Wednesday, March 15, 2017

माझे प्रथम चित्रप्रदर्शन... एक अविस्मरणीय अनुभव

८ मार्च २०१७, माझ्या आयुष्यातील एक अतिशय सुंदर दिवस...कधीही विसरता येणार नाही असा. तसा हा दिवस जगभरातील सर्वच महिलांसाठी एक विशेष दिवस असतो पण माझ्या जीवनाला एक नवी कलाटणी या दिवशी मिळाली ते अच्युत पालव स्कुल ऑफ कॅलिग्राफी तर्फे आयोजित केल्या गेलेल्या ' आदिशक्ती अक्षरशक्ती ' प्रदर्शनामुळे.२०१६ मध्ये या प्रदर्शनाच्या माध्यमातून भारतात प्रथमच कॅलिग्राफीचे असे फक्त मुलींचे काम 'पु ल देशपांडे अकॅडेमी, दादर' येथे प्रदर्शित केले गेले होते.कलारसिकांकडून त्या उपक्रमास खूप मोठा आणि चांगला प्रतिसाद मिळाला होता.या वर्षी या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष. आणि माझ्या जीवनातील माझे पहिले प्रदर्शन...अक्षरांचे, रंगांचे,चित्रांचे आणि त्यासोबतच स्त्रियांमधल्या कलेचे, त्यांच्यातल्या एका अनोख्या शक्तीचे. जागतिक महिलादिनी सुरु झालेले हे प्रदर्शन पुढे ५ दिवस समस्त कलाप्रेमींसाठी ठाणे येथील 'टाऊन हॉल' मध्ये खुले झाले होते. आणि समस्त ठाणेकरांसोबतच इतरही सर्वांकडून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला लाभला याबद्दल खरेच सर्व पाहुण्यांचे खूप खूप आभार. 

आम्ही एकूण २४ जणी...वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या, वेगवेगळ्या वयातल्या  आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या, परंतु आम्हा सर्वाना एकत्र बांधणारा खरा धागा होता तो म्हणजे आमचे सर्वांचेच लाडके गुरु , अच्युत पालव सर आणि आमची आवडती शाळा, APSC.' आदिशक्ती अक्षरशक्ती ' प्रदर्शन या वर्षी देखील आयोजित होणार ही खात्री झाली आणि गेल्या २ महिन्यांपासून आम्ही सर्व मुलींनी आपापल्या परिने या प्रदर्शनाची तयारी सुरु केली. याची खरी सुरुवात झाली ती अक्षया ठोंबरेने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेमुळे. अजूनही आठवते, त्या कार्यशाळेत आम्हाला घेऊन बसवून तुम्ही हेच करायला हवे असे कुणी सांगितले नाही तर तिथे विनायक सर आणि अक्षयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतःच स्वतःला शोधत गेलो. नवे काही करताना कित्येकींना इथेच आपल्यातील खऱ्या कलेचे स्वरूप आत्मसात झाले आणि मग पुढे काय? आपल्यातील खऱ्या खुबीची ओळख पटल्यावर त्या विशिष्ट पैलूवर अधिक मेहनत घेऊन त्याचा विकास करत पुढे चालणे हेच आमचे ध्येय बनले.सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिवसेंदिवस घडत गेलो. मार्गदर्शनाचा स्रोत जरी एक असला तरी त्याच्या अंमलाखाली काम करणारी विविध बुद्धीची मने आणि वेगवेगळे हात होते.त्यामुळे प्रत्येकीचे काम एकमेकींपेक्षा खूप वेगळे होते. घरी काम करता करता आठवड्यातून एकदा एकत्र येऊन सरांसोबत बसायचो. त्यातील चुका समजून घेऊन पुन्हा नव्याने काम सुरु करायचे असा हा आमचा प्रदर्शनापूर्वीचा प्रवासच आमच्या आजच्या यशाला कारणीभूत ठरला असेल, असेच मी आज म्हणेन. हे प्रदर्शन जरी ५ दिवसांचे असले तरी त्यामागे बऱ्याच दिवसांची मेहनत होती... अगदी महिने, वर्षांची तपश्चर्या होती. प्रदर्शनात सादर झालेली चित्रे जरी मोजकी असली तरी त्यामागे केलेला सराव आणि केलेली कामे मात्र अगणित होती.पण दगडाला घाव घातल्याशिवाय सुंदर शिल्प जन्म घेत नाही असे म्हणतात ते खोटे नाही. 

२ महिन्यांच्या या सुंदर प्रवासानंतर अखेर ८ मार्च रोजी आम्ही सर्व टाऊन हॉल मधील गॅलरीत उभे होतो...आपल्या कलाकृतीसोबत. एक प्रशस्त आणि मोकळी जागा, बघता क्षणीच आम्हाला खूप आवडली. हे प्रदर्शन म्हणजे फक्त आमच्या  चित्रांचेच नव्हते तर ते आमच्यातील समजूतदारीचे, एकमेकींसोबत असलेल्या एकीचे देखील होते.असे म्हणतात जिथे २ बायका एकत्र आल्या तिथे वाद हे होतीलच पण आम्ही या प्रदर्शनात हे महिलांबद्दलचे ब्रीदवाक्य खोटे करून दाखवले. या प्रदर्शनातून आम्हांला बरेच काही शिकता आले. आजपर्यंत गॅलेरीत लावलेली कितीतरी चित्रे पाहिली होती पण ती भिंतीवर कशाप्रकारे दाखवायची किंवा कशी मांडणी करावी हा विचार क्वचितच कधी मनात आला असेल. ते सर्व आज प्रत्यक्ष अनुभवले. हूक, दोरी,चौकट,रचना यांचे प्रत्येक चित्रप्रदर्शनामागे काय स्थान असते ते आज खऱ्या अर्थाने कळले. शेवटी आपली चित्रे समोर भिंतीवर लावलेली पाहिली आणि नकळत स्वतःचाच अभिमान वाटू लागला. माझी ६ फूट x ४ फूट आकाराची कलाकृती प्रवेशद्वारापाशी स्वागतार्थ स्थानापन्न झाली तो क्षण तर माझ्यासाठी लाख मोलाचा होता. इतक्या दिवसांची त्या मागची मेहनत आता त्या आनंदासमोर फार फिकी वाटत होती. ते एक वेगळेच समाधान होते, शब्दांत न व्यक्त करता येणारे. 

संध्याकाळी ५.३० वाजता वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमुख CSR गीता कॅस्टेलिनो आणि तन्वी हर्बल प्रॉडक्ट्सच्या प्रमुख संचालिका मेधा मेहेंदळे यांच्या हस्ते 'आदिशक्ती अक्षरशक्ती ' या प्रदर्शनाचे उदघाटन  करण्यात आले. उदघाटनप्रसंगी आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या या दोन्ही स्त्री व्यक्तिमत्वांनी आम्हा सर्वांनाच मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्या सोबतच शाबासकीची थाप पाठीवर देताना प्रोत्साहनाची अमूल्य भेटही दिली. अच्युत सर या प्रसंगी काही बोलले नाहीत तरी त्यांचा आनंदी चेहरा बरेच काही बोलत होता आणि तेच आमच्या मेहनतीचे एक फळ होते. APSC च्या विद्यार्थिनींच्या मनोगतातून APSC चे एक चांगले,पोषक आणि प्रसन्न वातावरणातील चित्र समस्त उपस्थितांसमोर उभे राहिले. प्रत्येकाच्या चित्राची अगदी जवळून केलेली वाहवा ही आमच्यासाठी मान्यवरांकडून मिळालेली एक प्रोत्साहनपर अमूल्य देणंच आहे. उदघाटनाचा सर्वात शेवटचा पण महत्त्वाचा  कार्यक्रम म्हणजे आमच्यातल्या सर्वात छोट्या आदिशक्तीचे प्रात्यक्षिक. अवघ्या १३ वर्षांच्या अदितीने बघता बघता मोठ्या कोऱ्या कागदावर शाईमिश्रित कुंचल्याने अल्प कालावधीत प्रेक्षकांसमोर जी काही अक्षरांची करामत दाखवली ती खरेच स्तुतीयोग्य होती. आणि या अक्षरांपासूनच आमचे हे चित्रप्रदर्शन ५ दिवसांसाठी सर्वांसाठी खुले झाले. 


मी आधी म्हटल्याप्रमाणे आम्ही सर्वच जणी या प्रदर्शनातून खूप काही शिकलो. आज प्रथमच समाजातील विविध थरांतील लोकांशी आमचा अगदी जवळचा संबंध आला आणि त्यातूनच नवे संवाद सुरु झाले. व्यक्ती तितक्या विविध त्यांच्या स्वभावरचना आज जवळून अनुभवल्या. प्रत्येकाची आवड-निवड अगदी वेगवेगळी. कोणाला रुपालीचा ओम भारावून टाकत होता तर कोणी अदितीच्या बुद्धदर्शनाने प्रसन्न होत होता. काही जणांना सुखदा आणि माधुरीचे मग्स व बुकमार्क्स हवेहवेसे वाटत होते तर काही जणींना दीपाचे दुपट्टे आणि मनिषाचे कुर्ते. कित्येक जण सोनलच्या आलाच्या कलेने मंत्रमुग्ध होत तर कित्येकजण शारदाच्या वॉटर कलरच्या आर्टने स्तब्ध होत. काहींना गार्गीच्या फोटोग्राफीतून शिवाचे दर्शन घडे तर काहींना प्राजक्ताच्या गणपतीत देवपण दिसे. काहींना पत्रिकाची 'ए ' पासून निर्मिलेली कलाकृती विस्मयकारी वाटे तर काहींना अमृताची केशरचना मनाला वेड लावी. काहींना दिप्तीच्या कलाकृतींनी नटलेले टीशर्ट आवडले तर काहींना प्रतिमाच्या वर्तमानपत्रापासून बनवलेल्या उपयुक्त वस्तुंनी भूरळ पाडली. काहींना रुपालीच्या नृत्यांगनांसोबत सेल्फी काढायचे होते तर काहींना स्नेहलच्या अक्षरमुर्त सुंदरीसोबत. काहींना अक्षयाची चित्रे कलेचा एक महान ठेवा वाटत होती तर कित्येकांना श्रद्धाच्या कलेमध्ये एक उत्तम कलाकार दिसत होता. कोणाला निरूची देवनागरीसोबत केलेली कलाकुसरी आवडली तर कोणाला हिरलची गुजराती कवितेतील राधा. केतकीच्या श्लोकांनी घर कसे पवित्र आणि प्रसन्न होईल याचा अंदाज कित्येकजण तिथेच घेत असताना दिसले.  आवडीनिवडी वेगळ्या तशाच त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रोत्साहन देण्याची तऱ्हा वेगळ्या. त्यांच्याशी बोलताना कुठेतरी स्वतःला आणखी खोल शोधत गेलो. आणि निश्चितच यातून बरेच काही शिकत असताना उदयाला या सर्व अनुभवांचा कुठेतरी उपयोग होईलच यात शंकाच नाही. 

अक्षरचित्रांसोबतच या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे प्रत्येक दिवशी संध्याकाळी होणारे प्रात्यक्षिक. अदितीचे प्रथम दिवशीचे प्रात्यक्षिक तर उत्तम होतेच पण त्या सोबतच दुसऱ्या दिवशी झालेले हिरलचे गुजराती वर्णांचे रचनात्मक प्रात्यक्षिकही प्रेक्षकांना खूप आवडले. गुजराती लिपीत आपले नाव लिहून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. त्यानंतर मनिषा आणि प्राजक्ताच्या प्रात्यक्षिकांमध्ये अवघ्या काही मिनिटांतच साडी किंवा बॅग रंगानी सुशोभित करण्याचे कसब अगदी उत्कृष्टरित्या सर्वांसमोर सादर झाले. माझ्या प्रात्यक्षिकांमध्ये माझी खुबी बनलेले स्ट्रोक्स वापरून मी माझ्या नृत्यांगना आणि चिमण्या कागदावर अचूक उतरवल्या. रुपाली आणि सुखदाचे प्रात्यक्षिक म्हणजे तर चित्रकला शिकणाऱ्यांसाठी एक अनोखी मेजवानीच होती... रंगाना कागदावर आणताना त्यांनी वापरलेले विविध तंत्र त्यांनी आज सर्वांसमोर सादर केले. सुतळी , कंगवा ,स्पंज अशा वस्तूंच्या साहाय्याने कागदावर रंगांची काय जादू पाहायला मिळू शकेल ते आज प्रत्यक्ष पाहिले. या सर्वापेक्षाही मोठे आणि या प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेले मेगा प्रात्यक्षिक होळीनिमित्त सर्वांसमोर सादर झाले. २२ मुलींनी एकत्र येऊन एकाच वेळी २० फूट लांब कोरा पेपर अवघ्या १५ मिनिटांत रंगीबेरंगी केला. हे करत असताना प्रत्येकीने आपली खुबी वापरून सुंदर काम केले.अधून मधून प्रेक्षकांतून येणाऱ्या गायिका, कवयित्री आणि नृत्यांगनांनाही आपली कला सादर करण्याची संधी दिली गेली आणि या संधीचे सोने करत त्यांनीही प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या प्रात्यक्षिकांची आणि प्रदर्शनाची सांगता झाली ती आमचे महागुरू अच्युत पालव यांच्या प्रात्यक्षिकाने - 'झिंगाट होळी '. 

हा ५ दिवसांचा सुंदर उपक्रम खूप काही शिकवून गेला. असे काही आयोजन करत असताना कोणत्या अडचणी येऊ शकतात तेही या पहिल्याच प्रदर्शनात मी अनुभवले.आणि अशा प्रसंगी वेळेचे भान ठेवून कसे वागले पाहिजे याचे थोडेसे का होईना पण बाळकडू मिळाले.मीडियाचा अनुभव माझ्यासाठी नवीनच होता पण तोही खूप काही शिकवून गेला. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी केलेली तयारी जशी महत्त्वाची तशीच कार्यक्रम संपल्यानंतर ती जागा पूर्ववत सुपूर्द करण्याची जबाबदारी देखील महत्त्वाची - हा एक खूप मोठा आणि उपयुक्त असा गुरुमंत्र मिळाला जो नेहमीच आणि प्रत्येकासाठीच खूप महत्त्वाचा आहे. या प्रदर्शनादरम्यान एक गोष्ट प्रामुख्याने माझ्या लक्षात आली ती म्हणजे लोकांना कॅलिग्राफीबद्दल ओढ आहे पण ती शिकावी कशी आणि याचा उपयोग काय या प्रश्नांमुळे माणूस तिथेच घुटमळत राहतो. पण या प्रदर्शनात अशा अनेक इच्छुकांना या नव्या विषयाबद्दल खूप छान मार्गदर्शन तर मिळाले आहेच पण त्यासोबतच कॅलिग्राफीच्या माध्यमातून एक नवी दिशा मिळेल. या प्रदर्शनातून उद्याच्या भविष्यात होणाऱ्या उलाढालींसाठी आम्हाला प्रोत्साहन तर मिळालेच पण अनेक छोट्या मोठ्या चुकांतून खूप काही शिकायला देखील मिळाले... माझ्यासाठी हेच फार फार महत्त्वाचे. आयुष्यात असा एक अनुभव हवा होता, तो मिळाला. आता यातून शिकून पुढे चालायचे. APSC आणि अच्युत सरांचे तर अशी संधी दिल्याबद्दल आभार आहेतच पण त्यासोबतच विशेष आभार मानावेसे वाटतात ते म्हणजे ठाणे म्युनिसिपालिटी कॉर्पोरेशनचे, इतकी सुंदर जागा आम्हाला दिल्याबद्दल. तसेच येथे आलेल्या सर्व मान्यवरांना आणि रसिकप्रेक्षकांना खऱ्या मनाने धन्यवाद म्हणावेसे वाटते. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने 'आदिशक्ती अक्षरशक्ती ' अशीच प्रत्येक वर्षी वर्धत राहो ही एक आशा.  


- रुपाली ठोंबरे.

4 comments:

 1. Awesome explanation of experience. Like the wording and it's flow.
  All the best.
  -Pravin

  ReplyDelete
 2. kya baat hey! Rupali.....gr8! khup cchan lihileys....keep it up! shevtcha photo cchan taklas!

  ReplyDelete
 3. Sunder. Kalanar barobar kids ani antarangatlya awit anandachi surely Anubhuti hya lekhatun disun yete. Truly amazing. Keep it up.would like to visit the exhibition next Time.

  ReplyDelete

Blogs I follow :