Sunday, May 28, 2017

जागर अक्षरांचा ||


बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम । पंढरीनाथ महाराज कि जय ।।
या जयघोषात अवघे आळंदीचे मंदिर दुमदुमत होते. आसपास भक्तांचा मेळा होता पण आज त्यातही काही विशेष होते. कारण भक्तीसोबत आज कलासुद्धा इथे अवतरली होती.
 विठ्ठल... अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि या विठुरायाकडे समस्त विश्वाच्या कल्याणाचे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर तेराव्या शतकातील एक प्रसिद्ध संत आणि कवी.
माझा मराठाचि बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके ।ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।।
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेचा अभिमान आणि महती व्यक्त केली. सरळ सोप्या रसाळ मराठी भाषेत भग्वदगीतेचे अनुवाद असो वा कर्मयोग,भक्तियोग आणि ज्ञानयोग सांगणारी ज्ञानेश्वरी असो त्यांनी अत्यंत सरळ सोप्या भाषेत शब्दरचना करून सर्वसामान्यांसाठी मराठी वाङ्मय साहित्याचे मोठे दार उघडले आहे. माझे आजोळ वैष्णवपंथीय वारकरी संप्रदायाचे असल्याने अगदी बालपणापासून विठू, ज्ञाना ,नामा ,तुका आमच्या परिचयाचे...कधी कथांमधून ,कधी अभंगांमधून तर कधी ओव्यांमधून...सतत माऊली आमच्या कानांवर आणि वाणीवर विराजमान असे. पण तरी आळंदीला जाण्याचा योग कधी चालून आला नाही. परंतु , ज्याची मी कधी स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती असा सुवर्णयोग आज कॅलिग्राफीच्या माध्यमातून घडून  आला. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपाशी आपली कला सादर करून दरवर्षी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या वारकऱ्यांसाठी अक्षरसेवा करावी...असे स्वप्न सुद्धा किती सुंदर. पण हे हकिकतेत घडत होते. आम्ही एकूण २० जण आमचे गुरु अच्युत पालव सरांबरोबर तिथे आमची कला आणि रंग-कुंचले घेऊन 'जागर  अक्षरांचा' सादर करण्यास हजर होतो.
'जो जे वांछील तो ते लाहो' 
असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इंद्रायणी काठी संजीवन समाधी घेतली आणि हे स्थान पावन केले. आज आम्ही सर्वानी या पवित्र समाधीचे दर्शन घेऊनच आमच्या अक्षरसेवेला सुरुवात केली. पुष्प-तुळशीपत्रांचे प्रसन्न सुगंध वातावरणात दरवळत होते सोबत होता माऊली नामाचा गजर. ५० फूट लांबीचा कोरा कागद मंदिराच्या आवारात असा लांबच्या लांब अंथरला गेला आणि भाविकांची गर्दी जमा झाली. सर्वांसाठीच एक अनोखा आणि नवा अनुभव होता. मधोमध निलेश जाधव यांच्या हातातील कला विठ्ठलाचे रूप घेत होती तर त्यांच्या मनीचे माऊलीविषयीचे भाव भक्तीचे सुंदर रंग त्यात भरत होते.त्या विशाल कागदाच्या एका बाजूने शिवच्या हातून दिंडी नाचत येत होती. टाळ-मृदूंग आणि पावलांच्या तालावर निर्माण होणारा ताल आज भक्तांना डोळ्यांनी अनुभवास येत होता. डोईवर तुळस आणि उंच गगनी लहरणारा माऊलीचा केशरी झेंडा घेऊन टाळ वाजवत पुढे पुढे चालणारी दिंडी सर्वांचेच मन वेधून घेत होती.अच्युतसरांच्या अतिशय सुंदर आणि वळणदार अक्षरांतून
 " देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेला ।।" 
हे संतवाणीचे बोल जिवंत होऊन या विश्वेश्वराचा महिमा सांगत होते. एरव्ही टाळ-मृदूंग-अभंग-भजनांच्या नादात दुमदुमणारे ते स्थान आज प्रथमच रंगले होते - भक्तीच्या रंगानी. 
त्यानंतर या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेला रंगसोहळा सुरु झाला आणि सारीच मने रंगांत चिंब चिंब झाली.भर पावसात आषाढी वारी करत कितीतरी मैल चालत वारकरी आळंदीत येतील. तेव्हा या पावसात एक छत्र त्यांच्यापाशी असावे या भावनेतून ही वारकऱ्यांच्या छत्र्यांची कल्पना जन्मास आली. पण अशा विठ्ठलभक्तीत चिंब भिजलेल्या वारकऱ्यास एखादी काळी छत्री दयावी ? यापेक्षा एक सप्तरंगी कल्पना सुचली आणि तीचेच प्रत्यक्ष रूप आज इथे आमच्या हातून साकार होत होते. पांढऱ्या शुभ्र छत्र्या एकापाठोपाठ एक अच्युतसरांच्या शिष्यांच्या हातून रंगत होत्या. लाल,पिवळ्या,हिरव्या ,निळ्या जांभळ्या अशा रंगांचा सडा चहूकडे सांडला जात होता. कुठे थेंबांची नक्षी होती तर कुठे पांडुरंगाच्या कपाळावरचा टिळा...कुठे दिंडीपताका रंगत होते तर कुठे विठ्ठल रुक्माई सजत होती...कुठे विठू माऊलीचा गजर होता तर कुठे संतवाणीचे रसाळ बोल... अशा मोत्यासारख्या टपोऱ्या अक्षरांत संतांचे तेजस्वी शब्द त्या रंगीत छत्र्यांवर बरसत होते.मे महिन्याच्या भर दुपारी इथे रंगीत फुलांचा ताटवा असा अचानक फुलून यावा असे तिथे सुकण्यासाठी ठेवलेल्या छत्र्यांना पाहून वाटत होते.


क्षणाक्षणाला विठू नामाने रंगत जाणाऱ्या छत्र्या पाहून कितीतरी भाविकांना एक नवा हुरूप आला. जणू त्यांच्यातील कलाकार जागा होत होता.लहान असो वा मोठा ,कलाकार असो वा नसो, पण आज मनामनांतून पाझरणारा भक्तीचा झरा तिथे प्रत्येकाच्याच हातांतल्या कुंचल्यांतून ओसंडून वाहत होता.  दर्शनासाठी आलेल्या अशा कितीतरी भक्त मंडळींनी अशाप्रकारे पावसाचे स्वागत करण्यात आणि ही अक्षरसेवा करण्यात रस दाखवला. सुमारे २-३ तास हा अक्षरांचा आणि भक्तीचा पाऊस आळंदीत कोसळत होता. आणि या रिमझिम रंगांच्या चिंब धारांत भिजून सारी मने समाधानी आणि आनंदी होऊन वारकऱ्यांसाठी ही अक्षरसेवा करण्यात धन्य होत होती.त्यावेळी मनात एकच भावना रासरंग खेळत नाचत-गात होती,
आजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ।।
हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ।।

- रुपाली ठोंबरे.
 

Friday, May 19, 2017

एका हव्याशा उत्तरासाठी

काळजाच्या प्रत्येक ठोक्यासोबत 
घड्याळातला काटा पुढे सरकत होता 
आणि त्या प्रत्येक सेकंदासोबत 
आठवणींचा पर्वचा ओळीओळीनें 
दृष्टिपटलावर पुढे जात होता 
कधी वाटे पूर्वी तीच चुकली 
कधी वाटे नाही, सारे जगच चुकले
या चुकामुकीच्या जगात शेवटी 
जीवनाचे कटू सत्य ती मात्र कळून चुकली 
ज्यांच्याकडून घोटभर मधाची अपेक्षा केली 
त्यांनीच विषाचा प्याला बनवून का समोर ठेवला?
का तिच्यासोबतच असे घडत गेले हे मात्र कळेना
आयुष्यात नकळत कुठे ती चुकत गेली हेच कळेना
या प्रश्नाचे उत्तर शोधताना 
घड्याळातले सारे काटे एकमेकांना 
कितीदातरी आता भेटून  गेले 
भूतकाळी घटनांचा वर्तमानातल्या जीवनाशी 
आणि वर्तमानाचा भविष्यातील स्वप्नांशी 
मेळ घालता-घालता कधीपासून ती स्तब्ध होती   
बेरीज -वजाबाकीची कितीतरी गणिते 
समोर तिने हजार वेळा मांडून पाहिली 
गुणाकारच नव्हे तर पुन्हा पुन्हा भागाकारही 
करून पाहिला... एका हव्याशा उत्तरासाठी 
पण बाकी तीच...एक आकडा वजेला घेऊन 
शेवटी शून्य मात्र अजून जीवनी नाही या समाधानाने 
त्या वजा बाकीतही आयुष्य नवे ती शोधू लागली 
एखादा हातचा घेऊन भविष्याचा पाढा पुन्हा गिरवू लागली. 


- रुपाली ठोंबरे .

Friday, May 12, 2017

स्वप्नदर्शी


एक कलाकार...स्वप्नदर्शी
                    स्वप्नांना हकिकतेत अचूक उतरवणारा 
                    कल्पनांचे मनोरे जगासमोर उभारणारा 
                    मनामनांचे गुपित जाणून सहज मांडणारा 
                    कुंचल्यांच्या स्पर्शांनी रंग रंग उधळणारा 
                    रेघा-बिंदू-ऊन-सावलींशी मनसोक्त खेळणारा 
                    कलाकृतीने आपुल्या जग दंग-बेधुंद करणारा
                    अगदी शुन्यालाही या जगी मूल्य बहाल करणारा 
                    उघड्या डोळ्यांना कल्पनेपलीकडचेही दाखवणारा
                    मनाच्या झरोक्यातून कल्पनांच्या कवडश्याना
                    कोऱ्या कागदावर उमटवणारा... एक जादूगार
           
                                                                                                                           - रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :