Pages

Thursday, March 26, 2015

आज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी ...


( लग्न म्हटले कि हळद आलीच. हळदीचा तो पिवळा रंग समारंभाला खरेच सोन्याचे रूप देतो . आणि अशा हळदीत नटलेली नवरी आनंदात हा सोहळा अगदी मन भरून अनुभवत असते .)



भाळी मुंडावळी ओळी
गाली मोतीयांच्या लडी
आली उन्ह पांघरून नवरी
मोडली आज पैठणीची पिवळी घडी ।।

भाव लाख सांगतात
डोळे लाजत काजळी
नाकी नथ अशी
जशी शोभे मोत्यांची पाकळी ।।

मुग्ध ओठांत त्या लाल
दडल्या किती गुजगोष्टी
ऐसे हासत लावण्य
बैसे चंदनाच्या पाटी ।।

प्रथम पाहिले होते हिला घरी पाळण्यामंदी
आज शोभतेया दारी लावून पिवळी हळदी
आई-बापास कळेलेच नाही
मोठी  झाली लेक अशी  कधी ।।

सोनचाफा हसतो केसांत
सांगतो गूज काय घडले या दिवसांत
त्याच्यासंगे झेललेल्या सरी पावसात
आज भर घालतात हिच्या सौंदर्यात ।।

गोऱ्या करांत चुडा पाचूचा खेळे मेंदीसंगे
मेंदीत दडले रंग-गंध जीवनाचे सारे
पिवळे झाले आज अंग अंग सारे
मनात वाहतात सौम्य सौख्याचे वारे ।।

                                             
                                        - रुपाली ठोंबरे


1 comment:

  1. प्रथम पाहिले.... २ ओळी, मोठी झाली लेक अशी कधी च्या नंतर असाव्यात.

    ReplyDelete