Wednesday, December 31, 2025

चित्रकलेची खरी सुरुवात

वर्षाच्या सरतेशेवटी या वर्षातील चांगल्या-वाईट गोष्टींचा छोटासा हिशोब यावेळी अगदी नकळतच मांडला गेला. याचे मुख्य कारण म्हणजे हे वर्ष स्वप्नांची पूर्तता करणारे ठरले...कधी काळी पाहिलेली पण कुठेतरी हरवलेली आणि कधी न पाहिलेली अशी सुखद धक्का देणारी. यांपैकी एक स्वप्न होते आपल्या आवडत्या विषयाचे रितसर, अगदी मनापासून घेतलेले शिक्षण. लहानपणापासूनच भाषा आणि चित्रकला या विषयांत विशेष रुची होती पण दहावीत चांगले गुण मिळाले आणि जणू सामाजिक नियमाप्रमाणे पावले अभियांत्रिकी दिशेकडे वळली. आणि दोन्ही विषय केवळ छंद म्हणून जीवनात राहिले. जे काही दहावीपर्यंत शिकले तेच नकळत पुढे फुलत गेले. त्यात सुंगंध होता, तो दूरवर पसरला देखील, परंतू जो मकरंद मनास तृप्त करेल तो काहीसा लुप्त होता. APSC आणि अच्युत सरांच्या सानिध्यात तो बऱ्याच प्रमाणात गवसला. आपल्या आवडत्या विषयात गुरु म्हणून पद्मश्री अच्युत पालव यांच्यासारखे व्यक्तिमत्व लाभणे हे खूप मोठे भाग्य आहे. असेच भाग्य पुन्हा एकदा नव्याने झळकावे तसे या वर्षात विक्रांत शितोळे सर गुरु म्हणून माझ्या आयुष्यात आले. आणि त्यांनी आयोजित केलेल्या 'फॉउंडेशन कोर्स' च्या रूपात खऱ्या अर्थाने चित्रकला या विषयाला योग्य दिशा मिळाली अगदी नेहमी हवी होती तशी. 

फेब्रुवारी महिन्यात साधारण ८ महिने सुरु राहणारा हा पाठयक्रम सुरु झाला आणि जीवनात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. वरवर सोपा वाटणारा हा विषय तितकाच क्लिष्ट देखील आहे कारण चित्रकला म्हणजे केवळ एक विषय नाही तर या कलेचे अनेक  अंग एकत्र आणून स्वतःतील सर्जनशीलतेला धडवण्याचे हे अध्ययन आहे.  या अभ्यासक्रमात मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास करून त्यातून माझ्यातील मीच नव्याने गवसत गेले. याचे पूर्ण श्रेय द्यायचे झाले तर हा विषय आणि त्यांतील उपविषय योग्य प्रकारे जाणून घेऊन , येणाऱ्या विद्यार्थ्यांची योग्यता लक्षात घेऊन जाणीवपूर्वक आखलेली संपूर्ण  रूपरेषा आणि अर्थातच या सर्वांचे अचूक रेखाटन करणारे आणि अनुभव देणारे एक उत्कृष्ट शिक्षक - विक्रांत शितोळे सर.  त्यामुळे सुरुवातीला जटिल वाटणारे विषय सुद्धा नंतर आनंददायक ठरू लागले. आम्ही अंदाजे ३५ विध्यार्थी... या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ऑनलाइन एकत्र आलो. पहिला दिवस प्रस्तावना-परिचयाचा आणि मग लक्षात आले कि यांतील बहुतेकजण माझ्यासारखेच एका राहिलेल्या स्वप्नाच्या शोधात इथवर पोहोचले होते. शिक्षण आणि व्यवसाय जरी वेगवेगळ्या क्षेत्रात असतील तरी प्रत्येकाचा खरा आनंद चित्रात होता. एकमेकांना आजवर भेटलो नाही पण उत्तम संयोजनामुळे ती कमी इतकी भासलीच नाही. प्रत्येकाचेच काम अप्रतिम... फक्त काम नाही तर प्रत्येकाकडून काहीतरी गुण शिकण्यासारखा नक्कीच आहे आणि एकत्र अध्ययनामध्ये हेच खरे महत्वाचे. सर्वच सर्व उपविषयांत निपुण नक्कीच नाहीत पण एकमेकांच्या सोबतीने आणि योग्य मार्गदर्शनाने भविष्यात नक्कीच यात यशस्वी होतील. इतरांच्या चांगल्या कामाची योग्य दखल घेऊन, कौतुक करून प्रोत्साहन देण्याची कलासुद्धा खूप गरजेची आहे जी मला या ग्रुप मध्ये विशेष जाणवली. 

संपूर्ण विषय खूप मोठा आहे, तो ८ महिन्यांत पूर्ण शिकणे जवळजवळ अशक्यच पण शास्त्र , तंत्र, विद्या आणि कला या माध्यमातून सुरुवात झाली आणि कलेचे एकेक पदर समोर उलगडू लागले. चित्रकला म्हणजे केवळ कागदावर चित्र काढणे नाही तर चित्र आधी मनात आखले जाते आणि मग भावनांच्या रंगांत भिजून हस्तरूपी कुंचल्यातून जगासमोर अविष्कार घडवून आणण्याची ही दैवी क्षमता. हा अभ्यास करताना नाट्यशास्त्र , चित्रसुत्र अशा ग्रंथांचा किती प्रभाव आपल्या कलेवर आहे हे सरांनी पहिल्याच वर्गात मनावर बिंबवले. आश्चर्य वाटले जेव्हा कळले कि चित्रकलेचा अर्थ फार पूर्वी महर्षी वत्सायन यांनी कामसूत्रात अशाप्रकारे शब्दात मांडला आहे -

रूपभेद: प्रमाणानी भावलावणीयोजनं ।

सादृश्यम वार्णिकाभंग इति चित्र षडंगकं ।।

या ग्रंथांप्रमाणेच सर वेळोवेळी इतर प्रतिष्ठित चित्रकारांची कामे आणि पुस्तके दाखवून आम्हांला प्रेरणा देत. भोवताली जे जे दिसते ते ते योग्य प्रकारे आत्मसात करून कसलीही लाज न बाळगता कुठेही असाल तरी रेखाटन सुरु ठेवा आणि पहा तुमच्यातला कलाकार आपोआपच बहरू लागेल हा त्यांच्या शिक्षणातील मूळ गाभा. मुळात अॅनिमेटर असलेले विक्रांत सर आम्हांला प्रत्येक प्रसंगी त्यांच्या त्या कामातील दाखले देऊन एका नव्या क्षेत्राबद्दलसुद्धा प्रकाशमान करत असत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवर त्यांचे कार्य नित्य सुरु असते, विविध कार्यशाळा आणि प्रदर्शने या सर्वातून वेळ काढून ते वेळोवेळी आम्हांला त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात सदैव तत्पर असतात. उदाहरण द्यायचे झाले तर रशियाला, लडाखला सर गेले पण त्याचा अनुभव इतक्या सुंदर पद्धतीत कथन आणि दर्शनीय झाला कि आम्ही सर्व सुद्धा काही प्रमाणात त्या प्रवासाची अनुभूती घेतली. हे अशाप्रकारे जीव ओतून शिकवणारे, आपल्यातले केवळ इतरांवर न लादणारे फार कमी असतात. रंगसंगती असो वा परस्पेक्टिव्ह, ह्यूमन अनॉटॉमी असो वा कन्स्ट्रक्शन, सुलेखन असो वा शेडींग ... उपविषय कोणताही असो त्यातील मूलभूत जाणून घेणे फार महत्वाचे आणि त्यानंतर ते एकमेकांत योग्य रीतीने गुंफून सादर करणे हीच तर खरी चित्रकला ना? Gauche या रंगमाध्यमात प्रथमच काम केले मी, पण त्यात उद्भवणाऱ्या समस्या व त्यावर केलेले उपाय या सर्वातून नवे काहीतरी शिकत गेले. या वर्गात प्रामुख्याने काही शिकले असेल तर ते हे कि कोणतीही गोष्ट सुरुवातीला कठीणच भासते पण तिला योग्य ठिकाणी तोडून सोपे करून योग्य क्रमाने मांडले तर अगदी अशक्य वाटणारे कार्यसुद्धा आपल्या हातून यशाची एकेक पायरी पार करत सहज घडून येऊ शकते. खरेतर या कोर्स मधील प्रत्येक विषयावर खूप काही आहे सांगण्यासारखे. हे सर्वच खरेतर स्वतः अनुभवण्यासारखे आहे. त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे टाळावे म्हणते. फक्त समोर असलेले जसेच्या तसे कागदावर उतरवणे हे चित्र मुळात नसतेच... त्यामुळे वास्तव रेखाटायला हवे पण त्यात आपल्या  सर्जनशीलतेचा मुलामा असायला हवा तेव्हा ते चित्र दुर्मिळ बनते. स्थिरचित्र हा विषय हाताळताना वास्तव रेखाटताना ते सुंदर कसे मांडावे ही खरी पहिली पायरी असते हे जाणवले. चित्र काढताना प्रकाशयोजना , फोटोग्राफी, मांडणी हे सर्व देखील कसे आणि किती महत्वाचे आहे ते हळूहळू आमच्यात उतरत गेले आणि ते कामातून समोर येत गेले. या अभ्यासक्रमातील सर्वात आनंददायक विषय म्हणजे शेवटचा उपविषय - abstract... जिथे सात महिने सुरु असलेल्या शिस्तशीर कार्याला तात्पुरता स्वल्पविराम देऊन असते कागदावर स्वैर विहरणे, मनसोक्त रंग उधळणे , मनातील भावनांचे आकार आपोआप समोर उमटणे... आणि यातुन निर्माण होणारे ते सर्व आपल्या स्वतःसाठी सुद्धा अद्भूत ठरावे , जणू काही जादूच... कोणी केली? आपणच... आपल्या अंतर्मनातल्या लपलेल्या चित्रकाराने जो हळूहळू बाहेर येऊ लागला आहे. पण ही जादू तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो पुष्कळदा कंटाळवाणा वाटणारा ७ महिन्यांचा शिस्तशीर प्रवास सफलरीत्या पूर्ण होईल. 

विक्रांत सर... खरेच मनापासून खूप खूप आभार असा हा अभ्यासक्रम योजून आमच्या सारख्या कलाप्रेमींना एक खरा मार्गदर्शक स्वतःच्या रूपात मिळवून दिल्याबद्दल. मार्गदर्शन करणारा चेहरा जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे ते हात ज्यांच्या हातभाराशिवाय इतका मोठा ऑनलाईन उपक्रम उभारणे फार कठीण. आणि ते हात कृपा मॅमचे आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जसा गुरु तसे त्यांचे शिष्यही, त्यांच्या सहवासात येणारे सर्व विद्यार्थी सुद्धा अशाचप्रकारे निःस्वार्थ भावनेने इतरांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा प्रामाणिक विचार मला नेहमी भावतो. योग्य तेच लोकांपर्यंत पोहोचावे हा त्यांचा अट्टहास त्यांच्या बोलण्यातून नेहमी दिसून येतो. विक्रांत सरांचा क्लास म्हणजे अशी शाब्दिक कलात्मक मेजवानी जी कितीतरी प्रसंगी भावुक करणारी, तुम्हाला पुढच्याच क्षणी सुंदर काही करण्यास उत्स्फूर्त करेल आणि पुढचा कितीतरी काळ या सर्वातून मिळणाऱ्या आनंददायी समाधानाने तृप्त करेल. ही मेजवानी काही दिवसांनंतर थांबणार असली तरी त्या शब्दांची जादू नक्कीच भविष्यात काहीतरी चमत्कारीत कार्य घडवून आणण्यात यशस्वी ठरेल. 

- रुपाली ठोंबरे 

Wednesday, December 3, 2025

अक्षरयज्ञ - ८

अक्षरयज्ञ - सुलेखनाचे संवर्धन करण्यासाठी एकत्रितरित्या येऊन केलेला अक्षरांचा यज्ञ. विविध भावनांनी रंगांसोबत आणि रंगानी अक्षरांसोबत केलेला हा एक दैवी संवाद.  भावनांच्या डोहातून कागदावर उमटणारी अक्षरे... जणू  वर्ण,छटा ,कल्पकतेने आच्छादून अवतरणारी शक्तिरूपे .या तीन दिवसांच्या कार्यशाळेतून मिळणारी ही ऊर्जा पुढचे ३६५ दिवस उत्साहित, कार्यरत ठेवते. आणि म्हणूनच या यज्ञात पुन्हा पुन्हा यायला मला नेहमीच आवडते. 

सुलेखन क्षेत्रात ४ दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ सुलेखनकार आणि आत्ताच भारत सरकारने त्यांच्या सुलेखन कार्याचा गौरव करीत 'पद्मश्री' बहाल केलेले अच्युत पालव यांच्या संकल्पनेतून साकारलेला या यज्ञ 'अच्युत पालव कॅलिग्राफी फॉऊंडेशन'च्या वतीने दरवर्षी 'अक्षरयज्ञ' या ३ दिवसीय कार्यशाळेच्या रूपात आयोजित केला जातो. रोजच्या धकाधकीच्या जीवनाला स्वल्पविराम देऊन एखाद्या शांत ठिकाणी तीन दिवस एकत्र येऊन स्वतःला व्यक्त करून घेण्याची संधी देणारा हा एक अनोखा उपक्रम. येताना कॅलिग्राफी किंवा सुंदर चित्र यायला हवे अशी अट मुळीच नसते पण जाताना प्रत्येकजण स्वतःतील रंग शोधत आपले मनातले चित्र सोबत नक्कीच घेऊन जातो. म्हणूनच अभियांत्रिकी , वैद्यकीय , वाणिज्य , कला अशा अनेक क्षेत्रांतील सर्वांनाच हा यज्ञ आपलासा वाटतो. प्रत्येक वेळी नवी संकल्पना ... नवा सहभाग... नवे मार्गदर्शक ....नवी सत्रे  ...,परंतू  येणारा अक्षरानुभव प्रत्येक वेळी तितकाच दिव्य....मी यावर्षी चौथ्यांदा ही कार्यशाळा अनुभवत होते पण तरीदेखील त्यातून मिळालेला अनुभव आणि आनंद खूप वेगळा  आणि नाविन्यपूर्ण होता. 

सुलेखनाला जसं सुंदर रूप असतं तसंच आकार, भावना असतात आणि त्या वेगवेगळ्या माध्यमातून मांडता येतात. हाच मुद्दा विचारात घेऊन पालव सरांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना आपल्या कार्यशाळेत आमंत्रित करून मुलांना शब्दामागचा अर्थ कसा व्यक्त करावा त्याचा एक उत्तम अनुभव देण्यावर विशेष भर दिला. मग तो अनुभव नाटकातून असो वा नृत्यातून, चित्रांतून असो वा सुलेखनातून तो मनात उतरला पाहिजे आणि नंतर कागदावर ओसंडून वाहायला हवा.  नाट्य क्षेत्रातील दिग्गज श्री अतुल पेठे, योगेश तडवलकर, शिवदास घोडके, सिने सृष्टीतील रवी जाधव, नृत्य क्षेत्रातील आरती धानिपकर, तन्वी पालव, संगीत क्षेत्रातील कौशल इनामदार, मिलिंद जोशी, वाचन अभिव्यक्तीतून प्रमोद पवार, साहित्य क्षेत्रातील चंद्रमोहन कुलकर्णी, पेंटिंग क्षेत्रातील अशोक हिंगे, कुलदीप कोरगावकर, शिल्प क्षेत्रातील प्रमोद कांबळे अशा  विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांच्या सानिध्यात आमची अक्षरकला आणि सृजनशीलता विकसित होत जाते. नाटकातल्या शब्दांनी अक्षरांचा पोत कळतो, त्यातल्या हावभावांनी शब्दाची चालरीत कळते, शिल्पातून शब्दांची घडण, पेंटिंगमधून अक्षरांचे रंगलेपन तर संगीत-नृत्य अशा कलांतून अक्षरांतील स्पंदने मनाचा ठाव घेतात... शब्द उच्चारला कि त्यातील भावना कळते आणि म्हणूनच अच्युतसरांनी वेगवेगळ्या माध्यमांतील कलाकारांना बोलावून सुलेखनकारांना त्याची जाणीव करून दिली कि अक्षरं आणि त्यांचा आकार त्या त्या भावनेने कागदावर उमटतात... आणि त्याचंच अक्षरचित्र होतं. रोजच्या चित्रांपेक्षा जरा वेगळं... ज्यात असतं न पाहिलेल्या रंगांचं बेधुंद उधळणं... बंधमुक्त आकारांचं कागदावरती स्वैर विहरणं आणि मनातल्या भावनांचं दृश्यरूपात दिसणं. 

आतापर्यंत मी उपस्थित राहिलेल्या अक्षरयज्ञांत नाट्य , नृत्य , संगीत अशा कलांच्या माध्यमातून जागृत होणाऱ्या भावनांच्या खोल डोहातून चिंब भिजलेल्या कल्पनांच्या कुंचल्याने मनावर , हृदयावर विविध भावरंगांचे चित्र रंगवत नव्याने अक्षरांचा शोध घेण्यावर भर असायचा. तो एक विलक्षण अनुभव असायचा. यावर्षी हे स्वरूप थोडे वेगळे जाणवले. यावेळी पूर्ण अक्षरयज्ञाचा श्वास म्हणजे सर्वांना सुरवातीला घाबरवून टाकणारे माध्यम - कॅनव्हास. म्हणूनच या अक्षरयज्ञाची पहिली जाहिरातच मनात घर करून गेली आणि इथे येण्याचा निश्चय तत्क्षणी पक्का झालेला. अक्षरयज्ञाच्या कल्पनेचे पुढचे पाऊल म्हणून पालवांनी आता कागदावरून कॅनव्हासवर प्रवास सुरु करण्याचा घाट घातला आणि त्यासाठी मार्गदर्शक म्हणून अजय चव्हाण यांना आमंत्रित केले गेले. अजय चव्हाण यांनी जाहिरात क्षेत्रात काम केल्यानंतर ते कॅनव्हास आणि abstract पेंटिंगकडे वळले होते. त्यामुळे कॅनव्हासवर त्यांची विशेष पकड. विशेष करून कॅनव्हास हाताळण्याचे तंत्र शिकून घेण्याच्या इच्छेने आलेल्या सर्वांसाठीच ही एक खास कलात्मक मेजवानी. कार्यशाळेत त्यांना , त्यांच्या कामाला जवळून पाहण्याची संधी मिळाली. अजय सरांबद्दल सांगायचे झाले तर ते उत्तम मार्गदर्शक आहेत. ते शिकवता शिकवता कधी आमच्यातले होऊन जात कळतच नसे. कोणत्याही विषयावर मनमुराद गप्पा मारत असताना त्यातून कलेचे वेगवेगळे पदर सहज उलगडले जात होते. स्वतःचा अनुभव सांगता सांगता महत्वाचे धडे आमच्याकडून नकळत गिरवून घेऊन आमच्यातल्या 'मी' शी आमची ओळख करून देण्याचे विलक्षण कसब त्यांच्यात होते. उभरत्या कलाकाराला मार्गदर्शन देताना कौतुकाची छोटीशी थापदेखील त्याच्या जीवनात खूप मोठी क्रांती घडवून आणू शकते यावर त्यांचा विश्वास होता. असे गुरु आम्हाला अक्षरयज्ञाच्या निमित्ताने लाभले याचा आनंद आणि समाधान प्रत्येकालाच झाला असेल यात शंका नाही. 

२८ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या कार्यशाळेत येण्यासाठी अनेकांनी अगदी दिवसापूर्वीच घर सोडले होते. सकाळी सुमारे १० पर्यंत जवळजवळ सर्वच सहभागी उपस्थित राहिले होते. प्रथमच आलेल्या सर्वांनाच त्या हिरवळीने , निसर्गाने पहिल्या क्षणातच भुरळ पाडली होती. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात वसलेली अशी निसर्गरम्य वास्तू हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण आहे. जागा जितकी सालस आणि सुंदर तितकेच इथले जेवणसुद्धा सात्विक पण अतिशय चविष्ट. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी म्हणजे मुंबईतील एक असे आकर्षक ठिकाण जिथे ज्ञानाचे संवर्धन होत असते. ज्ञान देणारा आणि घेणारा या दोघांसाठी विद्येची देवाणघेवाण करण्यासाठी यापेक्षा योग्य जागा असूच शकत नाही. राहण्याच्या आणि खाण्याच्या सर्व  उपलब्ध सोयी, उत्तम कर्मचारीवर्ग , प्रसंगोचित वातावरण अशा सर्वार्थाने परिपूर्ण जागेत ३ दिवस वास्तव्य करण्याचे एक वेगळे समाधान असते. अशाप्रकारे सर्व बाजुंनी सुव्यवस्था असली कि मूळ कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. प्रत्येकवेळी सुंदर निसर्गाने तर येणाऱ्यांचे स्वागत होतच असते पण त्यापेक्षा विशेष आकर्षण असते ते अक्षरयज्ञाच्या वतीने अच्युतसरांच्या नूतन कल्पनेतून निर्माण होणारी अक्षरांची सुरेख नवी आरास. आजपर्यंत प्रत्येक वेळी एक नवी कल्पना, विषय आणि नवी रचना. यावर्षी स्वागत करण्यास सज्ज होते वरपासून खालपर्यंत मांडलेले अक्षरांची महती सांगणारे पेपरड्रॉप्स, मधोमध फुलांनी सुशोभित केलेली समई आणि त्या समोर रचलेले ३५ कोरे कॅनव्हास. पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे ते दृश्य. 

आमचे सर्वांचे लाडके गुरु पद्मश्री अच्युत पालव आणि मान्यवर प्रमुख पाहुणे आणि या कार्यशाळेची कमान पुढील ३ दिवसांसाठी पेलून घेण्यासाठी सिद्ध असलेले अजय चव्हाण सर आणि आम्ही सर्व आतुरलेले सहभागी कलाकार यांच्या उपस्थितीत उदघाटन आणि प्रस्तावना परिचय असा छोटासा पण महत्वपूर्ण कार्यक्रम सुंदररित्या पार पडला. पुढच्याच क्षणी केलेल्या निदर्शनाप्रमाणे प्रत्येकजण उत्साहाने समोर मांडलेल्या रचनेतून एकेक कॅनव्हास घेऊन जात मुख्य दालनात प्रवेश करू लागला आणि अक्षरयज्ञाचा मूळ आरंभ सुरु झाला. खूप विचार न करता आपापल्या क्षमतेप्रमाणे रंगांची उधळण करत आपापल्या कोऱ्या कॅनव्हासला एक अद्भुत रूप देण्याचा प्रयत्न सर्वत्र सुरु झाला...सुरुवातीला फक्त निरीक्षण करत, अगदीच गरज असल्यास रीतसर हस्तक्षेप करत अजय सर आणि अच्युत सर आपापली कामगिरी चोख बजावत होते. कुठेही स्पर्धा नाही पण तरीही प्रत्येकजण आपले १००% देण्यासाठी चढाओढ करत होता. बघता बघता सारे कॅनव्हास सौन्दर्याने भिजून गेले. ती सुंदरता पुन्हा एकदा प्रवेशद्वारी केलेल्या रचनेत अधिक भर घालण्यास तत्पर झाली. विविध हातांनी, विविध आकारांनी, विविध रंग-ढंगानी सजलेले सारे कॅनव्हास पुन्हा एकदा एकत्र आले आणि एक नवी रचना डोळ्यांसमोर निर्माण झाली. प्रत्येकाची कलाकृती एकमेकांपेक्षा वेगळी असली तरी ती त्यात एकरूप झाली आणि हा प्रयोग सफल झाला. आतापर्यंत केलेले काम आमच्या मनाप्रमाणे , आजपर्यंत शिकलेल्या गोष्टींप्रमाणे सुरु होते. आता या कार्यशाळेचे एकेक पैलू समोर येण्यास सुरुवात झाली. अजय सरांचे प्रात्यक्षिक ही आम्हां सर्वांसाठी दृश्य पर्वणीच. रबर सोल्युशन हे एक नवे शस्त्र नव्यानेच आम्ही अनुभवत होतो. या नव्या शस्त्रासोबत समर्पक पोत ,आकर्षक रंगसंगती , प्राचीन अक्षराकृती आणि सोबत प्रश्नोत्तरांचा संवाद असा सुरेख संगम तिथे घडून येत होता. 'आनंद घेत मनसोक्त काम करा... एखादी चूक झालीच तर तो कॅनव्हासच तर आहे ना... पुन्हा gesso मारा आणि नव्याने निर्मिती करा'...अजय सरांचे हे वाक्य अनेकांना आजपर्यंत वाटणाऱ्या भीतीपासून दूर साऱण्यास समर्थ ठरले असावे. gesso ,रबर सोल्युशन हे सारेच नवे असले तरी अजय सरांच्या प्रात्यक्षिकामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे सर्वांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आणि सारेच हिरीरीने कामाला लागले. आसपास नजर टाकता सगळीकडे दिसत होते ते शुभ्र कोरे नवे कॅनव्हास , नव्या कल्पना, नवे प्रयोग , नवा हुरूप. कानांवर सलग पडणारा ड्रायरचा आवाज हे या सर्वांचे प्रमाण ठरत होते. भावनांना अक्षरांचा स्पर्श झाला कि मनातील रंग शब्दरूप घेऊन कॅनव्हासवर ओघळू लागतात...ही ओघळणारे अक्षरे जेव्हा मनाचा ठाव घेतात, अंतरंगातील भाव तेव्हा अचूक समोर उमटलेली असतात. खरेच मनाचे चित्र पाहिले आहे का कधी? नक्कीच नाही..पण अक्षरयज्ञात अशाप्रकारे ३ दिवस मनसोक्त मोकळे होऊन जे काही समोर उमटत जाते तेच आपलेसे वाटते जणू हेच ते मनाचा ठाव घेणारे मनाचे चित्र. असा अनुभव प्रत्येक वेळी येत राहिला आणि चित्रांच्या रूपात इतस्ततः मांडला जाऊ लागला.  एका विशिष्ट कालावधीनंतर अजय सरांचे प्रात्यक्षिक पुन्हा सुरु होत असे, पुन्हा गप्पांच्या माध्यमातून ज्ञानात भर पडत असे. असा हा कलात्मक प्रवास बराच काळ सुरु होता. सरतेशेवटी सकाळपासून केलेल्या या प्रयोगाचे फलित समोर येण्यास सुरुवात झाली... जणू काही एक जादूच वाटावे इतके त्या चित्राचे रूप पालटून गेले. असाच प्रयोग दुसऱ्या दिवशी सुद्धा अनुभवला जेव्हा मास्किंग टेप साधन म्हणून हातात आले. आजपर्यंत कशापासून वंचित होतो आणि आज काय गवसले याचा आनंद चेहऱ्यांवर दिसून येत होता. आम्ही सर्वजण एकच प्रकारचे तंत्र जरी शिकत असलो तर प्रत्येकाचे प्रयोग आणि होणारी उत्पत्ती फार निरनिराळी होती. नुसते इतरांचे काम पाहणे हे देखील नकळत खूप काही शिकवून जात होते. संवाद मग तो शाब्दिक असो वा मौन पण तो सतत सुरु होता आणि त्यातून नव्याने उपजणारी कार्यक्षमता हीच या कार्यशाळेची खासियत आहे. 

रोज संध्याकाळी आजपर्यंत केलेले विशेष काम सर्वांसमोर प्रस्तुत करण्याची आणि त्याबद्दल व्यक्त होण्याची सर्वांना संधी मिळत असे. या कार्यशाळेतील दुसरा नवा पैलू समोर आला तो खास अमेरिकेतून आलेल्या अमित कुलकर्णी यांच्या रूपात. त्यांनी जेव्हा त्यांच्याकडे असलेला खजिना सर्वांसमोर रिता केला क्षणभर वाटले असाही छंद असावा एखादा. छंद म्हणण्यापेक्षा तो एक ध्यास होता. आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो कि या कार्यशाळेच्या निमित्ताने पेनांचा इतका सुंदर आणि माहितीपूर्ण संग्रह अगदी जवळून पाहायला मिळाला. २०० वर्षांपूर्वीचे पेन्स आणि त्यानंतर त्यांच्यात होत जाणारे नूतनीकरण, शाई तयार करण्याचे तंत्र, एखाद्या पिसापासून उमटणाऱ्या अक्षरांपर्यंतचा प्रवास या सर्वांचा सखोल अभ्यास आणि त्याचे सादरीकरण खूप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होते. अमित यांनी अशा प्रकारचे अनेक पेन अगदी जपून ठेवले आहेत. ते नियमित या ना त्या कारणाने वापरात असल्याने ते आजही अतिशय सुस्थितीत आहेत.त्यांची ही शिस्त प्रत्येक सुलेखनकारासाठी शिकण्यासारखी आहे. केवळ आमच्यासाठी इथवर हा सर्व ठेवा आणला त्यासाठी त्यांचे खूप आभार. हे सर्व इतकेही सोपे नक्कीच नसावे. पहिल्या दिवशी सर्व पहाटेच लवकर उठल्याने थकून गेले होते त्यामुळे छान जेवणानंतर थोड्या गप्पा मारून सर्व आपापल्या रूम्सकडे परतले. त्यातही संजीव जोशींसारखे एखादे अवलिया असतात जे कोणत्याही क्षणी आपल्या कलेसोबत असलेल्या आसक्तीने इतरांना थक्क करतात. सुलेखन फक्त कागद किंवा कॅनव्हासपर्यंत सीमित न राहता मिळेल त्या प्रत्येक माध्यमावर काम करण्याचा त्यांना छंद. आजही जेव्हा सर्व झोपण्याच्या तयारीत परतत होते तेव्हा हे महाशय जमिनीवर एक मोठा कॅनवास अंथरून त्यावर भल्या मोठ्या ब्रशने आपली कलाकुसरी करण्यात मग्न होते. आता असे दृश्य पाहिल्यावर एखादा कलाप्रेमी दाद न देता कसा झोपायला जाईल. कलेप्रती असलेली ही आसक्ती खरेच त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. हेच चित्र दुसऱ्या दिवशी सुद्धा निदर्शनास आले. रात्री शेकोटी, गाणी, नृत्य,फोटो असा चौफेर कार्यक्रम आटोपून सर्व परतले खरे पण तरी अनेकांची पावले कर्म-दालनात वळली आणि रात्री १ वाजता सुद्धा अक्षरांचा उत्सव तसाच रंगलेला दिसत होता. 

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या जागेचा खराखुरा आनंद घ्यावा तर तो पहाटेच्या वेळी. माझ्या आयुष्यातील एकमेव ठिकाण जिथे अलार्ममुळे नव्हे तर पक्षांच्या किलबिलाटाने मनावरचे मळभ दूर होऊन चैतन्याचे वारे अंगभर भिनू लागतात. आणि तेच सारे दिवसभर अविश्वसनीय असे काम करण्यास ऊर्जा देतात. अगदी ठरलेल्या वेळेत 'रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी' चे सर्वेसर्वा असलेले आणि भारतीय राजनीतिज्ञ विनय सहस्त्रबुद्धे यांचे झालेले आगमन,आमच्या अक्षरांना अगदी उत्स्फूर्तपणे दिलेली दाद , सुलेखन कलेच्या संगोपनासाठी केलेले मार्गदर्शन, प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमातून केलेले शंका निरसन आणि या सर्वांसोबत आमच्या अक्षर प्रवासाला मिळालेले प्रोत्साहन हे सर्व खूप आनंददायक आणि समाधानकारक आहे. त्यांच्या मुखातून येणाऱ्या प्रत्येक शब्दासोबत त्यांच्यात वसणाऱ्या सरस्वतीचा भास होत होता. आम्हा सर्वांना शुभेच्छा देताना ते हस्तलिखित असावे यातूनच त्यांचे लेखनाबद्दलचे प्रेम दिसून आले. अक्षरांच्या संवर्धनासाठी स्वतःपासून सुरुवात करून पुढे पाऊले तर टाका, प्रयत्न योग्य आणि प्रामाणिक असतील तर अशी सुवर्णसंधी नक्कीच उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी दिला. 

अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयांवरील गप्पा , केलेल्या कामांचे सादरीकरण , अजय आणि अच्युत सरांचे वेळोवेळी होणारे मार्गदर्शन , अधूनमधून चहा- नाश्ता, वेगवेगळ्या खाऊंची देवाणघेवाण आणि मनाला वाटेल तेव्हा मनसोक्त केलेले काम ... अशाप्रकारे अक्षरयज्ञातील प्रत्येकाचा कलाप्रवास सुरु होता. अक्षरांच्या संवर्धनासाठी असे अक्षरयज्ञ वेळोवेळी होत राहायला हवे ज्यातून निर्माण होणारी ऊर्जा भावी समाजासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल.आणि हीच पद्मश्री अच्युत पालव यांची 'अक्षरयज्ञ' सुरु करण्यामागील संकल्पना आहे. आतापर्यंतच्या अक्षरयज्ञात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी मार्गदर्शनपर उपस्थिती दिली आहे, शेकडो कलाकार विचारांचे समर्पण करत, अक्षरांची समिधा आणि रंगांची आहुती देत आहेत आणि त्यामुळेच २००७ पासून सुरु झालेला हा अक्षरयज्ञ आजही त्याच प्रखरतेने तेजाळत आहे. पण आता त्याचे दीप्तिमान रूप प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठ्या समाजवर्गापर्यंत पोहोचले पाहिजे. सध्या AI च्या विळख्यात अडकलेली पिढी जर वाचवायची असेल तर असे यज्ञ वारंवार ठिकठिकाणी घडवून आणायला हवेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळायला हवा. या अक्षरयज्ञात एकाने खूप सुदंररित्या आपल्या अक्षरयज्ञाप्रतीच्या भावना मांडल्या होत्या-

आकाशी झेप घे रे अक्षरा 

तोडी AI  चा पिंजरा 

अगदी खरे आहे देवाने माणसाला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे 'कल्पनात्मक मन', जर याच कल्पनांचे पंख कोणी छाटू पाहत असेल तर त्यातून या मनाला वेळीच मुक्त करायला हवे. अच्युत सरांनी सुरु केलेल्या या अक्षरयज्ञातून निर्माण होणारी अशी ब्रह्मक्षरे दूरपर्यंत तेजस्वी राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.  

- रुपाली ठोंबरे 

Thursday, November 6, 2025

प्रवास... गोष्टीपासून चित्रापर्यंतचा

महाराष्ट्रातील अनेक घरांत अगदी प्रामुख्याने आढळून येणारे वर्तमानपत्र म्हणजे लोकसत्ता. आणि या वर्तमानपत्रातील प्रत्येक चित्रातून घराघरांत पोहोचलेले व्यंगचित्रकार निलेश जाधव हे त्यांच्या कलेच्या माध्यमातून सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. ही सर्व चित्रे घरात लोकसत्तातील विविध पुरवण्यांमध्ये नेहमीच पाहायला मिळतात पण तरीही तीच चित्रे जेव्हा एकत्र दादर येथील पु ल देशपांडे कला अकादमी मधील कलादालनात पाहिली तेव्हा त्या चित्राची जादू काही वेगळीच होती. प्रत्येक चित्रातील व्यक्तिरेखा आपल्याला काही सांगू पाहत आहे इतके जिवंत भाव त्या चित्रात होते... मग त्यातील व्यक्ती सामान्य असो वा असामान्य , ती तितकीच बोलकी असतात. हे सर्व पाहताना निलेशची चित्रे अशी कलादालनात पाहायला मिळणे ही खूप वर्षांपासूनची असलेली माझी इच्छा पूर्ण झाली असे वाटले. सुमारे १५० विविध विषयांतील चित्रे तिथे सजवलेली होती पण तरी हा त्याच्या कार्यातील महत्त्वाचा असा १५-२० % च भाग असावा. असे अनेक प्रदर्शने भविष्यातही पाहायला नक्कीच आवडेल. ही चित्रे कलादालनात मला वेगळी वाटली कारण नेहमी वर्तमानपत्रात एक कथा किंवा बातमी सोबत जोडून आलेल्या चित्राचा मागोवा घेणे सहज शक्य होते. चित्र अचूक समजूनही येते. पण इथे कलादालनात तीच चित्रे प्रेक्षकाला नव्याने विचार करण्यास भाग पाडतात. गोष्टीपासून चित्र आपण नेहमीच अनुभवतो पण चित्रापासून गोष्टीचा प्रवासही इतका सुंदर असू शकतो हे आज अनुभवले. 

या चित्र प्रदर्शनासोबतच निलेश जाधव यांनी आपल्या बालमैफिलीतील बालगोपाळांसाठी घेतलेली कार्यशाळाही खूप विशेष होती. पेन्सिल, रंग , कागद या सर्वांसोबत प्रत्येकाचा चित्रप्रवास अगदी लहान वयातच सुरु होतो, आणि त्याच वेळी जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच ती कला एखाद्यात खोल रुजण्यात आणि उद्याच्या जगात बहरून येण्यास सफल ठरते. खरे तर दीड तासात कोणी मोठा चित्रकार बनू शकत नाही हे जरी खरे असले तरी त्या दीड तासात मिळालेले ज्ञान कुठेतरी मनात नक्कीच चांगला बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरू शकते. अशाप्रकारे दीड तासात असा बदल घडवून आणण्यासाठी कार्यशाळेमध्ये नक्की काय घेतले जाईल याची उत्सुकता मलादेखील होती. मुलांचा निलेश दादा बनून आकारांचे महत्व मुलांना खूप छान प्रकारे समजावले. कुठल्याही चित्राचा मूळ पाया म्हणजे काय...आपल्या नेहमीच्या परिचयाचे वर्तुळ, त्रिकोण , चौकोन आणि रेषाच की. फक्त हे सर्व किती प्रमाणात , कशाप्रकारे आणि किती कलात्मकतेने वापरतात यावर त्या चित्राचे स्वरूप ठरत जाते. एका रेषेत केलेला बदल चित्रातील भावना किती वेगळ्या पद्धतीने बदलतात हे सोप्या ईमोजी सारख्या चित्रांतून समजून घेण्यात मुलांना खूपच मज्जा आली. सुरुवातीला 'माझी चित्रे बोलतात ना तुमच्याबरोबर ?' या प्रश्नावर गोंधळून गेलेली किलबिल आता प्रत्येक चित्रासोबत संवाद साधू लागली होती. चित्राची भाषा हळूहळू कळू लागली होती. निर्जीव वस्तू तर सोडाच पण प्राणी असो पक्षी असो वा माणूस...यांमध्ये सुद्धा आकार दडलेले असतात हे कदाचित या मुलांना नव्याने समजले असेल त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक नवा शोध लागल्याची भावना दिसून येत होती. आणि ते अधिक उत्साहाने यात सहभागी होत होते. बालमैफिल मधील चित्रे पाहताना अनेकदा हा प्रश्न मला देखील पडायचा कि एखाद्या प्राण्याचे किंवा मुलाचे हावभाव , आपल्या मनाचा वेध घेता येणारी कृती कशी बरे सुचत असेल , नक्की कुठून सुरुवात होत असेल किंवा कथेतील नेमका कोणता भाग चितारायचा हे कसे ठरवले जात असेल. आज प्रत्यक्ष गोष्टीचे चित्र होताना पाहिले आणि जणू माझ्या मनात गुंतलेली ही प्रश्नांची वीण उलगडत गेली . ढोल्या हत्ती आणि चिंटुकल्या मुंगीची गोष्ट इतक्या सहज सुंदर पद्धतीने चित्रात मांडली कि ती दोघेही  बोलके झाले होते आता. 

त्यानंतर एका लहानश्या छकुलीला स्टेज वर बोलावून चित्र काढण्याचा प्रवास कसा सुरु होतो, आणि पुढे ते चित्र कसे साकारत जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहायला सर्वाना खूप आवडले. कौतुक त्या छकुलीचेही जी अगदी उत्साहात आणि उत्सुकतेने छानप्रकारे निःस्तब्ध उभी राहिली. लहान मुलांना आपल्या वयातल्या मुलांपेक्षा मोठ्यांवर होणारे प्रयोग पाहण्यात काही विशेष मज्जा येते आणि हे निलेशनी अगदी अचूक हेरले. मग काय, एका दादांना स्टेजवर बोलावण्यात आले. त्यानंतर सर्वानी त्यांच्या शरीयष्टीचा , हावभावाचा अभ्यास केला आणि पाहता पाहता त्यांचे व्यंगचित्र सर्वांसमोर प्रस्तुत झाले. त्यांनाही आणि मुलांनाही खूप आनंद झाला . असा हा छोटासा पण तितकाच दमदार कार्यक्रम संपत जरी आला तरी या कार्यशाळेतून मुलांनी नक्कीच काहीतरी घेतले असेल. आशा आहे त्यांना आता पटले असावे कि देवाने डोळे आणि हात नुसते मोबाईलला पाहण्यासाठी नव्हे तर आसपास दिसणारे व न दिसणारे असे अनेक आकार पाहून ,अनुभवून ते कागदावर उतरवण्यासाठी दिले आहेत. कदाचित या क्षणी तीच मुले आईकडे हट्ट करून मिळालेल्या मोठ्या कागदावर चित्राच्या साहाय्याने आपल्या मनाला, स्वतःला मांडत असावे. आणि जर खरेच असे एकाही घरी झाले असेल तर तीच या कार्यशाळेची खऱ्या अर्थाने झालेली सफलता आहे. 

- रुपाली ठोंबरे 

Friday, September 19, 2025

'अनबाऊंड'..अक्षरांच्या पलीकडले

'लेटर्स एन स्पिरिट्स'... हे नाव गेले अनेक वर्षे ऐकत आले आहे, सुलेखनाच्या क्षेत्रात मराठी साहित्याच्या माध्यमातून या कलाप्रेमी समूहाने दिनदर्शिका किंवा कॉफी टेबल पुस्तक या रूपांत केलेली कामे पाहिली, यांतील अनेक कलाकारांचा गेल्या काही वर्षांतील प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. बहुतेक सर्वच जण विविध क्षेत्रात कार्यरत असतानाही आपला सुलेखनाचा अभ्यास सातत्याने करत असतात. आणि त्याचेच फलस्वरूप म्हणजे आज मुंबईतील प्रतिष्ठित अशा जहांगीर आर्ट गॅलरी येथील प्रमुख कलादालनात सुरु असलेले 'अनबाऊंड' हे चित्रप्रदर्शन. 


प्रदर्शन सुरु झाले आणि अगदी दुसऱ्याच दिवशी माझा ते पाहण्याचा योग जुळून आला. १६ सुलेखनकार... प्रत्येकाची विचार करण्याची , अक्षरांना समजून घेण्याची, त्यांना मांडण्याची तऱ्हा वेगवेगळी पण अक्षरांच्या एका अदृश्य धाग्याने एकत्र गुंफलेली. मला लेखिका म्हणून खरी ओळख देणारे, लोकसत्तामधील सर्व चित्रांवर वर्चस्व गाजवणारे निलेश जाधव यांच्या प्रदर्शनाची तर कितीतरी वर्षांपासून मी वाट पाहत होती. आणि आज त्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आणि तो ही अतिशय उत्कृष्टरीत्या... मुळातच फाईन आर्टचे विद्यार्थी आणि आतापर्यंत नोकरीनिमित्त मिळालेल्या अनुभवाचे एकत्र चित्रण पाहायला मिळाले. अक्षरांच्या सानिध्यात प्रत्येक माणसाचे जीवन विविध रंगछटांच्या ऊनसावलीत विविध आकार घेत असते , त्याच्या भावभावना त्यासोबत जुळलेल्या असतात, एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा व्यक्त होतानाही साथ असते ती अक्षरांची आणि हे सर्व एकत्रितरित्या एका चित्रात मांडण्याचा विचारच किती आगळावेगळा... आणि हेच मला त्याच्या चित्रांत जाणवले. निलेश व्यक्तिचित्रांमध्ये तर माहीर आहेतच पण अक्षरांवर पण इतके प्रभुत्व आहे हे आजच पाहिले... खूप छान. या सर्वात एक निरागस मुलगी...अक्षरांच्या सहवासात जणू भविष्याची स्वप्ने पाहत रमलेली आहे ती मला अधिक भावली. जेव्हापासून खरी सुलेखनचित्रे मला कळू लागली तेव्हापासून मी अक्षयाला ओळखते... माझ्यासाठी अक्षरांचा तो प्रवासच अक्षयाच्या पहिल्या प्रदर्शनापासून सुरु झाला. विविध भाषा आणि शैलींतील सुलेखनातील कानेकोपरे माहित असूनही एकाच शैलीला घेऊन त्यातून अद्भुत प्रयोग करत प्रत्येकवेळी नव्याने सर्वांना अचंबित करण्यात ती नेहमी सफल झालेली दिसते. तिची काम करण्याची पद्धत, रंगांची अचूक उधळण, या रंगछटांत सुरु असलेला अक्षरांचा लपाछुपीचा खेळ हे सारे नेहमीच मंत्रमुग्ध करणारे असते. हे सर्व प्रत्यक्षात पाहायला आणि त्यातून बरेच काही शिकायला अनेकदा मिळाले आहे, पहिल्यापासूनच तिची चित्रे प्रेरणादायी असतात परंतु यावेळी या सुंदर अक्षरांचे कॅनव्हासवरील विशाल स्वरूप पाहताना वेगळीच मज्जा आली. वाईन रंगातील तिची कलाकृती ज्यात गोल्डन अक्षरांत उठावदार 'बी' 'ए' 'सी' अशी स्वैर अक्षरे... त्या चित्रात एक वेगळीच नशा जाणवते.या चित्राने माझे लक्ष विशेष वेधले गेले आणि मला खूप आवडलेही. अक्षरे म्हणजे जीवनाच्या कॅनवासवर रंग भरणारे माध्यम....हे डॉ शिरीष शिरसाट यांच्या २ कलाकृतींमधून स्पष्टपणे जाणवते... सावल्यांचा वापर करून केलेली आखणी आणि त्यामध्ये विसावलेली अक्षरे... सुंदर. डॉक्टरांचे असे काम मी प्रथमच पाहत होते आणि त्यांच्या इतर कामाप्रमाणेच हे सुद्धा खूप आवडले. मंगेश आकूला यांच्या चित्रांमध्ये एका स्ट्रोकमध्ये मांडलेली अक्षरे , विविध रंगसंगती एकत्र आणून केलेल्या अक्षर रचना... सर्वच मनमोहक. देवनागरीसोबत मोडी , गुजराती, तेलुगू अशा इतर भाषांतही केलेला प्रयत्न सुंदर आहे. एरव्ही बीजी लिमये म्हणजे कवितांमधील मूळ गाभा ओळखून त्या अक्षरांना बोलके स्वरूप देणारा अवलिया अशीच त्यांची ओळख होती. आजही अक्षरयज्ञ मधील संध्याकाळची बीजीं सोबतची आमची अक्षर मैफिल आठवते. सकाळपासून सुरु असलेली कार्यशाळा संपली कि बीजी सरांसोबत आमचा एक नवा अक्षरप्रवास सुरु व्हायचा. त्यांचे प्रदर्शनातील काम यावेळी खूप वेगळे होते, मग ते कापडावरील विष्णुसहस्त्रनाम असो वा अक्षरांची रेखीव कोरलेली सुंदर गुंतागुंत असो... सारेच काम केवळ अप्रतिम. अक्षरांच्या पलीकडेही एक वेगळे ऍबस्ट्रॅक्ट , भाववाचक असे विश्व असते जे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे असूनही नेत्रसुख देणारे ठरते हे पटवून देणारे काम म्हणजे मनीष कसोदेकर यांची अक्षरचित्रे. भले काय लिहिले आहे ते वाचता येणार नाही किंबहुना तशी त्या कलाकाराची अपेक्षाही नसते परंतु तरीही ती चित्रे प्रेक्षकाला खिळवून ठेवू शकतात. अशा कलाकृती निर्माण करणे सोपे नक्कीच नसते. मलाही त्यांच्या या चित्रपर्यंतच्या प्रवासाबद्दल अजून जाणून घेण्याचे विशेष कुतूहल आहे कारण ते काम खरंच खूप प्रेरणादायी आहे. ऍबस्ट्रॅक्ट बद्दल विचार करता पिनाकीन रिसबूड यांचे कामही दृश्य-अदृश्य अक्षरांचा सुरेख मिलाप भासतो. एक उत्तम छायाचित्रकार म्हणून वावरताना त्यांची सुलेखनकार ही दुसरी बाजूसुद्धा यशस्वीरीत्या मांडलेली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुळचे नाशिकचे असलेले चिंतामण पगारे यांची देवनागरी भाषेतील चित्रे म्हणजे मेडिटेशन आणि कलात्मकता यांची योग्य सांगड. त्यांच्या चित्रांनी नाद, मौन, वैश्विक अनुनाद या सर्वाला दृश्य रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.मनिषा नायक यांच्यामते अक्षर म्हणजे दृश्य स्वर आहे आणि त्या अक्षराला रंग , आकार , पोत, रचना यांच्या साहाय्याने भाववाचक तालबद्ध रूप देऊन अक्षरांचे आगळेवेगळे रूप जगासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मनिषासाठी अक्षर हे अध्यात्मिक , वैश्विक भाव आहे ज्याचे प्रकटीकरण हा एक विविध अक्षरांचा एकत्र सोहळा वाटावा. मनन साठी सुलेखनकला म्हणजे एक भावनिक प्रवाह ज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक तरंगासोबत स्वत्व, संस्कृती आणि वारसा याबद्दलची त्याच्या विश्वातील कथा उलगडत जाते.फक्त तुलनात्मक रंगछटांचा अभ्यास आणि अक्षरांची विशिष्ट रचना यामुळे चित्राचे सौन्दर्य अगदी मोजक्या रंगांतदेखील किती फुलू शकते ही किमया रुपाली गट्टीच्या चित्रांमधून अनुभवायला मिळते. सिनेमॅटिक संकल्पन आणि सुलेखन यांचा सुरेख मेळ घडवून आणत सुलेखनाच्या माध्यमातून दृश्य कथाकथन कशाप्रकारे अस्तित्वात येऊ शकते ते या प्रदर्शनात पाहावयास मिळते. रंगीबेरंगी अक्षरांच्या दुनियेत अक्षरांची एक ग्रे बाजू पण असू शकते हे विनय देशपांडेंच्या कलाकृतीतून समोर येते आणि या तिसऱ्या परिमाणाबद्दल उत्सुकता वाढते. प्रत्येक कॅनव्हासवर विशिष्ट रचनेत, केवळ २ रंगांत मांडलेली २६ रोमन अक्षरे... अक्षरांचे एक वेगळे रूप समोर आणतात. सुलेखन , चित्रकला अनेकजण करतात पण यासाठी लागणारी शाई, साधने स्वतः केलेल्या प्रयोगातून अस्तित्वात आणणारे अश्विन कारळे सारखे उत्तम कलाकार फार कमी असतात. प्रदर्शनातील त्याचे काम म्हणजे नियमित  वापरातील अक्षरांना पारंपरिक पद्धतीत न मांडता त्यांना एका विशिष्ट शैलीमध्ये मांडून नव्या सुलेखनकारांसाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित केले आहे . जे असेल ते तसेच न घेता त्यातून नवे काही शोधण्याचा प्रयत्न करून वेगळ्या प्रकारे मांडता आले पाहिजे. स्नेहलच्या मते सुलेखन हा संकल्पन आणि ललितकला यांमधील दुवा असून ती या पिढीतील सुलेखनकारांपैकी एक आहे जिचा भर सुलेखनात मुक्तपणे भाव प्रकट करून नित्य प्रयोगशील काम करण्यावर आहे. शाईतून निर्माण झालेले अक्षरांचे तालबद्ध आकृतिबंध ऍबस्ट्रॅक्ट स्वरूप हा तिच्या 'शब्द संचार' या मालिकेतील मूळ अर्क आहे. निरूच्या प्रदर्शनातील कामाने मला खरेच एक सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वीच तुझी हरवलेली कॅलिग्राफी पाहण्याची इच्छा आहे असे मी तिला बोलून गेले होते आणि आज तिची चित्रे इथे लागलेली आहेत. निरूच्या चित्रांत एक लयबद्धता, चिकाटी, जागरूकता आणि शिस्त दिसून येते. प्रत्येक स्ट्रोक जणू योगामधील एक पवित्रा... मनाला शांती, स्थिरता देणारा. चौथ्या शतकातील पल्लव लिपीतून प्रेरणा घेऊन पेस्टल रंगसंगतीत अतिशय सुबकरीत्या निर्माण केलेल्या कलाकृती पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही परस्परविरोधी गोष्टींचा एकत्रित मेळ घालण्यात यशस्वी ठरल्या आहेत. निलेश देशपांडे यांची १५ चित्रांची एकत्र मालिका पाहण्यात मला विशेष मज्जा आली. प्रत्येक फ्रेम एकमेकांपेक्षा वेगळी... एक भाव , एखादी अवस्था दर्शवणारी... मोजक्या रंगांत आणि मोजक्या ढंगात सादर झालेली.... पण तरी एकमेकांसोबत सामावून जाणारी.  

कलादालनात लागलेले सर्वच सुलेखनकारांचे काम अप्रतिम आणि विलक्षण आहे...इथे ब्लॉगवर काही छायाचित्रे आहेत, थोडक्यात माहिती आहे ... पण मला विशेष नमूद करावेसे वाटते कि प्रत्यक्षपणे तिथे जाऊन घेता येणारा अनुभव त्याहीपेक्षा सुंदर असेल. त्यामुळे जर तुम्ही सुलेखनकार असतील किंवा कलाप्रेमी जरी असाल तरी मला तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते कि या कलादालनाला भेट देऊन स्वतः ही अनुभूती घेणे केव्हाही चांगले. चित्रे नुसती बघण्यापेक्षा ती निर्माण करणाऱ्या सुलेखनकारांशी बोलून त्या चित्रांबद्दल जाणून घेण्यात एक विशेष आनंद आणि समाधान असेल. आणि त्यासाठी लेटर्स एन स्पिरिट्स हा समूह नेहमीच तत्पर असतो. या सर्वांसोबत आता पर्यंत त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके जवळून पाहण्याची संधी सुद्धा आहे. २२ सप्टेंबर २०२५ हा शेवटचा दिवस असला तरी जास्त वेळ न दवडता हा आस्वाद घ्यायला हवा कारण अक्षरांची अशी मेजवानी पुन्हा पुन्हा अशाप्रकारे गॅलरीत नक्कीच मिळत नाही. 

- रुपाली ठोंबरे 



Tuesday, September 16, 2025

उदयगिरी ... एक स्वप्नपूर्ती

आज भारताची शान असलेल्या, आत्मनिर्भर भारताचे प्रतीक ठरलेल्या विशाल अशा दोन भारतीय युद्धनौका 'आय एन एस उदयगिरी' आणि 'आय एन एस हिमगिरी' दिमाखात समोर उभ्या , डावीकडे पांढऱ्या शुभ्र गणवेषांमध्ये अतिशय शिस्तीमध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीच्या स्वागतास सज्ज असलेले ५० नौसैनिक, दोन्ही युद्धनौकांचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन, आसपास खूप काही सुरु होते पण सर्व अगदी शांतपणे आणि सुव्यवस्थेत... हे असे दृश्य माझ्यासारख्या सामान्य नागरिकासाठी स्वप्नवतच होते. पण आज मी तिथे उपस्थित होते भारतीय नौसेना पोत उदयगिरी आणि हिमगिरी या युद्धनौकांच्या प्रवर्तिकरण समारोहासाठी एक अतिथी म्हणून. खरं सांगते तिथे पाऊल ठेवणे हेच खूप अभिमानास्पद वाटत होते. लहानपणापासून आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना फक्त गोष्टींमध्ये, वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर पाहिले होते. आज आसपास त्यांच्यामध्ये वावरणे आणि ते आपल्याशी बोलत आहेत , आपले कौतुक करत आहेत , युध्दनौकेमध्ये आतपर्यंत जाण्याची संधी, देशाचे रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेली भेट हे असे क्षण आयुष्यात आले यावर विश्वासच बसत नव्हता. आणि या सर्वांचे श्रेय जाते माझ्यातील कलेला, या कलेला योग्य वेळी योग्य प्रकारे खत पाणी घालून फुलवणाऱ्या माझ्या 'अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी' या सुलेखन शाळेला आणि युद्धनौकेसाठी कार्य करण्यासाठी उत्स्फूर्त करणाऱ्या 'उदयगिरी' युद्धनौकेच्या कलाप्रेमी कॅप्टनला. 

आजही प्रकर्षाने आठवतो तो दिवस. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील प्रतिष्ठित अशा 'जहांगीर आर्ट गॅलरी' या कलादालनात आमचे 'अक्षरभारती' हे सुलेखन कलाप्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडत असताना एके दिवशी भारतीय नौसेनेचे कॅप्टन आणि सोबत कमांडर यांनी तिथे भेट दिली.ते तिथे सामान्य दर्शकाप्रमाणे आले होते पण तरी त्यांची बोलण्याची पद्दत, समोरच्याबद्दल असलेला आदर , शांत असे व्यक्तिमत्त्व या सर्वामुळे आमची ती भेट असामान्य वाटली. मला मुळातच माझ्या कलाकृतींबद्दल भरभरून बोलायला खूप आवडते आणि इथे तर समोरून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनाही माझ्या कल्पना , विचार जाणून घेण्यात रस होता. भारतीय ११ शास्त्रीय भाषांमध्ये केलेल्या एका कलाकृतीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या चित्राबद्दल सांगताना मी कित्येक वर्षांपासून असलेली माझी इच्छा व्यक्त केली. आपला देश जसा शेतीप्रधान आहे तसाच तो लिपिप्रधान आहे. अनेक भाषा आणि लिप्यांनी समृद्ध अशी आपली भारतीय संस्कृती अशा चित्रांच्या माध्यमातून जगासमोर मांडली तर नक्कीच भारत देशाची एक खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण बाजू विश्वात प्रकाशमान होईल. कदाचित हाच माझा विचार त्यांना आवडला असावा आणि काही महिन्यांतच त्यांनी मला संपर्क साधला. आणि त्यानंतर 'उदयगिरी' या नावाला समर्पक अशा एकूण ४ कलाकृती माझ्या हातून घडून आल्या ज्यांनी भारतीय सुलेखन क्षेत्रात आज एक इतिहास घडवला. 


या प्रत्येक चित्राचे एक वैशिष्ट्य आहे. खरे तर प्रत्येक चित्रातून एक नवीन ब्लॉग निर्माण होईल. मी तयार केलेली सर्व अक्षरचित्रे असल्याने चित्रातील कण न कण अक्षरांनी सामावून गेलेला आहे. त्यातील एका चित्रात शास्त्रीय , अधिकृत आणि पुरातन अशा एकूण २१ भारतीय भाषांमध्ये उदयगिरी हे नाव रंग आणि रचना यांचा मेळ घालून कलात्मकतेने मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. २१ च का तर २१ फेब्रुवारी हा मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून. जरी अनेक लिपी असतील तरी ते चित्र एक वाटते... ही  संकल्पना भारतातील विविधतेत असलेली एकता दर्शवते. हे चित्र नौकेमध्ये कॅप्टनच्या केबिन मध्ये दिमाखात विराजमान झाले आहे. माझ्याप्रमाणेच इतरही चित्रकारांची चित्रे त्या दालनात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत.  दुसरे चित्र म्हणजे ५ फ्रेम्सची एकत्र रचना. यातील प्रत्येक चित्रचौकटीत उ द य गी  री अशी अक्षरे समुद्रलाटांच्या अक्षरशैलीमध्ये अनुक्रमे मांडली आहेत... दुरून दिसताना ते फक्त एक अक्षर वाटते पण जवळ जाऊन पाहिले तर ते प्रत्येक अक्षर हजारो भारतीय लिपीकृत अक्षरांनी तयार झालेले आढळून येईल. या चित्रात एक विशेष म्हणजे यात असलेला एक प्रतीकात्मक बिंदू जो प्रतीक आहे सूर्याचा... प्रत्येक फ्रेममध्ये त्या बिंदूचा होणारा प्रवास म्हणजे सूर्योदय... उदयगिरी या त्या नौकेच्या नामार्थाला समर्पक. हे चित्र नौकेमध्ये कॅप्टनच्या बेडरूम मध्ये आहे. घरी तयार करताना हे चित्र खूप सामान्य वाटले मला पण त्या ठिकाणी फ्रेमिंग केल्यानंतर खूप सुंदर वाटत होते. खरेच म्हणतात ना चित्राला योग्य जागा , प्रकाशयोजना मिळाली तर त्यातील सौंदर्य अधिक खुलते. तिसऱ्या चित्राची अक्षरांची मूळ संकल्पना अशीच होती फक्त इथे बिंदू नसून पाचही चित्रे विविध रंगांतील अक्षरांनी भरून गेली आहेत. हे पाच रंग म्हणजे ऋतूंचे प्रतीक... आपली युद्धनौका सर्व ऋतूंमध्ये, परिस्थितींमध्ये त्याच जोशात आणि उत्साहात कार्यरत असेल ही त्यामागची माझी संकल्पना. चौथे चित्र म्हणजे मी प्रथमच केलेला एक आगळावेगळा प्रयोग होता जो सुरुवातीला फार कठीण वाटत असला तरी शेवटी ते यशस्वीरीत्या पूर्ण झाले. उगवत्या सूर्यासोबत रंगलेले आकाश, खाली समुद्राच्या पाण्यातील लाटांवर अलगद पसरलेले त्याचे  प्रतिबिंब, एक पक्षांचा थवा जणू या दिनकराला भेटण्यासाठी आतुर होऊन झेप घेत आहे आणि अशा या वातावरणात विशाखापट्टणम येथील डॉल्फिन टेकडीवर दिमाखात उभे असलेले दीपगृह...असे भूदृश्य मी प्रथमच कॅनवासवर अस्तित्वात आणले होते आणि या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे इथे पाणी, आकाश, अगदी पक्षीसुद्धा अक्षरांनी चितारले होते. वॉर्डरूम म्हणजे डाईनिंग एरिया... तिथे ही दोन्ही चित्रे आज नौसैनिकांना साथ देण्यासाठी तिथे उपस्थित झाली आहेत. ओडिया लिपीमधील अक्षरे आणि देवनागरीतील शिरोरेषेला एक वेगळे वळण देऊन समुद्राच्या लाटा निर्माण झाल्या, तेलुगू मधील अक्षरांची एक विशेष ठेवण असते आणि त्यातूनच माझ्या चित्रातील पक्षी अगदी लयीत जन्माला आली, आता राहिले आकाश तर ते मात्र ११ भाषांतील अक्षरांनी भरून आले होते. प्रत्येक लिपीतील अक्षरे थोडी वेगळी पण अगदी सहज इतरांसोबत सामावून जाणारी...आपल्या देशाची हीच तर खासियत आहे. 




महिनाभरापूर्वी ही चित्रे घरात साकारत असतानाही काही वेगळ्याच भावना होत्या. आपल्या देशासाठी काही करायला मिळणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. एकदा बोलता बोलता तेथील कमांडर बोलून गेला कि आम्ही घरापासून ४-६ महिने दूर नौकेवर असताना एका वेगळ्याच मानसिक स्थितीमध्ये असतो त्यावेळी तुझी ही चित्रे मनाला एक वेगळा आनंद देतील ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची देशसेवाच आहे... त्याचे हे शब्द अक्षरशः मनावर खूप खोल कोरले गेले आहेत आणि स्वतःबद्दल एक वेगळा अभिमान जागृत झाला. आज ती सर्व चित्रे सागवान फ्रेम्स मध्ये बंदिस्त होऊन युद्धनौकेमधील महत्वाच्या ३ रूम्स मध्ये आहेत. देशाच्या इतक्या प्रतिष्ठित ठिकाणी पितळेच्या टॅलीवर कोरलेला प्रत्येक चित्रामागचा माझा विचार आणि वर्णन... त्यासोबत त्यावर कोरलेले आपले नाव हा मला मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा सन्मान आहे असे मी मानते. जोपर्यंत ही युद्धनौका राहील तोपर्यंत ती चित्रे अजरामर राहतील असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा धन्य वाटले. आणि हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आणि स्वतः अनुभवणे हा एक खूप मोठा अविस्मरणीय क्षण होता. 

या सर्वांतून आनंद , समाधान , सन्मान तर मिळालाच पण यात घडलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही शिकवून गेली. आपण सैनिकांबद्दल, त्यांच्या त्याग-शौर्य-कर्तृत्वाबद्दल खूप काही ऐकतो परंतू त्याची जाणीव मला तिथे उपस्थित राहून जास्त झाली आणि त्यांच्याबद्दल असलेला अभिमान द्विगुणित झाला. देशातला प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित राहावा यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागासमोर आपल्या व्यथा फारच तुटपुंज्या वाटू लागल्या. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे शिस्त. सैन्यामध्ये शिस्त असते हे माहित होते पण ठरलेल्या वेळेपेक्षा एक मिनिट उशीर सुद्धा अजिबात चालत नाही किंवा ठरलेल्या गणवेषात काडीमात्राचाही बदल अशा चुकीला माफी नाही, कुठलीही सबब अपेक्षित नसते आणि तिथे काम करणारेदेखील इतके शिस्तशीर असतात कि आपली चूक लक्षात येताच कुठलीही सबब पुढे न करता लगेच  आवश्यक ती कृती करतात हे प्रत्यक्ष पाहिले. त्यांचे स्वतःचे काम, बोलण्यात मिनिटामिनिटाचा हिशोब असायचा. त्यामुळे वेळेची किंमत कशी असावी हे शिकायला मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्त्व ही तर प्रत्येक सामान्य व्यक्तीवर खास ठसा उमटवणारी असते. आदराने बोलणे, वागणे आणि त्यासोबतच असलेले देशप्रेम हे सर्व त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. 

पूर्वार्धात ८ वर्षे 'ओ एन जी सी' साठी 'वेल प्लॅनर' म्हणून काम करत असताना जो देशाभिमान मला जाणवायचा त्याच भावना जवळजवळ १० वर्षांनंतर उदयगिरीसाठीचे हे काम करताना दाटून आल्या. याच वर्षी माझे गुरु आणि APSC चे सर्वेसर्वा अच्युत पालव यांना सुलेखन क्षेत्रातील विलक्षण कामगिरीबद्दल 'पद्मश्री' हा किताब देऊन सन्मानण्यात आले  आणि त्याच वर्षी त्यांच्या एका विद्यार्थिनीच्या सुलेखन चित्रांना भारतीय नौदलाने अशाप्रकारे सन्मान बहाल केला हे सर्वच भारतीय सुलेखनकारांसाठी प्रेरणादायी आहे. या दोन्ही गोष्टी भारतीय सुलेखन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आहेत. 'तू माझी विद्यार्थिनी आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो'... आपल्या गुरुकडून अशा शब्दांत आपले कौतुक व्हावे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. आणि उदयगिरीच्या या माध्यमातून आज स्वप्नपूर्ती झाली असे मला वाटते. माझ्याप्रमाणेच इतर अनेक सुलेखनकार देशातील अनेक भाषांत, लिप्यांत उत्तम काम करत आहेत, त्या सर्वानाच अशाप्रकारे संधी उपलब्ध झाल्या तर नक्कीच या क्षेत्रात एक नवी क्रांती घडून येईल.  एरव्ही चित्रकलेत काय ठेवले आहे म्हणणाऱ्यांसाठी या कलाक्षेत्रातही भविष्यात किती संधी उपलब्ध आहेत त्यासाठीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. तीव्र इच्छा असेल तर माणूस कुठेही आपले स्थान प्रबळ करू शकतो. त्यामुळे आपली मुले नुसती चित्र काढत असतील तर त्यासाठी दुःखी न होता त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. यातूनच एक नवा भारत नक्कीच जगासमोर येईल. 

 - रुपाली ठोंबरे . 


Blogs I follow :