Pages

Tuesday, December 19, 2017

गाणी आणि आठवणी

 कसे असते ना ... कधीकधी एखादे ओळखीचे गाणे कानांवर पडते आणि मग त्या गाण्यासोबत कुठेतरी जोडलेली आठवणींची तार अचानक मनावर आपले जाळे विणू लागते आणि मग आपले मन अगदी देह भान हरपून आधी त्या गाण्याच्या आणि नंतर त्यासोबत जुळलेल्या आठवणींच्या अधीन होऊन जाते.  न राहवून अचानक मूड का बदलतो याचे एखादे ओळखीचे पण विशिष्ट गाणे ऐकले हे देखील एक कारण असते असे मी म्हटले तर चकित व्हाल ना? पण माझ्यासोबत तर असे पुष्कळ वेळा होते.अनेकदा गाडीतून जात असताना ,बाजारात चालत असताना किंवा इतर कुठेही वाजणारे एखादे गाणे असे एक हरवलेले तराणे नव्याने वर्तमानात आणण्यास कारणीभूत ठरते आणि पुढे कित्येक वेळ ते या ओठांवरती गुणगुणत राहते...सोबत असते एखादी कुठेतरी दाट वनात गुंजारव करणारी पण आता अचानक स्मरलेली एक आठवण.

त्यादिवशी मुलाच्या नर्सरी सॉन्ग्स च्या लिस्ट मध्ये सुरु असलेले लहानपणीचे 'chubby chicks ... ' ऐकले आणि डोळ्यांसमोर लहानपणची छान हातवारे करत बोबड्या बोलांत कविता म्हणणारी मला मीच आठवली. मराठी माध्यमात असल्याने या इंग्लिश कविता फार कमी कानावर पडायच्या. त्यावेळी गट्टी असायची ती बालगीते आणि बडबडगीतांशी. आजही 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला... ', 'ससा रे ससा... ' किंवा ' नाच रे मोरा ... ' ऐकले कि त्या बालगीतांवर नकळत पाय थिरकतात.' ये रे ये रे पावसा... ',लहान माझी बाहुली... ','अटक मटक...' यासारखी बडबडगीते विचित्र हातवारे करण्यास भाग पाडतात.

 माझ्या लहानपणी आमच्या समोरच्या हॉटेलमध्ये सकाळ झाली कि त्या काळची हिट गाणी सुरु व्हायची. तो नव्वदीचा काळ. मैने प्यार किया , साजन , सडक , विश्वात्मा आणि असे कितीतरी त्या काळचे गाजलेले चित्रपट. त्यामुळे आजही कधी कानांवर ' कबुतर जा जा ... ', सात समुंदर पार करके' किंवा ' तुझे अपना बनानेकी कसम... ' या गीतांची धून कानी पडली तरी डोळ्यांसमोर २० वर्षांपूर्वीचे आमचे ते घर आणि त्या समोरचे  त्या काळचे ते आलिशान हॉटेल अगदी जसेच्या तसे उभे राहते. मी दुसरीला असताना आमच्या शेजारी एक मस्त एकत्र कुटुंब राहत होते. त्यांच्याकडे एकदा काही कार्यक्रम होता तेव्हा त्या तरुणांनी ' ही चाल तूरु तुरु, तुझे केस भुरुभुरु... ' इतक्यांदा वाजवले कि हे गाणे म्हणजे माझ्या मनात निर्माण झालेला त्या कुटुंबाच्या आठवणींसाठीचा एक दरवाजाच. आमच्या लहानपणी गणपती म्हटले कि फार मज्जा असायची. त्यावेळी फिरायला जाणे म्हणजे फार मोठे अप्रूप. सायन मधल्या पप्पांच्या एका मित्राकडे आमचा गणपती खूप थाटामाटात साजरा होई. त्या कोळी कुटुंबात आणि सार्वजनिक गणपतीत वाजणारी गणेशगीते आजही गणपतीच्या दिवसांत सायनच्या त्या कोळीवाडयाची सैर करवतात. ''डोल डोलताय वाऱ्यावर... ', ' आम्ही कोली ... ' अशा कोळीगाण्यांवर आमच्या पिढीतल्या प्रत्येकानेच एकदा तरी नृत्य सादर केलेच असेल. 'शेपटीवाल्या प्राण्यांची... ' हे मला माझे पहिले बक्षीस मिळवून देणारे गाणे. त्यामुळे अशी गाणी ऐकली कि मन आपोआपच बाललीलांशी मेळ घालायला सुरुवात करते.आणि आजच्या जगात राहून त्या बालवयात जाण्याचे अजब धाडस ही त्या काळची गाणी करतात.

काही गाणी एखाद्या घटनेशी निगडित असतात तर काही विशिष्ट व्यक्तींशी. प्रत्येकाच्या जीवनातले पहिले गीत असते आईच्या आवाजातले अंगाईगीत. आणि या अंगाईगीताशी आपसूकच आईच्या प्रेमाची नाळ जोडली जाते. 'चांदोबा चांदोबा भागलास का ?' हे सर्वांचे आवडते अंगाई गीत. पण मला कधी माझ्या आईने हे ऐकवलेलं आठवत नाही. पण मला आई आठवते ती बाबांनी लहानपणी माझ्यासाठी घरीच रेकॉर्ड केलेल्या आईच्या आवाजातील बडबडगीतांच्या कॅसेटमुळे. पुढे शाळेत शिकवलेले ' आईसारखे दैवत साऱ्या... ' हे गीत म्हणताना आणि आजही ते ऐकताना आई जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी तीच नजरेसमोर येते. पुढे ' तू निरागस चंद्रमा... ' किंवा बाली ब्रम्हभट्टचे ' तेरे बिन जिना नहीं ...' यासारखी कधीकाळी कोणी डेडिकेटेड केलेली गाणी असो किंवा ' तेरा होने लगा हू... ','मेरी दुनिया है तुझमें कहीं...' सारखी प्रेमगीते आणि ' तू जाने ना... ' सारखे विरहगीत सारेच कोणत्यातरी प्रिय नात्याची आठवण करून देणारी. अशी ही गाणी माणसामाणसांशी असलेले एक विशिष्ट नाते स्वतःच मनात निर्माण करतात ज्यामुळे या गीतांशी आपले असे एक अतूट नटे निर्माण होते. 

पिकनिक आणि गाणी हे समीकरण जसे ठरलेले तसेच त्या गाण्यांशी जुळलेल्या त्या त्या पिकनिकच्या आठवणी हे माझ्या आयुष्यातील एक समीकरण. नववीला आमची पिकनिक गेली होती तेव्हा आमच्या बस ड्रायव्हरच्या मनावर 'दिल तो पागल है' चित्रपटाची गाणी राज्य करत असायच्या त्यामुळे आजही कुठे जरी ' अरे रे अरे वो क्या हुआ ' ऐकले कि त्या पिकनिकमधल्या गंमतीजंमतींसोबतच पुढचा अर्धा तास तरी खर्ची होतो. पिकनिकप्रमाणेच बऱ्याच कार्यक्रमांशी निगडित काही गाणी असतात आणि त्या गाण्यांशी जुळलेल्या काही आठवणी. हल्ली लग्नाच्या विडिओ कॅसेट मध्ये सुंदर गाणी असतात आणि मग पुढे त्या गाण्यांशी तो प्रेमाचा धागा नकळत जुळला जातो. 

खरेतर माझ्या घरी अगदीच कलात्मक असे वातावरण अजिबात नव्हते. लहानपणी कॅसेट आणि रेडिओ यांवर वाजणारी गाणी हाच एक गाण्याशी जवळचा संबंध. तेव्हा ' घन क्रमी शुक्र... ',' श्रावणात घननीळा ... ',' रामा रघुनंदना .. ' अशी भक्तिगीते आणि भावगीते बऱ्यापैकी ऐकिवात होती. पण पुढे अभ्यास आणि टीव्हीवरची हिंदी दुनिया या पसाऱ्यात मराठी गाण्यांसोबत एक वेगळाच दुरावा निर्माण झाला. ती नाळ पुन्हा एकदा नव्याने जुळली ती आशा दीदींच्या आवाजातील ' केव्हा तरी पहाटे... ' या गीतामुळे आणि तेही इंजिनीरिंगच्या चौथ्या वर्षात. आमचा एक मंदार नावाचा मित्र होता. अगदी अफलातून गायचा. त्याच्या आवाजाची मीही एक चाहती होती. तर एकदा असेच कॉलेजनंतर बोलत असताना संगीताचा विषय निघाला आणि तो पुढे 'केव्हा तरी पहाटे ..' या गीतापाशी येऊन थांबला. मी एवढ्या कलाप्रेमींसोबत राहत असूनही माझे गाण्यांचे ज्ञान फारच तुटपुंजे होते. तेव्हा 'हे कोणते गाणे ?' या प्रश्नाचे उत्तर म्हणून मला मराठी गाण्यांची एक CD मिळाली आणि त्या दिवसापासून इतक्या वर्षांपासूनची ती तुटलेली तार पुन्हा एकदा जुळून आली. आणि मग अरुण दाते , सौमित्र ,लता आणि आशा दीदी या सर्वांचा सहवास अतिप्रिय वाटू लागला. संदीप खरेंच्या कवितांसोबत मराठी गाण्यांविषयीचे माझे प्रेम अधिकाधिक दाट होत गेले. या सर्व गीतांचा आणि कॉलेजमधल्या त्या एका भेटीच्या आठवणींचा एक सुंदर पर्वचा आयुष्यात कित्येकदा मनातल्या पडद्यावर उमटून पुसट होत जातो. 

तर अशी ही आठवणी ताज्या करून देणारी गाणी आणि अशा अनेक प्रिय गाण्यांना एका सुंदर बंधनात मनात गुंफून वर्षानुवर्षे रुजलेल्या आठवणी.  हा माझ्या आयुष्याचा अनमोल असा खजिना आहे जो वेळेनुरूप आयुष्यात एक वेगळीच बहर घेऊन येत असतो. आयुष्यात अशी कितीतरी गाणी आहेत ... प्रत्येकाचे स्वतःचेच असे अर्थपूर्ण शब्द , वेगळीच अशी चाल , लय आणि सूरही वेगळाच आणि त्यामुळेच प्रत्येक गाणे असे इतरांपेक्षा आगळे बनते आणि त्यासोबत जुळलेली आठवण देखील अद्वितीय बनते. आज बालपणापासून ते आजपर्यंतची विविध गाणी हा लेख लिहिताना आठवली आणि त्यासोबतच मनात दाटून आला एक वेगळाच आठवणींचा पूर ... विविध भावनांच्या असंख्य सुरांनी भरून निघालेला, वर्षांवर्षांच्या लहानमोठया घटनांना, व्यक्तींना पुन्हा एकदा नजरेसमोर आणणारा , आनंदाच्या असंख्य प्रवाहांना वाट मोकळी करून देणारा. 

- रुपाली ठोंबरे.




 

No comments:

Post a Comment