Pages

Monday, May 18, 2020

शुभेच्छा कॉमामॅन साठी




स्वल्पविराम... 
कायम सामान्य वाटणारा भाषेतला एक सुंदर आकार 
आणि अशोक सर ... 
या सामान्य आकाराला आसामान्य बनवणारा एक चित्रकार 

घडवून रेषांचे मिलन... 
कृष्ण-धवल रंगछटांत न्हाऊन जिवंत होणारे आभासी आकार 
जणू दुनियेची सुरेख एक सैर...  
आवर्तनांतून मनाच्या संवेदनांना स्पर्श करणारा अनुभवांचा सागर 

तव सारे अनुभव... 
प्रत्येक चित्रात उतरत वर्धत राहावा तुमच्यातला सदाबहार कलाकार
शुभेच्छा हीच आज... 
कोणत्याही पूर्णविरामाशिवाय तुमचे प्रत्येक स्वप्न होत राहावे साकार



- रुपाली ठोंबरे.  



Friday, May 15, 2020

स्क्रीनवरची शाळा


चल ऊठ बाळा 
आता सुरु होईल शाळा 
आणला निळा फळा 
पाहू स्क्रीनवरची शाळा 
नको आई , नको मला
कॉम्पुटरची ती शाळा
नाही वर्ग , नाही दंगा
ही कसली शाळा ?
अनोखी ही तुझी शाळा 
आवडली खूप मला 
पुन्हा लहान होऊन आई 
बाळासोबत शाळेत जाई 
हम्म्म्म...आई आणि बाई
अडकून दोघांच्यात मी
मित्र नाही , मस्ती नाही
शाळेची मज्जाच उरली नाही 
बाईंचाही तुझ्या, आला बघ फोन 
पाहू तरी आता, आले कोण कोण ?
नवीन काही शिकू चला आज 
मज्जाच मज्जा करू चला खास 
तसाच उठून बसलो मी पहा
देतेस का गं खारीसोबत चहा ?
मुले झाले फक्त सोळा गोळा
जळू लागे आत्ताशीच माझा डोळा 
खाऊ देईन, पाणी देईन 
वेळही देईन हवा तेवढा 
पण, आनंदाने या शाळेत मी राहीन
शब्द दे मजला तुझा फक्त एवढा 
तेच तर कठीण आहे गं आई
तुला समजतच कसे ते नाही ?
खरी शाळा आठवत मला राही
जायची 
तिथे लागली आता घाई 
त्याच्याशिवाय, 
क ख ग घ... १ २ ३ ४
काहीसुद्धा कळत मला नाही
खरं खरं एकदा मला सांग
तुझी सुद्धा होती का गं ... शाळा अशी आई ?


- रुपाली ठोंबरे .  


Friday, May 1, 2020

महाराष्ट्रा वाचवू एकवटून सारी शक्ती |



सप्तसुरांनो, आज गा तुम्ही
अभिमानाची आरती
गाथा मोठी या महाराष्ट्राची
शिवशंभू जिचा सारथी ।

माथ्यावरी शिरोमणी सह्याद्री
पावलांशी सागरपाणी
दिशादिशांतुनी वारे वाहती
गाती स्वातंत्र्याची गाणी ।

घामांच्या धारांत भिजून माती 
हिरव्या लाटा काळ्या सागरी
कणीदार शिंपल्यांत सुवर्णमोती
घरोघरी भरती धान्याच्या घागरी ।

कुंभ सरितांचे येथ भरून वाहती
चैतन्ये नांदती पशूप्राणीही
किलबिल भुपाळी पाखरांची
सूर्यनारायणा प्रातः जागवी ।

धन्य धन्य ही संतांची पवित्र भक्तीभूमी
अभंग-पोवाडे येथ माणसा जागविती
धन्य धन्य ही कलांची सुंदर किल्लेभूमी 
तंत्र-कला-क्रीडेचा भगवा जगी फडकती ।

नमन क्रांतिकारकांच्या चरणी 
रक्तरंगात धन्य जाहली ही माझी आई
ते सळसळणारे रक्त अजूनही
जिवंत आहे येथल्या मावळ्यांच्या ठायी।

संकट येवो दृश्य-अदृश्य कोणतेही 
येथल्या मनामनांत दाटली राष्ट्रभक्ती 
घेऊन पुन्हा वसा इतिहासाचा हाती 
महाराष्ट्रा वाचवू एकवटून सारी शक्ती ।

-रुपाली ठोंबरे.