Pages

Friday, July 31, 2015

लघु होई गुरु हाच सन्मान जगी गुरूचा ।।

आज आषाढ पौर्णिमा म्हणजेच "गुरु पौर्णिमा " किंवा "व्यास पौर्णिमा". 'गुरु' या शब्दाचा अर्थच महान,मोठा. 'गु' या शब्दाचा अर्थ आहे अंधार (अज्ञान ) आणि 'रु' या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश (ज्ञान) . अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गुरु. गुरु सकळ जीवास  शिकवतो ,संस्कार देतो. गुरु सत्व ,रज,तम या त्रिगुणांच्या पलिकडे असून शुद्ध ,अतिपवित्र आणि आत्मज्ञानी आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी अथक परिश्रम आणि सोबत श्रद्धा ,विश्वासाची जोड हवी असते. आणि ती प्रेरणा शिष्याला गुरूकडूनच मिळते. निष्ठावान भक्ताला गुरुमुळेच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते . एखादा जरी सामान्य असेल तरी आपल्याला हव्या त्या क्षेत्रात तो असामान्य असेल तर आपल्यासाठी तो गुरूच. गुरुरूपी प्रकाश अज्ञानापासून ज्ञानाकडे , अनीतिकडून नीतिकडे , दुर्गुणापासून सद्गुणाकडे  , विनाशापासून कल्याणाकडे , शंकेपासून संतुष्टीकडे , अहंभावापासून विनम्रतेकडे आणि पशुत्वापासून मानवतेकडे जाणारा मार्ग दाखवत असतो. गुरूचरणामृताच्या एका थेंबापासून प्राप्त होणारे फळ सर्व तीर्थक्षेत्रात स्नानातून मिळणाऱ्या फळापेक्षा हजारपट अधिक असते.गुरू एक परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे.गुरूची कृपा असेल तेथे विजय निश्चित आहे.गुरू-शिष्य नाते तर्कापेक्षा श्रद्धा, आस्था व भक्तिवर टिकून असते. भावनिक प्रदर्शन म्हणजे गुरूभक्ती नव्हे. भक्ति म्हणजे समर्पण. शिष्याचे गुरूप्रति समर्पणच गुरू-शिष्य नात्याची वीण अधिक घट्ट करत असते.निर्जिव वस्तूला वर फेकण्यासाठी सजीवाची गरज असते. त्याच प्रकारे पशुतुल्य मानवाला देवत्वाकडे वाटचाल करायची असेल, तर सद्गुरूची आवश्यक्ता असते.गुरू म्हणजे जो लघू नाही तो. म्हणजेच लघुला गुरू बनवितो तो गुरू.जीवनाच्या निसटत्या प्रवाहात स्थिर राहतो तो गुरू. कनक (सोने), कांता (स्त्री) आणि कीर्ति यांच्या झंझावातातही तो स्वतःचे अस्तित्व राखतो तो गुरू.जीवनाचं तत्त्वज्ञान ज्याच्याकडून शिकायला मिळतं तो म्हणजे गुरू.जो शिष्य गुरूचे ज्ञान वाटतो तोच उत्तराधिकारी होण्यास पात्र आहेगुरूदक्षिणेचा अर्थ खूप व्यापक आहे. शिष्याचे सूर्याप्रमाणे देदिप्यमान होणे हीच गुरूला दिलेली सर्वांत योग्य गुरूदक्षिणा आहे.
 


झरोक्यातून येणारा प्रकाश कवडसा ।
अंधाऱ्या खोलीत दिवा इवला जसा ।।

विशाल सूर्याचा झोत ज्ञानरुपी प्रकाशाचा।
नाश करी काळोखरुपी अज्ञानाचा ।।

मार्ग विनाशापासून कल्याणाकडे नेणारा।
अहंभावातून विनम्रता  ठायी आणणारा ।।

शंकांपासून संतुष्टीपर्यंत प्रवास शिष्याचा।
लघु होई गुरु हाच सन्मान जगी गुरूचा  ।।

भिंगाशी एकवटून संस्कारांची किरणे।
कागदाशी लपेटून एका ज्योतीचे जन्मणे ।।

ज्योतीतून प्रकाशणारा सर्वकल्याणरुपी ज्ञानसुर्य।
गुरुदक्षिणा ही अर्पणारा शिष्य जो, तोच खरा धन्य ।।

-  रुपाली ठोंबरे. 


( प्रस्तावनेचा काही भाग "http://marathi.webdunia.com" मधून घेण्यात आला आहे)

Monday, July 27, 2015

दो दवांत जगून घे पाऊस सारा




कधी कधी एखादी गोष्ट मिळणार नाही ही वस्तुस्थिती माहित असूनही माणसाचे मन तिच्याच स्वप्नांत, तिच्या अवतीभवती अडकून राहिलेले असते.कधी कधी ते स्वप्न पूर्ण होणारा क्षण त्या माणसाच्या जीवनात उलटूनही गेलेला असतो. तरी ते मिळणार याची वाट पाहत तिथेच थांबून राहतो.एकाच ध्येयाचा ध्यास लागणे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे . त्यासाठी सतत नवनव्या मार्गांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे. पण त्यासाठी पूर्णपणे थांबणे, निराश होणे हे कोणत्याच उद्दिशाच्या पूर्ततेसाठी कामी येत नाही . याउलट जीवनाचा एक नवा अध्याय नव्याने, नव्या उमीदीने सुरु करावा - खिन्नतेचा ढग दूर सारून उद्दिष्टांचा ध्रुवतारा दाखवणारा.


                


रे मना , ' ये घना '
साद का घाली असा
टळून गेली वेळ आता
अजून का तू उभा असा 

नभी न पसरला घनांचा पसारा
कधी न उलगडला मनाचा पिसारा
मिटून असाच वाट पाहत आहे
सण थेंबांचा येईल केव्हा असा

ढगाळ-काळे आभाळ सारे
मनात श्वास असे गुदमरावे
आठवांच्या गर्दीत आसवे
पावसात हळूच मुग्ध विरावे

धारांत भिजण्याची ओढ तुला
ताऱ्यांत निजण्याचा परिपाठ पुन्हा
रे मना , स्वप्नांना तू सोड आता
नवा सर्ग मार्ग नवा तू शोध आता

काहूर मनात फुलू दे आशांचा पिसारा
दिशांत शोध एक नवा किनारा
पूर्ततेची इहिता आनंदाश्रूंना थारा
 दो दवांत जगून घे पाऊस सारा

- रुपाली ठोंबरे.

Thursday, July 16, 2015

अबोला

तुझे शब्द प्रीतीचे जोपासुन आहे
तुझी साथ एकांतातही भासताहे

मनी जाण होता तुझ्या कल्पनेची 

दुरावा तुझा आसवांतुन वाहे

जरी हाक देण्या मन आतुर आहे
उरी भावनांचा का थैमान चाले

तुझ्या आठवणीतुनी संचारताना
अबोला तुझा या मनी साद घाले

बाळा , भेटण्या तुला…जीव माझाही होई कावराबावरा ।।

मागची कविता " बाबा ,लवकर या ना " एका बाळाची कामासाठी दूर गेलेल्या त्याच्या बाबांसाठीची निरागस हाक होती तर ही कविता त्या हाकेला बाबांनी दिलेली केविलवाणी पण तितकीच सुंदर,प्रेमळ ,खरी साद आहे…

दूर सागराचा किनारा
तिथे दूर राहिला निवारा
येण्या परत अपुल्या घरा
बाळा , भेटण्या तुला…जीव माझाही होई कावराबावरा ।।

तुझं टाकलेलं पाऊल पहिलं
बा- बा-बा-बा बोल बोबडं पहिलं
निरागस रूप खळाळत्या हसण्यातलं
सारंच बघायचं माझं चुकलं …सुखावलो पाहून जे आईनं होतं टिपलं ।।

पाहत सागरात रोज येत-जात नावा
माझ्याही मनात उडे आठवांचा थवा
दूर जरी…ऐकतो मी तुझा माझ्यासाठीचा धावा
तुझ्या-माझ्या मनांचा असा दुवा…कधी न होईल कमी जरी आहे हा दुरावा ।।

रोज बघून मुला,ऐकून तुला
वाटे कुशीत घ्यावे लगेच तुला
सावरतो हळूच मग मीच मला
आसवांच्या पूरातही वाट काढतो…फुलवण्या तुलाच उदयाला, माझ्या फुला ।।

हाक तुझी येता येईन असा मी धावून
या वेळी खरेच बाळा, मी लवकर येईन
पण थांब जरा दोन दिवस धीर तू धरून
माझ्यासारखाच मित्र माझा निघाला घरून …तुझ्यासारख्याच पिल्लाचा निरोप घेवून।।

- रुपाली ठोंबरे.

बाबा , लवकर घरी या ना ....||


आजकाल कामानिमित्ताने बाबांची दूरवर परदेशी वारी असते . मग महिनो-महिने बाबांपासून दूर असलेल्या त्यांच्या चिमुकल्याची काय व्यथा असते तेच सांगणारी ही गोड काव्यकथा …. 


एक दाणा भला कमी आणा
बाबा , यावेळी पुन्हा येताना
पुरे झाला आता सारा बहाणा
बाबा , लवकर घरी या ना ....||

रोज आई गाते नवी अंगाई
 लक्ष मनाचे तिथे लागेना 
सवय तुमच्या गोष्टीची
आता राती झोपू देईना ....||

पाहू जरी नवा खेळणा
तरी ओठांवर हसू येईना
आठवतो हातांचा पाळणा
त्याच्याशिवाय खरेच करमेना ....||

रोज रात्री  कॉम्प्युटरवर पाहत तुमची वाट
मीही बसतो समोर आईसोबत मांडून थाट
हिरवा रंग दिसता क्षणी सुरु झालेला तो संवाद
तासभर झाला तरी मन काही शेवटी मानेना ....||

काहीतरी काढून आमची समजूत
परत जाता नव्या कामाला जेव्हा
मी ही मुसूमुसू आणून पाणी डोळ्यांत
पाहतो हुंदके देणाऱ्या आईला तेव्हा ...||

माझ्यापरी आईसुद्धा बोलावते बघा
गेला उलटून पहा असा हाही महिना
हसता-रडता कसा गेला हेही कळेना  
सांगून तिथे एखादा नवा बहाणा
    बाबा , आता लवकर घरी निघून या ना ....||


- रुपाली ठोंबरे

Wednesday, July 8, 2015

"Are you still carrying her ? "


कालच झी मराठी या वाहिनीवर सध्या गाजत असलेली " जुळून येती रेशीमगाठी " ही मालिका पाहण्यात आली . कालच्या भागात या मालिकेतील अतिशय अनुभवी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या नाना या पात्राच्या तोंडी ऐकलेली एक झेन कथा आज इथे सांगावीशी वाटते . एकाग्रता आणि निर्विचार होवून घटनांकडे पाहण्याची क्षमता, या २ तत्वांच्या आधारे केलेले ध्यान आपल्याला मर्माकडे घेवून जाते . आणि झेन गोष्टी अशा अचूक अनुभवांचे मर्म सांगणाऱ्या गोष्टी. 

तर ती कथा अशी होती कि ,

एकदा दोन झेन साधक आपली दिलेली जबाबदारीची कामे संपवून  मठाकडे निघालेली असतात. बरेच अंतर कापायचे असते आणि  चालत जायचे असते . ते आपले मजल दरमजल करत  डोंगर-दऱ्या,रान-वने पार करत चालत असतात . एका ठिकाणी त्यांना आडवी येते नदी . आता ही पार करून पार करून जावे लागेल . त्यात दिवस पावसाचे असतात . पाऊस वाढला तर पार करणे अशक्य होईल म्हणून ते लगेच नदीत उतरतात .

इतक्यात त्यांना एका मुलीची हाक ऐकू येते . ते मागे वळून पाहतात .
एक सुंदर मुलगी  येते आणि म्हणते ,

               " हे बघा , मला नदीच्या त्या पलीकडे जायचे आहे.  पण मला एकटीला काही हे जमणार नाही .शिवाय पावसाचा वेग वाढला तर नदीचा जोर वाढेल आणि मला इथेच थांबावे लागेल .तर मला तुम्ही उचलून त्या पलीकडे न्याल का ?"

त्या दोघांपैकी एक मोठा साधक क्षणाचाही विलंब न करता तिला लगेच आपल्या खांद्यावर उचलून घेतो आणि दुसरऱ्या  साधकाला मागे येण्याचा इशारा करतो. आणि अशाप्रकारे ते तिघे ती नदी पार करून पलिकडे येतात . तिथे तो साधक तिला खाली उतरवतो आणि ती अतिशय नम्रतेने खाली मान लववून अभिवादन करून धन्यवाद मानून तिथून निघून जाते . हे दोघे साधकही आपला मुळचा प्रवास करत मठाच्या दिशेने चालू लागतात.बराच वेळ असाच गप्प गप्प जातो .

मग जसा आश्रम जवळ येतो तसा तो छोटा साधक मोठ्या साधकाला विचारतो ,
              " मठात तू ही गोष्ट  सांगणार आहेस का ?"
मोठा साधक साधक विचारतो ,
               " कोणती गोष्ट ?"
 तेव्हा छोटा साधक त्याला म्हणतो ,
             " अरे हेच जे तू काही वेळापूर्वी केलेस . आपल्याला स्त्रियांना स्पर्श करणे व्यर्ज्य आहे ना . "
तेव्हा तो मोठा साधक स्मित करत उत्तरतो ,
            " अरे, मी तर त्या मुलीला कधीच त्या दुसऱ्या काठावर उतरवलं पण तू मात्र अजूनही तिला खांद्यावर घेतलेलं दिसतंय ."

या गोष्टीचे दोन साधे सरळ अर्थ आहेत .
एक म्हणजे गोष्टी कधीच संपून गेलेल्या असतात पण आपण उगीचच त्या गोष्टीचं ओझं मनावर बाळगत  असतो .
आणि दुसरा अर्थ म्हणजे साध्या सरळ गोष्टींकडे आपले मन ढगाळलेल्या नजरेने पाहत असते . आणि आपल्याला त्या गोष्टी गढूळ वाटतात .

खरेच प्रत्येकाला विचार करायला लावणारी सुंदर गोष्ट आहे . आपल्या सोबतही बरेचदा असेच होते . पूर्वी घडून गेलेल्या घटनांना आठवून  किंवा त्यांचे सल मनात बाळगून आपण आपले आणि इतरांचेही वर्तमान बिघडवत असतो. आणि कित्येकदा पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे आपल्याला जगही चुकीचे भासते आणि यातूनच पुढे बरेचदा होत्याचे नव्हते करून बसतो .

 तेव्हा प्रत्येकाने थोडा वेळ काढून एकदा विचार करून पहा

                         "Are  you still carrying her? "

Monday, July 6, 2015

शोध नव्या दिशेचा ...


इवलेसे स्वप्न माझे ,अशक्यप्राय इतरांसाठी
भासे जणू ,  इंद्रधनूची वाट पाहतो कोणी वाळवंटी

छोटासा खोपा राजा-राणीचा असावा
थकलेल्या क्षणीही जो देईल विसावा

अनपेक्षित वादळांनी  नेले ते घरटेही हिरावुनी
आयुष्यभराची उणीव ठेवून गेले ते मनी

अजूनही हृदयात लपल्या असंख्य आशा
स्वप्न जगण्यासाठी मिळावी एक नवी दिशा

ओठांवरील हसू झाले आज कर्जच माझ्यासाठी
भासे जणू , इंद्रधनूची वाट पाहतो कोणी वाळवंटी

Friday, July 3, 2015

मन स्वप्नी विचारांच्या रथात स्वार

दोन जणांचे भेटीसाठी आसुसलेले मन ,भेटीतला  निरोपाचा क्षण , त्यानंतर होणारा विरह यांचे  सुंदर चित्रण
 
मन स्वप्नी विचारांच्या रथात स्वार 
तुज संगतीत स्वैर भिरभिरते
सत्यात जाणुनी विरह तुझा
बैचेन होऊनी व्याकुळते

होताच चाहुल तव स्पर्शाची
फुलवुनी शहारे मोहविते
सुटताच साथ त्या घटकाला
पुनः भेटीची आस ते धरते

चांदण्या सम मन माझे
निशी आसमंती दाटीत बावरते
मिळताच दिशा चंद्र तेजाची
प्रफुल्लित होऊन सावरते