Wednesday, May 25, 2016

एक प्रवाह

किनाऱ्यावरच्या वाळूत त्या भेटीचे ठसे उमटवत मी त्या अथांग पसरलेल्या नदीच्या पात्राशी पोहोचले.वाऱ्याच्या नाजूक झुळूकेसह हलणाऱ्या त्या गार पाण्याचा माझ्या अनवाणी पायांना तरंग स्पर्श झाला आणि त्यासोबतच कितीतरी तरंग अलगद या मनात आणि पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झाले. पाय तसेच पाण्यात मोकळे सोडून तिथेच वाळूत खोलवर रुतलेल्या मोठया खडकावर बसले.… समोर अधूनमधून ढगांच्या आड दडणाऱ्या झगमगीत सूर्याचा सोनेरी किरणांचा रंगलेला लपाछुपीचा खेळ पाहत.

जवळचाच एखादा छोटासा खडा उचलावा आणि त्या पात्रात दुरवर फेकावा. माझा असा खेळ बराच वेळ चालला होता. सोबत मनात न सांगता येणाऱ्या-जाणाऱ्या असंख्य विचारांची ये-जा सुरु होती. फेकलेला खडा हवेत भिरभिरत जात त्या पाण्याला स्पर्श करायचा आणि अचानक आलेल्या या नव्या पाहुण्यामुळे पाणी जरा  बिचकायचे, थोडे शरीर आत आकसून घेत ते जरा थरथरायचे. आणि असंख्य नवे तरंग त्यातून नव्याने जन्म घ्यायचे.त्या स्पर्शबिंदूभोवती जमलेले ते सारे तरंग आपला व्यास उंचावीत दूर दूर जात होते आणि मग शेवटी हवेच्या झुळूकेसोबत उठणाऱ्या तरंगांत विलीन होत पुन्हा ते पाणी एकरूप झाल्यासारखे भासे. तो खडाही एव्हाना गटांगळ्या खात नदीच्या खोल डोहात पोहोचलेला असेल. 

या प्रत्येक खडयासोबत उठणाऱ्या तरंगासोबतच मनातल्या खोल समुद्रात आठवणींच्या लाटा बेभान होऊन उसळून येत होत्या. त्या लाटांनी फेसाळलेला तो सागर या डोळ्यांच्या कडयावरून बाहेर येऊ पाहत होता.एक … दोन … तीन …. असे कितीतरी खडे त्या पात्रात विलीन होत होते. जणू आसपासचे सारेच खडे संपतील कि काय अशी भीतीही एका क्षणी मनास स्पर्शून गेली.त्यासोबतच बेभान होऊन उसळणारा तो आठवणींचा महासागर आता अश्रू होऊन त्या नदीपात्रात समरूप होत होता. हातातून नदीच्या दिशेने भिरकावलेल्या प्रत्येक लहानमोठया खड्यांसोबत समोरच्या नदीपात्राच्या रुपेरी चादरीवर चाललेला सोनसळी सुवर्णकिरणांचा खेळ आणि मनातल्या भूतकाळातल्या गोडकडू आठवणींच्या पडद्यावर चाललेला रंगीत हवाहवासा कधी नकोनकोसा वाटणारा खेळ यामध्ये मी आता हरवून गेले होते.फार दूर न जाता जवळच पडलेल्या एका खड्याने निर्माण केलेले गार तुषार माझ्या दिशेने उडाले आणि क्षणभरासाठी सबंध अंगावर शहारे उभे राहिले. आणि त्याच क्षणी मी भानावर आले.

आता सायंकाळ झाली होती. तासाभरापुर्वीचा तो लखलखणारा सूर्य आता लालबुंद झाला होता. काही क्षणांतच तो आता डोंगराआड लय पावणार होता. शेजारच्या झाडीतून कृष्ण धूम्ररेखा लाल-केशरी-निळसर आकाशाकडे वक्र गतीने जात होत्या. त्यांची  हालचाल नर्तकीच्या तालबद्ध पदक्षेपांप्रमाणे भासत होती. घरट्यांकडे परत येणारी ही पाखरे मधुर किलबिल करीत होती.जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते.त्यात मेघखन्डांच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी ऋत्विज बनून मंत्र म्हणत होते. कधी अचानक वाटे मी जणू या विश्वाच्या विशाल देवालयात ध्यान लावून बसले आहे. पश्चिमेकडं या देवळातला नंदादीप मंद मंद होत चालला आहे. जरा वर पाहिले तर जाणवे आता या मंदिरात निरांजनांमागून निरांजनं प्रज्वलित होत जातील. शेजारीच एखाद्या थोर योग्यासारखी समाधी लावलेले पानगळ झालेले नेमस्त झाड आसवांच्या पडद्याआडून पाहिले. काही क्षणासाठी त्या झाडात माझ्या उदास आयुष्याचे प्रतिबिंब मला दिसले. पण दुसऱ्याच क्षणी दूर उंच शेंड्यावर फुटलेली कोवळी पालवी नजरेस पडली,मनात काहीतरी अनामिक हालचाल झाली आणि जणू मनाच्या वाळवंटात एक नवे कल्पनेचे,चैतन्याचे कारंजे उत्पन्न झाले. काही काळापूर्वी फेकलेल्या प्रत्येक खड्यासोबत निर्माण होणाऱ्या तरंगांप्रमाणेच मनातही असंख्य विचारांच्या मालिकांची गर्दी झाली होती. सबंध शरीरभर त्याचा मानसिक थकवा जाणवत होता. तो आता अवचितच स्फुरलेल्या कल्पनेच्या कारंज्यातून येणाऱ्या लाखो सकारात्मक आणि स्फूर्तीदायक सूक्ष्म तुषारकणांमुळे क्षमलेला वाटत होता.

कसे असते ना आपले ? एका क्षणी उदास तर दुसऱ्या एका क्षणी आनंदी ,आणखी एखादया क्षणी कोमेजलेलो तर कधी उत्स्फूर्त… बरेचदा सभोवतालचे जग , त्यातील सूक्ष्म हालचाली आपल्या मनात असे काही नवे बदल घडवून आणतात कि क्षणाक्षणाला जग नवे भासते. आणि या नव्या जगाच्या ओघात आपल्या विचारांचा प्रवाह सुद्धा एक दिशा घेतो. आणि क्षणाक्षणाला जग कसे बदलत जाते याचा साक्षात्कार आपल्याला घडत जातो. ही सुद्धा या जगण्यातली एक मज्जाच आहे , नाही का ?


- रुपाली ठोंबरे

Tuesday, May 17, 2016

आज जरा एकटं वाटतंय    आज जरा एकटं वाटतंय
    राहून राहून सारं जगच
    माझ्यावर रुसलेलं वाटतंय

     सकाळचे १० वाजले
   पण पहाटेचे रंग उधळत
   येणारे रोजचे Good morning
   आज अजूनही आले नाही

    एरव्ही दसऱ्याच्याही शुभेच्छा न देणारे
   आता कुठे रामनवमीही साजरे करू लागले होते
   काल रात्री १२ पासून वाट पाहत होते मी
   पण जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणारे
   असे काहीच आले नाही माझ्यापाशी

    आज जरा एकटं वाटतंय
   राहून राहून सारं जगच
   माझ्यावर रुसलेलं वाटतंय

    एव्हाना रोज २-४ तरी कोडी येतात दुपारपर्यंत
   आणि मग मीही गुंग होते कागदावर आकडे मांडत
   पण आज ना कोणी गणिताची कसोटी घेतली ना भाषेची
   काय सांगू हल्ली सवयच झाली होती अशा अनपेक्षित परीक्षांची

    सुंदर विचारांची लयलूट करणारे सारे
   जणू आज रस्ताच माझा चुकले
   ना आले अजुनी गोड कवितांचे आशय वारे
   ना हास्याचे कारंजे घेऊन
   उनाड विनोद घरा खिदळत आले

    एरव्ही वर्षानुवर्षेही नाही जिथे संबंध
   निळ्या रेघांच्या ऊनसावलीत तिथे आता
   रोजच रंगतात संवादांचे रेशीमबंध
   आज असाच अस्वस्थ गेला दिवस सबंध
   मोबाईलच्या कुपीतून दरवळणारा गंध आता
   हरवल्यासारखा वाटतोय, कारण नेट आहे बंद

    आज जरा एकटं वाटतंय
   राहून राहून सारं जगच
   माझ्यावर रुसलेलं वाटतंय

    जेव्हापासून 'whatsapp '
   बनला माझा मित्र
   त्याच्याशिवाय वाटे
   इतराचा सहवास आता अशक्य

    आज हा मित्र दूर गेला अधांतरी
   आणि जाणवले जवळच्याचे अस्तित्व
   पण  whatsapp च्या नादापायी
   आज तेही गेले होते आहारी
   विसरून स्वतःचेच व्यक्तिमत्त्व

    आज जरा एकटं वाटतंय
   राहून राहून सारं जगच
   माझ्यावर रुसलेलं वाटतंय

    आज स्वतःचेच स्वतःला कळले
   इतके दिवस काय माझे चुकले
   आभासी जगात वावरताना आज जाणवले
   कुठेतरी काहीतरी खरेच हरवत गेले   

    आज अपरीत काही घडले
   मिनिटामिनिटाच्या किलबिलीशिवाय
   आज काळानंतर हरवलेली
   झोप येताच अलगद डोळे मिटले- रुपाली ठोंबरे

Sunday, May 8, 2016

"Four shades"...आज अनुभवलेले नाविन्यपूर्ण असे काहीतरी

आज बऱ्याच वर्षांनी जहांगीर आर्ट गैलेरीला जाण्याचा योग चालून आला…. मनाला मुग्ध करणाऱ्या चित्रांच्या एका प्रदर्शनामुळे… प्रदर्शन "Four  shades".

एकच गैलेरी… पण ४ विविध कलाशैलीनी नटलेली… ४ वेगवेगळ्या कलाकारांच्या प्रतिभेच्या विविधढंगी कुंचल्यातून साकारलेली, एकाच जागी एकरूप झालेली.…पाहणाऱ्याचे भान न हरपले तर नवलच. याचे पूर्ण श्रेय जाते या तरुण कलाकारांना.
शशांक म्हशीलकर या शिल्पकाराच्या शिल्पकलेतुन सत्य-असत्य, हकीकत-कल्पना यांची योग्य जडणघडण झाल्याने या जीवनातील बारकावे नकळत मनात कोरले जातात. आजपर्यंत शंकर मंदिरात कित्येकदा गेले पण तेथील शिवशक्तीचे खरे रूप आज या नेत्रांस दिसले , रात्रीचा सुर्य आज प्रथमच कल्पनांच्या जगातून फार पूर्वी उगवल्याचे ध्यानात आले ,माशाचे खरे वास्तव्य आपण व्यर्थ म्हणून फेकलेल्या हाडांत दडलेले असते हे आजच कळले , ज्या कल्पतरूचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो त्याकडून मिळालेली 'नारळ ' ही देण असो वा माणसाची सर्वात प्रिय पैशांची नाणी-नोट असो ती मानवानेच कल्पनाविश्वात राहून निर्मिलेल्या देवासमोर वाहून वाया घालवणे हे योग्य कि अयोग्य … असे आणखी कितीतरी प्रश्न , कितीतरी नवे खुलासे आज झाले… ते शशांकनी साकारलेल्या ब्राँझ या सर्वात कठीण धातूपासून घडविलेल्या शिल्पांतून.

मूळ वास्तव आणि कल्पनात्मक जग यांतील पोकळी दाखवण्याचा सफल प्रयत्न समीर पाटीलच्या लक्षवेधी चित्रांतून सहज नजरेस पडतो. वर्तुळ ,त्रिकोण ,चौकोन या भौमितिक आकारांतून आपल्याला या खऱ्या आणि खोटया जगाची सैर करून आणण्यात या चित्रकाराने खरेच यश संपादन केले आहे. विविध रंगांच्या रंगछटा असो वा फक्त काळ्या पांढऱ्या ऊन सावल्यांचा खेळ… बघणारा पाहतच राहतो. विविध रंगछटामधून साकारण्यात आलेला ३D इफेक्ट हा एक कौतुकाचाच भाग आहे. सगळीकडे वर्तुळ हा आकार प्रामुख्याने त्याच्या चित्रांत दिसून येतो. याचे कारण सांगताना तो म्हणतो ,
" पृथ्वी , सुर्य ,ग्रह असे कितीतरी निसर्गातील प्रमुख गोष्टी वर्तुळाकार आहेत म्हणून निसर्गाचा हा विषय हाताळताना वर्तुळाला मी विशेष प्राधान्य दिले आहे".   
याची चित्रे वरवर जरी सारखीच भासत असली तरी ती खूप बोलकी आहेत, वेगळी आहेत आणि रंगाच्या योग्य वापरामुळे ती कोणत्याही भिंतीवर अगदी उठून दिसतील यात शंकाच नाही.

प्रवीण पाटील या कलाकाराच्या चित्रांतून कधी बालपण आणि बालपणीच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रतिभेचे दर्शन घडते तर कधी 'जैत रे जैत' या सुप्रसिद्ध चित्रपटामधील नायक नायिकेच्या भूमिकांचे सुंदर वर्णन , कधी अजिंठा-वेरूळ मधल्या शिल्पांच्या त्या स्तब्ध आकृत्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात तर कधी आपले अवघे आयुष्य मागे सोडून इतरांच्या लग्नकार्यात एकरूप होणारी धवलारीण नवरंगांत प्रकट होते. लहानपणी नावडते झालेले गणिती आकडे आज चित्रकला या आवडत्या विषयात वापरून प्रवीणने त्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन जगासमोर दर्शविला.

इंद्रधनूचे इतर सर्व रंग डावलून हेमंत भोर या चित्रकाराने फक्त पेन्सिलच्या काळ्यापांढऱ्या , गडदपुसट रंगछटांतून आणि शब्दांच्या माध्यमातून आजच्या जगातील अनेक विषय अगदी योग्यरित्या मांडले आहेत. त्याच्या चित्रांत कुठे अभ्यासासाठी भुकेलेली चिमुरडी भेटते तर कुठे अशीच एक चिमुरडी सेल्फिच्या आहारी गेलेली आढळते . हेमंतची चित्रे बोलतात आणि बोलताना या चित्रांत आपल्याला सहज दिसून येते… एक आभासी जग , स्त्रीचे एक अनोखे विश्व ,आजचे स्पर्धामय झालेले हे वास्तवातील जग , आधुनिकतेच्या नावाखाली हतबल झालेले तारुण्य ,एखादी कृती करण्याआधी मनात उठणारे वादळ. नवरसांच्या विविध भावना दाखवत अशी ही सर्व चित्रे प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच भुरळ पाडतात.सोबत असलेली त्या चित्राच्या संदर्भातील शाब्दिक रचना विशेष उल्लेखनीय आहे. 

असा हा चतुर्शैली महोत्सव या आठवडयात जहांगीरमध्ये रंगला आहे. आणि आज तिथे प्रत्यक्ष भेट दिल्याने एक वेगळेच समाधानाचे भाव चेहऱ्यावर घेऊन मी घरी परतले.


- रुपाली ठोंबरे.  


Saturday, May 7, 2016

छंद जोपासण्याची एक नवी तऱ्हा

गेल्या एक वर्षापासून तेच तेच काम, तेच दैनंदिन जीवन जगत आहे या अधूनमधून नेहमी मनात डोकावणाऱ्या या गोष्टीची जाणीव त्यादिवशी नकळत पुन्हा मनाला झाली आणि नेहमीप्रमाणे तात्पुरता मूड खराब झाला. काहीही करावेसे वाटत नव्हते. ऑफिसचे काम तर नकोच. त्यामुळे फक्त नजर समोर असलेल्या ऑफिसच्या कॉम्प्यूटरवर होती , पण लक्ष मात्र घड्याळ्याच्या काट्याकडे होते. तोही आज का कुणास ठाऊक भारीच मंदावला होता. इतक्यात मोबाईलवर क्षणभराची किलबिल ऐकू आली. पाहिले तर एका मैत्रिणीचा व्हाट्सएप मेसज,
 
        "Hi…There is a guy Amrut Deshmukh…He reads an interesting book every week and sends the summary of the book on whatsapp to everyone…so that we can read (or listen to )a fat book in just 20 mins!...I am enjoying his summaries every week….if you want to read books on whatsapp ping him ur name at his whatsapp no +919594700077…Happy reading!Amrut is on mission to cultivate the habit of reading books amongst youth…"

 मेसेज वाचला आणि क्षणभरासाठी वाटले कि कोणीतरी मज्जा केली असेल . आजच्या जमान्यात कोण इतरांसाठी असे करत बसणार.  मी दुर्लक्ष करून फोन ठेवणार इतक्यात तिचाच नवीन मेसेज डोळ्यांसमोर आला ,

आणि मी पुन्हा त्या आधीच्या मेसेजकडे वळले. त्यातला नंबर आधी अमृत देशमुख (बुक्स ) नावाने सेव केला . आता व्हाट्सएप वर मी त्याची प्रोफाईल पाहू शकत होते पण त्यातही माझे विशेष लक्ष वेधले गेले ते त्याच्या status मेसेजकडे , 

     "  If you have time for FaceBook, you have time for a Book." 
 
क्षणभरासाठी प्रत्येकाला विचार करायला लावणार अशी ही ओळ. मला वाचता क्षणीच फेसबुकचे पान उघडून तासंतास त्यावर घालवणारी मीच आठवली . खरेच आज आपण असा कितीतरी वेळ सोशल मिडियावर उगाच खर्च करतो आणि मग असे काही वाचनाबद्दल मत विचारले कि प्रत्येकजण ' हल्ली वेळच मिळत नाही ' अशी सबब पुढे करतो . आणि मग कुठेतरी आपण काहीतरी नक्कीच गमावतो . उगीच नाही आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे - "वाचाल तर वाचाल ". आणि मग माझ्यातला वाचक एकदम जागा झाला.  इतके लिहिले आहे त्यात काहीतरी तथ्य असेलच असा विचार करत मीही त्या नंबरवर एक मेसेज पाठवला. क्षणभरात मोबाईलवरची किलबिल सांगू लागली

          Congratulations Rupali for joining the mission "Make India Read "…… 
 
मला चांगले आठवते आहे तो सोमवार होता. त्यानंतर मी हे जवळजवळ विसरूनही गेले होते. घर आणि ऑफिस नेहमीसारखे चालवण्यात मग्न असलेल्या मला बुधवारी पुन्हा या नंबरने किलबिलाट ऐकवली. नाव वाचले तसे सारे आठवले आणि उघडून पाहते तो काय

            Hello ! it's Wednesday !New Book New Insights !
 
अशी सुरुवात करत एक नवे पुस्तक त्याच्या छोटया रुपात तुमच्या भेटीला येत आहे याची वार्ता मिळाली. आणि फोनवर पुढचा मेसेज हजार झाला तो ३०० पानी पुस्तकाचा अर्धा भाग अवघ्या ४ पानांत घेऊन . १० मिनिटांत अर्धे अधिक पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले खरे पण त्यासोबतच 'पुढे काय ' ही उत्सुकता वाढली. आणि एव्हाना व्हाट्सएपला इतके महत्त्व न देणारी मी चक्क त्या अनोळखी नंबरवरून येणाऱ्या एका मेसेजची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. अशाप्रकारे अवघ्या २० मिनिटांत एवढे मोठे पुस्तक वाचल्याचा एक प्रकारचा वेगळाच आनंद डोकावत होता.

आपल्या छंदात जगाला अशा प्रकारे सामावून घेणे …. खरेच मला तर ही कल्पना फारच आवडली.प्रत्येकालाच असे जमणे शक्य नाहीच. आणि त्यासाठी अमृतला कौतुक आणि आभार मिळायलाच हवे .कॉम्प्यूटरच्या जगात आजची पिढी जिथे पुस्तक हाताळायला विसरून गेली आहे त्यांच्यासाठी एक नवा मार्ग ज्ञान मिळवण्याचा. होय… ज्ञानच… प्रत्येक पुस्तक आपल्याला काहीतरी शिकवूनच जाते… गरज आहे ती फक्त त्यातील शब्दांना आपलेसे करण्याची. हे ८ पानेही वाचण्याचा ज्यांना कंटाळा त्यांच्यासाठी तर त्याने त्याच्याच आवाजात वाचनही केले आहे. मधूर हळू आवाजातील संगीतमय वातावरणात त्याचे ठळक शब्द पुस्तकातील प्रत्येक पात्र मनाच्या कोपऱ्यात असे काही रेखाटले जातात कि ते पूर्ण पुस्तक वाचण्याची ओढ निर्माण होते.

मी जेव्हापासून या सुविधेचा अनुभव घेतला , इतरांनी ही याचा लाभ घ्यावा असे मनोमन वाटू लागले. कित्येकांना सांगितले देखील. यातूनही अनेकांचे विविध दृष्टीकोन नजरेस पडले. माझ्या एका मैत्रिणीने तर उत्तर दिले,
" मला पूर्ण पुस्तकच वाचायला आवडेल. अशा सारांशामध्ये मूळ लेखकाची भाषाशैली पुसट होते आणि सोबतच ते भाव नसतात ना? "
मी लगेच तिला उलट प्रश्न विचारला,
" मग तू अशी किती पुस्तके वाचतेस महिन्याला ?"
 त्यावर तिचे
 " अगं महिन्याला काय वर्षभरातही माझे एक सुद्धा पुस्तक वाचून होत नाही.वेळच नाही मिळत ना ."
 असे त्वरित उत्तर ऐकून एक स्मितरेषा हळूच माझ्या चेहऱ्यावर रेखाटली गेली. तिच्या प्रतिकारात्मक स्मितहास्यातच माझे बोलणे आणि ही कल्पना तिलाही पटत असल्याचे दिसत होते.

 आज या पुस्तकांच्या सारांशांच्या वाचकांचा आकडा ८००० च्याही वर गेला तसा हा पसारा व्हाट्सएपवर सांभाळणे कठीण झाले आणि त्यातूनच जन्म झाला एका नव्या एपचा - Booklet.… नवा वाचक वर्ग निर्माण करण्यासाठी. विविध पुस्तकांचे भांडार असणाऱ्या booklet ला खूप खूप शुभेच्छा.


- रुपाली ठोंबरे   Tuesday, May 3, 2016

हरवलेला 'मे ' महिना
रोजच्या त्याच वातावरणात राहून कंटाळलेल्या मुलाला काहीतरी वेगळेपण म्हणून सहज माझ्या एका बालमैत्रिणी कडे घेऊन गेले.' आपण कुठे जात आहोत?' ','कशाला ?','मी ओळखतो का ?" अशा त्याच्या असंख्य बोबड्या प्रश्नांना उत्तरे देत शेवटी मी त्या परिसरात पोहोचले. तब्बल १५ वर्षांनी मी येथे आले होते. अनोळखी वाटत असला तरी ओळखीच्या खाणाखुणा अजूनही पुसटशी वाट काढत भूतकाळ स्मरण करून देत होत्या. काही दिवसांपूर्वीच फेसबूक वर नव्याने ही बालमैत्रीण भेटली आणि सुट्टीत तिच्या आईकडे आली म्हणून प्रत्यक्षात भेटण्याचा बेत आखला होता आम्ही. 

१५ वर्षांपूर्वीचे तिच्या आईचे घरही आता नव्याने सजले होते. आसपास बरेच काही बदलले होते.हा बदल अनुभवतच आम्ही तिच्या दारासमोर आलो. मी तिच्या घरी गेले कि कायम सताड उघडा असणारा तिचा दरवाजा आज बेलच्या प्रतीक्षेत होता. संध्याकाळ असतानाही तो उकाडा नकोसा होत होता… आत शिरल्यावर AC च्या शीतप्रवाहात हायसे वाटू लागले. मग गप्पा रंगल्या. मुलेही आसपासच खेळत होती.त्यांची आता छान गट्टी जमली होती.

मग अचानक बालपण रांगत रांगत यावे तसे संभाषणात ते नकळत आले. बालपणीच्या खास गप्पांमध्ये सर्वात महत्त्वाचा काळ होता तो म्हणजे उन्हाळ्याची मिळणारी भलीमोठ्ठी सुट्टी.

 "मराठी असो वा इंग्लिश, व्याकरणाच्या आणि अक्षरांच्या दृष्टीने पाहायला गेलो तर 'मे ' महिना सर्वात लहान. पण मज्जा करण्यासाठी 'मे ' महिना म्हणजे खूप मोठा ,आनंदाचा,आणि आवडीचा … कितीही मस्ती करा , अभ्यासाला तर मोठ्ठी दांडी ,छोटे-मोठे, हवे-नको ते सारे सारे करण्याचा सर्वांचाच आवडता महिना… आज कॉर्पोरेट जगतात या महिन्याला महत्त्व तसे कमीच . पण आपणा सर्वांना एका हव्याहव्याशा भूतकाळात घेवून जातो तो हा आपला लाडका महिना…. मे महिना."

सारिकाच्या या बालआठवणींमध्ये मीही भर घालत पुढे बोलू लागले,

" अगं हो ना , साधारण ३० एप्रिलला प्रशस्तिपत्रक हाती पडायचे. मोठयाना हवे ते गुण मिळवून दाखवले कि तेही खूशच. त्यावेळी पालकांच्या अपेक्षाही जास्त नव्हत्या म्हणा. मग काय ? बाहेर वैशाखाचे भर दुपारचे रणरणते ऊन असो किंवा रात्रीचे टपोरे चांदणे… आपली ओढ सतत बाहेर असायची…. मित्रमैत्रिणीकडे. त्या काळी ना आतासारखे मोबाईल ,न वेगवेगळे कॉम्प्यूटर वरचे महागडे गेम्स ना केबलवर भरमसाठ च्यांनेल्स. घरी बसल्याबसल्या कंटाळा यायचाच मग कामी यायचे बैठे खेळ … कैरम , बुद्धिबळ ,सापशिडी ,नवा व्यापार,भातुकली यांसारख्या  खेळांत दिवस कसा निघून जायचा कळायचेच नाही. साऱ्यांचीच सारखीच स्थिती म्हणून नेहमी सोबती मिळायचेच.याच्या घरी कधी त्याच्या घरी… सतत ये-जा.  शिवाय कोणी गावावरून इथे आले कि एक वर्षापूर्वी भेटलेल्या भावंडासोबत नव्याने खेळ रमायचे. बैठया खेळांतून काही वेगळेपण म्हणून मग बाहेर नवे खेळ रंगायचे. मुलं म्हटली कि क्रिकेट ,विटीदांडू,गोटया ,भोवरा … आणि आपण मुली छान लंगडी ,चीप्पी-चीप्पी नाहीतर एक मोठ्ठा भातुकलीचा डाव मांडायचो .आठवते ? आपण एकदा आपल्या बाहुला बाहुलीचे लग्न सुद्धा लावले होते ….  "

" हो आठवते ना … खूप मोठा थाट होता तो . शेवट भांडणात झाला होता तरी खूप मज्जा आली होती .कित्ती कित्ती खेलोय्चो आपण तेव्हा.  लपाछुपी , पकडापकडी ,रंगरंग ,तळ्यात-मळ्यात असे कित्तीतरी खेळ… छोटे मोठे काही खेळ तर आता आठवत ही नाहीत."

म्हणत गार गार लिंबूपाणी घेऊन सारिका जवळ आली.

ते गार सरबताचे ग्लास हातात घेतले आणि १५ वर्षांपूर्वीचा तो शाळेशेजारी मिळणारा चम्मचगोला आठवला.ते झाडावरची चिंचा ,बोरे पाडणे ,घरातून चोरून आंबे-कैऱ्या आणून भातुकलीमध्ये त्या चिमुकल्या हातांनी थाटलेला पन्हे आणि लोणच्याचा घाट आठवला. ते आठवून माझे मलाच हसू आले. आणखी काहीसे आठवून मी म्हटले ,

" सारिका आठवते का ? आपल्या आई पापड, लोणचे वैगरे घालायच्या तेव्हा उन्हात काही वाळत घातले कि आपण बसायचो राखण म्हणून. आणि तेव्हा तर कित्ती मज्जा करायचो. सुट्टीत मामाच्या घरी जायचे आणि गावाकडची मज्जा….  ती तर काही औरच. खरेच ते दिवस अगदी आपले हक्काचे असायचे. पुन्हा यायला हवे असे बालपण  " 

असे म्हणत मी तिच्या १२ वर्षाच्या मुलीकडे एका लटक्या हेव्याने पाहिले.आणि त्याच क्षणी मघापासून अगदी उत्साहाने आणि कौतुकाने आम्हा मैत्रिणींचे संभाषण ऐकणाऱ्या त्या चिमुरडीच्या इवल्या ओठांना बोल फुटले,

" अगं मावशी , आत्ता तुम्ही आमच्या एवढ्या छोट्या झाल्या की यातली काहीसुद्धा मज्जा मिळणार नाही. खरंच . खूप कंटाळून जाल तुम्ही . ऊन्हात तर आई जरा सुद्धा जाऊ देत नाही. आणि असे सर्व वेगवेगळे खेळ खेळायला आमच्याकडे कुठे वेळ असतो? सकाळपासून या न त्या क्लासला जाऊन जीव इतका दमून जातो कि काही काही सुद्धा करावेसे वाटत नाही. मग करमणूक म्हणून २४ तास मनोरंजन करणाऱ्या TV चाच आसरा घ्यावा लागतो. आई-बाबा दोन्ही सकाळीच कामाला जातात. इतर तर कोणी घरी नसतच. जास्त कोणाला घरी घेवू नये आणि आणि जास्त कुणाच्या घरी जावू नये अशा नव्या धोरणामुळे मैत्रिणी सुद्धा फोनवरच भेटतात…अगदी तासंतास. आणि त्या झाडावरच्या चिंचा, बोरे पाडण्यासाठी तिथे आता झाडच नाही. साधा फेरीवाला पण आमच्या अलिशान सोसायटीत येवू शकत नाही … आणि मग आम्ही मुकतो तो उन्हाळी खाऊ. काय खायचे ते एखाद्या रविवारी हॉटेलमध्ये जावून खावून यायचे.कधी कधी हॉटेल छान वाटते पण त्यात ती मज्जा कशी असणार . इथे आईला साध्या जेवणाचे गणितच इतके किचकट वाटते तर मग हा पापड- लोणच्याचा थाट तर स्वप्नातही इथे दिसणार नाही. 

मावशी , तू म्हणते तशी उन्हाळी सुट्टी मला पण अनुभवायची आहे. मला गावचे शेत ,ते डोंगर,ती नदी , ती गावाकडची नाती ,ते चिंचेचे झाड हे सारे सारे खूप आवडते.मलाही कधी तरी अशी मज्जा करायची … अगदी मनसोक्त … अल्लड होऊन  महिनाभर बागडायचे… अभ्यासाचे  किंवा कोणत्याही क्लासचे टेंशन न घेता….पण आई म्हणते आपल्याला गावच नाही.  ही मुंबईच आपले गाव जिथे आता तुझ्या गोष्टीतल्यासारखे शहरपण उरले नाही.  आमचे खेळण्याचे मैदान सुद्धा आता फक्त आमचे म्हणून नाही बरे का . नात्यांचा तर दूरदूर आमचा हवा तसा संपर्कच  नाही . कधीतरी वाजणारा फोन हेच ते कुठेतरी अस्तित्त्वात असल्याचे निशाण.तुमच्या गावी आहे का अशी मज्जा…. अशी सुट्टी मिळेल का तिथे ? मग मलाही हा मे महिना हवाहवासा वाटेल अगदीतुझ्या एवढी मोठी होईन तेव्हाही … सांग न मावशी, आहे का असे गाव तुमचे…  ?"


त्या चिमुरडीचे बोलणे ऐकले आणि आम्ही दोघी मैत्रिणी एकमेकांकडे बघतच राहिलो.त्या छकुलीच्या प्रश्नांचे होकारार्थी उत्तर देण्यासाठी माझे गाव कुठे पूर्वीसारखे राहिले होते ?… ते गाव आज कुठेतरी हरवलेले होते आणि त्यासोबतच मुलांचा 'मे ' महिना.

- रुपाली ठोंबरे 


Blogs I follow :