आज २२ जानेवारी २०२४...एक अभूतपूर्व दिवस.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांना आजच्या दिवशी यश आले आणि भव्य दिव्य श्री राम मंदिर अयोध्येमध्ये रामाच्या मूळ जन्मस्थानी उभे राहिले . आज खऱ्या अर्थाने देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे.'श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली... ' या गीताचे बोल नसनसांत संचारले होते. भगव्या रंगात आणि रामनामाच्या जयघोषात अवघा देश आनंदमय झाला आहे. सगळीकडे श्री राम भजन, प्रदर्शन , प्रवचन , कला सोहळा अशा अनेक माध्यमांतून जनमानसांत अवतरत आहेत. असाच एक सुंदर माहितीपूर्ण,कलापूर्ण उपक्रम - 'अक्षर राम ' अनुभवण्याचे भाग्य आम्हांस लाभले आणि आम्ही धन्य जाहलो.
ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था आणि संस्कृत -संस्कृति - संशोधिका आयोजित 'अक्षरराम' सोहळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे कै. डॉ . ग. न. साठे यांनी भेट दिलेल्या विविध भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ रामायण ग्रंथांचे प्रदर्शन. पुण्यात सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी, उपासना मंदिर येथे २० जानेवारीपासून पुढे ३ दिवस चालणारे हे प्रदर्शन म्हणजे रामभक्त , साहित्यिक , कलाप्रेमींसाठी ज्ञानाची शाब्दिक मेजवानीच. नावातच 'अक्षरराम' असलेल्या कार्यक्रमात भारतातील सुलेखन क्षेत्रातील अत्युच्च स्थानावर असलेल्या अच्युत पालव यांचा सहभाग नाही असे कसे होईल. आणि सरांना येथे सुलेखनातून राम साकारण्यासाठी निमंत्रण मिळाले. आणि धन्य आम्ही ज्यांना आमच्या गुरूमुळे यात सहभागी होण्याची संधी लाभली.
पहाटेच मुंबईहून पुण्यासाठी आमची पूर्ण टीम अगदी उत्साहात रवाना झाली. धनुष्यधारी श्रीरामाच्या सुरेख रांगोळीने पोहोचताच आमचे स्वागत केले. स्वादिष्ट न्याहारीच्या आस्वाद घेऊन आम्ही मूळ दालनात पोहोचलो. प्राचीन काळातील वाडा वाटावा अशा त्या शाळेच्या परिसराने आणि विद्यार्थ्यांच्या वावरामुळे आम्ही भारावून गेलो. तिथे प्रदर्शित केलेले ग्रंथ वाङ्मय पाहून तर मोहित झालो . १५ देशांतील, १८ विविध लिपींमध्ये , ३४ भाषांमध्ये लिहिली गेलेली रामायणांची सुमारे २५०० पुस्तके तिथे उत्तमरीत्या मांडण्यात अली होती. अगदी कालपरवाचीच गोष्ट... व्हॅट्सऍप वर कुणीतरी पाठवलेले संपूर्ण रामचरितमानस pdf स्वरूपात पाहिले आणि जाणवले ,'रामायणाची कथा किती मोठी आहे आणि आपल्याला किती कमी माहित आहे, हे आता वाचायला हवे लवकरच.' परंतू येथील रामग्रंथांचा व्यासंग पाहून तर शब्दच हरवले जणू. तेथे उपस्थित शिक्षक प्रत्येक ग्रंथ माहितीपूर्ण पद्धतीने समजवण्यास खूप सक्षम असल्याने प्रदर्शन पाहण्यास अति रुची निर्माण झाली. आणि या प्रदर्शनातील पुस्तकांचे विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकातील रामायण , त्यातील कथा , पात्रांचा वावर अतिशय वेगळा पण अंत एकच. रामानंद सागर यांच्या कृपेमुळे जे रामायण आम्ही लहानपणापासून पाहत आलो तेच रामायण असे सुरुवातीला वेगळ्या स्वरूपात मनाला पटवून देणे खूपच कष्टमय , पण समोर शेकडो वर्षांपूर्वी रचलेली पुस्तके ते पटवून देण्यास समर्थ ठरत होती.डॉ . ग. न. साठे यांनी त्यांच्या अभ्यासक्रमासाठी रामायण हा विषय निवडला आणि हा पुस्तक संग्रह आज सर्वांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यांनी हे सर्व अभ्यासून स्वतःच्या अक्षरात जवळजवळ ८ मोठमोठ्या खंडांत या सर्व २००० पुस्तकांचे सार रचले आहे. मोत्याच्या अक्षरांतील हि भव्य हस्तलिखिते एक अमूल्य ठेवा आहे. भाषा , प्रदेश , लिपी या सर्वाना ओलांडून रामाबद्दलची प्रत्येकाची आस्था नव्याने आम्ही अनुभवत होतो. हे सर्व निरखून पाहण्यास १ वर्ष देखील कमी पडेल.
त्यानंतर १० वाजता आम्ही सर्व अक्षरराम सुलेखनातून मांडण्यासाठी सज्ज झालो. ५ x ५० फूट असा कोरा कागद त्या दालनात मध्यभागी अंथरला गेला. अवतीभवती , वर प्रत्येक मजल्यावर मोठा कलासक्त वर्ग जमला होता. एका बिंदूपासून सुरुवात करत अच्युत पालव यांनी जय श्री राम साकारला. आम्ही त्यांचा शिष्यवर्ग तिथे प्रत्येक कामासाठी सज्ज होतो. त्यानंतर रामगीतांच्या आणि जनमानसातून होणाऱ्या रामनाम जयघोषातुन ऊर्जामयी त्या मंत्रमुग्ध वातावरणात अच्युत सरांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरांत एक श्लोकी रामायणाच्या चार ओळींनी सबंध कागद राममयी केला. त्या ओळीसुद्धा आजवर कधी न ऐकलेल्या परंतु आज एक खूप मोठा आनंद इथे देऊन गेल्या ...
आदौ रामतपोवनादि गमनं ,
हत्त्वा मृगं कांचनं ,
वैदेहीहरणं जटायूमरणं
सुग्रीव संभाषणं
वाली निग्रहणं समुद्रतरणं
लंकापुरी दाहनं
पश्चाद रावण कुंभकर्ण हननंएतद्धी रामायणम ll
- रुपाली ठोंबरे
No comments:
Post a Comment