Pages

Monday, December 3, 2018

'कॅलिफेस्ट'ची कलाकृती


अक्षरे 
मधाळ भाषांच्या सानिध्यात रमलेली 
भाषांतल्या सुरेख लिप्यांमध्ये दडलेली 
लिप्यांच्या काटकोनांतून मुक्त डोकावणारी 
आज ती सारी एकत्रच बाहेर पडली
काही रंगांत डुंबून नखशिखांत रंगली
काहींनी रंगांवरच आपला ठसा उमटवला 
काही सरसर करत झाडांवर चढली 
काहींनी जमिनींवर पायघड्या अंथरल्या 

अक्षरे 
बालपणापासूनच मनामनांत रुजलेली 
लहानमोठ्यांच्या भावनांना वाट देणारी 
थोडी सोपी थोडी जरा कठीण वाटणारी 
येथल्या पानांपानांवर...पायरी पायरीवर
ती सारीच आज नव्याने उमलून आली
काही शुभ्र पाणी बनून निर्झरी वाहत होती 
काही काळ्या दगडांवरती विराजमान होती 
काही शिल्प अन रांगोळ्यांमध्ये सजलेली होती 

अक्षरे 
सुंदर...रेखीव...रंगीत...वळणदार...टपोरी  
विविध भाषांतली आणि विविध लिपींतली 
एकमेकांत रंगांच्या धाग्यांत मुक्त गुंफलेली 
प्रत्येकाची ढबच आगळी आणि निराळीच शैली 
काही शब्दांमध्ये रमली तर अलिप्त साकारली
काही बंधनांत बांधली तर काही मुक्त संचारली 
काही अर्थ सांगणारी तर काही सौन्दर्य खुलवणारी

अक्षरे 
सारी ही अशी आज एकत्र आली...नाचली... बागडली 
निसर्गाच्या कुशीत मनसोक्त हिंडली... जरा विसावली 
सण अक्षरांचा...सण आनंदाचा... सण हा भारतीय लिप्यांचा
सजला... सजत आहे... सजत राहील हा सोहळा अक्षरांचा 
अक्षरांच्या सोहळ्यात स्वागताचे क्षण तुम्हां प्रेक्षकांसाठी 
बोलकी होऊन नयनांनी मनांशी संवाद साधण्यासाठी 
सुख... समाधान ...आनंद भरभरून उधळण्यासाठी   
आतुर झाली 'कॅलिफेस्ट'ची कलाकृती अन बोरूची अक्षरे. 

-रुपाली ठोंबरे.

1 comment: