Thursday, October 29, 2015

जोपासा कल्पक विचार

" जोपासा कल्पक विचार " हे शिर्षक वाचून 'कल्पक विचार' म्हणजे नक्की काय ? असा प्रश्न नक्कीच मनात निर्माण झाला असेल. तर ' कल्पक विचार' म्हणजे एखाद्या गोष्टीकडे नव्याने, सुधारणेच्या भावनेतून पाहण्याचा दृष्टीकोन.…. नवे काही निर्माण करण्याची आपल्या प्रत्येकात असलेली एक खास क्षमता.… जणू अशक्य ते शक्य करण्यासाठी मनात उडणारे योग्य नव कल्पनांचे कारंजेच….

 तर आता तुम्ही म्हणाल ," म्हणजे ही कल्पकता फक्त चित्रकार,मूर्तीकार,लेखक अशा कलाप्रेमी लोकांकडे किंवा शास्त्रज्ञ,अभियंत्यातच असेल. पण नाही. एखाद्या साध्या अगदी रोजच्या जीवनातील कोणत्याही समस्येचे निवारण करण्यासाठी वापरलेली एखादी नवी कल्पना …. जसे तुटपुंज्या पैशांत महिनाभर घर चालवण्याचे  एका गृहिणीचे गृह्कौशल्य, योग्य आराखडा आखून एखाद्या शहराचे नूतनीकरण करण्याची एखाद्या मंत्र्याची कार्यक्षमता,लहान मुलाला चांगल्या उपक्रमात व्यस्त करण्याची कलाशैली, स्वतःच्या आणि इतरांच्या सोयीसाठी केलेली दर्जेदार नोंदणी किंवा एखाद्या ग्राहकाला केलेली अशक्य वाटणारी विक्री हे  सर्व एक प्रकारचे कल्पक विचारच आहेत .

पण प्रत्येकात जरी ही कला अवगत असली तरी तिला योग्य वाट करून देण्यासाठी एखादी अशक्य गोष्टही आपण करू शकतो असा दृढ विश्वास आपल्या ठायी असला पाहिजे. एकदा का ' हे मी करू शकतेच ' असे मनाला ठामपणे सांगितले की त्याची पूर्तता करणारे अनेक कल्पक विचार मनात डोकावू लागतात. आणि त्यातूनच सर्वोत्तम मार्ग शोधून काहीतरी नवनिर्मिती नक्कीच होते.

याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर कित्येकांना घर, नोकरी सांभाळताना काही नवे शिक्षण घ्यायची इच्छा आणि संधी असूनही ते वेळ मिळत नाही असे कारण सांगताना आढळतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे , जेव्हा आपण एखादी गोष्ट अशक्य आहे असे म्हणतो तेव्हा आपले मन आपले हे वाक्य कसे अचूक आहे हे सिद्ध करण्याच्या मागे पडते आणि शेवटी हाती अपयशच येते याउलट जर हे शक्य आहे असे म्हणाल तर नक्कीच नवे मार्ग सापडतील…वेळ मिळत नाही म्हणणाऱ्याना वेळेचे नियोजन करून वेळ उपलब्ध करून घेण्याचे नवे उपाय सुचतील.

यासोबतच जुन्या विचारांत रुतलेले मन हा कल्पक विचाराच्या जडणघडणीत असलेला सर्वात मोठा शत्रू आहे. कारण जोपर्यंत आपण जुन्यातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत नव्या कल्पनांना वाट मिळणार नाही. एखाद्या नव्या कंपनीत नव्याने रुजू झालेला जर त्याची जुनी कार्यशैली वापरण्याचा प्रयत्न करत असेल तर काही अंशी चुकीचे परिणाम पहावयास मिळतील. याउलट जर नव्या ठिकाणची कार्यपद्धती, उपलब्ध नोकरवर्ग, यंत्रणा या सर्वांचा मेळ घालणारी नवी कल्पना आणि त्यातून सुरु झालेली कार्यपद्धत अंमलात आणली तर नक्कीच यशापर्यंत पोहोचण्यास यशस्वी ठरेल.

लोकमान्य विचारांपेक्षा आपले विचार नेहमी प्रगत ,विकसनशील असावे यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील असावे. मग चला तर…अगदी आजपासूनच जुन्या विचारांच्या काळोखामुळे खोल मनात कुठेतरी दडलेल्या,कधीतरी सुचलेल्या किंवा आताही सुचणाऱ्या नव्या अशक्य  कल्पना कागदावर उमटवून, योग्य पडताळणी करून जगाच्या प्रकाशात साध्य करू…आणि यशस्वी होऊ.- रुपाली ठोंबरे

Sunday, October 25, 2015

"कृती नष्ट करी भीती "

प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती असतेच. एकदा एकाने सांगितले ,
खरेतर भीती नसतेच. ती म्हणजे आपल्या मनाची फक्त एक नकोशी वाटणारी कल्पना असते. पण मला वाटते भीती खरोखर अस्तित्वात असते. तिचे अस्तित्व आपण अनुभवू शकतो… भीतीने खंगत चाललेली तब्येत, विविध आजार , जेव्हा बोलावेसे वाटते तेव्हा नेमकी अनुभवास येणारी शांतता ही सर्व भीती दर्शवणारी चिन्हेच आहेत.

भीतीमुळे माणसाला होणारा सर्वात मोठा तोटा म्हणजे खचत जाणारा आत्मविश्वास. खरोखरच भीती ही मनुष्याला लाभलेली एक मोठी नकारात्मक शक्ती आहे.…माणसाला जीवनात जे हवे ते मिळवण्यापासून परावृत्त करणारी. ही एक प्रकारची मानसिक नकोशी वाटणारी गोष्ट आहे.आणि या शक्तीला योग्य पद्धतीने वेळीच आवर घातला नाही तर ही पुढे त्रासदायक आणि तितकीच धोकादायक बनेल यात शंकाच नाही.

भीती नाहीशी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपाय म्हणजे त्या भीतीशी संबंधित कृती अंमलात आणा . जेव्हा आपण एखाद्या समस्येत अडकतो तेव्हा जोपर्यंत आपण त्यावर एखादा पर्याय शोधून त्याची अंमलबजावणी करत नाहीत तोपर्यंत आपण असंख्य प्रकारच्या प्रश्नांनी वेढलेलो असतो. परंतू एकदा का 'सर्व ठीक होईल' अशी सकारात्मक आशा बाळगून योग्य तो निर्णय घेऊन त्यादिशेने पाऊले टाकली की अर्धी लढाई जिंकलोच. आणि उरलेली अर्धी … टाकलेले पाऊल यशस्वीरित्या पार पडल्यानंतर.पुढे हीच यशस्वी खेळी आणखी मोठे पाऊल उचलण्यास प्रोत्साहित करतात आणि अशाच प्रकारे आपल्यात प्रगती होत जाते. आणि सुरुवातीला वाटणारी भीती कधी गायब झाली हे आपले आपल्यालाच कळत नाही.

पण यासोबतच एक लक्षात ठेवा, कोणताही निर्णय घेताना उद्भवणारे अनमान, दुविधा, दिरंगाई हे भीतीवाढीसाठी घातलेले खतपाणीच ठरते. म्हणून योग्य निर्णय घेणे जितके महत्त्वाचे तितकीच तो घेण्यासंबंधीची तत्परता मोलाची.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अनेकांना गाडी चालवण्याचे भय असते. पण फक्त मला भीती वाटते म्हणून मी हे करू शकत नाही असे म्हणून अंग झटकले की आयुष्यात खरेच कधीच आपण ड्रायव्हिंग करू शकणार नाही हे आपण स्वतःच सिद्ध करून दाखवतो. अनेकांना उंचीचे ,पाण्याचे ,काळोखाचे भय असते. आणि त्या भयाला सतत एक सबब म्हणून पुढे करता करता आपण ती भीती आणखी खोलवर रुजवत जातो. हे नाही म्हटले तरी एक अयशस्वी माणसाचे लक्षण आहे. 

पण याउलट एक सकारात्मक जिद्द मनाशी बाळगून या भीतीचे कृतीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला की योग्य मार्गदर्शन, एकाग्रता, सकारात्मक दृष्टीकोन आणि नवे काही शिकण्याची चिकाटी या सर्वाच्या सहाय्याने नक्कीच माणूस कधीतरी यशस्वी होऊ शकतो. आणि मग यशाची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पडली की दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचण्यास आपल्यातला नव्याने जन्मलेला आत्मविश्वासच मदत करतो. अशा रितीने एक ,दोन ,तीन … अगदी शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर पूर्वी वाटणाऱ्या त्या बलाढ्य भीतीचे अस्तित्वच नष्ट होते…आणि उरतो तो एक नवा ताजा आत्मविश्वास….- रुपाली ठोंबरे 


Friday, October 23, 2015

देवी सिद्धीदात्री

दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे.अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत. देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.  दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सर्व सिद्धिदायिनी तूच नवमं दुर्गाशक्ती
प्राप्ती ब्रम्हांडविजयाची, करता तुझी पूजाभक्ती

तुझ्या सिद्धीप्राप्तीनेच शिवा लाभले देवीकलेवर
अष्टसिद्धी करुनी धारण शिव तो अर्धनारीनटेश्वर

सिंहावरी कधी कमलासनी तू चार भूजाधारी
शंख-चक्र-गदा हस्ते तू देवी कमळ पुष्पधारी

तुझी कृपा दूर करी दुःख, सुखदात्री तू ,दावी मोक्षाची वाट
देवी सिद्धीदात्री, नवरात्राअखेर असतो तुझाच मोठा थाट

- रुपाली ठोंबरे 
प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Thursday, October 22, 2015

देवी महागौरी

दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी होय. दुर्गापूजेच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुऊन जातात. भविष्यात पाप-संताप, दु:ख त्याच्याजवळ कधीही येत नाही. तो सर्व प्रकारच्या पवित्र आणि अक्षय पुण्याचा अधिकारी होतो. 
गौर वर्ण तुझा शंख- चंद्र - कुंदफूलापरी
दुर्गा मातेचे रुप आठवे अष्टवर्षा तू महागौरी

वृषभावर बैसून येई तू चार भूजाधारी
त्रिशूळ,डमरू तू अभय - वर मुद्राधारी

शांत स्वरूपी तू श्वेत वस्त्राभुषणांधारी
तुझे पूजास्मरण भक्तास कल्याणकारी

संकटनाशिनी तू सिदधीदायिनी तू पापनाशिनी
शंकरासाठी व्रत कठोर तुझे तू तेज तपस्विनी

अशक्य ते शक्य दिसे मज येता तव चरणी
अलौकिक महिमा तुझा देवी,आले मी तुज शरणी

- रुपाली ठोंबरे.

प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Wednesday, October 21, 2015

देवी कालरात्री

दुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'सहार' चक्रात स्थिर झालेले असते. यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धिंचे दरवाजे उघडू लागतात. या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णत: कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते. तिच्या साक्षात्कारापासून मिळणार्‍या पुण्याचा तो भागीदार होतो. त्याच्या संपूर्ण पापांचा नाश होतो. त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते.ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणार्‍या शुभ कामांची गणना केली जाऊ शकत नाही. आपण नेहमी तिचे स्मरण आणि पूजा केली पाहिजे.
रूप दुर्गेचे सातवे भयाकारी परी शुम्भंकारी तू
देवी कालरात्री, शुभफळदात्री दुष्टविनाशी तू

विखुर केश,वीजतेज लखलख माळा गळयात
ब्रम्हांडापरी गोल त्रिनेत्र, ,चमक तिन्ही डोळ्यांत

श्वासाश्वासांतून तुझ्या भयंकर अग्निज्वाळा
लंबकर्णावरी आरूढ तू  देह हा तुझा काळा-सावळा

 हस्त दर्शवी अभयमुद्रा अन वरमुद्रा वरदायक
 लोहकाटा अन कट्यार हाती रूप हे शुभदायक

पळू लागती राक्षस-भूतप्रेत, जिथे तुझा आसरा
मन-वचन-देह पवित्र तिथे नाही ग्रहसंकटास थारा

भयमुक्त भक्त तुझे करी यम-नियम-संयम पालन
तुझे नामस्मरण करी भक्तांचे पुण्यार्जन-पापक्षालन

- रुपाली ठोंबरेप्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Tuesday, October 20, 2015

देवी कात्यायनी

दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'आज्ञा' या चक्रात स्थिर होते. योगसाधनेत या आज्ञा चक्राचे विशेष स्थान आहे. या चक्रात स्थिर झालेला साधक कात्यायनीच्या चरणी आपले सर्वस्व वाहून देतो. परिपूर्ण आत्मदान करणार्‍या भक्ताला देवी सहजपणे दर्शन देते.


कात्यायनि महामाये महायोगिन्यधीश्वरि । 
नन्द गोपसुतं देविपतिं मे कुरु ते नमः ॥ 

कालिंदीच्या यमुना किनारी
ब्रजगोपी पुजती देवी कात्यायनी
वर मिळावा श्याम मुरारी
हीच आकांक्षा हर गोपमनी

कतपुत्र कात्याच्या गोत्री
जन्मले कात्यायन महर्षी
अनंतकाल तपस्यति भगवती
'स्वगृही देवीजन्म' वरप्राप्ती त्यास अशी 

महिषासुर अत्याचार पृथ्वीवरी 
तत्विनाशाय ब्रम्ह-विष्णू-महेश तेज अंशी
जन्म घेई देवी कात्यायना घरी
अश्विन-कृष्ण-चतुर्थी दिवशी

सप्तमी-अष्टमी-नवमी तिन्ही दिनी
ग्रहण करून पूजा आनंदे महर्षीघरी
दशमीस असूरवध करी महिषासुरमर्दिनी
पुराणकथा ही दुर्गारूप सहावे सार्थ करी

तेजःपुंज ती चतुर्भुजा ती सिंहावरी
वरमुद्रा ती अभयमुद्रा शोभे द्विहस्ती
पुष्प कमळ, खड्ग तळपती वाम करी 
इहलोकातही तेज-प्रभाव जिथे तिची वस्ती

करू कात्यायनी उपासना शुद्ध मानसी 
देई मानवा अर्थ-धर्म-काम-मोक्ष प्राप्ती
ती अमाप फलदायी,सप्तजन्म पापनाशी
देवी कात्यायनी देई भय-दुःख-संताप मुक्ती

- रुपाली ठोंबरे.

प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Monday, October 19, 2015

देवी स्कंदमाता

दुर्गेचे पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर झालेले असते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भवसागरात दु:खापासून मुक्ती मिळवून मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही.
सूरासूर संग्रामे सेनापती देवतांचे
कुमार कार्तिकेय बाळ हे स्कंदमातेचे

श्वेतकांती पद्मासना रूप पाचवे दुर्गेचे
चतुर्भूजा सिंहासनी मार्ग सुकर मोक्षाचे

द्विहाती घेऊन कमळे रूप हे वरमूद्रेचे
सुर्यमंडले अधिष्ठार्ती तू , तेज अलौकिक भक्तांचे

तव उपासनेत दडले गूढ इच्छापूर्ततेचे
मृत्युलोके परमशांती-सौख्य प्राप्ततेचे


रुपाली ठोंबरे.  
प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Friday, October 16, 2015

देवी चंद्रघंटा


दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकीक वस्तुचे दर्शन होते. दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात.


पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।

प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।
घंटाकारी अर्धचंद्र मस्तकी
कांचनकांती दिव्यशक्ती

शान्तिदायी कल्याणकारी
सौम्य,शांत दशभुजाधारी

सज्ज युद्धास सिंहमुद्रा पाठी
हाती आयुधे भक्त रक्षणासाठी

घंटारव निनादी येता तव चरणी
प्रेतबाधा दूर करी तू परमकल्याणी

पवित्र मनाने आराधना तुझी
कांती-गुण वृद्धी निर्भयता माझी

देवी चंद्रघंटा दुर्गेची तृतीय शक्ती
तव भक्ती हीच माझी भयमुक्ती

मधु-सुगंध दिव्य-स्वर ठायी
नत मी आज माते तुझ्या पायी

- रुपाली ठोंबरे
प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

देवी कुष्मांडा

दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते. या दिवशी अत्यंत पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली पाहिजे.

सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु में। स्मित हास्याने तिने निर्मिले ब्रम्हान्डा
 चौथ्या रुपात जन्मली तू आद्यशक्ती कुष्मांडा

 सुर्यसम दिव्य तेज तुझे सौरमंडळी नीत वसे
 दशदिशांत-सर्वत्र  तव कृपातेज क्षणोक्षणी दिसे

कमळ मनोहर-अमृतकलश-धनुर्बाण-चक्र-गदा हस्ते
जपमाळा-कमंडलू घेऊनी हाती अष्टभूजा सिंहावरी विराजते

देवी कुष्मांडा,उपासना तुझी दूर करी भक्तांची व्याधी
प्रसन्न ती भक्तावरी, अचंचल मनाची पवित्र पूजा जरी साधी

भक्ती तुझी देई यश-शक्ती-आयुष्य-आरोग्य वृद्धी
शरण तुज आले मी, ये घरा, घेऊन शांती-सुख-समृद्धी


- रुपाली ठोंबरे

प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Wednesday, October 14, 2015

देवी ब्रम्ह्चारिणी

नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी 'ब्रह्मचारिणी' मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या चक्रात मन स्थिर करणार्‍याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होतेनवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी.ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते.

दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।

देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।
 

 ऐकून व्रत नारद मुखे
 हिमकन्या सुरु करतसे
 व्रत दीर्घ उपासाचे

मिळवण्यास शिवशंकर
सदा पती म्हणुनी
तप कठोर सुरु तिचे

 भक्षून फळे, बेलपत्रे
ऊनपावसातही हजारो वर्षे
न डळमळले धैर्य तिचे

तपस्येत ती ब्राम्हचारिणी
शुष्क बेलपत्रेही त्यागून पुढे
नाम "अपर्णा" जाहले तिचे

उमेची महती पसरली त्रिलोकी
देवीदेवतांच्या प्रशंसेत
न्हाले  अनोखे व्रत तिचे

"उमे, जा घरी तू ,होतील इच्छा पूर्ण
भावी पती शिव येईल घ्यावया तुज"
धन्य ती  उमा ऐकून बोल हे ब्रम्हाचे 

हीच भव्य देखणी ब्रम्ह्चारिणी
घेऊन हस्ती जपमाळा, कमंडलू
कृपाभक्ती देत उभे, रूप दुसरे हे दुर्गेचे

- रुपाली ठोंबरे
प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/


Tuesday, October 13, 2015

देवी शैलपुत्री

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणांतर्गत देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाटी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. दुष्टांच्या निर्दालनासाठी देवीने अनेक अवतार घेतले.सामान्यजनांना, विद्वानांना तिने पुन्हा सुख प्राप्त करून दिले. तिच्या या कर्तृत्वाबद्दल तिचे स्तवन व स्मरण करण्यासाठी नवरात्र साजरे केले जाते.

नवरात्रीतली प्रत्येक रात्र आदिशक्तीच्या पुढील नावावरुन प्रचलित आहे.

 पहिली रात्र - शैलपुत्री
दुसरी रात्र - ब्रह्मचारिणी
तिसरी रात्र - चंद्रघंटा
चौथी रात्र - कुश्‍मांदा
पाचवी रात्र - स्कंदमाता
सहावी रात्र - कात्यायनी
सातवी रात्र - कालरात्री
आठवी रात्र - चामुंडा
नववी रात्र - सिध्दीदात्री

दुर्गेचे पहिले रूप 'शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे.


या देवी सर्वभू‍तेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता। 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।प्रजापती दक्ष राजाची कन्या
होती भोळ्या शंकराची भार्या
सर्व देवी-देवतांस निमंत्रण, तरी
नाही बोलावले शिवास यज्ञकार्या

कार्य पहावे जाऊन पित्याघरी
इच्छा झाली सतीच्या  मनी
पती सामोरी बोलुन दाखवता
उद्गार उमटले त्याच्या वदनी

"सती, तव पिता रुष्ट माझ्यावरी
 म्हणुनी नाही आमंत्रण त्वमपि
 ठरवुनी तूच योग्य-अयोग्य
 मुभा देतो, जा तू यज्ञ मंडपी  "

 माहेरभेटीस व्याकूळ झालेली
 तशीच निघाली ती दाक्षायाणी
 पोहोचता आवेगाने त्या यज्ञमंडपी
 अनुभवले सत्य शिवबोल तत्क्षणी

स्वागत करण्या कोणी आले नाही
नाही आदर, नाही मातेची गळाभेटही
तिरस्कार स्वपतीचा पाहून पित्याघरी
झाली क्रोधीत ती भवानी अशी काही

ढग-विजांच्या कडकडाटात
प्रकटली जगदंबा आदिशक्ती
योगाग्नीत झोकून देत स्वतःस
सिद्ध केली अशी पतीभक्ती

ऐकून ही वार्ता कोपल्या कैलासगिरी
दशदिशांत शिवतांडव नाच करी
झाला यज्ञ नाश शिवगणांकरवी
पत्नी-वियोग झेलून शंभू शोक करी

जन्म नवा शैलराज हिम कुशीतला
सती अवतरली नव्याने उत्तुंग पर्वती
हेमवती या जन्मीही शंकरास भावली
दशदिशांत नावाजली शिवासह पार्वती

मूलाधारचक्रे स्थिर करुनी मनासी
संत-महंत आरंभती योगसाधना 
नवरात्रोत्सव आज सुरु जाहला
करू भक्तीभावाने हेमवतीची आराधना

त्रिशूळ कमळ शोभती हाती, आरूढ नंदीवरी
नवदुर्गांत प्रथम दुर्गा शैलपुत्री नावाजली
घराघरांत घट स्थापुन भक्तांनी
माता शैलपुत्रीच्या नावे पहिली रात्र जागवली
- रुपाली ठोंबरे

प्रस्तावनेसाठी आभार  : http://mannmajhe.blogspot.in/

Wednesday, October 7, 2015

'चिऊताई ' पुन्हा कशी रे आणशील ?

त्या दिवशी बाळाला " चिऊ ये ,काऊ ये "म्हणत एकेक घास भरवताना एका आजीला पहिले आणि  मला माझे बालपण आठवले. मी बराच वेळ गम्मत म्हणून तिथेच उभी राहिली. पण पूर्वीसारखी एकही चिमणी तिथे आली नाही किंवा साधी दृष्टीसही पडली नाही . तेव्हा मनात सहज विचार डोकावून गेला " अरेच्चा ! कुठे गेल्या असतील  चिमण्या ". खरेच आज जर निरीक्षण केले तर चिमणी हा अगदी सामान्य पक्षी आज अतिशय दुर्मिळ होऊ लागला आहे हे कटू सत्य सहज जाणवेल. याबाबत थोडा शोध घेतला आणि त्याचे कारण समोर आले आणि आश्चर्याचा धक्काच बसला.
कारण, याचे कारण होते …. आम्ही _ मानव म्हणून म्हणवणारे आपण सर्वच, भ्रमणध्वनीसाठी पसरलेले अणुकिरणोत्सर्जीत तारांचे महाकाय अदृश्य जाळे ,सिमेंटचे वाढते जंगल , विविध प्रकारच्या प्रदुषणासोबत दिवसेंदिवस वाढणारा इतस्ततः विखुरलेला कचरा…. आणि अशा वेळी आपल्याच जातीतील कावळेही शत्रू होतात.
हे असे काही आपल्यास जेव्हा समजते तेव्हा नकळत मन गहिवरते,स्वतःवर राग येतो, काही अंशी पश्चाताप होतो आणि मग जाणवते दुःखावेगाने आकांत करत आपली व्यथा सांगणारी चिमणी… तिची कहाणी …


जाळ्यात इमारतींच्या
जीव  भिरभिरतो माझा
सैरावैरा धावते इथे तिथे
शत्रू जणू विखुरलेले जिथे तिथे
जाऊ कुठे मी थांबू कुठे
गुदमरत्या जीवास देऊ आसरा कुठे

दूर गावी होता निसर्ग जीवनाचा
तिथे पिल्लांसवे संसार सुखाचा
उंच आभाळी मुक्त आम्ही राजा -राणी
सांजवाटेला पिल्लांसाठी आणू दाणा पाणी
दिवसांमागून दिवस असेच जात गेले
सुखाच्या वाटेवर एकदा दुःख चालून आले

उजाडणारा नवा दिवस क्रांती घेऊन आला
जगाचा पसारा महाजालासंगे वाढतच गेला
अजाण पाखरं आम्ही, शोधत होतो गतकाळ हरवलेला
अणूकिरणांच्या विषतारांत एकदा चिमणा जीवच कोमेजला
बावरलेली चिमणी मी, पिल्लांसंगे दूर उडून इथे आली
पण याही शहरात माझी तीच दैना झाली

झाड दिसेना एक
कुठे शोधू मी आसरा
आणू पिल्लांसी आता
कोठून रोज नवा चारा

सिमेंटच्या जाळ्यात आज
हरवली कापसाची मऊ दुलई
मोकळ्या हवेसाठी सुद्धा
शोधत फिरते दिशा दाही

बदललेलं जग पाहून
जीव जातो रे गोठून
कचराच चारा होऊन
जगवतो भूक शमवून

कावळ्याच्याही जगात
असाच दुष्काळ आला
आमचाच असूनही
आज तोही शत्रू झाला

दिवसांमागून दिवस असेच जातील
नवे बाळ 'चिमणपाखरे' गोष्टीतच पाहील
माणसा, माणूस म्हणून तू खूप मोठा रे होशील
पण बालपणीची 'चिऊताई ' पुन्हा कशी आणशील ?
आज शून्य-मुल्य मी ,उद्या दुर्मिळ होईन
माझ्या साठी मग कधीतरी लाखही मोजशील

- रुपाली ठोंबरे

Blogs I follow :