Pages

Saturday, February 7, 2015

क्षण …. जीवनाचे चित्र रेखाटणारे रंग

क्षण …. जीवनाचे चित्र रेखाटणारे रंग

( जीवन म्हणजे कॅनवासवर वेगवेगळ्या रंगछटानी चित्रीत केलेल्या चित्राप्रमाणे असंख्य मंद तेजस्वी अशा क्षणांची सुरेख कलाकृती.
क्षण सुखाचे असो वा दुःखाचे, अश्रू दोन्ही वेळी येतात. ग़ेलेले क्षण काही आनंद देणारे तर काही उदास करणारे असले तरी ते काही केल्या परत अनुभवता येत नाहीत. भूतकाळात घडलेली एखादी वाईट घटना घडून गेली तरी ती आठवणीच्या स्वरुपात व्रण करून नेहमी मनात राहते. पण त्यामुळे जर खचून गेलो तर येणारे जीवनही निरर्थक वाटते.आणि त्यामुळे येणारे नवे सुख दिसत नाही.कदाचित नकळता आपण येणारी चांगली संधी गमावतो आणि पुन्हा स्वहस्ते दुःखालाच कवटाळतो. म्हणूनच आनंदी जीवन जगण्यासाठी जुन्या आठवणीत हरवून राहण्यापेक्षा नव्या आठवणींनी जीवनाचे सार्थक करणेच योग्य …)
  

क्षणांची रांग जीवनात रंग उधळते ।
कण कणांत जीवनाचे चित्र उमटते ।।

हासरे काही क्षण चमचम नाचती
रुसलेले मंद क्षण स्तब्ध राहती ।
गोड-कडू भावनांची रंगते लपाछुपी
आसवांची रांग प्रतीक्षणाची सोबती ।।

गत क्षण मनात कधी काहूर आणती
कधी तेच ओठांवरी स्मित रेखाटती ।
नाही ते आता,तरी आठवणींचे व्रण आहे अंतरी 
क्षणार्धात चित्राची कायाची पालटली ।।

न पुसता येणारे
कधी हवेसे वाटणारे ।
कधी नकोसे झालेले
ते सारे क्षण आज चिंब न्हाले ॥

एक श्वास थांबला पण जीवन न थांबले
नवक्षणांचे कवडसे जीवनात प्रविशले ।
येणारे क्षण पुससि आम्ही काय केले ,
इंद्रधनूचे ते रंग का आम्हांस न मिळाले ?

जरी गतक्षणांचे व्रण पुसता न येणारे
तरी नवक्षणांत रंग भरून ते झाकता येणारे ।
चित्राचे ते पूर्वीचे सौन्दर्य पुन्हा आणणारे
असे भाग्य आम्हांसही मिळावे ।।

 -  रुपाली ठोंबरे

1 comment: