Pages

Wednesday, November 30, 2016

एक विरंगुळा

लहान मुलं खरंच गोड असतात, पण त्यांच्यासोबत पूर्ण वेळ घालवला कि  खऱ्या अर्थाने समजते कि मुलाला सांभाळणे तेही त्याला न त्रास देता ,न रडवता, समजुतीने त्याला सांभाळून घेणे किती कठीण असते ते .कित्येक आपल्याच जगात व्यस्त असलेल्या पालकांसाठी तर कधीतरी ते डोक्याला तापही होऊन बसतात. आणि मग ते आईबाबा साथ घेतात टीव्ही ,व्हिडिओ, मोबाईल गेम नामक घातकी शत्रूची. त्यामुळे लहानपणापासूनच हे सर्व त्या बालपणीचे सवंगडी बनतात. हे सर्व नसतील तर काहीजणांच्या मते मूल सांभाळणे कठीणच. कारण थोडे चालते-फिरते मूल घरात असेल तर व्यवस्थित रचलेल्या घराचा पार कायापालट करायला तासभरही लागत नाही. सोफ्यावर चढ , उंच स्टूलावरून उडी मार ,किचनमध्ये रचलेली भांडी फेक, बाथरूममध्ये पाण्यासोबत खेळ असे एक ना अनेक उद्योग सतत घरात चालत असतात. कधीतरी काही नको ते तोंडात घालतील नाहीतर नको ती गोष्ट उचलून फेकून मारतील. बोलक्या मुलांना तर इतके प्रश्न असतात कि त्याची उत्तरे द्यायला साक्षात परमेश्वर खाली अवतरला तरी तोही एका क्षणी निरुत्तरित होऊन गप्प राहील. मग आपल्यासारख्या सामान्यांची काय व्यथा. एक वेगळीच जिद्द आणि चिकाटी असते त्यांच्यात.त्या गोष्टीचे कौतुकही असते पण हीच जिद्द जेव्हा नको त्या गोष्टीसाठी हट्ट बनतो सर्व नकोसेही होते.पण तरी शेवटी मुले असतात खूप निरागस, गोड... आजच्या धकाधकीच्या जीवनातसुद्धा आपल्याच बालविश्वात रमणारी आणि कधीतरी आपल्यालाही त्यांच्या कल्पनाविश्वात ओढून नेणारी.पण आजच्या जगात त्यांच्या त्या स्वर्गात जाण्यासाठी आपल्यालाच मुळी वेळ नसतो. आपणच एका विचित्र तांत्रिक जगात गुरफटून गेलो आहोत आणि सोबत या नव्या पिढीलाही गुंतवू पाहत आहोत असे म्हणणे अजिबात खोटे ठरणार नाही. 



आज असेच चित्र अनेक घरांत जरी दिसत असले तरी आमच्या घरी मात्र  किती तरी वेळा एक नवेच वेगळेपण असते, कलेच्या सानिध्यातले. त्या दिवशीही असेच झाले. आमच्या घरी देखील अडीच वर्षांचा असाच एक खोडकर कृष्णा आहे. एके दिवशी ऑफिसहून येताना एक खेळणे काय घेऊन गेले त्यानंतर पुढे रोजच मी बाहेरून येताच माझ्या पर्सची चांगली निरखून झडती घेतली जाऊ लागली. आणि नेमके त्या दिवशी आज चित्रकलेत काही वेगळा प्रयोग करून पाहूया या विचाराने मी पेंटींग रोलर घेऊन आले होते. नेहमीप्रमाणे झडती झाली. मुद्दाम ठेवलेला त्याचा आवडता बिस्किटाचा पूडा देखील आज दुर्लक्षित राहिला कारण त्याआधीच साहेबांच्या हाती तो रोलर लागला होता. एका क्षणात तो रोलर त्याची गाडी बनली होती आणि पलंगावरच्या अस्ताव्यस्त चादरीवर निर्माण झालेल्या दरी-डोंगरांवरून उड्या मारत धावत होती आणि त्याच्या प्रत्येक विचित्र हालचालीसोबत माझा जीव वर-खाली होत होता.मग काही वेळाने मलाच एक युक्ती सुचली. कपाटातून पोस्टर कलर घेतले, एक-दोन ब्रश उचलले आणि एक मोठा पांढराशुभ्र कागद घेऊन मी जमिनीवर ठिय्या मांडला. विविध गाडयांमध्ये गुंग असलेला तो आपोआपच जवळ येऊन बसला. मुलांना नवीन काही समोर आले कि त्याचे भारी आकर्षण असते. मग ती गोष्ट त्यांच्या कामाची असो वा नको, त्यांना ती काही केल्या हवी असते आणि आकाशपाताळ एक करून ते ती मिळवतात सुद्धा. तर ओम हा असा शेजारी येऊन बसला.... निश्चितच कशालाही हात न लावता शांतपणे तर नाहीच.आधी सर्व वस्तूंवर हात फिरवून झाला आणि मग जरा समाधानाने त्यातले काहीतरी एक घेऊन बसला. कधी मला पाहत तर कधी त्या वस्तू आणि कागदावर त्याची नजर. मीही  हिरवा रंग डिशमध्ये घेतला, सोबत थोडे पाणी मिसळले आणि हे हिरवे मिश्रण त्याच्या समोर ठेवले. एव्हाना आमची रोलर गाडी हातात तयारच होती. तिने लगेच त्या हिरव्या रंगात डुबकी घेतली आणि पुढची उडी थेट कागदावर. अर्थात ड्राइव्हर तो अडीच वर्षाचा चिमुकलाच. मग त्या नव्याकोऱ्या स्वच्छ मैदानात मनसोक्त गाडी चालवली आणि त्या मैदानावर क्षणात हिरवळीचे साम्राज्य पसरले. लहान मुलांचा मूळ स्वभाव... कोणतीही गोष्ट अधिक काळ ते झेलू शकत नाहीत. आता हिरवा रंग नको असा विरोध समोरून आला आणि मी सुद्धा  नवा रंग शोधू लागले. पण त्यानेच निळा रंग माझ्या हातात दिला- 'मला हा ब्ल्यू कलर हवा '. बहुतेक मुलांना निळा रंग लहानपणापासूनच आवडतो हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले. 'ठीक आहे. निळा तर निळा...' म्हणत मी तो डिशमध्ये काढू लागले. आता त्याला रोलर पण कंटाळवाणा वाटू लागला. ही गोष्ट अगदी माझ्या मनासारखी झाली. लगेच रोलर बाजूला ठेवला आणि क्लेआर्ट चे साचे त्याच्यासमोर ठेवले... फुलपाखरू , टेडी बिअर,झाड ,मासा अशा कितीतरी आकाराचे साचे रंगात बुडवून त्यांचे निळे ठसे कागदावर उमटले. ते करण्यात मग्न असलेल्या ओमला मी पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेला ब्रश हाती दिला. ठरल्याप्रमाणे त्याने त्या चित्रावर इथे तिथं स्ट्रोक्स मारण्यास सुरुवात केली. पूर्वीचा हिरवा आणि निळा रंग थोडाफार ओला असल्याने या नवीन पिवळ्या रंगाच्या सुंदर छटा सगळीकडे पसरल्या. कापसाच्या बोळ्याने केशरी रंगाचे सुर्यास्तासमयीचे ढगही त्या देखाव्यावर जमा झाले. पुढे त्या इवल्याशा बोटांना लाल रंग लावून त्या बागेत फुलांचा वर्षाव झाला. मध्येच काळा रंग वापरण्याची हुक्की झाली आणि त्यातूनच काळ्या ठिपक्यांचा पाऊस पडला. चित्रात बॅलेन्स नावाचा एक प्रकार असतो.कदाचित त्या चिमुकल्या मनाच्या कल्पनेतही तो असेल. पण शेवटी त्या चंचल मनाची स्थिरता आता संपू लागली. हाताच्या हालचालींवरचा ताबा आता सुटत होता. तसे मी ते सर्व रंग त्याच्याकडून काढून घेतले.नैसर्गिक नियमानुसार थोडी रडारड झालीच असती जर मी अचूक वेळी त्याला भेट म्हणून मिळालेले नवीन क्रेयॉन रंग त्याला दिले नसते तर. त्यातला आतापर्यंत चित्रात नसलेला चॉकलेटी रंग दिला. २ रेघोट्या मारून त्याने त्याचा मोर्चा पुन्हा काळ्या रंगाकडे वळवला. त्याच्या मनातली अस्थिरता त्या खरडण्यामध्ये पूर्णपणे दिसून येत होती. जितक्या रेघोट्या मला त्या चित्रात हव्या होत्या तितक्या पूर्ण झाल्यानंतर मी तो कागद त्याच्या हातून हळूच काढून घेतला. कधी कधी अनावश्यकतेच्या अतिक्रमणामुळे सुंदर चित्रही मिनिटभरात बटबटीत,कुरूप बनते हे सत्य अजून त्या बालमनाला काय माहित ? पण मोठ्यांना  ते कळते. पण तरीही खूपदा मोठ्यांकडूनही अशा काही चुका घडून येतात ज्या खरेच त्यांना लहानांकडून शिकता येण्यासारख्या असतात. 

लहान मुलं खूप छान असतात. निर्मळ, निरागस असतात.आणि हीच निरागसता ते खूपदा चित्रकलेच्या  माध्यमातून जगासमोर मांडतात. ज्या गोष्टी सांगता येत नाहीत ते चित्रातून सांगतात, फक्त त्या कळून घ्यायची मानसिकता आपल्यापाशी असायला हवी. पसारा मांडतील, रंग सांडतील, कदाचित भिंतीदेखील रंगतील. पण त्यातून त्यांना आणि त्यामुळे आपल्याला मिळणारा तो आनंद, समाधान वेगळेच असेल. योग्य तऱ्हेने आणि समजूतदारीने बरेच काही मिळवता येते.अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ही निरागस बालके नेहमीच आपल्याला शिकवत असतात.पण आपल्याकडेच त्यांच्याकडून शिकून घेण्यासाठी वेळ नसतो किंवा ती मानसिकताच नसते. "मुले म्हणजे देवघराची फुले" असे  म्हणतात ते एका अर्थी खरेच आहे.या प्रत्येक मुलामध्ये एखादी कला उपजतच असते. तिला अचूक ओळखून खतपाणी घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे जितके त्या फुलाला जपणे. नुसतेच मोठ्या मोठ्या फी भरून शाळा -क्लासेस मध्ये प्रवेश दिला म्हणजे आपले कर्तव्य पूर्ण होत नाही. त्यासोबतच त्यांना आपला वेळ , आपले मार्गदर्शन...सर्वार्थाने  आपण हवे असतो. त्यामुळे या सर्वांसोबतच आपल्या पाल्यांना प्रत्येक बाबतींत स्वतःचे विचार मांडण्याची थोडीशी मोकळीक आणि प्रोत्साहन प्रत्येक पालकाने द्यायला हवी असे मला तरी नेहमीच वाटते.एखादा विरंगुळा जोपासता जोपासता त्यातून काही शिकणं आणि शिकवणं म्हणजे प्रगतीच्या दिशेने पुढे टाकलेलं एक पाऊलच, नाही का ? थोडक्यात काय, मुलांचा गुंता सोडून बाहेर न पडता त्या गुंत्यात अडकून जायचं... आपोआप सगळं कसं छान सुटसुटीत होऊ लागतं. 

- रुपाली ठोंबरे.

Monday, November 28, 2016

कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा...


कधी कधी जीवनात आलेल्या एखादया संकटामुळे माणूस अतिशय निराश होतो,निरस होतो,जीवनातील प्रत्येक गोष्टीतून त्याचे मन उठून जाते. अशा वेळी सर्वात जास्त राग येतो तो नशिबाचा आणि देवाचा. याच रागातून अगदी रोज करत असलेली गोष्टही तेव्हा करावीशी वाटत नाही. सर्वांपासून दूर जाऊ पाहतो. पण त्याने काहीही साध्य होत नाही. पण मग कधीतरी स्वतःसच केलेली चूक उमगते. उगाच केलेला राग अचानक विरघळतो. गोष्ट-आस्तिक नास्तिकतेची नाही पण सकारात्मक आणि शांत वातावरणात वेळ घालवण्याची आहे. जी निश्चितच कित्येकांना मंदिरात त्या अदृश्य शक्तीसमोर मिळते जिच्यावर ठेवलेला विश्वास एक प्रकारचे आंतरिक बळ देते सर्व संकटांवर मात करण्यासाठी.



   कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा
   ती मंदिरात आली होती 
   कधीकाळी नास्तिक झालेली ती 
   आज आस्तिकतेच्या वाटेवर होती 

   इतक्या दिवसांतून आज प्रथमच 
   मंदिराचा सोन्याचा कळस तिने निरखून पाहिला 
   जणू तो टाचा उंचावून तिचीच वाट पाहत होता 
   इतक्या दिवसांतून आज प्रथमच 
   अभंगांचे स्वर तिच्या हृदयाशी थेट भिडले होते 
   एरव्ही तेही कानांपाशी येऊन दुर्लक्षित असायचे 
   आज मात्र तिने त्या परिचित हाकेला साद दिली 
   आणि कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा
   या मंदिराच्या दगडी पायऱ्या ती चढत होती 

   प्रत्येक पायरीवर जुन्या आठवणी भेटत होत्या 
   चिघळलेल्या जखमा अचानकच भरल्या जात होत्या 
   कधीतरी आलेल्या अहंकाराची खपली आज दूर होती 
   अनुभवांमुळे आलेल्या अविश्वासाचा पदर दूर सारून 
   आशेने आज पुन्हा एकदा ती या मंदिरात आली होती

   दाराशी स्वागत करत होती तीच रांगोळी
   जणू समईची तीच वात अजून तेवत होती 
   पूर्वी वाहिलेली तीच फुले अजून दरवळत होती
   घंटेचा घुमणारा नाद अनोळखी वाटला नाही
   गाभाऱ्यातला देव पण आपलाच वाटत होता 
   खरेतर इतके घडून देखील तिच्या मनातला 
   भक्तीचा झरा अजूनही पूर्ण आटला नव्हता
   त्या तेजस्वी मुखावर ती स्वानंद शोधत होती 
   आशीर्वादासाठी धरलेली झोळी भरून घेत होती

   दोन्ही अंजली एकत्र आणून ती नतमस्तक होती 
   आशीर्वादाचे फूल मस्तकावर झेलून घेण्यासाठी
   प्रसन्न रागरंगात मनावर शांततेचे आता राज्य होते 
   सुखाच्या शोधात अंतरंग इथेच येऊन थांबले होते  
   स्वतःला शोधत कितीतरी वेळ आज ती मंदिरात होती 

   कधी नव्हे ते आज पुन्हा एकदा
   ती मंदिरात आली होती 
   कधीकाळी नास्तिक झालेली ती 
   आज आस्तिकतेच्या वाटेवर होती



              - रुपाली ठोंबरे.

Wednesday, November 16, 2016

अच्युत पालव... अक्षरांच्या राज्यावर अधिपत्य गाजवणारा एक किमयागार

एक सुदंर आणि फार मोठे राज्य होते. तिथे विविध भाषांतील आणि विविध अक्षरांतील असंख्य अक्षरे रहात  होती.देवनागरी, रोमन ,बंगाली ,अरेबिक ,जर्मन ,चिनी अशा कितीतरी देशी-विदेशी भाषा आणि त्यांना साथ देणाऱ्या लिपी समूह करून राहत होत्या...विविध प्रकारांमध्ये ,त्यांच्यावर लादलेल्या विविध बंधनांमध्ये. बंधने ... पूर्वापार चालत आलेली आणि ज्यांना ते सर्व निमूटपणे आपलेसे मानून आजपर्यंत पाळत होते.



एक दिवस तिथे एक राजा आला... अक्षरांचा राजा.गेली कित्येक वर्षे अशा प्रकारच्या कितीतरी ओळखी-अनोळखी अक्षरांमध्ये स्वतःला गुंतवून जगणारा, त्यांची ती मुग्ध भाषा नव्याने जाणणारा ,अक्षरांवर अगदी मनापासून प्रेम करणारा. त्याने जणू सर्व अक्षरांना आव्हान केले आणि ती सर्व एका विशाल व्यासपीठावर एकाच वेळी उतरू लागली. तो विशाल पण अदृश्य व्यासपीठ होता त्या राजाच्या मनाचा ,एका अनोख्या कल्पनाविश्वाचा. त्या विश्वात अक्षरांसाठी ना कोणते बंधन होते ना कोणते नियम. पूर्वापार चालत आलेली अक्षरमांडणी आज एक नवे रूप घेऊन अवतरली होती. 'प' च्या शेजारी 'भ' जाऊन बसला तरी आज त्याला तिथून कोणी उठवले नाही. स्वर-व्यंजनांसोबत काना,मात्रा ,वेलांटी,अनुस्वार सारेच एका विशिष्ट शैलीत नटले होते. पंधराव्या-सोळाव्या शतकात अस्तित्त्वात असलेली आणि काळाच्या ओघात कुठेतरी दडून बसलेली मोडीलिपीसुद्धा या राजाने पुरातन अवशेषांतून वर आणली... एखाद्या खोल डोहातून मोती शोधावा तशी. आज तिचे अस्तित्व जाणवू लागले तसे एकविसावे शतक सुद्धा एका वेगळ्याच ऐतिहासिक तेजाने झळाळू लागले. भावनेच्या शीत-उष्ण कारंज्यांतून चिंब न्हाऊन अक्षरांचे कितीतरी थवे त्या कोऱ्या पानावर एका मागोमाग एक झेप घेऊ लागले आणि त्या मानस-मंचावर सुरु असलेल्या कल्पनाविष्काराचे बिंब संपूर्ण जगासमोर अचूक प्रतिबिंबित झाले. त्या चित्त रंगभूमीवर रंगलेल्या खेळात आज कोणी कायम लहान नाही किंवा दीर्घकाळासाठी मोठाही नाही. कधी 'म' पौर्णिमेच्या चंद्रासारखा महत् असतो तर कधी हाच 'म' सूक्ष्म रूप धारण करून एखाद्या कौमुदीपरी शब्दनक्षत्रात चमकत असेल. मंद-तेजस्वी अनंत अक्षरचांदण्यांची अशी सुरेख मांडणी...अवकाशातील नक्षत्रालाही लाजवेल अशी... संबंध कागदावर अथांग पसरली आहे...जणू तारांगणच... रेखीव अक्षरांचे.

अशा जगातील कितीतरी भाषा,लिपी वेगवेगळे वळणे घेत , कमी-अधिक रेषांच्या सानिध्यात नव्याने उदयास आल्या ... अक्षरांच्या सुरेख पण वेगळ्याच शैलीतील रचनेला घेऊन. त्या अक्षरप्रेमी राजाच्या अधिपत्याखाली अशी सर्व अक्षरे एकोप्याने नांदू लागली.... ना कोणते जुने बंधन ना कोणते जुने तेच ते कंटाळवाणे नियम .... पण एक शिस्त कायम ध्यानी बाळगून. शिस्त... त्या राजाच्या मनात आखलेल्या रचनात्मक आराखड्यावर पाऊल ठेवून अचूक रितीने पुढे चालत राहण्याची.

त्या राजासाठी तर या अक्षरांची अशी जुळवाजुळव आणि आखणी म्हणजे एक प्रकारचे ध्यानच... मन शांत ठेवणारे ,स्वतःचा स्वतःशीच परिचय करून देणारे , भावनांना एका निर्जीव कागदावर उतरवून एक जिवंत चित्र समोर उभारणारे , मुग्धपणे इतर मनांशी संवाद साधणारे, एका वेगळ्याच विश्वाशी स्वतःला जोडणारे.
म्हणूनच कि काय त्या राजाच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या अक्षरांना पाहताना लाखों दीप प्रज्वलित होऊन आपल्या यश आणि सुखसमाधानाची कामना करत आहेत असा भास अचानकच त्यावेळी झाला.कधी त्या जादुई हातांतून कागदावर उमटलेल्या प्रेमकवितेतून स्वच्छंदपणे हिंदोळे घेत डुलणारी प्रीत डोकावते तर कधी सावधतेचा इशारा देणारे शब्द स्तब्ध करतात . कधी फुलांच्या आशयातून नकळत सुगंध अवतीभवती दरवळतो तर कधी मधुर सुभाषिताचे बोल मनात उत्साहाचे कारंजे निर्माण करतात. या जादूगाराच्या हातून सादर होणाऱ्या अशा कितीतरी अक्षरांचा ,त्यांच्या मांडणीचा उलगडा हे कायम त्याच्या चाहत्यांच्या मनात एक रहस्य असेल. पण तरी कागदावर उमटणाऱ्या त्या विविधरंगी , विविधढंगी लहानमोठ्या फुलपाखरांना असे एकाच वेळी बागडताना पाहताना मनाला मिळणारा  आनंद एक वेगळीच उत्सुकता आणि उत्साह देऊन जातो... हाच आनंद निरंतर या अक्षरांच्या राजाकडून आम्हां सर्वांना मिळत राहावा हीच सदिच्छा.



- रुपाली ठोंबरे.

Wednesday, November 9, 2016

अचानकच झालेला एक बदल...

नशीब कधी कोणाचे 
कसे फिरेल हे सांगणे 
साक्षात परब्रम्हालाही 
होऊन जाते अशक्य 

आता आजचेच पहा ना 
ज्या ५००,१०००च्या नोटांना 
इतके दिवस मानाने 
प्रत्येकाने मिरवले होते,
आज निपचित  पडून  होत्या 

ज्या आजपर्यंत हव्याहव्याशा 
आज मात्र झाल्या नकोश्या
कालपर्यंत कुणासमोर धरली 
कि आनंद झळकायचा चेहऱ्यावर 
आज मात्र तिला पाहताच 
विचित्र आठ्या पडतात कपाळावर 

आजपर्यंत मागे राहिलेली 
शुल्लक नाणीसुद्धा आज 
दिमाखात व्यवहारात आली 
जो आज चालतो तोच आवडतो 
ही दुनियेची रित पुन्हा अनुभवली 

अचानकच झालेला एक बदल 
क्षणात आयुष्य पालटवून जातो 
नशिबाचा खेळ "आज आहे  उद्या नाही 
आज नाही उद्या असेल " चालूच राहील 


-  रुपाली ठोंबरे .



Monday, November 7, 2016

आजच्याच दिवशी

( वाढदिवसाच्या शुभेच्छा.....गोजिऱ्या पाखरासाठी )


तुझ्या इवल्याशा पावलाने 
आजच्याच दिवशी 
या अंगणात 
सुखांचा सडा शिंपला होता 

तुझ्या इवल्याशा हातात 
आजच्याच दिवशी 
माझी करांगुली 
प्रेमाचे बंधन गुंफत होती 

तुझ्या किलकिलणाऱ्या डोळ्यांनी 
आजच्याच दिवशी 
तू आईबाबांना तुझ्या 
मन भरून हसताना पाहिले होते 

तुझ्या नाजूक स्पर्शात 
आजच्याच दिवशी 
आपल्या कुटुंबाला 
नवे खोडकर नाते गवसले होते 

आज इतक्या वर्षांनी 
आजच्याच दिवशी 
तुला शुभेच्छा देताना 
नवजात तू,नकळत आठवणींत येतो

तेव्हापासून प्रत्येक वर्षी
आजच्याच दिवशी
माझा आशीर्वादाचा हात 
नकळत तुझ्या मस्तकी टेकतो 


- रुपाली ठोंबरे. 

 

Thursday, November 3, 2016

यशपूर्तीसाठी मार्गदर्शक... हवा कि नको ?

काल अचानकच पडलेला प्रश्न...आयुष्यात स्वतःचे ध्येय आणि त्यासाठी लागणारा रस्ता स्वतःच शोधायचा कि आपले ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्यावर अवलंबून राहायचे, वेगळ्या अर्थात सांगायचे तर आपले ध्येय साध्य करण्यासाठी एखाद्याची मदत घ्यायची कि घेऊ नये.

घड्याळाचा मिनिटकाटा कितीदातरी इतर दोघां मित्रांना भेटून जात होता पण माझ्या प्रश्नाच्या दोन्ही बाजू काही केल्या एकत्र येऊन एखादे ठोस उत्तर देत नव्हत्या. तर दोन्ही गोष्टींचे समान फायदे-तोटे. कधी वाटते कि ध्येय आपले तर त्यासाठी इतरांचा काय संबंध, इतरांना का त्रास,त्यांच्या विचारांच्या बंधनांचे ओझे कशाला ... पण मग वाटते फक्त आपल्याच एका डोक्यातून निघणाऱ्या कल्पनांपेक्षा एखाद्या अनुभवी व्यक्तीचे विचार सोबतीला एकत्र आले तर त्या ध्येयाशी पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग नक्कीच मिळेल.

समोर फक्त पर्वतशिखर दिसते आहे पण जाणारा योग्य रस्ता समजत नाही. काय करणार? तिथेच धीर खचून तर चालणार नाही. पण प्रयत्न केला तर एखादा मार्ग नक्कीच नजरेस पडेल. ते उत्तुंग शिखर सर करण्यासाठी तोच रस्ता घेऊन पुढे चालू शकतो. पण कधीकधी होते काय कि एखाद्या नव्या वळणावर त्या रस्त्याला २ फाटे फूटतात. आता यापैकी एकाची निवड करणे तर भागच असते. मग आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून त्यांतील एका रस्त्याला आपण आपला साथी बनवतो. पुढे हा साथी कधीकधी चुकीचाही ठरतो किंवा आपला अंदाज अचूक आणि नशीब बलवत्तर असेल तर बरोबरही. बरोबर मार्गावर असू तर ठीक पण चुकून मार्ग चुकला कि मग डगमगायला होते. मग अशा वेळी एखाद्या अनुभवी मार्गदर्शकाची गरज नकळत जाणवते.कधीकधी योग्य मार्गदर्शन ही यशाची एक किल्ली आहे असे म्हणण्यासही हरकत नाही. पण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा मार्ग अवलंबलेला असेल तर थोडे आड वळणे घेत भरपूर सारे अडथळे पार पाडत पुढे चालत राहतो. त्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने कितीतरी प्रयोग यशस्वी पार पडले असतात त्यातून प्रत्येक पावलाशी नवे काही शिकून त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला असतो.याउलट सुरुवातीपासूनच मार्गदर्शक निवडला तर आपले सर्वस्वी यश तो किती योग्य आहे यावर अवलंबून असते. जर त्याला निवडण्यात आपली चूक झाली नसेल तर आपण नक्कीच शीघ्र गतीने शिकत टोकाशी पोहोचू शकतो. असा मार्गदर्शक आपल्या बुद्धीची आणि कर्तृत्त्वाचाही योग्य वापर करून आपल्याला सबळ बनवतो यात यत्किंचितही शंका नाही. पण त्यातही तो जिथे थांबेल तिथे विश्रांती घेणे ,त्याच्या तत्त्वांच्या बंधनात राहणे हे ओघाने आलेच. कित्येकदा हे आपल्या चांगल्यासाठीही असू शकते. आपल्या शिष्याला योग्य रितीने समजून घेऊन निस्वार्थीपणे योग्य मार्गदर्शन करणारा गुरु मिळणे म्हणजे भाग्यच.

अशा दुहेरी विचारांमध्ये मन अडकले असतानाच आज सकाळी बाबा आमटेंचा एक सुविचार दृष्टीस पडला ,


" दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाहीत , त्यासाठी एकटयाला उन्हात उभे राहावे लागते. "
हे तर १००% खरे आहेच पण त्यासोबतच एका उत्तम मार्गदर्शकाची निश्चितच गरज असते असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?



- रुपाली ठोंबरे