Pages

Tuesday, June 30, 2015

दिवसातून ५ मिनिटे काढू ५ नव्या मित्रांना शोधण्यासाठी…

लहानपणी बा बा मा पा पासून सुरु होते आपली सर्वांचीच या जगातल्या सर्वात सुंदर अशा 'शब्द' या देणगीशी  ओळख.अगदी प्रथम हे एकाक्षरी बोलच आपले संवादाचे साधन. आणि या बोबड्या बोलांचा आपल्या वडिलधाऱ्याना वाटणारा केवढा तो आनंद .

थोडे मोठे झालो कि, अ आ इ … क  ख ग  या मुळाक्षरांपासून सुरु होत पुढे या अक्षरांना योग्य काना ,मात्रा , वेलांटीने सजवत शब्दांची सुंदर रचना शिकत जातो . तेव्हा नवीन शब्द शिकणे , त्याचा अर्थ समजून घेणे , योग्य ठिकाणी वापरून सर्वांना अचंबित करणे हा जणू छंदच. रोजच्या व्यवहारातील असे खूप शब्द बालपणीच्या मित्रांप्रमाणे आपल्या मेंदूत जमू लागतात. मग शाळा ,कॉलेज जसजसे पुढे शिकत राहू रोज नवनवीन शब्दमित्र भेटत राहतात. आणि अशाप्रकारे हा मित्रपरिवार वर्षानुवर्षे पुढे वाढत राहतो. जितक्या भाषा जास्त तितका विविध शब्दसंचय आपल्या ठायी. एखादया खऱ्याखुऱ्या मित्राप्रमाणे जेव्हाही गरज पडेल हे शब्द लगेच सहाय्य करण्या धावून येतील. कधी समजवण्यासाठी ,कधी सल्ला देण्यासाठी तर कधी कोणतीही भावना व्यक्त करण्यासाठी नेहमीच हे शब्द आपली साथ देतात.आपण जितके नवीन वाचू ,ऐकू तितका हा अमुल्य मित्रपरिवार वाढत जातो.

रोज रात्री आकाशात असंख्य दिवे लागतात आणि त्यासोबतच पृथ्वीवरचे दिवे मालवतात . आणि शांतपणे निजणाऱ्या या जगासोबत आपणही झोपेची वाट पहात पडून राहतो क्षणभर . पण अशा वेळी कधी असा विचार मनात आला का कि आजच्या दिवसात आपण नक्की काय शिकलो

बहुतेकवेळा आपल्या या प्रश्नाला खूप उत्तरे असतीलही पण कधी कधी आपण निरुत्तर असतो कारण तो दिवस काहीही शिकवताच गेलेला असतो. खरे तर शिक्षण सुरु असताना रोज नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो .पण एकदा का नोकरीच्या रहाटगाड्याला आपले जीवन बांधले गेले कि मग मात्र कित्येक दिवस तेच तेच काम करत असताना नवे काही शिकण्याचेच  विसरून जातो. आणि  मग बुद्धीला गंज चढावा असे आपले होऊन जाते.

माझ्या मते जीवन म्हणजे एक अखंड शाळा जिथे कायम काहीतरी शिकत राहिले पाहिजे. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण हे  वाचन ,नवे शिकणे विसरून जातो आणि या संचयाची वाढ  जणू खुंटून जाते. काही वर्षांपूर्वी मला एकाने एक छान गुरुकिल्ली दिली होती ती आज तुम्हाला सांगावीशी वाटते. रोज जास्त नाही फक्त ५ नवे शब्द अर्थासहित शिकावे . प्रत्येकाने हे करून पाहायला काहीच हरकत नाही . झाला तर कधीतरी फायदाच होईल यात तिळमात्रही शंका नाही. आपण रोज वर्तमानपत्र वाचतो ,नवीन पुस्तके वाचतो,बरेच काही ऐकतो  तेव्हा असे अपरिचित सापडलेले शब्द दुर्लक्षित करून पुढे जाण्याऐवजी त्यांना थोडे गोंजारावे ,त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा ,मागे कधी काही ओळख होती का हे पडताळून पहावे आणि नाहीच आपल्या सान्निध्यातला वाटला तर इतर कुणाला सांगून पाहावा ,कुठेतरी शोधून पाहावा मला खात्री आहे या नवीन मित्राचे नाव,गाव अर्थ नाते सर्व नक्कीच कधीतरी गवसेल.

विचार करून पहा , रोज ५ शब्द म्हणजे आठवडयाला ३५ , एक महिन्यात १५० आणि  एका वर्षात १८२५ नवीन शब्द. डिक्शनरी घेवून बसलो तर एवढे शब्द शिकायचे म्हणजे अंगावर काटाच उभा राहील आणि हे अशक्यच असे मानून आपण ते झटकून टाकू . पण "थेंबे थेंबे तळे साचे " या उक्तीप्रमाणे रोज ५-५ असे शब्दज्ञान मिळवले तर आयुष्यात आपण भाषेत बरेच प्रवीण होवू . मग ती भाषा कोणतीही असो . शब्दसंचय मुबलक असेल तर कोणत्याही भाषेवर व्याकरणाची योग्य साथ घेवून प्राविण्य मिळवू शकतो.आपले मत योग्य प्रकारे मांडणे ही माणसाची नेहमीच एक खूप मोठी गरज आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात देखील. आणि हे या शब्दरुपी मित्रांच्या साथीनेच शक्य आहे .

मग चला तर आजपासूनच दिवसातून ५ मिनिटे काढू ५ नव्या मित्रांना शोधण्यासाठी… 

म्हणतात ना जगाला ज्ञान देण्यापूर्वी आधी स्वतःपासून सुरुवात करावी . मी ही तेच केले आहे . माझ्या  "umatlemani .blogspot.in " या ब्लोगमध्ये माझे शब्दकोश हे पान म्हणजे माझ्या अशाच नव्या शब्दमित्रांचा परिवार जो असाच वर्धावा दिवसेंदिवस हाच एक ध्यास . 

- रुपाली ठोंबरे

Sunday, June 28, 2015

तव नयन दर्पणी पहाते मी मला, पाहताना मी तुला

आपले प्रेम समोर उभे असूनही ते व्यक्त न करता येणार्‍या एका प्रेयसीची निरागस कथा


तव नयन दर्पणी पहाते रे मी मला |
पाहताना मी तुला ||

स्पर्शता प्रेमभरी नजर तुझी,ती अबोल भाषा |
नकळता थरथरली ओठांची रेषा ||

श्वास थांबले क्षणभर माझे ,पाहिले तुला जेव्हा |
भान न उरले माझेच मला तेव्हा ||

उघड-मिटणारी नयनांची दले,संवाद असा अपुला |
समजुन घेई तू मला नि मीही अचूक तुला ||

तू सामोरी माझ्या तरी का मैलांचा दुरावा |
विरह नको आता तरी माझाच तू असावा ||

वाटते हळूवार शिरावे मिठीत मी तुझिया |
प्रेमगीत सहज म्हणावे कानी मी तुझिया ||

चूक अघटित घडता काही काय सांगू मी जगाला |
उमगताच ही भीती सावरावे मी मलाच स्वत:ला ||


-रुपाली ठोंबरे

Tuesday, June 23, 2015

महीदर्शनी मेघास आठवे गतजन्मीचे नाते ....

विज्ञानात जलचक्र आपण सर्वानीच शिकलेले आहे. नदी सागराला समर्पित होते ,तिच्या जलाचे बाष्पात रुपांतर होते त्याचे आकाशी जावून ढगांत रुपांतर होते .वाऱ्यासोबत हे मेघ मुक्तपणे संचार करत असतानाच त्यांच्या दुष्टीस वैशाखाच्या उन्हाने होरपळून गेलेली पृथ्वी पडते . आणि क्षणात त्याला गतजन्मीचे तिच्यासोबत असलेले प्रेमाचे नाते आठवते . तिचे हे ओझरणारे रूप पाहून नकळत मेघांच्या नयनीही अश्रू ओघळू लागतात आणि थेंब थेंब करत या साऱ्या धारा तिच्याकडे धावतात. तीही हा आकस्मित झालेला चमत्कार पाहून क्षणभर भान हरपते , मुग्ध होते. या मिलनाचा सुगंध दाही दिशांत पसरवत, नव चैतन्य या जगी पसरवते. नवे तृण ,नव्या पालवी  जन्मतात . एखाद्या फुलाप्रमाणे ती हिरवी शाल पांघरत सौंदर्याने फुलून जाते. पावसाच्या या पाण्याने नदीचा जलस्तर पुन्हा वाढू लागतो आणि भविष्यातील पुढच्या अशाच भेटीसाठी तयार होतात.

अशी विज्ञानात गवसलेली एक अनोखी प्रेमकथा म्हणजेच तुमचा आमचा प्रिय पाऊस …।



सरितजलाने सागरी मिळावे
अलगद झेप घेत आकाशी भिडावे
श्वेत अभ्र नील गगनी जन्मावे
शीत समीर अवचित वहावे ।।

मेघास वाऱ्याने हळूच बिलगावे
क्षणात पालटावे नभ घेत रंग नवे
कृष्णरंगात न्हात आकाशी झुलत राहावे
वाऱ्यासंगे दशदिशांत स्वैर रचावे ।।

महीदर्शनी आठवे गतजन्मीचे नाते
प्रेमाचे बंध पुन्हा हळूच जुळावे
ओसरत्या सौंदर्यात आत्म झिजावे
बेभान मुक्त वावरता कधी थकावे ।।

घेत विसावा पर्वती जरा टेकावे
पहात  प्रेयसीस असे आत झुरावे
नकळत डोळ्यांत आज उभी आसवे
धारांत थेंब अनंत बनून प्रियेपाशी धावावे ।।

प्रथम स्पर्शी तिनेही मुग्ध व्हावे
मातीच्या सुगंधात नवे रंग भरावे
सर्वांगावरी नवे प्राण उमलावे 
उमलत्या पुष्पापरी पुन्हा फुलावे ।।

हरित तरंग सबंध पसरावे
धवल क्षीर निर्झरी वाहावे
पर्जन्ये या सरितजल वर्धावे
प्रियकरां पुन्हा असेच भेटावे ।।

- रुपाली ठोंबरे.

 

Monday, June 22, 2015

"मी"- एक स्त्री …. प्रश्नांच्या असंख्य वलयांनी वेढलेल्या बिंदूपाशी थांबलेली.


मी एक निरागस तितकीच सहनशील,सौम्य तितकीच कतृत्ववान,प्रेमळ तितकीच कठोर अशी या पुरुषांच्या जगात वावरणारी देवाची एक अनमोल देण -एक स्त्री .

या जीवनपटावर विविध भूमिका साकार करीत मी आजही तुम्हा सर्वांमध्ये अस्तित्वात आहे . मुल जन्माला येते आणि मी आईच्या ममतेने त्याच्या जीवनाची या जगातील सर्वात गोड आणि अमुल्य अमृताच्या पान्ह्याने सुरुवात करते . जरा मोठे होत असताना बहिणीच्या वेड्या मायेने त्याच्यासोबत खोडकर बाल्याचा आनंद घेते . त्याचे सुख - दुःख समजून घेवून त्याला योग्य ठिकाणी योग्य सल्ला देणारी जिवाभावाची मैत्रीण बनते . तारुण्यात पदार्पण करताच सौख्य,आनंद, यांना गोंजारत विश्वासाची साथ देत त्याची सहचारिणी बनते. आणि नंतर कधी गोंडस ,निरागस बाळ म्हणून त्याच्या पदरात देवाची अमुल्य देण या रुपात त्याच्या जीवनात प्रवेशते. माझ्या रूपातील एक धागा प्रत्येक पुरुषाच्या जीवनात त्याचे जीवनवस्त्र विणत अखंडपणे कार्यरत आहे . कालानुरूप या धाग्याचे रूप बदलते पण मी एक स्त्री  नेहमी कोणत्या ना कोणत्या रुपात त्याच्यासोबत असते. पण मी खरच खुश आहे ? मी सुरक्षित आहे? मला काय वाटते हे कोणी समजून घेण्यासाठी या जगात आहे? अशा असंख्य प्रश्नांनी माझी सर्व रूपे आज जणू वेढून गेली आहेत.

आज या जगात आई ,बहिण , मैत्रीण ,पत्नी या सर्व नात्यांत मी जितकी हवीहवीशी वाटते तीच कधी कधी त्याला मुलगी म्हणून इतकी नकोशी का असावी या प्रश्नाचे योग्य पटण्याजोगे उत्तर कधी तरी मिळावे ही एका स्त्रीची,माझी अपेक्षा.आयुष्यात सर्व प्रकारच्या सुखांसाठी तो नेहमी देवीपुढे गुडघे टेकतो . पण याच देवीचे रूप म्हणून घरी जन्मास आलेल्या मुलीचे स्वागत आनंदाने का होऊ नये ? असे म्हणतात कि माणूस जन्माला येतो तो त्याचे नशिब घेवून .पण दरवर्षी हजारोंच्या संख्येने भृण हत्येस बळी  पडणाऱ्या त्या चिमुरड्यांच्या नशिबाचे काय?का त्या नशिबवान नाहीत ? पण एक उत्तुंग स्वप्न उराशी बाळगून नवचैतन्याने या जादूमयी जगात स्वतःचे नशिब अजमावण्यासाठी आलेल्या या इवल्याशा कन्येला साधे जगण्याचीही संधी दिली जात नाही. कधीकधी तर ज्या जगात येण्यासाठी त्या इतक्या उत्सुक असतात, त्याच जगात तिचेच आपले तिचा या जगात होणारा प्रवेश नाकारतात . मी "बाबा, मला वाचवा" म्हणून खूप हाका मारते पण पुत्रप्राप्तीसाठी आसुसलेल्या बापाला साधी माझी किंचाळी ऐकू येत नाही किंवा तो न ऐकल्याचे नुसते ढोंग करतो. मुलीच्या आगमनाने आनंदाने पेढे वाटणारा बाबा पहिला कि खूप हायसे वाटते .

 हेही तितकेच खरे कि काही घरात मुलींना लक्ष्मीच्या रुपात आनंदाने स्वीकारले जाते पण खुपदा अशा घरांतही एक महत्वाचा मुद्दा दृष्टीक्षेपास पडतो आणि तो म्हणजे घरामध्येच होत असलेला मुलामुलींमधला भेदभाव. आज जर आपण "जे एक मुलगा करू शकतो तेच एक मुलगी करू शकते " हे मान्य केले असले तरी घराघरांमधील हे वातावरण कधी बदलणार . चांगले अन्न ,चांगले कपडे,शिक्षण या सर्व गोष्टी मुलगा असो वा मुलगी, त्यांना एकसमानच मिळायला हवी. त्यांच्यामध्ये दुराभाव असूच नव्हे.माझी अशी ही केविलवाणी अवस्था आणि त्यावेळी मला काय वाटते याचा कोणी तरी विचार करत असेल का ? आजही कित्येक कुटुंबांमध्ये मला येणाऱ्या या अनुभवामुळे मी खूप संकोचित होते.

लग्न झाल्यावरही नव्या संसाराचे सुंदर स्वप्न मनी गुंफून मी एका नव्या घरात गृहप्रवेश करते . घर,तिथली माणसे ,वातावरण ,चालीरीती सर्व वेगळे असले तरी मी ते सर्व आपलेसे करून घेते. पण तरी हुंडा हवा म्हणून किंवा वंशाचा दिवा हवा म्हणून होत असलेला माझा छळ आजही कित्येक ठिकाणी सुरूच आहे .

पुरुषांच्या या जगात खरेच स्त्री किती सुरक्षित आहे? वर्तमानपत्रातील रोजच्या बातम्या पाहता मी घरात किंवा बाहेर अजिबात सुरक्षित नाही हे अगदी अचूक समजू शकेल . आज शिक्षणानिमित्त , कामानिमित्त सतत घराबाहेर असणारी मी सतत एका अनामिक भीतीमध्ये वावरत असते. प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नजरांना सामोरी जाताना घरात किंवा बाहेर कुठेही आणि कोणत्याही क्षणी  काय होईल याची कल्पनाच अंगावर शहारे आणतात . आणि कधी असे काही अघटित घडले तरी मला किती न्याय मिळेल याची खरेच काहीच शाश्वती नाही . कारण बहुतेक वेळा दूषण हे मलाच लावले जाते मग परिस्थिती काहीही असो. अशा समाजाकडून मी काय अपेक्षा करावी हेच कळेनासे  झाले आहे.

आजची स्त्री हि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालू शकत असली तरी नोकरीच्या ठिकाणी ,समाजात वावरताना मला खुपदा दुय्यम स्थान मिळते. का?

खुपदा घरी,बाहेर सतत होत असलेल्या अशा मानसिक ,शारीरिक छळाला कधीतरी पूर्णविराम  लागायलाच हवा. अशी मी खूप घाबरलेली , बावरलेली ,एक नवा आधार शोधत विचारांच्या ,प्रश्नांच्या ,शंकांच्या अनंत वलयांमध्ये बिंदूपाशी थांबलेली आहे.स्वतःचे या जगात असलेले अस्तित्व शोधत आहे. माझ्यातील स्त्रीशक्ती उत्तेजित करून स्वतःच येणाऱ्या अशा संकटांवर मात करण्यासाठी सज्ज होत आहे.

- रुपाली ठोंबरे .

Tuesday, June 16, 2015

या अमृतधारांत नटली धरा जणू वधू लाजरी...

पहिला पाऊस आणि दोन जीवांचे मिलन एक अनोखे नाते , आणि या संगमात होणारी ती भेट खरेच एक स्वर्गमयी अनुभव देते.

यमुने तीरी भर दुपारी
वाट पाहत उभा तो शाम मुरारी
पदर सावरी जरतारी डोईवरी
लपत छपत येते ती राधा बावरी ।।

नदीत तरंग उन्हं पांघरी
सूर्यकिरणांच्या स्वर्ण चादरी
वारा लबाड मुग्ध गायन करी
जले निर्मित हजार लहरी ।।

मन धुंद करी हरीची बासरी
राधाही डुले शीश खांद्यावरी
सप्तसुरांत गुंग दुनिया सारी
सृष्टीही होई हासरी नाचरी ।।

अवचित मेघ सावळे गगनांतरी
वारा बेभान अंगा देत शिरशिरी
काय अघटित घडे हे या प्रहरी
क्षणात स्तब्ध राधा - श्रीहरी ।।

नाजूक मोत्यांच्या साखळ्या अंगावरी
स्पर्शता राधा गिरकी घेई गर्र्कन हर्षभरी
झेलीत मोतियांच्या सरींवर सरी
चिंब भिजली राधाकृष्णासवे  गोकुळनगरी ।।

दूध सांडत भिजल्या त्या हरित गिरी
अनंत पदरी सर रुपेरी चौफेर दुरवरी
पाचूच्या शालीत नटली वृक्षवल्ली,धरा सारी
गंध मातीचा सुगंधी दशदिशांत वास करी ।।

कर्णमधुर घुंगुरगायन, रव हे या शुभ्र निर्झरी
सोहळ्यात या, रंगीत मयुरपिसारा नृत्य करी
या अमृतधारांत नटली धरा जणू वधू लाजरी
दिवे दवांचे पानोपानी दिवाळी पावसाळी साजिरी ।।

कोसळणाऱ्या पावसात उसळल्या लाटा दूर सागरी
चिंब राधा घेत निरोप परते माघारी
सावरी डोईवरी त्या चार मधू घागरी
नजर मागे फिरत चाले सामोरी जाण्या परत घरी ।।


- रुपाली ठोंबरे

Thursday, June 11, 2015

यातच दडले ध्यानाचे गूढ सारे

ध्यान म्हणजेच meditation हे प्रत्येकासाठी खूप हितकारी आहे. ध्यान म्हणजे नक्की काय ? ज्ञात मनाचा अज्ञात मनाशी होणारा संवाद . एखाद्या स्वच्छंद पाखराप्रमाणे जिथे तिथे भिरभिरणाऱ्या मनाला शांत करून , नियंत्रित करून स्वतःचे अस्तित्व समजून घेणे आणि आनंदी जीवन व्यतीत करणे.

पापण्यांची मिटता दारे
अंधारात मन बावरे
किलबिलती हजार पाखरे
दशदिशांत झेपावती सारे ।।

विचारांचे येत-जात वारे
मनास अनंत देत शहारे
धुंद होवून क्षणात भिरभिरे
पाखरू मनाचे स्वच्छंद फिरे ।।

प्राणाची ती संथ स्पंदने
एकाग्र मनी मुग्ध श्वासाचे गाणे
पाहून स्वतःचे वैश्विक रूप देखणे
सूक्ष्मात हळूहळू विलीन होत जाणे ।।

प्रकाशाच्या झोतात न्हाणारे
सर्वांगावर वाहताहेत शुभ्र झरे
अपादमस्तक साऱ्या पेशींचे
जीवन फुले नवचैतन्याचे ।।

कोण मी , परिपूर्ण मी, समजून सारे
मनी चमकणारे नवप्रेरणांचे तारे
दिव्य शक्तीचे उलगडून पेटारे
जीवन अमृताचे ज्ञान घ्या रे ।।

तेजोवलयात या दर्पणी
कल्पनांचे प्रतिबिंब लोचनी
स्तब्ध होवून ईश्वरचरणी
सौख्य वसावे ठायी हीच मागणी ।।

ज्ञात-अज्ञात मनाची भेट अशी रे
यातच दडले ध्यानाचे गूढ सारे
प्रतिदिवशी ध्यानामृत पिऊन हे
चिरतारुण्याचे ध्येय साध्य करा रे ।।

-  रुपाली ठोंबरे.

Monday, June 8, 2015

एक कप चहा ...

सकाळी सकाळी उठल्याबरोबर हातात हवा असतो - गरमागरम असा एक कप चहा . जिवलगांच्या,मित्रांच्या  सोबत गप्पा मारत घोट घोट घेतलेल्या वाफाळलेल्या चहाची चव काही न्यारीच असते . आणि यात मिळणारी मजा काही औरच असते…. ही मज्जा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच  हवी.


एक कप चहा
जरा घेवून तर पहा
जीवनाची हर तऱ्हा
जरा जगून तर पहा ।।

रोज उठताच होते पहाट
घेवून येते थंडीची लाट
आळसावलेल्या मनाला
येते चैतन्याची ऊब
जेव्हा येतो हातात
गरमागरम एक कप चहा ।। 

जीवलगाच्या सोबतीत
आठवून गतयोजना उर्वरित 
दिवसाला करा सुरुवात
नव्या कल्पना पुन्हा रंगवीत
घोट घोट घ्या सोबत
निवांत एक कप चहा ।।

गरम गरम चाय गरम
टपरीत या जर तब्येत नरम
टोस्ट अन खारीच्या संगतीत
चहा उभा कसा पहा ऐटीत
किटलीतून काचेचा ग्लास
भरतो एक कप चहा ।।

दगदगीच्या जीवनातून
काढून वेळ जरा निवांत
कामांमधल्या त्राणातून
डोके करण्या जरा शांत 
मिळून मित्रांच्या सहवासात
 घ्या एक कप चहा ।।

उकळत्या पाण्यात दूधाची साथ 
साखरेची गोडी ,मन मोहवी क्षणात 
चहा भुकटीत रंगला आल्याचा स्वाद
लहानथोरांनीही घ्यावा या चवीचा आस्वाद
एकदा तरी घ्या आयुष्यात
वाफाळलेला एक कप चहा ।।


- रुपाली ठोंबरे




Tuesday, June 2, 2015

जग तिचे प्रकाशात , पण…ती सदा असते अंधारात ।।



Dedicated to all women


घरात मंद प्रकाशात तेवणारी मातीची पणती घराला एक मंगलमयी रूप प्राप्त करून देते . ती नेहमी चोहीकडे अंधाऱ्या खोलीत प्रकाशाची उधळण करत असते . तिच्या सानिध्यात अंधारात चाचपडलेल्याला योग्य दिशा मिळते आणि पुढचे सर्व सुकर होते. पण सर्वांना प्रकाश देण्यात समाधान मानणारी ती स्वतःकडे लक्षच देत नाही. ती कायम अंधारात उभी असते तिच्या खाली तिचीच सावली तिला प्रकाशापासून दूर ठेवते. सर्वांसाठी अखंड तेवत राहताना तिची वात कधी झिजते, कधी तिच्यातले तेल संपुन जाते हे तिलाही कळत नाही पण ती त्रास देणाऱ्या वाऱ्यालाही न जुमानता शेवटच्या ज्योतीपर्यंत सर्वांना प्रकाश देण्यासाठी झटत असते आणि यातच तिचे समाधान असते …अशीच असते घरातली गृहलक्ष्मी. जोपर्यंत तिच्या अंगात त्राण आहे ती अगदी उत्साहाने घरातल्या प्रत्येकासाठी झटत असते . कधी उपदेशाचे बोल सांगून सर्वाना योग्य दिशा दाखवते कधी स्वतःतल्या प्रेरणादायी ज्योतीने घराला मंदीर बनवत असते . पण हे सर्व करताना ती खुपदा स्वतःचा विचार करतच नाही. 'कुटुंबाचे सुख त्यातच माझे सुख' मानणारी ती अखंड घरातील प्रत्येकाच्या मनात घर करून आनंदात समाधानाने नांदते .पण स्ञी ही पण एक मनुष्य आहे तीला पण या जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे. सर्व त्याग फक्त स्ञीनेच करावा हि मानसिकता बदल झाली पाहिजे समान संधी समान दर्जा समान अधिकार मिळाले पाहिजेत.आणि तिला नेहमीच योग्य स्थान मिळायला हवे .


देह सुगंधी मातीचा दिसायला देखणी ।
आल्या घरा आणते ती सुख-समृद्धीच्या खाणी ।।

काळोख्या खोलीत देते प्रकाशाचे दान ।
तिच्या अस्तित्वाने घर दिसे मंगलमयी छान ।।

कधी अपुरी साथ कधी वाऱ्याचा झंजावात।
तेला-वातीच्या साथीने अखंड तेवते ती आनंदात ।।

देवापुढे शोभते ती लक्ष्मीच्या रुपात ।
सुख तिचे दडले सर्वांच्या कल्याणात ।।

स्वतः तेलात भिजून झिजत राहते तिची निस्वार्थ वात ।
जग तिचे प्रकाशात , पण…ती  सदा असते अंधारात ।।

तिच्या अशा अमुल्य अस्तित्वाचे,जीवनाचे ठेवून भान ।
तिला देवून योग्य मान, मिळावे तिला नेहमीच योग्य स्थान ।।


- रुपाली ठोंबरे .