'लेटर्स एन स्पिरिट्स'... हे नाव गेले अनेक वर्षे ऐकत आले आहे, सुलेखनाच्या क्षेत्रात मराठी साहित्याच्या माध्यमातून या कलाप्रेमी समूहाने दिनदर्शिका किंवा कॉफी टेबल पुस्तक या रूपांत केलेली कामे पाहिली, यांतील अनेक कलाकारांचा गेल्या काही वर्षांतील प्रवास अगदी जवळून पाहिला आहे. बहुतेक सर्वच जण विविध क्षेत्रात कार्यरत असतानाही आपला सुलेखनाचा अभ्यास सातत्याने करत असतात. आणि त्याचेच फलस्वरूप म्हणजे आज मुंबईतील प्रतिष्ठित अशा जहांगीर आर्ट गॅलरी येथील प्रमुख कलादालनात सुरु असलेले 'अनबाऊंड' हे चित्रप्रदर्शन.
प्रदर्शन सुरु झाले आणि अगदी दुसऱ्याच दिवशी माझा ते पाहण्याचा योग जुळून आला. १६ सुलेखनकार... प्रत्येकाची विचार करण्याची , अक्षरांना समजून घेण्याची, त्यांना मांडण्याची तऱ्हा वेगवेगळी पण अक्षरांच्या एका अदृश्य धाग्याने एकत्र गुंफलेली. मला लेखिका म्हणून खरी ओळख देणारे, लोकसत्तामधील सर्व चित्रांवर वर्चस्व गाजवणारे निलेश जाधव यांच्या प्रदर्शनाची तर कितीतरी वर्षांपासून मी वाट पाहत होती. आणि आज त्या प्रतिक्षेला पूर्णविराम मिळाला आणि तो ही अतिशय उत्कृष्टरीत्या... मुळातच फाईन आर्टचे विद्यार्थी आणि आतापर्यंत नोकरीनिमित्त मिळालेल्या अनुभवाचे एकत्र चित्रण पाहायला मिळाले. अक्षरांच्या सानिध्यात प्रत्येक माणसाचे जीवन विविध रंगछटांच्या ऊनसावलीत विविध आकार घेत असते , त्याच्या भावभावना त्यासोबत जुळलेल्या असतात, एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा व्यक्त होतानाही साथ असते ती अक्षरांची आणि हे सर्व एकत्रितरित्या एका चित्रात मांडण्याचा विचारच किती आगळावेगळा... आणि हेच मला त्याच्या चित्रांत जाणवले. निलेश व्यक्तिचित्रांमध्ये तर माहीर आहेतच पण अक्षरांवर पण इतके प्रभुत्व आहे हे आजच पाहिले... खूप छान. या सर्वात एक निरागस मुलगी...अक्षरांच्या सहवासात जणू भविष्याची स्वप्ने पाहत रमलेली आहे ती मला अधिक भावली. जेव्हापासून खरी सुलेखनचित्रे मला कळू लागली तेव्हापासून मी अक्षयाला ओळखते... माझ्यासाठी अक्षरांचा तो प्रवासच अक्षयाच्या पहिल्या प्रदर्शनापासून सुरु झाला. विविध भाषा आणि शैलींतील सुलेखनातील कानेकोपरे अचूक माहित असूनही एकाच शैलीला घेऊन त्यातून अद्भुत प्रयोग करत प्रत्येकवेळी नव्याने सर्वांना अचंबित करण्यात ती नेहमी सफल झालेली दिसते. तिची काम करण्याची पद्धत, रंगांची अचूक उधळण, या रंगछटांत सुरु असलेला अक्षरांचा लपाछुपीचा खेळ हे सारे नेहमीच मंत्रमुग्ध करणारे असते. हे सर्व प्रत्यक्षात पाहायला आणि त्यातून बरेच काही शिकायला अनेकदा मिळाले आहे, पहिल्यापासूनच तिची चित्रे प्रेरणादायी असतात परंतु यावेळी या सुंदर अक्षरांचे कॅनव्हासवरील विशाल स्वरूप पाहताना वेगळीच मज्जा आली. वाईन रंगातील तिची कलाकृती ज्यात गोल्डन अक्षरांत उठावदार बी ए सी अक्षरे... त्या चित्रात एक वेगळीच नशा जाणवते.या चित्राने माझे लक्ष विशेष वेधले गेले आणि मला खूप आवडलेही. अक्षरे म्हणजे जीवनाच्या कॅनवासवर रंग भरणारे माध्यम....हे डॉ शिरीष शिरसाट यांच्या २ कलाकृतींमधून स्पष्टपणे जाणवते... सावल्यांचा वापर करून केलेली आखणी आणि त्यामध्ये विसावलेली अक्षरे... सुंदर. डॉक्टरांचे असे काम मी प्रथमच पाहत होते आणि त्यांच्या इतर कामाप्रमाणेच हे सुद्धा खूप आवडले. मंगेश आकूला यांच्या चित्रांमध्ये एका स्ट्रोकमध्ये मांडलेली अक्षरे , विविध रंगसंगती एकत्र आणून केलेल्या अक्षर रचना... सर्वच मनमोहक. देवनागरीसोबत मोडी , गुजराती, तेलुगू अशा इतर भाषांतही केलेला प्रयत्न सुंदर आहे. एरव्ही बीजी लिमये म्हणजे कवितांमधील मूळ गाभा ओळखून त्या अक्षरांना बोलके स्वरूप देणारा अवलिया अशीच त्यांची ओळख होती. आजही अक्षरयज्ञ मधील संध्याकाळची बीजीं सोबतची आमची अक्षर मैफिल आठवते. सकाळपासून सुरु असलेली कार्यशाळा संपली कि बीजी सरांसोबत आमचा एक नवा अक्षरप्रवास सुरु व्हायचा. त्यांचे प्रदर्शनातील काम यावेळी खूप वेगळे होते, मग ते कापडावरील विष्णुसहस्त्रनाम असो वा अक्षरांची रेखीव कोरलेली सुंदर गुंतागुंत असो... सारेच काम केवळ अप्रतिम. अक्षरांच्या पलीकडेही एक वेगळे ऍबस्ट्रॅक्ट , भाववाचक असे विश्व असते जे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे असूनही नेत्रसुख देणारे ठरते हे पटवून देणारे काम म्हणजे मनीष कसोडेकर यांची अक्षरचित्रे. भले काही लिहिले आहे ते वाचता येणार नाही किंबहुना तशी त्या कलाकाराची अपेक्षाही नसते परंतु तरीही त्या चित्रे प्रेक्षकाला खिळवून ठेवू शकतात. अशा कलाकृती निर्माण करणे सोपे नक्कीच नसते. त्याबद्दल अजून जाणून घेण्याचे विशेष कुतूहल आहे कारण ते काम खूप प्रेरणादायी आहे. ऍबस्ट्रॅक्ट बद्दल विचार करता पिनाकीन रिसबूड यांचे कामही दृश्य-अदृश्य अक्षरांचा सुरेख मिलाप भासतो. एक उत्तम छायाचित्रकार म्हणून वावरताना त्यांची सुलेखनकार ही दुसरी बाजू सुद्धा यशस्वीरीत्या मांडलेली या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मुळचे नाशिकचे असलेले चिंतामण पगारे यांची देवनागरी भाषेतील चित्रे म्हणजे मेडिटेशन आणि कलात्मकता यांची योग्य सांगड. त्यांच्या चित्रांनी नाद, मौन, वैश्विक अनुनाद या सर्वाला दृश्य रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.मनिषा नायक यांच्यामते अक्षर म्हणजे दृश्य स्वर आहे आणि त्या अक्षराला रंग , आकार , पोत, रचना यांच्या साहाय्याने भाववाचक तालबद्ध रूप देऊन अक्षरांचे आगळेवेगळे रूप जगासमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मनिषासाठी अक्षर हे अध्यात्मिक , वैश्विक भाव आहे ज्याचे प्रकटीकरण हा एक विविध अक्षरांचा एकत्र सोहळा वाटावा. मनन साठी सुलेखनकला म्हणजे एक भावनिक प्रवाह ज्यात निर्माण होणाऱ्या प्रत्येक तरंगासोबत स्वत्व, संस्कृती आणि वारसा याबद्दलची त्याच्या विश्वातील कथा उलगडत जाते.फक्त तुलनात्मक रंगछटांचा अभ्यास आणि अक्षरांची विशिष्ट रचना यामुळे चित्राचे सौन्दर्य अगदी मोजक्या रंगांतदेखील किती फुलू शकते ही किमया रुपाली गट्टीच्या चित्रांमधून अनुभवायला मिळते. सिनेमॅटिक संकल्पन आणि सुलेखन यांचा सुरेख मेळ घडवून आणत सुलेखनाच्या माध्यमातून दृश्य कथाकथन कशाप्रकारे अस्तित्वात येऊ शकते ते या प्रदर्शनात पाहावयास मिळते. रंगीबेरंगी अक्षरांच्या दुनियेत अक्षरांची एक ग्रे बाजू पण असू शकते हे विनय देशपांडेंच्या कलाकृतीतून समोर येते आणि या तिसऱ्या परिमाणाबद्दल उत्सुकता वाढते. प्रत्येक कॅनव्हासवर विशिष्ट रचनेत, केवळ २ रंगांत मांडलेली २६ रोमन अक्षरे अक्षरांचे एक वेगळे रूप समोर आणतात. सुलेखन , चित्रकला अनेकजण करतात पण यासाठी लागणारी शाई, साधने स्वतः केलेल्या प्रयोगातून अस्तित्वात आणणारा अश्विन कारळे सारखे उत्तम कलाकार फार कमी असतात. प्रदर्शनातील त्याचे काम म्हणजे नियमित वापरातील अक्षरांना पारंपरिक पद्धतीत न मांडता त्यांना एका विशिष्ट शैलीमध्ये मांडून नव्या सुलेखनकारांसाठी एक चांगले उदाहरण प्रस्थापित केले आहे . जे असेल ते तसेच न घेता त्यातून नवे काही शोधण्याचा प्रयत्न करून वेगळ्या प्रकारे मांडता आले पाहिजे. स्नेहलच्या मते सुलेखन हा संकल्पन आणि ललितकला यांमधील दुवा असून ती या पिढीतील सुलेखनकारांपैकी एक आहे जिचा भर सुलेखनात मुक्तपणे भाव प्रकट करून नित्य प्रयोगशील काम करण्यावर असतो. शाईतून निर्माण झालेले अक्षरांचे तालबद्ध आकृतिबंध ऍबस्ट्रॅक्ट स्वरूप हा तिच्या 'शब्द संचार' या मालिकेतील मूळ अर्क आहे. निरूच्या प्रदर्शनातील कामाने खरेच एक सुखद धक्का दिला. काही महिन्यांपूर्वीच तुझी हरवलेली कॅलिग्राफी पाहण्याची इच्छा आहे असे मी तिला बोलून गेले होते आणि आज तिची चित्रे इथे लागलेली आहेत. निरूच्या चित्रांत एक लयबद्धता, चिकाटी, जागरूकता आणि शिस्त दिसून येते. प्रत्येक स्ट्रोक जणू योगामधील एक पवित्रा मनाला शांती, स्थिरता देणारा. चौथ्या शतकातील पल्लव लिपीतून प्रेरणा घेऊन पेस्टल रंगसंगतीत अतिशय सुबकरीत्या निर्माण केलेल्या कलाकृती पारंपरिक आणि आधुनिक या दोन्ही परस्परविरोधी गोष्टींचा एकत्रित मेळ घालण्यात यशस्वी ठरल्या आहेत. निलेश देशपांडे यांची १५ चित्रांची एकत्र मालिका पाहण्यात मला विशेष मज्जा आली. प्रत्येक फ्रेम एकमेकांपेक्षा वेगळी... एक भाव , एखादी अवस्था दर्शवणारी... मोजक्या रंगांत आणि मोजक्या ढंगात सादर झालेली.... पण तरी एकमेकांसोबत सामावून जाणारी.
कलादालनात लागलेले सर्वच सुलेखनकारांचे काम अप्रतिम आहे...इथे ब्लॉगवर काही छायाचित्रे आहेत ... पण प्रत्यक्षपणे तिथे जाऊन घेता येणारा अनुभव त्याहीपेक्षा सुंदर असेल. त्यामुळे जर तुम्ही सुलेखनकार असतील किंवा कलाप्रेमी जरी असाल तरी मला तुम्हाला आवर्जून सांगावेसे वाटते कि कलादालनाला भेट देऊन स्वतः ही अनुभूती घेणे केव्हाही चांगले. चित्रे नुसती बघण्यापेक्षा सर्वांशी बोलून त्या चित्रांबद्दल जाणून घेण्यात एक विशेष आनंद आणि समाधान असेल. आणि त्यासाठी लेटर्स एन स्पिरिट्स हा समूह नेहमीच तत्पर असतो. या सर्वांसोबत आता पर्यंत त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके जवळून पाहण्याची संधी सुद्धा आहे. २२ सप्टेंबर २०२५ हा शेवटचा दिवस असला तरी जास्त वेळ न दवडता हा आस्वाद घ्यायला हवा कारण अक्षरांची अशी मेजवानी पुन्हा पुन्हा अशा गॅलरीत मिळत नाही.
- रुपाली ठोंबरे
No comments:
Post a Comment