Pages

Thursday, September 15, 2016

.... शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'


हे दरवर्षीचेच आहे... वाजत गाजत सर्वांचा लाडका गणपती बाप्पा थेट आपल्या घरी येऊन चांगला १० दिवस राहतो....अतिशय आनंदाने,स्मितमुखाने आपल्या आशीर्वादांची उधळण सर्व भक्तांवर करतो. आणि आपणही नव्या पाहुण्याप्रमाणे मनसोक्तपणे आपल्या भक्तीची लयलूट त्याच्यावर करत असतो. रोज नवा नैवद्य, फुलाफुलांची सुरेख आरास , दिव्यांची उजळण, भक्तिगीतांची उधळण आणि पाहुण्यांची रेलचेल या सर्वांसवे हे दहा दिवस प्रसन्नतेला असे काही पांघरून घेतात कि जेव्हा शेवटी आजचा दिवस उजाडतो, प्रत्येकाला आज काहीतरी हरवणार असल्याचे भास नकळत होऊ लागतात... राहून राहून मन उदास होऊ लागतं.बघता बघता दरवर्षी हे दहा दिवस कसे सरून जातात हे कळतच नाही... आणि शेवटी येते 'अनंत चतुर्दशी'.... बाप्पाला निरोप देण्याचा दिवस.



संध्याकाळी, दहा दिवसांपासून गजबजलेले प्रसन्न मखर मंडपे त्या गूढ अस्तित्वाशिवाय रिकामे वाटू लागतात... रोषणाई मंद मंद होत जाते....सजावटीत एक पोकळता सारखी जाणवते.... गणेशस्तुतीच्या सुरांशिवाय या मंडपांतील शांतता अधिक भकास वाटू लागते....

याउलट त्याच प्रहरी शहरातील रस्ते, जलाशये,तलाव भक्तीच्या पुराने ओसंडून वाहत असतात...साऱ्या दिशा ढोल पथकांनी दुमदुमत असतात....ताशांसवे लेझीमही फेर धरून नाचत असते....अबीर गुलालाने लाल झालेले गर्दीचे लोट आपल्या बाप्पाचे शेवटचे मुखदर्शन घेण्यासाठी दूरदूरून आज रस्त्यांवर येतात...दोन्ही कर जोडून ते विश्वरूप डोळ्यांत साठवून घेत असतात.... कोणी उरलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी नवस म्हणत असतो तर कोणी झालेल्या चुकांबद्दल क्षमा.... पण प्रत्येकजण दीनवाणा होऊन काहीतरी मागत असतो....पण सरते शेवटी प्रत्येकाची आग्रहाची एकच मागणी असते.... गणपती बाप्पा मोरया ।। पुढच्या वर्षी लवकर या ।। पुढच्या वर्षाचे आमंत्रण देता देता डोळ्यांत तरळलेले पाणी आज प्रत्येक चेहऱ्यावर दिसते. लालबागचा राजा असो वा पुण्याचा मानाचा गणपती किंवा मग घरात बसवलेला लाडका बाप्पा... आज सारेच रस्त्यावरच्या मिरवणुकीत सामील असतात.भला मोठा लवाजमा पाठी सोडत आज प्रत्येक राजा पाण्याच्या दिशेने पुढे जात असतो....आपल्या गौरी माईला भेटायला. पण भक्त काही अगदी दूरपर्यंत त्याची सोबत सोडत नाही. पार पाण्यात उतरून आपल्या बाप्पाला निरोप दिल्यावरच समाधानाचे भाव त्या चेहऱ्यांवर पसरतात.

परत येताना आणलेली मूठभर माती त्या रिकाम्या मखरात , त्या रिकाम्या पाटाची पुन्हा शोभा वाढवते...शेवटच्या आरतीच्या स्वरांनी मंडप पुन्हा गजबजतो.... दिव्यांची उजळण पुन्हा एकदा प्रखर होत जाते... गणरायाचा जयजयकार करत एक समाधानाची पण किंचित उदासवाणी प्रसन्नता पुन्हा प्रत्येक चेहऱ्यावर निर्विकारपणे झळाळते....उत्साहाचे नवे कारंजे पुन्हा अंगांगांवर थुईथुई नाचते.... एका नव्या स्वागतासाठी !

- रुपाली ठोंबरे



No comments:

Post a Comment