Pages

Monday, August 31, 2015

"सांस्कृतिक कट्टा".

अलीकडेच आमच्या परिसरात घडवून आणलेली एक नवी कल्पना अनुभवण्यात आली. ती म्हणजे काही साहित्यिक, विभाग प्रमुख ,रसिक यांच्या अमुल्य सहकार्यातून नुकताच सुरु करण्यात आलेला "सांस्कृतिक कट्टा".

तर हा सांस्कृतिक कट्टा म्हणजे काय ? थोडक्यात सांगायचे झाले तर , एक अशी सांस्कृतिक चळवळ ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत, कलेचे सर्वच पुजारी सामील होवू शकतात. खरे तर माझ्या 'इवल्याशा मूठीत' या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकामध्ये एक तरी कला असते. वत्कृत्व ही त्यांपैकीच एक कला. जी खरेतर व्यावसायिक दृष्टीनेही अतिशय उपयोगी. अनेकांना खूप काही बोलायचे असते, विविध कल्पना सुचत असतात पण ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नसते. घरच्यांसमोर वा मित्रमंडळी , आप्तेष्ठांमध्ये आपले विचार मांडावे तर ते तेवढे रसिक असले पाहिजेत नाहीतर ' सदा पकवणारी व्यक्ती 'असे कायमचे लेबल लागते. तर अशा कलाप्रेमींसाठी सांस्कृतिक कट्टा म्हणजे एक आपलेसे वाटणारे व्यासपीठ. इथे स्वैरपणे समाजातले विषय ,इतिहास , विज्ञान या संबंधांतले कोणतेही मनातले विचार सर्वांपुढे मांडता येतील , चर्चा करण्यास वाव मिळेल, सर्वांसमोर उभे राहून बोलण्याने एक नवा आत्मविश्वास अंगी संचारेल. आणि या सरावाने व्यक्तिमत्त्व नक्कीच समृद्ध होईल.

शिवाय प्रत्येक वेळी खास बोलावण्यात येणाऱ्या पाहुण्यांकडून ज्ञानाची जी अमुल्य शिदोरी प्राप्त होते त्याची गोडीच निराळी. येणारा हा पाहुणा एखादा डॉक्टर असेल किंवा साहित्यिक किंवा आणखी कोणत्यातरी क्षेत्रातील निपुण वक्ता आणि यांचे विचारही तितकेच नैपुण्य प्राप्त करून देणारे.

मला तर ही कल्पना खूपच आवडली. खरेच ज्यानीही ही कल्पना मनात आणून हकिकतेत आणली त्यांचे शतशः आभार  आणि पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. असे सांकृतिक कट्टे राज्याच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाले तर कुठेतरी लय होत जाणाऱ्या मराठी भाषेला नवी उभारी मिळेल,नागरिकांच्या विचारांना योग्य वाचा फुटेल, कुठेतरी दडलेला इतिहास आणि विज्ञानातील रहस्ये यांचा मागोवा घेऊन प्रत्येकात लपलेल्या जिज्ञासू वृत्तीला नवी प्रेरणा मिळेल आणि अशा प्रकारे या उपक्रमातून राज्यातील सर्वांचेच व्यक्तिमत्त्व उत्तमरीत्या दिवसेंदेवस फुलत जाईल. योग्य खतपाणी मिळाले, जोपासना झाली कि पिके आपोआपच उत्कृष्टपणे भरभरून येतात आणि असे हे तरारून आलेले शेत आनंदाचं अनोखं देणं देवून जातं. गरज आहे ती फक्त - योग्य जाणीवेची ,योग्य निर्माणाची ,योग्य विचारांची ,नवे काही शोधण्याची आणि उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसादाची .

- रुपाली ठोंबरे. 

No comments:

Post a Comment