Tuesday, February 27, 2018

मराठी... माझी मायबोली !!!

महाराष्ट्र...माझी मायभूमी 
मराठी... माझी मायबोली. 

माझ्या मंगलदेशाची मानलेली मायच... माझी मराठी 
मातीत माखलेल्या मुक्या मुलात मुरणारी... माझी मराठीच 
मुळाक्षरांच्या मोजक्या मेखलांनीही मोहवणारी... माझी मराठीच 
माऊलींनी मूलतत्त्वाचे मर्म मोगरे माळले... माझ्या मराठीतच
मुकुंद-महागणपती-महेशाचे मंजूळ मनन ... माझ्या मराठीच 
 मंदिरातील मृदूंग मागतो मोक्षमुक्ती मार्ग ... माझ्या मराठीतच 
मीरा-मुकुंद मूर्तिमंत माया म्हणते मन माझे... माझ्या मराठीतच
महाराजांची मेघडंबरी मानात म्हणे महिमा...माझ्या मराठीचाच  
मोकळ्या म्यानांनी म्लेच्छांचा मारा मावळती मावळातील मर्द मराठे...मराठी मातीचेच 
मोतियांच्या मल्हारवारीमध्ये मल्हारी मार्तंडाचा मुरळ्यांनी मांडला मेघमल्हार...माझ्या मराठीतच  
मांडवात मुहूर्तावर मंगलमयी मंगलाष्टकांच्या मंत्रमाळा...माझ्या मराठीतच
मेंदीसंगे मुंडावळ्यांत मापाप्रसंगी मुखे मांडते मालिनी ... माझी मराठीच
मंतरलेल्या मधुभेटींच्या मनोहारी मृग-मिलनात मोहोरते... माझी मराठीच 
माहेराचे मीपण मधात मंथून मिसळले मोठया महाली...माझ्या मराठीतच
मितभाषी मंजिरी माझ्या मानसीची मैत्रीण माळते माळा मनाशी... माझ्या मराठीतच 
मदन मित्र मयूर मेघवर्षावात मिरवतो मनोरथ-मनोरे मानसीचे... माझ्या मराठीतच
माणुसकीच्या मंचावरती माणूस म्हणून मारतो मायेची मिठी... माझ्या मराठीतच 
माड्या-मळ्यांमध्ये मुलुख-मुशाफिरांमध्ये महोत्सवाची मौक्तिके... माझ्या मराठीतच     

म्हणूनच म्हणते मानाने,
  महाराष्ट्र...माझी मायभूमी 
    मराठी... माझी मायबोली !!!

जागतिक मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
  - रुपाली ठोंबरे. 

Wednesday, February 21, 2018

आभाळभर शुभेच्छाफुले !!!मी सांगते, आज काहितरी गजबच घडले... पहाटे उठले आणि पहाते तर काय ?... अवतीभवती अगदी खच पडला होता..... रंगीबेरंगी शुभेच्छा-फुलांचा.... प्रेमाच्या रंगाने डवरलेली लाल-केशरी सुंदर मोहक फुले.... मैत्रीच्या रंगात बहरलेली नाजूक पिवळी सोनफुले....शुभ्र ताटव्यात शोभून दिसणारी सुवासिक आशीर्वचनांची पवित्र फुले.... मी तर बाई, आज या फुलांच्या सहवासात स्वतःला एकदम स्पेशल फील करू लागले आहे ...मोबाईलवर आलेला यम्मी केक खाता येत नसला तरी त्याची गोड चव पोहोचली बरे का इथवर...फुलांचे सकाळपासून इतके गुच्छ मोबाईलमध्ये आले आहेत कि आता ३२ GB चे स्टोरेज कमी पडू लागलंय...पण खूप खूप भारी वाटतंय आज... वर्षातून एकदा तरी अशा बागेत रमायला खूप आवडते ना, प्रत्येकालाच ... आणि हो, प्रत्यक्षपणे मिळालेली फुले, केक आणि त्या गोड भेटी तर अनमोलच आहेत माझ्यासाठी... आणि या सर्वांसाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार ...आजच नव्हे तर नेहमीच दरवर्षी अशा आप्तस्वकीयांकडून येणाऱ्या आभाळभर शुभेच्छांच्या पावसात भिजायला खूप खूप आवडेल मला...अशा पावसात चिंब भिजूनच तर उद्याच्या स्वप्नांना जगायला मज्जा येईल , नाही का?


- रुपाली ठोंबरे.


Monday, February 19, 2018

श्रीमान योगी

" आयुष्यात कधी खचत चाललो आहे... सर्व बाजुंनी हार होते आहे... योग्य मार्ग सापडत नाही... चहू बाजुंनी भयाण वणव्याने वेढले आहे...तुझ्यावर कधी असा बाका प्रसंग आला तर तेव्हा तू रणजीत देसाई लिखित 'श्रीमान योगी ' वाच. तुला खूप बळ , स्फूर्ती , प्रेरणा मिळेल.

असे काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला सुचवले. आणि काय आश्चर्य त्या काळात त्याचे हे बोल मी स्वतः जगत होते. श्रीमान योगी या पुस्तकाच्या साधारण मध्यावर पोहोचले होते मी तेव्हा. आणि सांगते, तो म्हणाला ते १०० टक्के खरे होते जे मला वाचताना क्षणोक्षणी त्या पानांवरच्या प्रत्येक शब्दातून पटत होते. 

फक्त श्रीमान योगीच नव्हे तर शिवरायांवर लिहिलेले कोणतेही पुस्तक हाती घ्या अथवा त्यांच्यावर लिहिलेली गीते श्रवण करा आपोआपच अंगात एक नवे चैतन्य निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्वच फार थोर. अगदी बालपणापासून आईच्या गोष्टींत सापडलेला हा पराक्रमी पुरुष माझा नेहमीच आवडता राजा होता...माझा सर्वात आवडता हीरो. पुढे तिसरीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांबद्दल एक विशेष आदर मनात निर्माण झाला तो आजपर्यंत आणि पुढेही असाच राहणार.

१९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरीवर आई शिवाईच्या कृपेने जिजाबाई या थोर मातेच्या पोटी एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला आणि महाराष्ट्राचे भाग्य उजळले.जिजाबाईंच्या तोंडून बालवयातच रामायण आणि महाभारताच्या कथांमधून शिवबांच्या बालमनावर संस्कारांचे सिंचन झाले सोबतच दादोजी कोंडदेवांसारखा उत्तम गुरु लाभले आणि हा हिरा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर पडणाऱ्या या एकेक पैलूने घडत गेला. रोहिडेश्वराच्या मंदिरात त्यांनी शंभू महादेवाच्या प्रेरणेने आणि मूठभर मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि हा संकल्प तडीला नेण्यास सिद्ध असलेल्या महादेवाचा आशीर्वाद घेऊन पुढे तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि त्या क्षणापासून शिवरायांना उसंत मिळाली नाही. त्यांच्या पराक्रमांची शृंखला स्वराज्याचे तोरण बांधत गेली. शिवरायांची खरी ताकद होती ती ही मराठी माती... या मातीत जन्मलेले वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करणारे मावळे आणि या मातीतल्या दगडांनी उभारलेले भक्कम गड आणि किल्ले. येसाजी कंक , तानाजी मालुसरे , फिरंगोजी नरसाळा , कुडतोजी गुजर, बाजीप्रभू देशपांडे अशी कितीतरी स्वराज्यासाठी जीव ओतणारी माणसे पाठीशी होती म्हणूनच आग्ऱ्यातून सुटका असो वा अफजल खानाचा वध , महाराजांच्या हाती फक्त यशच येत गेले. 

भविष्यात स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वास आणि प्रेमामुळे शिवाजी महाराज उद्याचे छत्रपती झाले. पण इथवर पोहोचण्यासाठी संकटांशी केलेले सामने खरेच चुरशीची आहेत... खूप काही शिकवणारे ... खूप प्रेरणा देणारे आहेत. आपल्या तुटपुंज्या शिबंदीसमोर उभ्या असलेल्या बलाढ्य मोगल फौजांना तोंड देण्यासाठी शिवाजी महाराजांचा गनिमी कावा नेहमीच कामी आला... आणि प्रत्येक वेळी 'शक्तीपेक्षा युक्ती महान' ही उक्ती सिद्ध होत गेली. महाराजांचे सुनियोजित अष्टप्रधानमंडळ हा ते एक महान राजनीतीज्ञ होते याचा उत्तम पुरावा आहे. अशा आपल्या महाराजांच्या किती गोष्टी कथन कराव्या तितक्या कमीच. असे हे आपल्या लाडक्या राजांचे थोर व्यक्तिमत्त्व. पण त्यांनाही स्वकीयांचा मारा , कुटुंबातील तडजोडी या सर्वांचा सामना करावा लागला. त्यांनी हे सर्व कशा पद्धतीने घडवून आणले ते बरेच काही शिकवून जाते. पुरंदरच्या तहात इतके परिश्रम घेऊन उभारलेले बरेच काही मिर्झा राजांच्या हाती सुपूर्द करताना राजांचे कुठेतरी क्षणभर किंचित खचलेले मन आणि जिजाबाईंच्या बोलांनी पुन्हा धैर्याने उभे राहिलेले शिवबा सामान्य माणसाला त्याची लढाई लढण्यासाठी एक मोलाचा संदेश देतात.शिवाजी महाराजांचा पराक्रम वाचताना नकळत रक्त उसळले जाते... मनात राष्ट्राभिमान जागृत होतो... शरीराच्या नसनसांत चैतन्य निर्माण होते. 

श्रीमान योगी वाचताना आलेला हा अनुभव माझ्या आयुष्यासाठी खूप मोलाचा... एखादे पुस्तक स्वतःमध्ये इतका बदल घडवून आणू शकतो यावर कधीकधी विश्वास बसत नाही पण हे शिवचरित्र खरेच प्रत्येकाने अनुभवण्यासारखे आहे... कारण ते खूप प्रेरणादायी आहे. 

'श्रीमान योगी' या पुस्तकाची डिजिटल प्रत

 
- रुपाली ठोंबरे .

Wednesday, February 14, 2018

तो आणि....ती (भाग २)तो...घाईघाईतच थेट त्या टर्मिनल मध्ये आत आला.सकाळपासून सामान जमा करताना झालेल्या छोट्याशा गोंधळामुळे त्याला आधीच उशीर झाला होता.साधारण दीड तासांपासून चाललेल्या धावपळीला थोडा स्वल्पविराम मिळाला आणि त्याने आपला कोट अंगापासून विलग केला. त्याच्या एका हातात आता त्याने कोट घेतला होता आणि दुसऱ्या हातात धरली होती ट्रॅव्हेलिंग ट्रॉली बॅग. तीदेखील तो जाईल तिथे त्याच्यापाठोपाठ फिरत होती. पण त्याची नजर सारखी चहू दिशांना फिरत होती. जणू तो काहीतरी शोधत होता.पण त्याला जे हवे होते ते सापडत नव्हते किंवा ते सुस्थितीत नव्हते त्यामुळे तो थोडा हताश होऊन क्षणभर तिथेच थांबला. मनगटावरच्या घड्याळावर एक नजर टाकली आणि एकदम काही आठवल्यासारखे टर्मिनलच्या दुसऱ्या दिशेला जाऊ लागला.

ती... इथे बाहेर तशीच विचारमग्न होऊन बसून राहिली होती.त्याने पाहिले असेल का मला ? कदाचित पाहिलेच नसेल नाहीतर लगेच जवळ आला असता . मी तर समोरच होते ना मग मी कशी बरे दिसली नसेल त्याला ? विसरला असेल का मला भेटायचे ठरले होते ते ? छे छे ! असे कसे विसरू शकतो तो मला ? काही दिवसांपूर्वीच तर प्रपोज केले होते त्याने मला ! पण मी हो कुठे म्हटले ? राग तर आला नसेल ना ? पण इतका राग ? तो का बरे ? फोन करणार होता विमानतळावर पोहोचताच पण आता २ तास होत आले ... काय झाले असेल नक्की ? कुठे अडकला तर नसेल ना ? पण मी पाहिले तेव्हा तर सर्व ठीकच वाटत होते ? मला टाळले असेल का ? पण का ? मीच जाऊन भेटते त्याला... विचारते नक्की काय सुरु आहे . नको , मला खरेच गरज आहे का ? का विचारावे ? पण आता बराच वेळ झाला अर्ध्या तासात इथून निघावे लागेल नि मग सर्वच राहून जाईल. मी जाऊन त्याला भेटते... कमीतकमी माझे मन शांत होईल... अशा असंख्य प्रश्न ,विचारांनी तिचे मन आता गुदमरून गेले होते.

ती तशीच ताडकन  उठली आणि त्या टर्मिनलमध्ये आली. तिच्या नजरेची भिरभिर क्षणभरही थांबली नाही. काही अंतरावर तिला तीच आकृती पाठमोरी उभी दिसली. ती जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर अलगद आपला तळवा ठेवला,
 " तू... ? विसरलास ना मला ? मला वाटलेच होते हे असेच होईल. "
तिचा आवाज आता भरला होता.त्याने तो स्पर्श ओळखला आणि तिच्या दिशेने वळला ... तो तिला पाहतच राहिला. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. अबोली रंगाच्या कुर्त्यांवरच्या गडद रंगाच्या जॅकेटमुळे तिचा गोरा रंग विमानतळावरच्या लाइटांच्या लखलखाटात अधिक गोरा भासत होता. तिचे कुरळे केस वाहत नसलेल्या वाऱ्यावरसुद्धा उडत होते...
" अरे , मी काय बोलते आहे ? लक्षच नाही आहे माझ्याकडे तुझे. चल मी जाते मग ."
माघारी फिरणाऱ्या तिचा हात त्याने लगेच हातात घेऊन तिला तिथेच थांबवले
"अगं , वेडी आहेस का ? मी तुला कसे विसरेन बरं ? बघ मी इथे तुलाच शोधत होतो."
" हो का ? मग मला पाहूनसुद्धा तू माझ्या समोरून निघून गेलास. याला काही उत्तर? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती..... "
आणि हे बोलताना आता तिच्या डोळ्यांच्या अश्रूंचा बांध शेवटी भावना रोखून धरू शकला नाही.
" हे बघ , तू म्हणतेस तसे खरेच मी तुला पाहिले नाही. तुला फोन करायचे असे ठरले होते ना आपले. तोच करण्यासाठी इथे आलो होतो मी. हे बघ, सुट्टे पैसे अजून हातात तसेच घेऊन आहे मी."
त्याने त्याच्या हातातील खणखणणारी नाणी मूठ उघडून तिच्यासमोर धरली.ते पाहून आणि नाईलाजानेच तिने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी क्षणात पालटले.
"इतकी सारी नाणी... ? ती खुद्कन हसली.
तो आणि ती ... आता मघाशीच्याच तिच्या जागेवर जाऊन बसले.... तीच पहिली रांग आणि पहिलीच खुर्ची.
ती आता फार शांत झाली होती... तासाभरापासून चाललेली तिच्या मनातली अस्थिरता जरा आता स्थिर होऊ लागली होती.इतका वेळ सभोवतालच्या ज्या हालचालींकडे तिने लक्षही दिले नव्हते त्याच ती आता उगाचच पाहण्याचा अट्टहास करत होती. पण त्याचे लक्ष होते फक्त तिच्याकडेच. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदाने पुढे पुढे सरकत होता. असा बराच काळ उलटला. मग त्यानेच त्याच्या मते अर्धवट सुटलेल्या विषयाला हात घातला .
" काय मग, तू काय विचार केला आहेस ?"
 " मी ? विचार ?कशाबद्दल रे ...? तिच्याकडून अगदीच अपेक्षित प्रतिसाद होता हा. 
त्याने पुढे होऊन तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने एक नाजूक शिरशिरी तिच्या नखशिखान्त निर्माण झाली. पण दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित होते.
" अगं , तुझ्याबद्दल...माझ्याबद्दल ...आपल्याबद्दल ... !"
काही क्षण तसेच सरले. हातात घेतलेला हात तसाच होता आणि आणि आश्चर्य म्हणजे तिने तो मागेही घेतला नाही किंवा सोडवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. हे पाहून त्याची हिम्मत आणखी वाढली. त्याने लगेच आपला दुसरा हात तिच्या खांद्यावर नेला.
आणि आता मात्र ती बिचकली. तिने लगेच खांद्यावरचा हात झटकून दिला.
" काय हे ! तुला आधीच सांगितले आहे ना मी कि ते शक्य नाही. आपल्या दोघांमध्ये जातीची एक खूप उंच भिंत आहे ती कशी रे तुला दिसत नाही. माझ्या घरी हे अजिबात चालणार नाही आणि मी त्यांना दुखावू शकत नाही."
" स्वतःला दुखावलेले चालते तुला? तुझ्या मनात काही वेगळेच आहे आणि ओठांवर काही वेगळेच. आज बघ , तुझे डोळे तुझीच फितुरी करत आहेत."
क्षणापुर्वी भडकलेली ती पुन्हा शांत झाली. तिच्या मनात विचारांची चक्रे अगदी वेगात सुरु झाली. हा विषय बदलण्यासाठी ती काहीतरी नवीन शोधत होती . तो मात्र तिच्या पुढच्या उत्तराची अपेक्षा करत तिच्याकडेच पाहत राहिला.
" अरे तुझ्या कविता काय म्हणताहेत ? यावेळी तुझ्या कविता ऐकवल्याच नाहीस तू ?
ती हे सर्व इतके सहज बोलत होती हे पाहून त्याला तिचा किंचित राग आला.
"नाही... मी नाही लिहीत आता कविता वैगरे . ते सर्व सोडले मी "
"पण का ?  पूर्वी तर किती छान लिहायचास तू .अगदी मी वैतागेपर्यंत ऐकवत राहायचास मग मी नाईलाजानेच तुझी एखादी कविता खूप छान म्हणायची आणि मग कुठे थांबायचास तू . तुला आठवते हे सर्व ?"
ती एकटीच सांगता सांगता हसत होती , बोलत होती.
"असे काही करू नकोस. पुन्हा लिहायला सुरुवात कर. छान लिहितोस खरेच. मी वाचते ना नेहमी. मला आवडतात फार ."
ती ओघात बोलतच होती. पण पूर्वीच्याच विषयावर अडखळून राहिलेल्या त्याला या नवीन विषयात अजिबात रुची नव्हती. एरव्ही त्याच्या कवितेची स्तुती त्याला खूप आनंदी करायची पण आज तो त्या स्तुतीपासूनही पाठ फिरवू पाहत होता.
" तुला काय फक्त माझ्या कविताच आवडतात. मी तर नाही ना ? मग काय उपयोग या सर्वाचा. माझ्या शब्दांना तुझ्या सुरांची साथ हवी आहे . त्यानंतरच त्याचे एक सुंदर संगीत निर्माण होईल जे माझे स्वप्न आहे. तुझ्याशिवाय ते सारे शब्द फक्तच कागदावर रेखाटलेली, एकटी पडलेली अक्षरे.... "
तिला यावर काय बोलावे सुचेना. इतक्यात त्याच्या विमानाची घोषणा सुरु झाली. पण त्याचे मात्र त्याकडेही लक्ष नव्हते. तिनेच त्याचे लक्ष त्या सूचनेकडे वळवले.
" मला वाटते तुझ्याच विमानाची सूचना आहे ही."
" हो " 
तो इतर काहीही न बोलता तिथून उठला आणि जड पावलांनी चालू लागला. त्याच्या पाठोपाठ ती जात राहिली. अगदी शेवटच्या फाटकाजवळ ते दोघे आले आणि तो तिच्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे एक स्मित होते . ते पाहून तिला आश्चर्य वाटले. पण ती मात्र स्तब्ध होती.
" तुला आठवते , मी तुला म्हणालो होतो त्या दिवशी कि माझी एक ईच्छा आहे - या वेळी तू मला निरोप देण्यासाठी विमानतळापर्यंत यावेस. तू निश्चितच बोल्ड अक्षरांत 'नाही' असेच म्हणाली होतीस. पण आता बघ , नियतीने कसा डाव मांडला आहे. तू मला अगदी शेवटच्या फाटकापर्यंत सोबत देते आहेस.तू सुद्धा एकदा या दृष्टिकोनातून आपला विचार करून बघ जरा . माझी ही इच्छा पूर्ण झालीच आहे ... इतरही नक्कीच पूर्ण होतील यात आता मला कोणतीच शंका नाही . "
तो इतके बोलला आणि त्याचे पाय विमानाच्या दिशेने चालू लागले. पण कितीतरी वेळ त्याची नजर तिलाच पाहत राहिली . आणि ती सुद्धा तिथेच थांबून होती अगदी तो अदृश्य होईपर्यंत.

त्याच्या शेवटच्या वाक्याने तिच्या मनातील विचारांच्या भरतीला उधाण आणले होते. वेगवेगळ्या भावनांच्या लाटा तिच्या चित्तहृदयावर येऊन धडकून मागे सरत होत्या. तिच्याही विमानाची आता वेळ झाली होती. ती आपल्याच स्वप्नांच्या दुनियेत होती.  विमानात शिरतानाचे सारे उपचार अगदी यंत्रवत घडत होते. विमानातल्या खिडकीजवळच्या आसनावर ती बसली होती. एरव्ही विमान , त्यातील रचना , TV या सर्वांचे विशेष आकर्षण वाटणारी ती आज या सर्वापासून अलिप्त होती. कितीतरी वेळ तिने असाच घालवला. काही वेळाने तिने समोरच्या आसनाशी बांधलेला हेडफोन मोकळा करून तो कानाला लावला. नेहमी सर्व चॅनेल्स ची कितीदातरी सैर करणारी ती आज मात्र जॅकबॉक्सच्या एका गाण्यापाशी थांबली-" तेरा होने लगा हूँ...खोने लगा हूँ ... जबसे मिला हूँ..... "
 कोणता चित्रपट ? कोणावर चित्रित ?... या सर्वांशी आज तिला देणेघेणे उरले नव्हते. पण त्या शब्दांनी मात्र तिच्या मनाचा आता अचूक ठाव घेतला होता. त्या गीताच्या ओळींमध्ये तिला तिचे उत्तर गवसत होते. कुठेतरी तिचे मन थांबून तिला एक गोड इशारा देत होते.
' तो क्यू ना मैं भी
 कह दूँ कह दूँ
हुआ मुझे भी प्यार हुआ.... ' 
आकाशातली तिची ही आजची भरारी आज तिच्या आनंदाच्या परमोच्च बिंदूच्या समोर ठेंगणी वाटत होती कारण या दोन तासांच्या प्रवासातील या तीन ओळींसोबत उद्याच्या भविष्यात तिच्या वाट्याला येणारे गोड क्षण कितीदा तरी ती स्वप्नवत अनुभवत होती .

छायाचित्रसौजन्य -निखिल देशपांडे
- रुपाली ठोंबरे .

तो आणि....ती (भाग १)


छायाचित्रसौजन्य - निखिल देशपांडे
ती...विमानतळावर प्रतीक्षाकक्षामध्ये अगदी पहिल्याच रांगेत समोरच्या खुर्चीवर बसलेली. एक पर्स आणि पाठीवरच्या लॅपटॉप बॅगेव्यतिरिक्त इतर सर्व सामान बॅगेज काउंटरवर जमा करून आता कुठे ती निवांत झाली होती. भौतिक हालचाली आता कमी होत्या पण मन ?... मनात अजूनही शांतता नव्हती.

तिच्या आसपास बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. पण लोकांची बरीच वर्दळ तिच्या आसपास सुरु होती.कदाचित बाजूच्याच टर्मिनल वरून रवाना होणाऱ्या विमानाची वेळ आता झाली होती. कोणी आपले सामान सांभाळत धावतपळत होते तर कोणी त्याही परिस्थितीत आपल्या मागचा कुटुंबाचा लवाजमा सांभाळत आरामात तिकीटतपासणी डेस्क पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. हवाईसुंदरी टापटीप गणवेषांत लगबगीने विमानफाटकाच्या दिशेने ये जा करत होत्या. किंचित पडद्याआडून दिसणाऱ्या काचेच्या खिडक्यांतून डोकावणारा सूर्यप्रकाश बाहेर पहाटेची वेळ ओसरल्याची वर्दी देत होता. ती बसली होती त्या जागी AC चा गारवा चांगलाच जाणवत होता त्यामुळे तिला थंडी देखील वाजत असावी... पण ती तसेच आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट बांधून तिथेच बसून होती. तिच्या समोरच्या खुर्च्यांवर कित्येक आले आणि कित्येक गेले पण तिचे मात्र या सर्वांकडे भानच नव्हते.

ती... दंग होती कुणाची तरी वाट पाहण्यात. सभोवताली इतक्या हालचाली सुरु असल्या तरी तिचे डोळे लागले  होते ते फक्त दरवाजाकडे...तिथून येणाऱ्या प्रत्येकाला ती न्याहाळत होती...आणि तिचे कान रोखून होते फक्त मोबाईच्या रिंगच्या दिशेने. आतापर्यंत बरेचदा तो फोनदेखील  वाजला होता पण तिला हवा तो संवाद मात्र अजूनपर्यंत घडला नव्हता...ज्याची प्रतीक्षा होती तो त्या दरवाजापाशी दिसत नव्हता... त्यामुळे क्षणाक्षणाला तिची अस्वस्थता वाढत होती. १० मिनिट...२० मिनिट असा जवळजवळ तासभर उलटून गेला पण तरी नशीब साथ देईना. शेवटी पंचेंद्रियांपैकी या दोन इंद्रियांवर विश्वास ठेवून तिचे मन मात्र आता स्वच्छंदपणे भिरभिरू लागले...जुन्या आठवणींत...काही कालपरवाच घडलेल्या तर काही पार वर्षांपूर्वीच्या.नकळतच एखादी निरर्थक शंकेची पालदेखील मध्येच चुकचुकली होती. ज्याचा आवाज ऐकण्यासाठी ती आतापर्यंत आतुर होती... ज्याला पाहण्यासाठी ती इतकी उत्सुक होती तो चेहरा आता तिला दिसत होता तिच्याच मनातल्या आठवणींच्या झरोक्यांमध्ये.

 ती आणि तो... दोघे एकाच शाळेत लहानाचे मोठे झाले. कॉलेजदेखील एकच... पण तरी म्हणावा तितका संपर्क कधी आलाच नव्हता. ती स्वभावाने शांत असली तरी अतिशय कार्यक्षम. सतत या ना त्या उपक्रमांत सहभागी असायची...त्यामुळे तिचा मित्रमैत्रिणींचा गोतावळा खूप मोठा होता. एका विशिष्ट ठिकाणी तिचे सापडणे म्हणजे अशक्यच. निर्वी जितकी अस्थिर सार्थक तितकाच स्थिर. उद्या काय करायचे याचा संपूर्ण आराखडा त्याच्याकडे नेहमीच तयार असायचा. अभ्यासातही तो अव्वल त्यामुळे अभ्यासात साधारण असलेली ती त्याच्यापासून दूरच असायची. कधीतरी एखादी भेट व्हायची आणि तीदेखील एखाद्या गृहपाठाच्या वहीच्या देवाणघेवाणीनंतर समाप्त होई. तिच्यासाठी तो नेहमीच फक्त एक चांगला मित्र... खूप हुशार, खूप मेहनती आणि चांगल्या स्वभावाचा. तिच्या मैत्रीच्या भल्या मोठया पुष्पगुच्छातील तो ही एक गुलाब होता. पण तो...तो मात्र एका वेगळ्याच नावेत तरंगत होता. अभ्यासाव्यतिरिक्त कशातच रुची नसलेल्या त्याच्या जीवनातील ती म्हणजे एकमेव फूल. पण अस्पष्टशा आकर्षणाव्यतिरिक्त इतर कोणतेच भाव तेव्हा अस्तित्वात नव्हते आणि ती न सुरु झालेली कहाणी तिथेच विरली. काळ असाच लोटला. दोघे आपापल्या इयत्तेत वर चढत गेले. पुढे तो शिकण्यासाठी अमेरिकेत निघून गेला. ती मात्र एका नावाजलेल्या कंपनीत कमला लागली आणि तिथेच आनंदात राहिली. नव्या देशात पाऊल ठेवले आणि नकळत ई-मेल आणि पुढे चॅटिंग च्या माध्यमातून ती अधुरी राहिलेली कहाणी पुन्हा सुरु झाली. तो तिला रोज त्या नव्या देशाची सैर करवायचा आणि ती तिच्या नोकरीनंतरच्या नव्या जगाच्या गंमतीजंमती शेअर करायची. या गंमतीजंमती पुढे त्यांच्या दोघांच्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला. पुढे आनंदासोबतच दुःखाचीही देवाणघेवाण सुरु झाली. ती तिच्या स्वप्नांबद्दल अगदी भरभरून बोलायची, त्याच्यासमोर स्वतःला अगदी मोकळं करायची. तो मात्र अजूनही शांतच असायचा. तिचे फक्त ऐकत राहणे हाच त्याचा छंद जणू. तिच्यासाठी हा फक्तच एक मैत्रीचा धागा होता त्यामुळे तिने कधीही खोलात उतरून त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता. तो मात्र तिला समजून घेत राहिला किती तरी दिवस... किती तरी महिने... कितीतरी वर्षे. त्याच्यासाठी तो मैत्रीचा धागा केव्हाच प्रेमाचा बंध झाला होता... अगदीच नकळत , दोघांच्याही.

इतक्या वर्षानंतर गेल्या महिन्यात तो पुन्हा तिच्या शहरात आला होता. माझा खूप जवळचा मित्र आला आहे म्हणून ती फार खुश होती.त्याच्या परदेशवारीनंतर झालेल्या पहिल्या भेटीमध्ये तिच्या अगदी सामान्य मुलीसारख्या अपेक्षा होत्या ज्या पूर्ण झाल्या नसल्याने ती सुरुवातीला दुखावलीच. पण तिने तसे बोलून दाखवले नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या ज्यात आज नाविन्य फक्त इतकेच कि आज या गप्पा समोरासमोर होत होत्या.. चॅट वर नव्हे. पुढे तिला वाटले आणि तिने ते बोलूनही दाखवले " काय रे तू ? इतका अमेरिकेतून आलास. साधे एक चॉकलेट आणले नाहीस माझ्यासाठी? मला तर वाटले होते कि चांगला परफ्युम आणशील शोधून. माझ्यासाठी काहीच का आणावेसे वाटले नाही ?". पण तिच्या या प्रश्नांना त्याच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाहीत कारण हे प्रश्न ... हे शब्द तिच्या मनातच राहिले होते... ओठांवर आलेच नाहीत. नकळत मनात हक्काने निर्माण झालेल्या या अपेक्षांचे कारण तिचे तिलाच त्या क्षणी उमगत नव्हते. तिच्या मनातल्या त्या अचानक उठलेल्या बेभान वाऱ्याला शमवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने तिच्या मनात फक्त एका नव्या प्रश्नाने एक वेगळेच वादळ निर्माण केले. बोलता बोलता चुकून नव्हे तर अगदी निर्धाराने सार्थकने निर्वीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अप्रत्यक्षपणे लग्नाची मागणी देखील घातली होती. तो किती सहजतेने बोलून गेला हे सर्व... जणू वाऱ्याची एखादी नाजुकशी झुळूक, पण तिच्या मनात मात्र या झुळुकेने क्षणात थैमान घातले होते. त्या क्षणी काहीच सुचेना... होकार... नकार ... काही काहीसुद्धा सुचत नव्हते. असेच काही क्षण उलटले. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित , एक उत्सुकता कायम होती आणि ते पाहून तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता अधिक वाढू लागली. पण काही काळातच सारे स्थिर झाले... क्षणांपूर्वीचे वादळ आता शांत झाले होते. इतक्या वेळापासून अबोल  असलेल्या तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले... ते नकाराचे. सोबत तिच्या चेहऱ्यावर एक अपराधीपणाची भावना उमटली होती पण त्याच्या चेहऱ्यावरच्या खिन्नतेसमोर ते सारे फार फिके होते. तिने दिलेल्या नकाराचे कारण त्याला काही केल्या पटेना कारण दोघांमध्ये असलेल्या ज्या दरी आणि भिंती तिला स्पष्ट दिसत होत्या त्या त्याला काही केल्या दिसत नव्हत्या किंवा त्याला त्यांना जाणून घेण्याची गरजही भासत नव्हती.त्याची खूप इच्छा होती तिने या खेपेला त्याला विमानतळावर निरोप द्यायला यावे. विविध प्रकारे तिच्या घेतलेल्या निर्णयावर त्याने किती समजावले ... पण तिच्या नकाराचे बोल बदललेच नाहीत. उलट यापुढे आपले मैत्रीचे नाते आज संपले , यापुढे कधीही भेटू नकोस अशा शब्दांत ती भेट तिथेच गोठली होती .

त्यानंतर महिनाभर त्याच्याकडून एकही फोन आला नाही. पण का कुणास ठाऊक ती मात्र प्रत्येक क्षणाला त्याच्या फोनची वाट पाहत असायची. पुढे तीही तिच्या कामात गुंतून गेली. परदेशात जाण्याची एक संधी अचानक तिच्या दिशेने चालून आली. वेळ फार कमी होता त्यामुळे ती आता त्या तयारीत लागली आणि बघता बघता तो महिना कसा उलटून गेला हे तिला कळलेच नाही.एके दिवशी भिंतीवर फडफडणाऱ्या कालनिर्णयकडे ती बराच वेळ टक लावून पाहत होती. तिच्या नकळतच तिच्या डोळ्यांतून पाणी तरळत होते. का?.. कुणासाठी?... कशासाठी?..  हे त्या क्षणी तिलाही कळत नव्हते किंबहुना जे जाणवत होते त्यावर तिला विश्वास ठेवायचा नव्हता.उद्या तो परत जाणार होता. त्यानंतर पुन्हा कितीतरी वर्षे ते दोघे भेटणार नव्हते. अगदी जाईपर्यंत त्याचा काहीच पत्ता नाही हे पाहून ती दुखावली होती. हे सर्व इतक्या शिगेला पोहोचेल असा विचारही तिने केला नव्हता... माझे बोलणे त्याने खरेच मनावर घेतले असेल का? खरेच मैत्री संपली ? नाही नाही मी हे सहनच करू शकणार नाही. ती तशीच उठली आणि तिने फोन हाती घेतला.फोनची रिंग ऐकू येत होती पण तो प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. जर त्याने फोन उचललाच नाही तर... ? अशी शंकाही एकदा मनात येऊन गेली पण पुढच्याच क्षणी त्याचा आवाज ऐकला आणि तिचा जीव भांड्यात पडला.
" काय रे ,इतके रागवायचे? साधा एक फोन नाही तुझा."
 तिच्या या हक्काच्या खोट्या रागाच्या स्वरावर उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने हास्य प्रकट झाले
" अगं तूच तर म्हणालीस ना कि आता आपल्यातले मैत्रीचे नाते संपले म्हणून मग ?म्हणून म्हटले कशाला उगाच त्रास द्या. "
तो थट्टेच्या स्वरात म्हणाला. 
" काहीही हां. ते सोड. तुला कितीदा सांगितले आहे मी कि माझ्या गोष्टींना इतके मनावर घेत जाऊ नकोस "
तिने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला .
"म्हणजे तुझ्याकडून होकाराची अपेक्षा ठेवतो मग.  "
त्याच्या या बोलण्याने हास्याचे एक निखळ कारंजे त्या संवादात निर्माण झाले. दोघांच्याही मनांवरचा ताण  आता हलका झाला होता. त्या संभाषणातच दोघांच्याही लक्षात आले कि दोघांच्या परदेशात जाण्याची तारीख आणि वेळ जवळपास एकच आहे.
" चल मग आता आपण उद्या विमानतळावरच भेटू."
असे म्हणत त्याने फोन ठेवला. तिच्या आनंदाला तर आज सीमाच उरली नव्हती.

कालचे ते संभाषण तिला जसेच्या तसे आठवत होते. ती त्याच विचारांत मग्न होती... कधी स्वतःशीच हसायची तर दुसऱ्याच क्षणी गंभीर होत होती. पण तिची नजर मात्र त्या दरवाजावरच खिळून होती. हा विसरला तर नसेल ना अशी शंका देखील एका क्षणी मनात येऊन गेली. 

याच शंका-आकांक्षांच्या लपाछुपीत तिची अवस्था मात्र फार केविलवाणी झाली होती. इतक्यात तो दिसला.इतक्या उशिरा का होईना पण तो आता आला होता . तिथेच त्याच दरवाजातून आत शिरला. निळा शर्ट , त्यावर तपकिरी रंगाचा कोट आणि डेनिमची जीन्स... तो फारच रुबाबदार दिसत होता. तिने त्याला असे कोटमध्ये यापूर्वी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे ती या देखण्या रूपावर फारच भाळून गेली.आता हा बघता क्षणी माझ्याशी बोलेल, उशीर झाला म्हणून एक छानसे सॉरी म्हणेल, मला पाहून खूप आनंदी होईल असे तिला वाटत होते म्हणून ती त्या उत्साहात उभी राहू लागली पण काय विपरीत घडले. तो तिच्याकडे ना पाहता तडक शेजारच्या टर्मिनलमध्ये निघून गेला आणि ती त्याची प्रतिमा नजरेआड होईपर्यंत पाहतच राहिली. ती आता अगदी स्तब्ध झाली होती.तिला त्या क्षणावर विश्वासच बसेना.

 - रुपाली ठोंबरे. 
 

Monday, February 12, 2018

बालमैफल -२

बालमैफल -२
 माझी लोकसत्ता मध्ये आलेली दुसरी कथा...हा खेळ सावल्यांचा. 


वाचण्यासाठी लिंक :
हा खेळ सावल्यांचा. 


- रुपाली ठोंबरे .

Thursday, February 1, 2018

"ईश्वर अल्ला तेरो नाम"- मेळ भाषांचा...खेळ अक्षरांचा !" येथे दोन भाषा एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर नृत्य सादर करत आहेत असा भास होतो आहे "

सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक यांचे हे उद्गार होते एका उदघाटन समारंभातील.उदघाटन...अच्युत पालव आणि सल्वा रसूल या दोन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुलेखनकारांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या "ईश्वर अल्ला तेरो नाम" या प्रदर्शनाचे. ६ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित केल्या गेलेल्या या उदघाटनाचे प्रमुख अतिथी होते सर्वांचे चाहते अभिनेते नासिरुद्दीन शाह आणि त्यांच्या पत्नी रत्ना पाठक.सर्व मान्यवरांची उपस्थिती,दोघा सुलेखनकारांच्या चाहत्यांची गर्दी आणि सोबत देवकी पंडित यांच्या सुरेल स्वरांनी या उदघाटनसोहळ्याला अतिशय सुंदर रूप प्राप्त झाले. 

या कलादालनातील सर्वच चित्रे खूप सुंदर आणि बोलकी होती. त्यातील प्रत्येक चित्र काहीतरी सांगत होते. दोघांच्या शैली विविध होत्या पण त्या एकत्र आल्याने त्यातील सौन्दर्य अधिक खुलून आले होते.त्यातील अच्युत पालव यांचे देवनागरी आणि उर्दू भाषेतील एकत्रित काम पाहिले आणि क्षणभर वाटले जणू काहीश्या कारणांमुळे एकमेकांपासून दुरावलेल्या या अखंड विश्वातील दोन बहिणी आज एकत्र आल्या...गळ्यात गळे मिळवून एकमेकींना आलिंगन देताहेत...एकाच कल्पनेच्या हिंदोळ्यावर झोके घेत एकच गीत गाताहेत... भले त्या गीताची भाषा,अक्षरे  वेगवेगळी असो पण सूर ,ताल, अर्थ, लय मात्र एकच. दोघींचे स्वतःचेच असे एक वैशिष्ट्य ,स्वतःचीच दुसरीपासून वेगळी अशी एक चाल, एका विशिष्ट संस्कृतीसोबत बांधली गेलेली नाळ पण तरी या दोघी त्या त्या लिपीतील आभूषणांनी नटलेल्या...आणि त्यामुळे दोघीही आपापल्या जागी सुंदर दिसताहेत.उलट एकमेकींच्या साथीने त्यांचे सौदंर्य कैक पटीने वाढले आहे. कोणी कोणापेक्षा वरचढ नाही...किंबहुना त्यांच्यात अशी कोणती चढाओढ सुरूच नाही...या स्पर्धा आणि त्यातून वाद तर आपण माणसांनीच निर्माण केले आहेत.खरेच 'वसुधैव कुटुम्बकम' या उक्तीचा कुठेतरी विसर पडत असलेल्या माणसांना एकत्र आणण्यासाठी या सुंदर विश्वाच्या विविध भाषाकन्यांचा एकत्र मेळ आज असायला हवा. आणि याच उद्देशातून देवनागरी आणि उर्दू या दोन विभिन्न भाषांना कलेच्या माध्यमातून एकत्र आणून एक सुंदर चित्र निर्माण केले गेले आणि काय आश्चर्य! वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या ढंगाच्या या दोन लिपी जेव्हा एका कागदावर अच्युत पालव यांच्या कुंचल्यातून अवतरल्या तेव्हा त्यातून जे निर्माण झाले ते केवळ अप्रतिम...

"ईश्वर अल्ला तेरो नाम" हे प्रदर्शन केवळ ४० चित्रांचे दालन नाही तर तो एक सुलेखनाच्या रूपातील भाषा आणि लिपी यांना जोडणारा संवाद आहे...रंग-कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी विविधतेला एकत्र आणणारा कलात्मक सेतू आहे. अरेबिक भाषेमध्ये सुलेखन करत असणाऱ्या सल्वा  रसूल यांच्या मते आपला देश अनेक बाबतींत वैविध्यतेने समृद्ध आहे. ही विविधता एकत्र साजरी केली पाहिजे.या प्रदर्शनातील अनेक चित्रांमध्ये ओम आणि अल्ला किंवा ईश्वर आणि अल्ला या शाश्वत पवित्र धाग्यांना सुलेखनकलेच्या माध्यमातून अशाप्रकारे सुंदर रीतीने एकत्र विणले आहे कि त्यातून ओम आणि अल्ला दोघे एकाच परमेश्वराचे रूप आहे असा संदेश समाजात पोहोचेल. ही चित्रे पाहणारे प्रेक्षक नक्कीच समाजातील विविध पार्श्वभूमीतून आलेले असतील ... कदाचित त्यांना कॅलिग्राफीचे अचूक ज्ञान नसेल किंवा चित्रांत वापरल्या गेलेल्या सर्व भाषांचे आकलन नसेल पण तरी त्या चित्रांतून एक सुंदर संदेश, एक आनंद , समाधान नक्कीच मिळेल.समाजातील विविध घटकांतील जनसामान्यांमध्ये शांती आणि एकोपा निर्माण करणे हाच या प्रदर्शनाचा मूळ उद्देश आहे.हाच उद्देश मनाशी बाळगणारे सुलेखनकार अच्युत पालव हे भारतीय कॅलिग्राफीच्या क्षेत्रातील एक नावाजलेले नाव. ते या प्रदर्शनाबद्दल अगदी भरभरून बोलतात कारण ते हे प्रदर्शन म्हणजे इतके वर्षे प्रेम देणाऱ्या समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य मानतात.कला हे समाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे एक सुंदर,आकर्षक आणि तितकेच प्रभावी माध्यम आहे असे ते म्हणतात. जगातील भारत हा एकमेव असा देश आहे जो भाषा, संस्कृती , लिपी ,इतिहास अशा असंख्य बाबतींत वैविध्यतेने नटलेला आहे. इतक्या भाषा आणि लिप्या असूनही भारतात त्यांच्यावर हवे तितके काम आतापर्यंत झाले नाही अशी खंत ते व्यक्त करतात. परंतू सोबतच या प्रदर्शनाच्या माध्यमातून कॅलिग्राफी सारखा सुंदर प्रकार नक्कीच जनसामान्यांपर्यंत पोहोचून प्रकाशाच्या झोतात येईल अशी आशा ते व्यक्त करतात. संगीत, नृत्य अशा वेगवेगळ्या माध्यमांसोबत सुलेखनाचे नाते अतिशय सुंदररित्या जोडण्यात यशस्वी होऊन इतरांना प्रत्येकवेळी चकित करणारे अच्युत पालव या प्रदर्शनात आपली कोणती जादू दाखवतील हे नक्कीच उत्सुकता वाढवणारे असेल

खरेतर देवनागरी आणि उर्दू या दोन्ही भाषा एकमेकांपासून फार निराळ्या...भाषा निराळी,लिपी निराळी, त्यांच्याशी बांधली गेलेली संस्कृती निराळी इतकेच काय तर ही भाषा लिहिण्याची दिशा देखील निराळी पण तरी या विभिन्नतेतही एकता दिसून येते ती रेषांमुळे... लिपी देवनागरी असो वा उर्दू, रेषा आणि वळणे ही आलीच...  भले त्यांच्या दिशा वेगळ्या असतील पण एकाच विचारातून साकार झालेल्या वेगवेगळ्या रेषांतून मांडलेल्या शब्दांना मात्र एकच अर्थ असू शकतो. तो शब्द... त्या रेषा... आपल्याला काही सांगू इच्छित असतात...नजरेच्या स्पर्शातून एक मुग्ध संवाद साधत असतात.समोर असणारा शब्द केवळ एका विशिष्ट लिपीत रेखाटलेला शब्द नव्हे तर तो एक विचार आहे... कलाकाराच्या अंतर्मनातून उमटलेला.आजच्या जगात जिथे माणसामाणसातील विश्वासाला तडा जात एक विचित्र भयानक दरी निर्माण होत आहे तिथे गरज आहे शांती प्रस्थापित करणारा, विविधतेतील एकोपा टिकून राहण्यासाठी प्रयत्नशील ठरणारा असा हा सुंदर संवाद अनुभवण्याची. या दोन विविध लिप्यांना आदर देत एकत्र मांडलेल्या, दोन सुलेखनकारांच्या अक्षरांच्या माध्यमांतून साकारल्या जाणाऱ्या सुंदर विचारांच्या अनुभूतीसाठी नक्कीच आवश्यक आहे एक भेट... "ईश्वर अल्ला तेरो नाम" या प्रदर्शनाची.

"ईश्वर अल्ला तेरो नाम"
कॅलिग्राफी प्रदर्शन
स्थळ : नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी
वेळ : ते १२ फेब्रुवारी , २०१८
         सकाळी ११.०० ते संध्याकाळी वाजेपर्यंत.
                                                                   - रुपाली ठोंबरे.

Blogs I follow :