Pages

Tuesday, March 1, 2016

आज १ मार्च....स्व-इजा जागृती दिवस





आज पर्यंत आपण व्हॅलेन्टाईन्स डे,मदर्स डे ,फ्रेन्डशिप डे असे कितीतरी दिवस ऐकले असतील, साजरे केले असतील. पण आज १ मार्च … आज कोणता दिवस असेल ठाऊक आहे का ? विचार करून बघा. नाही माहित ना ? आज आहे सेल्फ इंज्युरी अवेअरनेस डे (Self-Injury Awareness Day ).स्व-इजा जागृती दिवस……  नक्कीच असा कोणता दिवस अस्तित्त्वात आहे याची  खूप जणांना कल्पनाही नसेल. 


 तर काय आहे या दिवसाचे महत्त्व? त्या आधी "स्वतःला इजा" हा काय प्रकार आहे हे समजून घेतले पाहिजे. तर आपल्या प्रत्येकालाच माहित आहे कि आयुष्य हे कधीच सरळ नसते. त्यात कमी-अधिक , यश-अपयश ,सुख-दुःख, आनंद-उदासीनता असे भावनांचे नेहमीच चढ-उतार असतात. काहींच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टींचे प्रमाण अधिक असते तर काहींना अशा गोष्टींचा सामना करण्याची सहनशक्ती कमी असते. मग अशा व्यक्तींमध्ये भावनिक असमतोल आणि त्यासोबतच अशा अदृश्य वेदना वाढू लागतात. मग अशा वेळी या भावनिक वेदनांचा सामना करण्यासाठी तो स्वतःला शारीरिक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ही अशा प्रकारची नकळत पण दीर्घ काळात उत्पन्न होणारी मानसिकता म्हणजेच "स्व-इजा (Self Injury)". 

हे समजून घेतले पाहिजे कि स्वतःला इजा पोहोचवून आपण एक तात्पुरता आराम मिळवू शकतो. पण होणारा त्रास मुळापासून नष्ट होत नाही. उलट तो नव्या पद्धतीने वाढतच जातो. आणि त्यातून नवे दुःख निर्माण होते. आणि हा प्रकार कोणाच्याही बाबतीत कधीही घडू शकतो. वय,लिंग ,धर्म यातील कशाचेही बंधन नाही.इतरांकडून होत असलेल्या सततच्या निंदेमुळे खालावलेला आत्मविश्वास, इतरांकडून होत असलेला मानसिक किंवा शारीरिक अत्याचार, स्पर्धेमध्ये मागे पडत असताना नकळत मनात उत्पन्न होणारा स्वतःबद्दलचा कमीपणा अशा कितीतरी कारणांमुळे माणूस दुखावला जातो. पण अशा वेळी अशा भावनिक चढ-उताराशी सामना करण्याची योग्य शक्ती निर्माण करणे ,घटनांना समजून घेऊन सकारात्मक विचारक्षमता वाढवणे,लढण्याची योग्य अशी मानसिक तयारी दाखवणे हाच यावर एकमेव उपाय आहे हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. आणि या बद्दल जागृत करणे हेच या दिवसाचे महत्त्व आहे. 

गेल्या सतराहून अधिक वर्षांपासून दर वर्षी १ मार्च या दिवशी जगभरात SIAD (Self-Injury Awareness Day) हा उपक्रम राबविला जातो. पण अशा दिवसाला पाठींबा देणाऱ्या LifeSIGNS सारख्या काही मोजक्याच संस्था असल्यामुळे आपल्याला या दिवसाची कल्पनाही नाही. अशा संस्था या प्रकाराबद्दल जनजागृती तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सदा तत्पर असतात. काही लोक केशरी फीत हातात धारण करून तर काही दंडावर 'प्रेम(Love )' असे लिहुन,काही जण मनगटावर फुलपाखरू काढून या दिवसाबद्दल जनजागृतीसाठी प्रोत्साहित करतात.

खरेतर "स्वतःला इजा" या प्रकाराबद्दल जागरुकता वाढविणे ,विश्वास बसणार नाही इतके महत्त्वाचे आहे. अशा जागृतीमुळे,आपल्या थोडयाशा योग्य सहानुभूतीने ,दिलेल्या समजुतदारीने आपल्या आसपास असलेल्या अशा कितीतरी ग्रस्त, एकाकी पडलेल्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल. आणि हीच आजच्या काळाची एक महत्त्वाची गरज आहे.  

- रुपाली ठोंबरे .  

3 comments:

  1. हा असा काही दिवस अस्तित्वात आहे हे खरच आज च कळल.

    ReplyDelete
  2. असा दिवस माहित नव्हते. कां बरं साजरा होर असावा असा दिवस ? आत्मा इजा करून घेण्यासाठी नक्कीच नव्हे असे दिवस केले जावू नयेत.

    ReplyDelete
    Replies
    1. Rad it properly to understand actualreason behind it.normally samajat ase prakar ghadat astat ani aplya sarakhe tya kade durlaksha kart astat.tyasathi aahe ha divas.

      Delete