Pages

Monday, April 3, 2023

अखंड ऋणानुबंध

हे इथे मी बसायचे... आपण या जागेसाठी खूप भांडायचो, आठवते? ...इथे आपण संस्कृतच्या वर्गासाठी जमायचो... त्या तिथे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे...ते तिथे माझे चित्र बोर्ड वर एकदा लागलेले... हे इथे मला शिक्षा म्हणून ओणवे उभे केले होते...याच वर्गात आपण अशी मस्ती केली होती...  अशा एक ना अनेक आठवणी. प्रत्येकाच्याच मनात आठवणींचे जाळे निर्माण झाले होते... एकमेकांसोबतच्या संवादाने एकेक पाश मोकळा होत होता...आणि सर्वच इतिहासातील गोड आठवणींत रमून गेले....नजर जाईल त्या त्या प्रत्येक कोपऱ्यात , जागेवर एकतरी आठवण हजर होती. बालपणी आईचे बोट हातात घेऊन ज्या वास्तूमध्ये ३५ वर्षांपूर्वी प्रवेश केला होता आणि पुढची १३ वर्षे कधी रडत कधी हसत जिथे आयुष्याला आकार देता देता असंख्य आठवणी गोळा केल्या होत्या ती माझी शाळा- फादर अग्नेल मल्टीपरपज स्कूल, मराठी माध्यम. 

सुमारे २३ वर्षांपूर्वी जिथून शाळेचा दाखला हातात घेऊन बाहेरच्या दुनियेत पाऊल ठेवले होते , त्याच शाळेत आज इतक्या वर्षांनी एकत्र भेटायचे ठरले होते . जसजसा हा दिवस जवळ येत होता तसतशी आतुरता वाढत होती. सर्व एकत्र भेटतील तर काय बोलतील एकमेकांशी ?  सर्व किती वेगळे दिसत असतील? बाकीचे खूप बदलले असतील का ? शिक्षक- शिक्षिकांना आपण आठवत तरी असणार का ? ते किती बदलले असतील ? शाळेत किती बदल झाले असतील?... असे एक ना अनेक प्रश्न मनात येत-जात राहिले....आणि अखेरीस आज २ एप्रिल २०२३ हा आम्हा सर्वांच्या आयुष्यातील ऐतिहासिक दिवस उजाडला होता आणि या दिवसासाठी मनावर फक्त एक नाव कोरले गेले... अखंड ऋणानुबंध. 

तर हा 'अखंड ऋणानुबंध' म्हणजे नक्की काय ?... तर जवळ-जवळ २-३ महिन्यांपूर्वी आमच्या १९९२ च्या बॅच मधील संतोष कोरे दादा, अमोल दादा आणि इतर काही जणांना (आमच्या सिनिअर्सना आम्ही नेहमी दादा-ताई अशा नावानेच हाक मारायचो... तसे नातेच असायचे. आणि अनेकदा आमचीच भावंडे वरच्या खालच्या इयत्तांमध्ये असल्याने दादाचा मित्र दादाच होऊन जायचा ) चाहूल लागली कि फादर ऍग्नेल मराठी माध्यमची ही वास्तू काही महिन्यांतच पुनर्बांधणीसाठी जाणार आहे. साहजिकच आहे ज्या ठिकाणी आयुष्यातील १३-१४ वर्षे घालवली त्याच्याबद्दल असे ऐकताच कळवळा तर वाटणारच. आणि यातूनच ऋणानुबंधाची कल्पना रुजली...त्या दृष्टीने हालचाली वाढल्या... वेगवेगळ्या बॅचमधील एकदोघांचे संपर्क शोधून काढले गेले ... पुढे त्या एक-दोघांनी संपूर्ण वर्गाला त्यासाठी तयार केले आणि यातूनच आजचा 'अखंड ऋणानुबंध' हा कार्यक्रम जन्मास आला आणि आज कार्यसिद्धीस पोहोचला . 

वाशीला येणे-जाणे कायम असले, तरी शाळेच्या दिशेला जाणारा रस्ता जणू  गेली २० वर्षे तरी हरवलाच होता... जावेसे वाटायचे पण अनेक प्रश्न असायचे आणि अशाप्रकारे तिथे जाणे कधी झालेच नाही.  त्यामुळेच इतका परिचयाचा परिसर देखील आज खूप वेगळा भासला. शाळेपर्यंतच्या मोकळ्या रस्त्यावर आता दुकानांची खूप गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा गाड्याच-गाड्या....या सर्व आपल्याच शाळेत जमणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असाव्यात हे जाणवले आणि उगाच खूप अभिमान वाटला. आसपासचा परिसर वेगळा होता पण शाळा... तीच दुमजली इमारत. कित्ती वर्षांनी मी शाळेचा तो बोर्ड पाहत होते. अगदी गेटपाशीच किती तरी आठवणी गळाभेटीसच आल्या. अगदी बालपणी रोज शाळेत प्रवेश करताना इथेच सर्व रांगा लागायच्या ,दुसरी-तिसरीत त्याच जागेत आम्ही लागंडी खेळायचो, पावसाळ्यात त्याच तेव्हढ्याशा छताखाली सर्व पालक आम्हा मुलांना रेनकोट घालून घेऊन जात असत , त्याच जागेत दहावीला मानात बोर्डावर लिहिल्या गेलेल्या माझ्या नावाची आठवण  स्पर्शून गेली ....  जसजशी पावले पुढे पडत गेली तसतशा असंख्य आठवणी जाग्या होत गेल्या. जरा मागे वळून पाहिले आणि शाळेसमोरचा तो कठडा जिथे सर्वांच्या आई तासंतास वाट पाहत गप्पा मारत बसलेल्या जाणवल्या. वर्गमित्र-मैत्रिणींपेक्षाही त्या सर्वांच्या आयांशी एक वेगळेच जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले असायचे. त्याच आठवणींत शाळेत आतल्या दिशेने मी चालू लागले. आता जसजसे एकेक जण भेटत होते,आठवणींचे ते क्षण वाढत होते.सर्वात मोठे आश्चर्य सर्वानाच वाटत होते ते म्हणजे त्या जागेचे जिथे नेहमी आमचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. या एवढ्याशा जागेत किमान ४ वर्ग म्हणजे जवळजवळ २५० विद्यार्थी कसे काय बसायचो आपण ? आणि इतकेच नाही तर मधल्या मोकळ्या जागेत नाचायचो सुद्धा....दुसरीला ''डोल डोलतय वाऱ्यावर .... " इथेच सादर केले होते आणि किती मोठा मंच वाटायचा तो तेव्हा. त्या काही क्षणांतच मी तिथे गायलेली गाणी, सादर केलेली टोपीवाल्याची गोष्ट, नृत्य सारे सारे एकामागोमान एक आठवत गेले. समोरच्या खिडकीत निलीमा किंवा दीपा टीचरचा भास न व्हावा असे होणारच नाही. ती खिडकी सहसा कधीच रिकामी पाहिली नव्हती ... आज ती चक्क बंद होती. स्टाफरूम ,मुख्याध्यापकांची केबिन हे फक्त बाहेरून पाहिले तरी २०-२२ वर्षांपूर्वीचे चित्र नजरेसमोर उभे राहिले. स्टाफरूम म्हटले कि मला आठवायचे ते डस्टर आणि खडू... चुकून एका वर्षी वर्ग-मॉनिटर बनले होते ना ? त्या काळात स्टाफरूम मधून रोज रंगबिरंगी खडू आणून वर्गात टेबलावर ठेवणे पण जाम भारी वाटायचे. आणि विशेष गृहपाठाच्या वह्या... त्यादेखील तिथेच असायच्या.पावलापावलावर येणाऱ्या आठवणींची गर्दी आता मनावर ताबा घेऊ लागली होती. वर्गांवर जाणारे- येणारे शिक्षक-शिक्षिका , विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेले वर्ग ,फादरांच्या वाढदिवसादिवशी गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या भिंती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा , परीक्षेच्या वेळामधली शांतता, मधलीसुट्टीतील मस्ती, स्वतः काढलेले सुंदर चित्र बाहेरच्या डिस्प्ले बोर्ड वर लावताच होणारा तो आमच्या मनातला आनंद, कुठेही जाता-येता नकळत कधी शिस्तीचे धडे घेत ओरड खात तयार होणाऱ्या रांगा, कामाच्या लगबगीत असणारे सुरेश मामा , श्रावण मामा , वनिता मावशी , जोत्स्ना मावशी (आमची शाळा जितके विद्येचे माहेरघर तितकेच ते अशा नात्यांमुळे खरेखुरे घरही वाटायचे, अगदी आई-बाबा, शिक्षक, भाऊ-बहिणी या सर्वांचेच एक वेगळेच नाते असायचे )... अशी एक ना अनेक चित्रे डोळ्यांसमोर येत होती. 


पहिल्या मजल्यावर शेवटचा वर्ग म्हणजे आमचा पाचवीचा वर्ग...त्या वर्गापर्यंत जाईपर्यंत जवळ जवळ सर्वच इयत्ता मनावर राज्य करून गेल्या. प्रत्येक वर्गात एक नवी स्मृतिमालिका. वर्गा समोरच्या लांबच लांब पसरलेल्या बेसिनमध्ये होळीला पाणी खेळणारी मुले आणि त्यानंतर रागावणारे टीचर्स क्षणात स्मृतीपटलावर जाणवले .... एलिमेंटरीच्या क्लासनंतर रात्री ७-८ वाजेच्या अंधारात कलर पॅलेट साफ करण्यासाठी घाबरत तिथे जाणारी मीच मला आज आठवली. वर्गाच्या दरवाजाजवळ येताच 'मे आय कम इन' म्हणत प्रवेश करणारे आम्ही आठवलो. त्या एका प्रवेशात खरंच किती क्षण लपलेले होते. वर्ग तर बराच बदलला होता पण तरी तो आपलासा वाटत होता. लाल , पिवळ्या अशा रंगीत भिंती, माथ्यावरचा प्रोजेक्टर आणि काही अधिकच्या खिडक्या सोडल्या तर सर्व काही ओळखीचेच. त्याच ४ हाऊसच्या ८-८ बेंचेसच्या चार रांगा. वर्गात तर अनेक आठवणींना उजाळा येत होता.पहिला मजलाही कितीतरी उंच वाटणारा आणि तोच आता ठेंगणं वाटू लागला. पण आजही इतर भरपूर पैसे घेणाऱ्या शाळा पाहिल्या कि मान्य करेन आमचे वर्ग मात्र खूप मोठे आणि ऐसपैस... वर्गच नव्हे तर सारेच काही मुबलक उपलब्ध जे जे विद्यार्थ्यांना हवे ते ते. आजही आम्ही ३ जणी एका बेंचवर बसू शकत होतो... आश्चर्यच वाटले. जिथे एके काळी दोघींमध्ये पण जागेसाठी भांडणे होत होती तिथे आज गप्पांचा ओघ नाती अधिकाधिक जवळ आणत होता.कदाचित शाळेचे ब्रीद वाक्य " Love your neighbor as yourself " आज खऱ्या अर्थाने जगू वाटत असावे.  अशा प्रत्येक वर्गात तर किती सुंदर क्षण जन्मलेले होते. यादी करावी तर दिवसाची रात्र होईल. पण नव्या युगातील नव्या बदलांप्रमाणे काही बदल अपेक्षित होताच.  काळा फळा जाऊन आता सरकता हिरवा फळा आला होता. जुन्या सवयींना उजाळा देण्याच्या हेतूने काही लिहिण्यासाठी खडू शोधावा तर जिथे पूर्वी खडूच-खडू असायचे त्या कपाटात आज कीबोर्ड आणि माऊस होता. पण तरी कदाचित आमच्यासाठीच १-२ खडूचे तुकडे सापडलेच आणि आज इतक्या वर्षांनी त्या फळ्यावर मी सुविचार लिहिला, तीच जुनी मांडणी...आणि तीच जुनी नक्षी.  वर्तमानातील आपले वेगळे आयुष्य विसरून आम्ही सर्व आज लहान झालो होतो.पल्लवी, पिनाकीनी, स्मिता, मुकेश , केतन, विनायक...असे एकूण ६२ पैकी अंदाजे ३४ जण जमलो होतो. वयाने आम्ही मोठे दिसत होतो, स्वभावही थोडे बदलले होते, काहींची तर नावेही बदलली होती...पण तरी सर्व एकत्र आलो आणि आमचा वर्ग पुन्हा तसाच जिवंत झाला.कित्ती आठवणी... कित्ती किस्से ... जुने न उलगडलेली कोडी सोडवण्याचे खटाटोप... या सर्वांनी वर्ग गजबजून गेला होता. आज कोणी ओरडणारे, मारणारे नव्हते तरीही सर्वात मस्तीखोर वर्ग म्हणून नावारूपाला असलेला आमचा वर्ग दंगा न करता कसा  काय शिस्तीत बसला होता याचे आश्चर्य पाटगांवकर टीचर जेव्हा वर्गात आल्या तेव्हा त्यांनाही वाटले. त्या अजूनही तशाच होत्या. पुढे भागवत सर आले ते तर आमच्या वर्गाचे लाडके सर. जवळजवळ ३ वर्षे त्यांनी आम्हाला झेलले होते. आज इतक्या वर्षांमध्ये कितीतरी विद्यार्थी त्यांच्या छत्रछायेखाली वाढले असतील पण तरीही चेहऱ्यांसह नावेही अचूक आठवणीत होती...हे फक्त त्या काळातल्या शिक्षकांनाच जमू शकते. दहावीनंतर समोर हात घेऊन आज पहिल्यांदा पुन्हा एकदा प्रतिज्ञा म्हटली असेल.शब्द मनात अस्पष्ट होते पण आठवणी सुस्पष्ट होत होत्या. समोर धरलेल्या हाताने समोरच्याला त्रास देणे हा जणू एक आवडता छंद... आज पुन्हा अनुभवला. गीत आणि त्यानंतर सुरु झालेले जन-गण-मन... शेवटी 'जय जय जय हे' च्या दरम्यान होत असणारी सूर-तालांची सरमिसळ पाहता आपण आपल्या वर्गमित्रांसोबतच आहोत ही खात्री पटलीच. आणि पुन्हा शाळा सुरु झाल्याचा भास झाला. आमच्या शाळेचे खास करून मराठी माध्यमचे एक सर्वात छान वैशिष्ट्य म्हणजे इथे तुकड्या नव्हत्या. त्यामुळे अगदी नर्सरी पासून ते दहावीपर्यंत तेच वर्गमित्र. चार रो हाऊस आणि यांच्या जागा ठरलेल्या... तेही शेवटपर्यंत सोबत.... मग तो रंग तुमचा आवडता असो वा नावडता. एका बेंचवर मुलगा-मुलगी अशा जोडीने वर्षाला सुरुवातीला टीचर बसवून द्यायच्या आणि मग जसा आयुष्यभर एकाबरोबर कसाबसा आनंदात संसार थाटावा तसे जुळवून घेत, कधी भांडत , मस्ती करत अक्खे वर्ष त्या एका बेंच पार्टनर सोबत घालवायचे. कदाचित जीवनातील adjustment इथेच शिकलो आम्ही. सर्वांना पुढचा आणि मागचाही बेंच समान मिळावा म्हणून रोज एक बेंच पुढे सरकत जाणारा वर्षभराचा असा प्रवास नंतरच्या जीवनात खूप मिस केला. 

त्यानंतर आम्ही सर्व खाली मैदानात पोहोचलो. हे तेच मैदान जिथे पाऊल ठेवताच आठवली ती पाटील सरांची ड्रम आणि शिटी सोबतची कवायत , नकळत लेझीमची धून मनात वाजू लागली , खेळणारे विद्यार्थी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पाटील सर... सारे आठव मनाच्या अंगणात जणू थयथय नाचत होते. प्रत्येक वर्गाचा फोटो काढला जात होता. त्यानंतर आम्हां सर्वाना ओढ लागली ती इतर सर्व शिक्षकांना भेटण्याची. सिनिअर केजी च्या जोशी टीचर , पहिलीच्या प्रार्थना मोरे टीचर , तीन वर्षे आमच्या वर्गाला आपलेसे करणाऱ्या अनिता पाटील टीचर , गणित-विज्ञानाचा पाय मजबूत करणाऱ्या पाटगांवकर टीचर , कामाठे टीचर , विद्या टीचर , तवटे टीचर , लता टीचर, इंग्लिशची गोडी लावणाऱ्या माधुरी भांडारकर टीचर, आयुष्यभरासाठी तीन वर्षांत पुरेशी हिंदीची शिदोरी बांधून देणाऱ्या शिंदे टीचर, मराठी आणि इतिहासावर हसत-खेळत प्रेम करायला शिकवणाऱ्या साळवी टीचर असा समस्त आदरणीय शिक्षक परिवार आज आम्हा सर्वांच्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून येथे जमा झाला होता ... फक्त आणि फक्त आमच्यासाठी. या सर्वांना इतक्या वर्षांनी असे एकत्र समोर पाहून वाटणाऱ्या भावना शब्दांत सांगता येणारच नाहीत. त्या क्षणी काय बोलावे हेही नेमके कळत नव्हते. आम्हांला इतका आनंद होत होता तर त्या सर्वाना आपले ६५० विद्यार्थी असे पाहून किती आनंद होत असेल हे त्या प्रत्येकाचे हसरे आणि समाधानी चेहरे सांगत होते . प्रत्येकाला पुरेसा वेळ देऊन सर्वांशी हसतमुखाने संवाद सुरु होते. १९९२ ते २०२२ पर्यंतच्या ३० बॅचेस अशा इथे एकत्र जमल्या होत्या. जवळजवळ ६५० विद्यार्थी... जे न येऊ शकले त्यांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला होता. आपल्या शाळेतले अनेकजण परदेशात उच्च पदांवर तिथे स्थायिक झाले आहेत हे जाणून अभिमानाने मान अधिक उंचावली. आमच्या बॅचसोबतच इतर सर्व सिनियर -जुनिअर वर्गातील सर्वांना एकत्र बघून खूप आनंद झाला.... सर्वच गुरुजनांसाठी ही एक अविस्मरणीय भेट असेल. आम्हा ६५० जणांसाठी देखील हा ऋणानुबंध खूप खूप आनंदाचा आणि उत्साहाचा. आणि या सर्वांचे श्रेय जाते ते त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी सर्वप्रथम या ऋणानुबंधाचे स्वप्न पाहिले... आम्हां सर्वांच्या मनामनांत ते रुजवले आणि आज ते हकिकतेत जिवंत साकारले. इतका मोठा कार्यक्रम इतक्या कमी कालावधीत योग्यरीतीने पार पाडणे हे एक अभूतपूर्व यश आहे. आणि ते का होणार नाही. शेवटी या सर्वांचे बीज याच शाळेत रुजले आहे. आयोजकांप्रमाणेच सर्वांनी दाखवलेली शिस्त , नम्रपणा, एकत्रितपणा, शाळेबद्दलचे प्रेम,शिक्षकांप्रतीचा आदर, वर्गमित्रांबद्दलचे भाव या सर्वांचेच हे एकत्रित फलित आहे... शेवटी काय... फादर ऍग्नेलची आम्ही मुले हुशारच. 

आज पुन्हा एकदा हे नव्याने सिद्ध झाले कि आमची शाळा म्हणजे केवळ एक ज्ञानार्जनासाठी निर्माण केलेली वास्तू नव्हती. तर ते एक स्वप्न होते उदयासाठी  एक चांगले, सुशिक्षित आणि सुजाण असे व्यक्तिमत्व घडवण्याचे. ते ज्यांचे स्वप्न होते ते फादर ओरलँडो आणि ते हकिकतेत उतरवण्यासाठी त्यांना साथ देत झटणारे आमचे मुख्याध्यापक सबनीस सर आज या जगात नाहीत पण तरी त्यांच्या विचारांचे अस्तित्व आजही या जागेत टिकून आहे... ते त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामनात आजही कुठेतरी जिवंत आहेत. आयुष्याच्या प्रवासात अनेकजण भेटतात...अनोळखी चेहरे पुढे ओळखीचे होतात...आणि कधीकधी दुर्दैवाने ते आपली साथ सोडून त्यांची एक छाप सोडून या जगातून निघून जातात. अशा आपल्यातील मित्र-मैत्रिणींना आजच्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्यासोबतचे गोड-कडू क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले. त्यानंतर नाशिक ढोलाच्या दुमदुमत्या वातावरणात सर्व शिक्षक-शिक्षिकांना स्टेज वर मानाने बोलावण्यात आले. त्या सर्वांना आपल्या हातांनी  शाल आणि सन्मानचिन्ह देतानाही विद्यार्थ्यांचे आणि हा सत्कार स्वीकारताना शिक्षकांचेही मन अगदी भरून आले. 

कोणत्याही कार्यक्रमात इतर सर्व गोष्टींसोबतच जी एक गोष्ट कायम लक्षात राहते ती म्हणजे तेथील जेवणाची सोय. आजच्या कार्यक्रमातील जेवणाबद्दल तर बोलावे तितके कमीच. अगदी मस्त थंडगार पेय आणि स्टार्टर्स पासून ते खास मराठमोळ्या मेनू आणि आईस्क्रीम पर्यंत सर्व काही उत्तम आणि फक्त उत्कृष्ट च. तांदळाची भाकरी, ठेचा या दोन पदार्थांनीच थाळीला वेगळी शोभा आणली होती. सर्व शिक्षकांसोबत जमेल तितका अधिक संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आपल्या सोबत एका फ्रेम मध्ये आणण्याची प्रत्येकाची धडपड सुरु होती. आणि सर्व शिक्षक देखील अगदी आनंदाने या सर्वाला प्रतिसाद देत होती. आमच्या या सर्व गुरुजनांकडे पाहून एक गोष्ट मात्र आम्हां सर्वांनाच प्रामुख्याने जाणवली आणि त्या गोष्टीचे खरेच खूप कौतुकही वाटले. आणि ती म्हणजे ते सर्वच जसे २३ वर्षांपूर्वी होते अगदी तसेच आजही होते. पाटील सरांमध्ये तर मला पहिलीपासून ते कालपर्यंत या एकूण ३० वर्षांत दिसण्यात फरक जाणवलाच नाही. पाटगांवकर टीचर , साळवी टीचर ,जोशी टीचर, शिंदे टीचर, विद्या टीचर,अनिता टीचर, भागवत सर असे जवळजवळ सर्वच जण जणू वयानुसार अधिकाधिक तरुण होत होते. आणि शिक्षणासोबतच जगण्याची ही कला सुद्धा आम्हा सर्वांना हे सर्वजण पुन्हा एकदा नकळत शिकवूनच गेले. खरंच, या शाळेत जगण्यासाठी उपयोगी असे उत्कृष्ट शिक्षण तर मिळालेच पण त्याही पेक्षा जगावे कसे हे धडे वेळोवेळी मनावर गिरवले गेले. आणि कदाचित त्या संस्कारांमुळेच मी आज जी काही आहे ती आहे. खरंच अभिमान वाटतो अशा शाळेत , अशा गुरुजनांकडे लहानाचे मोठे झाल्याचा. Really feels proud to be an agrellite.  

दुपारी  ४ वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमाची अखेर १० -११ वाजता सांगता झाली. अवघ्या काही महिन्यांत दिसेनाशा होणाऱ्या त्या वास्तूला सर्वजण डोळे भरभरून पाहत होते. अगदी शेवटी मी आमच्या प्रि-प्रायमरीच्या वर्गांमध्ये डोकावून पाहिले ... तेच रंगीत छोटेछोटे बेंचेस त्याच रंगीत चित्रांनी गोष्टी सांगत रंगलेल्या भिंती. १३ वर्षांचा प्रवास सरसर करत डोळ्यांसमोरून जात होता. शाळेची ती 'U' आकारातील प्रतिमा तर कायम मनात घर करून राहील. या असंख्य आठवणींना पुन्हा एकदा सर्वांसोबत जगण्याची संधी देणाऱ्या सर्व आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार मानावेसे वाटतात. इतक्या वेगवेगळ्या वयोगटातील सर्वांना शोधून एकत्र आणणे आणि ज्याप्रमाणे आज कसलेही गालबोट न लावता हे स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या पार पडले तसाच योग पुन्हा कधीतरी नक्कीच जुळून येईल या विश्वासासोबत आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींचा , गुरुजनांचा आणि खास करून आमच्या प्रिय शाळेचा निरोप घेतला... हा निरोप समारंभ फक्त बाहेरून होता...मनापासून तर आम्ही कायम तिथेच असणार होतो किंवा शाळेला मनात साठवून आपल्यासोबत घेऊन जाणार होतो. तिथे भविष्यात निर्माण होणाऱ्या नव्या वास्तूमध्ये ते कोपरे , त्या जागा अगदी तशाच दिसणार नाहीत पण तेथल्या कणाकणांत कुठेतरी आमच्या आठवणी नक्कीच सापडतील.आणि त्या शोधण्यासाठी असाच आणखी एक ' पुनःश्च ऋणानुबंध ' भविष्यात व्हायलाच हवा, हो कि नाही ? 

तुम्हांला काय वाटते ?

- रुपाली ठोंबरे.