Friday, November 13, 2020

एक मसालेदार अनुभव

दीपावलीचे वेध लागले आहेत. आता ठिकठिकाणी आकाशकंदील , रांगोळ्या , रंगबिरंगी दिवे यांची सुरेख रेलचेल पाहावयास मिळेल. आता रांगोळीचा विषय निघालाच आहे तर मला येथे या वर्षातला एक सुंदर अनुभव सांगावासा वाटतो आहे. मी काढलेली एक चित्ररूप रांगोळी...चित्ररूप रांगोळी हा काही नवा प्रकार नक्कीच नाही. पण यात नवीन काही असेल तर ती साकार करण्यासाठी रांगोळीच्या पावडर ऐवजी वापरलेले नवे काहीतरी... काय म्हणालात?रंगीत तांदूळ? फुले ? वाळू ?... नाही यांपैकी काहीच न वापरता चित्ररूपात माझी रांगोळी उमटली ती खड्या मसाल्याच्या विविध पदार्थांनी. 

चकित झालात ना 'मसाल्यांची रांगोळी' हा प्रकार ऐकून आणि ते सुद्धा कोणत्याही प्रकारची मसाला पावडर न वापरता, म्हणजे हळद,तिखट,गरम मसाला, धणे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सुक्या मसाल्याची पूड...व्यर्ज म्हणजे व्यर्जच. यांचा वापर म्हणजे इतकी मेहनत घेऊनही स्पर्धेतून तडक बाहेर जाण्याचा रस्ता . हो... मसाले रांगोळीची स्पर्धा आयोजित केली होती आमच्या लेवा पाटीदार फेसबूक ग्रुपवर पुण्यातील 'सवाई मसाले ' यांनी. 

साधारण एक महिन्यापूर्वी या स्पर्धेची घोषणा करण्यात आली होती ग्रुपवर. मी एक चित्रकार असल्याने त्याकडे माझे लक्ष लगेच वेधले गेले. अगदी क्षणाचाही विलंब न लावता मनाशी ठरवून टाकले आपण यात भाग घेऊन काहीतरी भन्नाट करून दाखवू. आणि त्यासोबतच डोक्यात विचारांची चक्रे सुरु झाली. आजच्या युगात कोणीही करेल त्याप्रमाणे आधी गुगलवर या नव्या रांगोळीच्या प्रकाराचा शोध घेतला . तेव्हा समजले कि हा प्रकार म्हणजे  जवळजवळ दुर्मिळच. जे थोडेबहुत सापडले त्यातून घेता येईल असे फारसे काही नव्हतेच. परंतु त्याक्षणी जाणीव झाली ती रंगांच्या उपलब्धतेची. धणे , जिरे , दालचिनी , ओवा हे सर्वच जणू एकाच मातकट रंगाच्या विविध छटा. बडीशोप आणि वेलची त्यातल्यात्यात थोड्या हिरव्या छटा... पण उठावदार त्यावर म्हणता येईल असे चक्रीफूल , लवंग , काळी मोहरी , काळे मिरे आहेत खरे... पण त्यांचाही काही प्रमाणात एकसारखाच रंग. आता रांगोळी म्हणजे कशी ... तर लाल, गुलाबी,पिवळा , निळा,हिरवा अशा असंख्य रंगांची उधळणच . पण इथे तर रांगोळीच्या या मूळ संकल्पनेवरच हे असे मोठे बंधन. आव्हानच होते हे एक आणि मी ते स्वीकारले. 


अनेकांनी आपल्या रांगोळ्या पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. अपेक्षेपेक्षाही खूप चांगला प्रतिसाद होता साऱ्या जणींचा . ते पाहून मसाल्यांपासून बरेच काही करता येऊ शकते हा विश्वास मिळाला. थोडा सकारात्मक विचार करता सुक्या मिरचीचा लाल रंग , मोहरीच्या डाळीचा पिवळा रंग , शुभ्र तिळातली पांढरी छटा असे अनेक रंग दिसू लागले आणि मीही तयारीनिशी सुरुवात केली. ऑफिस आणि घर सांभाळून हे करणे म्हणजे सुट्टीचा दिवस निवडला गेला . ज्या गोष्टी , जे रंग उपलब्ध आहेत त्यांना वापरून साजेसे काही करूया या विचाराने मी शरदातल्या जंगलातले निसर्गचित्र उमटवण्याचे ठरवले. त्यादिवशीची ही रांगोळी स्पर्धेसाठी देण्यासाठी अंतिम नसून केवळ सरावासाठी आणि एकूण कल्पना येण्यासाठी उभारलेला तो एक नमुना होता. झाडापानांचा रंग आणि रचना आरामात होऊ शकेल असे प्रथमक्षणी वाटले खरे, पण प्रत्यक्ष जेव्हा ते पूर्ण झाले तेव्हा त्यात ती मजा नव्हती. त्यामुळे निसर्गचित्राची निवड कशी चुकली हे लगेच ध्यानात आले. निसर्गचित्र तर नक्कीच करायचे नाही हे पक्के ठरले. आता काय काढावे या विचारात असतानाच कोपऱ्यात एकत्र सरकवलेल्या लाल रंगाच्या मिरच्यांवर नजर गेली. क्षणभर ते अस्ताव्यस्त पडलेले रेशमी कापडच भासले. आणि त्याच क्षणी एक कल्पना मनात रुजली. पुन्हा एकवार त्या मिरच्यांना रचून खाली धण्यांची सोनेरी किनार मांडली. लाल रंगांच्या विविध छटा आणि सोबत सोनेरी झालर... हवाहवासा घागरा तयार झाला. खूप सुंदर. आता माझ्या रांगोळीत अशी फेर घेणारी मुलगी असेल हे पक्के झाले. ओला मसाला स्पर्धेसाठी अमान्य असल्याने हिरव्या मिरच्यांचा असाच प्रयोग करता आला नाही परंतू पिवळ्या सुक्या मिरच्या असतात की... आणि तत्क्षणी पिवळ्या मिरच्यांचा शोध सुरु झाला. आसपासच्या एक दोन दुकानांत चौकशी केली तर तिथे नकारच मिळाला. पण नेहमीप्रमाणे ऍमेझॉनवर हवे ते लगेच गवसले आणि पुढच्याच क्षणी मी ऑर्डर देऊन मोकळी झाले. हे मसाले नंतर वापरता येतीलच ना...मिरच्यांचे पार्सल आले तेव्हा कळले आमची पिवळी मिरची जोधपूरवरून आली. त्याक्षणी रांगोळीची जय्यत तयारी सुरु आहे असेच सर्वांना वाटले. हे रेशमी घागरे घालून काय उभारावे असा प्रश्न पडताच लगेच त्याचे उत्तरही माझे मलाच मिळाले. काही दिवसांतच नवरात्री सुरु होणार होती. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात गरबा खेळला जाणार नाही... पण त्या दिवसांची आठवण जागी करणारी कलाकृती केली तर ...?आणि हे मनाला अगदीच पटले. बेधुंद होऊन टिपऱ्या खेळण्यात गुंग अशा जोडप्याचे चित्र प्रथम कागदावर काढून घेतले. रांगोळी जमिनीवर काढतात पण मसाले वापरायचे म्हणून कागद अंथरला, चित्र काढायलाही थोडे सोपे गेले . घरात उपलब्ध मसाल्यांची शोधाशोध झाली.हवे तेवढे सर्व मसाले नव्हतेच. चक्रीफुले, जावित्री , सूंठ ,मोहरी डाळ, खसखस यांसारखे प्रकार फारच कमी प्रमाणात होते आणि मला तर ते जास्त प्रमाणात हवे होते. त्यासाठी मसाल्यांच्या दुकानात गेले. तिथे एक गंमतच घडली. मला हवे असलेल्या मसाल्यांचे विचित्र प्रमाण ऐकून न राहवून दुकानदाराने मला शेवटी विचारलेच कि , "ताई तुम्ही नक्की कोणता मसाला तयार करत आहात ?" तेव्हा 'मसाला रांगोळी' हा प्रकार ऐकून प्रथमतः तोही चकितच झाला. 

तर आता सर्व तयारी झाली. मी शनिवारचा दिवस निवडला. सकाळची जेवणे आटोपून दुपारी २ च्या सुमारास रांगोळी या उपक्रमाला सुरुवात केली. ६ वर्षांचा ओमही सुरुवातीला भारी उत्साही होता. त्याच्याच रूमवर आज मी अतिक्रमण करून हा माझा मसालेदार थाट मांडला होता त्यामुळे त्याचे येणे-जाणे मर्यादित ठेवले. पंखा , खिडकी या सर्व हवेचा झोत निर्माण करणाऱ्या गोष्टीना पूर्णविराम दिला गेला. नावापुरता कित्येक दिवसांपासून बंद असलेला AC सुरु होता पण काही वेळातच त्यानेही निराशा आणली. पण मी मात्र हे सर्व विसरून माझ्या रांगोळीकडे वळले. नेहमी सुरुवात कठीण भागाकडून करावी हा माझा नित्य नियम. आणि त्या मुलीचा चेहरा करण्यास सुरुवात केली. नाकी, डोळे, ओठ जमले तर बाकी सर्व सुरळीत होईल असा माझा एक विश्वास. पण कसले काय ? काळे जिरे आणि सोबतीला खसखस... यातून चेहरा जिवंत करण्याचा माझा प्रयत्न. सुरुवातीला जितके सोपे वाटले होते ते तितकेच कठीण काम. सारखी इतस्ततः पळणारी खसखस आणि जराश्या धक्क्यानेही आपली जागा सोडणारे जिरे यांचा योग्य मेळ बसवता बसवता नाकी नऊ आले होते . त्यात तिच्या चेहऱ्यावर हावभावही हवेच ना? शेवटी तो त्या चित्राचा महत्त्वाचा भाग. केसर आणि जावित्रीच्या साहाय्याने ओठांची कमान सांभाळणे हेही महत्त्वपूर्णच. मनासारखा हसरा चेहरा मिळाला आणि हुश्श झाले. कागद सरकून रांगोळी बिघडू नये त्यामुळे सुरूवातीलाच तो चोहीकडून चिकटपट्टीच्या साहाय्याने चिकटवून घेतला होता. पण कितीही प्रयत्न केला तरी एक फुगवटा निर्माण झाला होता. त्यामुळे कागदावरील एका भागावर जरी काही पडले तरी त्याचा परिणाम रांगोळीवर सर्वत्र दिसून यायचा. आणि झालेही तसेच. डोळ्यांमध्ये रोवलेल्या शुभ्र तिळांना पेन्सिलच्या साहाय्याने ठीक करत असतानाच ती पडली. चेहऱ्यावर नाही...पण कागदावर पडली आणि इतक्या मेहनतीने निर्माण केलेले ते अप्रतिम सौन्दर्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले. खुप वाईट वाटले , राग आला...अनेक भावना एकत्रित दाटल्या. पण पुन्हा सर्व रचण्याशिवाय पर्याय नव्हता. पुन्हा नव्या उमेदीने , त्याच उत्सुकतेने पण जरा सतर्क राहून ते दृश्य पुन्हा नजरेसमोर आणण्यास यश मिळाले. केस, फुले, दागिने असा साजश्रुंगार सुरु झाला. रंगांची कमतरता होती खरी पण थोडे डोके चालवले आणि नवे रंग सापडू लागले. चक्रीफूलाच्या पाकळ्या विलग केल्यानंतर त्यात मिळणारी नारिंगी गुलबट छटा तर या पाकळ्या एकत्र मांडल्यावर अधिकच खुलून दिसायची आणि चित्रातल्या चोळीला एक सुंदर रूप प्राप्त झाले. त्यावर धण्यांचा सोनेरी हार आणि याच चक्रीफूलाचे नाजुकशे पदक. या यशानंतर या चित्रातल्या सर्वात मोठे आकर्षण ठरलेल्या घागऱ्याला सुरुवात झाली. मलाही ते करताना फार मजा आली. कमी वेळात सुंदर काही तयार करण्याचा आनंद आगळाच असतो. ओढणीच्या सोबतच नाजूक कमरपट्टाही शोभू लागला. लाल मिरच्यांनी घेर घालण्यास सुरुवात केली तसे चित्राला एक वेगळा दृष्टिक्षेप लाभला. त्याखाली धण्यांची सोनेरी झालर. त्यातही पिवळ्या मोहरीवर लवंग ,मिरे ,चक्रीफुलांनी मांडलेली गोलाकार नक्षी हे सर्वच त्या असंख्य मिर्यांत सुंदर दिसत होते. मुलगी नखशिखांत पूर्ण झाली तसे हायसे वाटले खरे पण एक नाजूक धक्काही काय भूकंप आणू शकतो याची कल्पना काही तासांपूर्वीच आल्याने भीती वाटत होती. जेवढी ही भीती जास्त तेवढी सावधानता वाढू लागली. त्या जोडप्यातील मुलाने मला अजिबात त्रास दिला नाही. पाठमोरा उभा असल्याने चेहऱ्यावरच्या हावभावांचा प्रश्नच नव्हता तरी चेहऱ्याचा जितका भाग दिसत होता तो अचूक जमला. पगडीवर मोहरीच्या डाळींवरच्या जावित्रीच्या पाकळ्यांनी सुंदर छटा निर्माण केल्या. मेथ्या आणि पिवळी मोहरी एकत्र आल्या आणि त्याचा कुर्ता जरीदार बनत गेला. चक्रीफुलाने नक्षीकामाची कामगिरी अगदी चोख बजावली. पिवळ्या सुक्या मिरच्यांनी घेरदार कुर्त्याला छान सजवले. कमरेला बांधलेल्या नक्षीदार शेल्याचा रंग ठरवताना खरेतर सुचेनासे झाले होते. पिवळा आणि पांढरा या दोन रंगांत शोभेल असा रंग. तो सापडला आणि एका अस्ताव्यस्त पण विशिष्ट रचनेत मांडलेल्या लवंगीने त्यास अलंकारिक रूप प्राप्त करून दिले. धोतीचा शुभ्र रंग आणि त्यासाठी शुभ्र तीळ हे समीकरण माझे फार आधीपासूनच ठरलेले होते. तर पाहता पाहता जोडपे समोर उभे झाले. या सर्वांत मुलीच्या चेहऱ्यानंतर जर काही फार कठीण वाटले असतील तर ती म्हणजे बोटे. मला आठवते पेन्सिलने चित्र काढताना मी बोटांच्या पकडीकडे आणि त्यांच्या आकाराकडे किती लक्ष दिले होते ... मात्र खसखशीने रंग भरताना ते आकार दिसेनासेच झाले. तरीही टिपऱ्या धरलेली बोटे जमलीच . तिची उडती वेणी आणि त्याचा उडता पगडीचा भाग यामुळे नृत्यात फेर धरतानाचे दृश्य टिपण्याचा माझा प्रयत्न दिसून येईल. एव्हाना त्या बंद खोलीत मसाल्याचा घमघमाट दाटला होता. सर्वच काही एकदम मसालेदार झाले होते. आता महत्वाच्या व्यक्तिरेखा तर सुखरूप पार पाडल्या परंतु त्यांना अधिक सौन्दर्य प्राप्त होते ते सभोवतालच्या वातावरणाने. तर हे जाणून मी वातावरण निर्मिती सुरु केली. हिरवीगार बडीशोप आसपास अंथरली आणि एक सुरेख गवताच्या गालिच्याची त्या मैदानावर निर्मिती झाली. जिऱ्यानी त्या दोघांची सावली चित्रित झाली निव्वळ खऱ्या चित्राकडे वळण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून. दालचिनी हा खोडाचाच भाग आणि म्हणून तो झाडाचे खोड म्हणूनच उत्तमरीत्या वापरावे या दृष्टिकोनातून मी एक झाड उभारले. त्यामुळे एक नैसर्गिकपणा त्या चित्रात डोकावला. खरे तर फक्त कसूरी मेथी वापरून झाड बहरले असते पण तरी हिरव्या वेलचीचा तो पर्णाकृती आकार मला फार भावला. आणि या वेलचीच्या पानांना विशिष्ट आकारात एकमेकांत गुंफून त्या झाडावरच्या फांद्याफांद्यांवर पालवी फुटली आणि हळूहळू एक टुमदार झाड आकार घेऊ लागले. त्यात हिरव्यागार कसुरी मेथीचा वापर केल्याने झाडाला एक प्रकारचा भरगच्चपणा मिळाला. त्यावर सांडलेली मोहरीची डाळ म्हणजे फुलांचा मोहोरच...खाली गवतावर स्वतःच्याच सावलीवर पानांचा वर्षाव करणारे ते झाड... त्यावर विहरणारे चक्रीफुलापासून निर्मिलेले फुलपाखरू... असे हे चित्र क्षणाक्षणाला आपले रूप पालटत गेले आणि त्यासोबत माझ्या चेहऱ्यावरचे भावही. उजवीकडचे झुडूप म्हणजे माझ्या कल्पनेतले एक झाड. तेजपानांच्या गर्दीत बोर मिरची आणि जावित्रीची फुले आणि फळे दडलेली होती. खाली सूंठ एकमेकांवर चढून नैसर्गिकरित्या रचल्या गेलेल्या दगडांची भूमिका पार पाडत होती. आता जवळजवळ ९०टक्के रांगोळी पूर्ण झाली होती. माझ्या मते १० टक्के म्हणजे आकाशाला त्याचे रूप देणे अजून बाकी होते. रात्रीचे काळेभोर आकाश , फुलून हसणारा चांदवा, अवतीभवती चमचम असंख्य तारका आणि या चांदण्यात सुरु असलेला हा नृत्याविष्कार... असे काहीसे चित्र माझ्या मनात कुठेतरी दडलेले होते. त्याप्रमाणे काळी मोहरी आकाशभर पसरली देखील पण छे ! हे सर्व इतके चांगले जुळून आले नाही आणि त्वरित माझा निर्णय बदलला. अंथरलेली मोहोरी जरा बाजूला केली आणि त्यामागे संध्याकाळची गुलबट केशरी दृष्टीस पडली. तिला पाहता कलेच्या क्षेत्रात माझ्या गुरुजनांकडून मिळालेले धडे आठवले. पूर्ण कागद रंगानी भरायलाच हवा असे गरजेचे नसते. कधीकधी गरज पडेल तेथे निगेटिव्ह स्पेस सोडायला हवी. त्यामुळे पॉजिटीव्ह स्पेस आणखी उठून दिसते. आणि मग मनाशी ठरवले केशरी सोनेरी रंगांत रंगलेल्या संध्याकाळी हा नृत्यसोहळा मांडावा. पुन्हा एकदा मेहनतीने केलेली रचना पुसण्यात दुप्पट मेहनत घेतली गेली आणि एक नवा धडा मिळाला. पण त्या मुळे काही ठिकाणी काळी बॉर्डर आपोआपच घडून आली हा एक प्रकारे झालेला फायचाच म्हणावा लागेल. जावित्रीच्या केशरी किरणांनी माझ्या चित्रात सूर्योदय झाला. तिळांनी त्या ढगांची मोहक दुलई आकाशभर पसरली. आणि या देखाव्यात जसे मला वाटले होते त्याप्रमाणेच ते नृत्य करणारे जोडपे अधिकच खुलून दिसू लागले. खोलीचा दरवाजा पूर्ण उघडला आणि बंद खोलीतला मसालेदार मंद सुगंध घरभर पसरला. त्या सोबतच सर्वांची पार शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आणि माझ्यावर कौतुकाची रिमझिम बरसात झाली.  

अशी ही चित्ररूपी रांगोळी पूर्ण होता होता रात्रीचे १० वाजले होते. त्यासोबत बसून चांगला फोटो घेण्याचेही त्राण उरले नव्हते. ती रांगोळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या रूमची शोभा वाढवत राहिली. आणि त्यानंतर सुरु झाला आणखी एक नवा अध्याय. मांडलेले सारे उचलायचे. आता सर्व पदार्थ भविष्यात नेहमीसारखेच वापरायचे असे ठरवल्यावर त्यांना वेगवेगळे करणे भाग होते. माझ्या एका मैत्रिणीने आयडिया दिली कि सर्व मसाले एकत्र करून टाक आणि मसाला बनवून टाक. पण हे खरेच इतके सोपे असते का ?मसाला बनवायलाही एक प्रमाण लागते प्रत्येक गोष्टीचे. त्यात माझ्या रांगोळीत सर्वच बहुतेक एकत्र आलेले. आता मेथ्या, पिवळी मोहरी, मोहरीची डाळ , काळे जिरे हे सर्व वेगळे करणे तर भागच होते. हा प्रयत्नही खूप वेळ रंगला. यात माझी मदत कोणी केली असेल तर सहा वर्षांच्या ओमने. का कुणास ठाऊक पण हे असे निवडून वेगवेगळे करण्याचे कंटाळवाणे काम त्याला फारच भारी वाटत होते. खरेच , मुलांना कधीही काहीही आवडू शकते . जसजसा त्याला कंटाळा येऊ लागला तसे त्याने मला काही सल्ले देण्यास सुरुवात केली. जसे कि आता हे सर्व एकत्र कर आणि मग उद्या ताटात घेऊन वेगवेगळे कर. हो खरेतर हे माझ्या डोक्यात आले होते पण असो.शेवटचा चिकवलेला कागद उचलल्यावर थोडी आवराआवर आणि झाडलोट करून होती तशी ती रूम आता सुस्थितीत दिसू लागली. 


दुसऱ्या दिवशी ही रांगोळी मसाले रांगोळी स्पर्धेत समाविष्ट झाली आणि खरंच खूप छान प्रतिसाद मिळाला... कदाचित माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक. त्याक्षणी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले.निकाल काहीही असो पण भरभरून कौतुकाची थाप पाठीवर पडली. यासाठी लेवा ग्रुप आणि त्यातील सभासदांचे विशेष आभार मानावेसे वाटते. कलाकार मेहनत घेतो पण त्या कलेला दादही हवी असते ती अधिक बहरण्यासाठी. २५ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला आणि विजेत्यांच्या यादीत स्वतःचे नाव पाहून खूप छान वाटले. फक्त २-३ जणांना बक्षिसाचे मानकरी करण्यापेक्षा शक्य तितक्या साऱ्या जणींचे अशा प्रकारे कौतुक करण्याची ही तऱ्हाही खूप आवडली.ही रांगोळी नेहमीप्रमाणे सोपी नाही. खूप मेहनत लागते. आणि त्या मेहनतीला सलाम हा मिळायलाच हवा होता. खरे सांगते मसाल्यांपासून रांगोळी हा असा प्रकार करण्याचे कधी स्वप्नातही माझ्या मनात आले नसते . आणि मसाल्यांपासून इतके सुंदर काही होऊ शकले असते यावर कधी विश्वासही बसला नसता. खरेतर सर्वच सहभागी झालेल्या रांगोळ्या अप्रतिम होत्या. मी तर म्हणेन , महिलांतील कल्पनाशक्ती ,चिकाटी , कष्ट घेण्याची वृत्ती या सर्वांचेच प्रतीक होती ही रांगोळी. आणि हा अविष्कार घडवताना विशेष आभार मानावेसे वाटते ते घरच्यांचे, ज्यांनी प्रोत्साहनासोबतच कौतुकही केले. माझ्या चिमुकल्याचा तर फार मोठा वाटा आहे. मध्यावर आल्यावर सारखे वाटे कि जर हा चुकून चिडला तर कोणत्याही क्षणी माझी रांगोळी उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे दिवसभर त्यालाही देता येईल तितका वेळ देत आनंदी ठेवण्याचा माझा प्रयत्न शेवटी सफल झाला. त्यालाही हा असा आगळावेगळा बेत पाहायला मज्जा अली होती. पुढे अनेक दिवस निवडनिवडीचे कार्य सुरु राहिले. काही खडे मसाले एकत्र कुटून नवा गरम मसालाही तयार झाला. खरेतर हा असा आगळावेगळा उपक्रम घडवून आणून त्यात आम्हाला समाविष्ट केल्याबद्दल आम्हीच सवाई मसालेचे आभार मानले पाहिजे. पण एक दिवस लॉकडाऊनच्या या काळातही घरपोच एक पार्सल आले ज्यात एक अप्रतिम ट्रॉफी आली, सोबत मसाल्यांच्या झणझणीत मेजवानी घेऊन. स्पर्धा जितकी आगळीवेगळी तितकीच ट्रॉफी सुद्धा वेगळीच होती. अक्ख्या महाराष्ट्र होता तो मसाल्यानी नटलेला. हि ट्रॉफी जोपासायला नक्कीच आवडेल. शेवभाजीच्या झणझणीत मसाल्यापासून कालच घरी मसालेदार खान्देशी मस्त अशी शेवभाजी बनली. आणि या रांगोळीच्या आठवणी काढत आम्ही सर्वांनी त्यावर यथेच्छ ताव मारला.अशाच प्रकारे, कायम आठवणीत राहावा असा हा जीवनातील एक मसालेदार अनुभव... मनाला तृप्त करणारा. 

- रुपाली ठोंबरे. 3 comments:

 1. अभिनंदन रूपाली..

  फारच कल्पक आणि नाविन्यपूर्ण...

  ReplyDelete
 2. अप्रतिम 🙌🙌❤❤

  ReplyDelete
 3. अभिनंदन.खूप छान अनुभव शेअर केलाय.

  ReplyDelete

Blogs I follow :