Friday, February 27, 2015

प्रवास रोजचा …भाग २


प्रवास रोजचा …भाग २



      या गर्दीत होणारा आणखी एक कमालीचा त्रास म्हणजे जिवंत माणसांपेक्षा असलेली निर्जीव गोष्टींची उपस्थिती. उदाहरणार्थ रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकारांच्या ,कधी टोकदार अशा लहान-मोठ्या पर्सेस आणि त्याहून जास्त म्हणजे कॉलेजच्या मुलींकडची  मोठी मोठी दप्तरे. बहुतेक सर्वच जणी कांगारूच्या पिलासारखे ते छातीशी कवटाळून मोकळ्या झालेल्या हातांचा वापर कोणी आजच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी तर काही स्मार्टफोनवर संवाद साधण्याच्या कामी वापरात आणतात. फोनवर संवाद साधण्याचेही आजकाल कितीतरी प्रकार आहेत. नंबर लावून फोन कानाशी धरून बोलणे हा आता जुन्या प्रकारात मोडला जातो . त्यापेक्षा कानात इयरफोन घातले कि  आरामात हात मोकळे ठेवून आणि स्पष्ट आवाजात बोलता आणि ऎकता येते .बोटांची विशिष्ट हालचाल करून आजकाल संदेश पार साता समुद्रापलिकडे पोहोचवता येतात .  हल्ली हे असे प्रकार जास्त पाहायला मिळतात. ग़र्दीत  देखील स्वतःची  किती घुसमट होतेय हे मित्र-मैत्रीणीना सांगण्यात विशेष रुची असते . मोठी  एक धक्का लागला तरी सहज जोरात लागणारी laptop घेतलेली bag पाहिली कि ती एवढया गर्दीत आणणाऱ्या मुलीचा रागही येतो आणि कीवही येते. एवढे जड ओझे खांद्यावर घेऊन असल्या गर्दीतून वाट काढत ही वस्तू जपून घरी न्यायची आणि कशासाठी तर घरून काम करण्यासाठी-हे सोपे नाही. पण हल्ली खुप ठिकाणी ही गरजच असते.
आता जसजसे पुढचे स्टेशन जवळ आले तसतसे एका दरवाजाकडे ओघ वाढायला लागला.
            "अहो ताई ,तुम्ही कुठे उतरणार ?
       इथे नाही उतरायचे मग दरवाजात कशाला उभे राहता?
 मागे  व्हा. मला पुढे जावू दया . "
असे  म्हणत नदीचे पात्र सपासप मागे सारत किनारा गाठावा तसे या स्टेशनवर उतरणाऱ्या साऱ्या जणी दरवाजावर येवून थबकतात.
         आणि मग एकदाचे स्टेशन येते. तेथे एखाद्या पिपाला छिद्र पडले कि पाणी जसे एका दिशेने वेगात वाहत सुटते तसा तो गर्दीचा लोट बाहेर ढकलला जातो. काही ठराविक वेळी आणि स्टेशन्सवर जेवढी गर्दी बाहेर पडली तेवढीच किंवा कदाचित त्यापेक्षाही अधिक गर्दी डब्यात शिरकाव करते.
पण ही खुपच सकाळची वेळ असल्याने  आणि  या स्टेशनवरून सुटणाऱ्या इतरही गाडया असल्याने आता उतरणाऱ्या आणि चढणाऱ्याच्या संख्येत बरीच तफावत आहे. एरव्ही याच स्टेशनवर चढणे-उतरणे म्हणजे फार मोठी मोहीम हाती घेतल्यासारखे असते.पण आता डबा बराच रिकामा वाटू लागला आहे. काही क्षणांपूर्वी उभे राहण्यापुरती एवढयाशा जागेसाठी आसुसलेल्या त्या कुटुंबाला आता ऐसपैस बसायला जागा मिळाली होती . गार वारा अंगावर झेलत त्यांनी दरवाजाशेजारीच खाली ठिय्या मांडला होता.
      लगेचच मी बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी पुढे सरसावले.डब्यात नव्याने प्रवेश करणारीला जर बसायचे असेल तर तिला आधीपासूनच बसलेल्या महिलांना विचारून स्वतःची जागा आरक्षित करून घ्यावी लागते. आणि  मग योग्य ठिकाणी योग्य वेळी येऊन आरामात 'बसून प्रवास' या कल्पनेची अनुभूती घेण्यास मिळते. लेडीज डब्यात बसण्यासाठी सीट आरक्षित करण्याची अशी ही एक जगावेगळी तऱ्हा वापरली जाते.ज्यांनी पण हि युक्ती सुचवली असेल त्यांनी नक्कीच या लोकलच्या प्रवासात आयुष्याची बरीच वर्षे काढली असतील आणि  त्यातुनच हे संशोधन झाले असेल. पण इंग्रजीत म्हणतात तसे "FIRST COME FIRST SERV " चा योग्य वापर करून खरोखरच त्यांनी पुढे वर्षानुवर्षे या लोकलच्या प्रवासात अर्धे जीवन खर्ची करणाऱ्यावर उपकारच केले म्हणावे.  पूर्वीच्या स्टेशन्सवर चढून जागा मिळवून बसलेल्या त्या १७ जणींवर मी एक नजर टाकली. त्या साऱ्या इतका वेळ सुरु असलेल्या चुरशीच्या सामन्यापासून एकदम अलिप्त आपल्याच विश्वात रममाण होत्या. कोणी गारव्यात झुळूकेच्या एका थंड स्पर्शाने लागलेल्या शांत डुलकीचा आस्वाद घेत आहे तर कोणी कानांत इयरफोन घालून मोबाईलमधून येणाऱ्या मधुर ध्वनीलहरींचा. एखादी कादंबरीच्या शाब्दिक विश्वात हरवलेली असते. कॉलेजच्या मुली तर चक्क छापाछापी करत असतात. पण ते करत असतानाही त्यांची ती तल्लीनता बघण्यालायक असते. या खिडकीपाशी असलेला जणींचा घोळका म्हणजे लोकलच्या मैत्रिणींचा एक ग्रुप. असे अनेक ग्रुप्स मिनिटाला धावणाऱ्या प्रत्येक लोकलमध्ये पाहायला मिळतात. या ग्रुप्समध्ये रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून ते जीवनातील महत्वाच्या घडामोडींपर्यंत सर्वच अनुभवांची संक्रांतीच्या हळदी-कुंकवातील तिळगुळाप्रमाणे देवाण-घेवाण होत असते. या ग्रुपमध्ये असल्याचा एक फार मोठा फायदा म्हणजे आपल्याला जागा शोधताना पाहून कधीकधी त्यातली एक मैत्रीण चटकन म्हणते
" अगं ये , तू बस इथे. मी खूप वेळापासून बसलेच आहे. थोडी उभी राहिले कि पाय मोकळे होतील आणि असे पण मला शेवटच्या स्टेशनवर उतरायचे आहे".
मग तिला 'नाही-हो ' करत बसायला आयती जागा मिळते. पण नेमकी माझी रोजची लोकल हुकल्याने माझा हा सुवर्ण योग जराश्याने हातून गेला. हा विचार मनात घोळवत असतानाच 'तुम्ही कुठे उतरणार?'  चा पाढा चालू ठेवला कि त्या घोळक्यातून लगेच उत्तर येते
 आता स्टेशन्स गेले कि उतरेन मी
तेव्हा आता फक्त एकच स्टेशन बसायला मिळणार आणि तेही फोर्थ सीट हे समजताच मनावर क्षणभर आलेली नाराजी चेहऱ्यावर दर्शवता गोड स्मित करून
            "ठीक आहे.मला दया  प्लीज”'  
असे आभारप्रदर्शन करत जागा आरक्षित करून ठेवल्याचे एक वेगळेच समाधान मिळाले.
 'फोर्थ सीट ' हे लोकलच्या लेडीज डब्याचे एक वैशिष्टय. हा प्रकार जगात इतर कोठेही पाहायला मिळणार नाही. जण आरामात बसू शकतील त्या जागेत एकोपा दाखवत चौथीसाठी थोडीफार तडजोड सहन करत चौघींनी ती जागा योग्य रीतीने व्यापून घ्यायची. त्यांतील एखादी जरा तब्येतीने जास्त असेल तर तडजोडीची मात्रा वाढली जाते. येथे नवीन येणारी आधी चवथ्या सीटवर मग जसजसे स्टेशन्स आणि त्यासोबत सहप्रवासी जातील तसतशी खिडकीकडे सरकत शेवटच्या स्टेशनपर्यंत खिडकीजवळ पोहोचतें. पण मी तर म्हणेन या डब्यात बाहेरपेक्षा आतच मज्जा असते. क़बुतराच्या जाळी लावल्याप्रमाणे असलेल्या त्या खिडकीतून बाहेर काय पहायचे?
                   या ग्रुप्समधून चाललेल्या वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा हा जवळजवळ संपूर्ण डब्यातील महिलावर्गासाठी एक करमणुकीचा भाग असतो. या चर्चेचे एक वैशिष्टय म्हणजे ती कधीच एका विषयाला धरून नसते. जितक्या जास्त जणी यात सहभागी तितकी विषय भरकटत जाण्याची शक्यता जास्त. सासू-सून-नवरा-मुलं यांनी भरलेलं घर आणि ऑफिसातला बॉस आणि त्याचे काम हे आवडीचे विषय. बाकी मग नवी ठिकाणे,नवे चित्रपट,कधी कधी जगातील घडामोडी अशा इतर विषयांतही रुची दाखवली जाते. पिकनिकला त्यातली एक जण जात असली तरी त्या सर्वाना सैर घडवून आणेल हे नक्की. नवा चित्रपट एकीने पाहिला तरी उतरताना प्रत्येकीचे कथानक पाठ झालेले असते. असे हे ग्रुप्स खूप मज्जा करतात . त्यातील एखादी जर उत्तम सुगरण असेल इतर सर्वांची रोजच मेजवानी. सर्वांना तिच्या हातून खाण्यात आणि तिला सर्वांना खावू घालण्यात एक विलक्षणीय आनंद प्राप्त होत असतो .
        अरे हो विसरलेच. या सर्वांचा सर्वात मोठा आवडता विषय म्हणजे शॉपिंग. कोणती गोष्ट कुठे आणि कधी उत्तम मिळते हे जाणून घ्यायचे असल्यास अशा डब्यातून नियमित प्रवास करत राहिले पाहिजे. इथे खरेदी-विक्रीच्या नुसत्या कोरड्या चर्चाच होत नाहीत तर प्रत्यक्षरीत्या पाहायलाही मिळतात. कोणी तिच्या टपरवेअरच्या प्रोडक्ट्सची जाहिरात करत असते तर कोणी आणखी काही. असाच एक अनुभव सांगतें. आमच्यातल्याच एकीने एकदा खूप सुंदर साडी नेसलेली. मग झाले. नवे काही इथे आले कि स्तुती, चौकशी या सर्व घरी कदाचित मिळणाऱ्या पण हव्या असणाऱ्या गोष्टी आपोआपच बोलता इथे मिळतात ही  शाश्वती. या नियमानुसार तिला देखील खूप प्रशंसा मिळाली. साडीची स्वस्त किंमत कळताच माफक दारातली ही साडी मिळवण्यासाठी सर्वानीच शर्यत लावली. आणि मग पुढचे कितीतरी दिवस ती साड्यांच्या पिशव्या या गर्दीत आणून उगाचच निर्जीव वस्तूंची अडचण करू लागली. पण बहुतेकदा यातून फायदाही होतो. जसे माझ्यासारख्या सौंदर्यप्रसाधानांमध्ये अतिशय कमी रुची असलेलीला यातले काही खरेदी करायची वेळ आली कि त्या अलिशान दुकानात जावून आयत्या वेळी स्वतःची फजिती करून घेण्यापेक्षा इथे दिलखुलास विचारपूस करून खरेदी केलेले नेहमीच योग्य.

2 comments:

Blogs I follow :