Pages

Saturday, May 19, 2018

तो आणि.... ती (भाग ५)

४ x ४ ची ती बंद जागा. आसपास कोणीच नाही. चारही भिंतींवर काचेच्या आणि निरनिराळ्या टाइल्सची खूप सुंदर रचना...एका भिंतीवर मधोमध एक आरसा तोही खूप सुंदर ... त्यावर त्यापेक्षाही सुंदर नक्षी... रंगसंगती तर अप्रतिमच... डोक्यावर आरशांचेच झुंबर... दिसायला झुंबरासारखे होते पण एक वेगळीच नक्षी होती ती ३D भासवणारी... ती एवढीशी जागा सुद्धा किती मन मोहवून टाकणारी....

... पण या क्षणी मात्र निर्वीला त्या कोणत्याच रचनेत किंवा नक्षीकामात रुची नव्हती...तो दोन मजल्यांच्या रस्तासुद्धा तिला खूप मोठा वाटत होता. घडयाळावर नजर जात होती तिची सारखी... आणि तेही उगाचच... तिलाही माहित होते कि तीची आज वेळेची स्पर्धा सुरु होती ती घड्याळाच्या काट्यासोबत नाही तर हृदयाच्या ठोक्यांसोबत.शेवटी तो काचेचा पडदा उघडला आणि ती जितक्या वेगाने शक्य होईल तितक्या वेगात तिच्या रूममध्ये आली. लॅपटॉप बाहेरच होता. तत्परतेने आधी लॅपटॉप आणि नंतर मेसेंजर सुरु केले तर नेहमीसारखीच आजसुद्धा तिच्या पदरी निराशाच आली. पण आज निर्वीने मनाशी चंगच बांधला होता जणू... आज काही झाले तरी सार्थकला मनातले सांगेलच असा. तिने फोन हाती घेतला आणि कसलाही विचार न करता 'सार्थक' या नावाशेजारचे कॉल चे बटण दाबले... दूरचा नंबर असल्याने अतिशय मंद आवाजात रिंग जात होती...त्या ध्वनीपेक्षा तिचे हृदयाचे ठोके अधिक वाटत होते. आणि एका क्षणाला तो काळजाचा एक ठोका चुकलाच ,
" हॅलो ... "
पलीकडून आवाज आला...  पण तो एका मुलीचा. हिने पुन्हा एकदा फोन नंबर तपासून पाहिला. नंबर तर बरोबर आहे .पण सार्थक कुठे आहे ? आणि ही कोण ? मनात हजार शंकांचे काहूर त्या एका क्षणात जमले. पलीकडून अजूनही ' हॅलो हॅलो ' असा आवाज येतच होता. हिने सावरले स्वतःला आणि त्याच्याबद्दल विचारणा केली.
" Ohhh ! Sir ? He is just busy in some important work. If anything urgent I will inform him . May I know with whom I am talking?Is it official ?"
मनात आले , अगं इम्पॉर्टन्टच आहे आता ... तुझा आवाज ऐकल्यावर तर आणखी इम्पॉर्टन्ट झालंय.किती चौकशा या मुलीला. तिने आपले नाव सांगितले आणि लवकरात लवकर त्याच्याकडे फोन देण्यास तिला विनवले.
" hallooooo... अगं निर्वी, काय मस्त सरप्राईझ दिलेस तू मला. Wow ! तुझा कॉल हा असा अचानक ? Can't imagine.तू बोल कशी आहेस ?"
" मी खूप छान होते पण आता नाही ."
"का गं ? काय झाले ?"
" आधी तू सांग , ती मुलगी कोण होती ?"
" ती ? ती उर्वी ... सध्याचं माझं शेपूट.... "
आणि सार्थक हसायला लागला. तो हसत होता पण ती मात्र फार गंभीर होती.
अगं , पूर्ण दिवस हल्ली तिच्यासोबतच जातो माझा म्हणून तर वेळ नाही मिळत . आणि आपल्याला बोलायलाही मिळत नाही... "
तो आपला बोलतच होता... त्याचा नवा प्रोजेक्ट... या प्रोजेक्टमधली ही नवीन आलेली मुलगी...तिच्याबद्दल बरंच काही...उर्वीच्या उल्लेखामुळे त्याची ही बालमैत्रीण कुठेतरी जळते आहे हे पाहून त्याला एकाप्रकारे छान वाटत होते... निर्वीला चिडवण्यासाठी सार्थक या उर्वीची स्तुतीफुले अधिकाधिक गुंफत राहिला आणि इथे त्याचे हे कुठेतरी फुलणारे प्रेम मात्र क्षणाक्षणाला तुटत होते ... ही फार संशयी होती असा भाग नव्हता मात्र अशा आतुर प्रसंगी या उर्वी नावाच्या नव्या नावामुळे काही अंशी तरी तिच्या आनंदावर विरजणच पडले होते. पण आज मनाशी ठरवलेच होते कि काही झाले तरी त्याला थोडीफार कल्पना तरी देऊयाच...आणि निर्वीने बोलण्याच्या ओघात असलेल्या सार्थकला आपल्या बोलण्याने थांबवलेच ,
" अरे , काय हे . फोन मी केलाय आणि कौतुक मात्र तुझ्याच कामाचं सुरु आहे. माहित आहे दुसरी मैत्रीण मिळाली आहे आता, पण तरी जुनी नाती विसरू नये ... ?"
पुन्हा तेच... खळखळून हसला तो पलीकडून. हसू आवरतच सार्थक पुढे बोलू लागला,
" आज पकडलं बरं का मी तुला ... अगं , तसं नाही गं .वेडी आहेस का तू ? मज्जा केली मी . ती उर्वी आणि तुझ्या जागी ? शक्य आहे का ? तू ही खूणगाठ बांधून घे मनाशी कि तुझी माझ्या मनातली जागा कोणीसुद्धा हिरावून घेऊ शकणार नाही या जगात. हे तुलाही माहित आहे आणि मलाही. तुझ्यावर प्रेम आहे गं माझे.. खूप.I always miss you and Love you a lot. पण काय करणार तुला समजत नाही ते."
" अरे तसे नाही रे.मला समजते सर्व. पण तू .. ... ... पण समजून घेत जा ना. मी असे लगेच कशी सांगू शकेन. मला तू आवडतोस अगदी खूप, म्हणूनच तर आज असे त्या मुलीचा आवाज ऐकला आणि वरून तू तिचेच कोडकौतुक करत होतास ते पाहून खूप वाईट वाटले...मी खूप संशयी वैगरे नाही बरे का.आणि तुझ्या मनात माझ्याशिवाय आणखी कोणी असूही शकणार नाही अशी खात्री आहे मला. बघ मला समजते सर्व ... पण तू... ... .. ... "
ती आपली बोलतच होती आणि मधूनच पलीकडून फक्त त्याची 'हॅलोSSS ...  हॅलोSSS .... ' अशी साद ऐकू येऊ लागली तशी ती थांबली. संपर्क तुटला होता हे तिला कळून चुकले... पण केव्हा ते तिलाही कळले नव्हते...  ती आपली बोलतच राहिली होती. पुन्हा फोन करावा का असा विचार करत असतानाच मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचे नाव आले.. त्याने पुन्हा फोन केला होता . तिनेही तत्परतेने तो घेतला.
" अगं सॉरी. फोन कट झाला तेव्हा. मी नेमका लिफ्टमध्ये गेलो तेव्हा आणि...पण तू बोल आता... खूप काही बोलत होतीस तू तेव्हा... उगाच लिफ्टमध्ये गेलो आणि... बोल आता."
" अरे हो हो... पण मी काय सांगत होती बरे?..."
"अगं , तू सांगत होतीस कि तुला सर्व समजते... पण तू ...तू...  पुढे काय ?"
" अरे हां , ... पण तू असे सर्व बोलत जाऊ नकोस. मला नाही आवडत."   
निर्वी आपला लटका राग दाखवत बोलत होती. दूरवरचे संभाषण असल्याने फारच अस्पष्टसे बोल ऐकू येत होते. 
" नक्की कशाबद्दल बोलते आहेस तू ? काय नाही आवडत ?मी काय बोललो आता?"
" आता बघ. तेच जे आता बोलत होतास तू? यापुढे नको हां असे करुस ? खरे तर त्रास होतो त्याचा कधीकधी. मला माहित आहे तू समजून घेशील... "
" अगं, पण कशाचा एवढा त्रास होतो तुला. OK. कळले.सॉरी तुला इतका त्रास होत असेल तर मी पुन्हा नाही असा बोलणार. आता तुझीच वाट पाहीन मी त्यासाठी. चल आता ठेवतो मी. मिटिंग आहे लगेचच. बोलू पुन्हा कधीतरी.बाय. टेक केअर "

निर्वीला अजूनही खूप काही बोलायचे होते पण सार्थकने फोन कट केला होता. ती तसाच फोन हातात घेऊन बराच वेळ उभी राहिली... तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते... मनातली एक भावना त्याला बोलून दाखवल्याचा तो आनंद होता. ती असेच स्वप्नांचे मनोरथ रचत निद्रेच्या अधीन झाली.

तिथे सार्थक मात्र फार अस्वस्थ झाला होता. सुरु असलेल्या मीटिंगमध्ये त्याचे अजिबात लक्ष लागेना. तिचा किंचित राग सुद्धा येत होता. सारखे मनात विचारांचे थैमान सुरु होते. खरंच माझ्या प्रेमाची कबुली तिला इतका त्रास का ? हा प्रश्न न राहवून तो सारखा स्वतःलाच विचारात होता. पण तो खूप समंजस होता. त्याने विचार केला कि खरंच तिला हे असे सारखे बोलणे आवडत नसेल तर मी स्वतःवर थोडा संयम ठेवायला हवा. तिला हवा तेवढा वेळ द्यायला हवा. आज उर्वीबद्दलचे माझे बोलणे तिला खूप आवडले नाही असे जाणवले म्हणजे कुठेतरी ती माझा विचार करत असेलही त्यामुळे माझ्याकडून आता उगाच घाई नको. आता सरळ २ महिन्यांनी तिला भेटेन तेव्हाच हा विषय काढेन. पण तोपर्यंत ?.... संपर्क तोडायचा ? नाही नाही...अगदी नॉर्मल बोलेन... तिचे काम... इथले काम. त्याने असे खूप काही मनात ठरवले... ठरवतच होता आणि उर्वीचा आवाज त्याच्या कानांवर आला. मिटिंग संपून ५ मिनिटे होऊन गेली होती पण तो तरी तिथेच बसून होता त्याच्या विचारांच्या तंद्रीत.

सकाळ झाली .... अगदी नेहमी सारखीच. अलार्मच्या आवाजाने जाग ,नंतर काल रात्रीचा पसारा आवरून आणि स्वतःची तयारी करून निर्वी नेहमीप्रमाणे खाली लॉबी मध्ये आली. आज खूप म्हणजे खूप खुश होती ती आणि ती सर्व ख़ुशी तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती . ब्रेकफास्ट करून ती रिसेप्शन च्या समोरच्या सोफ्यावर बसून तिचा रोजचा निरीक्षणाचा कार्यक्रम आणि तिच्या सहकाऱ्यांची वाट पाहण्यात मग्न होती . निहाल  तिला सकाळपासूनच दिसला नव्हता आणि ती त्याचीच आतुरतेने वाट पाहत होती कारण त्याला आनंदाची बातमी द्यायची होती ना ... आज एकदाचे मनातले सार्थक समोर बोलली होती ना ती...  तेही निहालने केलेल्या कानउघडणी मुळे...तेच सांगायचे होते त्याला. ती वस्तुस्थितीत होती ... रिसेप्शनवरच्या सर्व हालचाली पाहत... आमिरावर तिची नजर गेली आणि ती काही क्षण कालच्या संवादात, मनातल्या मनातच लुप्त झाली. ही आमिरा किती सुंदर दिसते ... फक्त आणि फक्त दोन डोळे आणि मनगटांपासून बोटांपर्यंतचा भाग आजवर पाहिला होता पण तरी ती सौन्दर्याची खाण होती...  पण त्या डोळ्यांत इतके दुःख लपलेले असेल ते नाही कधीच दिसले. काल  ऐकले ते खरे असेल का ... आणि असेल तर किती भयंकर... आमिरा एक १२-१३ वर्षांची तिच्या आईबापांची तिसरी मुलगी...अतिशय सुंदर ,निरागस अशी ती कोण्या एका सौदागाराला आवडली ... लगेच लग्न करून मोकळा झाला ... अवघ्या पंधराव्या वर्षी तिला आई करून सोडले... सोडले म्हणजे अगदी वाऱ्यावरच... इथे तलाक किती सोपा असतो... पण फक्त पुरुषांसाठी... स्त्रीची मात्र सर्वत्र एकच कहाणी...आईबापांचे तोंड काही पैसे देऊन गप्प केले... आणि आता ही मात्र त्या एवढ्याशा जीवासाठी रात्रीचे दिवस करत जगते आहे... पण तरी चेहऱ्यावर एखादे दुःखाचे निशाण नाही ... कायम एक स्मितहास्य खुलून असते त्यावर... तो निहाल एक ... स्वतःचे पहिले प्रेम अगदी डोळ्यांदेखत दुसऱ्याचे होताना पाहिले पण तरी चेहरा मात्र कायम प्रसन्न ...कस्से जमत असेल हे सर्व या लोकांना... खरंच यावेळी भेटलेले हे दोघे खूप काही नकळत शिकवून गेले... काल त्याने किती छान समजावले मला ... आणि सर्व किती सोपं झालं... इतके दिवस जमलेच नाही मला.... 
" अहो मिस एव्हरलॉस्ट ब्युटी , कुठे आहात तुम्ही ?"
मनात आठवण यावी आणि तो समोर यावा असा तो योगायोग. स्वतःचे हे नवे नाव ऐकून हसूच फुटले तिला. 
" काय म्हणालात ? एव्हरलॉस्ट .... (ती पुन्हा खूप हसली ) असलेल्या नावांना डावलून नवीन नावे देणे हा छंद कधीपासून जडला "
" मग काय तर ? जबसे आप मेरी जिंदगी में आये हो , सदाबहार. बरे ते जाऊ द्या . तुम्ही सांगा काल बोललात तुमच्या मिस्टर कॅलिफोर्नियाशी ?"
" हो तर "
" तर तसे वाटत तर नाही ."
"का ?खरेच काढला विषय मी..."
मग तुम्ही तरी का अशा हरवलेल्या... anyways तो काय बोलला? खुश झाला असेल ना खूप ?
"हम्म्म्म म्हणजे मी सांगितले थोडे ... अप्रत्यक्षपणे.  पण नंतर पुढे बोलताच नाही आले. त्याची मीटिंग होती तर तो निघून गेला."
"तरीच ... हे अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली हा काय प्रकार असतो बुवा ? प्रत्यक्ष बोलला असतात तर मन अधिक शांत झाले असते. पण असो , एक पायरी पुढे गेलात. All the Best ! मी येतो आता. आज बरेच काम आहेत ना? आज सर्व आटोपून लवकर घरी जायचे आहे. उद्याची तयारी पण करायची आहे ना. तसे आईने सर्व केले आहे पण तरी आपला काही हातभार हवा ना. आणि हो , तुम्ही याल ना नक्की? मी तशी तिकडची रूम कन्फर्म करतो. सकाळी शार्प सेव्हन .OK "
आणि निहाल निघूनही गेला . नवीन आलेल्या पाहुण्यांमध्ये गायब झाला कुठेतरी . निर्वीसुद्धा तिच्या कामासाठी निघून गेली.
  
रात्री बराच वेळ निर्वी मेसेंजरवर सार्थकची वाट पाहत राहिली पण तो आलाच नाही. कामात असेल खूप, असे समजून आणि उद्या लवकर उठायचे आहे हे उमगले आणि तिने लॅपटॉप बंद केले. पिकनिकच्या उत्साहात तयारीला लागली ती. 

दुसरा दिवस उजाडला तो एक नवीन पहाट घेऊन.तयार होऊन खाली आली. तो, त्याची आई , बहीण आणि एक छोटीशी चिऊ आधीपासूनच तिची वाट पाहत रिसेप्शन प्रभागात उभे होते. 
" या या मॅडम , झाली का  तुमची सकाळ ?आई , या आहेत आमच्या इथल्या पाहुण्या जिच्यासाठी तू त्या दिवशी पुरणपोळ्या केल्या होत्यास ना ?"
" अरे हो का ,हीच ती तुझी निर्वी मॅडम का ? छान छान ... मग आवडल्या ना पुरणपोळ्या तुला. ते काय आहे ना त्या दिवशी हा बोलला मला आणि मग मी म्हटलं ....  " आई आपली सुरु झाली लगेच. "
" आई हो हो , तुम्ही गाडीत बसा आधी. त्या आपल्यासोबत येत आहेत मग तिथे हव्या तितक्या गप्पा मारा. आणि निर्वीमॅडम , आता तुम्ही सुद्धा दोन दिवस मस्त एन्जॉय करा ... सर्व विसरून.आणि मग तुम्ही एकत्र या पुढच्यावेळी. खूप मस्त आहे दुबई. "
"एकत्र ... ? आणखी कोण ? " त्याच्या बहिणीला पडलेला प्रतिप्रश्न.
"अरे बाबांनो , मी म्हटले कि आता तुम्ही एकट्या फिरून घ्या आणि पुढच्यावेळी एकत्र सर्वाना घेऊन या ... अगं प्रियाताई , यांचे कॅलिफोर्निया मध्ये खूप महत्त्वाची माणसे असतात म्हणे. " 
निहाल नेहमीसारखा आपला हसत होता पण निर्वी मात्र कधी नव्हे ते आज प्रथमच लाजली. नंतर तीही त्या हसण्यात , गप्पागोष्टींत सामील झाली. आणि बोलता बोलता तिच्या एक लक्षात आले ... तिने वाकून पुन्हा एकदा नीट निरखून पाहिले. अरे हो हा तर तोच. ती परदेशात कोणीतरी ओळखीचा अचानक भेटून जावं तसं ती ओरडलीच ,
" अरे आप रेहमानजी ना ? आपने पेहचाना मुझे ?  मुझे यहा आपही लेकर आये थे . "
" जी मॅडमजी, पर सोचा आप शायद भूल गये होंगे तो कुछ कहा नहीं मैंने .आपको तो मैने बताई सारी बाते याद हैं .... ..  "
आणि मग अशा रीतीने रहमान सुद्धा त्यांच्या गप्पागोष्टींत सामील झाला. 

दुबई ... काय सुंदर जागा आहे ...अबब ! कित्ती त्या उंचच्या उंच इमारती! १२४ व्या मजल्यावरून दिसणारी दुबई तर काही औरच . तो जमैकाचा समुद्रकिनारा... त्या सप्ततारांकित हॉटेलमधलला अतिमहागडा नाश्ता केला पण तो फक्त त्या हॉटेलला जवळून अनुभवून घेण्यासाठी... वाळवंटातली गरमागरम वाळू आणि त्यातली ती उंटावरची सफर... रात्रीची मैफील... तिथल्या नृत्याची एक सुंदर झलक आणि काय त्या सौन्दर्याच्या खाणी ज्या डोळ्यांत अजूनही साठून आहेत... काय ते स्वादिष्ट जेवण ... काय ते गालिचे ... काय ती कलाकुसर ... त्या सुकामेवा ,मसाल्यांच्या विविध जागा ... आणि सोन्याचा बाजार... हो बाजारच सोन्याचा ... आपल्या इथे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी जशा राख्या दुकानांसमोर लडींमध्ये लगडलेल्या असतात तशाच इथे सोन्याच्या माळाच माळा दुकानांसमोर चकाकत असतात. सर्वच अद्भुत... 

तर अशी ही दुबईची सफर आता संपत आली होती. निहालच्या आई आणि बहिणीसोबत खूप मिसळून गेले होते. चिऊ तर इतर सर्वांपेक्षा तिच्याकडे जास्त राहू लागली. निर्वीही आता त्याच्या प्रियाताईला प्रियाताई बोलू लागली. प्रियाताईंकडूनच त्याच्या भूतकाळातली ती अधुरी राहिलेली प्रेमकथा समजली .आणि नकळत तिचेही डोळे पाणावले. त्याच्या आईची त्याच्याविषयीची चिंता जाणवली. निहाल लग्न करणारच नाही अशी शपथ घेतलेला भीष्म बनला होता ते काही केल्या त्या माऊलीला पटत नव्हते. ती त्याच्या विरोधात जाऊन हातपाय मारत राहायची पण तो मात्र सारेच डाव हाणून पाडायचा.... त्याचे हे वेगळेच रूप तिच्या डोळ्यांसमोर आज आले होते. एक वेगळाच तो... आईवर मनापासून प्रेम करणारा तरी आपल्या विचारांवर तटस्थ राहणारा. 

पुन्हा फिरून माघारी हॉटेलवर आली ती... खूप काही सांगायचे होते तिला. धावत पळत , सर्व बॅग्स सांभाळत ती रूममध्ये पोहोचली. लगेच फोन हातात घेतला आणि एका क्षणात रिंग पार सातासमुद्रापलीकडे कॅलिफोर्नियात वाजू लागली. पलीकडून आवाज सार्थकचाच होता पण खूप वेगळा... जणू कुठे तरी हरवत असलेला... पण तिला ते जाणवलंच नाही ... ती आपली दुबईची सफर , इथे भेटलेला नवा मित्र , त्याचे कुटुंब  हे सांगण्यात मश्गुल झालेली... खूप खूप बोलली ती ... त्याला काही  बोलायचे असेल याचे भानही नव्हते... पण तोही आज काहीच बोलला नाही ... फक्त ऐकून घेत होता ... ... बराच वेळ असे एकतर्फी संभाषण सुरु राहिले... निरोप झाला ... आणि तो संवाद थांबला. कॉल संपला होता. निर्वी तिच्याच मस्तीत होती पण नंतर जाणवले आज काहीतरी कमी होते त्या संवादात ... काय ?
ती आठवत राहिली ... ते दोन शब्द ... Miss You ! Love You !!

निर्वीला थोडे विचित्र वाटले पण ती आज धुंदीत होती कशाच्यातरी... मनात आले कि आता पुन्हा फोन करून मी ते कुठेतरी निखळून गेलेले शब्द पुन्हा जोडू का ... पण मग तिनेच विचार केला ... आता नको असे काही बोलायला.... त्यापेक्षा घरी जाईन... तोही येईलच ...  समोरासमोरच भेट घडून येईल आणि तेव्हाच सांगेन ... तेव्हा त्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे हे आता तिचे एकमेव स्वप्न होते .... तेच पाहत निर्वीने तिचा थकलेला जीव त्या गुलबक्षी रंगात लपेटून घेतला . 
- रुपाली ठोंबरे. 






2 comments:

  1. खुप छान... पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय..

    ReplyDelete
  2. Mastach rupali.. आमची दुबई सफर घडवलिस����

    ReplyDelete