Pages

Monday, February 16, 2015

तू अन मी …संसाराच्या नावेत स्वार होऊन वाहत जावे



दोन प्रियकारांतील प्रेम जे समाजाला समजत नाही  अथक प्रयत्नानंतरही जे स्वप्न हकीकतेत उतरवता येत नाही म्हणून मन मारून निरोप घेत असताना …


 तू तिथे अन मी इथे
प्रीतीची नदी वाहते अधांतरी रे
या नदीचे आपण दो किनारे
असेच आहे आपले अनोखे नाते

या पात्राच्या पाण्यावरचे हळुवार तरंग
हालते असेच काही माझे अंतरंग
वाटे हवाहवासा तुझा सदा संग
भरावे या नात्यात नविन रंग ।।

रुंद-अरुंद नागमोडी वळणांवरती
दोघे उभे एकाच क्षितिजावरती
तू अन मी , अंतर कधी कमी-जास्ती
नकळता लूप्त होईल का सारे , ही धास्ती ।।

हि प्रीती केवळ कल्पना नाही ,आहे खरी
वाटे तरुनि जावे , गेला कधी तोल जरी
भाव दोघां मनांतले सारखेच तरी
काय असे जे निर्मिते खोल दरी ।।

तट दोघे आसुसलेले मिलनासाठी
प्रीतीची स्वर्गमयी तृप्ती
अनुभवण्याची ओढ मनात जरी
ओंजळीत स्मृतीफुले घेवून तिथेच थांबलेली ।।

का असा खेळ खेळावा नियतीने
अशी अवस्था मंडळी काळाने
एकाच पात्राच्या दो तीरांनी
का एकमेकांस आज घायाळ करावे ?

वाटे उतरून या भवसागरात आता चिंब भिजावे
वाटे आता उजळावे भाग्य सोनेरी
अन कायमचे एकमेकांत विरघळून जावे
स्वप्नांतले ते सौम्य क्षण पुन्हा गोंजारावे
संसाराच्या नावेत स्वर होऊन तुझ्यासवे वाहत जावे ।।

सुखाच्या चाहुलीत ही या , आहे समाधान
तू दिलेल्या माळेतून निखळलेले ते क्षण
करून देतील देखाव्याची पुन्हा आठवण
तुझ्यासमोर नेहमीच असावी सुखफूलांची पखरण
काल-आज-उदयाही हेच मागेल माझे मन ।।

या सरितेने सतत मृगजळापरी मनात वाहत राहावे
तिच्या संगे दो किनारे अखंड सामोरी असावे
त्या शुद्ध निर्मळ जलाचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेत राहावे
चुकूनही ते कधीही गढूळ न व्हावे
झालेच असे जर
        तर एक किनारा नेहमीसाठी होईल मुग्ध
        दुसरा पाहून हे सारे होईल स्तब्ध ।।

 
- रुपाली ठोंबरे 



2 comments: