Pages

Monday, November 27, 2023

अक्षरयज्ञ ६

अक्षरयज्ञ ६

अक्षरयज्ञ...रोजच्या धकाधकीच्या जीवनाला स्वल्पविराम देऊन एखाद्या शांत ठिकाणी तीन दिवस एकत्र येऊन नाट्य , नृत्य , संगीत अशा कलांच्या माध्यमातून जागृत होणाऱ्या भावनांच्या खोल डोहातून चिंब भिजलेल्या कल्पनांच्या कुंचल्याने मनावर , हृदयावर विविध भावरंगांचे चित्र रंगवत नव्याने अक्षरांचा शोध घेण्याची संधी देणारा, सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुरु केलेला एक अनोखा उपक्रम. येताना कॅलिग्राफी किंवा सुंदर चित्र यायला हवे अशी अट मुळीच नसते पण जाताना प्रत्येकजण स्वतःतील रंग शोधत आपले मनातले चित्र सोबत नक्कीच घेऊन जातो. म्हणूनच अभियांत्रिकी , वैद्यकीय , वाणिज्य , कला अशा अनेक क्षेत्रांतील सर्वांनाच हा यज्ञ आपलासा वाटतो. २००७ सालापासून सुरु झालेला हा अक्षरयज्ञ आजपर्यंत सुरु आहे. प्रत्येक वेळी नवी संकल्पना ... नवा सहभाग... नवे मार्गदर्शक ....नवी सत्रे  ...,परंतू  येणारा अक्षरानुभव प्रत्येक वेळी तितकाच दिव्य....मी दोनदा ही कार्यशाळा अनुभवली आहे. २०१६ साली नवरसांच्या संकल्पनेतून घेतलेली अनुभूती अविस्मरणीय होतीच ... पण यावर्षी त्यावर नव्याने भावचित्रे कोरली गेली. आणि या चित्राची व्याप्ती इतकी प्रचंड होती कि जणू त्यासाठी हे मन अपुरे पडत आहे असे वाटत आहे. 

अक्षरयज्ञ ६....२४  नोव्हेंबर २०२३ पासून सुरु झाला...आणि मग पुन्हा एकदा तीच पायरी ...नक्की काय करायचे या विचारात भांबावलेले सर्वांचे चेहरे ...तरी त्यावर तोच उत्साह... साधारण तीच व्यवस्था... पण सभागृहात पाऊल ठेवता क्षणी एक वेगळेपण प्रकर्षाने नजरेत आले. पूर्वी ज्या ठिकाणी 'अक्षरयज्ञ' ची भव्य उभी कलाकृती स्वागतास सज्ज होती, ती आज यज्ञकुंडाच्या रूपात आडवी रचलेली होती. अक्षरे तीच... उभी अक्षरे जमिनीवर अंथरली की त्याचे स्वरूप कसे बदलते हा पहिला धडा शब्दांविना अच्युत सरांनी कल्पकतेने शिकवला. या अनोख्या कार्यशाळेचे उदघाटनही विलक्षणच. मेधा गोखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वरांतील रामदास स्वामी लिखित 'दासबोध' ग्रंथातील मंत्रांच्या उद्घोषात वातावरण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक डॉ . जयंत पाटील यांनी त्या यज्ञकुंडात अक्षरांची आहूती देत अक्षरयज्ञ कार्यशाळेचे खऱ्या अर्थाने उदघाटन केले .त्यापाठोपाठ सर्व अक्षरप्रेमी या यज्ञात सहभागी झाले.प्रत्येकाच्या हातातील अक्षरे वेदीत समर्पित होत असताना 'ब्राह्मणे बाळबोध अक्षर' या शब्दोच्चारांनी वातावरण अक्षरमय झाले... सोबत पालवांची अक्षरे होतीच..."अक्षराणाम आकारास्मि ।"

सुलेखनकारांची कार्यशाळा म्हणजे कागद आणि शाई आलीच. पण कार्यशाळा सुरु झाली ती या मूलभूत गरजांविना...कारण यावेळी संकल्पना होती ,"Caligraphy Beyond Ink & paper ". प्रख्यात थिएटर कलाकार अतुल पेठेंनी पहिल्या सत्राची कमान हाती घेतली आणि तत्क्षणी आम्हा सर्वांसाठी तो सभागृह म्हणजे एक प्रचंड मोठा कॅनव्हास म्हणून समोर अंथरला गेला ज्यावर आज आम्ही आपले भावरंग भरणार होतो.अतुल पेठेंच्या मार्गदर्शनाखाली अनेक भावनिक आणि शारिरीक हालचालींना वेग आला... कधी वस्तूंची फुले झाली तर कधी आम्हीच स्वतः फुलात विलीन झालो. अगदी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टींतून काय किमया घडू शकते याची प्रचिती आली. आयुष्य खरेच खूप सोपे असते पण आपण उगाच त्याला कठीण बनवत राहतो. जे स्वतःकडे आहे ते दुर्लक्षित केले आणि जे नाही त्याच्यासाठी रडत राहिलो, त्यामागे पळत राहिलो तर जीवनाचा कॅनव्हास आणि रंग प्रत्येक क्षणी अपुरेच  भासतील, पण त्याउलट जे रंग आज आहेत त्यापासून सुरुवात करत मनातली प्रत्येक भावना आपल्या पूर्ण क्षमतेने  मांडण्यास सुरुवात केली तर प्रत्येकात परमेश्वराने ती क्षमता दिली आहे की तो स्वतःच्या जीवनाचा कॅनव्हास स्वतः कल्पकतेने सुंदररित्या परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. फक्त प्रत्येक गोष्टीत आनंद मानला पाहिजे...धीर असावा...आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास. हे सर्व शिकवणारी कार्यशाळाही असू शकते हे आज अतुल सरांसोबत दिवस घालवल्यावर जाणवले. आणि हे शिकलेले नक्कीच पुढचे आयुष्य घडवण्यात मदत करेल. अतुल पेठे जसे श्रेष्ठ तशीच त्यांची टीम सुद्धा ग्रेट आहे. स्वर - ताल - शब्द - लय - भाव या सर्वांचा एकत्र संगम आणि त्यातून 'अ' या एका अक्षराची शक्ती आज 'अक्षरनाट्य' या संकल्पनेतून अनुभवली. सुप्रसिद्ध कथक नर्तिका ऋजुता सोमणचे नृत्य आणि त्यातून निर्मिलेला 'अ'कार.... बंदिश रचना करून गाणाऱ्या शीतल ओर्पे -भद्रेने  मेघमल्हारात रचना करून सादर केलेली 'अ'ची बंदिश ...प्रयोगशील वादक उमेश वारभुवनची सुरेल तालवाद्य मैफिल आणि यासोबत अतुल पेठे सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली उत्कृत्ष्ट कलाकृती-'अक्षरनाट्य'....निःशब्द! शेवटी 'अ' ची विविध रूपे अभिव्यक्त करताना आम्हां सर्वांनाही  या 'अ' मध्ये सामावून घेऊन सर्वानी मिळून जो चिल्ला केला तो अत्युच्च आनंददायी क्षण...   केवळ अद्भुत, अतुलनीय आणि अवर्णनीय.  

ती पहिली संध्याकाळ 'डॉट टू डॉट' या माझ्या संकल्पनेसाठी सुद्धा स्मरणीय ठरली. या संकल्पनेचे पुस्तकरूप सर्वांसमोर मांडले गेले जेणेकरून या बिंदूची व्याप्ती अधिक वाढून इतरांनाही त्या कलाकृतींचा आस्वाद घेता यावा. गजानन जोशी आणि अच्युत सर यांच्या हस्ते या शुभकार्यास प्रारंभ झाला. हिरल भगतने प्रख्यात कवी निरंजन भगत यांच्या गुजराती भाषेतील मुंबई शहरावर लिहिलेल्या कवितांना अक्षररूपात अतिशय कल्पकतेने मांडले.  ते पाहता मनात आणले कि कवितेतील शब्द न शब्द शरीरात भिनला तर कागदावर मोठी जादू घडू शकते हे जाणवले. त्यानंतर या कार्यशाळेसाठी खास  श्रीलंकेहून आलेल्या अमीर फैसल यांनी त्यांची जी अरेबिक आणि सिंहली भाषेतील सुलेखन कला सादर केली, ती पाहून अक्षरांचे रूप भाषेसोबत कसे बदलत जाते याचा प्रत्यय आला. भाव आणि अर्थ एकच पण लिपी वेगळी... अगदी एकाच लिपीत वेगवेगळ्या प्रकारे एकच शब्द मांडला तरी किती वेगवेगळी आवर्तने निर्माण होतात हे प्रत्यक्ष पाहावयास मिळाले. श्रीकांत या आमच्या सहकलाकाराने नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय सुलेखन कार्यशाळेचा आस्वाद घेतला होता. जगातील चार प्रख्यात सुलेखनकारांच्या कामातून आणि मार्गदर्शनातून त्याच्या कार्यात किती बदल झाला हे पाहायला मिळाले. रोमन भाषेत वापरल्या गेलेल्या विविध तंत्रांचा  जेव्हा भारतीय लिपीत योग्य प्रकारे वापर होतो तेव्हा चित्राचे स्वरूप किती वेगळ्या पद्धतीने पालटू शकते हे त्याच्या कामांतून निदर्शनास आले. कधीकधी तेच तेच काम करत असताना नवे काही प्रयोग त्याच अक्षरांवर करत राहिले पाहिजेत. त्याचा सुलेखन क्षेत्रातील हा अनुभवप्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याप्रमाणेच व्यवसायाने इंटेरिअर डेकोरेटर असलेल्या संजीव जोशी  यांनी आपली कला सर्वांसोबत सादर करत व्यापारीदृष्ट्या सुलेखन कलेला किती वाव आहे आणि आपण काय केले पाहिजे हे अगदी समर्पकरित्या दाखवून दिले. अक्षरांची मांडणी एका सामान्य माणसासोबत, त्याच्या भावनांसोबत जोडली गेली तर त्या भिंती सुद्धा बोलक्या होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणून अक्षरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मनोमन पटला. 

दुसरा दिवस सुरु झाला तो प्रख्यात कथक नृत्यांगना , सुंदर अभिनेत्री तन्वी पालव हिच्या नृत्यासोबत.आज कागदावर काम करायचे होते म्हणून सर्वच फार उत्सुक होते. अतुल पेठे सरांच्या कार्यशाळेतुन प्रेरित झाल्यानंतर काम करण्याची उत्सुकता आता वाढली होती.    जसे कोरे कागद समोर अंथरले होते तशी मने आता नवीकोरी झाली होती. आजपर्यंत शिकत आलेल्या अक्षरांचा तोच तोचपणा आता फिका वाटू लागला होता. मनातली पाटी कोरी होत चालली होती... नव्या भावनांना व्यापण्यासाठी. तन्वीच्या प्रत्येक आविष्कारासोबत वेगळा भावरंग कागदावर ओसंडत होता. तिची पावले समोरच्या व्यासपीठावर कमी आणि मनःपटलावर अधिक राज्य करू लागली... तीच आता कागदावर उमटत होती. तिच्या प्रत्येक गिरकीसोबत कलाकृतीची वळणे आता वेगळेपण आणण्यात यशस्वी होत होती. २०१६मध्ये तन्वीचा एक नृत्याविष्कार पाहून मी तिची फॅन तेव्हाच  झाले होते पण आज  जवळजवळ २-३ तास ती सोबत होती. तिची प्रत्येक मुद्रा, अविर्भाव मनात एक नवे चित्र निर्माण करत होते. खरे तर त्यानंतर या चित्रांसोबतच कथक शिकण्याची एक नवी प्रेरणा मनात जागृत झाली. 

प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांचे तेथे येणे आणि २ दिवस तो सहवास लाभणे हे केवळ स्वप्नवत वाटत आहे. सर्वांप्रमाणे मलाही संगीत खूप आवडते. माझे प्रत्येक चित्र संगीताच्या सहवासात जन्म घेते. पण तरी मला कविता किंवा गाण्याचे सुलेखन करणे फार  कठीण वाटायचे. नेहमी प्रश्न पडायचा कि हे कसे शक्य करावे. पण आज मला कळले कि माझा प्रयत्न फक्त त्या शब्दांना शाईमध्ये बंदिस्त करून कागदावर मांडण्याचा  असायचा...त्यामुळे कदाचित मी हे करताना अयशस्वी ठरले असेन.आज उमगले कि त्या शब्दांना बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना अजून मुक्त करावे... इतके कि ते गाणे अंगभर संचारावे... आणि त्यानंतर क्षणात होणारी निर्मिती खरंच अकल्पनीय असेल. आज मी खऱ्या अर्थाने गाणे कसे ऐकावे हे शिकले. आणि नक्कीच या संगीत सहवासातून निर्माण झालेली ऊर्जा आयुष्यभर आम्हां सर्वांना प्रेरित करत राहील. 

रात्री अशोक परब सरांनी अच्युत पालव सरांसोबत मारलेल्या गप्पा हे या ३ दिवसीय कार्यशाळेतील एक विशेष आकर्षण होते. अच्युत सरांचा जीवनप्रवास प्रत्येक वेळी ऐकताना नाविन्यपूर्ण वाटतो. प्रत्येक वेळी नवे काही शिकवून जातो , नव्याने पुन्हा पुन्हा प्रेरित करतो. त्यांची शिष्या असल्याचा अभिमान नव्याने जागृत होतो. 

शेवटचा दिवस जसा उजाडला तसा कार्यशाळेबद्दलचा उत्साह द्विगुणित झाला होता. आज योगेश तळवलकरांचे सत्र सुरु होताच त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख सर्वांसमोर फारच नाट्यमय रूपात करून दिली. योगेश हे एक उत्कृष्ट  UX Designer आणि Ergonomist तर आहेतच पण सोबतच एक उत्तम थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहेत. मी सुद्धा सॉफ्टवेअर क्षेत्रातील असल्याने मला त्यांच्या कार्यशाळेत विशेष रुची होती . आणि खरंच खूप काही माहित असूनही अगदी नव्या पद्धतीत बरेच काही शिकायला मिळाले. तंत्रज्ञान आणि कलात्मकता कशी एकमेकांना पूरक ठरते हे पाहायला मिळाले. आपण निर्माण केलेल्या कलाकृतीचा प्रेक्षकावर  किती आणि कशा पद्धतीने प्रभाव पडेल याची कल्पना निर्मितीपूर्वी करणे हे काहीवेळा किती गरजेचे आहे हे समर्पकरीत्या समजावले गेले.अगदी एक पत्र लिहिताना समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करत कमी शब्दांत, योग्य रचना केल्यास ते उद्दिष्ट सफल होते. आणि शेवटचा उपक्रम म्हणजे installation. काल काहीसा तसाच प्रकार भिंतींच्या आतल्या वस्तू गोळा करून केला गेला आणि आज भिंतींपलीकडल्या जगातील वस्तू गोळा करून कलाकृती निर्मिती झाली . दोन्ही प्रकारांत साम्य हेच की दोन्ही करताना एका उत्कृष्ट कलाकृतीसाठी कल्पकता ,मेहनत आणि मांडणी सोबतच टीमवर्कचा किती मोठा वाटा असतो हे अनुभवले. 'काळ्याची  निळी जखम'...वरवर नकारात्मक वाटणारे हे वाक्य किती सकारात्मक आहे हे काम करताना जाणवले. प्रत्येक ग्रुपने कलात्मक रित्या हा सारखाच विचार कितीतरी वेगळ्या पद्धतीत मांडला. सुरुवातीला कठीण, अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा किती सोप्या पद्धतीत मांडता येऊ शकते हा आयुष्यातील खूप मोठा धडा इथे मिळाला. 

अशी ही तीन दिवसीय अक्षरयज्ञ कार्यशाळा...शेवटी प्रमाणपत्र हाती घेताना आज संपत आहे याची जाणीव प्रकर्षाने जाणवली. ही कार्यशाळा म्हणजे  नियमित होत असलेल्या सुलेखन कार्यशाळांपेक्षा खूप वेगळे काही देऊन जाणारी होती. Calligraphy  म्हणजे केवळ चांगले, सुंदर वेगवेगळ्या स्क्रिप्टमध्ये लिहून मांडणे नक्कीच नाही. पण दुर्दैवाने आज सगळीकडे हेच पाहावयास मिळत आहे. भावना शब्दांतून , रंगांतून, रचनांतून  समोर मांडणे ही खरी कला आहे.आणि हेच या चौघांपैकी प्रत्येकाने दाखवून दिले.सुलेखन करताना केवळ अक्षरे कागदावर मांडणे हा हेतू नसून ती अक्षरे त्या कागदाच्या व्यासपीठावर अशा प्रकारे खेळवावीत कि जेणेकरून पाहणाऱ्याच्या अंगावर रोमांच येतील. चांगली असो वा वाईट, त्या भावनेत खोल बुडून गेलो  कि अक्षरे जिवंत होऊन स्वतःच बोलतील...ही कला अवगत करण्यासाठी नाटकांशिवाय दुसरा पर्याय नाही. अतुल पेठेंनी शारिरीक हालचाली आणि आपल्यातील कल्पकता यातील नाते खूप सुंदररित्या समजावले. ऋजुताची पावले थिरकत पावलांखाली 'अ' ची प्रतिकृती साकारत असताना नजर मात्र आकाशाकडे होती. यावरून अक्षरे कागदावर उमटतात ती मनातून हे सत्य समोर आले. कोणताही आकार चितारताना मनात ती कलाकृती आधी आकार घेते. कौशल इनामदार त्यांच्यासोबतच्या गप्पांतून आम्ही एक वेगळीच मैफिल अनुभवत होतो. एखाद्या कलेबद्दल ओढ निर्माण झाली की त्या कलेच्या प्रत्येक अंगावर प्रेम करतो तो खरा कलाकार, त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी इतरही कला कशा  प्रकारे साथ देतात हे जाणून ते आचरणात आणायला हवे , आयुष्यातले कोणते क्षण कधी इतर क्षणांना फुलवतील याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही... त्यामुळे मनात भाव उत्पन्न झाले कि ते रंग उधळत राहावे... योग्य सांगड आज करणे अशक्य नसल्यास त्याला अंतरीच्या कुपीत खुशाल ठेवावे.... हेच सर्व आज प्रत्येकाने इथे मांडले. इथे आत्मसात केलेला प्रत्येक संस्कार मनात खोलवर रुजला... आयुष्यभराची कलात्मक शिदोरी आहे ती. इतर सर्व कला , तंत्र शिकवणारे साहित्य सगळीकडे ढीगभर उपलब्ध आहे. पण भावनांना जागृत करून नवनिर्मितीसाठी प्रोत्साहित करणारी कला शिकवणारी कार्यशाळा क्वचितच उदयास येते.अक्षरांना रंगभूमी, नृत्य आणि संगीत यांच्या सर्जनशील संगमामुळे जो एक अभूतपूर्व आयाम निर्माण झाला तो 'ह्याची देही ह्याची डोळा' अनुभवता आला हा फक्त माझ्याच नव्हे , तर उपस्थित तमाम सन्मित्रांच्या आयुष्यात एक चिरंतन मूल्यरोप लावून गेला. आम्ही या तीन दिवसांत काय काम केले हे आज कदाचित दाखवता येणार नाही पण इथे इतकी ऊर्जा नसनसांत भिनली आहे जी यापुढील प्रत्येक कलाकृतीत आपली छाप सोडून जाईल. कार्यशाळा असावी तर अशी... फक्त एका कामात नव्हे तर संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी. 

निघता निघता या कार्यशाळेतून काय घेऊन चालले आहे असा विचार करता आजपासून पुढच्या आयुष्याचा कार्यक्रम मन नकळतच आखत असल्याचा भास झाला. ज्याप्रमाणे कथक शिकण्याची इच्छा येथे व्यक्त झाली त्याचप्रमाणे नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना हजेरी लावण्याची गरज लक्षात आली. आणि हे सर्व स्वतःतली सुलेखन कला अधिक फुलवण्यासाठी.डोळ्यांसमोर दिसणारी अक्षरे आता नुसतीच रेखीव नव्हती तर ती भावनांचा साज चढवून जिवंत भासत होती. या अक्षरांना कागदावर थिरकते करण्यास मन आतुरले  होते. या कार्यशाळेतून आणखी काही मनापासून घेऊन जाण्यासारखे असेल तर 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी' येथिल  स्वादिष्ट जेवणाची आजही जिभेवर रेंगाळत राहिलेली ती चव. मनाला चेतना देणारा शांत परिसर जितका सुंदर तितकीच तिथली व्यवस्थाही उत्कृष्ट.अशा एकमात्र कार्यशाळेसाठी हेच प्रेरणादायी स्थान अनुरूप आहे. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात निसर्गाच्या कुशीतील असा निर्मळ निवांतपणा... केवळ स्वप्नवत!

त्यादिवशी कार्यशाळा संपवून घरी परतत होते तेव्हा अनाहूत पावसाची रिमझिम सुरु होती. चालता चालता वाटेतल्या एका चहाच्या टपरीवरील चहाच्या सुगंधाने मन वेधून घेतले... नकळत कौशल सरांचा आवाज मनात रुंजी घालू लागला... त्या पागोळ्यांआडून एक सुंदर आठवण मनाचा वेध घेत होती... पावले घराची वाट चालत होती परंतू मन त्याच मुग्ध अक्षरमयी वातावरणात रममाण होते. 


- रुपाली ठोंबरे . 

Monday, April 3, 2023

अखंड ऋणानुबंध

हे इथे मी बसायचे... आपण या जागेसाठी खूप भांडायचो, आठवते? ...इथे आपण संस्कृतच्या वर्गासाठी जमायचो... त्या तिथे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे...ते तिथे माझे चित्र बोर्ड वर एकदा लागलेले... हे इथे मला शिक्षा म्हणून ओणवे उभे केले होते...याच वर्गात आपण अशी मस्ती केली होती...  अशा एक ना अनेक आठवणी. प्रत्येकाच्याच मनात आठवणींचे जाळे निर्माण झाले होते... एकमेकांसोबतच्या संवादाने एकेक पाश मोकळा होत होता...आणि सर्वच इतिहासातील गोड आठवणींत रमून गेले....नजर जाईल त्या त्या प्रत्येक कोपऱ्यात , जागेवर एकतरी आठवण हजर होती. बालपणी आईचे बोट हातात घेऊन ज्या वास्तूमध्ये ३५ वर्षांपूर्वी प्रवेश केला होता आणि पुढची १३ वर्षे कधी रडत कधी हसत जिथे आयुष्याला आकार देता देता असंख्य आठवणी गोळा केल्या होत्या ती माझी शाळा- फादर अग्नेल मल्टीपरपज स्कूल, मराठी माध्यम. 

सुमारे २३ वर्षांपूर्वी जिथून शाळेचा दाखला हातात घेऊन बाहेरच्या दुनियेत पाऊल ठेवले होते , त्याच शाळेत आज इतक्या वर्षांनी एकत्र भेटायचे ठरले होते . जसजसा हा दिवस जवळ येत होता तसतशी आतुरता वाढत होती. सर्व एकत्र भेटतील तर काय बोलतील एकमेकांशी ?  सर्व किती वेगळे दिसत असतील? बाकीचे खूप बदलले असतील का ? शिक्षक- शिक्षिकांना आपण आठवत तरी असणार का ? ते किती बदलले असतील ? शाळेत किती बदल झाले असतील?... असे एक ना अनेक प्रश्न मनात येत-जात राहिले....आणि अखेरीस आज २ एप्रिल २०२३ हा आम्हा सर्वांच्या आयुष्यातील ऐतिहासिक दिवस उजाडला होता आणि या दिवसासाठी मनावर फक्त एक नाव कोरले गेले... अखंड ऋणानुबंध. 

तर हा 'अखंड ऋणानुबंध' म्हणजे नक्की काय ?... तर जवळ-जवळ २-३ महिन्यांपूर्वी आमच्या १९९२ च्या बॅच मधील संतोष कोरे दादा, अमोल दादा आणि इतर काही जणांना (आमच्या सिनिअर्सना आम्ही नेहमी दादा-ताई अशा नावानेच हाक मारायचो... तसे नातेच असायचे. आणि अनेकदा आमचीच भावंडे वरच्या खालच्या इयत्तांमध्ये असल्याने दादाचा मित्र दादाच होऊन जायचा ) चाहूल लागली कि फादर ऍग्नेल मराठी माध्यमची ही वास्तू काही महिन्यांतच पुनर्बांधणीसाठी जाणार आहे. साहजिकच आहे ज्या ठिकाणी आयुष्यातील १३-१४ वर्षे घालवली त्याच्याबद्दल असे ऐकताच कळवळा तर वाटणारच. आणि यातूनच ऋणानुबंधाची कल्पना रुजली...त्या दृष्टीने हालचाली वाढल्या... वेगवेगळ्या बॅचमधील एकदोघांचे संपर्क शोधून काढले गेले ... पुढे त्या एक-दोघांनी संपूर्ण वर्गाला त्यासाठी तयार केले आणि यातूनच आजचा 'अखंड ऋणानुबंध' हा कार्यक्रम जन्मास आला आणि आज कार्यसिद्धीस पोहोचला . 

वाशीला येणे-जाणे कायम असले, तरी शाळेच्या दिशेला जाणारा रस्ता जणू  गेली २० वर्षे तरी हरवलाच होता... जावेसे वाटायचे पण अनेक प्रश्न असायचे आणि अशाप्रकारे तिथे जाणे कधी झालेच नाही.  त्यामुळेच इतका परिचयाचा परिसर देखील आज खूप वेगळा भासला. शाळेपर्यंतच्या मोकळ्या रस्त्यावर आता दुकानांची खूप गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा गाड्याच-गाड्या....या सर्व आपल्याच शाळेत जमणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असाव्यात हे जाणवले आणि उगाच खूप अभिमान वाटला. आसपासचा परिसर वेगळा होता पण शाळा... तीच दुमजली इमारत. कित्ती वर्षांनी मी शाळेचा तो बोर्ड पाहत होते. अगदी गेटपाशीच किती तरी आठवणी गळाभेटीसच आल्या. अगदी बालपणी रोज शाळेत प्रवेश करताना इथेच सर्व रांगा लागायच्या ,दुसरी-तिसरीत त्याच जागेत आम्ही लागंडी खेळायचो, पावसाळ्यात त्याच तेव्हढ्याशा छताखाली सर्व पालक आम्हा मुलांना रेनकोट घालून घेऊन जात असत , त्याच जागेत दहावीला मानात बोर्डावर लिहिल्या गेलेल्या माझ्या नावाची आठवण  स्पर्शून गेली ....  जसजशी पावले पुढे पडत गेली तसतशा असंख्य आठवणी जाग्या होत गेल्या. जरा मागे वळून पाहिले आणि शाळेसमोरचा तो कठडा जिथे सर्वांच्या आई तासंतास वाट पाहत गप्पा मारत बसलेल्या जाणवल्या. वर्गमित्र-मैत्रिणींपेक्षाही त्या सर्वांच्या आयांशी एक वेगळेच जिव्हाळ्याचे नाते निर्माण झालेले असायचे. त्याच आठवणींत शाळेत आतल्या दिशेने मी चालू लागले. आता जसजसे एकेक जण भेटत होते,आठवणींचे ते क्षण वाढत होते.सर्वात मोठे आश्चर्य सर्वानाच वाटत होते ते म्हणजे त्या जागेचे जिथे नेहमी आमचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. या एवढ्याशा जागेत किमान ४ वर्ग म्हणजे जवळजवळ २५० विद्यार्थी कसे काय बसायचो आपण ? आणि इतकेच नाही तर मधल्या मोकळ्या जागेत नाचायचो सुद्धा....दुसरीला ''डोल डोलतय वाऱ्यावर .... " इथेच सादर केले होते आणि किती मोठा मंच वाटायचा तो तेव्हा. त्या काही क्षणांतच मी तिथे गायलेली गाणी, सादर केलेली टोपीवाल्याची गोष्ट, नृत्य सारे सारे एकामागोमान एक आठवत गेले. समोरच्या खिडकीत निलीमा किंवा दीपा टीचरचा भास न व्हावा असे होणारच नाही. ती खिडकी सहसा कधीच रिकामी पाहिली नव्हती ... आज ती चक्क बंद होती. स्टाफरूम ,मुख्याध्यापकांची केबिन हे फक्त बाहेरून पाहिले तरी २०-२२ वर्षांपूर्वीचे चित्र नजरेसमोर उभे राहिले. स्टाफरूम म्हटले कि मला आठवायचे ते डस्टर आणि खडू... चुकून एका वर्षी वर्ग-मॉनिटर बनले होते ना ? त्या काळात स्टाफरूम मधून रोज रंगबिरंगी खडू आणून वर्गात टेबलावर ठेवणे पण जाम भारी वाटायचे. आणि विशेष गृहपाठाच्या वह्या... त्यादेखील तिथेच असायच्या.पावलापावलावर येणाऱ्या आठवणींची गर्दी आता मनावर ताबा घेऊ लागली होती. वर्गांवर जाणारे- येणारे शिक्षक-शिक्षिका , विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेले वर्ग ,फादरांच्या वाढदिवसादिवशी गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या भिंती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा , परीक्षेच्या वेळामधली शांतता, मधलीसुट्टीतील मस्ती, स्वतः काढलेले सुंदर चित्र बाहेरच्या डिस्प्ले बोर्ड वर लावताच होणारा तो आमच्या मनातला आनंद, कुठेही जाता-येता नकळत कधी शिस्तीचे धडे घेत ओरड खात तयार होणाऱ्या रांगा, कामाच्या लगबगीत असणारे सुरेश मामा , श्रावण मामा , वनिता मावशी , जोत्स्ना मावशी (आमची शाळा जितके विद्येचे माहेरघर तितकेच ते अशा नात्यांमुळे खरेखुरे घरही वाटायचे, अगदी आई-बाबा, शिक्षक, भाऊ-बहिणी या सर्वांचेच एक वेगळेच नाते असायचे )... अशी एक ना अनेक चित्रे डोळ्यांसमोर येत होती. 


पहिल्या मजल्यावर शेवटचा वर्ग म्हणजे आमचा पाचवीचा वर्ग...त्या वर्गापर्यंत जाईपर्यंत जवळ जवळ सर्वच इयत्ता मनावर राज्य करून गेल्या. प्रत्येक वर्गात एक नवी स्मृतिमालिका. वर्गा समोरच्या लांबच लांब पसरलेल्या बेसिनमध्ये होळीला पाणी खेळणारी मुले आणि त्यानंतर रागावणारे टीचर्स क्षणात स्मृतीपटलावर जाणवले .... एलिमेंटरीच्या क्लासनंतर रात्री ७-८ वाजेच्या अंधारात कलर पॅलेट साफ करण्यासाठी घाबरत तिथे जाणारी मीच मला आज आठवली. वर्गाच्या दरवाजाजवळ येताच 'मे आय कम इन' म्हणत प्रवेश करणारे आम्ही आठवलो. त्या एका प्रवेशात खरंच किती क्षण लपलेले होते. वर्ग तर बराच बदलला होता पण तरी तो आपलासा वाटत होता. लाल , पिवळ्या अशा रंगीत भिंती, माथ्यावरचा प्रोजेक्टर आणि काही अधिकच्या खिडक्या सोडल्या तर सर्व काही ओळखीचेच. त्याच ४ हाऊसच्या ८-८ बेंचेसच्या चार रांगा. वर्गात तर अनेक आठवणींना उजाळा येत होता.पहिला मजलाही कितीतरी उंच वाटणारा आणि तोच आता ठेंगणं वाटू लागला. पण आजही इतर भरपूर पैसे घेणाऱ्या शाळा पाहिल्या कि मान्य करेन आमचे वर्ग मात्र खूप मोठे आणि ऐसपैस... वर्गच नव्हे तर सारेच काही मुबलक उपलब्ध जे जे विद्यार्थ्यांना हवे ते ते. आजही आम्ही ३ जणी एका बेंचवर बसू शकत होतो... आश्चर्यच वाटले. जिथे एके काळी दोघींमध्ये पण जागेसाठी भांडणे होत होती तिथे आज गप्पांचा ओघ नाती अधिकाधिक जवळ आणत होता.कदाचित शाळेचे ब्रीद वाक्य " Love your neighbor as yourself " आज खऱ्या अर्थाने जगू वाटत असावे.  अशा प्रत्येक वर्गात तर किती सुंदर क्षण जन्मलेले होते. यादी करावी तर दिवसाची रात्र होईल. पण नव्या युगातील नव्या बदलांप्रमाणे काही बदल अपेक्षित होताच.  काळा फळा जाऊन आता सरकता हिरवा फळा आला होता. जुन्या सवयींना उजाळा देण्याच्या हेतूने काही लिहिण्यासाठी खडू शोधावा तर जिथे पूर्वी खडूच-खडू असायचे त्या कपाटात आज कीबोर्ड आणि माऊस होता. पण तरी कदाचित आमच्यासाठीच १-२ खडूचे तुकडे सापडलेच आणि आज इतक्या वर्षांनी त्या फळ्यावर मी सुविचार लिहिला, तीच जुनी मांडणी...आणि तीच जुनी नक्षी.  वर्तमानातील आपले वेगळे आयुष्य विसरून आम्ही सर्व आज लहान झालो होतो.पल्लवी, पिनाकीनी, स्मिता, मुकेश , केतन, विनायक...असे एकूण ६२ पैकी अंदाजे ३४ जण जमलो होतो. वयाने आम्ही मोठे दिसत होतो, स्वभावही थोडे बदलले होते, काहींची तर नावेही बदलली होती...पण तरी सर्व एकत्र आलो आणि आमचा वर्ग पुन्हा तसाच जिवंत झाला.कित्ती आठवणी... कित्ती किस्से ... जुने न उलगडलेली कोडी सोडवण्याचे खटाटोप... या सर्वांनी वर्ग गजबजून गेला होता. आज कोणी ओरडणारे, मारणारे नव्हते तरीही सर्वात मस्तीखोर वर्ग म्हणून नावारूपाला असलेला आमचा वर्ग दंगा न करता कसा  काय शिस्तीत बसला होता याचे आश्चर्य पाटगांवकर टीचर जेव्हा वर्गात आल्या तेव्हा त्यांनाही वाटले. त्या अजूनही तशाच होत्या. पुढे भागवत सर आले ते तर आमच्या वर्गाचे लाडके सर. जवळजवळ ३ वर्षे त्यांनी आम्हाला झेलले होते. आज इतक्या वर्षांमध्ये कितीतरी विद्यार्थी त्यांच्या छत्रछायेखाली वाढले असतील पण तरीही चेहऱ्यांसह नावेही अचूक आठवणीत होती...हे फक्त त्या काळातल्या शिक्षकांनाच जमू शकते. दहावीनंतर समोर हात घेऊन आज पहिल्यांदा पुन्हा एकदा प्रतिज्ञा म्हटली असेल.शब्द मनात अस्पष्ट होते पण आठवणी सुस्पष्ट होत होत्या. समोर धरलेल्या हाताने समोरच्याला त्रास देणे हा जणू एक आवडता छंद... आज पुन्हा अनुभवला. गीत आणि त्यानंतर सुरु झालेले जन-गण-मन... शेवटी 'जय जय जय हे' च्या दरम्यान होत असणारी सूर-तालांची सरमिसळ पाहता आपण आपल्या वर्गमित्रांसोबतच आहोत ही खात्री पटलीच. आणि पुन्हा शाळा सुरु झाल्याचा भास झाला. आमच्या शाळेचे खास करून मराठी माध्यमचे एक सर्वात छान वैशिष्ट्य म्हणजे इथे तुकड्या नव्हत्या. त्यामुळे अगदी नर्सरी पासून ते दहावीपर्यंत तेच वर्गमित्र. चार रो हाऊस आणि यांच्या जागा ठरलेल्या... तेही शेवटपर्यंत सोबत.... मग तो रंग तुमचा आवडता असो वा नावडता. एका बेंचवर मुलगा-मुलगी अशा जोडीने वर्षाला सुरुवातीला टीचर बसवून द्यायच्या आणि मग जसा आयुष्यभर एकाबरोबर कसाबसा आनंदात संसार थाटावा तसे जुळवून घेत, कधी भांडत , मस्ती करत अक्खे वर्ष त्या एका बेंच पार्टनर सोबत घालवायचे. कदाचित जीवनातील adjustment इथेच शिकलो आम्ही. सर्वांना पुढचा आणि मागचाही बेंच समान मिळावा म्हणून रोज एक बेंच पुढे सरकत जाणारा वर्षभराचा असा प्रवास नंतरच्या जीवनात खूप मिस केला. 

त्यानंतर आम्ही सर्व खाली मैदानात पोहोचलो. हे तेच मैदान जिथे पाऊल ठेवताच आठवली ती पाटील सरांची ड्रम आणि शिटी सोबतची कवायत , नकळत लेझीमची धून मनात वाजू लागली , खेळणारे विद्यार्थी आणि त्यांना प्रोत्साहन देणारे पाटील सर... सारे आठव मनाच्या अंगणात जणू थयथय नाचत होते. प्रत्येक वर्गाचा फोटो काढला जात होता. त्यानंतर आम्हां सर्वाना ओढ लागली ती इतर सर्व शिक्षकांना भेटण्याची. सिनिअर केजी च्या जोशी टीचर , पहिलीच्या प्रार्थना मोरे टीचर , तीन वर्षे आमच्या वर्गाला आपलेसे करणाऱ्या अनिता पाटील टीचर , गणित-विज्ञानाचा पाय मजबूत करणाऱ्या पाटगांवकर टीचर , कामाठे टीचर , विद्या टीचर , तवटे टीचर , लता टीचर, इंग्लिशची गोडी लावणाऱ्या माधुरी भांडारकर टीचर, आयुष्यभरासाठी तीन वर्षांत पुरेशी हिंदीची शिदोरी बांधून देणाऱ्या शिंदे टीचर, मराठी आणि इतिहासावर हसत-खेळत प्रेम करायला शिकवणाऱ्या साळवी टीचर असा समस्त आदरणीय शिक्षक परिवार आज आम्हा सर्वांच्या विनंतीस मान देऊन वेळात वेळ काढून येथे जमा झाला होता ... फक्त आणि फक्त आमच्यासाठी. या सर्वांना इतक्या वर्षांनी असे एकत्र समोर पाहून वाटणाऱ्या भावना शब्दांत सांगता येणारच नाहीत. त्या क्षणी काय बोलावे हेही नेमके कळत नव्हते. आम्हांला इतका आनंद होत होता तर त्या सर्वाना आपले ६५० विद्यार्थी असे पाहून किती आनंद होत असेल हे त्या प्रत्येकाचे हसरे आणि समाधानी चेहरे सांगत होते . प्रत्येकाला पुरेसा वेळ देऊन सर्वांशी हसतमुखाने संवाद सुरु होते. १९९२ ते २०२२ पर्यंतच्या ३० बॅचेस अशा इथे एकत्र जमल्या होत्या. जवळजवळ ६५० विद्यार्थी... जे न येऊ शकले त्यांनी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला होता. आपल्या शाळेतले अनेकजण परदेशात उच्च पदांवर तिथे स्थायिक झाले आहेत हे जाणून अभिमानाने मान अधिक उंचावली. आमच्या बॅचसोबतच इतर सर्व सिनियर -जुनिअर वर्गातील सर्वांना एकत्र बघून खूप आनंद झाला.... सर्वच गुरुजनांसाठी ही एक अविस्मरणीय भेट असेल. आम्हा ६५० जणांसाठी देखील हा ऋणानुबंध खूप खूप आनंदाचा आणि उत्साहाचा. आणि या सर्वांचे श्रेय जाते ते त्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी सर्वप्रथम या ऋणानुबंधाचे स्वप्न पाहिले... आम्हां सर्वांच्या मनामनांत ते रुजवले आणि आज ते हकिकतेत जिवंत साकारले. इतका मोठा कार्यक्रम इतक्या कमी कालावधीत योग्यरीतीने पार पाडणे हे एक अभूतपूर्व यश आहे. आणि ते का होणार नाही. शेवटी या सर्वांचे बीज याच शाळेत रुजले आहे. आयोजकांप्रमाणेच सर्वांनी दाखवलेली शिस्त , नम्रपणा, एकत्रितपणा, शाळेबद्दलचे प्रेम,शिक्षकांप्रतीचा आदर, वर्गमित्रांबद्दलचे भाव या सर्वांचेच हे एकत्रित फलित आहे... शेवटी काय... फादर ऍग्नेलची आम्ही मुले हुशारच. 

आज पुन्हा एकदा हे नव्याने सिद्ध झाले कि आमची शाळा म्हणजे केवळ एक ज्ञानार्जनासाठी निर्माण केलेली वास्तू नव्हती. तर ते एक स्वप्न होते उदयासाठी  एक चांगले, सुशिक्षित आणि सुजाण असे व्यक्तिमत्व घडवण्याचे. ते ज्यांचे स्वप्न होते ते फादर ओरलँडो आणि ते हकिकतेत उतरवण्यासाठी त्यांना साथ देत झटणारे आमचे मुख्याध्यापक सबनीस सर आज या जगात नाहीत पण तरी त्यांच्या विचारांचे अस्तित्व आजही या जागेत टिकून आहे... ते त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामनात आजही कुठेतरी जिवंत आहेत. आयुष्याच्या प्रवासात अनेकजण भेटतात...अनोळखी चेहरे पुढे ओळखीचे होतात...आणि कधीकधी दुर्दैवाने ते आपली साथ सोडून त्यांची एक छाप सोडून या जगातून निघून जातात. अशा आपल्यातील मित्र-मैत्रिणींना आजच्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्यासोबतचे गोड-कडू क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेले. त्यानंतर नाशिक ढोलाच्या दुमदुमत्या वातावरणात सर्व शिक्षक-शिक्षिकांना स्टेज वर मानाने बोलावण्यात आले. त्या सर्वांना आपल्या हातांनी  शाल आणि सन्मानचिन्ह देतानाही विद्यार्थ्यांचे आणि हा सत्कार स्वीकारताना शिक्षकांचेही मन अगदी भरून आले. 

कोणत्याही कार्यक्रमात इतर सर्व गोष्टींसोबतच जी एक गोष्ट कायम लक्षात राहते ती म्हणजे तेथील जेवणाची सोय. आजच्या कार्यक्रमातील जेवणाबद्दल तर बोलावे तितके कमीच. अगदी मस्त थंडगार पेय आणि स्टार्टर्स पासून ते खास मराठमोळ्या मेनू आणि आईस्क्रीम पर्यंत सर्व काही उत्तम आणि फक्त उत्कृष्ट च. तांदळाची भाकरी, ठेचा या दोन पदार्थांनीच थाळीला वेगळी शोभा आणली होती. सर्व शिक्षकांसोबत जमेल तितका अधिक संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आपल्या सोबत एका फ्रेम मध्ये आणण्याची प्रत्येकाची धडपड सुरु होती. आणि सर्व शिक्षक देखील अगदी आनंदाने या सर्वाला प्रतिसाद देत होती. आमच्या या सर्व गुरुजनांकडे पाहून एक गोष्ट मात्र आम्हां सर्वांनाच प्रामुख्याने जाणवली आणि त्या गोष्टीचे खरेच खूप कौतुकही वाटले. आणि ती म्हणजे ते सर्वच जसे २३ वर्षांपूर्वी होते अगदी तसेच आजही होते. पाटील सरांमध्ये तर मला पहिलीपासून ते कालपर्यंत या एकूण ३० वर्षांत दिसण्यात फरक जाणवलाच नाही. पाटगांवकर टीचर , साळवी टीचर ,जोशी टीचर, शिंदे टीचर, विद्या टीचर,अनिता टीचर, भागवत सर असे जवळजवळ सर्वच जण जणू वयानुसार अधिकाधिक तरुण होत होते. आणि शिक्षणासोबतच जगण्याची ही कला सुद्धा आम्हा सर्वांना हे सर्वजण पुन्हा एकदा नकळत शिकवूनच गेले. खरंच, या शाळेत जगण्यासाठी उपयोगी असे उत्कृष्ट शिक्षण तर मिळालेच पण त्याही पेक्षा जगावे कसे हे धडे वेळोवेळी मनावर गिरवले गेले. आणि कदाचित त्या संस्कारांमुळेच मी आज जी काही आहे ती आहे. खरंच अभिमान वाटतो अशा शाळेत , अशा गुरुजनांकडे लहानाचे मोठे झाल्याचा. Really feels proud to be an agrellite.  

दुपारी  ४ वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमाची अखेर १० -११ वाजता सांगता झाली. अवघ्या काही महिन्यांत दिसेनाशा होणाऱ्या त्या वास्तूला सर्वजण डोळे भरभरून पाहत होते. अगदी शेवटी मी आमच्या प्रि-प्रायमरीच्या वर्गांमध्ये डोकावून पाहिले ... तेच रंगीत छोटेछोटे बेंचेस त्याच रंगीत चित्रांनी गोष्टी सांगत रंगलेल्या भिंती. १३ वर्षांचा प्रवास सरसर करत डोळ्यांसमोरून जात होता. शाळेची ती 'U' आकारातील प्रतिमा तर कायम मनात घर करून राहील. या असंख्य आठवणींना पुन्हा एकदा सर्वांसोबत जगण्याची संधी देणाऱ्या सर्व आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार मानावेसे वाटतात. इतक्या वेगवेगळ्या वयोगटातील सर्वांना शोधून एकत्र आणणे आणि ज्याप्रमाणे आज कसलेही गालबोट न लावता हे स्नेहसंमेलन यशस्वीरीत्या पार पडले तसाच योग पुन्हा कधीतरी नक्कीच जुळून येईल या विश्वासासोबत आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींचा , गुरुजनांचा आणि खास करून आमच्या प्रिय शाळेचा निरोप घेतला... हा निरोप समारंभ फक्त बाहेरून होता...मनापासून तर आम्ही कायम तिथेच असणार होतो किंवा शाळेला मनात साठवून आपल्यासोबत घेऊन जाणार होतो. तिथे भविष्यात निर्माण होणाऱ्या नव्या वास्तूमध्ये ते कोपरे , त्या जागा अगदी तशाच दिसणार नाहीत पण तेथल्या कणाकणांत कुठेतरी आमच्या आठवणी नक्कीच सापडतील.आणि त्या शोधण्यासाठी असाच आणखी एक ' पुनःश्च ऋणानुबंध ' भविष्यात व्हायलाच हवा, हो कि नाही ? 

तुम्हांला काय वाटते ?

- रुपाली ठोंबरे.  

 

Wednesday, March 29, 2023

छावणी...एक ऐतिहासिक अक्षरानुभव

कपाळावर  टिळा आणि तळहातावर गुळाचा खडा...असे स्वागत आजकाल दुर्मिळच. यासोबतच आणखी काही दुर्मिळ तिथे असेल तर भोवतालचा परिसर . डावीकडे नजर फिरवली कि नजरेस पडत होता शिवाजी महाराजांची तिजोरी म्हणून प्रसिद्ध असलेला लोहगड आणि उजवीकडे दृष्टीस पडतो या लोहगडाच्या  संरक्षणार्थ दूरवर पसरलेल्या  विसापूर किल्ल्याचा एक उत्तुंग कडा. या दोन्ही किल्ल्यांच्या कुशीत उभे राहणे म्हणजे आपोआपच शिवप्रेम जागृती होईलच. आणि या भावनेला अधिक जागृत करत शिवरायांच्या काळात घेऊन जाणारी 'छावणी' म्हणजे खरोखर एक सुंदर अनुभव. 

छावणी...लोणावळ्यात निसर्गाच्या कुशीत, लोहगड आणि विसापूर या प्रसिद्ध शिवकालिन गडांच्या पायथ्याशी उभा राहिलेला जवळजवळ १० एकरचा भूभाग जो छावणीरूपी रिसॉर्ट म्हणून उदयास आला आहे. मुख्य दरवाजापासूनच तेथील कोपरा न कोपरा शिवकाळाची आठवण करून देतो. ज्याप्रमाणे छावणी चार भागांत विभागलेली असते त्याचप्रमाणे इथेही सैनिकी भोजनालय , मावळ्यांच्या राहण्याची सोय, राजे महाराजांचा निवास आणि पुढे इतर उपक्रमांसाठी मोकळी जागा अशाप्रकारे अगदी नियोजनपूर्वक व्यवस्था आहे. दगडाचे किंवा पितळेचे बेसिन , भोजनालयातील खास बैठक व्यवस्था , तिथले पडदे ,तांब्याचे पुरातन घंगाळ ,इतर भांडी,अडकित्ते, ऐतिहासिक मूर्त्या, चिलखत  सर्वच अभूतपूर्व...या इतक्या जुन्या वस्तू कशा काय जमवल्या असतील असा प्रश्न नक्कीच इथे येणाऱ्याला पडेल. आणि जेवण तर विचारूच नका... मराठमोळ्या मेनू सोबत इतर प्रकारचे जेवणही उत्तम मिळत होते. खास इंद्रायणी भात, भाकऱ्याही मस्तच आणि सोबत कधी तांबडा- पांढरा रस्सा तर कधी मस्त पाटवडी रस्सा . पाटावर मांडलेल्या चटण्या, ठेचा हा प्रकार मला खूप भारी वाटला.  जणू नुकत्याच त्या चटण्या वाटून वरवंटा बाजूला ठेवला आहे. भोजनाप्रमाणेच निवासी सोयही उत्तम आणि विशेष होती. बैलगाड्यांवर खास मराठमोळी रचना, तिथली प्रत्येक वस्तू पुरातन काळातली म्हणून आपल्याला नाविन्यपूर्ण भासणारी.फुलदाणी म्हणून तांब्याचा हंडा... अशी कल्पनाच कधी कोणी केली नसेल . त्या पूर्ण वास्तूमध्ये जिथेही जाऊ तिथे ज्याप्रकारे ऐतिहासिक गोष्टींचा ठेवा मांडला आहे त्यावरून त्याची रचना करणाऱ्या आर्किटेक्ट तुषार यांनी किती खोलवर अभ्यास केला असेल याची प्रचिती येते. इतकी सुंदर आणि ऐतिहासिक वास्तू निर्माण करणाऱ्या या आर्किटेक्टचे करावे तितके कौतुक कमीच.  शिवप्रेमींसाठी तिथे असलेले आणखी एक आकर्षण म्हणजे तेथील ऐतिहासिक संग्रहालय जिथे शिवकालीन शस्त्रास्त्रे , वस्तू , नाणी , मोडी लिपीतील अनेक महत्त्वाची पत्रे असे बरेच काही संग्रहित आहे जे फार दुर्मिळ आहे . 

तर पहाटे सहा वाजेपासून मुंबईतून सुरु झालेला आमचा प्रवास इथे येऊन पुन्हा नव्याने सुरु होणार होता. आम्ही म्हणजे प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालवांचे निष्ठावंत अक्षर मावळे. 'अक्षरनामा' या अनोख्या प्रयोगात्मक उपक्रमासाठी छावणीने आम्हा सर्वांना तेथे पाचारण केले होते. तसे आम्ही सर्व एकमेकांना बऱ्यापैकी ओळखत असल्याने लोणावळ्यापर्यंतचा प्रवास मस्त मजेत गेला. पुढेही छावणीपर्यंतचा खिंडीतून झालेला कार प्रवास एक छान अनुभव . ज्यांच्या नशिबात छावणीने पाठवलेली कार नव्हती त्या सर्वासाठी तर प्रत्येक चढावर पावलांनी केलेल्या प्रवासातुन मिळालेल्या आनंदामुळे हा अनुभव अधिक संस्मरणीय ठरला. प्रखर उन्हातही सो सो वाहणारा वारा सर्व काही सुसह्य करत होता .भरली वांगी, भाकरी अशा मराठमोळ्या जेवणावर ताव मारून आम्ही सर्वजण कार्यक्रमाची रूपरेषा समजून घेण्यासाठी एकत्र जमलो. ठरवून काम तर नेहमीच करतो, आज सभोवताल अनुभवून काम करायचे होते. सुरवातीला काय नक्की करायचे हे माहित नसले तरी काहीतरी भन्नाट आपल्या हातून घडणार हा विश्वास होता. ३ वाजेच्या सुमारास सर्वानी कामाला सुरुवात केली. कोरे कागद ,रंग आणि अर्थात आम्ही सर्व एकत्र आलो आणि पुर्णपणे रिकामे असे ते प्रशस्त दालन अवघ्या काही क्षणांत एका वेगळ्याच भावनांनी, सकारात्मक ऊर्जेने भरून गेले. सर्वांनी आपापल्या परीने कामाला सुरुवात केली. मोडी , देवनागरी पुस्तकांच्या पानापानांतून अक्षरे जिवंत होऊन आम्हाला उस्फूर्त करत होती. कोरे कागद आणि कॅनव्हास विविध रंगानी भिजू लागले होते. त्यावर अक्षरांनी आपली जादू मांडायला सुरुवात केली होती. पण या अशा जादूने आमचे मास्तर  भारावून शाबासकी देतील तर ते अच्युत पालव कसले! जसजसे कागद भरले जात होते आणि मनासारखे काम निघत नव्हते तसतसा सरांचा पारा चढत होता. पण  निश्चितच आम्ही सर्व मिळून काहीतरी भारी उद्याला नक्कीच करू अशा आमच्यावरच्या विश्वासामुळे सर्व काही शांतपणे सुरळीत सुरु होते. मी सुद्धा काही प्रयोग करून पाहिले...काही फसले... काही शिकले आणि शेवटी माझ्या रोजच्या लकबी प्रमाणे मोडी अक्षरांची सोनेरी चंदेरी गुंफण मी कागदावर कुंचल्याने विणण्यास सुरुवात केली.... आणि नेहमीप्रमाणे सुरुवातीला नुसतीच रेखाटलेली अक्षरे अधिकाधिक सुंदर भासू लागली. हा माझा सर्वात आवडता प्रकार असल्याने मी अगदी देह भान विसरून इतके तल्लीन झाले कि आसपास काय सुरु आहे तेही उमगले नाही. इतरांची देखील हीच कहाणी... नंतर सभोवताली पाहिले तर सर्वानीच एक सुंदर सुरुवात केली होती जी नक्कीच उद्या पूर्ण झाल्यावर एक अनुभवपूर्ण इतिहास निर्माण करणार होती. 

संध्याकाळ झाली आणि लोणावळ्याच्या त्या थंड वातावरणात या उपक्रमातील संगीतमय आणि तालबद्ध अशा सुंदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रसिद्ध कथक नृत्यांगना आरती धानिपकर आणि त्यांच्या शिष्या उमा साठे या दोघींनी सादर केलेली नृत्यमेखला ... मेघना देसाई यांचे सूत्रसंचालन आणि सुरेल गीतमालिका... अरुंधती जोशी यांच्या व्हायोलिन मधून  थेट हृदयाला भिडणारे स्वर आणि या सर्वांसोबत आपल्या चित्रकलेने कार्यक्रमात रंग भरणारे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार निलेश जाधव.... असा हा अविस्मरणीय सुंदर कार्यक्रम रंगला होता. मधुर गीतांचे बोल, व्हायोलिनची धून आणि घुंगुरांची रुणझुण कान तृप्त करत होते तर या सर्व भावना कागदावर उमटताना पाहून डोळे भरून येत होते. आम्हां प्रेक्षकांसाठी तर ही  कलात्मक मेजवानी होती जिचा शेवट अर्थात अच्युत सरांच्या कुंचल्याने व गाण्याने झाला. प्रचंड थंडीत पार पडलेला हा कार्यक्रम सर्वांच्या चांगलाच स्मरणात राहील.ती रात्र सरली... पहाटे निसर्गाच्या अदृश्य कुंचल्याने आकाशात रंगांचा खेळ मांडला होता. तोच रंग मनात साठवून आज तो परिसर कागदा-कागदांवर मांडायचा होता, रंग उधळायचे होते. 

छावणीत रंगलेल्या या अक्षरनाम्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते साकार करणारे हात खूप वेगवेगळ्या चित्रकार आणि सुलेखनकारांचे होते ज्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख होती. अक्षया , गोपाल आणि भावेश यांच्यात उत्तम बॅकग्राऊंड आणि स्ट्रोक्स निर्माण करण्याचे सामर्थ्य होते तर निलेश आणि महेश यांचा कॅनव्हासना जिवंत स्वरूप आणून देण्यात हातखंडा. तृप्ती, अमृता, श्रीकांत यांची देवनागरी वरची पकड मजबूत तर मी, केतकी, तेजस्विनी आणि  पिनाकीन आमची लपेटीदार मोडी कागदावर शिवकाळ उभा करण्यात समृद्ध.सोबत मनीषा आणि वैशाली या चित्राला वेगळेपण देण्यात उत्तम आणि या सर्वांना एकत्र आणून चित्राला पूर्णस्वरूप देण्यात सक्षम असे आमचे अच्युत सर. प्रत्येकाने आपापला नवा कागद घेऊन चित्राला सुरुवात केली खरी पण ते चित्र पूर्णत्वास जाईपर्यंत जिथे ज्याची गरज तिथे त्याची मदत घेऊन ते चित्र प्रवास करत होते. हा खरंच एक खूप सुंदर अनुभव. एरव्ही आम्ही सर्वच आपापल्या घरी चित्र पूर्ण करत असतो पण इथे ते करण्यात एक वेगळीच मज्जा होती. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, कल्पना... या सर्वांचीच येथे देवाणघेवाण होत होती आणि खूप काही नव्याने शिकायला मिळत होते. कधी न बोलता तल्लीन होऊन , कधी गाणी गुणगुणत तर कधी अगदी ओरडत, नाचत-गात ही सर्व चित्रे आकार घेत होती. सरांच्या शब्दांचे फटकारे जसे मिळत होते तसेच प्रोत्साहन देखील मिळत होते. जसजसा दिवस मावळतीला येत होता तसतसे दालनाचे रूपही पालटू लागले. जवळजवळ सर्वच कोरे कागद आता शिवतेजाने रंगले होते, रंग सारे संपत होते, स्वच्छ पाण्याच्या बादल्या रंगानी भरून निघाल्या होत्या त्यात कुंचले गर्दी करत होते. पाहता पाहता कालपर्यंत रिकाम्या भकास वाटणाऱ्या त्या दालनाला आता समृद्ध कलादालनाचे स्वरूप प्राप्त झाले होते. चित्रेही सर्वच एकसारखी नव्हती कारण ती वेगवेगळ्या हातांनी निर्माण केली होती आणि ती ही  मिळून मिसळून, त्यामुळे सारीच एकदम कडक झाली होती. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा लाल-पिवळ्या पाश्र्वभूमिवर ललकारात होती तर कुठे वीर मराठ्यांच्या शौर्याच्या गाथा उसळलेल्या तलवारीच्या पात्यांप्रमाणे तळपत होत्या. कुठे मोडी- ब्राह्मी या प्राचीन लिप्यांचा खजिना पुनर्जिवित झाला होता तर कुठे इतिहासातील घटना. कुठे बाळ शिवाजीसाठी अंगाई सजली होती तर कुठे सह्याद्रीच्या सिंहासाठी , जाणत्या राजासाठी राज्यभिषेक सोहळा,कुठे राजमुद्रा तेजाने झळाळत होती तर कुठे अक्षरांची रचना जादू करत होती ....अशी अनेक चित्रे कलादालनात शिवकाळ जिवंत करत होती. 

आज अगदी मनासारखे काम पूर्ण झाले होते म्हणून सर्वजण आनंदात...आणि मग काय ! एका मैदानात शेकोटीभोवती सारे जमले ,नाचले ...  वाद्य आणि गाण्यांची सुरेल मैफिल सजली. आसपास दोन्ही किल्ले जणू या सर्वांची साक्ष देत उभे होते. आजच्या चांदण्या रात्री साक्षीला आणखी कोणी तरी आकाशी स्तब्ध उभी होती... किती सुंदर दिसत होती ती... चमचमणारी शुक्राची चांदणी माथ्यावर चंद्रकोर घेऊन. 

तिसऱ्या दिवशी पहाटेच जोमाने कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता ३ मोठमोठाले  कॅनव्हास एकमेकांच्या साथीने अगदी ३-४ तासांत पूर्ण झाले. या नव्या कलाकृतींनी त्या कलादालनाला एक वेगळीच शोभा आणली. या चित्रांना पाहताना सर्वांचे एकत्र प्रयत्न दिसत होते आणि त्यामुळेच उत्तम टीमवर्कचे हे  एक उत्कृष्ट उदाहरण आहे असे मला वाटते . नाहीतर ३०-४० इतकी विविध वाटणारी पण तरीही  विषयाला धरून असणारी अशी  चित्रे केवळ २ दिवसांत साकार करणे ... अशक्यच . आणि हा अनुभव अभिमानास्पद वाटतो. 


गेले तीन दिवस छावणीत येणाऱ्या इतर पर्यटकांसाठी सुद्धा आमची ही कार्यशाळा एक विशेष आकर्षण ठरली. लहान मुले कौतुकाने अक्षरांचा आनंद घेत होती...मांडण्याचा प्रयोग करत होती. इतका सुंदर आणि वेगळाच कार्यक्रम आयोजित करून आम्हाला येथे निमंत्रित केले त्यासाठी खरेच सर्व आयोजकांचे खूप आभार मानावेसे वाटतात. आणि आमच्यावर विश्वास ठेवून अक्षरांचा झेंडा फडकवण्यासाठी येथे सर्वाना एकत्र आणणाऱ्या अच्युत पालव सरानी नक्कीच एक संस्मरणीय अनुभव दिला यात शंकाच नाही. दुपारी छावणीचा निरोप घेतला पण आपली अक्षरे तिथेच नांदतील आणि तेथे येणाऱ्या अनेकांना आनंद देत राहतील या भावनेने एक वेगळेच समाधान वाटत आहे. आम्हा सर्वांना येथे बोलावून हा अनुभव देणारे आर्किटेक्ट तुषार आणि छावणीचे सर्वेसर्वा उदय जगताप यांचे मनापासून आभार. आजच्या मॉडर्न काळातही इतिहासाला जागवणारे आणि इतरानाही हा ऐतिहासिक अनुभव देणारे तुम्ही दोघेही धन्यच. छावणीची ही कल्पनाच किती अनोखी आहे. लोहगडापाशी असलेल्या या छावणीचा  अनुभव घेत असताना अगदी मनापासून माझ्या मनात निर्माण झालेली एक इच्छा अशी होती कि जर अशा छावण्या महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्याच्या पायथ्याशी निर्माण झाल्या तर गड पर्यटनात वृद्धी होईल, अगदी थोरांपासून लहानांपर्यंत सर्वांच्याच मनात शिवकार्य, स्वराज्याभिमान जागृत होईल आणि नक्कीच या शिवप्रेमाने प्रत्येक गडालाही पुन्हा जाग येईल आणि कदाचित शिवकाळ पुनर्जीवित होईल. गडकिल्ल्यांचा महाराष्ट्र मग खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. 

आज आम्ही या ऐतिहासिक ठिकाणी राहून काम करून खरंच  कृतकृत्य जाहलो....... असा योग पुन्हा पुन्हा येत राहावा ही  सदिच्छा. 

- रुपाली ठोंबरे.