Saturday, July 27, 2019

पलीकडची पैंजणेपांढरे पुंजके पिंजून पार पालटले
पहा, पावसाचे प्रेम पुन्हा परतले 
पंख पिवळ्याधम्म प्रकाशाचे 
पहाटेच पुसले पाण्याने परतुनी

परवापासूनची पिर पिर पावसाची 
पावलोपावली पहा पाणीच पाणी 
पाण्याने पूर्ण पुसल्या पाऊलवाटाही
परि पावसाला पाहून परिसर प्रसन्न

पहा, पवन पळतो पिसाळल्यागत
पागोळ्यांतले पाणी पिसे पाठोपाठ
पलीकडच्या पहाडांतले पांढरेशुभ्र पाझर
पळती पावले पहा, पळणाऱ्या पाण्यापाशी 

पानोपानी पिवळी-पोपटी प्राण-पल्लवी 
पुष्पांच्याही परड्या पहुडल्या पैठणीवरती 
प्रयाण पहा पशु -पक्ष्यांचे पाणवठ्यांवरती  
पसरला पिसारा प्रफुल्लतेचा पृथ्वीवरती 

पुस्तकातल्या प्रीतलतेच्या पंक्ती पांघरलेल्या 
पुन्हा पापण्यांतल्या पाण्यात पळभर पसरल्या 
पलीकडची पैंजणे पुढच्याच पावली पोहोचली 
परि, परिकथेतील पावले पूर्वीच पाण्याखाली पुसली 

-रुपाली ठोंबरे. 
    २६ जुलै 

Tuesday, July 16, 2019

गुरु

गुरु...म्हणजे ज्ञानाचा एक असा दिवा ज्यात शक्ती आहे हजारो दिव्यांना उजळण्याची. 
मग ते हजारो दिवे नवीन कोरे असो वा भूतकाळात काही कारणांनी विझलेले असोत 
अशा अनेकांना प्रकाशझोतात आणून भविष्य उज्ज्वल करण्याचे पवित्र कार्य 
प्रत्येक गुरूच्या हातून कोणत्या न कोणत्या कारणाने सतत घडत असते. 

गुरु....म्हणजे एक पूर्ण वर्तुळ, ज्ञानाच्या पुर्णत्वामध्ये विलीन झालेले
त्याच्या मार्गदर्शनामध्ये अनेक बिंदू स्वतःचा विस्तार करत आकार घेत असतात  
प्रत्येक बिंदुला ,प्रत्येक रेघेला , प्रत्येक आकाराला स्वतःचे विशेष गुण असतात 
पण तरी एक गुरु हवा असतो उद्याला स्वतः गुरु होण्यासाठी...पूर्णत्वप्राप्तीसाठी 

गुरु... म्हणजे या जगातला प्रत्येक अणू जो ज्ञान देण्यासाठी तत्पर असतो 
लहान -थोर , प्राणी-पक्षी, निसर्गातील प्रत्येक किमया , प्रत्येक घटना 
सारेच प्रत्येकाला रोज नवा धडा शिकवून जातात, काहीतरी देऊन जातात
एक दृश्य वा अदृश्य शक्ती, शंकांना दूर सारून जगायला शिकवणारी 


गुरूने निःस्वार्थी पणे देत जावे आणि शिष्याने कृतज्ञतेने सारे घेत राहावे…  असे असते गुरु -शिष्याचे नाते. 


- रुपाली ठोंबरे . 


Friday, June 28, 2019

काय चुकते नक्की ?


गेले २-३ दिवस आभाळ गच्चं भरून यायचं आणि प्रत्येकाला वाटायचं आता आपला पाऊस येणार. पण दोन-चार थेंबांसोबत एक-दोन सरी बरसायच्या आणि मग पुन्हा सर्व शांत-शांत , उदास-उदास. कंटाळा येऊ लागला होता आता तर त्यात भरीस भर म्हणून लख्ख पडणारं ऊन आणि तेही भयंकर उकाडा आणणारं. तर असा हा खेळ उगाच आकाशात दिवसातून दहादा तरी खेळला जाई. तशी काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. पण तो आपला पाऊस नव्हता. आता 'आपला' म्हणजे नेहमीसारखा जुन महिन्यातील ७ तारखेलाच थंड झुळूकेसोबत हळूच डोकावत हळूहळू वाढत जाणारा पहिला पाऊस... तो खरा आपला पाऊस. नाहीतर हा 'वायू'सोबत आलेला पाऊस! अचानक जोरदार वारे वाहू लागले आणि दुसऱ्याच क्षणी मुसळधार पाऊसच पाऊस ! तो देखील भयंकर ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासोबत.  ना मातीचा तो पहिला सुगंध अनुभवायला मिळाला ना अंगावर अलवार आलेली पहिली सर. एक पाऊल बाहेर टाकले आणि एका क्षणात चिंब अंघोळ. १-२ तास चालणारा खेळ अवघ्या १५ मिनिटांत समाप्त. असे असले तरी त्या पावसाची देखील मनसोक्त मजा लुटली आम्ही. पण एकदा मनात वाटले. बापरे ! पहिला पाऊस हा एवढा मोठ्ठा तर आता पुढे काय ? पाण्याने भरलेले रस्ते , बंद पडलेल्या लोकल्स एका क्षणात डोळ्यासमोर उभ्या राहिल्या होत्या. पण कसले काय अन कसले काय ? दुसरा दिवस उजाडला तो लख्ख प्रकाशात. आकाशात सूर्य चांगलाच झळाळत होता आणि दिवसेंदिवस उकाडा वाढत होता.


पण काल तो आला आणि चांगला रात्रभर बरसला.अगदी बालपणीचा पाऊस आठवून गेला. सकाळी उठले तर वातावरणात चांगलाच गारवा होता. ढगांची शाळा नुकतीच भरू लागली होती. सृष्टी कशी एकदम न्हाऊन गेली होती . निसर्गाचे हे असे रूप पाहायला मला नेहमीच आवडते. म्हणून अगदी उत्साहात ऑफिसच्या तयारीला लागले. नावासाठी पावसाची किंचित रिमझिम सुरु होती. अशी रिमझिम छत्रीशिवाय झेलायला मला नेहमीच आवडते. स्टेशनवर नेहमीचेच दृश्य पण तरी पावसाच्या आगमनामुळे सारेच थोडे वेगळे भासणारे. ट्रेन वेळेवर आहेत हे पाहून जरा बरे वाटले.तो एक खूप मोठा दिलासा असतो. थोडी गर्दी होती पण बऱ्यापैकी दरवाज्यापाशी उभे राहण्याची संधी मिळाली. मला आज हेच हवे होते. धावत्या गाडीसोबत पळणारी झाडे , इमारती पाहायला एक वेगळीच मज्जा असते. हवेतला गार वारा झेलत माझी नजर त्या नुकत्याच न्हाऊन निघालेल्या सृष्टीचे नवतारूण्य पिऊन घेत होती. हिरवीगार झाडे पाण्याने धुवून निघून गेल्याने आणखी तरुण भासत होती. एका दिवसात काही लगेच इतकी हिरवळ जन्माला आली नव्हती पण आहे ती अशी धुवून निघाली आणि लक्ष वेधले गेले इतकेच. भरलेल्या आभाळात अशा हिरवळीसोबत धावणारे आगगाडीचे रूळ ... एक सुंदर निसर्गचित्र.
पण आज या चित्राने मी नाराज झाले . त्या रुळांमधल्या जागेत गाडीच्या वेगासोबत धावताना दिसत असणाऱ्या खडीच्या राशी पार कचऱ्याने झाकल्या गेलेल्या आणि त्यामुळे रुळांचे ते सौन्दर्य कुठेतरी पुसल्यासारखे वाटले. रिकामे चहाचे कप , चुरगळलेले कागद , प्लॅस्टिकच्या पिशव्या वरून या सर्वांमुळे तुंबलेले पाणी... या सर्वामुळे तो परिसर गलिच्छ वाटू लागतो. पुढे जसजसे स्टेशन जवळ येऊ लागले हा कचरा कमी झाल्यासारखा जाणवला स्टेशनवरच्या रुळांवर बऱ्यापैकी स्वच्छता पण स्टेशन मागे पडले आणि पुन्हा त्या अस्वच्छतेचे प्रमाण वाढत गेले. पुढचे स्टेशन आले आणि गेले. पुन्हा तेच. असे का असेल याचा विचार न राहवून मनात येत राहिला आणि उत्तरेही मीच माझी शोधू लागले. स्टेशन्सवर साफसफाई करणारे कर्मचारी अधिक असतात म्हणून ? स्टेशनवर कचरापेट्या अधिक असतात आणि मधल्या प्रवासात त्यांची कमी निर्माण होते म्हणून ? कि मग माणसांची मानसिकताच कुठेतरी चुकत असते ?असे एक ना अनेक प्रश्न मनात उदभवलेले असताना मी माझ्या ठरलेल्या स्टेशनवर उतरून बाहेर निघाले. पुढचा रिक्षाचा प्रवास सुरु झाला. डावीकडे मेट्रोच्या कामामुळे बंद झालेला अर्धा रस्ता आणि उजवीकडे रोजचाच पदपथ पण आज तिथल्या गोष्टी मनाला खटकू लागल्या. जागोजागी असलेले खड्डे आणि अधेमध्ये असलेले फेरीवाले... ते सर्व मुळी आपल्या हातात नव्हेच परंतू तिथे जमा होणारा कचरा मात्र आपल्यापैकीच अनेकांमुळे होत असेल ना ? चॉकलेटचे कव्हर , चुगळलेली कागदे ,प्लॅस्टिकच्या पिशव्या पावसामुळे अधिक घट्ट होऊन बसतात. अशाच नको त्या कचऱ्यामुळे रस्त्यावरून गटारांमध्ये वाहणारे पाणी अडले जाते आणि मग रस्त्यावर काही तासांत पाण्याचा पूर येतो.पाणी वरून सतत येत राहते परंतू ते जाण्यासाठीच्या वाटा बंद झालेल्या असतात आणि मग काय ? सगळीकडे नुसते पाणी पाणी. आणि मग हाच हवाहवासा वाटणारा पाऊस तासाभरात नकोसा होऊन जातो . हे सर्व विचार मनात चालू असतानाच शेजारीच बसलेल्या मुलीने तिच्या पर्स मध्ये नको असलेली फाटलेली पिशवी एकदा तपासून जाणून बाहेरच्या दिशेला भिरकावली. ती पिशवी भिरभिर करत उडत जाऊन अशाच एका आडोश्याला थांबलेल्या कचऱ्यात जाऊन बसली.टापटीप एकदम चांगली मुलगी वाटत होती ती तर . पण तरी असे वर्तन ? मी एक तीक्ष्ण नजर तिच्यावर टाकली .मी काही बोलण्याच्या आत ती स्वतःच उत्तरली ," चुकून झाले". पण चुकून तरी अशी चूक का व्हावी ना ? हा माझा प्रश्न होता. पण त्या तिथे वाद घालण्यात अर्थ नव्हता  हे अगदी १-२ मिनिटांच्या संवादातून मला कळून चुकले. त्यावेळी तिच्या मानसिकतेबद्दल किंव आली.पण अशा लोकांच्या बाबतीत काही करू शकत नाही हे मात्र खरं.तिला नको असतानाही तिला उपदेशाचा एक डोस मी पाजला होता पण त्याचा किती उपयोग होईल हे तिलाच ठाऊक. मनात आले , आपण झाडांची नको इतकी कत्तल करत असतानाही निसर्ग आपल्याला आभाळभर पाऊस देतच असतो. तो इतके काही करतो, देतो आणि आपण साधे त्याला योग्य वाटही मोकळी करू शकत नाहीत. समोरच्या पदपथावर गालिच्यासारखी फुले बरसली होती, ती तशीच भिजत राहिली होती. त्यावर एक रिकामा चहाचा पाण्यावर तरंगू लागला होता. ही अशी असंख्य दृश्ये आणि ती निर्माण करणारी माणसे यांची सोबत करत मी ऑफिसच्या गेटपाशी थांबले. ती मुलगी जवळच्याच वडापावच्या गाडीवर जाऊन ऑर्डर देऊ लागली. वडापावसोबत मिळालेल्या कागदाला पाहून मनात म्हटले कि हा कागद तरी आत योग्य ठिकाणी जावा म्हणजे केलेल्या उपदेशाचा फायदा होईल.

मीही गोदरेज आय टी च्या गेटमध्ये शिरले. तिथली हिरवळ पूर्ण अर्थाने नटली होती. फुलपाखरे स्वच्छंद भिरभिरत होती. रस्त्यावर , रस्त्याच्या कडेला कुठेच इतकासा कचरा सुद्धा नजरेस पडला नाही. असे का असेल याचा विचार न राहवून पुन्हा एकदा  मनात आला आणि  त्याची उत्तरेही माझी मीच पुन्हा शोधू लागले. इथे साफसफाई करणारे कर्मचारी अधिक असतात म्हणून ? रस्त्यावर कचरापेट्या अधिक असतात आणि मधल्या प्रवासात त्यांची कमी निर्माण होते म्हणून ? कि मग माणसांची मानसिकताच कुठेतरी चुकत असते ?


- रुपाली ठोंबरे. 

Wednesday, April 10, 2019

डॉट टू डॉट


'केंद्रबिंदू गवसल्याशिवाय परिघाचे वर्तुळ हाती लागत नाही.'
शाळेत असताना मराठीच्या पाठयपुस्तकातील ही एक ओळ, आजही मनात तशीच्या तशी ठसठशीत उमटलेली आहे. 'स्वरूप' पहा म्हणजे विश्वरूप आपोआपच दृष्टीक्षेपात येईल हा विचार मनावर बिंबवत असताना बिंदू आणि वर्तुळ या दोहोंचा केलेला योग्य वापर त्या विशिष्ट आकाराची व्याप्ती मनाच्या गाभाऱ्यात बिंबवून जातो. या विश्वातील प्रत्येक उत्पत्ती ही एका बिंदूपासून झालेली आहे मग तो बिंदू गर्भाच्या मूळ अस्तित्वाइतका सूक्ष्म असू शकतो किंवा सुर्याइतका प्रचंड. आणि त्या जन्मापासूनच सुरु होतो एक प्रवास ज्याला आपण जीवन म्हणतो. त्या प्रवासात जे जे दृष्टीस दिसले वा न दिसले ते सारे मला या आकारातून अनुभवायला मिळाले आणि म्हणूनच ते सर्व मांडण्यासाठी हा बिंदूच सर्वार्थाने सक्षम असेल असे माझ्या मनातील वलयांकित आवर्तनांनी पुन्हा पुन्हा सांगितले आणि बिंदूपासून सुरु झालेला लाखो बिंदूंचा प्रवास सुरु झाला. बिंदू म्हणजे एक अस्तित्व , मग ते अगदी डोळ्यांना न दिसण्याइतपत सुक्ष्म असू शकते किंवा बुद्धीला कल्पनाही करता येणार नाही इतके विशाल आणि अमर्याद असू शकते. आणि याच बिंदूंचे एक रूप म्हणजे वर्तुळ... त्रिज्येच्या शिस्तीत बंदिस्त असलेला एक आकार जणू  असंख्य बिंदूंची एकसलग मालिकाच , दोन विश्वांना पूर्णपणे विलग करणारी आणि तरीही स्वतःच्या केंद्रबिंदूपर्यंत पोहोचण्यास सक्षम असणारी. हा बाजूविरहित आणि कोनरहित आकार अगदी बालपणापासून आयुष्यात प्रत्येक वाटेवर त्याच्या वेगवेगळ्या स्वरूपांत येत गेला आणि प्रत्येक वेळी त्याच्याबद्दलची कुतूहलता नव्याने वाढत गेली.त्याचा वेगवेगळ्या रूपांत घेतलेला अनुभव आज माझी कला साकारत असताना पूरक ठरत असल्याचा प्रत्यय काम असताना वेळोवेळी येत गेला. आकाशातले तारांगण मला माणसामाणसात जाणवू लागले आणि तेच आज माझ्या हातून कागदांवर उतरले. सुख-दुःख , अनुभव, क्षण हे सर्व कागदावर मांडण्यासाठीचे माझे एकमेव माध्यम म्हणजे ठिपके... काळे . पांढरे , पारदर्शक,अपारदर्शक,रंगीत , लहान, मोठे, पोकळ, भरीव असे नाना तऱ्हेचे. ते सारे शाईच्या प्रवाहातून कागदावर सांडतात आणि माझ्या मनातल्या कल्पनांना आकार देऊन दृश्यरूप प्राप्त करून देतात. 

मुलाच्या हातातला बॉल, गोट्या पाहिल्या आणि बालपणीच्या विश्वात नकळत शिरले. बालपणी हातात पडणारे पहिले आणि पुढेही कितीतरी काळ आवडीचे बनलेले खेळणे म्हणजे चेंडू आणि तेव्हापासूनच या गोल आकाराशी गट्टी जमलेली. स्पर्शाने त्याची एक ओळख आणखी घट्ट होत गेली. त्यानंतर शाळेची पायरी चढल्यावर शिकवताना जरी रेषेपासून सुरुवात केलेली असली तरी पेन्सिलने घेतलेल्या गोलाकार गिरकीने काढलेला आकार मनाला अधिक भावला. नंतर थोड्याच कालावधीत ओळख झाली शून्याशी.आणि आज तोच  शून्य आयुष्यासाठी महत्त्वाचा भाग बनून सोबत राहिला. कोणाचीही किंमत कमीअधिक करण्याचे सामर्थ्य या शून्यात असते हे कळू लागले आणि तिथूनच त्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. या शून्यातूनच विश्वाची निर्मिती होऊ शकते हा विचार मनात ठासून भरला. डोळ्यांतील बुब्बुळे, भूगोलातील ग्रह- उपग्रह, विज्ञानातील अणू- रेणू, इतिहासातील कालचक्रे या सर्वांमध्ये या आकाराचे नवे रूप दिसू लागले. भूमितीच्या वहीत रेखाटलेल्या आकृत्यांमुळे वर्तुळ हे उत्तम रचनाकृतीचा भाग म्हणून समोर आले. बिंदू, वर्तुळे, गोल यांच्या योग्य वापरातून किती सुंदर कॉम्पोजिशन्स तयार होतात हे निदर्शनास आले.याच रचना आज चित्र होऊन नव्याने आयुष्यात आल्या आहेत. त्या साकारताना रंगाने भरलेला एक ठिपकादेखील किती सुंदर असू शकतो हे प्रामुख्याने जाणवले आणि डॉट चे एक वेगळे स्थान मनात निर्माण झाले.शालेय आयुष्यात नवा वर्ग , नवा अभ्यास आणि शेवटी परीक्षा अशी अनेक चक्रे यशस्वीरीत्या पूर्ण करत आयुष्याने एका नव्या रिंगणात उडी घेतली. नोकरीचे रिंगण म्हणजे कुठेही न थांबता दिवसरात्र भिरभिर घेत राहिलेल्या गिरक्याच जणू. नोकरी तेल उद्योगातील असल्याकारणाने माझा आवडता डॉट तेलाचा थेंब बनून नव्याने आयुष्यात आला. तेल विहिरींच्या योजना करत असताना लक्षात आले कि विहिरीचा आकार, त्यांचा प्रारंभ आणि लक्ष्य ,त्यांची रचना , त्यांच्या मोजमापांची प्रमुख माध्यमे ही सर्व कुठेतरी मनातल्या आकारांशी मेळ घालू लागली.सॉफ्टवेअर मध्ये 'मुंबई हाय' सारख्या विस्तृत क्षेत्रातील तेलविहिरी जेव्हा वरून एकत्र पाहिल्या जातात तेव्हा ते सर्व दृश्य तारांगणाशी अगदी अचूक जुळत होते. प्रत्येक नक्षत्राची एक वेगळीच रचना, वेगळाच विस्तार. हे सर्व मनात इतकी वर्षे साठून होते. आकाशातील आणि पृथ्वीवरील सर्व तारांगणे मनाच्या अवकाशात भावनांची , विचारांची नक्षत्रे रचू लागली आणि विचारांना नवी दिशा मिळाली.नव्या कल्पनांचा उदय झाला. या विचार आणि कल्पनांना लेखणी आणि रंगांची जोड लाभली, विचार आणि कल्पना एकमेकांत गुंफून जात सर्व दिशांनी फुलू लागल्या आणि कोऱ्या कागदांवरती तारांगणे आकार घेऊ लागली.नक्षत्रांच्या अशा अनेक रचना हा माझ्या चित्रांचा एक महत्त्वाचा भाग आहे. मनात उमटणाऱ्या कल्पना ठिपक्यांचे रूप घेऊन इअरबड्स किंवा नाजूक काड्यांच्या साहाय्याने,रिकाम्या बाटल्यांच्या झाकणांनी काळ्या कागदावर पसरल्या. खरेतर इथे माझ्या चित्रांच्या बाबतीत काळा कागद म्हणणे चूकच होईल. कारण या चित्रांतील पार्श्वभूमी जरी काळी दिसत असली तरी या चित्रांमध्ये काळा कागद अजिबात वापरलेला नाही. याउलट, पांढऱ्या शुभ्र कागदावर जलमिश्रित विविध रंगांच्या शाईचे पंधराहूनही अधिक हलके थर एकमेकांवर देऊन निर्माण होणारा हा निसर्ग रंग आहे. त्यावर मनातील सकारात्मकता ,मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, नाना विचार सडा पडावा तसे अंथरले गेले आणि एकेक चित्र वेगवेगळ्या कल्पना दर्शवत पूर्ण झाले. जसजसा मनातील खजिना हा असा कागदांवर रिता होऊ लागला तसतशी सर्व ज्ञानेंद्रिये सतर्क होऊन आसपासच्या जगातील अनुभव पिऊन घेण्यास आतुर झाली.

एकदा असाच एक आलेला अनुभव इथे नमूद करावासा वाटतो. घरात लहान मूल म्हटले कि अनेकदा स्वयंपाकघरातील ताट, वाट्या, पेले सारे बाहेर हॉल मध्ये आलेले असतात.एकदा हाच पसारा आवरत असताना या भांड्यांच्या मांडणीने लक्ष वेधले. कमी अधिक व्यासांच्या त्या चकचकीत वर्तुळांनी केलेली ती सुंदर रचना त्याच क्षणी माझ्या मनात चित्र आकारू लागली . कालवशतेमुळे नेत्रज्योती मालवून गेलेल्यांच्या आयुष्यात ज्ञानसूर्य बनून आलेली ब्रेल लिपी पाहिली आणि फिरत असलेली विचारांची चक्रे डोळ्यांच्या बाहुलीत येऊन स्थिरावली, जीवनचक्रामध्ये फिरत असताना येणाऱ्या संकटांवर मात करत सकारात्मकतेने पुढे चालत राहण्याचा ध्यास, नात्यांतील अनुबंध अशा एक ना अनेक आयुष्यात जुळून येणाऱ्या गोष्टी ज्यांच्या अनुभवांतून कल्पनेचा विस्तार होत गेला आणि त्या कागदावरती चित्ररूप होत गेल्या. विचार चित्रांत रचत असताना अशा प्रकारे मांडलेले आहे कि पाहणाऱ्याला त्यात अनेक वेगवेगळ्या कथा दिसू लागतील. जसे माझे एक चित्र आहे जे पाहताक्षणीच वाढत जाणाऱ्या चंद्रकलांचा महोत्सव वाटेल पण त्यामागचा विचार हा केवळ चंद्राचे विविध रूपातील दर्शन घडवणे हा नसून त्या प्रत्येक रूपामध्ये प्रत्येकाची आयुष्यातील एक विशिष्ट अवस्था आहे. पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण असतो आणि त्याचे सौन्दर्य अप्रतिम असते यात शंकाच नाही परंतु त्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण होणाऱ्या चंद्रकोरीच्या प्रवास हा सुद्धा सुंदरच मानला पाहिजे. इथे सांगायचे तात्पर्य असे कि आज एखाद्याकडे जरी सर्व काही नसले किंवा काही गोष्टी अपूर्ण असल्या तरी ते जीवन निरर्थक कधीच नसते. त्या अपूर्णतेतही उदयाला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, उत्साह असतो जो आयुष्यातील त्या प्रसंगालाही सुंदर बनवतो. एकदा का प्रयत्नांच्या जोडीने संकटांवर मात करत सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधणे रक्तात भिनत गेले कि मग पहा तोच माणूस चंद्रकोरीप्रमाणे वाढत पूर्णत्त्वाकडे पोहोचतो. फक्त आयुष्यातील प्रत्येक क्षण हा सुंदर आणि काहीतरी देणारा नक्कीच असतो हे खऱ्या अर्थाने मान्य  केले पाहिजे.त्यासाठी स्वतःवरचा विश्वास दृढ असला पाहिजे. अशाप्रकारे,दृश्य अनुभवांसोबतच अदृश्य अनुभवांना मांडण्यासाठी जेव्हा ही वलये एकत्र आली तेव्हा आलेला अनुभव हा आत्मिक समाधानाचा होता. मन , मनातील गुंतागुंत , मनात निर्माण होणारी पोकळी , सुटत असलेला गुंता, नात्यांमध्ये गुंतलेल्या भावना, आयुष्यातली ओढाताण, त्यातून शेवटी उदयास येणारे आनंदाचे क्षण हे सर्व जाणवत असते पण त्यांना जगासमोर मांडणे...  एखादा विचार , त्या भोवती फिरणारे विचारचक्र , त्यातून निर्माण होणारे सकारात्मक आणि नकारात्मक विचार, त्यांचा पडणारा प्रभाव या सर्वाना चित्ररूप देणे खरेतर अवघडच, पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणत केलेल्या आवर्तनांमुळे परिवर्तन हे घडतेच आणि त्यातूनच अशक्य ते शक्य होते.

'मी' या बिंदू पासून सुरु झालेला क्षणांचा प्रवास म्हणजे जीवन ज्यात अपरिपक्वतेपासून परिपक्वतेकडे प्रत्येकजण जात असतो. वरवरून केवळ रंगहीन वाटणारा गोळा जेव्हा प्रयत्नांच्या आवर्तनांनी तडकतो तेव्हा त्यातून रंगांचे कारंजे दृष्टीस पडते. आता त्या बिंदुला... वर्तुळाला... गोलाला  एक नवे आयुष्य प्राप्त होते. एक नवा अर्थ निर्माण होतो. अशाच अदृश्य भावनांचे दृश्य रूप म्हणजे माझी चित्रे आणि असा हा अशक्य वाटणाऱ्या रंगहीन बिंदूचा उच्च स्थळी पोहोचलेल्या , रंगांत भिजून आनंदाने चिंब झालेल्या गोलाचा प्रवास आहे ... डॉट टू डॉट.

मुंबईमधील वरळी येथील नेहरू तारांगणात रोज करोडो ताऱ्यांचा खेळ सुरु असतो. आता त्यासोबतच येत्या १६ एप्रिल ते २२ एप्रिल या दरम्यान आणखी एक आगळावेगळा ताऱ्यांचा खेळ रंगणार आहे नेहरू तारांगणापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नेहरू आर्ट गॅलरी मध्ये. पण या ठिपक्यांच्या तारांगणात नेत्रसूख देणारी नक्षत्रे असतील माझ्या कल्पनांची आणि सकारात्मक विचारांची ज्यांची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे नक्कीच एक सुंदर प्रवास असेल शून्यापासून पुर्णत्वापर्यंतचा.- रुपाली ठोंबरे.

Tuesday, March 19, 2019

संवेदनांची आवर्तने
काल जहांगीरमधल्या एका कलादालनात मेळ झाला...रंगांचा आणि रेषांचा. या रंग-रेषांच्या आवर्तनांतून उमटणाऱ्या स्पंदनांचा आणि त्यांतून जाणवणाऱ्या संवेदनांचा तो एक अनोखा खेळ होता.

कॉमामॅन म्हणून प्रसिद्ध असलेले चित्रकार अशोक हिंगे यांच्या चित्रांची एक अनोखी दुनिया त्या दालनात अतिशय रचनात्मक पद्धतीने उभी राहिली होती. आणि आम्हांला या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून हे सर्व कलाविष्कार अगदी जवळून अनुभवण्याची संधी प्राप्त झाली हा एक सुवर्णयोग जो काल  संध्याकाळी जुळून आला. 

कितीतरी दिवसांपासून प्रसारमाध्यमांमधून या प्रदर्शनाबद्दल, त्यातील चित्रांबद्दल पाहिले आणि वाचले होते. एका स्वल्पविरामानंतर रेषांचा एक नवा अध्याय अशोक सरांच्या जीवनात सुरु झाला होता. अधूनमधून या रेषांबद्दलची त्यांची मते वाचण्यात येत गेली.

 'चांगल्या विचारांच्या रेषा एकत्र आल्या कि चित्र नक्कीच बदलते '
 ' दिवस तटस्थ होऊन फिरणाऱ्या रेषा,रात्री एकमेकांमध्ये गुरफटून पडतात.'
 ' रेषा चालतात , स्वल्पविराम घेतात ,आकार होतात ,पुन्हा स्वल्पविराम घेतात , रंग त्यांना भेटतात आणि मग सुरु होतो चित्राचा प्रवास .'
 
रेषांबद्दलच्या अशा या कल्पनांमुळे नकळतच माझ्याही विचारांना चालना आली. आणि या चित्रांबद्दलची उत्सुकता वाढू लागली. मूळ चित्रातला प्रदर्शित केलेला एखादा छोटासा भाग देखील मनाला त्या क्षणी गुंतवू पाहू लागला होता. आणि या चित्रांना समजून घेण्याची एक वेगळीच उत्सुकता मनात निर्माण झाली होती. काल ही पाहिलेली आणि वाचलेली चित्रे प्रत्यक्षात अनुभवली आणि एक खूप वेगळी संवेदना मनात उमटली.

अशोक सरांची ही चित्रे म्हणजे रेषा आणि त्यांच्या रचनांतून होणाऱ्या विविध आकारनिर्मिती आणि त्यानंतर रंगांसोबत मिसळल्या गेलेल्या याच कलाकृती निर्माण करणाऱ्या रेषा. आडव्या रेषा... तिरप्या रेषा... उभ्या रेषा ... एकमेकांना आलिंगन देत मिसळलेल्या रेषा... एकमेकांपासून विभक्त होत दुरावलेल्या रेषा... नाजूक रेषा...कठोर रेषा... विरळ, हलक्या रेषा....दाट, गडद रेषा... रेषाच रेषा... अस्ताव्यस्त पसरलेल्या तरी एका रचनेला अलंकारित करणाऱ्या आकारीत रेषा.... आणि त्यात रंगांची भर पडता क्षणी सुरु झालेला तो  रंगछटांचा ऊन-सावल्यांचा खेळ.... आणि या सर्वांतून निर्माण होणारी स्पंदने, अलवार तरंगे जी चक्षूस्पर्शांनी मनाला भिडतात आणि थेट छेडू पाहतात हृदयाच्या तारा... त्यातून जाणवते एक नवी समाधानकारक भावनांची अनुभूती. या रेषांच्या, रंगांच्या अवकाशामध्ये जितके खोलवर जाल तितके स्वतः हरवले जाल..... हे सर्वच अप्रतिमच. संवेदनांच्या जगामध्ये अशाप्रकारे हरवून जाण्याचा अनुभव सुद्धा विलक्षणच, नाही का?

- रुपाली ठोंबरे
 

Tuesday, February 19, 2019

तूच... अभिमान माझा

सुवर्णाक्षरांनी कोरलेला दिवस आजचा 
पुन्हा उजळून यावा कडेकपारींतूनी
लक्ष सूर्यापरी प्रखर तेजस्वी शिवराजा
जन्म घेऊनि यावा पुन्हा भरतभूगर्भातूनी 

परकीय आक्रमणे आणि घरांतली भांडणे
यात अजूनही पूर्ण गुंतलेला आहे देश हा
म्हणूनच आज प्रत्येक मावळ्याची इच्छा
तोच राजा तेच छत्र पुन्हा मस्तकावर हवे

------------------------------------------------------------------- 

प्रखर तेजस्वी शिवकल्याणराजा 
तूच शिकवण... अभिमान माझा 

वर्षांपूर्वी शिवजन्माने भारतभूमी ही 
धन्य धन्य जाहली 
अन्यायांच्या धर्तीवरती मूर्ती थोर ही 
संजीवन ठरली 

पेटत्या वणव्यांमधुनी घेऊन ज्वाळा
लक्ष ज्योती जन्मल्या 
देशासाठी प्राण अर्पूनि साऱ्या 
धन्य धन्य झाल्या 

वीरज्योती अशा पवित्र भारतमातेच्या 
शिवराज्यातही जाहल्या 
शहीद होऊन तिरंग्यात लपेटणाऱ्या 
आजही अमर झाल्या   

सैनिक... त्यागाचे एक प्रखर रूप 
देशासाठी जगून रोज मरणारे
प्रत्येक नागरिकांच्या श्वासासाठी
वेळप्रसंगी मरून जगणारे 

अशा वीर-जन्मांनी भारतभूमी ही 
धन्य धन्य जाहली 
अशाच वीरपुत्रांमुळे भारतभूमी ही 
आज समर्थ ठरली. 

प्रखर ओजस्वी सैनिक तू देशाचा 
तूच रक्षक... अभिमान संपूर्ण देशाचा
 
------------------------------------------------------

प्रत्येकवेळी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून
देशासाठी प्राणांची बाजी लावणारे
अजूनही कितीतरी मावळे सैनिक बनून
त्या भारतसीमेवर अहोरात्र उभे आहेत

एक नेतृत्व शिवरायांसारखे पुन्हा जन्मावें
परकीय आक्रमणांना धडा शिकवणारे
आणि
प्रसंगी चुकणाऱ्या जनतेला मार्ग दाखवणारे
त्यासोबतच गरज आहे स्वतःच्या मानसिकता बदलाची
'भारत माझा देश आहे. आणि माझे माझ्या देशावर प्रेम आहे '
हे मनापासून बोलले आणि कृतीतून घडवून आणून दर्शवून देता आले पाहिजे

आपले रक्षण करणाऱ्या त्या प्रत्येक जवानाला मानाचा सलाम !!!
भारतभूमीच्या आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी जीवनाची बाजी लावणाऱ्या प्रत्येकाला आदरपूर्वक श्रद्धांजली. 

- रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :