Pages

Monday, December 17, 2018

वडिलांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा- मुलीकडून

(एका मैत्रिणीसाठी तिच्या बाबांच्या ७५ व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देणारे केलेले लेखन.... )

थोर जीवनाचा वटवृक्ष तू  
ज्याच्या सावलीत मी कणकण वाढली 
तुझ्या मायेच्या पारंब्यांसवे सुखाचे झोके घेत 
तुझी ही लाडाची लेक प्रत्येक ऋतूत बहरत गेली 
तूच जीवनदाता , तूच शिल्पकार... या जीवनाचा, या मनाचा 
वेळप्रसंगी सावरणारा सखासोबतीही तूच... तूच मार्गदर्शक दिवा 
तुझ्यासवे आयुष्याची कितीतरी पाने नव्याने लिहिली 
तुमची शिस्त आणि संस्कारांची देणं अजूनही शिदोरीत जपून ठेवली 
आठवतात ते सारे क्षण...ते खेळ...त्या जुन्या आठवणी 
ज्या अधिकच  दाट झाल्या जेव्हा केलीस तू माझी पाठवणी 
प्रत्येक प्रसंगी जरी नसशील तू प्रत्यक्ष सोबत,
तरी खरे सांगते मी, बाबा
तुमचे विचार, तुमचे संस्कार , तुमची प्रत्येक आठवण खूप आहे जगण्याला 
पण तरी 
तुमचे प्रत्यक्ष सामोरी असणे ही खरेच आनंदाची एक पर्वणी 
आणि याच पर्वणीचा आनंद हवा आहे मला सोबत, वर्षानुवर्षे...अनंत युगे 
अरे, काय म्हणालात?
आज ७५ वर्षे पूर्ण जाहली ? काया ही वृद्धत्वाकडे झुकली?
छे! छे! अजिबात नाही ! 
मी तर म्हणेन,
आज १८ वर्षे पूर्ण होऊन तुम्ही नवतारुण्यात शिरलात.... 
सोबत ५७ वर्षांचा आयुष्याचा सखोल अनुभव घेऊन. 
मग चला तर ,
नव्या उमेदीने , नव्या जोशात आयुष्याला आणखी एक नवा आकार देऊ 
धावपळीत लुप्त झालेल्या इच्छा-आकांक्षा... छंद... स्वप्ने... सर्वाना नवी वाट दाखवू 
कधीतरी कुठेतरी राहून गेलेले सर्व शोधून पुन्हा जोपासायला सुरुवात करू 
असा निश्चय मनाशी करून तुम्ही पुढच्या प्रवासासाठी नवे पाऊल पुढे टाका 
माझ्या शुभेच्छा आणि साथ आहेच की सोबत तुमच्या प्रत्येक घडीला.... 


- रुपाली ठोंबरे.

बालमैफल -६


बालमैफल -६
 माझी लोकसत्ता मध्ये आलेली सहावी कथा...नवा मित्र.



 
वाचण्यासाठी लोकसत्ता लिंक :
नवा मित्र.


- रुपाली ठोंबरे.

Tuesday, December 11, 2018

सोहळा ६ दिवसांचा

पाच ते दहा... अवघ्या ६ दिवसांचा हा सोहळा. 
पण आयुष्यात किती काही घेऊन आला हा ... आणि किती काही देऊन गेला. 
या सहा दिवसांसाठी किती परिश्रम घेतले , किती तयारी केली हे शब्दांत मांडणे आमच्यापैकी कोणासाठीही कठीणच. कारण या ज्या कलाकृती इथे सादर झाल्या त्या केवळ १ महिना किंवा ६ महिन्यापासून घेतलेल्या परिश्रमाचे फळ नसून गेल्या कित्येक वर्षांपासून सुलेखनाच्या क्षेत्रात शिरल्यानंतर घेतलेल्या मेहनतीसाठीच्या यशाची ही पावती आहे. एका उभ्या रेषेपासून सुरुवात करून आज आम्ही सर्वच इथवर पोहोचलो आहोत याचे श्रेय जाते ते आमच्या अच्युत सरांना... साहजिकच सोबत स्वतःची धीर, चिकाटी ,मेहनत ही होतीच. एक रेष... त्यामागची संकल्पना ... त्या रेषेशेजारी नव्याने निर्माण होणाऱ्या रेषेचे नाते, त्या दोघांमधल्या जागेचे मापन...अक्षरांची मांडणी... रंगांची योजना...या सर्व गोष्टी एका पाठोपाठ एक शिकत गेलो... कधी चुकलो, नंतर सावरलो आणि पुढे चुकता चुकता , प्रसंगी तिखट-गोड मार्गदर्शनासोबत स्वतःला शोधत निरनिराळ्या रचना आमच्या हातून घडत गेल्या. त्यावर सरांच्या दृष्टीचे आणि त्यातल्या समाधानाचे शिक्कामोर्तब झाले आणि ही चित्रे संमतीच्या चौकटींमध्ये बंदिस्त होऊन प्रदर्शनातील भिंतींवर उभी राहण्यासाठी मुक्तपणे सज्ज झाली. 

अर्बन हाट.... बेलापूर स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा गड... हो गडच म्हणावा लागेल याला आता तर.नुसत्या ३-४ फेऱ्या झाल्या तरी माणूस हमखास खाली बसेल असा हा परिसर, पण तरी इथे मोजता येणार नाहीत इतक्या फेऱ्या या १० दिवसांत केल्या सर्वानी. तरी तो थकवा मात्र कधी जाणवला नाही...  याला कॅलिफेस्टची झिंगच म्हणावी लागेल, नाही का ? मस्त निसर्गाच्या कुशीत विसावलेली एक रम्य जागा...आणि त्यावर इतस्ततः पसरलेली अक्षरेच अक्षरे.... आहे ना कलाप्रेमींसाठी एक आनंदाची पर्वणी. आणि खरेच इथे ठरल्याप्रमाणे कलाप्रेमींचा सतत वावर होता. प्रत्येकाला आपले काम वर्णन करणे आणि त्यांची त्यावरची प्रतिक्रिया जाणणे हा एक सुंदर अनुभव. नुसते इतर कलाप्रेमींच नव्हे तर सर्वांचे नातेवाईक , प्रियजन सर्वानी या कलाकृतींना भेट देऊन या प्रदर्शनाची शोभा वाढवली त्या सर्वांचेच मनापासून आभार मानावेसे वाटतात. 


विविध मान्यवर कलाकारांच्या कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके हाही एक सुंदर कार्यभाग. किती काही शिकायला मिळाले या सर्वांमधून. इतरांचे काम पाहताना आपल्यात नकळत विकास घडत होता. खूप काही नव्याने शिकायला मिळत होते. काय चुकते ते न सांगताच उमगत होते. लेखनापासून ते सुलेखनापर्यंतचा प्रवास नव्याने वेगवेगळ्या पद्धतीने निरनिराळ्या व्यक्तीकडून मनावर घडत होता. ओरिया असो वा बंगाली , मराठी असो व तेलगू .... आम्हा साऱ्यांचेच काम अतिशय उत्तम होते असा शेरा अनेकांकडून मिळाला तेव्हा फार हायसे वाटत होते. कौतुकाचा , मार्गदर्शनाचा पाऊसच पाऊस त्या गडावर कोसळत होता आणि त्या सुंदर सरींमध्ये आमची अक्षरे आणि त्यासोबत आमची मने चिंब होत होती. 



पण हे सर्व मिळवण्यासाठी आधी सांगितले तसे खरेच कितीतरी मोठी तपश्चर्या आम्ही प्रत्येकानेच केली आहे. मूळ कॅलिफेस्टच्या कामाला जवळजवळ ६ महिन्यांपूर्वी कशी सुरुवात झाली हे अजूनही आठवते. कॅलिफेस्टसाठी नियोजित केलेल्या मिटींग्स...त्यासाठी दुरदुरून प्रत्येकाचे बेलापूरला येणे ... त्यात झालेल्या चर्चा... तेव्हा पडलेले कामासाठी आणि भाषांचे ग्रुप्स ... नवीन लिपी शिकण्याची जिद्द ... त्या नव्या अक्षरांत स्वतःच्या कल्पनांनी नवे रंग भरण्याचे प्रत्येकाचे कसब... कुठल्याही प्रकारच्या चढाओढीशिवाय उत्तम काम करून आणणारे सारेजण... प्रायोजक मिळवण्यासाठीची सरांचे आणि इतरांचे प्रयत्न...बदलत पण चांगल्या पद्धतीने साध्य होत जाणारे नवनवे प्लॅन्स... कधी हताश झालेले... कधी नव्या उमेदीने उत्साही झालेले सारे सारे चेहरे आठवतात. ही सर्व दहा दिवसांपूर्वीची तयारी. पण कॅलिफेस्टच्या मूळ कामाला जोर आला तो १ तारखेपासून. जमतील तितके आणि जमेल तितके प्रत्येकाने त्या एवढ्या मोठ्या गडाला श्रुंगारण्याचे कार्य सर्वानी अगदी आनंदाने पार पाडले. त्यात मेहनत होतीच पण त्याहीपेक्षा कित्येक पटींनी जास्त मज्जा होती... उत्साह होता, आनंद होता, समाधान होते. दगड , झाडे,पायऱ्या, भिंती जे दिसेल तिथे अक्षरांचा पाऊस पडला. प्रदर्शनाच्या २ दिवस आधीच आपापल्या भाषेचे नवे घर त्या निसर्गाच्या सानिध्यात प्रत्येकाने उभारण्यास सुरुवात केली. तेव्हा एकमेकांची सोबत घेऊन मोठमोठ्या शीट्स वर आपली कामे लावून नंतर ती भिंतींवर विराजमान करणे... बघायला सोपे वाटत असले तरी खूप मोठे काम आहे ते. आपले घर कसे सुंदर दिसेल यासाठीचा प्रत्येकाचा आटापिटा आणि नंतर ते सुंदररित्या कलाप्रेमींच्या स्वागतासाठी सुसज्ज करणे... खूप मोठा आणि सुंदर अनुभव. 

या दहा दिवसांत सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत सर्व एकत्र... मग गप्पागोष्टी... चिडवाचिडवी... मज्जाच मज्जा! या अशा प्रदर्शनामुळे आणि सरांच्या सानिध्यात राहून असे उपक्रम केल्याने फक्त सुलेखन क्षेत्रातच नव्हे तर एक माणूस म्हणून घडण्यासही खूप मदत होते हे प्रकर्षाने जाणवते. काय नसते यात ? कला... मेहनत... चिकाटी... चुकले तरी त्या समजून घेण्याची मानसिकता... उत्तम घरगुती चवीचे जेवण... नाचगाणी...फोटोंचा तर अगदी पाऊसच... धम्माल एकदम ... मज्जाच मज्जा... आनंद...मदत करण्याची वृत्ती... नवी-जुनी  नाती... सारेच वृद्धिंगत होत जाते म्हणून मला इथे येण्यास फार फार आवडते. आणि माझ्यासारखेच मत आम्हा सर्वांचेच असेल यात मला तरी शंका वाटत नाही. 


काल हा सोहळा संपला आणि जितक्या परिश्रमांनी या कलाकृती उभ्या राहिल्या होत्या तितक्याच जड अंतःकरणाने त्या सर्वाना खाली उतरवण्याचे काम सुरु झाले. पण त्यातही एक वेगळी मज्जा असते. पुन्हा एकदा सर्वाना सोबत घेऊन हे कार्यही पार पडते आणि मग समोर दिसतात त्या भकास भिंती ज्या कालपर्यंत मोठ्या दिमाखात नटूनथटून उभ्या होत्या. पण हे नेहमीचेच म्हणून आता त्यासाठी वाईट वाटणे कमी झाले आहे. पण तरी एक विशिष्ट पोकळी निर्माण होते मनात, जी प्रखरतेने जाणवते ती दुसऱ्या दिवशी. गेले दहा दिवस जे घडत होते ते सर्व अचानक संपून जाते आणि पुन्हा दहा दिवसांपूर्वीची दिनचर्या आयुष्यात पुन्हा हजर होते आणि तिला कवटाळावे लागते. गेल्या काही दिवसांतल्या आठवणींचे मनात असे काही कोंदण झालेले असते कि त्या दिवसभर मनात एखाद्या सुखद झुळुकेप्रमाणे नकळत येत जात राहतात. हळूहळू या आठवणींवर काळाचे पापुद्रे चढू लागतील पण तरी आयुष्याच्या एका पानावर कोरला गेलेला हा 'कॅलिफेस्ट २०१८' मात्र कधीच आठवणींच्या पसाऱ्यांतून पुसला जाणार नाही... निदान माझ्यातरी मनातून तो कधी जाणार नाही. आणि या कवडश्यातूनच अशाच एखाद्या पुढच्या उपक्रमाची ओढ निर्माण होईल आणि त्यासाठीचे नवे प्रयत्न नव्या उत्साहाने सुरु होतील, हो कि नाही?




- रुपाली  ठोंबरे. 

Monday, December 3, 2018

'कॅलिफेस्ट'ची कलाकृती


अक्षरे 
मधाळ भाषांच्या सानिध्यात रमलेली 
भाषांतल्या सुरेख लिप्यांमध्ये दडलेली 
लिप्यांच्या काटकोनांतून मुक्त डोकावणारी 
आज ती सारी एकत्रच बाहेर पडली
काही रंगांत डुंबून नखशिखांत रंगली
काहींनी रंगांवरच आपला ठसा उमटवला 
काही सरसर करत झाडांवर चढली 
काहींनी जमिनींवर पायघड्या अंथरल्या 

अक्षरे 
बालपणापासूनच मनामनांत रुजलेली 
लहानमोठ्यांच्या भावनांना वाट देणारी 
थोडी सोपी थोडी जरा कठीण वाटणारी 
येथल्या पानांपानांवर...पायरी पायरीवर
ती सारीच आज नव्याने उमलून आली
काही शुभ्र पाणी बनून निर्झरी वाहत होती 
काही काळ्या दगडांवरती विराजमान होती 
काही शिल्प अन रांगोळ्यांमध्ये सजलेली होती 

अक्षरे 
सुंदर...रेखीव...रंगीत...वळणदार...टपोरी  
विविध भाषांतली आणि विविध लिपींतली 
एकमेकांत रंगांच्या धाग्यांत मुक्त गुंफलेली 
प्रत्येकाची ढबच आगळी आणि निराळीच शैली 
काही शब्दांमध्ये रमली तर अलिप्त साकारली
काही बंधनांत बांधली तर काही मुक्त संचारली 
काही अर्थ सांगणारी तर काही सौन्दर्य खुलवणारी

अक्षरे 
सारी ही अशी आज एकत्र आली...नाचली... बागडली 
निसर्गाच्या कुशीत मनसोक्त हिंडली... जरा विसावली 
सण अक्षरांचा...सण आनंदाचा... सण हा भारतीय लिप्यांचा
सजला... सजत आहे... सजत राहील हा सोहळा अक्षरांचा 
अक्षरांच्या सोहळ्यात स्वागताचे क्षण तुम्हां प्रेक्षकांसाठी 
बोलकी होऊन नयनांनी मनांशी संवाद साधण्यासाठी 
सुख... समाधान ...आनंद भरभरून उधळण्यासाठी   
आतुर झाली 'कॅलिफेस्ट'ची कलाकृती अन बोरूची अक्षरे. 

-रुपाली ठोंबरे.

Wednesday, October 31, 2018

तो... आणि ती (भाग १०)


"अरे थांब थांब. इथेच सोड मला. त्या समोरच्या इमारतीतच राहते मी."
निर्वीने सार्थकला गाडी थांबवायला सांगितली आणि पुढच्याच क्षणी ती थांबली सुद्धा.तिने दरवाजा उघडून बाहेर निघत पुन्हा एकदा विचारले,
"अरे आता आला असतास तर. चल ना. भेटायला तर चल घरी."
"अगं नको. आज नको. एक भेट अपेक्षित होती ती खूप चांगली झाली. त्यांना भेटण्यासाठी विशेष प्रसंगाचे औचित्य साधून आईबाबांना घेऊनच येईन,नक्की .येऊ ना ?"
निर्वी पुन्हा लाजली. तिच्या चेहऱ्याने एका सुंदर हास्यासोबत होकार दिला आणि निरोप घेऊन ती तिच्या घराच्या दिशेला वळली. पण पुढच्याच क्षणी त्याची हाक कानी आली आणि ती थबकली.हसली. माघारी वळली, जणू ती या क्षणाची वाटच पाहत होती. तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावरच्या हास्यात असलेली ती साद त्याच्या डोळ्यांना पुन्हा एकदा सुखावून गेली. दोघांच्या नजरा पुन्हा एक अबोल संवाद साधू लागल्या आणि अचानक त्या नजरेच्या रेषेत त्याने तिचा मघाशी स्वतःकडे ठेवून घेतलेला फोन धरला आणि तो संवाद तिथेच थांबला.
"ओ मॅडम , हा घेऊन जा."
"अरे हो हो .विसरलेच होते मी."
"असे नका हो विसरत जाऊ. आता ही खूप महत्त्वाची वस्तू आहे. लक्ष असू द्या तिच्याकडे म्हणजे आमच्या हाकांना वेळीच साद मिळेल."
" तू ना..."
"अगं खरंच फोन असा विसरली असतीस तर पंचाईतच झाली असती ना ?
असे म्हणत सार्थकने रिव्हर्स घेत गाडी वळवली आणि मग निर्वी सुद्धा हसत हसत पुन्हा एकदा निरोप घेऊन घराच्या दिशेने निघून गेली. घराच्या दिशेने पडणारी पावले फोन पाहता पाहता अडखळली... मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस चा नुसता भडीमार. ते वाचता वाचता तिला जाणवले कि तिचा एक मित्र तिची वाट पाहत गेले तासन तास त्या चौकावर उभा होता. तिने घाईघाईत त्याला फोन लावला पण तोही आता व्यस्त होता. पण पुढच्याच क्षणी तिचा फोन वाजला. निहालचे नाव पाहून तिने त्वरेने तो घेऊन ती बोलू लागली ,
" निहाल, सॉरी ! खरेच डोक्यातूनच निघून गेले माझ्या."
"ओके... आता कुठे आहात ?"
"आत्ताच पोहोचले घरी...ही काय बेलच वाजवते आहे.आज ना ... "
"अच्छा. मी अजूनही तिथेच आहे. येणार का?"
"आत्ता ? सॉरी पण नाही शक्य होणार. आत्ताच आले घरी. दिवसभरापासून गायब होते. आता आल्या आल्या आईची तक्रार सुरु झाली होती... म्हणून आता येणे तर शक्यच नाही."
"हम्म्म्म...बरे. आई कशा आहेत ?त्यांना नमस्कार सांगा माझा . "
" हो हो . हे घ्या तुम्हीच बोला तिच्यासोबत"
असे म्हणत निर्वीने तिचा फोन आईपाशी दिला आणि आईनेही लगबगीने तो घेतला."
" काय म्हणतोस, निहाल? कसा आहेस ? तू म्हणाला होतास मागे नक्की येईन नंतर कधी इथे आलास तर. मग कधी येतो आहेस इथे."
" काकू,  मी बोललो तर होतो पण सॉरी इतक्या दिवसांत नाहीच जमले.आता नव्या नोकरीचा खटाटोप सुरु झाला आहे. त्याच गडबडीत आहे सध्या.तरी वेळ मिळाला तर नक्की येऊन जैन, काकू."
"बरे बरे. पण काळजी घेत जा. आणि आई कशी आहे रे तुझी .... " असे म्हणत आईने पुढची ५-१० मिनिटे तरी त्याच्यासोबत गप्पा मारल्या. मन भरल्यानंतर त्याला नव्या कामासाठी शुभेच्छा देत फोन पुन्हा तिच्याकडे सुपूर्द केला. निर्वी पुढे बोलत बोलत स्वतःच्या खोलीत निघून गेली. वहिनी तिथेच होती. ती हे सर्व पाहत होती.मघाशी आल्या आल्याच वर उंचावलेल्या अंगठ्याच्या इशाऱ्याने वहिनीला तिच्या आयुष्यात घडलेल्या सुंदर क्षणाची बातमी कळली होती. वाहिनीसुद्धा आनंदी झाली होती आणि तिने स्वतःला पुन्हा रात्रीच्या जेवणाच्या तयारीत झोकून घेतले. 
इथे ती बरेच काही त्याला सांगत होती. इकडच्या तिकडच्या गप्पा पण त्या जणू फक्त एका बाजूनेच सुरु होत्या.
"निहाल, मी सांगू शकत नाही मी आज कित्ती खुश आहे. मला तर अजूनही विश्वास बसत नाही कि मी सार्थकला आज माझ्या मनातल्या भावना या अशा सांगितल्या असतील यावर. आणि तुम्हाला माहित आहे तो कित्ती आनंदी झाला होता. त्याच्या डोळ्यांत तो आनंद दिसत होता...... "
निर्वी बोलतच होती आणि निहालही ऐकत होता. त्या प्रत्येक शब्दासोबत त्याच्या मनातल्या भावना आता अस्पष्ट होऊ लागल्या होत्या. एक क्षण असा आला कि त्याला ते सर्व भास वाटू लागले. आज त्याला तो स्वतः, त्याचे वागणे चुकीचे वाटत होते. हे सर्व थांबवायला हवे असे प्रकर्षाने जाणवत होते.त्याने तिच्यापासून दूर राहायचा स्वतःच निर्णय घेतला. आणि ओमानची नवीन नोकरी ही त्यासाठीची उत्तम संधी होती. तो बराच काळ असा विचारांत गुंग झाल्यामुळे त्या बाजूने एक निरव शांतता होती. 
"हॅलो , आहेस ना ? खरंच आज मी खूप चुकीचे केले तुमच्यासोबत. तुम्हाला कळवायला हवे होते. तेव्हा मी करत होते मेसेज आणि माहित नाही अचानक काय झाले आणि ते राहूनच गेले. त्यानंतर तर सततचे फोन पाहून सार्थकने जबरदस्तीने फोन त्याच्याकडे ठेवून घेतला म्हणून पुढे कॉल, मेसेज काही कळलेच नाही. येतानाही माझी मी ट्रेनने आले असते तर चौकात नक्कीच भेटता आले असते आपल्याला. पण त्याने गाडीने घरापर्यंत सोडले आणि मग उशीरही झाला ना.... सॉरी. पण उद्या भेटू शकतो आपण. रविवार आहे ना ?किंवा तुम्हीच या ना घरी. आईला सुद्धा भेटायचे आहे . "
निर्वीचे हे स्पष्टीकरणाचे शब्द आता काही कामाचे नव्हते पण त्याने सर्व ऐकून घेतले. त्याला काहीच बोलावेसे वाटत नव्हते त्यामुळे फोन ठेवला त्याने. फक्त निरोप घेताघेता बोलून गेला ,
" नाही आता ते शक्य नाही. मला उद्याच निघावे लागेल इथून. परत कधी येईन माहित नाही. म्हणून भेटण्याची इतकी ओढ लागली होती. पण आता वाटते आहे बरे झाले भेटलो नाहीत ते. तुमचे खूप छान सुरु आहे. सार्थकसोबत आनंदात राहा. पुढच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. "
निहाल असे का बोलून गेला हे तिला उमगले नाही. त्या विचारांत असतानाच सार्थकचा फोन आला आणि पुन्हा एकदा प्रेमीयुगुली गप्पा सुरु झाल्या. मध्ये इस्त्रीचे कपडे ठेवायला आलेल्या  वहिनीच्या कानांवर काही शब्द पडले आणि तिच्या मनात एका नव्या संकल्पनेने जन्म घेतला. ती किचनमध्ये गेली आणि सासूबाईंशी सहज बोलता बोलता तिने विषयाला हात घातला,
"आई , मघाशी कुणाचा फोन आला होता ?"
"अगं, तो फोन ना... निहालचा. आपली निरु मागे दुबईला गेली होती ना तेव्हा ज्या हॉटेल मध्ये राहिली होती तिथला मॅनेजर.खूप चांगला आहे स्वभावाने. एकदाच भेटलो आम्ही आणि मनच जिंकून घेतलंय त्याने. आपल्या निरुची त्याला फार काळजी. ती सांगायची ना आल्यावर आणि त्या दिवशी पण जाणवले आम्हां दोघांना ते. खूप चांगली मैत्री आहे दोघांत."
"हम्म्म अच्छा असं आहे का ?"
"हां पण काय गं तुला अचानक हा कुठून आठवला?"
"काही नाही आई. सहजच. पण मला काय वाटतं आहे, सांगू ?"
" का गं , काही शंका वाटते आहे का तुला ?"
"शंका नाही पण आता तर खात्री वाटते आहे .जर मी चुकीची नसेल तर हा तोच मुलगा असेल ज्याच्यासाठी नीरु लाडू घेऊन गेली होती."
"लाडू ?"
"हो. त्यादिवशी नाही का रात्रीचे जागून माझ्याकडून करवून घेतले आणि एरव्ही कधी स्वयंपाकघरात पाऊल न ठेवणाऱ्या तुमच्या लेकीने अगदी मनापासून त्यात मदत केली.कारण त्याला आवडणारे बुंदीचे लाडू स्वतःच्या हातांनी बनवून तिला द्यायचे होते. "
आईच्या चेहऱ्यावर उमटलेले प्रश्नचिन्ह पाहून वहिनी पुढे अनेक गोष्टींचा उलगडा करू लागली.
"आई , बघा हां म्हणजे आपली नीरु दुबईहून परतल्यापासून थोडी वेगळी वाटते कि नाही. कधी खूप उदास कधी खूप आनंदी ...कधी नुसती चिडचिड तर कधी एक वेगळीच मस्ती. मला तर बाई खूप जाणवायचे. एकदोनदा समोरून विचारले देखील होते मी. पण तेव्हा काहीच पत्ता लागू दिला नाही. पण त्या दिवशी स्वतःहूनच सांगितले मला कि एका मुलावर प्रेम जडले आहे तिचे. त्याच्यासाठीच लाडू न्यायचे होते तिला. मीही खोदून बरेच काही विचारण्याचा प्रयत्न केला पण फार काही सांगितले नाही. बस्स इतके माहित आहे कि मुलगा परदेशात असतो आणि आत्ता अलिकडे सुट्टीसाठी इथे आला आहे.आणि आताही ती त्याच्याशीच बोलते आहे. दोघांची कबुली देखील झाली आहे या नात्याला. "
"अगं  सरिता , काय सांगतेस ? खरंच कि काय ?"
"हो आई , मला तरी असेच वाटते आहे सध्याच्या तिच्या वागण्याबोलण्यातून. पण तुम्ही आता काही बोलू नका आणि प्लीज रागावू नका. मी बोलेन तिच्याशी नंतर सावकाश. "
"अगं , रागावू कशाला ? जर तू म्हणतेस ते खरे असेल ना तर पांडुरंगच पावला असे म्हणेन मी तर. "
असे म्हणत आईनी देव्हाऱ्यापाशी हात जोडले आणि ती पुढे बोलू लागली ,
"अगं सरिता , तुला सांगते खूपच चांगला मुलगा आहे हा. आणि बरं का आपल्यातलाच आहे. अगदी माझ्या नात्यातलाच. त्यामुळे पडताळणी करणे पण सोपे जाईल. बघ,यांनाही पटेलच. किती काळजी होती मला त्या पोरीची. पण आता वाटतंय पोरीने तीही काळजी एका पद्धतीने कमी केली. "
ते ऐकून वहिनीला आनंद झाला. पण तिने  सावकाशरीत्या पुढचे पाऊल टाकण्याचे ठरवले आणि ती पुन्हा कामाला लागली. आईने आनंदाने आरतीला सुरुवात केली. तिच्या सुरांत आज एक समाधानी सूर आळवत असल्याचा भास होत होता. जणू तिच्या मनीची मनिषा आज देवाने पूर्णत्वास नेली. रात्री बाबा घरी परतले तेव्हा निर्वीच्या आईने बाबांनाही ही गोड बातमी सांगितली. सुरुवातीला त्यांना हे पटले नाही पण थोडा विचार करून पुढे बघूया असे म्हणत त्यांनी या विषयाचे विषयांतर केले. पण आईच्या मनात मात्र हाच एक विषय घर करून बसला होता. हे सर्व सुरु होते ते निर्वीला अलिप्त ठेवून.तिला या सर्वाचा थांगपत्ताही नव्हता. ती आपली आपल्याच स्वप्नांत रममाण होती.

एक-दोन दिवस असेच गेले आणि वेळ पाहून वहिनीने निर्वीशी बोलण्याचे ठरवले.
"अगं निर्वी , येऊ का आत ? काय करते आहेस ?"
असे म्हणत सरितावहिनी आत शिरली. तेव्हा निर्वी आपले दुबईचे फोटो अपलोड करत होती.
"अगं वहिनी , ये ना . त्यात काय विचारायचं.मी ते माझे दुबईचे फोटो अपलोड करत होते.तुला पाहायचे होते ना?"
असे म्हणत तिने तिचा फोटोंचा खजिना वहिनीसमोर मांडण्यास सुरुवात केली. कित्ती सारे फोटो होते ते. निर्वी फार कौतुकाने प्रत्येक फोटो दाखवत होती. आणि त्या प्रत्येक फोटोसोबत त्यासोबत जुळलेली एखादी छानशी गोष्ट ,घटना, गंमतीजंमती सांगत होती. वहिनीलाही मज्जा येत होती. फोटो पाहता पाहता निहाल आणि त्याच्या कुटुंबियांसवें केलेल्या दुबईच्या सफरीचे फोटो समोर आले.
" अगं हा कोण आहे गं ? किती देखणा दिसतो आहे ना हा ?"
"हा ? अगं हाच तर तो निहाल...अगं तो मॅनेजर ज्याने पहिल्या दिवशी माझ्यासाठी वरणभात तयार करवून घेतला होता.हो अगं , खूपच भारी आहे तो. मला तर तो पाहताक्षणीच जाम आवडला होता. आणि आता माझा बेस्ट फ्रेंड आहे हा. "
"हम्म्म्म , छान. मलाही आवडला हा तर."
निर्वी दुबई , निहाल , त्याची आई ,बहीण, अमिरा , तिची ट्रेनिंग या सर्वांबद्दल भरभरून बोलत होती. वहिनी कुतूहलतेने निर्विकडे पाहत होती आणि निर्वी मात्र व्यस्त झाली होती त्या फोटोंमध्ये ... त्यांच्याशी जुळलेल्या आठवणींमध्ये. इतक्यात आईने हाक मारली आणि जे बोलायला वहिनी तिथे आली होती तेच राहून गेले.

पुढे काही काळ असाच गेला. आणि एके दिवशी वहिनीने पुन्हा निर्वीला असेच गाठले. तेव्हा निर्वी सार्थक सोबत बोलत होती. वहिनीने आत येत घसा खाकरला आणि निर्वीने सावध होत फोन ठेवला.
"अगं बोल बोल... हा तोच ना तुझा परदेशी मित्र? ज्याच्यासाठी एवढ्या प्रेमाने त्यादिवशी बुंदीचे लाडू घेऊन गेली होतीस. "
"हो ." निर्वी उगाचच लाजली. 
"अगं, मग हा तोच असेल तर त्याला घरी बोलवायला हवे ना ?"
" नको नको. इतक्यात नको. आईबाबांच्या मनाचा अंदाज पाहून एके दिवशी सांगणारच आहे मी. आणि दादाला येऊ दे. तो बोलेल बाबांशी असे म्हणाला होता मला."
"अरेच्चा ! यांना आधीच माहित आहे तर हे सर्व ! हे बरे आहे. मला नाही सांगितले त्यांनीही. असो. पण मी पण तर तुझी वहिनी आहे ना? मी बघते. "
"हो पण... "
"पण काय ? तुला आवडतो ना तो? तुला आवडतो ... आईला आवडतो... बाबा आणि मलाही चांगला वाटतो आहे मग अशा मुलाला घरी बोलावण्यात उगाच दिरंगाई नको ."
"काय ? आईला माहित आहे ? बाबांनाही ?"
"हो म्हणजे मीच विषय काढला तेव्हा समजले कि त्यांनी बघितले आहे त्याला आणि त्यांना तो तुझ्यासाठी योग्य वाटतो आहे. पुढे त्यांच्याकडून काय होते ते पुढच्या पुढे."
हम्म्म्म...त्याला आईबाबांनी आता कसे पाहिले असेल ? निर्वीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मग एका मनाने सांगितले, 'अगं आता नाही पण लहानपणापासून तर पाहिले आहे ना?अगदी तो अमेरिकेला जाण्यापूर्वीपर्यंत आई बाबा त्याला पाहत आले आहेत. त्याचे आई-वडील, त्याच्यावर झालेले त्यांचे संस्कार हे सर्व पाहूनच त्यांना सार्थक माझ्यासाठी योग्य वाटला असावा. आणि हेच तर मला हवे होते. किती दडपण होते या सर्वांचे कि सर्व हो म्हणतील ना म्हणून.खरे टेन्शन तर आईचेच होते. हा विषय कसा पुढे न्यावा हे सुद्धा मला काळात नव्हते. पण वहिनीने किती सोपे करून टाकले सर्व.सारखी जातीबाहेर नको नको म्हणणारी आई ही अशी आनंदाने तयार झाली म्हणजे जादूची कांडीच फिरवली असेल वहिनीने.
"अगं, काय झाले ?माझे चुकले का काही? मी तुझाच विचार करून सहज बोलले होते आईंशी तेव्हा... "
निर्वीचा असा विचारांत हरवलेला चेहरा पाहून वहिनी गोंधळून गेली होती.
" अगं वहिनी , काही काय ? आई बाबा मान्य झाले...माझा तर विश्वासच बसत नाहीय अजूनही. तू इतकी छान आहेस ना कि काय सांगू. I Love you, सरितावहिनी .... "
"पुरे पुरे... खूप झाले कौतुक... हे त्या होणाऱ्या नवरदेवाला सांगा आणि आई-वडिलांना घेऊन घरी ये म्हणावं . मी आईंशी बोलून घेते म्हणजे दिवस आणि वेळ ठरवता येईल, हो ना ?"
निर्वी आता त्या क्षणी सातव्या अस्मानावर होती. खूप खुश होती ती. त्याच आनंदात तिने वहिनीला अगदी घट्ट मिठी मारली. वहिनीनेही तिला प्रेमाने थोपटले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर वहिनीने आईबाबांसमोर हा विषय काढला आणि निर्वी गोंधळून गेली. 
"आज भेटणार आहेस ना तू त्याला ? तर विचार त्याला कि त्याच्या आईबाबांना कधी यायला जमेल आमच्या घरी."
"हो. भेटणार आहे. पण हे जरा लवकर होते आहे का ?"
निर्वीने आईबाबांवर एक नजर फिरवत वहिनीला प्रश्न केला. बाबा शांतपणे प्लेटमधले पोहे संपवत होते पण आई मात्र तिलाच पाहत होती. ती लगेच निर्वीला म्हणाली,
"निरू, काही लवकर वैगरे नाही. आम्हांला तू तर काही सांगितलेच नाही. ते बरे सरिताच्या हे लक्षात आले आणि तिनेच खरा पुढाकार घेतला. पण मुलगा चांगला वाटला म्हणून आम्ही पण भेटीला तयार झालो. म्हणून म्हणते कि लवकर भेटायला बोलाव त्यांना."
"सॉरी आई... सॉरी बाबा. मी ना सांगणारच होते तुम्हांला."
"बरे, ते ठीक आहे.पण यापुढे असे करत जाऊ नकोस. काही असले तर लगेच सांगत जा."
बाबांच्या बोलण्यावर आईनेही तसेच काहीसे तिचे मत मांडले पण त्या वरून दोघांचाही या सर्वाला होकार आहे हे निर्वीच्या लक्षात आले. आईने  पुढे चौकशी केली, 
"बरं एक सांग, आता त्याच्या आईची तब्येत कशी आहे ?"
आईच्या या प्रश्नावर निर्वी पुन्हा थोडी गोंधळून गेली. त्याची आई आजारी होती ?मला तर माहीतच नाही. कदाचित मी इथे नसताना आईला भेटल्या असतील काकू तेव्हा काही बोलल्या असतील किंवा कुणा मैत्रिणीकडून कानांवर आले असेल."
"निरू , काय विचारते आहे मी ? अशी गोंधळलीस का अचानक ?ठीक आहेत ना त्या ?"
"हो हो. ठीक आहेत त्या."
"बरे मग त्यांचा नंबर दे. त्यांना रितसर आमंत्रण द्यायला हवे. उद्याच बोलावते मी."
"आई कशाला? मी सांगते ना?"
" नको. तू नंबर दे मला फक्त. तसे तुही सांग पण मी फोन करते दुपारी त्यांना ."
असे म्हणत निर्वीच्या आईने किचन आवरायला घेतले. मग निर्वीने सुद्धा फोनमधून शोधून काही आकडे टेबलावरच्या एका कागदावर लिहिले आणि ती तशीच ऑफिसला निघाली. 

निर्वी ऑफिसमध्ये बसल्याबसल्या व्हाट्सअँप वर सार्थकसोबत चॅट करत होती. इकडचे तिकडचे बोलून झाल्यानंतर तिने त्याला घरी घडलेला प्रकार सांगण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्याच क्षणी फोनची रिंग वाजू लागली. 
" हॅलो , वाटलेच मला, तू हे ऐकल्यावर लगेच फोन करशील."
"अगं तू बातमीच तशी दिली आहेस. आणि काय म्हणतेस? तू घरी खरंच आपल्याबद्दल सर्व सांगितले? काकू रागावल्या का मग ?"
"अरे नाही. रागावली नाही. उलट तुला आईबाबांसोबत घरी बोलावले आहे. तुझ्या आईला फोन करेल आज आई."
"काय ?"
"अरे, असेही तुझ्या घरी सर्व माहित आहे ना ? मग काय प्रॉब्लेम आहे ?"
"हो. पण आईची थोडी नकारघंटा सुरु होती त्या दिवशी. माहित नाही आज कशी रिऍक्ट करेल. मी हा फोन ठेवतो आणि आधी आईशी बोलून घेतो."
"बरं."
असे म्हणत तो संवाद तात्पुरता थांबला आणि अवघ्या १०-१५ मिनिटांत तो आनंदाची वर्दी घेऊन येत पुन्हा खणखणला. 
"हॅलो, आई हो म्हणाली. बाबा सुद्धा घरीच आहेत. नुसतं भेटायला तरी येऊ असं म्हणाली ती. खूप वर्षे झाली कधी गाठभेट नव्हती म्हणून या बहाण्याने जुन्या मैत्रिणी भेटू असं म्हणाली. बघू, काय होतंय ते. मी लग्नाची बोलणी वैगरे करायला बोलावले आहे असे काही मी सांगितले नाही. सहज भेटायला जायचे आहे असेच काहीसे पटवले मी तिला. तेव्हा तू तुझ्या आईला सांग कि आम्ही उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचू.कांदेपोहे रेडी ठेवा...."
त्याच्या अशा बोलण्याने संवादात नवे हास्यकारंजे थयथय नाचू लागले. 

दुसरा दिवस उजाडला तो निर्वीचं आयुष्यात एक नवे चैतन्य घेऊन. कितीतरी स्वप्नमनोरे एकाच वेळी तिच्या मनात निर्माण झाले होते. एक सार्थकच्या आईवडिलांच्या भेटीचे एक विचित्र टेन्शन होते पण त्या आनंदापुढे ते अगदीच नाममात्र होते. ती सकाळच्या घाईगडबडीत असलेल्या वाहिनीच्या सारखी मागे लागली होती. 
"अगं वहिनी, मला ती तुझी पिवळी साडी काढून दे ना. मी कालच सांगितले होते तुला काढून ठेवायला. आता दे ना पट्कन. "
"साडी ती कशासाठी हवी आहे तुला ?तुला तर हे सर्व नाही ना आवडत ?मागे म्हणाली होतीस बघ तू. "
आईने हसत चेष्टेने निर्वीला प्रश्न केला. पण निर्विने त्याकडे दुर्लक्ष करून आपला तगादा कायम ठेवला ... अगदी साडी प्रत्यक्षात हातात येईपर्यंत. 

"काल त्याच्या आईचा फोन पण लागला नाही दिवसभरात. तुला तो नक्की येणार म्हणून सांगितले आहे ना ?"
आईने आपल्या मनातली एक शंका बोलून दाखवली. 
"हो गं आई. ते लोक येणार आहेत ५ पर्यंत. बापरे! ४ वाजले ? मी तयारीला सुरुवात करते. एकतर साडी नेसायची आहे मला. ए वहिनी , उठ ना . ४ वाजले बघ. तू मदत करणार होतीस मला ."

असे म्हणत निर्वी आपल्या थोडा वेळ अंथरुणावर पहुडलेल्या वहिनीला उठवायला लागली.

काही वेळ गेला आणि निर्वीची तयारी सुरु झाली. त्या पिवळ्या साडीत ती खरेच खूप सुंदर दिसत होती... एखादी सोनकळीच जणू. वहिनी तिला मदत करत स्वतःची तयारी करण्यात मग्न होती. आई पोहे आणि इतर तयारीत रमली होती. बाबा मात्र तयार होऊन शांतपणे सोफ्यावर पाहुण्यांची वाट पाहत बसले होते. घड्याळात पावणेपाच झाले आणि दारावरच्या बेलने कर्कश आवाजात कुणीतरी आल्याची वर्दी दिली.बेल वाजली  आणि सारेच जणू एका क्षणासाठी स्तब्ध झाले. निर्वीचा तर क्षणभरासाठी श्वासच रोखला होता पण चेहऱ्यावरचे गोड हासू त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या चाहुलीने मनात  निर्माण केलेल्या आनंदाचे,उत्सुकतेचे,अधिरतेचे प्रतिबिंब होते.जे निमिषात अधिकाधिक विस्तारत होते. 

- रुपाली ठोंबरे.


                                              (भाग ११ वाचण्यासाठी )

Tuesday, October 30, 2018

जाणीव.





चाळीच्या खचलेल्या पायऱ्या चढत सुहास वर आला. चाळ आता बरीच जुनी झाली होती. अनेक कोपरे ढासळले होते. कितीतरी घरांना कुलुपे लागली होती. उजव्या दिशेला तिसऱ्या घरापाशी तो येऊन थांबला. गणपतरावांचे म्हणजे सुहासच्या बाबांचेच घर होते ते. जे विकण्यासाठीच आज तो इथे आला होता. घरापाशी येईस्तोवर बालपणीच्या कितीतरी आठवणी अलगद तरळून गेल्या ...मनातल्या मनातच.
तो क्षणभर थबकला. तीन महिन्यांपूर्वीच सुहासची चांगली नोकरी गेली होती. पूर्वीच्या साठवणीवर आणि प्रियाच्या जेमतेम पगारावर घर कसेबसे चालत होते. पण इतर खर्च अंगावर येण्यापूर्वी नवे उत्पन्न सुरु होईस्तोवर काहीतरी मार्ग काढणे भाग होते. त्यासाठीच प्रियाने सुचवलेला हा मार्ग सुहासने स्वीकारला होता. चाळीतले घर जुने असले तरी ती आईची एक सुखद आठवण होती. ती आठवण ही अशाप्रकारे काढून टाकणे बाबांसाठी अशक्य होते पण त्याचाही नाईलाज होता. सुहासलाही वाईट वाटतच होते.पण किरकोळ भाडे देणारे हे घर आता त्याला नको होते. असे नाममात्र भाडे देणाऱ्या त्या भाडेकरूला तो आज खोली खाली करण्यास सांगणार होता. या सर्व विचारांत गुंतलेला असतानाच त्याने दारावर थाप मारली.आणि हलकेच लावलेलं दार पुढच्याच क्षणी उघडलं गेलं.

समोर पाहिले आणि सुहासला धक्काच बसला.बाबांचे एक परिचित काही वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होते हे त्यास ठाऊक होते पण ते सुधीरसर असतील असे त्याला स्वप्नातदेखील कधी वाटले नव्हते. तो त्यांच्याकडे पाहतच राहिला. ते मात्र कित्येक वर्षांनी त्याला पाहून आनंदित झाले होते. मोडकळीस आलेल्या खुर्चीवर बसण्याचा इशारा करून ते आत जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन आले. समोर अभ्यास करत बसलेल्या चाळीतल्या मुलांना त्यांनी आता घरी जाण्यास सांगितले.
"सर, तुम्ही? आणि इथे? अजूनही शिकवता?"
त्या मुलांना पाहून त्याने अडखळत विचारले. त्यावर ते हसत म्हणाले,
"अरे शिक्षक ना मी? मग शिकवणे काही दूर जात नाही बघ. मला आवडते मुलांमध्ये वेळ घालवायला. असेही एकट्याला घर खायला उठते. आणि तेवढाच म्हातारपणात आधार"
सुहास प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहत तसाच उभा होता... भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटनांचा मेळ घालत.
सुधीरसर म्हणजे जित्याचे बाबा आणि चाळीतील सर्व लहानथोरांचे आवडते सर. संपूर्ण चाळीतल्या मुलांवर त्यांचा चांगलाच दरारा असायचा.सुहाससुद्धा त्यांच्याकडेच शिकवणीसाठी जायचा. जित्या म्हणजेच जितीन... सर्व मुलांमध्ये एकदम हुशार आणि सुहास मात्र काठावर कसाबसा पास होणारा सामान्य मुलगा. म्हणूनच त्यांची मैत्री कधी घट्ट अशी जमली नाही. पण गणपतराव आणि सुधीरसर मात्र अगदी जिवाभावाचे मित्र. जित्या खूप शिकला. सरांनी पुढच्या शिक्षणासाठी त्याला अमेरिकेतसुद्धा पाठवले. काही वर्षांपूर्वी त्याच्या लग्नाला भेटलो होतो ते एकदाच. त्यानंतर ते सर्वजण परदेशात स्थायिक झाले असेच माहित होते आतापर्यंत. पण आता सर इथे राहतात आणि तेही भाड्याने? आपल्या घरात? अशा अनेक प्रश्नांनी घेरले होते त्याला. शेवटी न राहवून त्याने विचारले,
"सर, तुम्ही तर जित्याकडे गेला होतात ना?"
सुहासचा प्रश्न ऐकून सुधीरसर फक्त हसले आणि म्हणाले,
"अरे, ती मायानगरी पाहायची एक हौस होती. ती फिटली आणि आलो पुन्हा परत.खरंतर आमचे विचार पटत नाहीत रे तुमच्या पिढीला.आम्हां म्हाताऱ्यांना मुलांना समजावत राहण्याची भारी हौस. आमची माया असते रे ती, पण तुम्हाला ते ओझं वाटतं. मग खूप ओढाताण व्हायची माझी आणि बहुतेक त्यांचीही. मग मीच एकदा म्हटले, "राहा तुम्ही राजाराणी सुखात, मी जातो आपल्या चाळीत". कधी वाटले भेटावेसे तर घर तुमचंच आहे. पण आज 4 वर्षे उलटली अजूनतरी तो कधी आला नाही. आता काय? कधीतरी अधूनमधून फोन येतो त्यातच समाधान मानायचं. तिकडून येणाऱ्या पैशाचंही अगदी तसंचमागे पावसाळ्यात आमच्या घराचं छत कोसळलं तेव्हा तर अडचणींचा डोंगरच कोसळला होता.पण तेव्हा तुझ्या बाबांनीच पाठीशी उभं राहून आधार दिला होता."

हे ऐकून सुहास पार हादरला. मनोमन त्याला खूप चीड येत होती. जित्याची नव्हे तर स्वतःचीच कारण तोही आज तेच करायला जाणार होता. सुहासला असे विचारांत हरवलेले पाहून सुधीरसरांनी एकदम विचारले,
"तू सांग. तू आज इथे कसा? अचानक?"
त्या आवाजाने सुहास भानावर आला आणि स्वतःच्या नकळत बोलून गेला ,
"मी? सहजच. जुन्या आठवणी घेऊन आल्यात आज इथे. मी काय म्हणतो, घर फारच खराब झालं आहे ना? पुढच्या आठवड्यात येऊन थोडी दुरुस्ती करून देईन म्हणतो."
त्याची नजर त्या जीर्ण घराच्या भिंतींवर फिरत होती. अचानक त्याला सरांचा हात खांद्यावर जाणवला आणि पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा त्याने पुसून काढल्या.

- रुपाली ठोंबरे.