत असतो…फक्त अशा वेळी हवा असतो एक संग.… जो नक्कीच प्रयत्न केला तर आपण देवू शकतो.


कळी उदास सुंदर
आसवांत भिजून
एकटीच राहून दूर
कधी जाईल कोमेजून

पाहून सखी आपली अशी 
आला एक भ्रमर तिजपाशी
काय करावे काही कळेना
काय सांगावे काही सुचेना

अखेरीस मग तिलाच विचारी
सांग , तुज काय हवे ?
खुलण्यास ही कळी बिचारी
सांग , तुजसाठी मी काय करावे ?

ऐकून बोलही हेच थोडके
कळीही वदली हळूच हलके
"न देत बहाणे असे तुझे विचारणे
यातच गवसले मज जीवन-तराणे

संग तुझा हा असाच हवा
आनंदगाणे गुणगुणणारा
न आशा अधिक नाही हेवा
  संग तुझाही प्रिय तो भुणभुणणारा "

- रुपाली ठोंबरे.

Monday, April 4, 2016

रुईचीही वाटतात जड मला ओझी

माणसाचा एक गुणधर्मच आहे कि त्याला नेहमीच स्वतःचे दुःख पहाडा एवढे आणि दुसऱ्याचे वाळूच्या सूक्ष्म कणाइतके सूक्ष्म वाटते. आणि सुखाच्या बाबतीत याच्या एकदम उलट असते. कधी कधी यातूनच ईर्ष्या जन्म घेते तर कधी निराशा. या दोन्ही भावना मानवासाठी हानिकारकच. कधीकधी अगदी क्षुल्लक कारण असते पण त्याचे तो स्वतः मनावर इतके ओझे घेतो की हकिकतेत असलेल्या सामान्य संकटाचाही खूप मोठा बाऊ करून घेतो. आणि तेच मानसिक ओझे सांभाळत आणखी खचत जातो. इतरांची प्रगती कधीकधी नकोशी वाटते. इतरांपासून काही शिकण्यापेक्षा तो त्यांचा तिरस्कार करणे पसंत करतो. पण अशा प्रकारे स्वतःची दयनीय स्थिती करून घेत असताना शेवटी तो पार कोलमडून जातो आणि त्यातच अंत होतो. पण यातूनच चांगला धडा घेऊन , इतरांकडून प्रेरणा घेऊन आयुष्याचा पाठ नव्याने गिरवण्यास सुरुवात केली तर नक्कीच यश आपल्यालाही आपलेसे करून घेईल आणि आपणही इतरांसाठी प्रेरणास्थान ठरू शकू यात शंकाच नाही.



घेऊन टोपलीभर डोईवर ओझे
चालतो समजून हे नशीबच माझे

काठोकाठ भरलेली टोपली माझी
रुईचीही वाटतात आता जड मला ओझी

नशिबाला दोष देत रडतच होतो उभा मी
पुढे जावेसेच न वाटे, शेवटी थांबलो तिथेच मी

रस्त्यावर त्या, भेटले माझ्यासारखेच कितीतरी जण
त्यांच्या डोईवरचे ओझे वाटे माझ्यापेक्षा कमीच पण

दुरून पाहिले तर एकाची टोपलीच दिसे रिकामी
जवळ जाऊन पाहिले तर त्यात दगड होते फक्त काही

वजनाचा अंदाज घेतलाच नाही मी
आणि झालो आणखीनच दुःखी मी

 फार जवळ येता त्याच्याही डोळ्यांत दिसले मला पाणी
 कुत्सिततेने म्हटले त्याला मी,

" अरे, अर्धे टोपले रिकामेच तुझे
   बघ किती सारे ओझे हे माझे
   मी रडतो त्याला कारण आहे खरे
   तुझ्या अश्रूंची कथा काय आहे बरे ?"

पाणेरी डोळ्यांसवे हसतच म्हणू लागला तो

" रे सवंगड्या, यशाच्या आनंदाचे अश्रू हे आहेत सारे
  नशिबाचीच कमाल मित्रा, सदा वाहतात सुखांचे वारे
  दगडांचे ओझे घेऊन चालत आलो मी आज इथवर
  त्याच दगडांचे प्रसंगी सेतू बांधले मी येत्या संकटांवर
  आनंदाने स्वीकारत गेलो सामोरी आले जेही काही
  दुःखाची काळी सावली कधी मला जाणवलीच नाही  "

हसत-हसतच तो निघून गेला तिथून
मी मात्र त्याचा हेवा करत तिथेच होतो थांबून

इतक्यात काय झाले ?
दूर उंच निळ्या आकाशातून
चिमणी आली माझ्यापाशी भुर्रकन उडून

बांधत होती ती एक घरटे इवल्याशा पिल्लांसाठी
कापूस मागत होती मला मऊ -मऊ गादीसाठी

स्वतःतच हरवलेलो मी, भानच नव्हते माझे मुळी तिच्यापाशी
ओझे दूर करण्याची एकेक संधी स्वार्थापायी गमावत गेलो मी ही अशी

तेव्हाच समोरून आला एक नवा पाहुणा
घेवून डोईवर गुलाबफुलांचा सुंदर नजराणा

पाहून त्याला हिरमुसलो अजूनच मी आता पुन्हा
वाटू लागले "का इतकी शिक्षा मलाच, काय केला मी गुन्हा ?"

परी लाल फुलांआड लपलेले काटे मला दिसलेच नाहीत
रक्ताळलेले हात आणि गोठलेले रक्त मला दिसले नाहीच

पुन्हा स्वतःच्याच नशिबाला दोष देत होतो मी तिथेच उभा
एका चमत्काराची प्रतीक्षा करत जिथे मिळेल काही मुभा

तीच चिमणी भिरभिरत आली आणि घेऊन गेली फूलपाकळ्या
आणि काटे नकळतच दूर गेले, खुलू लागल्या आनंद कळ्या

हसत-हसतच ते दोघे निघून गेले तिथून
मी मात्र त्यांचा हेवा करत तिथेच होतो थांबून

अचानकच आकाशात जमू लागले मेघ काळेसावळे
निराशेच्या भावनांनी मना वेध लागले भलते आगळे

इतक्यात काय झाले ?
दूर उंच निळ्या आकाशातून
झरू लागल्या सरी मागून सरी ओथंबून

स्वतःतच हरवलेलो मी, भानच नव्हते माझे मुळी त्यांच्यापाशी
वाढलेले ओझे पुन्हा कवटाळून घेत एकेक ओझी वाहवत गेलो मी ही अशी

क्षमतेच्या पलीकडे गेले जेव्हा सारे
कोलमडून पडलो खाली, उरले फक्त सर्वत्र निखारेच निखारे



- रुपाली ठोंबरे . 

पुढे चालत राहणे… हेच आहे जीवन

आज ऑफिसला येत असताना लोकलला नेहमीसारखीच गर्दी होती. नेहमीसारखेच अनेक बायकांचे आवाज त्या फर्स्ट क्लासच्या एवढ्याश्या डब्यात घुमत होते. पण नकळता माझे लक्ष बाजूलाच बसलेल्या मुलींच्या संभाषणाकडे नकळत वेधले गेले. त्यातली एक जण नुकत्याच काल-परवा झालेल्या तिच्या एका सहकाऱ्याच्या लोकलच्या अपघाताबद्दल सांगत होती. खरे पाहता पूर्ण चूक त्याचीही नाही. जे नेहमी करत आला आणि जे प्रसंगी सर्वच करतात तेच तो करत होता…घाईघाईत ट्रेन पकडण्याचा त्याचा निष्फळ प्रयत्न फसला आणि त्या तरणाताठया युवकाने कायमचा जीव गमावला.गाडीची चाके कमी-जास्त वेगात पुढे धावत होती त्या गत क्षणांच्या आठवणीसोबत. त्या घटनेच्या प्रत्येक शब्दासोबत…. माझ्याही मनात विचारांची अनेक चक्रे एकाच वेळी घुमू लागली.

कसे असते न प्रत्येकाचे आयुष्य. या क्षणाला आहे तर पुढच्या क्षणाला असेल की नाही याची शाश्वती कोणालाच देता येणार नाही. तरी माणूस सतत धावत असतो…. एका वेगळ्याच मृगजळाकडे.मृगजळच ते…. सुख सुख म्हणून पाठलाग करतो नात्यांचा , पैशाचा , प्रसिद्धीचा अशा विविध गोष्टींचा…. पण जेव्हा ते खरोखर समोर येते… अनुभवयास मिळते तेव्हा ते सुख क्षुल्लक वाटते आणि पुन्हा पळतो एका नव्या सुखाकडे. मग जे समोर असूनही मन तृप्त होत नाही ते मृगजळच ना ?

पण सुखाचा शोध न घेता फक्त त्याची अपेक्षा करत राहणेही योग्य नाही.… एका ठिकाणीच स्तब्ध राहून जबाबदाऱ्यापासून दूर पळणेही योग्य नाही. नाती, पैसा हे सर्वच काही नसले तरी जगण्याला आवश्यक असेच आहे. अशा काही इच्छापूर्तीतूनच पुढे सुखाचा उगम होतो. त्यामुळे त्यांचा पाठलाग आवश्यकच आहे.

आता तुम्ही म्हणाल पळायचे नाही ,थांबायचे नाही…. मग माणसाने करायचे तरी काय ?
अगदी सध्या शब्दांत सांगायचे झाले तर… चालत राहा… अगदी अखंड चालत राहा.…गेलेला काळ कधीच पुन्हा तसाच येणार नाही हे सत्य उमगून मागे जराही वळून न पाहता फक्त भविष्याच्या दिशेने वर्तमानाच्या रस्त्यावर चालत राहा.उगाचच अतिहव्यासापायी धावत राहण्यापेक्षा स्वतःची सत्सतविवेकबुद्धी जागृत ठेवून ठरवलेले ध्येय आणि शेवटी यश मिळवणे यातच जगण्याचा खरा आनंद.

निराशेचे काळे मेघ जरी कधी दाटले तरी नव्या आशाकिरणाची आस न सोडता सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे. वर्तमानपत्र हाती घेतले तरी कितीतरी उदाहरणे समोर येतात ज्यांनी परिस्थितीला कंटाळून चुकीचा मार्ग निवडला आणि स्वतः सोबतच अनेकांचे आयुष्य अंधारात ढकलले. इथे कमी पडतो तो विश्वास.… स्वतःच्या कर्तुत्वावरचा आणि देवावरचाही. आपल्याला इतके सुंदर जीवन देणारा तो नक्कीच इतका क्रूर नाही हे सदैव लक्षात असावे.जीवनात एखादया प्रसंगी जरी १० मार्ग बंद झालेत तरी एखादा मार्ग खुला असतोच. गरज आहे ती फक्त धीराची आणि प्रयत्नांची. कधीतरी प्रयत्नांच्या स्पर्शाने स्वप्नांचे ढग हकिकतेचे रूप घेऊन या जीवनात आनंदाचा वर्षाव करतीलच. गरज आहे ती फक्त योग्य दिशेने वाटचाल करत राहण्याची.

जीवन-मरणाचा फेरा अगदी देवालाही चुकला नाही. जन्मप्रसंगीच सटीदेवीद्वारे आपली मृत्युरेषाही तळहातावर कोरली जाते. कितीही प्रयत्न केला तरी मरण टळणार नाही हे माहित असतानाही जन्म-मृत्यू दरम्यानचा काळ फुकट घालवणाऱ्याला खरेच 'जीवन म्हणजे काय' हे कळले नाही असेच म्हणायला हवे. म्हणूनच नियतीने बहाल केलेल्या आयुष्यात कुठेही ,कोणत्याही कारणामुळे न थांबता निरंतर चालत राहावे.उद्या जेव्हा खरोखर थांबण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही तेव्हा जीवनात ' हे करता आले नाही , ते करायचे राहून गेले ' अशाप्रकारचे सल मनात राहणार नाही… आणि कोणतीही खंत न बाळगता समाधानाने  पुढच्या प्रवासासाठी जाता येणे हेच जीवनाचे खरे सार्थक.

- रुपाली ठोंबरे