Pages

Monday, June 13, 2016

तसं मैत्रीनं....

फेसाळलेल्या सागराला भरतीचं उधाण यावं
तसं गप्पांच्या ओघात मैत्रीनं खळखळून हसावं

तापलेल्या भूईवर सरीनं झेपावून अत्तर उधळावं
तसं रागाच्या ओघात मैत्रीनं हक्कानं बरसावं

काटयांच्या सहवासातही गुलाबानं हसत बहरत फुलावं
तसं सुख दुःखाच्या क्षणांतही मैत्रीनं निरंतर नातं जपावं

सैराट सुटलेल्या प्रिय घोड्याला लगामानं आवरावं
तसं सैरभैर होवून चूकताना मैत्रीनं प्रेमानं सावरावं

परिमळानं दरवळणारया फुलांना हिरवळीनं अलगद झेलावं
तसं क्षणाक्षणाला फुलणारया मैत्रीच्या नात्याला ओंजळीत घ्यावं

नदीच्या प्रवाहात नावेनं पाण्यासोबत दूरवर तरत जावं
तसं जीवनप्रवासात या मैत्रीनं अंतापर्यंत सोबत रहावं

सूर्यास्ताच्या सूर्यानं जाता जाता प्रतिबिंब डोळ्यांत साठवून जावं
तसं मैत्रीनं मैत्रीचे ठसे एकमेकांच्या हृदयांत नेहमीसाठी उमटवून जावं

जगदिवा मावळला तरी ध्रुवतारयानं दिशाभान नित्य जसं दाखवावं
तसं थोड्याश्या गैरसमजूतीनंतरही मैत्रीनं आपुलकीननं जवळ घ्यावं

न संकोचता सहजपणे जीवनपुस्तक समोर तुझ्या मी उलगडत जावं
कधी मुग्ध कधी बोलक्या तुझ्या सोबतीत जीवनकोडं सोडवत जावं

मनांच्या तारा जुळत जाऊन सहवासाचा मधूर राग छेडत जावं
ना बंध ना वचनांत अडकून मैत्रवेलीनं उंच अवकाशी भिडत जावं

- रुपाली ठोंबरे.






Sunday, June 12, 2016

कोरायचे कोरया काळजावरती

कधीतरी कोणीतरी काजळी कटाक्षात कळतनकळत काही कोरायचे
कोरायचे कोरया काळजावरती, कानांत काव्य केयुर कुजबुजायचे

कालिंदीकिनारी काळोख्या कुशीत, काजव्यांच्या कवेत
कवेत कुणाच्या कधीतरी कल्पनांचे कनककाव्य करायचे
कांचन कंकणांची कीणकीण कोमल कामिनी करांत
करांत कुणाच्या कधीतरी करबंधन कळतनकळत करायचे

केशसंभारातल्या काक्ष कळ्यांची कस्तूरी कामनेत कुणी
कुणी कधीतरी केशरकुपीतुन कचकचून कवटाळायची
कुंजातल्या कारंज्यात, कैरवीत करमणारी कंसाकृती कोर
कोर किमयेची कणाकणात काळजात केवळ कोरायची

- रुपाली ठोंबरे


Saturday, June 11, 2016

सोहळा नवा रुपेरी

आज पहाटेच उघडला डोळा
समोर उभा होता मेघ सावळा
लालबुंद सूर्य त्याने हुशारीने झाकला
आणि तांबूस आकाशी काळोख दाटला
मी क्षणभर भ्ययाले मग भानावर आले
गार वारयावर मन अलवार तरंगत गेले
आनंदाचे अंकुर फुटले या मनात रडव्या
वेली झुलू लागल्या वारयावर होऊन हळव्या
झाडे डुलू लागली, पान पान पिटती टाळया
फुलाफूलांत फुलू लागल्या कळ्या कोवळ्या
कुजबुजली पाखरेही,"आज काय गजब झाला?"
पहातापहाता आकाशातला पिसारा पार काळवंडला
पापण्यांची माझ्या होते न होते पुन्हा उघडझाप
टपटपणारया थेंबांनी मारलीच आत्ता दारावर थाप
धगधगत्या धरणीवर झेपावल्या बघ सरींमागुन सरी
उघडत सुगंधाच्या खाणी बरसला नवा पाऊस रुपेरी
मेघगर्जनेतही आज गीत जणू छेडल्या अनंत सुखतारा
अश्रूही विरले आज भिजून गेल्या सारया घामांच्या धारा
जलक्रिड़ेत आज रमली सृष्टी, तरणी ही झाली वधू नवेली
गारव्याचा मंद सडा शिंपत दारी चढल्या थेंबाथेंबांच्या हजार वेली
पाहून हा सोहळा नवा रुपेरी आनंदली सारी जीवनधारा
नाव नाजूक इवलीशी डोकावली...पिऊन घेण्या पाऊस सारा.

- रुपाली ठोंबरे.

Monday, June 6, 2016

पावसाच्या सरींमध्ये तुझ्यासाठी भिजताना

आज कित्येक महिन्यांपासून
अडगळीत राहून कोंदटलेले
सारे श्वास मोकळे झाले
गर्रकन गोलाकार फिरताना मला पाहून
माझे खुललेले हवे तसे रूप पाहिले
अन तुझ्या चेहर्‍यावरचे चिंतेचे सावटच दूर झाले

ऊन बरसणार्‍या निरभ्र आकाशात
सावळ्या मेघांची आज गर्दी झाली
ढोल ताशांच्या अजब स्वागतात
पावसाची पुन्हा हासत वर्दी आली

आज मीही नव्याने बाहेर पडेन
आकाशातून बरसणारे मोती झेलण्यासाठी
घोंगावणारया वारयासोबत खूप भांडेन
तुझ्यासोबत असणारे गोड नाते जपण्यासाठी

माझ्या अंगाला असलेला ऊबट वास आज
भिजलेल्या मातीच्या कस्तूरीत विरुन जाऊ दे
क्षणाक्षणाला भिजताना गाली दाटणारी लाज
या सृष्टीत विरुन रंग माझा अधिकाधिक खुलू दे

डबक्यानी भरलेल्या आडवाटेवरून चालताना
सांभाळणारया तुझी तू मुळीच काळजी करू नकोस
जोपर्यंत आहे तुझ्या हातात माझा हात
पावसाच्या सरींमध्ये तुझ्यासाठी भिजताना
आनंदणारया माझी तू मुळीच काळजी करु नको
तोपर्यंतच तर ही 'छत्री' राहील तुझ्या सहवासात

- रुपाली ठोंबरे.

Thursday, June 2, 2016

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी !


त्या दिवशी सहजच शालेय वर्ग मित्रमैत्रिणींची छान मैफिल जमली. जुन्या आठवणी ,आजचे धकाधकीचे जीवन , उदयाच्या भविष्यासंबंधीच्या योजना अशा अनेक भूत-वर्तमान-भविष्याच्या विषयांच्या मार्गावर थांबत आमची गप्पांची गाडी वेगात वळणे घेत पळत होती. आम्ही सर्व मराठी मिडीयम मधूनच पुढे आलेलो त्यामुळे प्रत्येकाच्या मनात मराठी विषयी माझ्या इतकाच नितांत आदर असेल ही माझी आजपर्यंतची धारणा. पण " आपल्या मराठी शाळेला आता पुरेश्या विद्यार्थ्या अभावी कायमचे कुलूप लागणार कि काय?" या विषयावर सुरु झालेल्या चर्चेत माझ्या या धारणेला बऱ्यापैकी तडा गेल्याचे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले.
कित्येकांचे मत होते ,
   
  "काय करायचे आहे मुलांना मराठी शिकवून ?शेवटी तर या जीवनाच्या रहाटगाड्यात इंग्लिशचीच हांजी हांजी करायची आहे. फार तर हिंदी तरी किमान कुठेतरी उपयोगी येईल.पण मराठी … छे ! उगाच वेळ आणि परिश्रम वाया जायचे… आपले आणि मुलांचेही.त्यापेक्षा इतर कोणत्या तरी क्लासला टाकेन मी माझ्या मुलाला. तेवढेच काही नवीन उपयोगी शिकेल . आता हेच पहा ना … आपण दहावीपर्यंत मराठीत मर मर शिकलो पण पुढे कॉलेजमध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी अडखळलोच ना ?तो मराठी ते थेट इंग्लिश हा प्रवास अवघ्या काही महिन्यांत कसा पार पाडला हे आपले आपल्यालाच माहित. त्यावेळी आपल्या आईवडिलांनी लहानपणीच कॉनव्हेंट शाळेचे दर्शन का घडवले नाही ही खंत नाही म्हटले तरी कितीदातरी या मनास भेट देऊन जात असे."

तर काहींच्या मते मराठी शिकणे म्हणजे वेळेचा अपव्ययच जणू . मराठी येत असूनही ती उच्चारल्यास समाजात आपला दर्जा कमी होईल या भीतीने काहीजण उगीचच येत नसलेल्या भाषांना नको त्या ठिकाणीही कुरवाळत राहतात. कधी कधी याचा परिणाम विचित्रच घडतो. माझ्यासारखेच इतरही मराठीभाषिकप्रेमी त्या ग्रुपमध्ये हजर होते , ज्यांनी आपापली मते स्वच्छंदीपणे मांडली. एकाने तर माझी मुले फक्त मराठी भाषेसमोरच झुकतील आणि इतर कोणत्याही भाषेला आमच्या ठायी थारा नसेल अशी अवास्तव अतिशयोक्तीही केली.

या विषयावर माझे म्हणणे फार सोपे होते. एखादया भाषेवर अथवा गोष्टीवर कितीही प्रेम असले तरी कोणत्याही परिस्थितीत वास्तव जग नाकारता येत नाही… काळाची गरज समजून त्यानुरूप वागणाराच योग्य ठरतो.आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही कारणास्तव स्थान निर्माण करायचे असेल तर इतर भाषांचाही मोठ्या आदराने स्वीकार करायलाच हवा, पण निश्चितच आपल्या मातृभाषेच्या प्रतिष्ठेला जरासुद्धा धक्का न लावता. भले तुम्ही जन्मापासून मुलांना इंग्लिश भाषेतून शिक्षण द्या अगदी शेवटपर्यंत. पण त्यातून मराठी भाषा- आपली पूर्वापार चालत आलेली बोलीभाषा पूर्णपणे बाद करू नका. मराठी भाषेची गोडतिखट चव नक्कीच प्रत्येक मराठी पालकाने आपल्या लहानग्यांना चाखायला दिली पाहिजे.आणि मग पहा. त्या मायेच्या स्पर्शातून त्या कोवळ्या मनांवर बिंबवले गेलेले संस्कार जन्मभर त्यांची सोबत करून राहतील. आपला मुलगा मराठी बोलतो यात न्यून नाहीतर अभिमान वाटला पाहिजे. आणि आज आपल्या आसपास पाहिले तर हे मराठी विश्व नव्याने फुलत चाललेले अगदी प्रत्यक्षरीत्या दिसेल.गेल्या काही वर्षांत मराठी आणि महाराष्ट्रात बरीच प्रगती झाली आहे. आणि त्यामुळेच कि काय , पाश्चात्य संस्कृतीचा मुखवटा घालून दूर पळणारा मराठी माणूस आज हळूहळू आपल्या मातृभाषेच्या कुशीत विसावण्यासाठी येतो आहे. इथल्या अमृतप्राशनात त्याला पुन्हा एकदा नव्याने गोडी निर्माण झाली आहे.

याचे साधे सरळ उदाहरण द्यायचे झाले तर ते म्हणजे आजचे मराठी साहित्यविश्व… मराठी चित्रपटसृष्टी… मराठी रंगभूमी. मराठीला योग्य प्लाट्फोर्म नाही… पुरेसा रसिकवर्ग नाही म्हणत लोप पावत असलेली मराठी चित्रपटसृष्टी २००४ मध्ये पुन्हा प्रकाशात आली ती संदीप सावंत दिग्दर्शित 'श्वास या चित्रपटामुळे. अखेरपर्यंत प्रेक्षकांचा श्वास रोखून ठेवणारी ही कथा पार साता समुद्रापलीकडे जात ऑस्कर पुरस्काराला भिडली. त्यानंतर भारतीय सिनेमासृष्टीचा जनक म्हणवल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा जीवनप्रवास दर्शवणारी 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' सुद्धा जनमानसांत खूप गाजली. पुढे 'गर्व आहे मला मराठी असल्याचा' म्हणत अवघ्या मराठ्यांच्या हृदयावर विराजमान झालेल्या 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ' या चित्रपटात सामान्य मराठी माणूस आणि छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्रात असलेले त्याचे आजचे स्थान अचूक चित्रित केलेले आढळते.त्यानंतर 'नटरंग','दुनियादारी','टाईमपास ',बालक-पालक','काकस्पर्श ','कट्यार काळजात घुसली' ,'नटसम्राट' असे एकपेक्षा एक सरस चित्रपट मराठीच्या शीर्षकाखाली अधोरेखित होत गेले…एक नवा प्रेक्षकवर्ग जमा होऊन मराठी चित्रपटसृष्टीच्या दिशेने खेचला जावू लागला… बॉक्स ऑफिस वरील कमाईचे रेकोर्ड तोडत गेले. म्हणूनच कि काय आज अक्षय कुमार, संजय लीला भन्साळी यांसारख्या बॉलीवूडमधल्या बड्या असामींनी मराठी चित्रपटसृष्टीत रस दाखवला. सलमान खानसारख्या वर्षानुवर्षे बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावलेल्या दिग्गज कलाकाराने 'लय भारी ' या मराठी चित्रपटात ५ मिनिटांची का होईना पण हजेरी लावली,हीदेखील एक कौतुकाचीच बाब. कधी दिग्गज तर कधी नव्या चेहऱ्यांना घेऊन गेल्या ३-४ वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने अशी काही कमाल करून दाखवली कि या चित्रपटसृष्टीतही सोनेरी भविष्य दडलेले आहे हे आता कोणालाही नाकारता येणार नाही.हल्ली मराठी चित्रपटांचा दर्जाही वाढला आणि त्याच्यात उपजत असलेल्या मराठी मातीचा ,नात्यांचा स्पर्श यांमुळे इतर भाषिकांचे तर माहित नाही पण मराठी माणूस तरी या चित्रपटांकडे ओढला जाऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच सर्वत्र प्रदर्शित झालेल्या 'सैराट' या मराठी चित्रपटाने तर फक्त मराठी भाषिकांनाच नव्हे तर देश परदेशात इतर सर्वांनाच वेड लावले आहे.सामान्य जनतेतून शोधलेल्या नव्या चेहऱ्यांना घेऊन दिग्दर्शक नागनाथ मंजुळेनी अशी काही जादू रुपेरी पडद्यावर उतरवली आणि मराठी चित्रपटसृष्टीत सुवर्णक्षण जन्माला आले. जिथे बॉलीवूड,हॉलीवूड, टॉलीवूड मधल्या चित्रपटांचे राज्य मनामनांवर विराजमान होते तिथे या सर्वांना डावलून सैराटचे स्वागतही मोठया दणक्यात झाले. ज्या ज्या ठिकाणी पूर्वी 'मुन्नी बदनाम हुयी ' किंवा 'मटरगश्ती खुली सडकमे' वाजत होते तिथे आज 'झिंगाट'ची झिंग ऐकायला मिळते. फक्त सोलापूर,नाशिकातच नव्हे तर अमेरिकेत डेन्वरमध्येही या गाण्याला प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच बेभान नाचून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अनमोल यशाची रोख पावती दिली. अशाप्रकारे सर्वत्र बोलबाला असलेल्या या चित्रपटाने ८० कोटी वर मजल मारली हे ऐकले आणि मराठी असल्याचा एक वेगळाच आनंद या चेहऱ्यावर झळकला.

वास्तववादी नव्या कथा, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यासोबतच आज मराठीसृष्टी विशेष गाजते आहे ती म्हणजे येथे उंचावलेल्या संगीतातील उच्च दर्जामुळे.२००१ पासून 'विश्वविनायक' या अल्बमच्या मोठ्या यशानंतर अवघ्या महाराष्ट्रात कोपऱ्याकोपऱ्यांत पोहोचलेले अजय-अतुल यांचे संगीत म्हणजे या राज्याला लाभलेली एक अभूतपूर्व संजीवनीच. ती जोपर्यंत अजरामर आहे तोपर्यंत तरी आता भारतीय चित्रपटसृष्टी सदाहरित राहीलच . एव्हाना फक्त मराठी मनांतच नव्हे तर इतर सर्वभाषिक लोकांच्या मनांत या जोडीने स्वतःचे असे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे… मराठमोळे… अस्सल मराठी बोलीभाषेतील. त्यांच्या गाण्यांतली गावरान भाषा चाखली आणि आपलीच असूनही दुर्लक्षित राहिलेली बोलीभाषा नव्याने आपलीशी  वाटू लागली.

अशीच आणखी एक सुरेल जोडी काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीला लाभली आणि ती म्हणजे संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांची रंगलेली मैफिल. काही वर्षांपूर्वी 'आयुष्यावर बोलू काही ' चा पहिला प्रयोग झाला आणि तोही रसिकांनी अगदी खचाखच भरलेल्या नाट्यगृहात. आणि त्या नंतर या जोडीने आपल्या सहज सुंदर ,सोप्या शब्दांनी आणि चालींनी फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरातील मराठीप्रेमीना असे काही वेड लावले कि आज त्यांचा हजारावा प्रयोग झाला तरी प्रेक्षकांच्या मनातून त्यांच्या कार्यक्रमाला जाण्याची ओढ किंचितही कमी झाली नाही. अशा कार्यक्रमांसोबतच निरनिराळे विषय घेऊन येणारी नाटकेही आज प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या नाट्यगृहात दिमाखाने सादर होतात. आणि मराठी जनतेचा असा उदंड प्रतिसाद पाहून त्यातील कलाकारांना स्फूर्तीचे उधाण येते आणि त्यासोबतच पुढच्या प्रत्येक प्रयोगाला त्यांच्यातला कलाकार नव्याने बहरून प्रेक्षकांसमोर येतो.

मराठी भाषेचा पगडा आता फक्त मोठा पडदा किंवा रंगभूमीवरच नव्हे तर छोटया पडद्यावरही जाणवू लागला आहे. काही वर्षांपूर्वी 'कहानी घर घर की','कसौटी जिंदगी  की ' या हिंदी मालिकांमध्ये रमणाऱ्या मराठी गृहिणी हल्ली 'होणार सून मी या घरची ', ' का रे दुरावा ' यांसारख्या खास मराठी मालिकांच्या गप्पांत रंगताना आढळतात. आजकाल मराठमोळं घर आणि 'झी मराठी ,स्टार प्रवाह,कलर्स मराठी यांसारख्या मराठी चैनेल्समध्ये एक आगळंच नातं गुंफलं गेलं आहे. सैराटच्या निमित्ताने तर मराठी गाणी आज हिंदी मुझिक चैनेल्सवरही थिरकू लागली आहेत. रोज रात्री ' काय करताय ? हसताय ना ? हसायलाच पाहिजे ' म्हणत सुरुवात करणारा निलेश साबळे तर आता आपल्यातलाच वाटू लागला आहे. मराठी चित्रपटसृष्टी सोबतच रंगभूमीलाही प्रेक्षकांसमोर अचूक मांडणारा "चल हवा येवू दया ' हा कार्यक्रम घराघरांत हास्याचे फवारे उडवण्यात यशस्वी ठरला आहे. आबालवृद्धांपासून सर्वांनाच हा कार्यक्रम अगदी हवाहवासा वाटू लागला आहे… ते जणू एक कुटुंब… मराठी साहित्याचे. त्याबद्दल एक अनामिक आपुलकी मराठी माणसाच्या मनात नकळत निर्माण झाली आहे यात नवल नाही. त्यामुळेच कि काय ,आज असे क्वचितच एखादे मराठी घर आढळेल जिथे या कार्यक्रमापेक्षाही कपिल शर्माच्या शोला उचलून घेतले असेल. अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा करता करता महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचण्यात या हास्यमैफिलीने खरेच मोठे यश संपादन केले आहे. आणि या यशाचा परिणाम म्हणूनच बॉलीवूडमधला किंग म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान सुद्धा या मंचावर येऊन पोहोचला.

थोडक्यात सांगायचे तर आज जरी मराठी एक पर्यायी भाषा बनत चालली असली तरी तिचा आदर करणारे आजही या जगात मोठ्या संख्येने अस्तित्त्वात आहेत. आता हेच पहा ना, जेव्हा मी हा ब्लॉग सुरु केला तेव्हा मराठी ब्लॉग कोण वाचणार याविषयी इतर अनेकांप्रमाणेच माझ्याही चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह असायचेच. पण  तरी मी जे मनात होते तेच करण्याचे ठरवले. आणि दिवसांमागून दिवस सरत गेले. जपमाळेतला एकेक रुद्राक्ष मागे टाकला जावा,तसे! आणि त्यासोबतच माझेही लिखाण सुधारत गेले… दिवसेंदिवस वर्धत गेले. यामध्ये वावरताना अशा अनेक मराठी ब्लॉग्सच्या संपर्कात आले. त्यांची रोज वाढणारी संख्या पाहता मराठीला लेखक वर्गाची कमी आहे असे मुळीच भासत नाही. आणि मी आज ३६००० चा टप्पा अवघ्या सव्वा वर्षात पार पाडला यातून तर हेच दिसून येते कि मराठी साहित्याला हवा असलेला वाचकवर्गही भरपूर आहे.… आणि निश्चितच पुढच्या काळात तो असाच वाढत जाईल.आज या लेखाच्या निमित्ताने 'उमटले मनी' ला आवर्जून भेट देणाऱ्या सबंध वाचकांचे मनापासून आभार मानावेसे वाटते.… खरेच मनापासून धन्यवाद !!!

मराठी भाषेतील दिवसेंदिवस होणारी प्रगती , वाढता लेखक आणि वाचक वर्ग… हे सर्व पाहून मनाला एक वेगळेच समाधान मिळते.… अभिमानाने छाती फुलून येते…आणि अशाच क्षणी ओठांतून नकळत सुरेश भटांचे बोल बाहेर पडतात ,


लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी

येथल्या चराचरात राहते मराठी    



- रुपाली ठोंबरे