Pages

Friday, July 31, 2015

लघु होई गुरु हाच सन्मान जगी गुरूचा ।।

आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच "गुरु पौर्णिमा " किंवा "व्यास पौर्णिमा". 'गुरु' या शब्दाचा अर्थच महान,मोठा. 'गु' या शब्दाचा अर्थ आहे अंधार (अज्ञान ) आणि 'रु' या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश (ज्ञान) . अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गुरु. गुरु सकळ जीवास  शिकवतो ,संस्कार देतो. गुरु सत्व ,रज,तम या त्रिगुणांच्या पलिकडे असून शुद्ध ,अतिपवित्र आणि आत्मज्ञानी आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी अथक परिश्रम आणि सोबत श्रद्धा ,विश्वासाची जोड हवी असते. आणि ती प्रेरणा शिष्याला गुरूकडूनच मिळते. निष्ठावान भक्ताला गुरुमुळेच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते . एखादा जरी सामान्य असेल तरी आपल्याला हव्या त्या क्षेत्रात तो असामान्य असेल तर आपल्यासाठी तो गुरूच. गुरुरूपी प्रकाश अज्ञानापासून ज्ञानाकडे , अनीतिकडून नीतिकडे , दुर्गुणापासून सद्गुणाकडे  , विनाशापासून कल्याणाकडे , शंकेपासून संतुष्टीकडे , अहंभावापासून विनम्रतेकडे आणि पशुत्वापासून मानवतेकडे जाणारा मार्ग दाखवत असतो. गुरूचरणामृताच्या एका थेंबापासून प्राप्त होणारे फळ सर्व तीर्थक्षेत्रात स्नानातून मिळणाऱ्या फळापेक्षा हजारपट अधिक असते.गुरू एक परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे.गुरूची कृपा असेल तेथे विजय निश्चित आहे.गुरू-शिष्य नाते तर्कापेक्षा श्रद्धा, आस्था व भक्तिवर टिकून असते. भावनिक प्रदर्शन म्हणजे गुरूभक्ती नव्हे. भक्ति म्हणजे समर्पण. शिष्याचे गुरूप्रति समर्पणच गुरू-शिष्य नात्याची वीण अधिक घट्ट करत असते.निर्जिव वस्तूला वर फेकण्यासाठी सजीवाची गरज असते. त्याच प्रकारे पशुतुल्य मानवाला देवत्वाकडे वाटचाल करायची असेल, तर सद्गुरूची आवश्यक्ता असते.गुरू म्हणजे जो लघू नाही तो. म्हणजेच लघुला गुरू बनवितो तो गुरू.जीवनाच्या निसटत्या प्रवाहात स्थिर राहतो तो गुरू. कनक (सोने), कांता (स्त्री) आणि कीर्ति यांच्या झंझावातातही तो स्वतःचे अस्तित्व राखतो तो गुरू.जीवनाचं तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो म्हणजे गुरू.जो शिष्य गुरूचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहेगुरूदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे. शिष्याचे सूर्याप्रमाणे देदिप्यमान होणे हीच गुरूला दिलेली सर्वांत योग्य गुरूदक्षिणा आहे.
 


झरोक्यातून येणारा प्रकाश कवडसा ।
अंधाऱ्या खोलीत दिवा इवला जसा ।।

विशाल सूर्याचा झोत ज्ञानरुपी प्रकाशाचा।
नाश करी काळोखरुपी अज्ञानाचा ।।

मार्ग विनाशापासून कल्याणाकडे नेणारा।
अहंभावातून विनम्रता  ठायी आणणारा ।।

शंकांपासून संतुष्टीपर्यंत प्रवास शिष्याचा।
लघु होई गुरु हाच सन्मान जगी गुरूचा  ।।

भिंगाशी एकवटून संस्कारांची किरणे।
कागदाशी लपेटून एका ज्योतीचे जन्मणे ।।

ज्योतीतून प्रकाशणारा सर्वकल्याणरुपी ज्ञानसुर्य।
गुरुदक्षिणा ही अर्पणारा शिष्य जो, तोच खरा धन्य ।।

-  रुपाली ठोंबरे. 


( प्रस्तावनेचा काही भाग "http://marathi.webdunia.com" मधून घेण्यात आला आहे)

2 comments: