मी एक निरागस तितकीच सहनशील,सौम्य तितकीच कतृत्ववान,प्रेमळ तितकीच कठोर अशी या पुरुषांच्या जगात वावरणारी देवाची एक अनमोल देण -एक स्त्री .
या जीवनपटावर विविध भूमिका साकार करीत मी आजही तुम्हा सर्वांमध्ये अस्तित्वात आहे . मुल जन्माला येते आणि मी आईच्या ममतेने त्याच्या जीवनाची या जगातील सर्वात गोड आणि अमुल्य अमृताच्या पान्ह्याने सुरुवात करते . जरा मोठे होत असताना बहिणीच्या वेड्या मायेने त्याच्यासोबत खोडकर बाल्याचा आनंद घेते . त्याचे सुख - दुःख समजून घेवून त्याला योग्य ठिकाणी योग्य सल्ला देणारी जिवाभावाची मैत्रीण बनते . तारुण्यात पदार्पण करताच सौख्य,आनंद, यांना गोंजारत विश्वासाची साथ देत त्याची सहचारिणी बनते. आणि नंतर कधी गोंडस ,निरागस बाळ म्हणून त्याच्या पदरात देवाची अमुल्य देण या रुपात त्याच्या जीवनात प्रवेशते. माझ्या रूपातील एक धागा प्रत्येक पुरुषाच्या जीवनात त्याचे जीवनवस्त्र विणत अखंडपणे कार्यरत आहे . कालानुरूप या धाग्याचे रूप बदलते पण मी एक स्त्री नेहमी कोणत्या ना कोणत्या रुपात त्याच्यासोबत असते. पण मी खरच खुश आहे ? मी सुरक्षित आहे? मला काय वाटते हे कोणी समजून घेण्यासाठी या जगात आहे? अशा असंख्य प्रश्नांनी माझी सर्व रूपे आज जणू वेढून गेली आहेत.
आज या जगात आई ,बहिण , मैत्रीण ,पत्नी या सर्व नात्यांत मी जितकी हवीहवीशी वाटते तीच कधी कधी त्याला मुलगी म्हणून इतकी नकोशी का असावी या प्रश्नाचे योग्य पटण्याजोगे उत्तर कधी तरी मिळावे ही एका स्त्रीची,माझी अपेक्षा.आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखांसाठी तो नेहमी देवीपुढे गुडघे टेकतो . पण याच देवीचे रूप म्हणून घरी जन्मास आलेल्या मुलीचे स्वागत आनंदाने का होऊ नये ? असे म्हणतात कि माणूस जन्माला येतो तो त्याचे नशिब घेवून .पण दरवर्षी हजारोंच्या संख्येने भृण हत्येस बळी पडणाऱ्या त्या चिमुरड्यांच्या नशिबाचे काय?का त्या नशिबवान नाहीत ? पण एक उत्तुंग स्वप्न उराशी बाळगून नवचैतन्याने या जादूमयी जगात स्वतःचे नशिब अजमावण्यासाठी आलेल्या या इवल्याशा कन्येला साधे जगण्याचीही संधी दिली जात नाही. कधीकधी तर ज्या जगात येण्यासाठी त्या इतक्या उत्सुक असतात, त्याच जगात तिचेच आपले तिचा या जगात होणारा प्रवेश नाकारतात . मी "बाबा, मला वाचवा" म्हणून खूप हाका मारते पण पुत्रप्राप्तीसाठी आसुसलेल्या बापाला साधी माझी किंचाळी ऐकू येत नाही किंवा तो न ऐकल्याचे नुसते ढोंग करतो. मुलीच्या आगमनाने आनंदाने पेढे वाटणारा बाबा पहिला कि खूप हायसे वाटते .
हेही तितकेच खरे कि काही घरात मुलींना लक्ष्मीच्या रुपात आनंदाने स्वीकारले जाते पण खुपदा अशा घरांतही एक महत्वाचा मुद्दा दृष्टीक्षेपास पडतो आणि तो म्हणजे घरामध्येच होत असलेला मुलामुलींमधला भेदभाव. आज जर आपण "जे एक मुलगा करू शकतो तेच एक मुलगी करू शकते " हे मान्य केले असले तरी घराघरांमधील हे वातावरण कधी बदलणार . चांगले अन्न ,चांगले कपडे,शिक्षण या सर्व गोष्टी मुलगा असो वा मुलगी, त्यांना एकसमानच मिळायला हवी. त्यांच्यामध्ये दुराभाव असूच नव्हे.माझी अशी ही केविलवाणी अवस्था आणि त्यावेळी मला काय वाटते याचा कोणी तरी विचार करत असेल का ? आजही कित्येक कुटुंबांमध्ये मला येणाऱ्या या अनुभवामुळे मी खूप संकोचित होते.
लग्न झाल्यावरही नव्या संसाराचे सुंदर स्वप्न मनी गुंफून मी एका नव्या घरात गृहप्रवेश करते . घर,तिथली माणसे ,वातावरण ,चालीरीती सर्व वेगळे असले तरी मी ते सर्व आपलेसे करून घेते. पण तरी हुंडा हवा म्हणून किंवा वंशाचा दिवा हवा म्हणून होत असलेला माझा छळ आजही कित्येक ठिकाणी सुरूच आहे .
पुरुषांच्या या जगात खरेच स्त्री किती सुरक्षित आहे? वर्तमानपत्रातील रोजच्या बातम्या पाहता मी घरात किंवा बाहेर अजिबात सुरक्षित नाही हे अगदी अचूक समजू शकेल . आज शिक्षणानिमित्त , कामानिमित्त सतत घराबाहेर असणारी मी सतत एका अनामिक भीतीमध्ये वावरत असते. प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नजरांना सामोरी जाताना घरात किंवा बाहेर कुठेही आणि कोणत्याही क्षणी काय होईल याची कल्पनाच अंगावर शहारे आणतात . आणि कधी असे काही अघटित घडले तरी मला किती न्याय मिळेल याची खरेच काहीच शाश्वती नाही . कारण बहुतेक वेळा दूषण हे मलाच लावले जाते मग परिस्थिती काहीही असो. अशा समाजाकडून मी काय अपेक्षा करावी हेच कळेनासे झाले आहे.
आजची स्त्री हि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालू शकत असली तरी नोकरीच्या ठिकाणी ,समाजात वावरताना मला खुपदा दुय्यम स्थान मिळते. का?
खुपदा घरी,बाहेर सतत होत असलेल्या अशा मानसिक ,शारीरिक छळाला कधीतरी पूर्णविराम लागायलाच हवा. अशी मी खूप घाबरलेली , बावरलेली ,एक नवा आधार शोधत विचारांच्या ,प्रश्नांच्या ,शंकांच्या अनंत वलयांमध्ये बिंदूपाशी थांबलेली आहे.स्वतःचे या जगात असलेले अस्तित्व शोधत आहे. माझ्यातील स्त्रीशक्ती उत्तेजित करून स्वतःच येणाऱ्या अशा संकटांवर मात करण्यासाठी सज्ज होत आहे.
- रुपाली ठोंबरे .
No comments:
Post a Comment