आपल्या मनातल्या सुकलेल्या पानांना फुलवण्याचा प्रयत्न नित्य सुरु असावा म्हणजे एक दिवस एक टुमदार शेत मनाच्या वाऱ्यावर डुलताना आढळेल |
आजचा नववर्षाचा पहिला दिन...तोच सूर्य नेहमीप्रमाणे काळोखाचे साम्राज्य धुळीत मिळवून नवे रंग घेऊन आकाशी आला... सभोवताली पक्षी , झाडे , पाणी सारे सारे अगदी रोजसारखेच... पण तरीही जग आज निराळे भासत होते... कारण रोजचाच तोच सूर्य आज मात्र अधिक स्फूर्तिदायी वाटत होता... त्याच्या प्रकाशाने मनात एक नवे चैतन्याचे कारंजे जन्माला आले... त्या तेजकणांनी अंग अंग उत्साहाने प्रेरित झाले...आयुष्यभरच्या स्वप्नांच्या सुकलेल्या कळ्यांना नवसंजीवनी लाभली... त्याच कळ्यांना पुन्हा एकदा नव्याने गोंजारण्याचे भाग्य या जन्मी लाभले... आज जिथे सारे जण नवे संकल्प करण्याच्या तयारीत असतात तिथे आपण मात्र आपल्याच जुन्या, काळाच्या ओघात खोल गर्तेत बुडालेल्या इच्छा-आकांक्षांना सावरून पैलतीरी आणण्याच्या प्रयत्नात जाऊया...त्यांना वेळेच्या योग्य नियोजनाचे आणि निश्चयाचे बळ देणारे नवे पंख देण्याचा प्रयत्न करूया... आणि हे करत असताना खरेच असे वाटेल जणू खूप पूर्वी अशी एखादी कविता सुचली... २ ओळी लिहिल्या आणि मग नंतर पुढच्या ओळी राहूनच गेल्या... तो कागद त्या अर्धवट राहिलेल्या कवितेला घेऊन कितीतरी वर्षे नव्या शब्दांच्या प्रतीक्षेत वाऱ्यावर उडत राहिला पण आज मात्र त्या कवितेला नवे शब्द लाभले आणि ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे...
या कवितेसारखेच काहीसे आपल्या स्वप्नांचे , संकल्पांचे असते , नाही का? नवा संकल्प सुरु करून तो असा अर्धवट राहून जाण्यापेक्षा या वर्षी जुन्याच स्वप्नांना खतपाणी घालून ताजे करून फुलवले तर...जीवन नव्या अर्थाने सार्थ होईल , आपलाच आपल्याबद्दलचा आत्मविश्वास दृढ होईल, नाही का ?... एक कविता पूर्ण झाली कि नव्या कवितेसाठी शब्द आपली ओंजळ आपसूकच पुढे करतील आणि मग आपल्यातील आत्मविश्वासाच्या जोरावर जन्म होईल आणखी एका नव्या कवितेचा. अशा प्रकारे आयुष्याच्या शेवटी फक्तच अर्धवट रचनांनी हिरमुसलेल्या कोऱ्या पानांपेक्षा एखादा मोजकाच कवितासंग्रह नको का ठायी असायला? अंतःकरणाच्या कोपऱ्याशी अहोरात्र टोचत राहणाऱ्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांच्या कळ्यांऐवजी फुललेल्या मोजक्याच पण आवडत्या फुलांचा गुच्छ जास्तच सुख देऊन जाईल , हो कि नाही ? विचार करून पहा आणि हो , सोबत कृतीपण...मग चला तर कामाला लागूया... नव्या वर्षाच्या जुन्याच स्वप्नांना नव्याने फुलवण्याकरता ... आणि त्यासाठी तुम्हां सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!!
- रुपाली ठोंबरे
अर्धवट रचनांनी हिरमुसलेल्या....व्वा!क्या बात हे.
ReplyDeleteअर्धवट राहिलेल्या स्वप्नांच्या कळ्या दुधी मोगर्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षणी खुलतात आणि आनंद देतात. बस्स हरेकका वक्त होता है, अपने पास उसके खिलने तक टैम कहां है? उसके पहले हम ही। मुरझा जाते है। कुदरत अपना काम सही ढंग से सही टैम पर करती है। तनिक राह देखो, तबतक खिले हुए कली के आनंद का लुफ्त लो।
ReplyDelete