Pages

Thursday, August 30, 2018

तो... आणि ती (भाग ९)

उशाशी ठेवलेला मोबाईल जोरात केकाटू लागला तसा निर्वीने झोपेतच डोळे मिचकत अलार्म १५ मिनिटे पुढे ढकलून बंद केला आणि पुन्हा झोपेच्या अधीन जाईल त्यापूर्वीच पुन्हा त्यावर रिंग वाजू लागली. तिचे डोळे खाड्कन उघडले. एक क्षणही न दवडता तिने तो कॉल रिसिव्ह केला.
"हॅलो , अरे पोहोचलास पण ? फ्लाईट वेळेवर होती म्हणजे?"
"अगं हो. आणि फोन स्विच ऑन करताच पहिला कॉल मी तुलाच केला... "
पलिकडून आवाज आला आणि हृदयात एक वेगळीच हालचाल झाली ... जाणवले तिला. आज कितीतरी दिवसांनी त्याचा आवाज ऐकत होती ती. आणि महत्त्वाचे म्हणजे आता दोघांतले अंतर आता खूप कमी झाले होते... प्रादेशिक रूपाने आणि मनाने सुद्धा. ती क्षणभर हरवूनच गेली अशा विचारांत.
" अगं , मी एवढा फोन केला. बोल ना काहीतरी. अरे हो. झोप मोडली असेल ना तुझी? सहजच केला होता मी कॉल ... काल बोलून गेलो होतो ना म्हणून. पण झोप तू आता... "
"अरे सार्थक,थांब. झोप काय ? नाही.बरे झाले तू कॉल केलास. तू नाही केला असतास तर मीच करणार होते. मी रात्रीच अलार्म लावून ठेवला होता म्हणून जागेच होते रे. आता हे नको विचारू बरे कि एवढा अलार्म लावून का जागलीस ते ?"
तिच्या या बोलण्यावर त्या पलीकडून मोठे खळाळते हास्य त्या संवादात सामील झाले.
" खरं सांगू का ? मला तर आत्ताच येऊन तुला भेटावसं वाटतंय. हसतोस काय? खरंच."
" अगं हो. मला माहित आहे तू किती उतावीळ झाली आहेस मला भेटण्यासाठी ते. रविवारी भेटणारच आहोत ना आपण?"
" तेच तर. गुरुवार ... शुक्रवार... शनिवार आणि मग रविवार येणार ... तेव्हा आपण भेटणार. कित्ती दूर... मला ना तुला एक सरप्राईझ द्यायचे आहे. उद्या काय एवढा बिझी आहेस कोण जाणे. उद्या किंवा परवा नाही का जमणार?"
" अरे व्वा ! अगं पण आता खूप जण आलेत घरी भेटायला. त्यांच्यातून वेळ काढून भेटणे थोडे कठीणच. आणि जेट लेग असेल तो वेगळा. मला ना तुझ्यासोबत निवांत वेळ घालवायचा आहे...तो रविवारपूर्वी मिळणे अशक्यच दिसतंय. तुला काय वाटतं मला भेटायचं नाही का तुला. तुझ्यापेक्षा आम्हांलाच तुमच्या भेटीची जास्त ओढ लागलेली असते."
"काहीही.... बरे पण रविवार नक्की.किती वाजता आणि कुठे ते नंतर ठरवू."
" हो. मी पुन्हा फोन दुपारी करतो. आणि हो भेटायला येशील तेव्हा माझ्या आवडीचे बुंदीचे लाडू आणायला विसरू नकोस. चल आता पळतो... भेटू लवकरच."
निरोप घेऊन सार्थकने फोन ठेवला. निर्वीच्याही चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान विराजमान झाले होते. इतक्यात वहिनीच्या उठण्याची चाहूल लागली तशी ती पट्कन चादर ओढून घेऊन पलंगावर आडवी झाली... झोपेचे नाटकच ते... उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहण्याची एक छान संधी आणि मूडसुद्धा.

पुढचे दोन दिवस कसे पटकन निघून गेले हे कळलेच नाही. ऑफिसच्या कामात तर निर्वीचें अजिबात लक्ष लागत नव्हते... घरीसुद्धा अगदी तसेच. इतर कोणाच्या जास्त लक्षात आले नाही... पण वहिनीच्या नजरेतून हे सुटलेदेखील नाही.वहिनीने एकदा विचारले सुद्धा होते. आता तिच्यापासून लपवणे शक्य नव्हते. त्यामुळे पुसटशी कल्पना तिने तिला दिली. याचे आणखी एक कारण म्हणजे तिची वहिनी फार उत्तम बुंदीचे लाडू बनवायची. तिने मस्का मारून शनिवारची दुपार वहिनीकडून लाडू शिकण्यासाठी राखून घेतली होती. सर्व मजेत सुरु होते. तो, ती आणि फोन हे समीकरण आता अधिकाधिक घट्ट होत होते. बऱ्याच गप्पा व्हायच्या दिवसभरात. सार्थक त्याच्या घरी सुरु असलेली मजामस्ती कथन करायचा आणि निर्वी मात्र अधिकाधिक त्याच्या गप्पांत स्वतःला हरवत राहायची.

शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा मोबाईल वाजला. आणि पलीकडून अपेक्षित आवाज आला.
" हॅलो, अगं , शनिवारी सुट्टी असते ना तुला? मग शनिवारी भेटायचे का आपण ?"
"शनिवारी ? हो चालेल ना..."
"तुला काल सांगितले त्याच तलावाशेजारी भेटायचे का ?"
" हो. done."
असे म्हणत निर्वीने फोन खाली ठेवला. तिला खूप आनंद झाला होता. तिला आता फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटत होती... ती म्हणजे लाडवांची. ते कसे करायचे आता. पण वहिनीने शुक्रवारी रात्रीच्या जागरणाला संमती देऊन तिची ती काळजीही दूर केली. निर्वीच्या आनंदाला आता सीमा उरली नव्हती. आणि या आनंदात ती हे सुद्धा सफशेल विसरून गेली होती कि तिने शनिवारी भेटण्याचा शब्द तिच्या दुबईच्या मित्राला म्हणजे निहालला दिला होता.आणि तो बिचारा उद्या तिला भेटण्याची किती उत्साहाने तयारी करत होता याची त्या प्रेमात जग विसरलेल्या वेडीला कल्पना देखील नव्हती.

वहिनी ऑफिसमधून आल्यानंतर जेवणं आटोपल्यावर ठरल्याप्रमाणे दोघी लाडवांची तयारी करू लागल्या. आई बाबांना तर कळेचना यांचे काय सुरु आहे ते. लाडू करता करता वहिनी तिला खोदून खोदून बरेच काही विचारण्याचा प्रयत्न करत होती आणि निर्वीनेही बऱ्यापैकी सार्थकबद्दल सांगितले.
" म्हणजे त्याला अजून माहित नाही तुही त्याच्यावर प्रेम करतेस ते ?"
"नाही ना वहिनी. तेच तर उद्या सांगणार आहे त्याला."
"अरे वाह ! म्हणजे उद्या प्रोपोज डे आहे तर तुमचा. छान छान... All the best. "
"थँक यू वहिनी. धक्काच बसेल काही सांगेन तेव्हा... तोही सुखद धक्का. त्यात तुमच्या लाडवांचा  सहभाग असेलच. मी त्याला आवर्जून सांगेन कि हे लाडू माझ्या वहिनीकडून शिकून आम्ही बनवले आहेत. त्याला खूप आवडतील."
वहिनी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेल्या निर्वीकडे पाहत कौतुकाने हसत होती.आणि हसता हसता पुन्हा लाडू वळण्यात मग्न झाली. रात्री एक-दोन वाजेपर्यंत चालणारा हा कार्यक्रम शेवटी संपला आणि दोघीनी बिछान्यावर पाठ टेकली.

रात्री उशिरापर्यंत जागरण  तरी दोघीही सकाळी लवकर उठून तयार झाल्या...तिला ओढ लागली होती त्याला भेटण्याची आणि वहिनीला घरातल्या सर्वांसोबत तिच्या मामेभावाच्या साखरपुड्यासाठी जायचे होते.आईला मैत्रिणीसोबत आधीच ठरलेल्या प्लॅनचे कारण सांगून निर्वीने त्या साखरपुड्यातून सुट्टी घेतली होती. त्याचा फोन येऊन गेला आणि काही तासांत भेटायचे ठरले होते. त्यातले दोन तास स्वतःला तयार करण्यात कसे गेले कळले देखील नाही. एरव्ही ऑफिसला जाताना १५ मिनिटांत तयार होणाऱ्या तिला आज घालण्यासाठी एक चांगला ड्रेस शोधायलाच तासभर लागला... त्यानंतर हेअरस्टाईल , छोटा मोठा नावापुरता मेकअप हे सर्व करता करता बराच वेळ झाला. शेवटी जी नको होती ती धावपळ झालीच. पर्समध्ये पिवळेधम्म बुंदीच्या लाडवांनी भरलेला डबा घेतला ,एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात घेतलेल्या मोबाईलवर कॉल लावतच निर्वी घराबाहेर पडली. घरापासून रिक्षा , नंतर लोकल या तिच्या सर्व प्रवासात सार्थक  सोबत होताच फोनवर... 
"अगं , आता भेटणारच आहोत. तू उतरलीस का?"
" हो , आत्ताच पोहोचले. पाच मिनिटांत पोहोचते."
"ग्रेट ... मला आणखी १५ मिनिट दे . पोहोचतोच मी."
"ओके ."
" अगं ड्रायविंग करतोय. आता तरी फोन ठेव. भेटूच कि आता."
" हो हो ..."
होकार देत निर्वीने फोन कट केला आणि तसाच इतर काहीही न पाहता बागेतल्या कप्प्यात पुढे सरकवून ती तलावाच्या दिशेने झपाझप पावले टाकून चालू लागली.तिथेही पोहोचून बराच वेळ झाला... एक १० मिनिटांचा निवांत वेळ मिळाला ...आणि  तिला तिच्या स्वप्नातल्या दुनियेची पुन्हा एकदा सैर घडत गेली... उघड्या डोळ्यांनी ... मनातल्या मनातच. मध्येच व्हाट्सअँप वर आलेल्या मेसेजेसच्या मालिकेने तिचे ते स्वप्न क्षणासाठी भंगले.तिने फोन हाती घेतला आणि चांगलीच भानावर आली ती. तिला आठवली ती काही दिवसांपूर्वीची रात्र... तो वळिवाचा पाऊस... ती भेट अवचित घडलेली... आणि त्या भेटीत तिने दिलेल्या शब्दाची... खात्री दिली होती तिने निहालला आज भेटण्याची. 
"Oh My God ! मी पार विसरूनच गेले. आत्ता ...?"
निर्वीचे स्वगतच बोलणे सुरु होते. तिने मेसेजेस पाहिले,
" हॅल्लो... आज भेटायचे ना?"
" मी २-३ वाजेपर्यंत पोहोचतो ."
"आज खूप काही बोलायचे आहे तुमच्यासोबत. नक्की या .प्लीज ..."
"प्लीज रिप्लाय ..."
" मी कॉल केला ... का उचलत नाहीत ?"
" पण मला आज काही केल्या भेटायचे आहे तुम्हाला. "
" मी निघालो. मी त्याच चहाच्या टपरीशेजारी तुमची वाट पाहीन.नक्की या हां ." 
कॉल लिस्ट पहिली तर तब्बल १३ मिस्ड कॉल्स... मी बोलण्याच्या नादात इतके दुर्लक्ष केले... तिला तिच्यावरच विश्वास बसत नव्हता... निर्वीने ताबडतोब त्याला कॉल लावला. रिंग जात होती. पण तो कॉल घेतलाच गेला नाही. तिने पुन्हा फोन लावला. पुन्हा तेच... तिचे मिस्ड कॉल्स वर मिस्ड कॉल्स त्याच्या मोबाईलवर जमा होत गेले पण ती तरीही त्याच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करत होती. शेवटी कंटाळून मेसेज टाईप करू लागली आणि पुढच्याच क्षणी डोळ्यांसमोर अंधारी आली. डोळ्यांच्या पाकळ्यांवर एक उबदार स्पर्श झाला...पाकळ्या सहज मिटल्या गेल्या... तो ओळखीचा स्पर्श बरेच काही सांगून गेला...पण त्या स्पर्शाच्या स्पर्शाने तिच्या मोबाईलवरच्या स्क्रीनवरचा मेसेज मात्र कोराच राहिला. 
" सार्थक, मला माहित आहे कि तूच येणार आहेस म्हणून डोळ्यांवरचा हात काढू शकतोस ."
निर्वीने हसत हसतच उत्तर दिले. 
" अगं हो... ते माहीतच होते मला पण. फक्त एक मज्जा... कॉलेजमध्ये असताना आठवते का तू अशीच एकदा माझे डोळे मिटवून गेली होतीस.आणि तेव्हापासूनच तर तू या डोळ्यांत साठून राहिली आहेस... त्या आठवणी.. त्या गंमती... "
"हो का ? छान छान!"
असे म्हणत आपल्या दोन्ही हातांनी डोळ्यांवरचे हात दूर करत निर्वी  सार्थककडे वळली. तिचे बोलके डोळे आणि तिचा हसरा चेहरा तिच्या मनातला आनंद वर्णन करत होता. अशा तिला पाहता क्षणीच त्याने तिला एक हलकीशी मिठी मारली. तशी निर्वी गोंधळली. स्वतःला मागे सारत , सावरत ती म्हणाली ,
" अरे अरे ओ मिस्टर ...जरा जपून . ही अमेरिका नाही इंडिया आहे."
"अरे मग काय झाले...मैत्रीचे नाते तर अमेरिका असो वा इंडिया सेमच असते ना ?"
"हो पण... सोड जाऊ दे.मग काय सुरु आहे ? घरी सर्व पाहुणे गेले असतील ना आता ?"
"हो... आता फक्त ताई आहे ... तीसुद्धा जाईल उद्या तिच्या घरी."
अशा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या... त्या ऐन रंगात आल्या असताना निर्वीचा फोन वाजला."
"सॉरी हां , ऑफिसमधून फोन आहे घ्यावा लागेल... "
असे म्हणत तिने उचललेला तो फोन जवळजवळ १० मिनिटांनी त्याच्या जागेवर शांत बसला.पण पुढे आईचा , वहिनीचा, एका जीवलग मैत्रिणीच्या मुलीचा असे एकूण ४ फोन आले त्यानंतर मात्र तो वैतागला आणि त्याने तो जबरदस्तीने सायलेंट मोडवर करून स्वतःच्या खिशात घालून घेतला. 
"अरे असे रे काय ?"
" मग काय ? मी एवढा दूरवरून ... अमेरिकेतून आलोय तुला भेटण्यासाठी आणि तू आहे कि मला बिलकुल भाव देत नाहीस.... "
" अरे बापरे ! हो रे खरंच की . खूप दुरून आलास भेटायला... रागावले वाटतं साहेब आता. पण आम्हाला माहित आहे हा राग घालवण्याचे औषध... "
सार्थकच्या खोट्या खोट्या रागावर हसतच तिने पर्समधून धम्म पिवळ्या लाडवांचा डबा उघडून त्याच्यासमोर धरला. आणि तो खोटा राग देखील कुठच्या कुठे पळून गेला. आणि मग त्या लाडवांचा स्तुतीपासून सुरु झालेला गप्पांचा प्रवास थेट वहिनीचे कौतुक ,घरांच्या खुशाली , अमेरिकेतील जीवन , तेथील मज्जा ,तिथे हरवलेल्या गोष्टी अशा अनेक स्थानकांना भेट देत थेट एका नाजूक विषयावर येऊन थांबला - तो...आणि ती. 
"मग ? आपल्याबद्दल विचार करतेस की नाहीस ?आहे ना अजून लक्षात ? "
यावर निर्वी काहीच बोलली नाही. नेहमीप्रमाणे विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

"किती वाजले ? गप्पांमध्ये बराच वेळ कसा निघून गेला कळलेच नाही."
तिचे हे वाक्य ऐकले आणि त्याचा गेलेला राग पुन्हा त्याच्या बोलण्यात जाणवून गेला. 
"हो. तुला जायचे असेल ना? जा तू ? सॉरी... तुझा किमती वेळ वाया घालवला ना मी ?"
तिने येत असलेले हासू दाबले आणि पुढे म्हणाली ,
" अरे त्यासाठी नाही म्हणाले मी. इथे ना ५ वाजता बोटिंग सुरु होते. त्यासाठी विचारत होते मी."
ते ऐकताच सार्थकची कोमेजणारी कळी पुन्हा एकदा खुलली. 
"अच्छा... मग तसे नीट सांगायचे ना !उगाच अर्थाचा अनर्थ होऊ शकतो अशा बोलण्याने... बरं ते जाऊ दे ... आता ५ वाजले नाहीत पण फार वेळही नाही उरला. चल चल... लवकर जाऊया."
निर्वी काही न बोलता त्याच्याकडे पाहत नुसतीच हसली. ते चालत चालत तिकीट खिडकीपाशी पोहोचले. सार्थकने तिकिटे काढली. तो इतर माहिती जाणून घेण्यात बिझी होता ती मात्र मग्न होती एका खोल विचारात... आज मनातल्या भावनांची संपूर्ण ओंजळ त्याच्यासमोर रिती करण्याचे ठरवून आली होती ना ती... 
" चल.तिथे जाऊन बसुया आपण...ती लाल रंगाची बोट दिसते आहे ना ती आपल्यासाठी आहे ."
निर्वी कितीतरी वेळ त्याने बोटाने दर्शवलेल्या त्या लाल बोटीकडे पाहत राहिली...जी आज साक्ष होणार होते... एक सुखद आठवण ठरणार होती... त्या दोघांत जन्मलेल्या एका नात्याच्या भवितव्याची. 

इथे निर्वी उभी होती सार्थकसोबत, ज्याच्यासोबत ती आयुष्यातल्या एका सुंदर अशा प्रेमाच्या नात्याचे बंध बांधण्यास तयार होती आणि तिथे दूर निहाल  उभा होता तिच्याच घराशेजारच्या एका टपरीवर ... तिची वाट पाहत त्या भर उन्हात सुद्धा कितीतरी चहाचे कप आज रिकामे झाले होते. पण आज तोही आतुर झाला होता तिला त्याचे मन जाणवून देण्यासाठी... त्या मनात होत असलेली प्रत्येक हालचाल तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणूनच तहान भूक विसरून तो गेले कितीतरी तास तिथे तिष्ठत उभा होता. तिच्या घरी मारलेली एक चक्कर देखील घराला लागलेले टाळे पाहून वाया गेली होती. जागा तीच पण आज त्याला ती खूप वेगळी वाटत होती. आजच्या उदास उन्हापेक्षा त्या दिवशीचा तो पाऊस त्याला बरा वाटत होता. पण तरी तो मनाने अजूनही उत्साही होता ... तिला भेटण्यासाठी.... तिला बघण्यासाठी... तिला सांगण्यासाठी. त्याच उत्साहात त्याने आणखी एका चहाची ऑर्डर दिली आणि पुन्हा त्या रस्त्याच्या वाटेकडे दूरवर नजर फेकत पाहत राहिला. 



आकाशात उन्हाची चादर अजूनही लख्ख चमकत होती. तिचे सोनेरी प्रतिबिंब तलावाच्या पाण्यावर अलवार तरंगत होते... जणू सुवर्णकणांचा सडा त्या निळ्याशार पाण्यावर कोणीतरी शिंपडला होता. किनाऱ्यावरची हिरवीगार झाडे देखील वाऱ्याच्या अभावाने स्तब्ध झाली होती. आकाशाकडे डोळे लावून होती तीही एका किमयेसाठी. या सर्व निसर्गासोबत तीही शांत होती. आणि तो शांत होता तिला पाहत. बराच वेळ झाला. त्यांची बोट मध्यभागी येऊन पोहोचली होती. अचानक हवेची नाजूक झुळूक तिला सुखद स्पर्श करून गेली. त्या स्पर्शाने निर्वी भानावर आली. त्याच्यावर तिची नजर गेली. तो तिलाच पाहत होता. ती म्हणाली,
"तुला आठवते , मी दुबईला असताना तुला काहीतरी महत्त्वाचे सांगणार होते मी ?"
हे ऐकून तो चपापला. सार्थकने अजिबात अपेक्षा केली नव्हती कि अशा वेळी ती असा विषय काढेल. तरी तो थोड्या नाराजगीने उत्तरला ,
" हो. तुला ती ट्रेनिंग मिळाली म्हणून खूप खुश होतीस तू. तुझ्या करिअर साठी ती खूप उत्तम संधी होती... असेच म्हणाली होतीस ना ?आठवते मला... हेच सांगायचे होते तुला."
"नाही ."
"काय ?"
"हो."
"अगं, काय सुरु आहे तुझं ? कधी नाही कधी हो ... नीट सांग. नाहीतर मी तर म्हणतो तो विषयच नको अशा वेळी. छान हवा वाहते आहे आसपास. पाण्यावरती बघ किती सुंदर तरंग निर्माण करत ही हवा भेटते आहे त्याला. आणि त्या सोनेरी किरणांनी त्या तरंगांत एक नवा खेळ मांडला आहे.तो पहा... इतके सुंदर.... रोमँटिक वातावरण मला तर एक सुंदर प्रेमकविता सुचते आहे या प्रसंगावर आणि तुझे मात्र हे नेहमीचेच... छे !"
सार्थक अक्षरशः वैतागून बोलत होता पण ती त्याकडेही दुर्लक्ष करून पुढे बोलतच राहिली. 
"त्या दिवशी विमानतळावर आपण वेगळे झालो. आणि त्यानंतर मी फार चलबिचल झाले होते. तुझ्या बोलण्याचा एक वेगळाच प्रभाव पडला होता माझ्यावर. पण मी पार गोंधळून गेले होते. तिथे एक नवीन मैत्री जन्माला आली. त्या मैत्रीतून संवाद वाढत गेला. त्या संवादांत आपल्या मैत्रीच्या नात्यात गुंतलेले एक दुसरे गूढ नाते मला जाणवत गेले.... आणि मग मीही त्याला आणखी शोधत गेले... अनुभवत गेले. आणि शेवटी ते गवसले. "
काही क्षणांपूर्वी निर्वीवर वैतागलेला सार्थक तिच्या या बोलण्याने स्तब्ध झाला. कारण ती असे काही बोलेल याचीही अपेक्षा त्याने कधी केली नव्हती. तिला काय बोलायचे आहे ते समजत असले तरी तो तिचं बोलण्यामध्ये अडथळा निर्माण करू इच्छित नव्हता. ती प्रथमच असे काही जे त्याला नेहमी ऐकावेसे वाटे असे बोलत होती. तिने पुढे येऊन त्याचा हात हातात घेतला. सार्थक त्या स्पर्शाने गहिवरून गेला. त्याने तिच्याकडे पाहिले आणि तिने त्याच्या डोळ्यांत. निर्वी पुढे बोलू लागली,
" आणि ते नाते आहे प्रेमाचे. खरे तर तेव्हाच सांगणार होते मी तुला. पण उगाच मनात शंका होती कि तुझ्या मनात आणखी कोणी असेल तर ... म्हणून ... "
"अगं वेडी आहेस का ? असा विचार तरी कशी करू शकतेस तू ? कितीदा तर मी बोललो आहे तुला... विश्वास नाही वाटते माझ्यावर." तो तिच्या हातावर विश्वासाचा हात ठेवून शाश्वती देण्याचा प्रयत्न करत होता.
" अरे , नाही. Actually चुकलेच माझे. पण आता नाही."
निर्वी आता त्याच्या जवळ सरकून त्याला बिलगून बसली. थोडे लाजत मान खाली घालूनच तिचे मिटलेले डोळे खूप काही सांगत होते. 
"अगं , बोल ना. मी गेल्या कित्येक वर्षांपासून उतावीळ झालो आहे हे ऐकण्यासाठी. आज आता अजून अंत पाहू नकोस."
ती खाल मानेनेच गालातच हसली. आणि एकदम मान वर करून त्याच्या डोळ्यांत पाहून मनातले सर्व सांगून गेली.
"सार्थक, अगदी मनापासून सांगते खूप खूप प्रेम करते तुझ्यावर. तू माझ्या जीवनात फक्त माझा म्हणून असावास असे मनापासून वाटते."
" आणि मला सुद्धा. I Love you too , Dear "
त्यानेही अगदी मनमोकळेपणाने त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्याला तर आता काय करूआणि काय नको असे झाले होते.त्याला आज आभाळ ठेंगणे वाटत होते. काहीच सुचेना. त्याच आनंदात सार्थकने निर्वीला जवळ घेत तिला घट्ट मिठी मारली. पण यावेळी ती मागे सरलीही नाही आणि तिने स्वतःला सावरले देखील नाही. एक वेगळ्याच गप्पांचा, नात्याचा प्रवास त्या प्रवाहामध्ये सुरु झाला होता. दोघेही अगदी आनंदाने न्हाऊन गेली होती. आनंद कमी म्हणूनच कि काय... आकाशातून येणारे जलमोतींचे थेंब त्या दोघांच्या मिलनावर मोती उधळू लागले. थरथरत्या अंगावरचे ते जलमोती टिपून घेण्यासाठी वारा धडपडत होता. त्या वाऱ्याच्या वेगाने मोत्यांच्या राशींचा एक नवा सोहळा मांडला. त्या सोहळ्यात तो आणि ती ही दोन्ही मने रंगून गेली होती. तो रंग होता प्रीतीचा ... विश्वासाचा ... आनंदाचा... हे सर्व रंग क्षणात उधळले गेले.... अगदी उंच... खोल आभाळात. आणि त्या रंगांचे अनोखे मिलन झाले... एक सप्तरंगांची कमान आभाळभर प्रकटली. 
" ए ते बघ , इंद्रधनुष्य . "
सार्थकने निर्वीला आकाशात उमटलेले इंद्रधनू दाखवले. तिच्या चेहऱ्यावर त्याहीपेक्षा सुंदर अशी खुशीची लकेर रेखाटली गेली. तो आकाशातले इंद्रधनू विसरला आणि त्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या प्रेमात नव्याने पडला.

इथे एक प्रेम जिंकले होते तर तिथे एक प्रेम हरले होते ज्याची त्याला अजून जाणीवही झालेली नव्हती. तो आपला अजूनही मग्न होता न पूर्ण होणारे एक स्वप्न पाहण्यात. उगाच एक वेडी आशा घेऊन निहाल तिथे अजूनही उभा होता... सूर्यकिरणांचा प्रखर खेळ अनुभवल्यानंतर सायंकाळी आकाशात उगवणाऱ्या एकेक तारकेला पाहत.... मनात जन्मलेल्या आशेची ज्योत अजूनही तेवत ठेवून तो तिच्या वाटेकडे डोळे लावून उभा होता...एका नव्या नात्याच्या ज्योतीला प्रकाशमान करण्यासाठी. 

- रुपाली ठोंबरे.

1 comment:

  1. रुपाली, प्रत्येक भागाबरोबर गोष्ट अजुनच उत्कंठावर्धक होत चालली आहे. पुढच्या भागाची वाट पहातेय....

    ReplyDelete