Thursday, July 21, 2016

पांथस्थ


ओळखी-अनोळखी रस्त्यांवरून चालताना 
एखादा अनोळखी पांथस्थ अचानक भेटतो 
पुढे एकाच वाटेवरून सोबत चालताना 
तो अनामिक नकळत आपलासा वाटू लागतो


गप्पांच्या सागरात उसळत हास्याच्या लाटा 
क्षणाक्षणाला आनंदाचं लेणं तो उधळत असतो 
कधी हरलेल्या मनास दाखवत यशाच्या वाटा  
आसवांच्या पलीकडचे हृदय तो सावरत असतो 


घडलेल्या चुकांची बेरीज-वजाबाकी करताना 
स्वतःच बनून आरसा तो माझेच बिंब दाखवतो 
गुणाकार-भागाकारातच न गुंतता तो नाते जपताना 
बाकी काहीही उरली तरी मार्गदर्शनाचा तीर बनतो 


पुढे अनोळखी वाटेवरून असेच बराच वेळ चालताना 
झालेली त्या हिरवळीची सवय अधिकाधिक दाट होत जाते 
अनुभवांच्या शेतांतून त्याच्यासवे पुढेपुढे सरसावताना 
माझ्याच हरवलेल्या आत्मविश्वासाला नव्याने मी भेटत जाते 


असेच हसत-खेळत सोबत चालत राहताना 
अचानक एक नवा रस्ता समोर दृष्टीस पडतो 
मन कासावीस होते पुन्हा समोर पाहताना 
कारण पांथस्थ त्या नव्या रस्त्यावर आता उभा असतो 


निरोप घेतो स्वीकारलेल्या नव्या मार्गावर चालताना 
आठवणींच्या बागेत विहरताना मीही नवे जग जगू पाहते 
परि वाटेत येणारा प्रत्येक जुना-नवा अडथळा पार करताना 
त्याच्या विचारांची शिदोरी नित उघडत राहते... 
                                      .... स्वतःच स्वतःला प्रोत्साहित करत राहते. - रुपाली ठोंबरे . 


Friday, July 15, 2016

दर्शनात तुझिया...
दर्शनात तुझिया मी भेटे श्रीरंगा
धन्य तयातच जाहले, मी पांडुरंगा

विटेवरी राहून उभा, हात कटेवरी
कासूनि पितांबर उभा रखुमाईशेजारी
तुळशीहारांत शोभे पंढरीचा तू मुरारी
ऐसे रूप तुझे सावळे उभे नित मनमंदिरी

भीमेच्या यमुनेतिरी सूर अभंग-नाम-गजरांचे
टाळ वाजती फेर धरुनी अनंत पावलांचे
उधळीत अबीर गुलाल रंगले देह वैष्णवांचे 
किर्तनांत गुंतले भान आज भक्तीभावनांचे

चंद्रभागेला आज आला भक्तीचा महापूर
आनंदाने भरून आला वारकऱ्यांचा बघ ऊर
नको या मनात देवा आता नवे दुष्ट काहूर
विठू नामाच्या नादात स्फुरु दे नवे कोंब अंगभर ... 
                      अन जीवनात स्फुरत राहावे गीत नवे ... नवे सूर  आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !!!
-रुपाली ठोंबरे .

Blogs I follow :