Pages

Sunday, October 25, 2015

"कृती नष्ट करी भीती "

प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती असतेच. एकदा एकाने सांगितले ,
खरेतर भीती नसतेच. ती म्हणजे आपल्या मनाची फक्त एक नकोशी वाटणारी कल्पना असते. पण मला वाटते भीती खरोखर अस्तित्वात असते. तिचे अस्तित्व आपण अनुभवू शकतो… भीतीने खंगत चाललेली तब्येत, विविध आजार , जेव्हा बोलावेसे वाटते तेव्हा नेमकी अनुभवास येणारी शांतता ही सर्व भीती दर्शवणारी चिन्हेच आहेत.

भीतीमुळे माणसाला होणारा सर्वात मोठा तोटा म्हणजे खचत जाणारा आत्मविश्वास. खरोखरच भीती ही मनुष्याला लाभलेली एक मोठी नकारात्मक शक्ती आहे.…माणसाला जीवनात जे हवे ते मिळवण्यापासून परावृत्त करणारी. ही एक प्रकारची मानसिक नकोशी वाटणारी गोष्ट आहे.आणि या शक्तीला योग्य पद्धतीने वेळीच आवर घातला नाही तर ही पुढे त्रासदायक आणि तितकीच धोकादायक बनेल यात शंकाच नाही.

भीती नाहीशी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे त्या भीतीशी संबंधित कृती अंमलात आणा . जेव्हा आपण एखाद्या समस्येत अडकतो तेव्हा जोपर्यंत आपण त्यावर एखादा पर्याय शोधून त्याची अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आपण असंख्य प्रकारच्या प्रश्नांनी वेढलेलो असतो. परंतू एकदा का 'सर्व ठीक होईल' अशी सकारात्मक आशा बाळगून योग्य तो निर्णय घेऊन त्यादिशेने पाऊले टाकली की अर्धी लढाई जिंकलोच. आणि उरलेली अर्धी … टाकलेले पाऊल यशस्वीरित्या पार पडल्यानंतर.पुढे हीच यशस्वी खेळी आणखी मोठे पाऊल उचलण्यास प्रोत्साहित करतात आणि अशाच प्रकारे आपल्यात प्रगती होत जाते. आणि सुरुवातीला वाटणारी भीती कधी गायब झाली हे आपले आपल्यालाच कळत नाही.

पण यासोबतच एक लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना उद्भवणारे अनमान, दुविधा, दिरंगाई हे भीतीवाढीसाठी घातलेले खतपाणीच ठरते. म्हणून योग्य निर्णय घेणे जितके महत्त्वाचे तितकीच तो घेण्यासंबंधीची तत्परता मोलाची.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनेकांना गाडी चालवण्याचे भय असते. पण फक्त मला भीती वाटते म्हणून मी हे करू शकत नाही असे म्हणून अंग झटकले की आयुष्यात खरेच कधीच आपण ड्रायव्हिंग करू शकणार नाही हे आपण स्वतःच सिद्ध करून दाखवतो. अनेकांना उंचीचे ,पाण्याचे ,काळोखाचे भय असते. आणि त्या भयाला सतत एक सबब म्हणून पुढे करता करता आपण ती भीती आणखी खोलवर रुजवत जातो. हे नाही म्हटले तरी एक अयशस्वी माणसाचे लक्षण आहे. 

पण याउलट एक सकारात्मक जिद्द मनाशी बाळगून या भीतीचे कृतीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला की योग्य मार्गदर्शन, एकाग्रता, सकारात्मक दृष्टीकोन आणि नवे काही शिकण्याची चिकाटी या सर्वाच्या सहाय्याने नक्कीच माणूस कधीतरी यशस्वी होऊ शकतो. आणि मग यशाची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पडली की दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचण्यास आपल्यातला नव्याने जन्मलेला आत्मविश्वासच मदत करतो. अशा रितीने एक ,दोन ,तीन … अगदी शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर पूर्वी वाटणाऱ्या त्या बलाढ्य भीतीचे अस्तित्वच नष्ट होते…आणि उरतो तो एक नवा ताजा आत्मविश्वास….



- रुपाली ठोंबरे 


3 comments: