पहाट झाली कि संपूर्ण धरणी नवे रूप ,नवे तारुण्य पांघरते. नव्याने उमलणारी फुले या सौंदर्यात आणखी भर घालतात.या रंगीत फुलांसवे सुगंध पसरवत सर्व फुलझाडे दिमाखात उभी असतात, नव्याने लाभलेले सौंदर्य अनुभवत असतात. पण पारिजात मात्र खूप वेगळा . तोही या निसर्गात आपल्या रंग-सुगंधाने भर घालत असतो. पण हे सर्व निस्वार्थी मनाने धरणीस अर्पून , तिच्यावर मोती पोवळ्यांची चादर पांघरत असताना स्वतः मात्र तसाच पुष्पहीन होवून जातो . म्हणूनच कि काय , श्रीकृष्णाने फक्त परिजाताची धुळीत पडलेली फुले स्वीकारून त्यास कृतकृत्य केले. आणि देवाचा सहवास लाभून पारिजातकही समाधानी होवून जातो .
काल होता सूर्यास्त, गत झालेल्या रवीची वाट पहात ।
मग्न होवून स्वतःत, उभा असा दारात, हा पारिजात।।
भुईवर अवतरलेले रत्न हे, जे गवसले समुद्रमंथनात ।
कृष्णप्रीयेच्या मागणीत, इंद्रपुरीतून आले आज अंगणात ।।
मोती पोवळ्यांची आभूषणे करून परिधान ।
शोभतो पारिजात असा रात्रीच्या चांदण्यांत ।।
नजर आकाशात, कधी होईल आता पहाट ।
कधी दिसेल लाल केशरी आकाशाची ती वाट ।।
आतुरला हा करण्या रवीरश्मीचे स्वागत ।
मोती पोवळ्यांचा सडा शिंपला त्याने हासत ।।
सुर्य दिसे पूर्वेस उधळीत रंग नवे नभात ।
संगे त्याच्या नवतारुण्य आले या जगात ।।
रूप गळूनही मंद सुगंधी दरवळ चोहीकडे पसरवत।
पारिजात म्हणे," अर्घ्य पुष्पांचे अर्पण तुज, तात " ।।
फुले मातीस स्पर्शलेली वेचतो बघ हा भक्त ।
अर्पिता श्रीकृष्णास तोही आनंदतो ही स्विकारत ।।
कवाडातून झरोक्यातून येणाऱ्या सूर्यप्रकाशात ।
शोभतो देव्हाऱ्यात कृष्णासोबत हा पारिजातक ।।
- रुपाली ठोंबरे.
नेहमी प्रमाणेच मस्त
ReplyDeletesunder ahe
ReplyDeleteAprateem!!!
ReplyDelete