एक गोष्ट मनात ठेवून एखाद्या ठिकाणी जावे , आणि येताना विचार केलेल्या पेक्षाही काही वेगळे सोबत घेऊन यावे.
असे अनेकदा घडत असते. अगदी असेच काहीसे माझ्यासोबतही घडले. दोन दिवसांपूर्वी विक्रांत शितोळे सरांचे जलरंग चित्रांचे प्रदर्शन - 'chasing Charm - Bundi chapter ' जहांगीर येथे सुरु झाले. त्या उदघाटन कार्यक्रमाला जाण्याचा योग जुळून आला आणि एका खूप चांगल्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळाली. त्यांचे जलरंगातील काम अफाट आहे. कलाकृती साकारण्यासाठी जलरंग हे माध्यम सर्वात आव्हानात्मक आहे असे मला नेहमीच वाटते त्यामुळे त्या कामाबद्दलचा आदर आपसूकच वाढला.
चित्रसौन्दर्य आणि कलाकौशल्य यामुळे तर मी प्रभावित झालेच होते पण एक विशेष गोष्ट मनाला भावली ते या प्रदर्शनाच्या विषयाबद्दल. या प्रदर्शनाचा मुख्य गाभा म्हणजे 'बुंदी'. बुंदी नावाचे एखादे शहर भारतात अस्तित्वात आहे याबद्दल खरेच मला तत्पूर्वी अजिबात ज्ञात नव्हते. कदाचित या बाबतीत आपले भौगोलिक ज्ञान नक्कीच कमी असावे . परंतु एखाद्या नामवंत कलाकाराने असे शहर आपल्या प्रदर्शनातून मांडणे म्हणजे नक्कीच त्या जागेचे खूप मोठे वैशिष्ट्य असावे. आणि यातूनच माझ्यातील विद्यार्थिनी जागृत झाली आणि नवे काही जाणून घेण्यासाठी मी अधीर झाले. सध्या तरी गूगल या आपल्या प्रिय मित्राच्या माध्यमातून माझे शोधकार्य सुरु झाले आणि जसजसे वाचत गेले तसतसे खूप काही नवनवीन उमजत गेले.
बुंदी...राजस्थान राज्यात वसलेले हे शहर उत्तम स्थापत्यकला आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. इतकेच नव्हे तर तेथील असंख्य पुरातन मंदिरांमुळे हे शहर 'छोटी काशी' या नावाने ओळखले जाते. प्राचीन काळात सभोवताली असलेल्या मीना जमातीच्या वस्तीमुळे बुंदी शहर 'बुंदा मीना' या नावाने ओळखले जायचे. त्यानंतर कित्येक वर्षे हाडा -चौहान राजवंशाचे वर्चस्व असलेल्या या ठिकाणी अगदी पाषाण युगातील साधने आढळली आहेत असा इतिहास नमूद आहे.
अरवली पर्वतरांगांमध्ये अगदी उंचावर उभा असलेला 'तारागड' किल्ला त्या काळातील अविश्वसनीय तंत्रज्ञानाचा एक उत्तम नमुना आहे. सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असलेली 'बुंदी' महालातील भव्य भित्तिचित्रे आजही पाहणाऱ्याच्या मनात एक विशेष जागा निर्माण करण्यात सक्षम आहेत. मंदिरांसोबतच येथील प्रमुख आकर्षण म्हणजे पायरी विहीर. येथे जवळजवळ ५० हुन अधिक पायऱ्यांच्या विहिरी आहेत. आजही सुस्थितीत असलेली 'राणीजी कि बावडी' ही त्यांपैकीच एक. शहराच्या मधोमध असलेले वरूण देवाचे मंदिर आणि 'नवसागर' हा मानवनिर्मित तलाव, सुख महाल ,चौरासी खंबोंकी छत्री , केदारेश्वर शिव मंदिर, जैत सागर तलाव , अभयनाथ मंदिर, कृष्ण जीवनातील हडोती शैलीतील सूक्ष्मचित्रांनी सुसज्जित चित्रशाळा, हजारो वर्षांपूर्वीची पाषाणकला दर्शवणारी १०० हुन अधिक ठिकाणे, राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारक असा दर्जा प्राप्त झालेली 'महान सीमा भ्रंश' ही सत्तूर जवळची जागा अशी एक ना अनेक प्रेक्षणीय स्थळे असलेले हे बुंदी शहर का बरे राजस्थान पर्यटनाच्या यादीत सामील नाही असा क्षणभर मनात विचार आला.
अशाप्रकारे या प्रदर्शनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या उत्कंठेतून आणि पुढे केलेल्या वाचनातून बुंदी शहराची व्याप्ती मनात कोरली गेली. त्या चित्रांमध्ये बुंदीतील रस्ते , इमारती , भिंती, जीवनशैली यांचे सुंदर चित्रण आहे.उत्तम रंगसंगती आणि सविस्तर मांडणी यांचा सुरेख मेळ साधला आहे. परंतू तरी एक वैशिष्ट्यपूर्ण जाणीव झाली ती म्हणजे तिथे केवळ रेखाटून रंगवलेली चित्रे नव्हती तर आपला लूप्त होत जाणारा इतिहास , एक संस्कृती पुन्हा नव्याने प्रकाशात आणून जिवंत ठेवण्याचा एक निस्वार्थ प्रयत्न दिसून आला. माझ्यासारख्या नवोदित कलाकारासाठी हे अतिशय प्रेरणादायक आहे. फक्त चित्रे पाहून ती चित्रे जिवंत अनुभवण्याची इच्छा प्रेक्षकाच्या मनात उत्पन्न व्हावी यात नक्कीच त्या कलाकाराची मेहनत , विषयाचा विस्तृत अभ्यास आणि प्रामाणिकपणे सत्य मांडण्याची कला सामील आहेत... आणि हेच कोणत्याही कलाकारासाठी आणि त्या कलाकृतीसाठी मिळालेले खूप मोठे यश. विक्रांत सरांचे मला विशेष आभार मानावेसे वाटते असा अभूतपूर्व अनुभव दिल्याबद्दल.
माझ्या या थोड्याफार प्रमाणात वरवर केलेल्या अभ्यासानंतर ते प्रदर्शन पाहताना नक्कीच पुन्हा एक वेगळा अनुभव येईल. अजून पुढचे ४ दिवस हे प्रदर्शन जहांगीर येथील कलादालनात सुरु असेल. एका नव्या अनुभवासाठी नक्कीच पुन्हा जलरंगातील बुंदीला आणि भविष्यात एकदातरी प्रत्यक्षात बुंदी शहराला भेट द्यावीच लागेल.
- रुपाली ठोंबरे.
बुंदी शहराचे वर्णन सुंदर मांडलंय अगदीच तिथे असण्याची उत्सुकता वाटते. तीच उत्सुकता चित्रातील कंपोसिशन, पोत आणि shadow & light ची जाणवलेल्या वातावरणाच्या गंमतीचा सविस्तर उल्लेख व्हावा. बाकी शब्द तुझ्या तालावर नाचतातच.💐
ReplyDeleteखुप छान भाषेत वर्णन केले आहे वाचून खुप छान वाटले जुन्या आठवणी जाग्या होतील अश्या शब्द उच्चर करून वाचातानी एक वेगळा अनुभव देऊन जातो खुप खुप धन्यवाद https://carmaharashtra.com/
ReplyDelete