Pages

Monday, January 23, 2017

हस्ताक्षर दिवसाच्या शुभेच्छा

आज २३ जानेवारी, जागतिक हस्ताक्षर दिवस.
" सुंदर हस्ताक्षर हा एक मूल्यवान दागिना आहे " या सुविचाराशी अगदी लहानपणापासूनच आपण सर्व परिचित आहोत. पण तरी देखील आजच्या दिवसाचे महत्त्व अनेकांना माहित नसेल. असा एखादा दिवस अस्तित्वात आहे हे सुद्धा कित्येकांना माहित नसेल.

२३ जानेवारी हा जॉन हँकॉक यांचा जन्मदिवस. हा दिवस अमेरिकेसोबतच संपूर्ण जगभरात हस्ताक्षर दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र युनाइटेड स्टेट घोषणापत्राचे प्रथम हस्ताक्षरक म्हणून ज्यांना मान मिळाला तेच हे अमेरिकन क्रांतिकारी नेते जॉन हँकॉक. लेखन-साधन उत्पादक समितीने १९७७ मध्ये लेखनशैलीमधील प्रभुत्व स्वीकारण्यासाठी हा सुट्टीचा दिवस सुरु केला. आधुनिक QWERTY कीबोर्डच्या जगात पेन ,पेन्सिल ,कागद यांचा वापर करून होणाऱ्या जुन्या लेखनशैलीचा खालावत जाणारा प्रभाव वाढवण्यासाठी हे पाऊल होते.

सुंदर हस्ताक्षर हे माणसाचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खूप महत्वाचे आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. लिहिताना तसेच चित्रे काढताना माणसाची विचार करण्याची क्षमता वाढते. आणि यातूनच त्याचा विकास होतो. लहानपणापासूनच हस्ताक्षराचे विविध संस्कार कोणत्या ना कोणत्या रूपात प्रत्येकावर घडत असतात.या सर्व संस्कारांचा, विचारांचा ,अक्षरांचा मेळ घालून स्वतःच्या हाताने अक्षरांची सुंदर रचना करून एकमेकांना पाठवून हा दिवस साजरा केला जातो. तर मग आत्ताच काहीतरी छान लिहूया आणि आपल्या प्रियजनांना पाठवून या नव्याने माहित झालेल्या दिवसाच्या शुभेच्छा देऊया.

Tuesday, January 17, 2017

प्रगती... चित्रकलेच्या माध्यमातून.

५ ते १८ वयोगटातील शेकडो मुले- मुली, समोर असलेल्या कोऱ्या कागदांवर आपल्या प्रिय भारतदेशाचे चित्र साकारत आहेत... कोणी आपल्या मनातला काल्पनिक भारत रंगवत होता तर कोणी अवतीभवतीचा खरा भारत. त्या बालमनांच्या कल्पनेतले मोठे विश्व आज माझ्या अवतीभवती होते. सुमारे ७०० चित्रप्रेमी मुलांच्या गलक्यात, त्यांच्या रंगबिरंगी चित्रांच्या सानिध्यात काही काळासाठी स्वतःलाच हरवल्यासारखे वाटत होते. मी उभी होते प्रभादेवी येथील महानगर पालिकेच्या सभागृहाच्या आवारात. सभागृहाच्या आत - बाहेर , इथे - तिथे फक्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी - त्या परिसरातील विविध शाळांतून खास चित्रकलेच्या ओढीने इथवर आलेले. आणि या गर्दीला इथे आकर्षित करण्याचे मूळ कारण होते, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभाविनायक नवरात्रोत्सव मंडळाने आयोजित केलेले चित्रकला मार्गदर्शन शिबीर. हे केवळ शिबिरच नाही तर एक फार मोठी मोहीमच आहे. एक सुंदर मोहीम... विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वाव देणारी ...भविष्यातल्या स्वच्छ , सुंदर भारताकडे लक्ष वेधून घेणारी... भारताच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणारी .
 

आज कागदावर भविष्यातला भारत उमटवणारी ही मुले आपल्या कल्पनांच्या रंगानी आणि कलाक्षेत्रात अग्रेसर असलेल्या जत्रा टीमच्या मार्गदर्शनाच्या कुंचल्यांनी  २९ जानेवारीला प्रभादेवी ते वरळी दरम्यान सुमारे ४६ मोठ्या भिंती रंगवतील, आणि पुढे जाऊन हीच चिमुरडी मुले या भारताचे उज्ज्वल भविष्य घडवतील. लहान मुलांच्या मनावर या वयातच देशाबद्दलची आत्मीयता अशी चित्रकलेच्या माध्यमातून जागृत करण्याची या मंडळाची संकल्पना खरेच खूप सुंदर आहे. आणि याचे कौतुक आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले आहे ही सर्वांसाठीच एक अभिमानाची बाब.


आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने सुरु झालेल्या या  उपक्रमाचे उदघाटन सुप्रसिद्ध हस्ताक्षरकार अच्युत पालव यांच्या हस्ते झाले आणि त्यांनी त्या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिलेल्या कलेच्या धडयांतुन या उपक्रमाला एक योग्य दिशा मिळाली. समाजात स्वतःचे आस्तित्व निर्माण करायचे असेल तर चित्रे काढली पाहिजेत... मग ती कपडे, डबे,कागद , भिंती कुठेही रेखाटायची ,रंगवायची ... सुंदर चित्रे काढल्याने मनाला आनंद तर मिळतोच पण त्यासोबतच आपण स्वतः घडत असतो. त्यामुळे मुक्त मनाने चित्रे काढा, असे ते आवर्जून मुलांना सांगतात.


इतक्या सुंदर उपक्रमाचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले असेच मी म्हणेन. इथे मिळणारा अनुभव आयुष्यातील एक  विलक्षण अनुभव आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते. आणि त्यासाठी खरेच खूप खूप आभारी. या चिमुरड्यांसोबत स्वप्नातला आणि वास्तवातला असा दोन्ही प्रकारचा भारत मुंबईतल्या भिंतींवर उभारण्यासाठी मीही आता फार उत्सुक आहे. या मोहिमेत इतर अनेक मुलांना सहभागी करून घ्यावेसे मला अगदी मनापासून वाटते.... आनंद देण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुद्धा.


- रुपाली ठोंबरे.  

Thursday, January 12, 2017

तारांगणातले मृगजळ

अडीच-तीन वर्षांचा चिमुरडा प्रथमच नेहरू तारांगणात आला आणि तेथले त्याच्या कल्पनेपलीकडले जग पाहून क्षणात भांबावून गेला , चकित झाला.एवढे मोठे घुमटाकार छतसुद्धा त्याच्या अपरिचयाचे... त्यामुळे सर्वात आधी तर त्याचेच कुतूहल होते भारी. भर दुपारी उन्हातून येऊन इथे वाजणारी थंडी मात्र या AC ,पंख्यांच्या कालखंडात त्याच्यासाठी नवीन नव्हती. आसपास खूप सारे लोक , त्यांत भर होती ती त्याच्यापेक्षा वयाने छोट्या-मोठ्या मुलामुलींची.भोवताली पसरलेल्या कृत्रिम क्षितिजाशी वसलेले मुंबई शहर तर फारच विलोभनीय. हे सर्वच काही त्या बालमनासाठी एक नवे आकर्षण. पण त्याच्या  आईच्या मनात आणि चेहऱ्यावर मात्र चिंतेचे वेगळेच सावट. आता आत तर शिरलो आहोत पण थोड्या  वेळातच कार्यक्रम सुरु होईल , सर्वत्र अंधार पसरेल तेव्हा बाळ काळोखात घाबरणार तर नाही ना ? रोजचे आकाशातले चंद्र ,तारे आवडतात म्हणून याला आणले खरे पण त्याला नक्की आवडेल ना कि रडेल वैगरे ? इथे आणून चूक तर केली नाही ना ? अशा असंख्य प्रश्नांमध्ये ती  बावरलेली होती. आणि इतक्यात सारे दिवे हळूहळू मालवू लागले. पांढरे शुभ्र आकाश मिनिटभरात संध्याकाळचे लालकेशरी रंग पांघरून घेत काळे कुट्ट झाले. पण हे आकाश सोबत घेऊन आले लाखो तारे आणि तेही एकाच वेळी. उघड्या आकाशात तर रोज अशा चांदण्या पाहतो पण या उंच इमारतींच्या शहरांत दृष्टीस पडतील तेवढ्याच. इथे तर पूर्ण सभोवताल अगदी मोकळा.आसपास नजर जाईल तिथे लाखो ताऱ्यांनी गच्च भरलेले फक्त आकाशच आकाश . नक्षत्रांतील तारे आणि त्यांच्याशी निगडित गोष्टी फारच सुंदर. सर्व अगदी तल्लीन होऊन गेले होते हे नयनरम्य दृश्य अनुभवण्यात. पण त्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या मनात काय बरे सुरु असेल? भीती वाटत असेल का? पण छे ! त्याच्या आईच्या मनात असलेली भीती तर आता पूर्णपणे त्या निरागस चेहऱ्यावर अदृश्य होती. उलट तो हा निसर्गाचा अविष्कार पाहण्यात गुंग होता.अशा वेळी असे वाटते कि कधीकधी पालक म्हणून आपणही चुकतो का? चुकीचा विचार करत भीती या राक्षसामुळे कित्येकदा आपण मुलांच्या प्रगल्भतेला वाव देत नाही. हे बरेचदा आपल्याही नकळत घडते. अगदी जन्मल्यापासूनच आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून लहान मूल काहीतरी आत्मसात करत असते हे इथे विशेष नमुद करावेसे वाटते. असो. तर कोट्यवधी तारे असे एकाच वेळी पाहून तो भारावून गेला होता.माहितीसोबत येणाऱ्या नवनवीन आकृत्या त्याच्या बालमनासाठी फक्त समोर उमटलेले चित्र होते. कोटी वर्षांपूर्वीचा इतिहास, विश्वाची उत्पत्ती या सर्व गोष्टी त्याच्या वयाच्या बुद्धिमत्तेपलीकडे होते पण तरी तो पाहत होता , काही तरी नवे अनुभवत होता, आपले तर्क लावत होता .फुल ना फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे कणभर तरी त्या विकसित होणाऱ्या मेंदूत शिरेल हा त्यामागचा एकमात्र उद्देश. नक्षत्रांचा असा सुंदर नजराणा घेऊन ताऱ्यांनी भरलेले आकाश वर पाऊस बनून कोसळत होते पण ते बालमन मात्र एका वेगळ्याच गोष्टीच्या शोधात होते . वेगवेगळे ग्रह आणि तारे बघताना त्यांच्यासोबत आपले जुने नाते आहे का ते पडताळून पाहत होता. पण छे ! अंदाजे रोजच अवकाशात अगदी उघड्या डोळ्यांनी अगदी सहज पाहायला मिळणारा चंद्र मात्र त्याला दिसला नाही, ते जुने नाते या एवढ्या विशाल ,संपूर्ण अवकाशात सापडत नव्हते . खऱ्या चंद्रावरचा त्याच्या कल्पनेपलीकडील पृष्ठभाग नजरेसमोरून कितीदा तरी गेला पण तो शोधत होता तोच त्याचा लाडका मित्र... चांदोबामामा. आकाशात इतस्ततः विखुरलेल्या शुभ्र पुंजक्यांमध्ये कधीतरी त्याला आता तो भासत होता. पण त्या दीर्घिका आणि वायूमंडले आहेत हे मात्र त्याला समजत नव्हते.पण एकाच वेळी आकाशात १० चंद्र पाहिल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. किती सारे तारे आणि किती सारे चंद्र.!! त्याच भ्रमात , आनंदात तो उत्सुकतेने त्या तारांगणात मग्न होता. अशाच प्रकारे तारे,ग्रह ,नक्षत्र,दीर्घिका, आकाशगंगा यांच्या सहवासात काळ ओसरत होता, बरेच काही शिकवत होता . पण कार्यक्रमाच्या सरते शेवटी दिसलेली पृथ्वी आणि त्याभोवती फिरणारा आपला रोजचा चंद्र त्याला अधिक ओळखीचा वाटला. आणि त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर जे होते ते होते खरे समाधान हवे ते मिळवल्याचा.

हा एक छोटासा प्रसंग कदाचित सर्वांच्या आयुष्यात घडणारा. कधीतरी कल्पनेपलीकडील विश्व आपल्या समोर असते. देवाने निर्माण केलेले हजारो चमत्कार आसपास असतात. पण आपले लक्ष्य मात्र कित्येकदा एकच असते. आणि ते शोधण्यात आपण पूर्ण वेळ घालवतो. योग असेल तेव्हा आयुष्यात येईल या सृष्टीच्या नियमाप्रमाणे धीर धरून थांबत असताना अनेक मृगजळे वाटेत येतात. आपण काय करतो ? त्यातच खोटे समाधान मानून पुढे चालत राहतो. बरेचदा सकारात्मक विचार करून उचललेलं हे पाऊल योग्यच. फक्त आहे त्यात समाधान मानून प्रयत्नांची सोबत ना सोडणं हे महत्त्वाचं. मग एक दिवस जे हवं ते स्वतःहून तुमच्याही नकळत जेव्हा समोर येऊन उभे राहील तेव्हा त्या समाधानाच्या ओहोळातून ओसंडून वाहणारा आनंद खरेच अवर्णनीय आणि अविश्वसनीय असेल.


- रुपाली ठोंबरे .

Thursday, January 5, 2017

विसावा


कधी मनाला वाटेल तसे वागलो तर कधी मन मारून जगलो ,
कधी फक्त स्वतःसाठी जगलो तर कधी दुसऱ्यांसाठी जगून मेलो ,
पण आयुष्याच्या या वळणावरती असा विसावा म्हणजे स्वप्नच
स्वप्न... आयुष्याच्या सरतेशेवटी तरी मनासारखे जगण्याचे सुख असावे
आयुष्यभर ओझे वाहून थकलेल्या जीवास एक मनमोकळे जग हवे
पिल्लांसाठी दाणा-पाणी वेचता वेचता अवघे आयुष्य निघून गेले
आज पिल्लांनाही पिल्ले झाली आणि सर्व घरटेच भुर्र्कन उडून गेले
कधीतरी मग अशी विखुरलेली नाती जवळ येतात पुन्हा परतण्यासाठी
ही होती तोपर्यंत खरंच कधी जाणवलीच नाही वृद्धत्वाची चाहूल
साता जन्माची सोबतीण गेली आणि हा वटवृक्ष क्षणात गेला कोलमडून
सांत्वनाचे बाळकडू पिऊन सावरले, आवरले मग स्वतःनेच पुन्हा स्वतःस
खरेच आयुष्याच्या या क्षितिजावर पैशांपेक्षा प्रेमाचा स्पर्श हवाहवासा वाटतो
चिंता-अपेक्षा या बंधनांतून मुक्त होत आशा असते ती एका निवांत विश्रांतीची
कधीकाळी जपलेली मित्रत्वाची नाती देऊन जातात जगण्याची नवी आस
खरेच लोक म्हणतात तसे,म्हातारपण येतायेता घेऊन येतं अवखळ बालपण
निरागस बालमनासारखं पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात हे खरं जगणं
लोकलमधल्या गर्दीत कधीतरी चाळलेलं पुलंचं पुस्तक आज खरं समजलं
शरीरसाथ नाही तरी काठीच्या संगे फिरून रोजचंच जग आज नवं नवं भासलं
रोजच्या धकाधकीच्या जीवनात सोडून दिलेले छंद सारे नव्याने घरी आले
त्यांच्यासोबत दुःखातले लपलेले सुख सुद्धा हळूच बाहेर डोकावू लागले
समाधान, आनंद काय असतो तो पाहायचा असेल तर आज मला पहा
वैकुंठींच्या वाटेवर सुद्धा हसत हसत स्वतःतच रमणाऱ्या मला पहा
- रुपाली ठोंबरे.
 

 चित्रसौजन्य : हेमंत भोर