अक्षरयज्ञ ६
अक्षरयज्ञ...रोजच्या धकाधकीच्या जीवनाला स्वल्पविराम देऊन एखाद्या शांत ठिकाणी तीन दिवस एकत्र येऊन नाट्य , नृत्य , संगीत अशा कलांच्या माध्यमातून जागृत होणाऱ्या भावनांच्या खोल डोहातून चिंब भिजलेल्या कल्पनांच्या कुंचल्याने मनावर , हृदयावर विविध भावरंगांचे चित्र रंगवत नव्याने अक्षरांचा शोध घेण्याची संधी देणारा, सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुरु केलेला एक अनोखा उपक्रम. येताना कॅलिग्राफी किंवा सुंदर चित्र यायला हवे अशी अट मुळीच नसते पण जाताना प्रत्येकजण स्वतःतील रंग शोधत आपले मनातले चित्र सोबत नक्कीच घेऊन जातो. म्हणूनच अभियांत्रिकी , वैद्यकीय , वाणिज्य , कला अशा अनेक क्षेत्रांतील सर्वांनाच हा यज्ञ आपलासा वाटतो. २००७ सालापासून सुरु झालेला हा अक्षरयज्ञ आजपर्यंत सुरु आहे. प्रत्येक वेळी नवी संकल्पना ... नवा सहभाग... नवे मार्गदर्शक ....नवी सत्रे ...,परंतू येणारा अक्षरानुभव प्रत्येक वेळी तितकाच दिव्य....मी दोनदा ही कार्यशाळा अनुभवली आहे. २०१६ साली नवरसांच्या संकल्पनेतून घेतलेली अनुभूती अविस्मरणीय होतीच ... पण यावर्षी त्यावर नव्याने भावचित्रे कोरली गेली. आणि या चित्राची व्याप्ती इतकी प्रचंड होती कि जणू त्यासाठी हे मन अपुरे पडत आहे असे वाटत आहे.
अक्षरयज्ञ ६....२४ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु झाला...आणि मग पुन्हा एकदा तीच पायरी ...नक्की काय करायचे या विचारात भांबावलेले सर्वांचे चेहरे ...तरी त्यावर तोच उत्साह... साधारण तीच व्यवस्था... पण सभागृहात पाऊल ठेवता क्षणी एक वेगळेपण प्रकर्षाने नजरेत आले. पूर्वी ज्या ठिकाणी 'अक्षरयज्ञ' ची भव्य उभी कलाकृती स्वागतास सज्ज होती, ती आज यज्ञकुंडाच्या रूपात आडवी रचलेली होती. अक्षरे तीच... उभी अक्षरे जमिनीवर अंथरली की त्याचे स्वरूप कसे बदलते हा पहिला धडा शब्दांविना अच्युत सरांनी कल्पकतेने शिकवला. या अनोख्या कार्यशाळेचे उदघाटनही विलक्षणच. मेधा गोखले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वरांतील रामदास स्वामी लिखित 'दासबोध' ग्रंथातील मंत्रांच्या उद्घोषात वातावरण अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे संचालक डॉ . जयंत पाटील यांनी त्या यज्ञकुंडात अक्षरांची आहूती देत अक्षरयज्ञ कार्यशाळेचे खऱ्या अर्थाने उदघाटन केले .त्यापाठोपाठ सर्व अक्षरप्रेमी या यज्ञात सहभागी झाले.प्रत्येकाच्या हातातील अक्षरे वेदीत समर्पित होत असताना 'ब्राह्मणे बाळबोध अक्षर' या शब्दोच्चारांनी वातावरण अक्षरमय झाले... सोबत पालवांची अक्षरे होतीच..."अक्षराणाम आकारास्मि ।"
सुलेखनकारांची कार्यशाळा म्हणजे कागद आणि शाई आलीच. पण कार्यशाळा सुरु झाली ती या मूलभूत गरजांविना...कारण यावेळी संकल्पना होती ,"Caligraphy Beyond Ink & paper ". प्रख्यात थिएटर कलाकार अतुल पेठेंनी पहिल्या सत्राची कमान हाती घेतली आणि तत्क्षणी आम्हा सर्वांसाठी तो सभागृह म्हणजे एक प्रचंड मोठा कॅनव्हास म्हणून समोर अंथरला गेला ज्यावर आज आम्ही आपले भावरंग भरणार होतो.अतुल पेठेंच्या मार्गदर्शनाखाली अनेक भावनिक आणि शारिरीक हालचालींना वेग आला... कधी वस्तूंची फुले झाली तर कधी आम्हीच स्वतः फुलात विलीन झालो. अगदी शुल्लक वाटणाऱ्या गोष्टींतून काय किमया घडू शकते याची प्रचिती आली. आयुष्य खरेच खूप सोपे असते पण आपण उगाच त्याला कठीण बनवत राहतो. जे स्वतःकडे आहे ते दुर्लक्षित केले आणि जे नाही त्याच्यासाठी रडत राहिलो, त्यामागे पळत राहिलो तर जीवनाचा कॅनव्हास आणि रंग प्रत्येक क्षणी अपुरेच भासतील, पण त्याउलट जे रंग आज आहेत त्यापासून सुरुवात करत मनातली प्रत्येक भावना आपल्या पूर्ण क्षमतेने मांडण्यास सुरुवात केली तर प्रत्येकात परमेश्वराने ती क्षमता दिली आहे की तो स्वतःच्या जीवनाचा कॅनव्हास स्वतः कल्पकतेने सुंदररित्या परिपूर्ण करण्यास समर्थ आहे. फक्त प्रत्येक गोष्टीत आनंद मानला पाहिजे...धीर असावा...आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास. हे सर्व शिकवणारी कार्यशाळाही असू शकते हे आज अतुल सरांसोबत दिवस घालवल्यावर जाणवले. आणि हे शिकलेले नक्कीच पुढचे आयुष्य घडवण्यात मदत करेल. अतुल पेठे जसे श्रेष्ठ तशीच त्यांची टीम सुद्धा ग्रेट आहे. स्वर - ताल - शब्द - लय - भाव या सर्वांचा एकत्र संगम आणि त्यातून 'अ' या एका अक्षराची शक्ती आज 'अक्षरनाट्य' या संकल्पनेतून अनुभवली. सुप्रसिद्ध कथक नर्तिका ऋजुता सोमणचे नृत्य आणि त्यातून निर्मिलेला 'अ'कार.... बंदिश रचना करून गाणाऱ्या शीतल ओर्पे -भद्रेने मेघमल्हारात रचना करून सादर केलेली 'अ'ची बंदिश ...प्रयोगशील वादक उमेश वारभुवनची सुरेल तालवाद्य मैफिल आणि यासोबत अतुल पेठे सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली उत्कृत्ष्ट कलाकृती-'अक्षरनाट्य'....निःशब्द! शेवटी 'अ' ची विविध रूपे अभिव्यक्त करताना आम्हां सर्वांनाही या 'अ' मध्ये सामावून घेऊन सर्वानी मिळून जो चिल्ला केला तो अत्युच्च आनंददायी क्षण... केवळ अद्भुत, अतुलनीय आणि अवर्णनीय.
ती पहिली संध्याकाळ 'डॉट टू डॉट' या माझ्या संकल्पनेसाठी सुद्धा स्मरणीय ठरली. या संकल्पनेचे पुस्तकरूप सर्वांसमोर मांडले गेले जेणेकरून या बिंदूची व्याप्ती अधिक वाढून इतरांनाही त्या कलाकृतींचा आस्वाद घेता यावा. गजानन जोशी आणि अच्युत सर यांच्या हस्ते या शुभकार्यास प्रारंभ झाला. हिरल भगतने प्रख्यात कवी निरंजन भगत यांच्या गुजराती भाषेतील मुंबई शहरावर लिहिलेल्या कवितांना अक्षररूपात अतिशय कल्पकतेने मांडले. ते पाहता मनात आणले कि कवितेतील शब्द न शब्द शरीरात भिनला तर कागदावर मोठी जादू घडू शकते हे जाणवले. त्यानंतर या कार्यशाळेसाठी खास श्रीलंकेहून आलेल्या अमीर फैसल यांनी त्यांची जी अरेबिक आणि सिंहली भाषेतील सुलेखन कला सादर केली, ती पाहून अक्षरांचे रूप भाषेसोबत कसे बदलत जाते याचा प्रत्यय आला. भाव आणि अर्थ एकच पण लिपी वेगळी... अगदी एकाच लिपीत वेगवेगळ्या प्रकारे एकच शब्द मांडला तरी किती वेगवेगळी आवर्तने निर्माण होतात हे प्रत्यक्ष पाहावयास मिळाले. श्रीकांत या आमच्या सहकलाकाराने नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय सुलेखन कार्यशाळेचा आस्वाद घेतला होता. जगातील चार प्रख्यात सुलेखनकारांच्या कामातून आणि मार्गदर्शनातून त्याच्या कार्यात किती बदल झाला हे पाहायला मिळाले. रोमन भाषेत वापरल्या गेलेल्या विविध तंत्रांचा जेव्हा भारतीय लिपीत योग्य प्रकारे वापर होतो तेव्हा चित्राचे स्वरूप किती वेगळ्या पद्धतीने पालटू शकते हे त्याच्या कामांतून निदर्शनास आले. कधीकधी तेच तेच काम करत असताना नवे काही प्रयोग त्याच अक्षरांवर करत राहिले पाहिजेत. त्याचा सुलेखन क्षेत्रातील हा अनुभवप्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्याप्रमाणेच व्यवसायाने इंटेरिअर डेकोरेटर असलेल्या संजीव जोशी यांनी आपली कला सर्वांसोबत सादर करत व्यापारीदृष्ट्या सुलेखन कलेला किती वाव आहे आणि आपण काय केले पाहिजे हे अगदी समर्पकरित्या दाखवून दिले. अक्षरांची मांडणी एका सामान्य माणसासोबत, त्याच्या भावनांसोबत जोडली गेली तर त्या भिंती सुद्धा बोलक्या होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणून अक्षरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन मनोमन पटला.
दुसरा दिवस सुरु झाला तो प्रख्यात कथक नृत्यांगना , सुंदर अभिनेत्री तन्वी पालव हिच्या नृत्यासोबत.आज कागदावर काम करायचे होते म्हणून सर्वच फार उत्सुक होते. अतुल पेठे सरांच्या कार्यशाळेतुन प्रेरित झाल्यानंतर काम करण्याची उत्सुकता आता वाढली होती. जसे कोरे कागद समोर अंथरले होते तशी मने आता नवीकोरी झाली होती. आजपर्यंत शिकत आलेल्या अक्षरांचा तोच तोचपणा आता फिका वाटू लागला होता. मनातली पाटी कोरी होत चालली होती... नव्या भावनांना व्यापण्यासाठी. तन्वीच्या प्रत्येक आविष्कारासोबत वेगळा भावरंग कागदावर ओसंडत होता. तिची पावले समोरच्या व्यासपीठावर कमी आणि मनःपटलावर अधिक राज्य करू लागली... तीच आता कागदावर उमटत होती. तिच्या प्रत्येक गिरकीसोबत कलाकृतीची वळणे आता वेगळेपण आणण्यात यशस्वी होत होती. २०१६मध्ये तन्वीचा एक नृत्याविष्कार पाहून मी तिची फॅन तेव्हाच झाले होते पण आज जवळजवळ २-३ तास ती सोबत होती. तिची प्रत्येक मुद्रा, अविर्भाव मनात एक नवे चित्र निर्माण करत होते. खरे तर त्यानंतर या चित्रांसोबतच कथक शिकण्याची एक नवी प्रेरणा मनात जागृत झाली.
प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार यांचे तेथे येणे आणि २ दिवस तो सहवास लाभणे हे केवळ स्वप्नवत वाटत आहे. सर्वांप्रमाणे मलाही संगीत खूप आवडते. माझे प्रत्येक चित्र संगीताच्या सहवासात जन्म घेते. पण तरी मला कविता किंवा गाण्याचे सुलेखन करणे फार कठीण वाटायचे. नेहमी प्रश्न पडायचा कि हे कसे शक्य करावे. पण आज मला कळले कि माझा प्रयत्न फक्त त्या शब्दांना शाईमध्ये बंदिस्त करून कागदावर मांडण्याचा असायचा...त्यामुळे कदाचित मी हे करताना अयशस्वी ठरले असेन.आज उमगले कि त्या शब्दांना बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना अजून मुक्त करावे... इतके कि ते गाणे अंगभर संचारावे... आणि त्यानंतर क्षणात होणारी निर्मिती खरंच अकल्पनीय असेल. आज मी खऱ्या अर्थाने गाणे कसे ऐकावे हे शिकले. आणि नक्कीच या संगीत सहवासातून निर्माण झालेली ऊर्जा आयुष्यभर आम्हां सर्वांना प्रेरित करत राहील.
रात्री अशोक परब सरांनी अच्युत पालव सरांसोबत मारलेल्या गप्पा हे या ३ दिवसीय कार्यशाळेतील एक विशेष आकर्षण होते. अच्युत सरांचा जीवनप्रवास प्रत्येक वेळी ऐकताना नाविन्यपूर्ण वाटतो. प्रत्येक वेळी नवे काही शिकवून जातो , नव्याने पुन्हा पुन्हा प्रेरित करतो. त्यांची शिष्या असल्याचा अभिमान नव्याने जागृत होतो.
शेवटचा दिवस जसा उजाडला तसा कार्यशाळेबद्दलचा उत्साह द्विगुणित झाला होता. आज योगेश तळवलकरांचे सत्र सुरु होताच त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख सर्वांसमोर फारच नाट्यमय रूपात करून दिली. योगेश हे एक उत्कृष्ट UX Designer आणि Ergonomist तर आहेतच पण सोबतच एक उत्तम थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहेत. मी सुद्धा सॉफ्टवेअर क्षेत्रातील असल्याने मला त्यांच्या कार्यशाळेत विशेष रुची होती . आणि खरंच खूप काही माहित असूनही अगदी नव्या पद्धतीत बरेच काही शिकायला मिळाले. तंत्रज्ञान आणि कलात्मकता कशी एकमेकांना पूरक ठरते हे पाहायला मिळाले. आपण निर्माण केलेल्या कलाकृतीचा प्रेक्षकावर किती आणि कशा पद्धतीने प्रभाव पडेल याची कल्पना निर्मितीपूर्वी करणे हे काहीवेळा किती गरजेचे आहे हे समर्पकरीत्या समजावले गेले.अगदी एक पत्र लिहिताना समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा विचार करत कमी शब्दांत, योग्य रचना केल्यास ते उद्दिष्ट सफल होते. आणि शेवटचा उपक्रम म्हणजे installation. काल काहीसा तसाच प्रकार भिंतींच्या आतल्या वस्तू गोळा करून केला गेला आणि आज भिंतींपलीकडल्या जगातील वस्तू गोळा करून कलाकृती निर्मिती झाली . दोन्ही प्रकारांत साम्य हेच की दोन्ही करताना एका उत्कृष्ट कलाकृतीसाठी कल्पकता ,मेहनत आणि मांडणी सोबतच टीमवर्कचा किती मोठा वाटा असतो हे अनुभवले. 'काळ्याची निळी जखम'...वरवर नकारात्मक वाटणारे हे वाक्य किती सकारात्मक आहे हे काम करताना जाणवले. प्रत्येक ग्रुपने कलात्मक रित्या हा सारखाच विचार कितीतरी वेगळ्या पद्धतीत मांडला. सुरुवातीला कठीण, अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा किती सोप्या पद्धतीत मांडता येऊ शकते हा आयुष्यातील खूप मोठा धडा इथे मिळाला.
अशी ही तीन दिवसीय अक्षरयज्ञ कार्यशाळा...शेवटी प्रमाणपत्र हाती घेताना आज संपत आहे याची जाणीव प्रकर्षाने जाणवली. ही कार्यशाळा म्हणजे नियमित होत असलेल्या सुलेखन कार्यशाळांपेक्षा खूप वेगळे काही देऊन जाणारी होती. Calligraphy म्हणजे केवळ चांगले, सुंदर वेगवेगळ्या स्क्रिप्टमध्ये लिहून मांडणे नक्कीच नाही. पण दुर्दैवाने आज सगळीकडे हेच पाहावयास मिळत आहे. भावना शब्दांतून , रंगांतून, रचनांतून समोर मांडणे ही खरी कला आहे.आणि हेच या चौघांपैकी प्रत्येकाने दाखवून दिले.सुलेखन करताना केवळ अक्षरे कागदावर मांडणे हा हेतू नसून ती अक्षरे त्या कागदाच्या व्यासपीठावर अशा प्रकारे खेळवावीत कि जेणेकरून पाहणाऱ्याच्या अंगावर रोमांच येतील. चांगली असो वा वाईट, त्या भावनेत खोल बुडून गेलो कि अक्षरे जिवंत होऊन स्वतःच बोलतील...ही कला अवगत करण्यासाठी नाटकांशिवाय दुसरा पर्याय नाही. अतुल पेठेंनी शारिरीक हालचाली आणि आपल्यातील कल्पकता यातील नाते खूप सुंदररित्या समजावले. ऋजुताची पावले थिरकत पावलांखाली 'अ' ची प्रतिकृती साकारत असताना नजर मात्र आकाशाकडे होती. यावरून अक्षरे कागदावर उमटतात ती मनातून हे सत्य समोर आले. कोणताही आकार चितारताना मनात ती कलाकृती आधी आकार घेते. कौशल इनामदार त्यांच्यासोबतच्या गप्पांतून आम्ही एक वेगळीच मैफिल अनुभवत होतो. एखाद्या कलेबद्दल ओढ निर्माण झाली की त्या कलेच्या प्रत्येक अंगावर प्रेम करतो तो खरा कलाकार, त्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी इतरही कला कशा प्रकारे साथ देतात हे जाणून ते आचरणात आणायला हवे , आयुष्यातले कोणते क्षण कधी इतर क्षणांना फुलवतील याचा अंदाज कोणालाही बांधता येत नाही... त्यामुळे मनात भाव उत्पन्न झाले कि ते रंग उधळत राहावे... योग्य सांगड आज करणे अशक्य नसल्यास त्याला अंतरीच्या कुपीत खुशाल ठेवावे.... हेच सर्व आज प्रत्येकाने इथे मांडले. इथे आत्मसात केलेला प्रत्येक संस्कार मनात खोलवर रुजला... आयुष्यभराची कलात्मक शिदोरी आहे ती. इतर सर्व कला , तंत्र शिकवणारे साहित्य सगळीकडे ढीगभर उपलब्ध आहे. पण भावनांना जागृत करून नवनिर्मितीसाठी प्रोत्साहित करणारी कला शिकवणारी कार्यशाळा क्वचितच उदयास येते.अक्षरांना रंगभूमी, नृत्य आणि संगीत यांच्या सर्जनशील संगमामुळे जो एक अभूतपूर्व आयाम निर्माण झाला तो 'ह्याची देही ह्याची डोळा' अनुभवता आला हा फक्त माझ्याच नव्हे , तर उपस्थित तमाम सन्मित्रांच्या आयुष्यात एक चिरंतन मूल्यरोप लावून गेला. आम्ही या तीन दिवसांत काय काम केले हे आज कदाचित दाखवता येणार नाही पण इथे इतकी ऊर्जा नसनसांत भिनली आहे जी यापुढील प्रत्येक कलाकृतीत आपली छाप सोडून जाईल. कार्यशाळा असावी तर अशी... फक्त एका कामात नव्हे तर संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी.
निघता निघता या कार्यशाळेतून काय घेऊन चालले आहे असा विचार करता आजपासून पुढच्या आयुष्याचा कार्यक्रम मन नकळतच आखत असल्याचा भास झाला. ज्याप्रमाणे कथक शिकण्याची इच्छा येथे व्यक्त झाली त्याचप्रमाणे नाट्य आणि संगीत कार्यक्रमांना हजेरी लावण्याची गरज लक्षात आली. आणि हे सर्व स्वतःतली सुलेखन कला अधिक फुलवण्यासाठी.डोळ्यांसमोर दिसणारी अक्षरे आता नुसतीच रेखीव नव्हती तर ती भावनांचा साज चढवून जिवंत भासत होती. या अक्षरांना कागदावर थिरकते करण्यास मन आतुरले होते. या कार्यशाळेतून आणखी काही मनापासून घेऊन जाण्यासारखे असेल तर 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी' येथिल स्वादिष्ट जेवणाची आजही जिभेवर रेंगाळत राहिलेली ती चव. मनाला चेतना देणारा शांत परिसर जितका सुंदर तितकीच तिथली व्यवस्थाही उत्कृष्ट.अशा एकमात्र कार्यशाळेसाठी हेच प्रेरणादायी स्थान अनुरूप आहे. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात निसर्गाच्या कुशीतील असा निर्मळ निवांतपणा... केवळ स्वप्नवत!
त्यादिवशी कार्यशाळा संपवून घरी परतत होते तेव्हा अनाहूत पावसाची रिमझिम सुरु होती. चालता चालता वाटेतल्या एका चहाच्या टपरीवरील चहाच्या सुगंधाने मन वेधून घेतले... नकळत कौशल सरांचा आवाज मनात रुंजी घालू लागला... त्या पागोळ्यांआडून एक सुंदर आठवण मनाचा वेध घेत होती... पावले घराची वाट चालत होती परंतू मन त्याच मुग्ध अक्षरमयी वातावरणात रममाण होते.
- रुपाली ठोंबरे .
No comments:
Post a Comment