Pages

Monday, May 4, 2015

घेऊन आठवणींचे आंदण... सोडते मी आज हे अंगण

( मुलीचे लग्न हा सोहळा मुलगी आणि तिचे घरचे यांच्यासाठी खरंच खूप मोठा आणि तितकाच नाजूक प्रसंग असतो. यात लग्नासाठी चाललेल्या तयारींची धावपळ असते , चुकून काही चूक होईल का अशी धास्ती असते ,सुख सोहळा मनासारखा होत असल्याचा आनंद असतो,मुलगी चांगल्या घरी नांदेल याचे समाधान असते आणि त्यासोबतच उदया पासून या घरापासून दूर जात असल्याची कणकणही मनाला खूप त्रास देत असते .
या सुंदर , मंगलमयी विवाहसोहळ्यात सर्वांना गहिवरून टाकणारा असाच क्षण येतो, आणि तो म्हणजे पाठवणीचा….)

घेऊन आठवणींचे आंदण
सोडते मी आज हे अंगण ।
जिथे खेळले रम्य बालपण
इथेच आले भरास देखणं तारुण्य ।।

रोषणाईची मेखला
जणू उतरले खाली तारांगण ।
चौघडाही वाजतो आता
 देत पाठवणीची आठवण ।।

डोईवरी वली पांघरून
पाऊले चालली वाजीत पैंजण ।
हात हातात नव्या नात्याच्या
परी नजर थांबे पाठी घालीत रिंगण ।।

बाबा, लाडक्या लेकीची करा
आता हासत पाठवण ।
आई, गेली जरी दूर नको गं करू चिंता
 नाही विसरेन मी तुझी दिलेली ती शिकवण ।।

नको आणू डोळ्यांत पाणी
जरी चालली दूर तुझी बहिण ।
उन्मळून येतील जुन्या आठवणी
ते प्रेम ते आपल्यातले खोटे-खोटे भांडण ।।

पण दे मला तू आता खरे-खरे वचन
या घरी आणशील तू तसेच नवे सुखाचे क्षण ।
नाही मी आता इथे तरी असावी नेहमी
पाणावलेल्या पापण्यांतही आनंदाची पखरण ।।

आज घरा 
तुला लाभले माहेरपण ।
जाते मी सासुरा
तिथे आहेत नवे आप्तजन ।।

वाट पाहीन मीही
कधी येईल श्रावणसण ।
हासत येईन या घरी
वेचण्या पुन्हा ते मायेचे क्षण ।।

- रुपाली ठोंबरे

1 comment: