Saturday, March 9, 2024

शिवतत्व - एक कलात्मक अनुभूती

शिवोहं शिवोहं , शिव स्वरूपोहं 

नित्योहं शुद्धोहं , बुद्धोहं मुक्तोहं ll 

या शिवधुनीपासून साधारण १ महिन्यापूर्वी आयुष्यात सुरु झाला एक नाविन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण  अध्याय. या अध्यायातील पहिले पान काल सर्वांसमोर उलगडले गेले आणि एक अध्यात्मिक, कलात्मक अनुभूतीचा  प्रत्यय आला.भरतनाट्य नृत्यांगना उपासना हिच्या एका संकल्पनेतून 'Understanding Shiva as Natraj' या स्कंदपुराणातील 'आनंद तांडव' या कथेवर आधारित आजच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. बिंदूंवर कार्य करत असताना आलेला हा प्रस्ताव म्हणजे माझ्यासाठी  एक खूप मोठी संधी...आणि मीही यात चित्रकार म्हणून जोडले गेले. रजतच्या रूपात एक उत्तम सूत्रधार या कार्यक्रमासाठी लाभला. डॉ. प्रणिताच्या सुरांनी या कार्यक्रमाला संगीतमय साथ दिली. आणि असा हा कलांचा मेळा... एक सुंदर अनुभव.  

महाशिवरात्रीचा पवित्र दिवस... खूप सुंदर आणि शांत दालन... विविध फुलांनी , दिव्यांनी सजलेले... समोर मांडलेली नटराजाची मूर्ती हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण... त्यासमोर मांडलेली शुभ्र अशी बैठक आणि त्या शेजारी उभा कोरा कॅनवास सर्वांचे स्वागत करण्यास सज्ज झाले होते. एका ठराविक अंतरावर जवळजवळ २५-३० छोटे गालिचे अंथरलेले... त्या प्रत्येक बैठकीसोबत कागद, रंग असे चित्रसाहित्य मांडलेले. असे हे डोळ्यांना आनंद देणारे दृश्य अगरबत्तीच्या मंद सुगंधात आणि शिवधुनीच्या मधूर संगीतात अधिक दीप्तिमान झाले होते. 

शिवपूजन, आरती आणि नटराजाचा आशीर्वाद घेऊन संध्याकाळी ६.१५ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. दालन उत्स्फूर्त चेहऱ्यांनी भरून गेले होते. प्रत्येकास सुरुवातीस प्रस्तावना आणि कार्यक्रमाची रुपरेषा थोडक्यात सांगितली गेली. श्री गणेशाचे स्मरण करून कार्यक्रम आता स्वरबद्ध झाला होता. या संगीतमयी वातावरणात रंग आणि नृत्य यांचा मेळ कसा आणि कधी होईल याबद्दल प्रत्येकाच्याच मनात उत्सुकता होती. 'ओम'ची स्पंदने  समोरील चित्र, नृत्य आणि स्वरांतून जाणवू लागली. ती सर्व आता विविध कागदांवर वेगवेगळ्या रूपात उमटत होती. किती तरी वर्षांनी रंगांसोबत खेळताना सर्व सहभागी आपापल्या चित्रात अतिशय मग्न झाले होते. आणि रंगांसोबत प्रत्येकाचे नाते नव्याने निर्माण झाले. 

'आनंद तांडव'च्या विवरणानंतर सुरुवात झाली मूळ कथेला. यातील पहिले चरण म्हणजे व्याघ्रपाद आणि पतंजली ऋषींचा परिचय. त्यानंतर शाब्दिक आणि तालबद्ध स्वरूपात उपासनाने सर्वांसमोर सादर केलेले शिवाचे तेजोमय रूप त्या मनामनांत शिवतत्व रुजू करण्यात नक्कीच यशस्वी ठरले असेल. ऋषींच्या साधनेची महती समजून येत असताना सर्वानी 'ओम नमः शिवाय' नामस्मरणाचा अद्वितीय आनंद घेतला. कानांवर विराजमान झालेला हा पंचाक्षरी मंत्र कॅनव्हासवर उमटू लागला, तसे चित्र शिवमय होऊ लागले. पुराणकथेतील दुसरे चरण सुरु झाले आणि चितसभेचे भव्य-दिव्य रूप एकाच वेळी शब्द ,रंग आणि ताल या विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनांवर कोरले जाऊ लागले.प्रखर शिवतत्व आता सर्वांसमोर निर्माण झाले होते. शंख,घंटा आणि डमरूच्या नादात आनंद तांडवास सुरुवात झाली. यात प्रत्येकाचा असलेला उत्सुर्त सहभाग, हेच शिवतत्व प्रत्येक मनात जागृत झाल्याचे प्रमाण देत होता.हा नाद आणि ताल बिंदूंच्या माध्यमातून कॅनव्हासवर फेर धरू लागला आणि एक अद्भुत चित्रनिर्मिती समोर आली. 'मागे उभा मंगेश ... ' या गीतासोबत कथाकार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


शेवटी प्रत्येकास या सर्व कलात्मक प्रवाहातून अनुभवलेले शिवतत्व रंगांच्या माध्यमातून समोर मांडण्याची संधी दिली गेली. प्रत्येकाच्या मनातला भाव रंगरूपात सुंदररित्या रचला जात होता. स्वतःचीच ती कलाकृती पाहून निर्माण होणारा आनंदायी भाव त्यांना नवनिर्मिती साठी प्रोत्साहित करत होता. ना कोणती चढाओढ ना ताणतणाव... तिथे होता फक्त आणि फक्त समाधान देणारा आनंद. सर्वांचे समाधानी चेहरे आणि आनंदपूर्ण प्रतिक्रिया हे आमच्यासाठी लाखमोलाचे.  आणि हेच आमच्या या कार्यक्रमाचे फलित.हे सर्व आमच्यासाठी सुद्धा खूप सुखदायक होते. हा प्रयोग खरेच एक अविस्मरणीय अनुभव आहे. त्यातून नक्कीच अधिक प्रोत्साहन आम्हां सर्वांना मिळाले. समोर जरी आम्ही चौघे दिसत होतो तरी या कार्यक्रमासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. त्या सर्वांचे मनापासून आभार. 

आयुष्यात सुरु झालेल्या या नव्या अध्यायाचे पहिले यशस्वी पान उलटून नवी रचना करण्यास आता मी प्रोत्साहित झाले आहे. नवी संकल्पना , नवे स्वर , नवे रंग ,बिंदूचा नवा विस्तार आणि नवीन कथा... नक्की काय असेल हे जाणून घेण्यास माझेही मन आतुरलेले आहे. तुम्हां सर्वांची सोबत असेल तर हा अध्याय लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही. 

- रुपाली ठोंबरे. 

 

Monday, January 22, 2024

अक्षर राम

 आज २२ जानेवारी २०२४...एक अभूतपूर्व दिवस. 

अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांना आजच्या दिवशी यश आले आणि भव्य दिव्य श्री राम मंदिर अयोध्येमध्ये  रामाच्या मूळ जन्मस्थानी उभे राहिले . आज खऱ्या अर्थाने देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे.'श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली... ' या गीताचे बोल नसनसांत संचारले होते. भगव्या रंगात आणि रामनामाच्या जयघोषात अवघा देश आनंदमय झाला आहे. सगळीकडे श्री राम भजन, प्रदर्शन , प्रवचन , कला सोहळा अशा अनेक माध्यमांतून जनमानसांत अवतरत आहेत. असाच एक सुंदर माहितीपूर्ण,कलापूर्ण उपक्रम - 'अक्षर राम ' अनुभवण्याचे भाग्य आम्हांस लाभले आणि आम्ही धन्य जाहलो. 

ज्ञान प्रबोधिनी संशोधन संस्था आणि संस्कृत -संस्कृति - संशोधिका आयोजित 'अक्षरराम' सोहळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे कै. डॉ . ग. न. साठे यांनी भेट दिलेल्या विविध भाषा आणि लिपींमधील दुर्मिळ रामायण ग्रंथांचे प्रदर्शन.  पुण्यात सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी, उपासना मंदिर येथे २० जानेवारीपासून पुढे ३ दिवस चालणारे हे प्रदर्शन म्हणजे रामभक्त , साहित्यिक , कलाप्रेमींसाठी ज्ञानाची शाब्दिक मेजवानीच. नावातच 'अक्षरराम' असलेल्या कार्यक्रमात भारतातील सुलेखन क्षेत्रातील अत्युच्च स्थानावर असलेल्या अच्युत पालव यांचा सहभाग नाही असे कसे होईल. आणि सरांना येथे सुलेखनातून राम साकारण्यासाठी निमंत्रण मिळाले. आणि धन्य आम्ही ज्यांना आमच्या गुरूमुळे यात सहभागी होण्याची संधी लाभली.

  

पहाटेच मुंबईहून पुण्यासाठी आमची पूर्ण टीम अगदी उत्साहात रवाना झाली. धनुष्यधारी श्रीरामाच्या सुरेख रांगोळीने पोहोचताच आमचे स्वागत केले. स्वादिष्ट न्याहारीच्या आस्वाद घेऊन आम्ही मूळ दालनात पोहोचलो. प्राचीन काळातील वाडा वाटावा अशा त्या शाळेच्या परिसराने आणि विद्यार्थ्यांच्या वावरामुळे आम्ही भारावून गेलो.  तिथे प्रदर्शित केलेले ग्रंथ वाङ्मय पाहून तर मोहित झालो . १५ देशांतील, १८ विविध लिपींमध्ये , ३४ भाषांमध्ये लिहिली गेलेली रामायणांची सुमारे २५०० पुस्तके तिथे उत्तमरीत्या मांडण्यात अली होती. अगदी कालपरवाचीच गोष्ट... व्हॅट्सऍप वर कुणीतरी पाठवलेले संपूर्ण रामचरितमानस pdf स्वरूपात पाहिले आणि जाणवले ,'रामायणाची कथा किती मोठी आहे आणि आपल्याला किती कमी माहित आहे, हे आता वाचायला हवे लवकरच.' परंतू येथील रामग्रंथांचा व्यासंग पाहून तर शब्दच हरवले जणू. तेथे उपस्थित शिक्षक प्रत्येक ग्रंथ माहितीपूर्ण पद्धतीने समजवण्यास खूप सक्षम असल्याने प्रदर्शन पाहण्यास अति रुची निर्माण झाली. आणि या प्रदर्शनातील पुस्तकांचे विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकातील रामायण , त्यातील कथा , पात्रांचा वावर अतिशय वेगळा पण अंत एकच. रामानंद सागर यांच्या कृपेमुळे जे रामायण आम्ही लहानपणापासून पाहत आलो तेच रामायण असे सुरुवातीला वेगळ्या स्वरूपात मनाला पटवून देणे खूपच कष्टमय , पण समोर शेकडो वर्षांपूर्वी रचलेली पुस्तके ते पटवून देण्यास समर्थ ठरत होती.डॉ . ग. न. साठे यांनी त्यांच्या अभ्यासक्रमासाठी रामायण हा विषय निवडला आणि हा पुस्तक संग्रह आज सर्वांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला. त्यांनी हे सर्व अभ्यासून स्वतःच्या अक्षरात जवळजवळ ८ मोठमोठ्या खंडांत या सर्व २००० पुस्तकांचे सार रचले आहे. मोत्याच्या अक्षरांतील हि भव्य हस्तलिखिते एक अमूल्य ठेवा आहे. भाषा , प्रदेश , लिपी या सर्वाना ओलांडून रामाबद्दलची प्रत्येकाची आस्था नव्याने आम्ही अनुभवत होतो. हे सर्व निरखून पाहण्यास १ वर्ष देखील कमी पडेल. 


 त्यानंतर १० वाजता आम्ही सर्व अक्षरराम सुलेखनातून मांडण्यासाठी सज्ज झालो. ५ x ५० फूट असा कोरा कागद त्या दालनात मध्यभागी अंथरला गेला. अवतीभवती , वर प्रत्येक मजल्यावर मोठा कलासक्त वर्ग जमला होता. एका बिंदूपासून सुरुवात करत अच्युत पालव यांनी जय श्री राम साकारला. आम्ही त्यांचा शिष्यवर्ग तिथे प्रत्येक कामासाठी सज्ज होतो. त्यानंतर रामगीतांच्या आणि जनमानसातून होणाऱ्या रामनाम जयघोषातुन ऊर्जामयी त्या मंत्रमुग्ध वातावरणात अच्युत सरांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरांत एक श्लोकी रामायणाच्या चार ओळींनी सबंध कागद राममयी केला. त्या ओळीसुद्धा आजवर कधी न ऐकलेल्या परंतु आज एक खूप मोठा आनंद इथे देऊन गेल्या ... 

आदौ रामतपोवनादि  गमनं ,
हत्त्वा मृगं कांचनं ,
वैदेहीहरणं  जटायूमरणं 
सुग्रीव संभाषणं 
वाली निग्रहणं समुद्रतरणं  
लंकापुरी दाहनं 
पश्चाद रावण कुंभकर्ण हननं 
एतद्धी रामायणम ll 


 - रुपाली ठोंबरे 

Blogs I follow :