Monday, August 31, 2015

"सांस्कृतिक कट्टा".

अलीकडेच आमच्या परिसरात घडवून आणलेली एक नवी कल्पना अनुभवण्यात आली. ती म्हणजे काही साहित्यिक, विभाग प्रमुख ,रसिक यांच्या अमुल्य सहकार्यातून नुकताच सुरु करण्यात आलेला "सांस्कृतिक कट्टा".

तर हा सांस्कृतिक कट्टा म्हणजे काय ? थोडक्यात सांगायचे झाले तर , एक अशी सांस्कृतिक चळवळ ज्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत, कलेचे सर्वच पुजारी सामील होवू शकतात. खरे तर माझ्या 'इवल्याशा मूठीत' या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकामध्ये एक तरी कला असते. वत्कृत्व ही त्यांपैकीच एक कला. जी खरेतर व्यावसायिक दृष्टीनेही अतिशय उपयोगी. अनेकांना खूप काही बोलायचे असते, विविध कल्पना सुचत असतात पण ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध नसते. घरच्यांसमोर वा मित्रमंडळी , आप्तेष्ठांमध्ये आपले विचार मांडावे तर ते तेवढे रसिक असले पाहिजेत नाहीतर ' सदा पकवणारी व्यक्ती 'असे कायमचे लेबल लागते. तर अशा कलाप्रेमींसाठी सांस्कृतिक कट्टा म्हणजे एक आपलेसे वाटणारे व्यासपीठ. इथे स्वैरपणे समाजातले विषय ,इतिहास , विज्ञान या संबंधांतले कोणतेही मनातले विचार सर्वांपुढे मांडता येतील , चर्चा करण्यास वाव मिळेल, सर्वांसमोर उभे राहून बोलण्याने एक नवा आत्मविश्वास अंगी संचारेल. आणि या सरावाने व्यक्तिमत्त्व नक्कीच समृद्ध होईल.

शिवाय प्रत्येक वेळी खास बोलावण्यात येणाऱ्या पाहुण्यांकडून ज्ञानाची जी अमुल्य शिदोरी प्राप्त होते त्याची गोडीच निराळी. येणारा हा पाहुणा एखादा डॉक्टर असेल किंवा साहित्यिक किंवा आणखी कोणत्यातरी क्षेत्रातील निपुण वक्ता आणि यांचे विचारही तितकेच नैपुण्य प्राप्त करून देणारे.

मला तर ही कल्पना खूपच आवडली. खरेच ज्यानीही ही कल्पना मनात आणून हकिकतेत आणली त्यांचे शतशः आभार  आणि पुढच्या वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा. असे सांकृतिक कट्टे राज्याच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाले तर कुठेतरी लय होत जाणाऱ्या मराठी भाषेला नवी उभारी मिळेल,नागरिकांच्या विचारांना योग्य वाचा फुटेल, कुठेतरी दडलेला इतिहास आणि विज्ञानातील रहस्ये यांचा मागोवा घेऊन प्रत्येकात लपलेल्या जिज्ञासू वृत्तीला नवी प्रेरणा मिळेल आणि अशा प्रकारे या उपक्रमातून राज्यातील सर्वांचेच व्यक्तिमत्त्व उत्तमरीत्या दिवसेंदेवस फुलत जाईल. योग्य खतपाणी मिळाले, जोपासना झाली कि पिके आपोआपच उत्कृष्टपणे भरभरून येतात आणि असे हे तरारून आलेले शेत आनंदाचं अनोखं देणं देवून जातं. गरज आहे ती फक्त - योग्य जाणीवेची ,योग्य निर्माणाची ,योग्य विचारांची ,नवे काही शोधण्याची आणि उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसादाची .

- रुपाली ठोंबरे. 

Wednesday, August 26, 2015

इवल्याशा मुठीत ....

मला वाटते, नुकतेच जन्मलेले मूल प्रत्येकाने एकदातरी पाहिले असेलच. त्या नवजात शिशूचे इवलेसे हात आठवतात? त्याच्या मुठी अगदी आवळलेल्या असतात .जणू काही तरी दडवून गच्च मिटलेल्या असतात.कधी विचार  का असे? काय असेल त्या मुठीत ? तर या मुठीच्या रहस्येची सुंदर कल्पना अशीही होवू शकते ना कि , देव आपल्या लेकराला इतक्या दूर पृथ्वीवर एकटे पाठवतो तेव्हा तो काळजीत असेलच. तेव्हा स्वरक्षणासाठी आणि जीवन जगण्यासाठी एका कलेची शिदोरी त्याने या मुठीत दिली आहे . आपल्या प्रत्येकामध्ये जन्मतः एखादी तरी कला असतेच. गरज आहे ती फक्त ही मूठ उघडून त्या बांडगुळाला योग्य विकसित करण्याची . सुंदर रंगांचे फुलपाखरू बनण्यासाठी प्रेरणा देण्याची आणि मग पहा या स्वच्छंद सृष्टीत तो कसा आनंदात जगेल आणि जगी आनंद पसरवण्या पात्र ठरेल.देवाने दिलेल्या अशा देणगीचा शोध घेऊन तिला फुलवणे स्वतःच्या आणि इतरांच्याही हिताचेच. 


एवढयाशा बाळाच्या
इवल्याशा मुठीत
दडला कोणता खाऊ

उघडून मूठ मोकळी
या हातात आहे काय
ते चला आता पाहू

पाठवताना धरतीवर
आपल्या लेकराला
असे एकटे एकटे

देव देतो त्याच्या ठायी
लढण्या बळ जगण्यासाठी
आणि कलेचे एक दुपटे

मोठे मोठे होता होता
जगता जगता हे जीवन
थांबतो मी एका क्षणाला

हळूच काढून वेळ थोडा
मूठी उघडून पाहू दोन्ही
काय वेगळेपण दिले मला

उलगडून इवल्या मुठीच्या
बोटांच्या नाजूक पाकळ्या
गवसलेले प्रतिभेचे फुलपाखरू

स्वच्छंद बागडण्या या जगी
रंग नवे उधळण्या या जगी
उत्सूक ते ,  त्यास दिशा देऊ 

दिशाभूल न व्हावे ते कधी,
त्याला योग्य विकसित करू
 जग प्रफुल्लीत करू ,
                   सृष्टी हर्षमय करू


- रुपाली ठोंबरे

Monday, August 24, 2015

मानसपूजा

२-३ दिवसांपूर्वी मानसोपचार तज्ञ, डॉक्टर मंगेश जोशींचे "स्वसंमोहन " या  विषयावरचे व्याख्यान ऐकण्याचा योग चालून आला आणि जीवनात एका नव्या गोष्टीची अनुभूती आली .तीच आज इथे सांगावीशी वाटते. 

आजच्या धकाधकीच्या काळात खूपच दुर्लभ मनुष्य असा दिसेल जो "मला टेन्शन नाही "असे बोलताना आढळेल. चौथी-पाचवीच्या इयत्तेतील लहानग्यांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत प्रत्येकजण  कोणत्या न कोणत्या टेन्शनमध्ये जखडलेला असतो. मग कारण काहीही असो .मानसिक आणि शारीरिक शक्ती क्षीण झाल्यानंतरही हा टेन्शनरुपी राक्षस सतत माणसाचा पाठलाग करत असतो. मग त्यावेळी यातून मुक्त होण्याचा साधा सोपा माणसाने शोधलेला मार्ग म्हणजे कायम देव-देव करणे. रोज देवपूजा ,आठवड्यातून २-३ उपवास ,दूरदूर तीर्थस्थानांची वारी. पण खरेच हे इतके गरजेचे आहे ?यापासून खरी मनःशांती मिळेल ? संतानीही वेळोवेळी हेच सांगितले आहे कि देव हा देवळात नाही तर माणसातच तो वसलेला आहे.
                                                    शोधिसी मानवा राऊळीं, मंदिरीं
                                                     नांदतो देव हा आपुल्या अंतरी।।
'वंदना विटणकर' यांच्या याच गीतबोलांशी निगडीत असा एक नवीन विषय या व्याख्यानाच्या माध्यमातून जाणून घेण्याचे भाग्य लाभले. तोच आज इथे मांडण्याचा प्रयत्न मी करते आहे. आणि तो विषय म्हणजे एक ध्यानाचा क्वचितच माहित असलेला प्रकार - मानसपूजा.

आपण प्रत्येकजण थोडेबहुत आस्तिक आहोतच. पण बहुतेक जण तुम्हाला असे आढळतील जे सतत देव देव करत असतात .अगदी अभिमानाने सांगत असतात , 'मी देवपूजा केल्याशिवाय घराबाहेर पाऊलही ठेवत नाही ','मी सकाळचा पहिला चहा देवासमोर दिवा लावल्यानंतरच घेते.'अगदी आपल्याही घरी रोज सकाळी चांगली साजरेसंगीत पूजा केली जाते. पण ती करताना आपण खुपदा ते एक दिवसाचे काम म्हणून करत असतो. ही पूजा करत असताना लक्ष घरातल्या दहा ठिकाणी एकवटलेले असते. आरती करत असताना मध्येच एखादा फोन आला कि "मी थोड्या वेळाने फोन करतो' हे सांगण्यासाठी तरी निदान सेकंद दोन सेकंद खर्च करतो . पूजा करत असताना अचानक गृहिणीला आठवते 'अरेच्चा ! कूकर लावले आहे आणि ३ शिट्ट्या झाल्या कि लगेच एखाद्या जबाबदार गृहिणीप्रमाणे ती कुणालातरी गैस बंद करण्याची ऑर्डर सोडते. ९:१० ची लोकल पकडायची आहे असा विचार मनात घोळवत सुरु असलेल्या पूजेत देवापेक्षा घड्याळाचे दर्शन अधिक वेळा घेतले जाते. आता तुम्हीच सांगा या अशा देवपूजेत तुम्ही तुमच्या देवाशी किती एकरूप असता? हे कित्येकदा केवळ एक प्रदर्शनच, असे वाटत नाही का ?

हे तर प्रत्येकाला ज्ञात आहे कि माणसाची दोन मने असतात - बहिर्मन आणि अंतर्मन. मग ईश्वर म्हणजे आपले अंतर्मनच. ज्या शक्तीमुळे आपले जीवन सुरळीत चालले आहे तिच्या ठायी स्वतःला पूर्णपणे समर्पित होऊन नतमस्तक होणे म्हणजे खरी देवपूजा. स्वतःलाच शोधून समजून घेतले कि जीवनातील कितीतरी अडचणी कमी होतील यात शंकाच नाही. आणि हीच खरी ईश्वरसेवा.

खरे पहाता मंदिरातील किंवा देव्हाऱ्यातील मूर्ती म्हणजे निव्वळ एक धातूचा ठोकळा आहे. मूर्तिकाराच्या कल्पनेतून साकारलेले एक रूप ज्याला आपण उद्या जावून देव म्हणतो. मूर्तीकाराला वाटले या ठोकळ्यापासून दत्ताची निर्मिती करावी आणि दत्ताची मूर्ती निर्माण होते. हे सर्व आणि त्या मूर्तीची पूजा हे मानसिक समाधानासाठीच असते. पण असे खरे मानसिक समाधान हे कोणतीही मूर्ती समोर नसताना , कोणत्याही मंदिरात किंवा तीर्थस्थानी न जाताही मिळवता येते. ते कसे ?तर मानसपूजेच्या माध्यमातून.…आपण कुठूनही ,कधीही देवाची पूजा करू शकतो.

मानसपूजा म्हणजे स्वतःच्या मनःचक्षुंनी केलेली पूजा. मनः चक्षू म्हणजे मनाचे डोळे. आपल्या मनातील डोळ्यांनी आपल्याला हव्या त्या देवाची हव्या तशा पद्धतीने पूजा करणे आणि समाधानरूपी आशीर्वाद मिळवणे, हेच मानसपूजेचे स्वरूप.

हा प्रयोग करून पहायला काहीच हरकत नाही. तर यासाठी काय करावे लागते हे समजून घ्या आणि करून पहा. प्रथम डोळे मिटून शांत बसा. जागा ,वेळ यांतील कशाचेच बंधन नाही. आता डोळ्यांसमोर तुमच्या घरातला देव्हारा आणा. त्या देवांच्या मूर्ती पहा. आता जशी तुम्ही खरोखर पूजा करता तशीच पूजा करत आहात  अशी कल्पना करत स्वतःच्या मनातील डोळ्यांनी ती करत असताना स्वतःला पहा. देव्हारा पुसून घेणे ,कालची फूले निर्माल्यात ठेवून देणे हे सर्व केल्यावर नित्याप्रमाणे देवमूर्तीना ताम्हणात घ्या आणि मग पाण्याचा ,दुधाचा पुन्हा पाण्याचा अभिषेक करून त्यांचे स्नान करा ,स्वच्छ कपड्याने पुसून घ्या , पुन्हा देव्हाऱ्यात मूर्ती आसनाधीन करा. गंध ,हळद, कुंकू ,फूले आदी वाहून पूजा करा. दिवा ,उदबत्ती लावून वातावरण सुगंधी आणि  प्रसन्न होवू द्या. आरत्यांच्या सहवासात स्वतःला तल्लीन करून घ्या. तुमच्या देवाशी अगदी आपल्या मात्यापित्याप्रमाणे सर्व सांगा. मनापासून जशी हवी तशी पूजा केल्यानंतर आता तुमचे डोळे उघडा आणि आता स्वतःच या पूजेतील रहस्य अनुभवा. रोजच्या देवासमोर उभे राहून केलेल्या पूजेपेक्षा कितीतरी अधिक समाधान मिळाल्याचा प्रसन्न भाव तुमच्या ठायी नकळत जन्म घेतो. आणि हे करत असताना तुम्ही आणि तुमचा देव यामध्ये दुसरे कोणीही नसते.तुम्ही पूर्णपणे देवाशी एकरूप असतात , त्यामुळे त्यातून मिळणारा आनंदही खूप मोठा असतो. आणि हाच मानसपूजेतून मिळणारा समाधानरूपी गोड आशीर्वाद. 

अशाप्रकारे, फक्त देव्हाऱ्यातील देवाचीच नव्हे तर सबंध पृथ्वीतलावरील कुठल्याही धार्मिक क्षेत्रातील देवतेचे दर्शन तुम्ही कधीही आणि कुठूनही घेवू शकता. तुम्हाला वाटले कि शिरडीला जावून साईना भेटावे ,तुम्हाला वाटले कि समर्थांचे  दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जावे किंवा तुमच्या कुलदेवतेची पूजा करावी . मानसपूजेतून हे सर्व कधीही आणि कुठूनही सहज शक्य आहे. इतके दूर पायपीट करत जाऊन ,रांगांत तासनतास उभे राहून मिनिटभरही प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही हा अनुभव तर सर्वानीच घेतला असेल. पण तुम्ही मानसपूजा करून या हातही न लावता येणाऱ्या देवाला स्वतः अभिषेक करून स्वतःच्या आवडीचे वस्त्र परिधान करू शकतात. हवी तेवढी त्यांची सेवा करू शकतात. अगदी देवाचे  लेकरू ,म्हणून त्याच्या मांडीवर बसू शकतात. आपल्या आई वडिलांवर जसा हक्क दाखवतो तसे हक्काने जे हवे ते सांगू शकता. तेव्हा देवाची भीती उरत नाही. तिचा हात स्वतः आपल्या डोक्यावर घेऊन जेव्हा आशीर्वाद घेता तेव्हा एक सकारात्मकता आपल्या शरिरात प्रवेशते. आणि हा अनुभव म्हणजे खरेच अवर्णनीय असतो. याचा आस्वाद घेण्याचा एकदा तरी प्रयत्न करा आणि याची अनुभूती तुम्ही स्वतःच घ्याल यात शंकाच नाही.

अशाप्रकारे, धारणा, ध्यान आणि समाधी हे मुख्य ३ प्रकार. त्यातली समाधी अवस्था ध्यानाच्या विविध टप्याटप्यात प्रवास करत शेवटी प्राप्त होते. आणि ही समाधी अवस्था स्वसंमोहनाच्या माध्यमातून लगेच मिळवता येते . पण यासाठीही कठोर साधना अवश्यक असते.


-रुपाली ठोंबरे

Thursday, August 20, 2015

श्रद्धांजली


मालवलेली प्राणज्योत तुझी
धगमगते या हृदयी आजही

गर्द आठवणींच्या दाटीत जगी 
तू जिवंत अमुच्यात अजुनही,  

दीर्घ दुराव्यात हा जीव कधी
रांगतो दुःखात भाववेडा होवूनी

गर्दकाळ्या मन-मेघांतुनी
आसवांचा पाऊस बरसून येई

कोसळणाऱ्या पाऊसधारांतही
पाहुनी उमलणारी एक कळी

लागता चाहूल मग नव आशेची
तगमग क्षीण होई या मानसी

आठवांत जन्मे पुन्हा स्वप्ने पाहिलेली
स्वप्नपूर्तता हीच तुज मजतर्फे श्रद्धांजली

- रुपाली ठोंबरे

Friday, August 14, 2015

स्वातंत्र्यदिनी असेही काही साजरे करून पहावे .

आजकाल स्वातंत्र्य दिन असो किंवा प्रजासत्ताक दिन , तो साजरा करण्याचा एकच सोपा प्रकार . बाजारात मिळणारे तीन रंगांतले वेगवगळे आकार दिवसभर हाती किंवा छातीवर मोठ्या अभिमानाने घेवून सगळीकडे मिरवायचे आणि तो दिवस गेला कि एक अनावश्यक गोष्ट म्हणून कुठेतरी कोपऱ्यात किंवा इथे तिथे टाकावे . काय उपयोग अशा देशभक्तीचा ? त्या पेक्षा मनातल्या हृद्यकप्प्यात राष्ट्रध्वजाचे दर्शन घ्यावे, इतिहासातला हा दिवस नव्याने जागून पहावा आणि क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त वाया न जावू देण्याची प्रतिज्ञा करावी. 


ध्वज घेता हाती आठवावे
वीर अनेक, देशभूमीसाठी रक्त सांडणारे
हात हजारो, दिवस-रात देशासाठी राबणारे

इतिहासात थोडे जगून पहावे
अहिंसेचे धडे पुन्हा नव्याने गिरवावे
अन्यायाशी लढण्या स्वतःच पुन्हा शिकावे

स्मरून क्रांतीकाऱ्यांस ध्वजापाशी नमावे
देशभक्ती-गीत कायम उरात साठवावे 
घेऊन प्रेरणा स्वतःस नव्याने घडवावे

घेत शपथ मायभूमीची, स्वतःस सांगावे
"राष्ट्रध्वजाचे स्थान सदा जगी उंचावे
असे काही करण्या तत्पर नीत व्हावे

आदराचे भाव नेहमी मनीही बाळगावे
तिरंगा म्हणून हाती घेतलेले सारे
आजही अन उद्याही पायी न ते यावे

जर उद्या न मिळेल स्थान योग्य अपुल्या ठायी
तर  देशभक्ती दाखवण्या नको विकत घेण्याची घाई
फक्त मनात स्मरून तिरंगा एकदा नतमस्तक व्हावे
                                         
समाजकल्याणा प्रयत्न करावे
तन-मन-धनाने भारतास जपावे
देशप्रेम सर्वार्थाने व्यक्त करावे "
                                                  स्वातंत्र्यदिनी असेही काही साजरे करून पहावे .


- रुपाली ठोंबरे

Monday, August 10, 2015

ओळख आपल्यातल्या दोन 'मी' ची

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !…

संदीप खरेंचे हे गाणे तुम्ही ऐकले असणारच . संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी हे हल्ली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले नाव. ते त्यांच्या गाण्यांच्या सुरेख मैफिलीमुळे - " आयुष्यावर बोलू काही ".ती नुसती मैफिलच नाही तर मनसोक्त जीवनाचा आनंद बहाल करणारी तहानलेल्या रसिकांना एका वाटेवर भेटलेली एक पाणपोईच !

खरेच आयुष्यावर बोलता बोलता हे दोघे थेट रसिकांच्या हृदयाला भिडतात. अगदी रोजचेच ,आपले असे वाटणारे आपल्या नकळत  समजून घेतात आणि आपल्या कानी बहाल करतात तो एक अमुल्य नजराणा….अर्थपूर्ण पण अगदी साध्या सोप्या शब्दांत गुंफलेल्या कवितांचा आणि तितकीच सहज सोपी चाल . अबालवृद्धांपासून सर्वांनाच सहज गुणगुणता येईल असेच काहीतरी खास. म्हणूनच त्यांच्या हजाराव्या प्रयोगालाही लहान चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांचीच खच्चून उपस्थिती जाणवली.

यांची प्रत्येक कविताच मनात खोलवर रुजते. माझे म्हणाल तर माझा दिवस सुरु होतो तो या कवितांनी आणि संपतो तोही यांच्याच सानिध्यात. पण त्यातली ही कविता अधिक प्रिय आहे मला . हे गाणे कितीदा तरी ऐकले असेल तुम्ही पण कधी आतला अर्थ जाणून मर्म ओळखण्याचा प्रयत्न केला ?

आपण स्वतःबद्दल 'मी' हे संबोधन अगदी सहज वापरतो . पण कधी या 'मी'ला ओळखले? खरेतर कवीने या कवितेत सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रत्येकातच दोन 'मी' असतात . एक नेहमी रडणारा ,कोणत्याही परिस्थितीतील वाईट बाजू अगदी अचूक ओळखणारा आणि मग अशा 'मी' ला सतत चिंता भेडसावत असते . एखादी अनामिक भीती कायम पाठराखीण म्हणून सोबतीला उभी असते . याउलट आपल्यात असाही एक 'मी' असतो जो सुख असो व दुःख कायम आनंदात, जणू दुःख ,वेदना ,काळजी या सर्वांशी त्याचे दूरदूरपर्यंत नातेच नाही. एक 'मी ' नेहमी क्षुद्र विचारांच्या काळोखात बंदिस्त झालेला तर दुसरा स्वच्छंदी मनाने मोकळ्या हवेत तरंगणारा. एक जिंकता-जिंकताही रडत राहतो तर दुसरा हरुनही आनंदात असतो . एक, सतत या न त्या मागण्या ,इच्छानी नवसांची बोली लावत सतावणारा तर दुसरा -

तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

या पंक्तीप्रमाणे देवाचेच धन्यवाद मिळवणारा.खरेच आपल्या एका बदलेल्या दृष्टीकोनातून देवाकडूनच आपले आभार प्रकट होत असेल तर त्या सारखा आनंद हजार सुखांतही मिळणार नाही .
आणि अशा सकारात्मक दृष्टीकोनातून जीवनवृक्षावर कधी नव्या संधींचे फाटे फुटतील आणि कधी ते आनंदाच्या फुलोऱ्याने बहरून जाईल हे आपले आपल्यालाच कळणार नाही. मग सुखाची टवटवीत फळे आपण होऊन झोळीत येवून म्हणतील " उपभोग आता हवे तेवढे ".

अशाप्रकारे आपल्यातला एक 'मी'च आपल्याला हवे ते आपल्या नकळतच मिळवून देईल. फक्त तो 'मी' सकारात्मक हवा कि नकारात्मक हे ज्याचे त्यानेच ठरवावे लागेल.

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परि चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या श्यामनिळ्याच्या मोरपीसापरी दिसतो !!!


***
Thursday, August 6, 2015

नवरस


प्रत्येकामध्ये स्थिर व शाश्वत स्थायी भावना असतात . हे सर्व स्थायी भाव कमीअधिक प्रमाणात प्रत्येकाच्या ठिकाणी असतात. हे स्थायीभाव चाळविले जाऊन नऊ प्रकारचे रस निर्माण होतात.जणू प्रत्येकामध्ये या नऊ रसांत चढाओढ सुरु असते. आणि यात विजय प्राप्त करणारा भाव चेहऱ्यारूपी सिंहासनावर विराजमान होतो. शरीराच्या पेशी न पेशी या भावनेच्या अधीन होवून जाते. आणि या रसात फक्त  व्यक्तीच नाही तर पूर्ण सभोवताल न्हावून निघतो. जीवनात स्वतः केंद्र असू तर आजूबाजूचा परिसर हा या वलयाचा परिघ. आणि नवरसांवर नियंत्रण मिळवून आपण स्वतःतच नव्हे तर इतरांतही योग्य बदल घडवून आणू शकतो.आनंदाचा दरवळ चहूकडे पसरवू शकतो.

 
प्रेमात मनाचा शृंगार सुंदर
आनंदाचे ओहोळ सबंध अंगावर

हास्य खळाळते वाहते शुभ्र निर्झर
ओसंडणाऱ्या आनंदाचे पूर अंगभर

अजाण सत्य उभे राहून समोर
अदभूत होई मन  भाव विभोर

विचारकल्लोळ चित्त अस्वस्थ
समाधीत भाव खरे शांत नेमस्त

राग तप्त मनाच्या विसंगतेत
जीवन उद्ध्वस्त कधी रुद्र भावनेत

संयम शरीर मनावर, न कधी हरे वीर
अभिमान नसनसांत ,कधी न खचे धीर

करुण होई मन दीर्घ होता वेदना
आसवांत विराव्या सौम्य संवेदना

मन ढगाळ सावळे भय-रूपच आगळे
अंतर्मनावर विजयी भीती कशी ना कळे

असमाधानी मनाचे रूप करी विमनस्क
किळसवाणी मुद्रा आणी भाव विभत्स

नवरसांचे चाले मनात संगर
विजयीश्रीची ध्वज लहर चेहऱ्यावर

भाव मनीचे थुईथुई नाचती अंगभर
ओसंडलेला रस सांडतो क्षणात जगभर

स्व-रसात डुंबून हरवतो तोही परीघ-परिसर
जीवनवलयाचे केंद्र-परीघ अबलंबून नवरसांवर


 - रुपाली ठोंबरे.

Wednesday, August 5, 2015

"जेथे जातो तेथे "प्राध्यापक,लेखक, कवी 'प्रवीण दवणे' यांचे "जेथे जातो तेथे " हे वाचण्यासाठी हातात घेतलेले पुस्तक म्हणजे  २६ छोट्या छोट्या रोजच्या जीवनातील कथांची गुंफलेली नाजूक माळच. या माळेच्या प्रत्येक फुलात एक वेगळाच गंध आहे , नात्यांचा ओला स्पर्श आहे.प्रत्येक चिंतन मालिका वाचताना त्यातले हवेहवेशे शब्द वेचताना ,आशयाचे मर्म मनात कोरताना आपण नकळत त्या कथेत स्वतःला पाहतो, जणू हे माझ्यासोबतही झालेच की . प्रत्येक कथा म्हणजे जीवनाचे एक व्यवहारज्ञान शिकवताना सोप्या शब्दांत मांडलेली एक सुरेख आरास.

थोडक्यात, हा कथासंग्रह म्हणजे

 • " त्या तिथे पलीकडे " च्या जुन्या आठवणींत डोकावताना आजच्या पिढीशी तुलना करताना शाळा सुटल्यावर अनेक वर्षांनी भेटलेले पन्नाशीतले मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर. 
 • सतत गोंगाटात राहणारा आणि शांततेचे नुसते स्वप्न पाहणाऱ्याला जेव्हा खरोखर अशी "शांती " प्राप्त होते तेव्हा "तुझ्या एका हाकेसाठी" आतुरलेला तो.
 • एका ठिकाणी अन्नावाचून जीवनाशी लढणारा जीव आणि दुसरीकडे या "पुर्णब्रम्हाचा  कडेलोट "करणाऱ्यांची ऐट. असे कालानुरूप बदलत जाणाऱ्या मानसिकतेमुळे आणि परिस्थितीमुळे दोन विभिन्न जगांत विभागलेले आजचे जग .
 • निराधार वृद्धांमध्ये स्वतःचे आईवडील शोधणारा एक "सहजीवनाचा महोत्सव "
 • मृत्यूनंतरही स्मशानापर्यंत सोबत असणारे "देवाचे हात "
 • नाती जपताना ज्या धीराच्या रियाजाची गरज आहे तो म्हणजे "आपला विश्वासू " म्हणताना वाटणारा खरा विश्वास.
 • " कसे करू स्वागता?" या विचाराने लेखकाने अनुभवलेल्या स्वागताच्या विविध गमतीशीर तऱ्हा
 • जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण परीक्षेपूर्वी " आनंदाची पूर्वतयारी " केली कि जीवन कसे सुखमय होते याची गुरुकिल्ली .
 • दहावीचा तो कृतज्ञतेच्या अश्रूंत भिजलेला " संवेदनांचा निरोप समारंभ "
 • आयुष्याच्या शेवटपर्यंत रडगाणे गात राहण्यापेक्षा अनुभवांचा दिवा हाती घेत इतराना रुपेरी भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे "डौल"दार ज्येष्ठपण.  
 • " त्याच वेळी … "जर केले असते तरअशी कुरकुर दुःखात असताना नेहमी करणारा तेव्हा अपेक्षित पण ईश्वरकृपेने घडलेल्या घटनांना आणि त्या थांबवणाऱ्याला  निश्चितच विसरतो. अनेक अनोळखी संकटांपासून वाचवणाऱ्या या शक्तीचे  स्मरण आणि आभार .
 • आपल्या पुढच्या पिढीने समोर ठेवलेले आदर्श आणि त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा यांतील विसंगतीमुळे गुरफटून गेलेला एक विद्यार्थी  शेवटी  पत्र लिहून  विचारतो  " सर , चुकतोय का मी ?". मुलांबद्दल नेहमी विचार करणाऱ्यांना विचार करायला लावणारे एक पत्र.
 • " नऊ म्हणजे साडेनऊ " असे गणित आखून एखादी पूर्वतयारी करणाऱ्यांच्या हातून होणारा वेळेचा अपव्यय दाखवून देणारे आणि वेळेची जाणीव करून देणारे काट्याविरहित एक अदृश्य घडयाळ .
 • वयाचे ४० वर्षे एखादा चांगुलपणा जोपासणाऱ्याकडून कधी कधी हा " चांगुलपणाचा दर्प" जेव्हा इतराना नकोसा वाटतो तेव्हा त्यातूनही शिकायला मिळालेलं काहीतरी.
 • " मनातल्या मनात " उमललेलं अव्यक्त जेव्हा हकीकतेत व्यक्त होतं तेव्हा त्यातून मिळणारं सूख किती लाख मोलाचं असतं याची जाणीव .
 • आजच्या जगात काळाच्या ओघात हरवलेली सुट्टीतील खरी मज्जा अनुभवास आणणारी " सुट्टीतील पाळणाघरं "
 • खरेतर जीवन म्हणजे जीवनाच्या प्रवासातील "ज्याचा त्याचा टाईमपास" च. तो कसा असावा आणि कसा असू नये याची सुरेख गुंफण.
 • जागरूक मुलगा किंवा मुलगी असेघराघरातले अर्जुन” कधी कधी चुकणाऱ्या पालकांनाही घडवू शकतात. हेही एक कटू सत्य दाखवणारा एक आरसा.
 • " स्वानंदासाठी वणवण " करण्यापेक्षा स्वतःतच ते दडले आहे हे कित्येकदा माणूस विसरतो. त्याला गवसणी घालण्यासाठी चाललेली धडपड .
 • मनात योग्य भावना ,दृढ निश्चय आणि उत्कंठता असेल तर "वाळवंटातही हिरवळ" निर्माण करता येते ही आशा .
 • नवरा आणि मुलगा यांच्याशी एकसमान नात्याच्या धाग्याने बांधले गेलेले "आईचे सॅंडविच " प्रत्येक घरी बघायला मिळते. अशा माऊलीचे अचूक चित्रण.
 • ५० वर्षांतील "भांडणातील पन्नाशी" उलटताना आलेल्या सांसारिक अनुभवातून आजच्या तरुण पिढीला दिलेले मार्गदर्शन .
 • आयुष्याच्या व्यवहारात " खर्चातील जमा " मिळवणेही किती महत्त्वाचे याची सुंदर उदाहरणे .
 • " सजण दारी उभा " म्हणत वाट पाहत तिष्ठत उभे मन वेडे आणि आपल्या हाकेला साद देत येणारा सुसाट ,विराट ,भन्नाट ,देखणा पण खराखुरा पाऊस.
 • प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्यातून उद्भवलेली " आयुष्याची प्रश्नपत्रिका "
 • " तू माझा सांगाती " म्हणत निखळ प्रेम , विश्वास आणि उसासा व्यक्त करणाऱ्या मैत्रीपूर्ण खांद्यासाठी आसुसलेल्या समाजाचा लेखकाने घेतलेला निरोप.

सर्वांनी वाचावे, समजून योग्य बोध घ्यावा,आचरणात आणावे असेच एक हलके-फुलके पण वास्तववादी आरसा दाखवणारे जीवन विकासाचे ध्येय साधणारे एक पुस्तक.

- रुपाली ठोंबरे

Blogs I follow :