Pages

Monday, December 12, 2016

अक्षरयज्ञ-३

आसपास दृष्टीस पडतील ती फक्त नाना तर्हेची हिरवीगार झाडे, कानांना ऐकू येईल फक्त पोपट, चिमण्या आदी पक्षांची मधुर किलबिल आणि सोबतीला असेल अगदी नाजूक स्पर्शाने अंगाशी बिलगून जाणारा मुग्ध गारवा... अशी जागा मुंबईच्या कुशीत सापडणे खरेतर अशक्य. पण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ते शक्य करून दाखवले आहे. आज आमच्या सारख्यांना या नयनरम्य परिसराचे दर्शन घडू शकत आहे ते फक्त अच्युत पालव सरांनी आयोजित केलेल्या 'अक्षरयज्ञ-३' या ३ दिवसांच्या नवरस या गहन विषयावर आधारित कार्यशाळेमुळे. कॅलिग्राफीच्या जगतात प्रवेश केलेले त्यांचे सुमारे ५० विद्यार्थी आज इथे मोठया उत्साहाने जमले आहेत. निसर्गाच्या प्रेमात पाडणारी शांत जागा, सर्वांचा लाडका गुरु आणि नवरसासारखा भावनाप्रधान विषय या त्रिवेणी संगमामुळे सर्व विद्यार्थी फारच उत्सुक होते.


आज कार्यशाळेचा पहिला दिवस. मुंबई, अमरावती ,गुजरात, सावंतवाडी अशा निरनिराळ्या भागांतून आलेले सर्वजण राहण्याची सोय आणि न्याहारीचा आस्वाद घेऊन उत्साहात हॉलमध्ये जमले. काम करण्याची जागाही अतिशय सुंदर... प्रशस्त, हवेशीर, मोकळी आणि प्रकाशाची कमी नसणारी.कार्यशाळेचे उदघाटन झाले ते प्रसिद्ध कथक नृत्यांगना तन्वी अनिल पालव हिच्या नवरसांनी न्हाऊन निघालेल्या नृत्याने. तिच्या नृत्यातून आणि चेहऱ्यावरच्या हावभावांतून ओसंडणारा प्रत्येक रस आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर त्याची अचूक छबी उमटवून जात होता. तो खरंच एक सुंदर अनुभव होता. त्यानंतर सर्वांच्या आवडत्या विवा सरांनी रांगोळीचे सप्तरंग असे काही जमिनीवर उधळले कि नवरसांचे ठसे प्रत्येकाच्याच मनावर उमटू लागले. आणि या रंगांसोबत आमचा या ३ दिवसांच्या कार्यशाळेचा प्रवास सूरु झाला.

त्यानंतर सुरुवातीलाच अच्युत सरांनी विविध ब्रशेस, साहित्य या सर्वांशी निगडित प्रश्नउत्तरांचा कार्यक्रम ठेवला. अनेक प्रश्नांची उत्तरे थेट कागदावर त्यांनी उमटवली होती. इंजेक्शची सुई असो वा एखादा घरगुती वापरातला ब्रश, कॅलिग्राफीच्या दुनियेतले एखादे टूल असो वा रस्त्यावरून उचललेली एखादी दगडाची चिप.... अच्यूत सरांच्या हातून कागदावर एखादा जादुई स्ट्रोकच निर्माण होईल. आज म्हणूनच कॅलिग्राफीच्या जगातले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे .

दुपारच्या चहानंतर संगीतकार , कवी आणि चित्रकार या तिन्ही रूपांत साहित्यक्षेत्रात वावरणारे मिलिंद जोशी आमच्या समोर उभे होते.... काहीतरी नवे घेऊन. त्या नुतनतेची उत्सुकता सर्वांनाच होती पण ते नक्की काय असेल हे मात्र आमच्यासाठी गूढच होते, जे काही क्षणांतच आमच्यासमोर उलगडले गेले. एक सुंदर त्यांचीच संगीतबद्ध केलेली धून सर्वांच्या कर्णपटलांवर राज्य करू लागली. या संगीताला  मनातून अनुभवून समोरच्या कागदावर चित्रबद्ध करण्याची अतिशय अवघड कामगिरी आमच्यावर होती. सुरुवातीला तर कित्येकांना काहीच सुचले नाही. कितीतरी कागद कोरेच होते. पण हळूहळू प्रत्येक नव्या संगीतफ़ितीसोबत एक नवा रस मनात वाहू लागला. कधी तो संथपणे मनात तरंगत होता तर कधी थैमान घालून उसळत होता.कधी प्रेमाची रासलीला सुरु होती तर कधी भयाने व्याकुळ झालेला जीव सैरावैरा धावत होता. आता आम्ही सुद्धा या रसांना व्यक्त करण्यास सुरुवात केली आणि कोरे कागद सुंदर, भडक रंगानी आणि अंतर्भावांतून उत्पन्न झालेल्या रसांनी रंगू लागले. कोणी चुकले तर कोणी बरोबर होते ... पण प्रत्येकाचे प्रयत्न मात्र निरंतर सुरु होते. शांत ,वीर शृंगार, भक्ती , भय या रसांचे चित्र आज प्रथमच मी कागदावर पाहत होते आणि तेही स्वतःच्या हातून साकारलेले.

त्यानंतर थिएटर दिग्दर्शक शिवदास घोडकेंसोबत आमची नवी शाळा सुरु झाली... शाळा अभिनयाची. कधीही न अनुभवलेले आज आम्ही शिकत होतो.प्रत्येक कलेमध्ये निपुण होण्यासाठी एक खूप मोठी प्रक्रिया असते हे या कार्यशाळेतून घेण्यासारखे होते. त्या प्रक्रियेचा एक भाग बनून मेहनत घेतली कि नक्कीच यश दूर नसेल . थिएटर... खूप खूप मजेदार भाग होता या कार्यशाळेचा. सर्वानी खूप मज्जा केली. अभिनयामध्ये दडलेले नवरस आज आमच्यासमोर मांडले गेले आणि तेच स्वतःच्या अभिनयातून सर्वांसमोर मांडण्याचा नवा उपक्रम सुरु झाला. या उपक्रमात कार्यशाळेतील इतर १० जणांसोबत मिळून नाटक प्रस्तुत करायचे होते आणि त्यातूनच ओळखी-अनोळखी सर्वांसोबतच  एक नवा संवाद सुरु झाला. आपापल्या परिने सर्वानीच छान काम केले. पण ते निश्चितच घोडके सरांच्या मनासारखे नव्हते. पण पुढे त्यांच्या मार्गदर्शनासाठी उभारलेले शोकसभेचे,करूण  रसाचे चित्र सर्वांच्याच लक्षात राहील. अप्रतिम झाले होते ते.रात्रीच्या साध्या पण चविष्ट जेवणानंतर विद्यार्थ्यांपैकीच पण आज स्वतःच्या मेहनतीच्या बळावर स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या भालचंद्र लिमये आणि अक्षया ठोंबरे या दोघांच्या कॅलिग्राफीच्या कामाचे सादरीकरण झाले. दोघांचेही कामाचे स्वरूप , पद्धत , विषय एकमेकांपेक्षा वेगळे असल्याने २ नव्या गोष्टी शिकण्याचे, बघण्याचे भाग्य आम्हांस लाभले .लिमयेचें काम कवितांच्या सानिध्यातले होते... खूप सुंदर आणि खूप बोलके. अच्युत सर आणि विवा सर यांच्यानंतर या कार्यशाळेत आम्हा विद्यार्थ्यांना बी जी सर हे एक उत्तम मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यासाठी खरेच मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटते. अक्षयाचे काम तर खूप सुंदर आणि प्रेरणादायी होते. प्रबळ इच्छाशक्ती, मेहनत आणि अच्युत पालव सरांचे मार्गदर्शन या तिन्ही गोष्टींचा मेळ तिच्या प्रत्येक चित्रात जाणवत होता. थरांवर थर घेऊन मांडलेल्या विशिष्ट शैलीतील अक्षरांनी अक्षयाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले होते. आणि हीच जादू तिच्या ३ जानेवारीला मुंबईत असलेल्या तिच्या चित्रांच्या प्रदर्शनातही दिसून येईल यात शंकाच नाही. अशाप्रकारे आजचा पहिला दिवस हसत-खेळत पार पडला.

दुसरा दिवस सुरु झाला तो लेखिका आणि निवेदिका म्हणून सर्वज्ञात असलेल्या अक्षदा विचारेंसोबत. त्या आदल्या दिवसापासूनच सोबत असल्यामुळे आमच्या मनातील नवरसांबद्दलचे विचार थोडेफार त्यांना समजून आले होते. आम्हाला रसांविषयी शाब्दिक माहिती देऊन त्यांनी आमच्या विचारांना खतपाणी घालून एक पोषक वातावरण निर्माण केले. आज विविध रसांविषयी अधिक माहिती मिळवण्यात आलेले यश पुढे आमच्या कामातून दिसून आले. कॅलिग्राफीमध्ये आजपर्यंत बेसिक शिकताना एका साच्यात काम करत होतो पण या कार्यशाळेत ते सर्व बंध मुक्त करून स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाली होती.कविता, गाणी अर्थात शब्दांच्या माध्यमातून आम्ही रसांच्या अगदी जवळ जात होतो, त्यांना समजून घेत होतो,कागदावर त्यांचे ठसे उमटवून विचारांची छाप सोडत होतो. शृंगार ,भय,बिभत्स, रौद्र अशा सर्व रसांना शब्दांतून समजून घेणे आणि कागदावर व्यक्त करणे... हा एक खूप सुंदर अनुभव होता. खासकरून बिभत्स रस कागदावर व्यक्त करताना आलेले अपयश आणि पुढे मिळालेले मार्गदर्शन नक्कीच आपल्या सर्वांच्याच लक्षात राहील. आजच्या दिवसात अनुभवलेला आणखी एक सुंदर अनुभव म्हणजे ओमकारातून प्रत्येकाने शोधलेला आपापल्या अंर्तमनातील ओम... नेहमीच्या बघण्यातल्या ओमपेक्षा खूप वेगळे स्वरूप होते ते ... जे आपणच स्वतः मांडले होते यावर आपलाही आता विश्वास बसणार नाही कदाचित. त्यानंतर 'लय भारी ' चित्रपटातील 'माऊली माऊली...  ' गाण्यावर सरांसोबत सर्वच अगदी देहभान हरवून नाचले... जणू त्या भक्तिरसात, त्या जयघोषात स्वतःला हरवून घेतले होते. पुढे हाच भक्तीरस प्रत्येक कागदावर ओसंडून वाहत होता. सर्वाना हा प्रकार फारच आवडला. पुन्हा एक नवे गाणे सुरु झाले... २०१६ मधले सैराट गाणे अबालवुद्धांपासून सर्वानाच नाचवणारे... 'झिंग झिंग झिंगाट... '. यावेळी नाचतानाची झिंग प्रत्येकाच्या वयोमानानुसार वेगवेगळी होती जी कागदांवर रंग उधळत बेभान झाली होती. त्यानंतर चहासोबत झालेल्या गप्पांमधून कार्यशाळेत दडलेले कित्येक कलाकार समोर आले. आमच्याकडे कवीही होता आणि गायकही ... जादूगारही होता आणि नायकही. याच नायकाच्या अधिपत्याखाली आम्ही सर्व आज बहरत होतो.



आजच्या दिवसातील आणखी एक आकर्षण म्हणजे कुलदीप सरांचे प्रात्यक्षिक. कुलदीप सरांचा निळ्या ,पांढऱ्या रंगांत भिजलेला कुंचला जसजसा कोऱ्या कॅनव्हासला स्पर्श करू लागला त्या चित्रातला शांतपणा आमच्या चेहऱ्यांवर सौम्यलहरी बनून पसरत होता.सकाळच्या संथ सागरावर शितल चंद्रकोर... एक अनोखे आणि अतिशय सुंदर,शांत मिलन.... मनावरचा ताण क्षणार्धात दूर सारणारे. दिवसाप्रमाणेच आजची रात्रही विशेष स्मरणीय ठरली, ती या थंडीमध्ये पेटवलेल्या उबदार शेकोटीमुळे... तिच्याभोवती सादर झालेल्या नृत्यामुळे... बेभान होऊन सैराट गाण्यांवर नाचणाऱ्या आम्हा सर्वांमुळे... अवधूतच्या प्रेमाचा गंध असलेल्या कवितांमुळे... सरांच्या सुरेल आवाजात रंगलेल्या अंताक्षरीच्या मैफिलीमुळे.

या संपूर्ण महायज्ञात विशेष कौतुक करावेसे वाटते ते सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या क्रिएटिव्ह हेडचे.थर्माकॉलमधून निर्माण झालेल्या अक्षरांची जी सुंदर आणि भव्य कलाकृती अक्षरयज्ञात दिमाखात उभी होती त्याचे संपूर्ण श्रेय या सावंतवाडीच्या मुलांना. सरांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याचे मार्गदर्शनाचे ऋण त्यांनी ज्या पद्धतीने फेडले ते पाहून नक्कीच सरांच्याही डोळ्यांत दोन आनंदाची आसवे नक्कीच उभी राहिली असतील.ऋण म्हणण्यापेक्षा सरांबद्दल वाटणारे प्रेम होते ते.सरांच्या जीवनावर, कार्यावर  आधारित 'अद्वैत ' हा सुंदर माहितीपट आमच्यासमोर प्रस्तुत झाला तेव्हा साक्षात सरांबद्दल वाटणारा आदर मनात एका पायरीने आणखी उंचावला.जगातला कोणताही गुरु अशी गुरुदक्षिणा मिळाल्यास खरेच धन्य होईल.चांगल्या गुरुइतकेच चांगले शिष्य मिळणेही भाग्याचे असते. आणि या बाबतीत सर खरेच समृद्ध आहेत हे आज जाणवत होते.अच्युत पालव हे सुलेखनाच्या क्षेत्रात जितके नावाजलेले त्याहीपेक्षा अधिक माणूस म्हणून आदर्श व्यक्तिमत्त्व आहे असे मी म्हणेन. त्यांच्याकडून शिकण्यासारखे कॅलिग्राफीसोबतच आणखी बरेच काही आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात आल्यानंतर अनुभवले.उत्तम संवादातून अधिकाधिक माणसं जोडत राहणं हा त्यांचा सर्वात मोठा छंद. आणि त्यामुळेच ते सर्वांचे लाडके बनले आहेत. स्वबळावर अवकाशापर्यंत हात पोहोचलेले असून सुद्धा पाय मात्र अजून जमिनीवरच टेकलेले आहेत... हे काहीजणांनाच जमते. सामान्यांसोबत सामान्य राहूनच असामान्य स्थान निर्माण करणे यांच्याकडून शिकले पाहिजे.मी या कलेच्या महासागरात सामावू पाहणारी एक सामान्य नदी...माझ्यातील उपजत कलागुणांना या विशाल विश्वात स्वैर साकारू इच्छिणारी. आज या महासागराचा एक भाग असल्याचा मनापासून खूप अभिमान वाटतो. अद्वैत म्हणजे साक्षात ब्रम्ह...ज्याचे दर्शन या महान कलाकाराच्या अभूतपूर्व कलाकृतीत प्रत्येक क्षणी घडते.त्याचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे त्या क्षणी प्रस्तुत झालेले जन-गण-मन....अच्युत सरांच्या विश्वातून झालेले... सामान्यांच्या पलीकडले.

आज तिसरा म्हणजे या अक्षरयज्ञाचा शेवटचा दिवस. तिसरा दिवस सुरु झाला तो अरुंधती जोशी यांच्या व्हायोलिनवरच्या स्वरांसोबत. नवरसांचे अभूतपूर्व दर्शन आम्हाला त्या वाद्यस्वरांतून आज घडले... खरेच एक अद्भूत अनुभव. शांत रसापासून सुरु झालेले स्वर पुढे शृंगार , वीर ,हास्य रसांपर्यंत आमच्या मनांवर अधिराज्य गाजवत होते. आणि त्यांच्या सहवासात सर्वांनीच खूप छान काम केले, अगदी जे कालपर्यंत गोंधळलेले होते त्यांनी सुद्धा.... अशी रोख पावती अच्युत सरांकडून मिळाल्यावर सर्वानाच या कार्यशाळेत आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नवनीतचे मालक श्री. अनिल गाला यांची तिथे उपस्थिती ही आमच्यासाठी विशेष आनंदाची बाब होती. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज आम्ही सर्व हा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकलो होतो. त्यांना आमचे काम पाहून कौतुकही वाटत होते आणि आनंदही. खरेच या सर्वासाठी त्यांचे आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून विशेष आभार. खूप सुंदर आणि प्रेरणादायी कार्यशाळा अशी झरझर संपत चालली होती... पण तरी आज शेवटचा दिवस असूनही तसे मुळीच जाणवत नव्हते. उलट अंगी संचारलेला नव्या उत्साहामुळे कामाला आज खरी सुरुवात झाली असे माझ्याप्रमाणेच अनेक जणांचे मत होते. या दोन दिवसांत ज्या नवरसांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो ते सारे आज कुठे जरा तरी समजूउमजू लागले होते, कागदावर उमटले जात होते.



शेवट समीप आला तसे आम्हाला सर्व रंग, साहित्य आवरून ठेवायला सांगण्यात आले. पण तरी त्या गोष्टीसाठी कोणीही तयार होईना. काम करण्यासाठी अजूनही उत्साही असलेल्या आपल्या सर्व मुलांना पाहून सरांनीही एका वेगळ्या पद्धतीत आम्हा सर्वांकडून आजचा शेवटचा स्ट्रोक मारून घेण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपापले कागद एकमेकांशी जोडून एक सलग कागद थोड्या अवधीतच डोळ्यांसमोर निर्माण केला. सरांनी एक-दोन-तीन म्हणताच अरुंधती जोशींच्या वाद्यस्वरांच्या सोबतीत एकीने तिच्या कागदावर रंगाने भिजलेला फटकारा मारला...तिच्या शैलीत. जिथे तिचा वार संपला होता तिथे पुढच्या विद्यार्थ्याचा स्ट्रोक सुरु होऊन तो पुढच्या कागदापाशी येऊन थांबला. आणि अशाप्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याने मारलेल्या विविध शैलीतील , विविध रंगांतील स्ट्रोक्सचे एक सुरेख वलय निर्माण झाले.... तेही अवघ्या १५-२० सेकंदांत. या प्रयोगात सर्वानीच खूप आनंद लुटला. मुलांच्या म्हणण्यामुळे या प्रयोगाला वन्स मोर मिळाला. आणि दुसऱ्यांदा त्याहीपेक्षा सुंदर कलाकृती सर्वांनी घडवून आणली.

दुपारचे दीड वाजले. पॅलेट, ब्रशेस पाण्यात धुतले गेले . रंग सर्व बॅगेत बंद होऊ लागले.रंग उधळणारे हात आता आपापली चित्रे गोळा करून बांधून घेण्यात मग्न झाले होते. कुठेतरी फोन नंबरची देवाणघेवाण सुरु होती तर कुठे पुढच्या वाटचालीविषयी चर्चा. जेवणे झाली. ठरल्याप्रमाणे सर्वजण हॉलमध्ये पुन्हा एकत्र आली. आता तो हॉल कालपासून मांडलेल्या कागदांशिवाय,इथे अवतरलेल्या चित्रांशिवाय, रंगांशिवाय अपूर्ण वाटत होता. पण या अपूर्णतेला सुद्धा पूर्णत्त्वाकडे घेऊन जाणारा ऊर्जेचा , कलेचा स्रोत तिथे मध्यभागी उभा होता. सर्व विद्यार्थी अच्युत सरांभोवती गराडा घालून बसले... आता पुढे ते काय सांगतील या उत्सुकतेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकाच वेळी अनेक भाव गर्दी करत होते. सरांनी विचारले सुद्धा ," अरे काय झाले ? तुम्ही सर्वजण असे दिग्मूढ का दिसताहेत ? या प्रश्नाला एकमताने मिळालेले उत्तर ... 'मनात विरह रस वाहत आहे ' . खरेच ३ दिवसांत खूप जवळीक निर्माण झाली होती. कित्येक जणांनी ही कार्यशाळा ३ ऐवजी ५ दिवसांची का नाही अशी खंतही व्यक्त केली. खूप प्रश्न , खूप उत्तरे ,सल्ला मसलत झाली. आणि त्या संवादातून पुन्हा नवचैतन्याची कारंजे निर्माण झाले. सरांच्या हस्ते कार्यशाळेचे प्रमाणपत्र हाती घेताना समाधान व आनंद हे दोन्ही भाव एकत्र येत होते. संध्याकाळच्या समोसा पार्टीसोबतच या ३ दिवस सुरु असलेल्या कार्यशाळेची सफल सांगता झाली.


- रुपाली ठोंबरे

2 comments:

  1. Very nice! Felt like I was a part of it.

    ReplyDelete
  2. Beautifully expressed! It was like watching the event live and living every moment of it...

    ReplyDelete