Tuesday, September 20, 2022

मुंबईत जपानची सैर

जगात अनेक देश आहेत... प्रत्येकाची वेगळी भाषा, वेगळी संस्कृती. त्यांपैकी जपानच्या संस्कृती बद्दल नेहमीच एक वेगळेच आकर्षण असायचे. आणि योगायोगाने ही जॅपनीज संस्कृती अनुभवण्याची संधी २ दिवसांपूर्वीच मला मिळाली . एका मैत्रिणीकडून के जे सोमय्या या महाविद्यालयात 'टीचर्स असोसिएशन ऑफ जॅपनीज' च्या वतीने आयोजित केलेल्या 'जॅपनीज कल्चर सेमिनार' बद्दल माहिती मिळाली आणि आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला. 

१८ सप्टेंबर ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सुरु असलेल्या या कार्यक्रमात आम्ही दुपारी १ पर्यंत पोहोचलो. तिथे पोहोचताच एक वेगळीच लगबग सुरु होती. एकूण २ मजल्यांवरील विविध वर्गांत वेगवेगळ्या कार्यशाळा सुरु होत्या. सर्वप्रथम आम्ही कॅलिग्राफीच्या कार्यशाळेत प्रवेश केला. तिथे जॅपनीज कॅलिग्राफर हरूना तिच्या टीम सोबत सर्वांना जॅपनीज अक्षरांची ओळख करून देत होती. त्यांचा विशिष्ट हॅन्सी पेपर , ब्रशेस , शाई आणि विशिष्ट स्ट्रोक्स च्या साहाय्याने अक्षरे निर्माण करणारी ती कला... सारेच खूप आनंददायी होते. आम्ही सुद्धा काही अक्षरे त्याच पद्धतीने कागदावर उमटवण्याचा सफल प्रयोग केला. या सर्वात त्यांच्याशी बोलताना प्रामुख्याने जाणवला तो म्हणजे त्यांचा बोलण्यातला नम्रपणा. त्यांची संस्कृती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सफल प्रयत्न. हिरगाना, कटकाना किंवा कांजी असो ... आम्हाला अक्षरे फारशी कळत नव्हती परंतू तरीही ती निर्माण करताना खूप मजा आली. 

त्यानंतर आसपास सुरु असलेल्या ओरिगामी, इकेबाना , कॉई मेकिंग , कोकेशि डॉल्स, युकाता वेष परिधान , वागाशी , कराओके अशा विविध कार्यशाळांना भेट दिली . प्रत्येक ठिकाणी अगदी आनंदाने तो तो विशिष्ट प्रकार शिकवला जात होता. की-चैन आणि चॉपस्टिक्सवर आपल्या मनाने हवे तसे नक्षीकाम करण्यासाठी रंग उपलब्ध होते. त्याचप्रमाणे , कोकेशि डॉल्स च्या कार्यशाळेतसुद्धा योग्य मार्गदर्शनाखाली सुंदर वेष परिधान करणारे जॅपनीज बाहुल्या बनवण्यात खूप मज्जा आली. कॅलिग्राफी प्रमाणेच मला विशेष आवडलेली आणखी एक कार्यशाळा म्हणजे इकेबाना. मुळातच मला फुले आवडतात. त्यामुळे त्यांच्या विशिष्ट रचना करण्यात , त्यांबद्दल माहिती समजून घेण्यात समाधान वाटत होते. आजपर्यंत जॅपनीज प्रसिद्ध खाद्यप्रकार 'सुशी' हा फक्त ऐकून माहित होता . पण इथे तो कसा करतात ते पाहून तो खाण्याचा अनुभव सुंदर होता. रविवारची सुट्टी अशाप्रकारे मार्गी लावल्याचे समाधान आमच्या चेहऱ्यावर होते . काहीतरी नवीन अनुभवण्याची मजा काही औरच . 

हे सर्व पाहिल्यानंतर सहज एक विचार मनात येऊन गेला . चीन आणि जपान प्रमाणेच आपली भारतीय संस्कृती सुद्धा कितीतरी समृद्ध आहे.येथे प्रत्येक प्रांताचे वेगळे असे वैशिष्ट्य , भाषा , पेहराव, लिपी , कला, खाद्यसंस्कृती, इतिहास आणि नावीन्य आहे. मनात आणून कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास अशाप्रकारे किती काही करू शकणार. आपल्या संस्कृतीची ओळख जगभरात करून देण्यासारखे महत्त्वपूर्ण काम करणे हे देखील आपल्या देशाबद्दल आपल्या मनातील राष्ट्रप्रेम दर्शविण्याचा एक भाव आहे . विचार करा अनेक जमाती ज्या आजच्या युगात चाचपडत आहेत पण त्यांच्याकडे आपल्या इतिहाचा एक विशिष्ट वारसा आहे त्या सर्वाना एक रोजगार उपलब्ध होईल. आणि असे कार्यक्रम केवळ जगातील  इतर देशांतच नव्हे तर इथे देखील करण्याची आज  गरज आहे. पाश्चात्य संस्कृतीला कवटाळू पाहणारी आपली नवी पिढी आपल्याच संस्कृतीच्या काही विशिष्ट पैलूंपासून वंचित राहू नये हा या मागचा एक उद्देश. 

जशी आज मी मुंबईत जपानची सैर अनुभवली त्याचप्रकारे भारताची सैरसुद्धा सर्वांना अनुभवता यावी . 

- रुपाली ठोंबरे 

Thursday, July 21, 2022

सहस्त्रचंद्रदर्शन...मुलाच्या बाबांसाठी भावना

बाबा... ही दोन अक्षरे म्हणजे माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार 

जीवनातील प्रत्येक घडीला सोबत असणारा एक मोठा आधार 


इतरांसाठी शिक्षक म्हणून असणारे तुम्ही म्हणजे आमचा खरा मान 

जीवनशाळेतही ऊन-पावसातही सदा उंचावली इंद्रधनूची ही कमान 


प्रेम, शिस्त आणि माया यांचा आहे येथे त्रिवेणी संगम 

आई आणि बाबा हाच माझ्या प्रत्येक आनंदाचा उगम 


आज तुमचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजिरा सुंदर 

आप्तस्वकियांचे झाले आगमन आनंदाने उजळले हे घर 


तुमचा जन्मदिवस आहे आम्हा सर्वांसाठीच खूप खूप खास 

युगानुयुगे हा दीपक तेजाळत राहावा हाच या दिपकच्या मनाला ध्यास 


- रुपाली ठोंबरे. 

Sunday, February 6, 2022

स्वरलता


ओम नमोजी आद्या ।

य आणि ताल यांचा अप्रतिम मेळ होऊन स्वरबद्ध झालेला, कानी पडणारा सुमधूर सूर म्हणजे... गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर.लता ताई म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान... त्यांना पाहून नेहमी खात्री व्हायची कि खऱ्या अर्थाने  मराठी पाऊल पडते पुढे... 

या स्वरामृतांनी भरलेल्या मधुघटाने भारतातील प्रत्येक मनात गेली कित्येक दशके वसंत फुलवून अनेकांचे जीवन सुगंधित केले आहे. निश्चयाचा महामेरू असलेल्या प्रभो शिवाजीराजांच्या या आनंदवनभुवनी, लताताईंनी माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे असे म्हणत आपल्या स्वरातील हजारो गाण्यांनी सुरांचा अनोखा खेळ मांडीयेला आणि चहूकडे पसरला तो फक्त आनंदी आनंद. 

इतरांप्रमाणेच आले वयात मीसुद्धा हाच आवाज ऐकता ऐकता.चाफा बोलेना चाफा चालेना... बालपणी रेडिओवर ऐकलेले पहिले वहिले गाणे असेल... आणि बालगीतांसोबतच या बालमनात भावगीतांबद्दलही रुची निर्माण झाली. त्याकाळी ऐकलेले तिन्ही सांजा सखे मिळाल्या हे गाण्यास कठीण वाटणारे पण माझे हे सर्वात आवडते गाणे.घनतमी शुक्र बघ राज्य करी, गगन सदन तेजोमय, सुन्या सुन्या या गीतांचीही तीच कहाणी. 

शाळेत ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ही कविता अभ्यासाला होती तेव्हा त्या आवाजातील आर्तपणाने मन भरून आले...तोच आवाज झेंडावंदनाच्या दिवशी जयोस्तुते जयोस्तुते गाताना राष्ट्राभिमान जागृत करत असे. वेडात मराठे वीर ऐकले कि कुठून तरी नवे बळ अंगात संचारले जाई... एक नवा आत्मविश्वास जागृत होई. 

घनश्याम सुंदरा श्रीधरा हे बालपणी रोज सकाळी वाजणारे गीत...या गीतासोबत एक वेगळेच नाते होते. म्हणजे सकाळची सुरुवातच लताताईंच्या आवाजाने होई.  गजानना श्री गणराया , तुज मागतो मी आता या गीतांशिवाय तर गणेशोत्सव कधी झालाच नाही. गणराज रंगी नाचतो हे गाणे आजही कधीही ऐकले तरी गणपतीचे आत्ताच  घरात आगमन झाले आहे असा भास होतो. उठा उठा हो सकळीक या गीतात खरंच फक्त वाचेतून गजमुखाचे साक्षात दर्शन घडते. गणेशाप्रमाणेच विठ्ठल कळला तो याच आवाजातून. विठ्ठल तो आला आला म्हणत आजि सोनियाच्या दिनू सुंदर ते ध्यान, पंढरपूरीचा निळा साक्षात डोळ्यांसमोर उभा राहतो. संत ज्ञानेश्वरांच्या रचना आणि लताताईंचा आवाज...म्हणजे दुधात साखर. अरे अरे ज्ञानासी , रंगा येई वो येई चा तो आलाप असो वा पैल तो गे काऊ मधली ती अधीर आळवणी...कधी घनु वाजे घुणघुणा तर कधी वारा वाहे रुणुझुणु रुणुझुणु...या मधुर आवाजातील पसायदान ऐकताना मनाला एक वेगळीच शांतता जाणवते.संत तुकाराम रचित वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे गाणे ऐकताना खरेच आनंदाचे डोही आनंदतरंग निर्माण होतात... इतकी या सुरांत जादू. लाजली सीता स्वयंवराला  गाणे ऐकताना साक्षात ते स्वयंवर डोळ्यांसमोर उभे राहते जसे इंद्र जिमी जंभ पर ऐकताना शिवराज्याभिषेक सोहळा... आज गोकुळात रंग खेळतो हरी ऐकले कि आपोआपच पाय जागेवरच थिरकू लागतात आणि मनमोराचा पिसारा फुलू लागतो. विसरू नको श्रीरामा मला ऐकले कि अंतरीची हाक खरेच देवापर्यंत पोहोचते आहे असा विश्वास निर्माण होतो ... असा हा अमृततुल्य आवाज म्हणजे भावभोळ्या भक्तीची मधुर मुरली. 

भक्तिगीतांप्रमाणेच चित्रपट गीतांतही या आवाजाची मोहिनी काही औरच . कधी निळ्या आभाळी कातरवेळी असा बेभान हा वारा वाहू लागतो, श्रावणात घन निळा बरसू लागतो आणि चिंब पावसानं रान जागं होतं तेव्हा घन ओथंबून येति या गाण्यातला तो अवखळ आवाज रसिकाला स्वरलतेच्या मंत्रमुग्ध सूररसात नखशिखांत चिंब चिंब भिजवतो. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे ऐकताना खरंच सभोवतालच्या वेली ,फुल-पाने सारे सारे धुंद झाल्यासारखे वाटते . आज उदास उदास दूर असलेल्यालाही प्रश्न पडावा ...  बदलती नभाचे रंग कसे? आणि वाटू लागते  चित्र तुझे हे सजीव होऊन येईल भेटीला ... लागले पंख प्रीतीला. शाळेत एकदा स्पर्धेत मी प्रेमस्वरूप आई हे गाणे गायचे ठरवले... वर वर सोपे वाटणारे हे गीत फार कठीण... पण त्या गीतातून खूप काही शिकले. एखाद्या मुलीच्या जीवनातील तर प्रत्येक प्रसंगावर ताईंनी गाणी गायली आहेत. मेंदीच्या पानावर हे आणखी एक माझे प्रिय गीत. हे गाणे, हा आवाज कितीदाही ऐकलं तरी पुन्हा एकदा प्ले चे बटण दाबलेच जाते.जन पळभर म्हणतील हाय हाय पण तरी नाही कशी म्हणू तूला म्हणत एखाद्या प्रेयसीची व्यथा अचूक मांडली आहे. हसले गं बाई हसले या गाण्यातील नवतरुणीची प्रेमाची सुरुवात....लेक लाडकी या घरची, नववधू प्रिया मी बावरते, घेऊ कसा उखाणा  मधली नववधूची उत्सुकता... गंगा जमुना मधील पाठवणीची वेळ ... जय देवी मंडळागौर म्हणत फेर घेणारी, सप्तपदी मी रोज चालते म्हणत संसार चालवताना जीवनात  ही घडी अशीच राहू दे अशी इच्छा सदैव जोपासणारी ती आणि तिची कहाणी ....  लटपट लटपट या गाण्यातील ठेके असो वा वादळवारं सुटलं गो, माज्या सारंगा , माळ्याच्या मळ्यामंदी या गाण्यांतील तिची लगबग... अशी सारीच नाती, भावना या आवाजाने खूप छान सांभाळून घेतल्या. लतादीदींनी गायलेली अंगाई गीते सुद्धा किती गोड. नीज माझ्या नंदलाला,निजल्या तान्ह्यावरी माऊली , बाळा होऊ कशी उतराई, झुलतो बाई रास-झुला... घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे. अशा या  प्रसंग , भावना , वय जरी वेगळे तरी आवाज एकच ...तो म्हणजे लता ताईंचाच. 

चांद केवड्याची रात खूप वर्षांपूर्वी ऐकले होते आणि तेव्हापासून ते ओठांवर अगदी सहज विराजमान झाले. चांद मातला मातला  हे अशाच अजरामर गीतांपैकी एक.माजे राणी माजे मोगा ,तो एक राजपुत्र ,धुंद मधुमती रात रे रात रे, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं , शोधू मी कुठे कशी, या चिमण्यांनो परत फिरा रे, मी रात टाकली, संधीकाली या अशा,मी डोलकर, मजा लावताय डावा डोळा, भेटीलागी जीवा,अवचित परिमळू , ऐरणीच्या देवा ,मावळत्या दिनकरा ,भय इथले संपत नाही अशी एक ना हजार गीते... लता या दोन अक्षरांच्या नाजूक वेलीवर बहरलेली अजरामर अशी स्वरसुमने.  

देवाची इच्छा...आता विसाव्याचे क्षण आले... आणि डोळे पाण्याने भरले  

पण ही कोकीळ कुहूकुहू अनंत काळ गात राहील आणि आपणां सर्वांच्या आयुष्यात मोगरा असाच फुलत राहील.      

तरी पुन्हा एकदा  विचारावेसे वाटते, "हे स्वरलता... येशील कधी परतून ?"

पण शेवटी जो आवडतो सर्वांना , तोचि आवडे देवाला हे सत्य आपणही समजून घ्यायला हवे. आणि  म्हणूनच,

अखेरचा हा तुला दंडवत !!!

- रुपाली ठोंबरे 



Blogs I follow :