Wednesday, May 20, 2015

समजुन घे जीवनाची तू कथा ||

( माणसाच्या जीवनात जोपर्यंत आनंद ,यश ,सुख समृद्धी असते तोपर्यंत तो उत्साही असतो पण बरेचदा दुःखाचा स्पर्श होताच हाच माणूस हरून जातो. पण माणसाने जीवन जगताना जीवनाचे हे खूप मोठे पण तितकेच सोपे रहस्य समजून घ्यायला हवे कि, सुख-दुःख हे जीवनात नेहमीच येत-जात राहते पण येणारा काळ कधीच  थांबणारा नसतो,पुन्हा येणार नसतो. आनंद उपभोगताना आपण कधीतरी येणाऱ्या दुःखाला घेवून रडून क्षण वाया घालवत नाहीत पण दुःखात मात्र कठीण काळानंतर येणाऱ्या  सुखाचा विचार करून नक्कीच वेदना कमी करू शकतो . आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर ध्येय असावे आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्नांची साथ असावी . पण जेव्हा वाटा हरवून गेल्यासारखे वाटते तेव्हा क्षणभर तिथेच थांबून थोडा विचार करून योग्य पथावर पुढे वाटचाल करणे हेच उदयाच्या   यशाचे,सुखाचे गूढ आहे. जीवन खूप सुंदर आहे.माणसाचा जन्म हे  आपल्याला मिळालेले खूप मोठे वरदान आहे आणि यातही समाधान मानून आनंदी व्हावे. मग ते कसेही असेल तरी ते तितक्याच जोमाने ,आनंदाने जगावे .इथे कधीच फक्त सुख किंवा फक्त दुःख नसते ही खुणगाठ मनाशी बांधून घ्यावी .यांच्या लपाछुपीत जगण्याची मज्जा घ्यावी . आणि खरे पाहता दु:खानंतर आलेल्या सुखाची चव ही न्यारीच असते . याचाही कधीतरी आस्वाद घेवून पाहावा …. )



लाभले हे अमुल्य जीवन-वरदान ।
मानवा, तू मान यातच समाधान ।।

सदा मिळेल सुखाची कोठी
दुःख नसू दे माझ्या पाठी ।
नको बाळगू लालसा ही मोठी
नको अशी ही आस खोटी ।।

जे मिळेल ते घेत जावे
स्मित असू दे या ओठी ।
धैर्य असू दे संगे सोबती
अश्रू जरी येतील कधी ।।

समजुन घे जीवनाची तू कथा
कधी आनंद कधी आहेत व्यथा ।
वस्त्र हे मिश्र धाग्यांचे साऱ्या
चित्र हे सुंदर जरी नाना रंगछटा ।।

लक्ष्य जीवनाचे असू दे मनात
यश हे दडले आहे तुझ्याच प्रयत्नांत ।
धुंदल्या वाटा जरी कधी क्षणार्धात
थांबून जरा करून विचार चालत राहा तू प्रवासात।।

क्षण गेलेले कधीच न येतील पुन्हा
सुख-दुखाची ये-जा मात्र पुन्हा पुन्हा ।
क्षणात जगून घे जीवनाची प्रत्येक तऱ्हा
काळ आज कठोर तरी सुख येईल उदया ।।


- रुपाली ठोंबरे

1 comment:

Blogs I follow :