Pages

Friday, March 9, 2018

नजराणा लिप्यांचा...



नवी मुंबईतील वाशी स्टेशनपासून अगदी पायी चालत जाऊ शकू इतक्या अंतरावर असलेली ऐसपैस सिडको आर्ट गॅलरी ही चित्ररसिकांसाठी आता नव्यानेच सुरु झालेले एक उत्तम आकर्षण आहे. आणि या आकर्षणाची सुरुवात झाली आहे- आदिशक्ती-अक्षरशक्ती या प्रदर्शनापासून. 

प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या APSC स्कुल तर्फे दर वर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केले जाणारे आदिशक्ती- अक्षरशक्ती हे नुसतेच एक सुलेखन आणि चित्र प्रदर्शन नव्हे तर ते प्रदर्शन आहे स्त्री-शक्तीचे. एखादी स्त्री मनात ठरवले तर काहीही करू शकते हे या प्रदर्शनातून पुन्हा एकदा आम्ही, APSC च्या विद्यार्थिनींनी सिद्ध करून दाखवले आहे. 

आदिशक्ती-अक्षरशक्ती या प्रदर्शनाचे हे तिसरे वर्ष. या वर्षी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे जगासमोर मांडण्याच्या उद्देशाने अच्युत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही १७ जणींनी आपापली लिपी निवडली आणि तिचा यथायोग्य अभ्यास सुरु केला. भारतासारख्या लिपीप्रधान देशात राहून त्यातील या विविधतेतील समृद्धता न अनुभवून कसे बरे चालेल ? मल्याळम ,ओरिया , लोणात्रा ,बंगाली ,अरेबिक , मोडी ,सिद्धम अशा अनेक भाषा खरेतर आम्हा प्रत्येकासाठी नवख्या, पण तरी मनात निश्चय केला आणि पूर्णार्थाने त्या लिपीला आपलेसे करण्याचा प्रत्येकीने मनाशी चंग बांधला. या प्रत्येक लिपीची वळणे , तऱ्हा वेगवेगळ्या असल्या तरी आम्ही सुलेखनाच्या सहवासात बरीच वर्षे असल्याने  रेषा ,बिंदू ,रंग ,वक्राकार रेषा या सर्वांशी आमची बऱ्यापैकी गट्टी असल्याने या नव्या मैत्रिणींसोबत आमचा खूप चांगला संवाद घडला. त्यांना समजून उमजून घेत आणि आपल्या रोजच्या साच्यातून बाहेर पडून प्रत्येकीने त्या लिपीच्या अक्षरांना एक नवे रूप दिले...अतिशय सुंदर आणि समर्पक. कागदावर केलेल्या रचना आणि अचूक रंगसंगती यांमुळे ती अक्षरचित्रे अधिक आकर्षक झाली. सुरुवातीला कठीण वाटणारे काम स्वतःच्या कौशल्याने आणि मेहनतीने सोपे करून पूर्ण करून दाखवून स्त्री शक्तीचे एक उत्तम उदाहरण आज इथे निर्माण झाले. 

आणि अशाप्रकारे १७ जणींकडून निर्माण झालेल्या १५ विविध भाषांतील कितीतरी सुंदर कलाकृती जागतिक महिला दिनापासून ४ दिवसांसाठी वाशी येथील आर्ट गॅलरीत स्थानापन्न झाल्या आहेत. ज्याप्रमाणे या प्रदर्शनाची कल्पना सुंदर आणि निराळी त्याचप्रमाणे रोजच्या फ्रेमिंगच्या चौकटीतून बाहेर पडून प्रदर्शन सादर करण्यासाठी निवडलेली मांडणी निराळी. लाकडी स्टँडवर दिमाखात सर्व लिप्या आज तुमच्या स्वागतासाठी उभ्या आहेत. आतापर्यंत रसिकप्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहेच आणि खात्री आहे तुम्ही सर्वजण सुद्धा आवर्जुन आमच्या प्रदर्शनाला भेट द्याल आणि सर्व कलाकारांना एखादी कौतुकाची थाप देऊन त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा द्याल. आणि हो , या प्रदर्शनातून तुम्हाला मिळणारा लिप्यांचा नजराणा आणि त्यासोबतचा आनंद निश्चितच अधिक सुखावणारा असेल यात शंका नाही. 

 

- रुपाली ठोंबरे.

2 comments: