Monday, June 25, 2018

तो आणि ... ती (भाग ७)


(टिंग$$$ टॉंग$$$$) 
दारावरची बेल जोरात दणाणली आणि पुढच्याच क्षणी दरवाजा उघडला गेला.
" काय गं , आज बराच उशीर झाला ऑफिसमधून यायला. "
"हो ना . हा मुंबईचा ट्रॅफिक म्हणजे अक्षरशः  नकोसा करतो.आधी ऑफिसपासून स्टेशनपर्यंत रिक्षा मिळणे महाकठीण आणि त्यानंतर लोकलचा प्रवास म्हणजे नुसती गर्दी.आणि त्यानंतर आपले घर सुद्धा स्टेशनपासून अगदी दुसऱ्या टोकाला म्हणजे पुन्हा रिक्षा किंवा बसचा प्रवास. वैताग येतो गं! कधी कधी असे वाटते कि या दगदगीच्या प्रवासापासून सुटका मिळाली कि किती बरे होईल."
निर्वी आपला तक्रारीचा पाढा म्हणतच घरात शिरली. कपाटाच्या वरच्या कप्प्यात पर्स आणि अगदी खालच्या कप्प्यात चपला सरकवून तिची बडबड सुरु होती.
" अगं ,  नवीन का हे तुझ्यासाठी ? गेली ४ वर्षे हाच प्रवास नाही का तुझा?  दुबईवरून आल्यापासून तुला हे सर्व जास्तच वैतागवाणे झाले आहे. दोन महिन्यांचा आराम मिळालाच होता असे समजायचे आणि खुश व्हायचे. बरे , ते सोड .आता हातपाय धुवून घे आणि पोहे तयार करून  ठेवले आहेत किचनच्या ओट्यावर. ते तुम्ही दोघी खाऊन घ्या. "
असे म्हणत आई सोफ्यावर आवराआवर करू लागली.
" आई , आली वहिनी ?आज बरीच लवकर आली."
बाथरूममधूनच तिची  प्रश्नउत्तरे सुरु होती.आई होकार देऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली.

आता १० दिवस उलटून गेले होते तिला दुबईवरून परत येऊन. ऑफिसचे कामसुद्धा पूर्वीसारखे सुरळीत सुरु झाले होते आणि त्यासोबत हा पावणेदोन तासांचा कंटाळवाणा प्रवाससुद्धा. त्यामुळे घरी आल्या आल्या पार थकून जायची ती. वहिनी बँकेत कामाला होती त्यामुळे महिनाअखेरचा संपूर्ण आठवडा तिच्यासोबतच घरच्यांनाही चांगलाच जाणवायचा. ती आली कि रात्रीच्या जेवणाची तयारी आणि त्यानंतर थकलेला जीव बिछान्यावर विसावण्यासाठी आतुरलेला असायचा. पण तरीसुद्धा ती मात्र दोन दिवसातून १५ मिनिटे का होईना पण सार्थकशी सवयीचा संवाद अगदी नियमित साधायची. दुबईच्या हॉटेलमध्ये तिचे बरेच फोन गेले होते पण प्रत्येक वेळी निहाल सोडून इतर कोणीतरी तो घ्यायचा आणि हीचा मात्र भ्रमनिरास होऊन जायचा. त्याने म्हणे काही दिवसांची सुट्टी टाकली होती आणि नंतरही त्याचे हॉटेलमध्ये येणे फार कमी झाले होते.आला तरी तो कामात व्यस्त असायचा. त्यामुळे तिचे त्याच्यासाठीचे सर्व निरोप आमिराकडे तसेच साठून असतील किंवा त्याला आता या दूरदेशीच्या मैत्रिणीचा विसर पडला असेल असा भ्रम तिला होऊ लागला आणि त्याच्या आठवणी काहीश्या धूसर होऊ लागल्या होत्या. दहा दिवसांत ती आता सर्व गोष्टींत रमून गेली होती.

 निर्वी किचनमध्ये आली. तिथल्या गरमागरम पोह्यांच्या दोन्ही प्लेट्स घेऊन ती वहिनीच्या रूमकडे वळली. वहिनीच्या रूम मधून बाहेर येणारी आई तिची चाहूल लागताच क्षणभर थबकली. एक नजर आपल्या मुलीवर टाकली... एक नजर मागे वळून पाहिले आणि पुढच्याच क्षणाला 'चल , जेवणाची तयारी करते मी. खूप कामे पडलीत किचनमध्ये' म्हणत किचनच्या दिशेने निघून गेली. आईचे वागणे तिला विचित्र वाटले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पटकन आत शिरली. तर वहिनीच्या दचकण्याच्या आवाजाने घाबरलीच. तिची वहिनी तिला अचानक आलेली पाहून भयंकर दचकली होती. तिच्या हातात काहीतरी होते. ते तिने पटकन मागे घेतले. जणू ती काहीतरी लपवत होती तिच्यापासून.
"काय गं वहिनी, असं दचकायला काय झालं ? मी घाबरलेच की ! आणि पाठीमागे काय लपवते आहेस?"
असे म्हणत निर्वी घाईघाईने आत शिरली. दोन्ही प्लेट्स बेडवर तशाच ठेवून ती वहिनीच्या दिशेने धावत गेली. तिच्या चपळाईपुढे ती भोळी वहिनी हरणारच होती. तिने आपली हार पत्करून हात पुढे केला.
" हे घे. बघ .काही नाही जास्त. फक्त फोटो आहे."
"फोटो ?.... ओओह अरे वाह ! दादाचाच फोटो असेल मग तर हा . बापरे! आमची वहिनी कित्ती मिस्स करतेय दादाला. अगं , अजून तर आठवडा  झालाय त्याला जाऊन. आज सांगायलाच पाहिजे त्याचा फोन येईल तेव्हा."
असे म्हणत वहिनीकडे पाहून निर्वी हसतहसतच त्यातले फोटो बाहेर काढते. आणि फोटो पाहताच चकित होते ती.थोडी गोंधळून जाते. तिला प्रश्न पडलेला असतो आणि तसा तो विचारतेही...
" हा तर दादा नाही. कोण आहे हा ?"
" तेच तर सांगत होते पण तू ऐकून घेशील तर ना ... ? घाई नुसती."
म्हणत वहिनी तो फोटो हातात घेऊन निर्वीकडे हसत पाहून म्हणते,
" हा पंकज... पुण्यालाच असतो.... इंजिनीअर आहे .... "
" हो. ते सर्व ठीक. पण त्याचे काय ? त्याचा फोटो तुझ्याकडे काय करतो आहे. वहिनी खरे खरे सांग हां नक्की काय सुरु आहे तुझे ?"
निर्वीच्या बोलण्यात राग , भीती , संशय या साऱ्या भावना एकवटलेल्या होत्या.
" अगं काही काय. हा फोटो तर आत्ता आईंनी दिला मला.  तुझ्यासाठी त्याचे स्थळ आले आहे."
" का$$$य ???? काहीपण. असे कसे होऊ शकते ?"
" कसे म्हणजे ? आता २५ वर्षांची झाली आहेस तू . तुझ्या लग्नाचे पाहायला नको. ते सर्व या रविवारी संध्याकाळी घरी येतील. तेव्हा आणखी काही प्लॅन करू नकोस त्या दिवशी .घरीच राहा. "
आई जणू आता हुकूम देत होती आणि हे मात्र तिला अजिबात पटले नाही.
" आई , असे नाही करू शकत तुम्ही. मी लग्न करणार पण माझ्या पसंतीच्या मुलाशीच."
" अगं मग त्यासाठीच तर ते येतील ना घरी. एकमेकांना बघितल्याशिवाय का कोणी पसंत-नापसंत ठरवता येते? आणि लगेच थोडी लग्न करायचे आहे.  मग आपल्याला ते स्थळ पसंत पडायला हवे आणि त्या लोकांनाही सर्व आवडले तर पुढे बोलणी सुरु होतील. मग भेटीगाठी होतीलच की."
वहिनी निर्वीला समजावत होती. पण निर्वीला ते पटत नव्हतेच मुळी. आईचा पारा अशा कारणाने वाढावा असे तिला वाटत नव्हते आणि आता या विषयावर जास्त बोलण्यावर अर्थसुद्धा नव्हता हे तिला पक्के ठेवून होते त्यामुळे तिने बाबा येईपर्यंत शांतच राहण्याचे ठरवले. आईला आणि तिच्या सुनेला मात्र आपली मुलगी तयार झाली आहे असेच वाटले. दोघीनी एकमेकींकडे समाधानाने पण काहीश्या चिंतेने पाहिले आणि त्या आपापल्या कामामध्ये गुंतून गेल्या.ती अतिशय आतुरतेने आज बाबांची वाट पाहत राहिली. ते येईपर्यंतचे दोन तास तिला खूप अवघड गेले. प्रत्येक क्षण युगासारखा जात होता आणि त्या प्रत्येक युगात तिचे कितीतरी प्रश्न सारखे डोकावून जात होते. 'दादा आणि बाबांचाही असाच विचार असेल ? ... त्या योगिताचे लग्न ठरल्यापासून आईला हे माझ्या लग्नाचे वेध लागले आहेत... पण मी तयार नाही अजून हे कसे कळत तिला. कमीतकमी तो सोडून इतर कुणाशी लग्न करण्याचे तर स्वप्नात देखील कधी माझ्या मनात  येणार नाही. तो पुढच्या आठवड्यात येईल तेव्हा वेळ दवडण्यात अर्थ नाही. सार्थक  अजूनही माझ्यावर प्रेम करत असेल ना ?...  मी खूप वेळ घालवला का ?आता आणखी वेळ नको घालवायला. आजच चॅट वर सांगू? पण किती बोरींग. असे कुठे कोणी प्रेम व्यक्त करते का ? किंवा बाबांना सांगून पाहू ? पण ते समजून घेतील ? ते भडकले तर ? तेव्हा दादाने विषय काढला होता तेव्हाच प्रयत्न करायला हवे होते. त्याला या सर्वाची कल्पना असेल.त्याने त्याच्या पद्धतीने सांभाळून घेतले असते. पण आता काय करू? मनात खूप मोठे वादळ घोंघावत आहे. कुठे बोलू ? सांगू कोणाला ?कसे शांत करू ?'

दारावरची बेल वाजली आणि निर्वी भानावर आली. धावत जाऊन तिने दार उघडले. बाबा दारात होते. तिचे तिलाही कळले नाही का ते आणि तिने त्यांना एकदम मिठी मारली. अचानक झालेल्या अशा भावनिक हल्ल्याने तेही क्षणभर गोंधळलेच.
" अगं हो हो . मला आत तरी येऊ दे चिऊ. आज एकदमच छान मूड आहे कि काही मागणी पूर्ण  घ्यायची आहे . कारण हे असे प्रेम उतू  तर समजायचे कि नक्कीच काहीतरी हवंय ... ". 
बाबा हसत हसत आत आले. थोडे  फ्रेश झाले . जेवणे सुद्धा शांततेने आटोपली. आणि मग ठरल्याप्रमाणे आईनेच विषय काढला बाबांसमोर. वहिनी आणि ती किचनमधले  आवरण्यात व्यस्त असल्या तरी त्यांचे कान आईंच्या बोलण्याकडे टवकारलेले होते. खासकरून निर्वीचे... ती शांतपणे आई आणि बाबांचे बोलणे ऐकत होती.
"अहो , आज चौधरी काकू आल्या होत्या घरी. (बाबा नाव आठवल्यासारखे करत होते पण ओळख पटत नव्हती . अहो , असे काय करताय . ती सुहासची आई जो आता ६ महिन्यांपूर्वी लंडनला गेला ना.... "
"हा हा आठवलं ... बरं मग त्यांचं काय ? "
म्हणत बाबांनी टीव्हीचा रिमोट हाती घेतला आणि चॅनेल्स शोधू लागले. तशी आई जवळ गेली आणि पुढची खबर सांगू लागली. ती बोलतच होती आणि बाबा ते ऐकता ऐकता व्यस्त होते आवडीचे काही तरी शोधण्यात,
"अहो , त्यांनी किनई आपल्या चिऊसाठी एक स्थळ सुचवले आहे.... "
बाबांसाठी हा आश्चर्याचा धक्काच होता आणि तसे ते लगेच रिऍक्ट देखील झाले.
"काय$$$...?"
" हो . मुलगा इंजिनिअर आहे. पुण्याला असतो. घरचं सर्व छान आहे.... त्या म्हणत होत्या कि आत्ताच गेल्या वर्षी नवीन फ्लॅटपण बुक  केला आहे त्याने ... "
असे म्हणत आईने लगेच कपाटातून तो फोटो काढून त्यांच्या हातावर ठेवला.बाबांनी टीव्ही त्या क्षणी  करून रिमोट  ठेवून दिला आणि तो आणलेला फोटो पाहता पाहताच आईला म्हणाले ,
" ते सर्व ठीक... पण आपल्या लेकीचा होकार आहे काय  ते आधी पाहायला हवे , नाही का ?तिचे काय मत आहे ?"
त्यांनी निर्वीला हाक मारली. आईचा चेहरा मात्र नकळत नाराजीच्या रूपात गेला.इथे किचनमध्ये दोघीही याच संधीची वाट पाहत असल्याने त्या अगदी पुढच्याच क्षणी समोर उभ्या राहिल्या. तिच्यासमोर फोटो धरून बाबा तिला विचारू लागले. 
" हा मुलगा पाहिलास का तू ?तुला काय वाटते आहे ? जाऊया पुढे ?"
"बाबा , खरे सांगायचे तर मला वाटते कि आईने खूप घाई केली. आणि असा एक फोटो बघून मी काय सांगू शकेल... ?"
निर्वीचे हे असे बोलणे ऐकून आई लगेच मध्येच बोलली ,
" अहो मी नाही हां . त्या चौधरी काकू स्वतःच आल्या होत्या हे घेऊन तर त्यांना काय लगेच तोंडावर नाही सांगायचे ? ऐकून तर घ्यावे लागेलच ना ?"
" हो पण त्यांच्यासमोर तूच कधीतरी विषय काढला असेल ना .त्याशिवाय का कोणी असे लगेच... "
निर्वीचे शब्द पूर्ण होण्याच्या आतच वहिनीने आईच्या विरोधात बॉम्ब टाकला.
" हो हो. गेल्या महिन्यात आईच म्हणाल्या होत्या काकूंना कि या वर्षी निरूच्या लग्नाचे पाहू आणि एखादे चांगले स्थळ सुचवा असेल तर. आई, आठवते ना तुम्हांला आपण बाजारातच भेटलो होतो त्यादिवशी त्यांना."
आपल्या सुनेच्या अशा वागण्यामुळे तिची सासू पुरती खजील झाली होती. तिच्या दिशेने रागाचा एक तीक्ष्ण कटाक्ष टाकण्यापलीकडे त्या काही करू शकल्या नाहीत.आपल्या सुनेच्या अशा कुठेही काहीही एकदम बोलून जाण्याच्या स्वभावामुळे गोदावरीबाईंची अशी अनेकदा फजिती झाली होती. तिला कितीही रागावले तरी तिची हि सवय काही केल्या सुटायची नाही. स्वभावच तो... तो कसा बदलणार? पण तिच्या मुलीने मात्र हाच धागा अचूक धरला .
" बाबा बघा. मी म्हणाले होते ना ? आईनेच हा गोंधळ सुरु केला असेल."
" तू पण ना गोदावरी, असल्या नाजूक गोष्टी एकदा विचारून मग  करत जा. बरं , पण आता पुढे काय ? तू त्यांना काय सांगितलेस ?
" मी काय सांगणार ? काकूच स्वतःहून म्हणाल्या कि त्यांनी मुलीचा फोटो पहिला आहे आणि त्यांना आता तिला प्रत्यक्ष भेटायचे आहे एकदा. ते रविवारी येतील पाहायला घरी.आणि मी ही म्हटले आहे त्यांना. "
" आई , तू माझा फोटो दिलास त्यांना ? का ?"
"अगं...मी काही दिले नाही.पण त्यांनी म्हणे फेसबुकवर पाहिला. "
" बरं , पण आता ते येतील म्हटल्यावर आता त्यांना नाही म्हणणे योग्य नाही."
"पण बाबा.... "
" अगं ऐक. आपण काही लगेच दुसऱ्याच दिवशी लग्न करून देणार नाहीत. हा फक्त बघण्याचा कार्यक्रम असेल. तुला नाही पसंत पडले स्थळ तर कोणीही तुला जबरदस्ती करणार नाही. पण आता ते येत आहेत तर एक वेळ भेटून घेऊ. इतकेच."
बाबांचे बोलणेही बरोबर होते. पण एकात जीव गुंतलेला असताना असे दुसऱ्या कुणाची अशी चेष्टा करणे तिला मात्र पटत नव्हते.मनात आले यांना सर्व सांगावे का पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनाने तिला सावध केले आणि ती थांबून गेली. आणि नाईलाजाने होकारार्थी मान हलवून ती झर्रकन आत निघून गेली. पण आईने मात्र ' मुलगी लाजली बघा ' म्हणत हसत अगदी त्या क्षणापासून पाहुण्यांच्या तयारीला सुरुवात केली. सरितावहिनीला जाणवत होते कि कुठेतरी नक्कीच काहीतरी चुकतंय पण काय ते मात्र उमगत नव्हते.तिला सारखे वाटत होते कि आपली नणंद कुणाच्या तरी प्रेमात आहे पण कोणाच्या हा प्रश्न मात्र ती अद्याप सोडवू शकली नव्हती. वहिनीने तसे एकदा तिला विचारूनसुद्धा पाहिले होते पण ठरल्याप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे तिच्या दिशेने आली. म्हणून मग ती देखील आपलाच अंदाज चुकतोय असे समजून उत्साही होऊन तिच्या सासूबाईंच्या सांगण्यानुसार रविवारच्या तयारीत व्यस्त झाली.

त्या आठवड्याभरात जशी घरोघरी महिन्याभरापूर्वी दिवाळीची तयारी सुरु असते अगदीतशी सुरुवात झाली होती. काही प्रमाणात साफसफाई , हॉलमधल्या वस्तूंची आवराआवर अशी कित्येक कामे सासू सुना अगदी आनंदाने करत होत्या.काचेच्या नक्षीदार फुलदाण्यांना आज कित्येक महिन्यांनंतर खऱ्या फुलांचा सहवास लाभला होता.त्या फुलांच्या सुगंधाने संपूर्ण घर दरवळले होते. ती मात्र या सर्वापासून चार हात दूरच होती. कोणीतरी अनोळखी लोक घरी येतील आणि त्यांच्या तयारीसाठी सुरु असलेली ही तयारी पाहून तिला त्यांचे हसूही यायचे आणि रागसुद्धा येत होता.सर्वच तिच्या दृष्टीने जरा विचित्र होते पण ती काही बोलली नाही. ती तिच्याच एका वेगळ्या कल्पनेच्या विश्वात होती.

रविवार उजाडला. सर्व आज लवकर उठून तयारीला लागले होते. नवे पडदे , नवीन टेबल क्लोथ , दाराला मागच्या दिवाळीला आणलेले मोत्यामोत्यांचे नवीन तोरण , दारासमोर वहिनीने जमेल तशी रेखाटलेली फुलाफुलांची नाजूक रांगोळी... संपूर्ण घर कसे नवे नवे भासत होते... फक्त बाहेर वर आकाशकंदील आणि दारापाशी पणत्यांची कमी होती... नाहीतर त्यांच्या घरी आज जणू दिवाळीच होती. तिचे मात्र याकडे अजिबात लक्ष नव्हते. काल त्याच्यासोबत झालेल्या चॅटनंतर तिच्या चेहऱ्यावरचे सारे रंग बदलले होते. त्याचे भारतात येणे आणखी काही दिवसांसाठी लांबण्याची शक्यता त्याने वर्तवली होती. अगदीच नक्की नव्हते पण तरी एक वेगळीच हुरहूर लागली होती जीवाला. तो खात्री करून सकाळी तिला सांगणार होता त्यामुळे ती लॅपटॉपला चिटकून बसली होती. दर १० मिनिटांनी ती तपासून खात्री करून घ्यायची. आईच्या लक्षात आले होते पण तरी तिने बराच वेळ दुर्लक्ष केले पण मग मात्र तिला राहवले नाही.
"अगं , सकाळपासून पाहतेय . काय सोनं त्या लॅपटॉपला लागलं आहे गं ? सारखी त्याकडे तुझी धाव. आता ते जरा बाजूला ठेव आणि तुझ्या वहिनीकडे जाऊन तुला आवडेल ती चांगली साडी बघ एखादी ... संध्याकाळी नेसण्यासाठी."
आईचे हे शब्द कानांवर पडण्याचा अवकाश आणि वहिनी लगेच बाहेर आली.
" हो हो . देते ना. मी किनई आता गेल्या महिन्यातच तुझ्या दादाकडून एक साडी घेतली होती ... अजून घडी पण मोडली नाही तिची... तू ना तीच घाल."
" अजिबात नाही हां. आता हे साडी वैगरेचं नाटक नकोय प्लीज. नाहीतर सांगून ठेवते , मी आताच लाइब्ररीत निघून जाईन."
हा गोंधळ ऐकून बाबा बाहेर आले.
" अगं गोदावरी , आता काय झाले? ती नाही म्हणते आहे तर कशाला उगाच? एक तर हे सर्व नको त्या वेळेला मांडण्याचा घाट तूच घातलास आणि तीच खरी चूक झाली आहे आपली. आज हे कसेबसे निस्तरू दे ."
म्हणत ते आत गेले आणि आई शांतच झाली. तीही आत निघून गेली. जाताजाता फक्त इतकंच बोलली,
"कर तुला काय करायचं ते. मी आता काही बोलणार नाही."
खरेतर आईवर बाबा असे रागावले म्हणून तिला वाईटसुद्धा वाटत होते पण नाईलाज होता. ती तशीच उठली. आतल्या कपाटातून नवीनच वाटणारा मोरपिशी पंजाबी ड्रेस बाहेर काढून ती त्याला इस्त्री करू लागली.


ती इस्त्री करण्यात, बाबा पुस्तकाने नीट रचून ठेवण्यात , आई किचनमध्ये आणि वहिनी घराच्या सजावटीमध्ये अगदी मग्न झाले असतानाच अचानकच टेबलावरचा फोन दणाणला. सर्वप्रथम आईनेच येऊन तो उचलला. फोन घेतला .थोडेफार संभाषण सुद्धा झाले. आणि ते संभाषण संपता संपता तिच्या चेहऱ्यावरचा रंग पार बदलला. चौधरीकाकुंचा फोन होता.काही कारणामुळे मुलाला अचानकच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने परदेशी जावे लागणार असल्याने पाहुणे पुढचा १ महिना तरी येऊ शकणार नाहीत. पण तो परत आला कि नक्की येऊअसे त्या सांगत होत्या. 

"अरे याला काय अर्थ आहे ? परदेशी जाणार आहे १ महिन्यासाठी तर आत्ता येऊन गेले असते ना ? मला अजिबात पटले नाही त्यांचे हे असले वागणे."
म्हणून बाबा तावातावाने हॉलमध्येच येरझाऱ्या मारू लागले.ते आपला आलेला राग आवरण्याचा प्रयत्न करत होते आई विचारांच्या तंद्रीत  हरवलेली होती. वहिनी थोडीशी चिंतेत आणि काय होतंय हे न उमगत असल्याचा आव आणत दारापाशी उभी राहून सर्वाना न्याहाळत होती .... आणि निर्वीच्या मात्र मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. 'बरे झाले , आता या नमुन्याचा विषय आपोआप १ महिन्यावर ढकलला गेला' असा विचार ती मनोमन खूप खुश झालेली होती.मध्येच आईला काही आठवल्यासारखे ती बोलून गेली ,
"अहो , पण यावरून एक गोष्ट कळली कि मुलगा परदेशाच्या वाऱ्या करतो. खूपच छान.म्हणजे बक्कळ खोऱ्याने पैसा कमावत असला पाहिजे "
आईचे हे बोल ऐकून तिची कळी खुलली. 'अरे वाह ! आईला परदेशातल्या मुलाविषयी भारी आकर्षण आहे तर. मग तर नक्कीच माझी निवड आईला आवडेल ' असा विचार करत ती गालातल्या गालात हसत राहिली.लॅपटॉप घेऊन पुन्हा तपासले आणि ते हसू वाढतच गेले.कारण आता  तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. तो येणार होता अगदी ठरल्या वेळी म्हणजे अवघ्या आठवडाभरात तो इथे भारतात तिच्या समोर असणार होता.

पुढचे काही दिवस असेच गेले. सर्व आपापल्या कामांत व्यस्त झाले होते. लग्नाचा विषय तर जणू गायबच झाला होता. 

अशाच एका संध्याकाळी दारावरची बेल वाजली. घरात तिचे आई आणि बाबा हे दोघेच होते. आईने लगबगीने दरवाजा उघडला आणि पहाते तर काय एक चांगला उंचपुरा , गोरा नसला तरी दिसायला देखणा , उमदा तरुण दारासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर असलेले लोभस स्मितहास्य हे त्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आकर्षण. हास्याची अदलाबदल झाली आणि पुढच्याच क्षणी त्याने प्रश्न विचारला तो त्यांच्या निर्वीबद्दल. 

- रुपाली ठोंबरे. 

Friday, June 15, 2018

... अरे ये ना !

आता पुन्हा एकदा ,
आभाळाचा कागद लख्ख कोरा झाला आहे 
काळ्या मेघांची शाई आता धूसर होते आहे 

पावसा , असा दडलास तरी कुठे इतक्यातच ?
किती वाट पहाते आहे मी...आता ये ना ! 
रिमझिम ये ,कोसळत ये ,गडगडत ये, लखलखत ये 
पण आता लवकर धावत ये, बरे का!

काळ्या काळ्या मेघांची शाई 
आभाळभर सर्वत्र पसरू दे
त्यातून तुझे जलमोती शब्द होऊन 
चोहीकडे आनंदाचा पाऊस बरसू दे 

तुला माहित आहे ?
तुझ्या प्रत्येक लहरी सरीत 
माझी एक ओळ दडलेली असते 
आणि त्या प्रत्येक ओळीत 
तुझ्यावरचे माझे निस्वार्थ प्रेम 

या प्रेमाखातर...कोरड्या नदीसाठी 
जीवनाचा अमृत सागर घेऊन ये 
तुझ्यावरच्या माझ्या अधुऱ्या कवितेसाठी 
भावनांच्या दाट शब्दमधुर रेघा घेऊन ये

एका पावसात जन्मलेली नवी पालवी 
वाट पहाते आहे तुझी....नव्याने बहरण्यासाठी 
तुझ्या स्वागतासाठी बघ ही कागदी होडी 
ती ही आतुरली आहे...अलवार तरंगण्यासाठी

त्या पालवीसाठी...त्या होडीसाठी... माझ्या कवितेसाठी
आभाळ भरून खाली बरसत ये
किती वाट पाहायची रे आम्ही .... अरे ये ना ! 
रिमझिम ये ,कोसळत ये ,गडगडत ये, लखलखत ये 
पण आता लवकर धावत-पळत पुन्हा परत ये !

छायाचित्रसौजन्य  : निखिल देशपांडे.


 - रुपाली ठोंबरे.

Friday, June 8, 2018

१ लक्ष... एक फार मोठी संख्या

खरंच आहे , कोणाला आपला आनंद कुठे, कसा आणि कधी गवसेल हे सांगता येत नाही.... पण एक सकारात्मक दृष्टिकोन आणि सोबत मेहनत,जिद्द असेल तर त्या सुखाची चाहूल नक्कीच फार पूर्वीपासून मनाला लागते....जसे आज मी फार आनंदी आहे... या आनंदाचे कारण फार फार मोठेही नाही आणि अगदीच शुल्लक देखील नाही...जवळजवळ  ३ वर्षांपूर्वी एक टाईमपास म्हणून सुरु केलेल्या माझ्या ब्लॉगच्या रोपट्याचे झाड आज इतके मोठे होईल असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. आज हा 'उमटले मनी ' १ लाख वेळा देश-परदेशांतून वाचला गेला आहे ... आणि म्हणूनच मला ते पाहून खूप खूप आनंद झाला. इतका जितका एखादी हाताला न लागणारी गोष्ट अचानक सापडावी तितका. ज्या गोष्टीसाठी कधी हजारांची देखील अपेक्षा केली नव्हती ती गोष्ट आज लाखाची पहिली पायरी चढली... आणि अशाच पायऱ्या चढत राहो असे मनोमन वाटते आहे आज... पण हे सर्व शक्य झाले आणि शक्य होईल ते फक्त आणि फक्त माझ्या लेख आणि कवितांवर भरभरून प्रेम करणाऱ्या वाचकांमुळे. आजही आठवते जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा कित्येकजण म्हणाले होते कि मराठीत  लिहितेस ? मराठी वाचत नाहीत कोणी जास्त. ... पण आज मराठी कोणी जास्त वाचत नाहीत ही माझ्यासाठी अफवा ठरली आणि कित्येकांच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तरही मिळाले...खरेच ,माझ्यासारख्या नवोदितेच्या लेखणीला इतका भरभरून प्रतिसाद इतक्या कमी वेळात मिळू शकतो तर नक्कीच आपल्या मातृभाषेला आनंदाने बिलगणारी मने आजही जगभर विखुरलेली आहेत हे सिद्ध झाले , नाही का ?

३ वर्षांपूर्वी ऑफिसमध्ये कामाचा अचानक फार कंटाळा आला आणि सहज बसल्याबसल्या काहीतरी नवीन करण्याची कल्पना मनाला शिवून गेली. आणि मी मोठ्या कष्टाने मला न आवडणारे कोडिंगचे धागेदोरे उसवून गुंतवू पाहू लागले. त्यातूनच आणखी ओळखी वाढल्या. त्या ओळखीतून एकाच्या काही वर्षांपूर्वी सुरु केलेल्या कोडिंग संबंधित असलेल्या ब्लॉगचा पत्ता लागला. तो माझ्या आयुष्यातील पहिला क्षण जेव्हा मी या ब्लॉग नामक फुलपाखराकडे झेपावले.नेटवर असे कोणीही पोहोचू शकतो हे जाणून मला त्याचे खूप आकर्षण वाटले. पण मुळात मला कोडिंग मध्ये आवड नसल्याने सुरुवातीला तो ब्लॉग फार निरस वाटला.त्यातून बाहेर पडून माझे विशेष आकर्षण ठरलेल्या ब्लॉग या विषयावर इंटरनेटवर खूप काही जुने-नवे अवशेष, कलाकृती, संकल्पना उलगडून काढल्या. आणि मग एक कल्पनेचा कुंचला हळूच मनात नवे रंग भरून गेला..."रुपाली ,तुझाही असा ब्लॉग बनू शकतो.... कवितांचा... ज्या गेली कित्येक वर्षे एका जुन्या वहीत बंदिस्त झाल्या आहेत... त्यांना पुन्हा नव्याने बाहेर काढायला हवे... नवे रंग भरून नवे पंख मिळाले तर तेही अनेकांना आनंद देऊ शकतील आणि सोबत या उदास चेहऱ्यावर नवे हसू फुलून येईल "... माझ्या मनाला हा रंग खूप भावला... इतरांना ही कल्पना बोलूनही दाखवली... 'छान कल्पना आहे ' म्हणत पुढच्याच क्षणी या ब्लॉगचा जन्म आणि बारसे देखील लगेच झाले... 'उमटले मनी '... अचानक मनाच्या झरोक्यातून कागदावर उमटलेले सुंदर नाव...ज्यात माझ्या मनात जे जे काही येत गेले सारे सारे टिकटिक शाईने पुढे उमटत गेले.... सुरुवातीला जुन्या कवितांचा नजराणा पेश करून त्यात आनंद मानत होते.... कधीतरी एखादा लेख लिहून पाहिला... तो चांगला जमला आणि एक वेगळेच समाधान मिळाले , स्वतःचेच स्वतःला.... मग एकदा समजले , आपण लिहिलेले कोणाला तरी खरेच आवडते आहे ... आपल्या शब्दांसाठी सुद्धा दूरवर कोणीतरी आतुरले  आहे... मग नव्याने विचार सुरु झाला... त्यातून कल्पनांचा इवलासा झरा गवसला...त्या कल्पनांना शब्द मिळाले आणि कवितेची नदी वाहू लागली... मनातल्या खोल गाभाऱ्यातून उगम पावून थेट कागदांवर वाहणारी...पुढे कल्पना वाढल्या पण शब्द कमी पडू लागले... मग वाचन वाढले ... वाचनातून नव्या विचारांना नव्याने पालवी फुटली... नव्या कल्पनांची फुलेच फुले जणू मनाच्या बागेत उमलली होती...त्या प्रत्येक फुलावर त्या फुलपाखराची नजर... आणि मग ते सर्वच त्या ब्लॉगच्या खेळकर फुलपाखरात सामावून गेली....आणि उडत बागडत या 'उमटले मनी' नावाच्या फुलपाखराने माझे शब्द , माझ्या कल्पना थेट सातासमुद्रापलीकडच्या ओळखी-अनोळखी मनांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनाही त्या आवडू लागल्या हे विशेष. फुलपाखरू म्हणू किंवा झाड म्हणू किंवा शेकडो कथाकवितांना आपल्यामध्ये सामावून घेणारा समुद्र... माझ्यासाठी 'उमटले मनी' हा एक आरसा आहे... हो . एक असा जादुई आरसा ज्यात मला जे जे वाटते, अनुभवते ते ते सर्व कळत नकळत लेखणीतून उमटले जाते... माझ्या कल्पनांना , बंधनांना मोकळी वाटच मिळाली आहे जणू...

१ लक्ष... एक फार मोठी संख्या... अगदी कोणत्याही बाबतीत या संख्येला एक अनन्यसाधारण महत्त्व. आज तिचा स्पर्श 'उमटले मनी ' ला झाला आणि यशाची पायरी चढली, असा कुठे तरी भास झाला. पण या यशात माझ्या शब्द -कल्पनांसोबतच कितीतरी दृश्य-अदृश्य शक्तींची साथ आहे हे नाकारता येणार नाही. सर्वात मोठी शक्ती आहे ही इतकी सुंदर , रसाळ अशी माझी मातृभाषा- मराठी. या भाषेशी दोस्ती करायला लावणारी माझी मराठी शाळा... तेथील शिक्षक शिक्षिका....अश्विनी जोशी , अनिता पाटील ,शिंदे,योजना , प्रार्थना मोरे ,घोरपडे ,निरंजना साळवी,पेठे अशी कितीतरी नावे घ्यावीशी वाटतात जेव्हा या माझ्या प्रिय संग्रहाचा खरा उगम मी शोधू पाहते तेव्हा. खरेतर मी मराठी शिकले ते फक्त दहावीपर्यंतच आणि तेही या सर्व गुरूंकडून झालेल्या भाषेच्या संस्कारांमुळेच.पुढे मराठीशी पुस्तकस्वरूपी नाते म्हणजे कथा कादंबऱ्या आल्या...चित्रपट आणि मालिकांमधून मी त्या कथेचा आनंद घेण्यापेक्षा या भाषेला नव्याने आणि वेगळ्या प्रकारे अनुभवून घ्यायचे... अगदी तसेच गाण्यांसोबतही ... गाण्यांचे बोल, त्याच्यातील मतितार्थ ही एक आणखी सुंदर शाळा भाषा , शब्द , कल्पनांचे अनोखे सौन्दर्य व्यक्त करणारी आणि स्वतःला त्यातून व्यक्त होण्यास मदत करणारी...रोज घडणाऱ्या घडामोडी , नवे अनुभव ,भेटणारे नवी-जुनी माणसे ,आणि त्यासोबतच निसर्ग हे सर्व सर्व 'उमटले मनी'च्या प्रत्येक शब्दासाठी असलेली प्रेरणा आहे. ब्लॉग सुरु झाला तेव्हा अनेकांची अनेक मते... त्यातून खूप काही शिकले... प्रत्येक चांगले कार्य अखंडित चालू राहण्यासाठी लागणारे प्रोत्साहन वेळोवेळी मित्र-नाते मंडळी , ओळखी-अनोळखी वाचक या सर्वांकडून मिळत गेले आणि हा आजपर्यंतचा शब्दकल्पनांचा प्रवास सुरेख सुरु राहिला. या सर्वासाठी या सर्वांचेच मानावे तितके आभार कमीच...धन्यवाद. 

- रुपाली ठोंबरे .

Monday, June 4, 2018

ही छत्री रंगली...आणि तो पाऊस आला

पाऊस आणि पालवसरांसोबत रंगणारा 'Umbrella workshop ' हे एक वेगळेच नाते.... त्या नात्यात अवघ्या ३-४ वर्षांचा ओम गेल्यावर्षीपासून सामील झाला...आपल्या कल्पनांचे,स्वप्नांचे,बालविचारांचे आगळेच रंग नव्याने भरू लागला...आणि मग आकाशातले इंद्रधनुष्य हे असे स्वतःच्या छत्रीवर खाली उतरवण्याचे कसब हळूहळू आकार घेऊ लागले...तसा मनातला आनंदाचा रंग दाटू लागला... तो पाऊस होऊन त्या बालमनावर , त्या कोवळ्या चेहऱ्यावर , त्या खोडकर बालपणावर बरसू लागला...



आज नाहीतर उद्या किंवा परवा 
लवकर नाहीतर उशिराच जरा 
शंका नाही, खात्री झाली आता 
तो येईलच...अगदी दिमाखात
येताना सोबत आणेल घोंगावता वारा
नाहीतर 
नुसत्याच रिमझिमणाऱ्या पाऊसधारा 

त्याच्या आगमनाची वर्दी आली 
आणि आता तीही तयार झाली 
आपला पांढराफटक चेहरा घेऊन 
आकाशाकडे टक लावून पाहत राहिली 
जणू तहानलेला चातकच झाली होती ती
कितीतरी वेळ उन्हात तिष्ठत उभी होती 

आणि अचानक गजब झाला 
पिवळा रंग माथ्यावरून अंगभर ओघळला 
जणू आता हळद लागली त्या गोऱ्या अंगाला 
त्यावर नाजूक हिरव्या रंगांचा चुडा सजला
शुभ्र मोत्याच्या दागिन्यांनी देह फुलून आला 
काळ्या मेघांचा केशसंभार मोकळा झाला 
त्यावर केशरी अक्षरफुलांचा गजरा माळला
मनामनांतला पाऊस असा छत्रीवर जमला
 
रंगांच्या थेंबांनी नसनसांत नवा उत्साह संचारला 

पिवळा -हिरवा -पांढरा-काळा-केशरी-गुलाबी 
रंगांनी छोट्या ओमची छत्री अशी सुंदर नटली 
लहान थोरांची साऱ्यांचीच छत्री आता रंगून गेली 
आकाशातले जलमोती झेलून घेण्यासाठी आतुर झाली  
आणि बघता बघता सृष्टीत एक जादू घडून आली 
बहरणाऱ्या फुलांसाठी बरसणारी सर धावत आली 

आणि आला आला 
उद्या नाहीतर परवा येणारा तो आजच आला 
सोबत घेऊन घोंगावता वारा
आणि
रिमझिमणाऱ्या थेंबांच्या जलधारा 
असा तो क्षणात धरतीकडे झेपावला 
आणि 
ओमची आतुरलेली छत्री चिंब चिंब झाली 
त्यावर जमलेली रंगमाया नव्याने मोहरली

चिमुकल्याची कळीही नव्याने आनंदली...समाधानाने फुलू लागली. 


- रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :