मागची कविता " बाबा ,लवकर या ना " एका बाळाची कामासाठी दूर गेलेल्या त्याच्या बाबांसाठीची निरागस हाक होती तर ही कविता त्या हाकेला बाबांनी दिलेली केविलवाणी पण तितकीच सुंदर,प्रेमळ ,खरी साद आहे…
दूर सागराचा किनारा
तिथे दूर राहिला निवारा
येण्या परत अपुल्या घरा
बाळा , भेटण्या तुला…जीव माझाही होई कावराबावरा ।।
तुझं टाकलेलं पाऊल पहिलं
बा- बा-बा-बा बोल बोबडं पहिलं
निरागस रूप खळाळत्या हसण्यातलं
सारंच बघायचं माझं चुकलं …सुखावलो पाहून जे आईनं होतं टिपलं ।।
पाहत सागरात रोज येत-जात नावा
माझ्याही मनात उडे आठवांचा थवा
दूर जरी…ऐकतो मी तुझा माझ्यासाठीचा धावा
तुझ्या-माझ्या मनांचा असा दुवा…कधी न होईल कमी जरी आहे हा दुरावा ।।
रोज बघून मुला,ऐकून तुला
वाटे कुशीत घ्यावे लगेच तुला
सावरतो हळूच मग मीच मला
आसवांच्या पूरातही वाट काढतो…फुलवण्या तुलाच उदयाला, माझ्या फुला ।।
हाक तुझी येता येईन असा मी धावून
या वेळी खरेच बाळा, मी लवकर येईन
पण थांब जरा दोन दिवस धीर तू धरून
माझ्यासारखाच मित्र माझा निघाला घरून …तुझ्यासारख्याच पिल्लाचा निरोप घेवून।।
- रुपाली ठोंबरे.
No comments:
Post a Comment