Wednesday, February 14, 2018

तो आणि....ती (भाग १)


छायाचित्रसौजन्य - निखिल देशपांडे
ती...विमानतळावर प्रतीक्षाकक्षामध्ये अगदी पहिल्याच रांगेत समोरच्या खुर्चीवर बसलेली. एक पर्स आणि पाठीवरच्या लॅपटॉप बॅगेव्यतिरिक्त इतर सर्व सामान बॅगेज काउंटरवर जमा करून आता कुठे ती निवांत झाली होती. भौतिक हालचाली आता कमी होत्या पण मन ?... मनात अजूनही शांतता नव्हती.

तिच्या आसपास बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. पण लोकांची बरीच वर्दळ तिच्या आसपास सुरु होती.कदाचित बाजूच्याच टर्मिनल वरून रवाना होणाऱ्या विमानाची वेळ आता झाली होती. कोणी आपले सामान सांभाळत धावतपळत होते तर कोणी त्याही परिस्थितीत आपल्या मागचा कुटुंबाचा लवाजमा सांभाळत आरामात तिकीटतपासणी डेस्क पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. हवाईसुंदरी टापटीप गणवेषांत लगबगीने विमानफाटकाच्या दिशेने ये जा करत होत्या. किंचित पडद्याआडून दिसणाऱ्या काचेच्या खिडक्यांतून डोकावणारा सूर्यप्रकाश बाहेर पहाटेची वेळ ओसरल्याची वर्दी देत होता. ती बसली होती त्या जागी AC चा गारवा चांगलाच जाणवत होता त्यामुळे तिला थंडी देखील वाजत असावी... पण ती तसेच आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट बांधून तिथेच बसून होती. तिच्या समोरच्या खुर्च्यांवर कित्येक आले आणि कित्येक गेले पण तिचे मात्र या सर्वांकडे भानच नव्हते.

ती... दंग होती कुणाची तरी वाट पाहण्यात. सभोवताली इतक्या हालचाली सुरु असल्या तरी तिचे डोळे लागले  होते ते फक्त दरवाजाकडे...तिथून येणाऱ्या प्रत्येकाला ती न्याहाळत होती...आणि तिचे कान रोखून होते फक्त मोबाईच्या रिंगच्या दिशेने. आतापर्यंत बरेचदा तो फोनदेखील  वाजला होता पण तिला हवा तो संवाद मात्र अजूनपर्यंत घडला नव्हता...ज्याची प्रतीक्षा होती तो त्या दरवाजापाशी दिसत नव्हता... त्यामुळे क्षणाक्षणाला तिची अस्वस्थता वाढत होती. १० मिनिट...२० मिनिट असा जवळजवळ तासभर उलटून गेला पण तरी नशीब साथ देईना. शेवटी पंचेंद्रियांपैकी या दोन इंद्रियांवर विश्वास ठेवून तिचे मन मात्र आता स्वच्छंदपणे भिरभिरू लागले...जुन्या आठवणींत...काही कालपरवाच घडलेल्या तर काही पार वर्षांपूर्वीच्या.नकळतच एखादी निरर्थक शंकेची पालदेखील मध्येच चुकचुकली होती. ज्याचा आवाज ऐकण्यासाठी ती आतापर्यंत आतुर होती... ज्याला पाहण्यासाठी ती इतकी उत्सुक होती तो चेहरा आता तिला दिसत होता तिच्याच मनातल्या आठवणींच्या झरोक्यांमध्ये.

 ती आणि तो... दोघे एकाच शाळेत लहानाचे मोठे झाले. कॉलेजदेखील एकच... पण तरी म्हणावा तितका संपर्क कधी आलाच नव्हता. ती स्वभावाने शांत असली तरी अतिशय कार्यक्षम. सतत या ना त्या उपक्रमांत सहभागी असायची...त्यामुळे तिचा मित्रमैत्रिणींचा गोतावळा खूप मोठा होता. एका विशिष्ट ठिकाणी तिचे सापडणे म्हणजे अशक्यच. निर्वी जितकी अस्थिर सार्थक तितकाच स्थिर. उद्या काय करायचे याचा संपूर्ण आराखडा त्याच्याकडे नेहमीच तयार असायचा. अभ्यासातही तो अव्वल त्यामुळे अभ्यासात साधारण असलेली ती त्याच्यापासून दूरच असायची. कधीतरी एखादी भेट व्हायची आणि तीदेखील एखाद्या गृहपाठाच्या वहीच्या देवाणघेवाणीनंतर समाप्त होई. तिच्यासाठी तो नेहमीच फक्त एक चांगला मित्र... खूप हुशार, खूप मेहनती आणि चांगल्या स्वभावाचा. तिच्या मैत्रीच्या भल्या मोठया पुष्पगुच्छातील तो ही एक गुलाब होता. पण तो...तो मात्र एका वेगळ्याच नावेत तरंगत होता. अभ्यासाव्यतिरिक्त कशातच रुची नसलेल्या त्याच्या जीवनातील ती म्हणजे एकमेव फूल. पण अस्पष्टशा आकर्षणाव्यतिरिक्त इतर कोणतेच भाव तेव्हा अस्तित्वात नव्हते आणि ती न सुरु झालेली कहाणी तिथेच विरली. काळ असाच लोटला. दोघे आपापल्या इयत्तेत वर चढत गेले. पुढे तो शिकण्यासाठी अमेरिकेत निघून गेला. ती मात्र एका नावाजलेल्या कंपनीत कमला लागली आणि तिथेच आनंदात राहिली. नव्या देशात पाऊल ठेवले आणि नकळत ई-मेल आणि पुढे चॅटिंग च्या माध्यमातून ती अधुरी राहिलेली कहाणी पुन्हा सुरु झाली. तो तिला रोज त्या नव्या देशाची सैर करवायचा आणि ती तिच्या नोकरीनंतरच्या नव्या जगाच्या गंमतीजंमती शेअर करायची. या गंमतीजंमती पुढे त्यांच्या दोघांच्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला. पुढे आनंदासोबतच दुःखाचीही देवाणघेवाण सुरु झाली. ती तिच्या स्वप्नांबद्दल अगदी भरभरून बोलायची, त्याच्यासमोर स्वतःला अगदी मोकळं करायची. तो मात्र अजूनही शांतच असायचा. तिचे फक्त ऐकत राहणे हाच त्याचा छंद जणू. तिच्यासाठी हा फक्तच एक मैत्रीचा धागा होता त्यामुळे तिने कधीही खोलात उतरून त्याला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नव्हता. तो मात्र तिला समजून घेत राहिला किती तरी दिवस... किती तरी महिने... कितीतरी वर्षे. त्याच्यासाठी तो मैत्रीचा धागा केव्हाच प्रेमाचा बंध झाला होता... अगदीच नकळत , दोघांच्याही.

इतक्या वर्षानंतर गेल्या महिन्यात तो पुन्हा तिच्या शहरात आला होता. माझा खूप जवळचा मित्र आला आहे म्हणून ती फार खुश होती.त्याच्या परदेशवारीनंतर झालेल्या पहिल्या भेटीमध्ये तिच्या अगदी सामान्य मुलीसारख्या अपेक्षा होत्या ज्या पूर्ण झाल्या नसल्याने ती सुरुवातीला दुखावलीच. पण तिने तसे बोलून दाखवले नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या ज्यात आज नाविन्य फक्त इतकेच कि आज या गप्पा समोरासमोर होत होत्या.. चॅट वर नव्हे. पुढे तिला वाटले आणि तिने ते बोलूनही दाखवले " काय रे तू ? इतका अमेरिकेतून आलास. साधे एक चॉकलेट आणले नाहीस माझ्यासाठी? मला तर वाटले होते कि चांगला परफ्युम आणशील शोधून. माझ्यासाठी काहीच का आणावेसे वाटले नाही ?". पण तिच्या या प्रश्नांना त्याच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाहीत कारण हे प्रश्न ... हे शब्द तिच्या मनातच राहिले होते... ओठांवर आलेच नाहीत. नकळत मनात हक्काने निर्माण झालेल्या या अपेक्षांचे कारण तिचे तिलाच त्या क्षणी उमगत नव्हते. तिच्या मनातल्या त्या अचानक उठलेल्या बेभान वाऱ्याला शमवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने तिच्या मनात फक्त एका नव्या प्रश्नाने एक वेगळेच वादळ निर्माण केले. बोलता बोलता चुकून नव्हे तर अगदी निर्धाराने सार्थकने निर्वीसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि अप्रत्यक्षपणे लग्नाची मागणी देखील घातली होती. तो किती सहजतेने बोलून गेला हे सर्व... जणू वाऱ्याची एखादी नाजुकशी झुळूक, पण तिच्या मनात मात्र या झुळुकेने क्षणात थैमान घातले होते. त्या क्षणी काहीच सुचेना... होकार... नकार ... काही काहीसुद्धा सुचत नव्हते. असेच काही क्षण उलटले. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित , एक उत्सुकता कायम होती आणि ते पाहून तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता अधिक वाढू लागली. पण काही काळातच सारे स्थिर झाले... क्षणांपूर्वीचे वादळ आता शांत झाले होते. इतक्या वेळापासून अबोल  असलेल्या तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले... ते नकाराचे. सोबत तिच्या चेहऱ्यावर एक अपराधीपणाची भावना उमटली होती पण त्याच्या चेहऱ्यावरच्या खिन्नतेसमोर ते सारे फार फिके होते. तिने दिलेल्या नकाराचे कारण त्याला काही केल्या पटेना कारण दोघांमध्ये असलेल्या ज्या दरी आणि भिंती तिला स्पष्ट दिसत होत्या त्या त्याला काही केल्या दिसत नव्हत्या किंवा त्याला त्यांना जाणून घेण्याची गरजही भासत नव्हती.त्याची खूप इच्छा होती तिने या खेपेला त्याला विमानतळावर निरोप द्यायला यावे. विविध प्रकारे तिच्या घेतलेल्या निर्णयावर त्याने किती समजावले ... पण तिच्या नकाराचे बोल बदललेच नाहीत. उलट यापुढे आपले मैत्रीचे नाते आज संपले , यापुढे कधीही भेटू नकोस अशा शब्दांत ती भेट तिथेच गोठली होती .

त्यानंतर महिनाभर त्याच्याकडून एकही फोन आला नाही. पण का कुणास ठाऊक ती मात्र प्रत्येक क्षणाला त्याच्या फोनची वाट पाहत असायची. पुढे तीही तिच्या कामात गुंतून गेली. परदेशात जाण्याची एक संधी अचानक तिच्या दिशेने चालून आली. वेळ फार कमी होता त्यामुळे ती आता त्या तयारीत लागली आणि बघता बघता तो महिना कसा उलटून गेला हे तिला कळलेच नाही.एके दिवशी भिंतीवर फडफडणाऱ्या कालनिर्णयकडे ती बराच वेळ टक लावून पाहत होती. तिच्या नकळतच तिच्या डोळ्यांतून पाणी तरळत होते. का?.. कुणासाठी?... कशासाठी?..  हे त्या क्षणी तिलाही कळत नव्हते किंबहुना जे जाणवत होते त्यावर तिला विश्वास ठेवायचा नव्हता.उद्या तो परत जाणार होता. त्यानंतर पुन्हा कितीतरी वर्षे ते दोघे भेटणार नव्हते. अगदी जाईपर्यंत त्याचा काहीच पत्ता नाही हे पाहून ती दुखावली होती. हे सर्व इतक्या शिगेला पोहोचेल असा विचारही तिने केला नव्हता... माझे बोलणे त्याने खरेच मनावर घेतले असेल का? खरेच मैत्री संपली ? नाही नाही मी हे सहनच करू शकणार नाही. ती तशीच उठली आणि तिने फोन हाती घेतला.फोनची रिंग ऐकू येत होती पण तो प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. जर त्याने फोन उचललाच नाही तर... ? अशी शंकाही एकदा मनात येऊन गेली पण पुढच्याच क्षणी त्याचा आवाज ऐकला आणि तिचा जीव भांड्यात पडला.
" काय रे ,इतके रागवायचे? साधा एक फोन नाही तुझा."
 तिच्या या हक्काच्या खोट्या रागाच्या स्वरावर उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने हास्य प्रकट झाले
" अगं तूच तर म्हणालीस ना कि आता आपल्यातले मैत्रीचे नाते संपले म्हणून मग ?म्हणून म्हटले कशाला उगाच त्रास द्या. "
तो थट्टेच्या स्वरात म्हणाला. 
" काहीही हां. ते सोड. तुला कितीदा सांगितले आहे मी कि माझ्या गोष्टींना इतके मनावर घेत जाऊ नकोस "
तिने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला .
"म्हणजे तुझ्याकडून होकाराची अपेक्षा ठेवतो मग.  "
त्याच्या या बोलण्याने हास्याचे एक निखळ कारंजे त्या संवादात निर्माण झाले. दोघांच्याही मनांवरचा ताण  आता हलका झाला होता. त्या संभाषणातच दोघांच्याही लक्षात आले कि दोघांच्या परदेशात जाण्याची तारीख आणि वेळ जवळपास एकच आहे.
" चल मग आता आपण उद्या विमानतळावरच भेटू."
असे म्हणत त्याने फोन ठेवला. तिच्या आनंदाला तर आज सीमाच उरली नव्हती.

कालचे ते संभाषण तिला जसेच्या तसे आठवत होते. ती त्याच विचारांत मग्न होती... कधी स्वतःशीच हसायची तर दुसऱ्याच क्षणी गंभीर होत होती. पण तिची नजर मात्र त्या दरवाजावरच खिळून होती. हा विसरला तर नसेल ना अशी शंका देखील एका क्षणी मनात येऊन गेली. 

याच शंका-आकांक्षांच्या लपाछुपीत तिची अवस्था मात्र फार केविलवाणी झाली होती. इतक्यात तो दिसला.इतक्या उशिरा का होईना पण तो आता आला होता . तिथेच त्याच दरवाजातून आत शिरला. निळा शर्ट , त्यावर तपकिरी रंगाचा कोट आणि डेनिमची जीन्स... तो फारच रुबाबदार दिसत होता. तिने त्याला असे कोटमध्ये यापूर्वी कधीच पाहिले नव्हते त्यामुळे ती या देखण्या रूपावर फारच भाळून गेली.आता हा बघता क्षणी माझ्याशी बोलेल, उशीर झाला म्हणून एक छानसे सॉरी म्हणेल, मला पाहून खूप आनंदी होईल असे तिला वाटत होते म्हणून ती त्या उत्साहात उभी राहू लागली पण काय विपरीत घडले. तो तिच्याकडे ना पाहता तडक शेजारच्या टर्मिनलमध्ये निघून गेला आणि ती त्याची प्रतिमा नजरेआड होईपर्यंत पाहतच राहिली. ती आता अगदी स्तब्ध झाली होती.तिला त्या क्षणावर विश्वासच बसेना.

 - रुपाली ठोंबरे. 
 

2 comments:

  1. Very nice. You can actually see it in front of you as of you are experiencing it yourself. All the best. पुढचे भाग वाचायला नक्कीच आवडेल.

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिखाण आणि साचेबद्ध मांडणी

    ReplyDelete

Blogs I follow :