Wednesday, May 23, 2018

तो आणि ... ती (भाग ६)


" मग उद्या किती वाजताची फ्लाईट आहे "निहालने विचारले. 
" दुपारी १.३० ची. म्हणजे इथून १०-११ पर्यंत निघावे लागेल, हो ना? निर्वी प्रश्नार्थक उत्तरली.
" हो. ती सर्व व्यवस्था झाली आहे. रेहमान १०.३० वाजता पोहोचेल इथे. "
इतके संभाषण झाले आणि एक स्तब्ध शांतता पसरली त्या दोघांच्यात.दोघेही त्यांच्या त्याच नेहमीच्या जागेवर बसले होते त्या संथ झालेल्या पाण्याकडे पाहत. एक हवेची गार झुळूक त्याला स्पर्शून गेली तसा निहाल विचारांच्या दुनियेतून माघारी वर्तमानात आला.
" मग उद्या तुम्ही जाणार तर. हे दृश्य, ही जागा मिस करेल मग तुम्हाला. 
" फक्त ही जागाच मिस करणार ? तुम्हाला आमची आठवण येणार नाही का ?"
" अरे, असे का बोलता. अर्थात. तुम्हाला कसा विसरेन मी. पण हे दोन महिने कसे गेलेत समजलेच नाहीत ना ?"
" हो ना. ते मात्र खरंच. मी तर आले तेव्हा फार घाबरले होते. कसे घालवणार इतके दिवस एकटी मी या जागेवर, असे वाटले होते. माझा पहिला दिवस आठवतो? रडले होते मी अक्षरशः (तिला  स्वतःचेच हसू येते ) पण इथून जाताना तुमची इतकी सुंदर मैत्री मी सोबत घेऊन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते कधी. You know you are a precious gift in my life.... "
निर्वी बोलतच होती पण मध्येच निहालला काही आठवले आणि त्याने तिथेच  तिला थांबवले.
" अरे गिफ्टवरुन आठवले. मी हे तुमच्यासाठी त्यादिवशी घेतले होते पण नंतर देणे जमलेच नाही. आज आठवणीने घेऊन आलो."
असे म्हणत निहालने एक बॉक्स तिच्यासमोर धरला.
" अरे वाह ! गिफ्ट ? माझ्यासाठी ? काय आहे ? उघडून पाहते मी."
आणि निर्वीने पटापट त्यावरचे सुशोभित कागद अलग केले.
"Wowwww  ! हे अत्तर तर मला त्यादिवशी फार आवडले होते पण .... काय हो ? हे खूप महाग आहे ना ?इतके महागडे गिफ्ट कशाला घेतले माझ्यासाठी ?"
" अहो मॅडम , घ्या हो . त्यादिवशी मी एकदोनदा पाहिले कि तुम्ही सारख्या या अत्तराभोवती घुटमळत होतात. खूप आवडले होते ना तुम्हांला हे. आणि मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचे होतेच. पण काय द्यायचे , तुम्हाला काय आवडेल हा पेच होता.. उलट तुम्ही सर्व सोपं करून दिलं. आणि मी generally कोण्या मुलीला गिफ्ट देत नाही , बरे का . तुम्हाला मिळते आहे तर आनंदाने स्वीकार करा की... म्हणजे आम्हांलाही आम्ही दिलेले काही तुम्हाला आवडले याचा आनंद होईल. "
निहालच्या भावना फार प्रामाणिक होत्या. निर्वी मनातल्या मनात खूप आनंदी होती. तिने त्या अत्तराचे दोन थेंब स्वतःच्या मनगटावर शिंपले आणि एका श्वासात तो सुगंध मन भरून स्वतःमध्ये सामावून घेऊ लागली. त्या अत्तराची मोहिनी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती . ते पाहून त्यालाही समाधान वाटले.
" थँक यू. खरंच, खूप काही केलं हो तुम्ही माझ्यासाठी. गिफ्ट तर फार पूर्वीच दिले होते तुम्ही. तुमच्यामुळेच मला माझ्या मनातले प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत आली आहे. "
" हो ना . पण ते प्रेम अजून प्रत्यक्षरित्या व्यक्त कुठे झालंय अजून?"
" होईल हो . इतकी काळजी करू नका. तो पुढच्या महिन्यात येणार आहे मुंबईत. तेव्हा त्याच्या समोर सर्व मन रिते करेन मी. तो येणारा क्षण कितीदा माझ्या स्वप्नात येतो आणि त्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीसाठी मीही कितीतरी आतुर आहे आता . "
" हो पण. अशा गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवू नये असे माझे मत आहे. पण असो , तुम्ही जो निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल."
" आणि आता तुम्ही पण मनावर घ्या आणि एखादा निर्णय घेऊन टाका" निर्वी पटकन बोलून गेली तसा निहाल चरकला. 
" मी ? मी कसला निर्णय घ्यायचा आता? माझे कुठे मध्येच आता ?"
" तसे नाही हो. तुमच्या आई खूप प्रेम करतात तुमच्यावर. खूप काळजी आहे तुमची. आता किती दिवस पूर्वीच्या गोष्टींमध्ये जळत राहणार ना ? नव्याने आयुष्य सुरु करा. स्वच्छ मनाने आसपास बघा एकदा , तुम्हाला हवी तशी अजूनही या जगात मिळू शकेल.तिला शोधायला हवे."
" अच्छा . असं म्हणताय. पाहिलं आसपास. तुम्ही दिसल्या मला. काय करू ?करू का प्रपोज ? हो म्हणाल ?
निहाल अगदी सहज म्हणाला आणि निर्वी मात्र स्तब्ध झाली. शब्दांची वाटच थांबली जणू. तिचा चेहरा पाहण्यालायक झाला होता आणि तो गंभीर चेहरा पाहून तो पोट धरून जोरजोरात हसू लागला.
" अहो मॅडम , काय तुम्ही? अजून ओळखलं नाही म्हणजे आम्हांला.चेहरा पहा तुमचा कसा झालाय ते. अहो ,गंमत केली मी. आणि मला काय तुमची कहाणी माहित नाही ?आधीच त्या मिस्टर कॅलिफोर्नियामुळे तुमच्या मनाची नाव सतत विचारांच्या वादळात हेलकावे खात असते त्यात मी कुठे आणखी मोठा सुनामीचा झटका देऊ तुम्हाला. "
तो नियंत्रणाबाहेर हसतच होता. ती मात्र तरीही शांतच.मध्येच तिला ते हासू कृत्रिम वाटत होते. मग आपलेच हसू आवरत तो अचानक गंभीर झाला ... एक भला मोठा विराम आला संभाषणात. आणि मग निहाल सांगू लागला ,
" हे पहा मॅडम , आपण एकदाच जगतो... या जगात मरतोही एकदाच ... आणि प्रेमसुद्धा फक्त एकदाच होते..."
" अरे वाह ,  कुछ कुछ होता हैं ! .... हे तर शाहरुख म्हणतो ना असे... ?"
" हो मग ? आम्ही नाही बोलू शकत ? माझेही तेच मत आहे... आता प्रेम एकदाच झाले होते ... ते पुन्हा होणे शक्य नाही... सॉरी , पण विषय संपला."
तो किती ठाम होता त्याच्या मतावर, त्याच्या निर्णयावर. निर्वी त्याच्याकडे पाहतच राहिली. तो खूप अस्वस्थ झाला होता. मग तिनेही माघार घेतली.शांतच झाली ती. काय बोलावे ते सुचेचना. त्याने तिच्याकडे एकवार पाहिले. तिच्यावर काही क्षणांपूर्वी आवाज चढवला होता आणि ते तिला फारसे आवडले नाही हे स्पष्ट दिसत होते चेहऱ्यावर. मग तो तिच्या समोर येऊन बसला.
" काय झाले ? रागावलात ? कान पकडून सॉरी. गेलेल्या गोष्टींचा विचार करण्याची खरे तर मलाही सवय नाही पण त्या आठवणींना विझवणे अजून तरी शक्य झाले नाही. पण यापुढे एखादी चांगली नजरेत आली तर तिला नजरेआड होऊ देणार नाही.पण ती एखादी कधी येईल समोर हे त्या परमेश्वरालाच माहित. बघू.पण तोपर्यंत आपण तुमच्या लव्ह स्टोरीवर लक्ष केंद्रित करू. त्या तुमच्या मिस्टर कॅलिफोर्नियाला या खेपेला सर्व सांगून टाका म्हणजे मुंबईला येण्याचे उत्तम कारण मिळेल आम्हांला. By The way , बोलवाल ना आम्हाला लग्नाला ?"
" अरे व्वा ! हा काय प्रश्न झाला ? अर्थात. निघताना तुम्हाला भारतातला फोन नंबर आणि पत्ता देईल. आणि लग्नापर्यंत काही वाट पाहण्याची गरज नाहीय. तुम्ही कधीही येऊ शकता. तुमच्या घरी पुण्याला तर येतच असाल ना तर तेव्हा आलात कि एक फेरी मुंबईला होऊ द्या. "
"हो . नक्की. पण आपल्या मनातले सांगितल्यावर सर्व मनासारखे होत असताना लग्नाचा बार उडवण्यासाठी तुमच्याकडून वेळ घालवू नका."
निहालने पुन्हा आठवण करून दिली आणि ती विचारात पडली.
"म्हणजे "
"अहो म्हणजे आयुष्य फार unpredictable असते. कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही ."
"अरे, तुम्हाला अजून शंका आहे ? त्याला मी आवडतेच ... मलाही तो आवडतो... घरच्यांचा म्हणावं इतकं टेन्शन वाटत नाही. मग ... "
" काही नाही. पण जीवनाबद्दल आणि कोणत्याही जीवाबरोबर खेळू नका फक्त इतकेच सांगायचे होते. चला, रात्र खूप झाली आहे. निघायला हवे "
निहाल उठला. आणि दोन पावले पुढे चालू लागला. निर्वीला ते थोडे वेगळे वाटले पण या गोष्टीचे कारण विचारण्याइतकेही त्याचे आचरण विचित्र नव्हते. ती पण उठली आणि चालत जात त्याला गाठले. दोघे पुढे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या जागी गेले. आज शेवटची ती त्या गुलबक्षी रंगात पुन्हा विसावली.

पहाट झाली. निर्वी फार आनंदात होती. काल तिच्या सातासमुद्रापलीकडच्या मित्राने काहीतरी तिच्या कानात सांगितले आणि ते मधुर शब्द अजूनही तिच्या कानांत रुंजी घालत होते. तीला तो आनंद शेअर करायचा होता.म्हणून अगदी ५ वाजल्यापासून ती ८ वाजण्याची वाट पाहत बसली होती. पावणेआठलाच सर्व तयारीनिशी ती खाली उतरली. आमिराने तिचे स्वागत केले. तिने ते स्वीकारले आणि ती त्याची वाट पाहत समोरच बसून राहिली. आठ वाजून पंधरा मिनिटे होऊन गेली तरी साहेबांचा पत्ता नाही तसे तिने त्याबद्दल विचारणा केली तेव्हा समजली निहालच्या आईची तब्येत ठीक नाही म्हणून आईला डॉक्टरकडे दाखवून तो आज जरा उशिरा येणार होता.तिला वाईट वाटले पण करणार काय ? आता वाट पाहण्यापलीकडे पर्याय नव्हता.मनातल्या मनात वाटत होते कि आता उद्यापासून तिची प्रत्येक गोष्ट ऐकून त्यावर आपले मत व्यक्त करणारा सोबत असणार नाही. तेव्हा ती सवय व्हायला हवी आता. पण आज तरी असायला हवा होता ना ? सर्व ठीक असेल ना ? हो हो येईल तो इतक्यात , ती तिच्या मनाचीच समजूत काढत राहिली. पण घड्याळाचा काटा १० वर गेला तरी त्याची येण्याची चिन्हे दिसत नव्हती. अर्धा तास असाच प्रतीक्षेत गेला. घड्याळाच्या पुढे सरकणाऱ्या काट्यासोबत तिची अस्वस्थता वाढत होती. तिने त्याला पुन्हा एकदा शेवटचा फोन करून पाहिला पण व्यर्थ ! त्याने तोही कॉल मिस केला. रेहमान आता हॉटेलमध्ये येऊन पोहोचला होता. आता निघावेच लागेल. तिने अत्यंत जड अंतःकरणाने सामान बाहेर काढले. जाण्यापूर्वी आमिराचा निरोप घेतला आणि सोबत त्याच्यासाठी तिचा भारतातला नंबर आणि पत्ता द्यायला निर्वी विसरली नाही.सर्व सामान गाडीत पोहोचले.पाठोपाठ तीही पोहोचली. गाडी सुरु झाली आणि काही क्षणांत त्या सुंदर जागेचा तिच्या शरीराने निरोप घेतला पण मन मात्र अजून तिथेच त्या बेटावर भिरभिरत राहिले अगदी भारतातल्या विमानतळात पोहोचेपर्यंत...

सर्व सामान संकलित करून निर्वी बाहेर आली. तिच्या नावाची हाक ऐकू आली आणि ती त्या हाकेकडे धावत गेली. तिचा दादा तिला न्यायला आला होता. एक छोटीशी गळाभेट झाली, तिच्या सर्व बॅगा कारमध्ये ठेवल्या गेल्या आणि पाठोपाठ तीसुद्धा आत आली. AC सुरु असल्याने सर्व  बंदिस्त आणि त्यामुळे आजूबाजूचा कोलाहल एकाएकी शांत झाला. दादाने गाडीचा पहिला गियर टाकला आणि ती गाडी रस्त्यावरच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागली.निर्वी मात्र अजूनही शांतच होती आजूबाजूचा परिसर पाहत . 
" तर मग कशी झाली आमच्या निरूची दुबई ट्रिप ?"
"दादा , ट्रिप नव्हती ती. ट्रैनिंग होते. पण छान झाले सर्व. खूप सुंदर देश आहे. आणि तुला माहित आहे ,तिथे खूप सारे भारतीय आहेत?मलाही असेच खूप चांगले मित्र मिळाले तिथे. (ती पुन्हा हरवून गेली पण लगेचच भानावरसुद्धा आली )खूप मस्त आहे सर्वच ... तू पण जा एकदा वहिनीला घेऊन "
" नको बाबा . तुझी वाहिनी नको. करायला जाऊ पिकनिक आणि भलतेच होऊन जायचे. "
दादा अगदी जोरजोरात हसू लागतो. 
" दादा ,तू का रे तिला नेहमी असे बोलत असतोस ? "
" अगं, ३ वर्षे ६ महिने संसार झालाय आमचा. तिला पूर्ण ओळखतो मी."
निर्वी काहीच बोलली नाही... अगदी शांत. 
" पण ते काही असले तरी माझी सरिता स्वभावाने चांगली आहे.
"दादा , मी पण तर तेच म्हणते ना रे ."
" हो पण ती काही गोष्टींमध्ये फार dangerous ... त्यामुळे जरा सांभाळून राहावे लागते ... कसा संसार करतो मी तिंच्यासोबत हे मात्र माझे मलाच माहित.तुला काय कळणार बिचाऱ्या तुझ्या दादाचे दुःख... "
तो पुन्हा कित्तीतरी मोठ्याने हसतो आणि यावेळी निर्वीदेखील त्यात सामील झाली.वहिनी या विषयावर त्यांच्यात नेहमीच थट्टा मस्करी चालायची.सुमन वहिनी खरंच मनाने चांगली असल्याने ती कधी यांचे बोलणे मनाला लावूनही घेत नसे. इकडच्या तिकडच्या कितीतरी गप्पा सुरु असताना तिच्या कॅलिफोर्नियातील मित्राचाही उल्लेख होतो. हे सर्व एकाच शाळेत असल्यामुळे दादा त्याला बऱ्यापैकी ओळखत होता. 
" अरे व्वा ! अमेरिकेत असतो तर तो आता ? छान. तुला माहित आहे , निरू ? सार्थक गेला आणि आमची टीम फुटबाँलमध्ये हरायला लागली होती. खूप चांगला मुलगा होता तो. काय गं , आता पुन्हा कधी येईल तो ? यावेळी मीपण भेटेन म्हणतो . खूप वर्षे झाली त्याला पाहून. "
निर्वी काहीच बोलली नाही. नुसतीच गालात हसली. काहीतरी स्वतःशीच पुटपुटली.अर्थात ते स्पष्टपणे दादाच्या कानांवर गेले नाही. 
" काय म्हणालीस ?अगं हसतेस काय नुसती ? सांग ना कधी येईल ? मला ना असे जाणवतेय निरू कि काहीतरी बिनसलंय तुझं. काय झाले ?"
" दादा, कुठे काय ? किती प्रश्न ? काही नाही झाले. खरंच."
"  आम्हाला नाही पटत.गाडीत बसल्यापासून पाहतोय, हरवली आहेस तू कुठेतरी. घरी पण अशीच राहिलीस तर माझ्यापेक्षा हजार प्रश्न अधिक असतील. म्हणून म्हणतो मला सांग पटपट. आणि आता तू जोपर्यंत काही सांगणार नाहीस तोपर्यंत ही गाडी पुढे जाणे शक्य नाही."
" दादा , काही काय. तू सुरु कर बरे पटकन. आई वाट पाहत असणार ."
"अजिबात नाही "
दादा हट्टच करून बसला. निर्वीलाही खरेतर दादाला सर्व सांगायचे होते. तिने हिम्मत एकवटली. आणि हॉटेलमधले त्याने केलेले प्रोपोज , विमानतळावरची भेट , चॅटिंग ... तिच्या मनातल्या त्याच्याविषयीच्या भावना ... सर्व सर्व दादासमोर सांगून मोकळी झाली ती. दादाला काय वाटत असेल हे तिला आता लवकरात लवकर जाणायचे होते. पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याबद्दलचा कोणताच अंदाज बांधता येत नव्हता. आणि इतक्या वेळापासून बोलणारा तो एकाएकी शांत झाला. एकवार तिच्यावर नजर टाकली आणि पुढच्याच क्षणी " चला आता निघायला हवे. घरी वाट पाहत असणार" म्हणत त्याने गाडी सुरु केली. तसा तिचा चेहरा अधिक गंभीर झाला. निर्वी पुन्हा पुन्हा स्वतःची प्रामाणिक , स्वच्छ बाजू मांडण्याचा प्रयत्न करत राहिली,... त्याला प्रतिसाद नाही म्हणून विषय बदलून काही बोलण्याचा प्रयत्न सुरु राहिला तिचा. पण छे ! दादा काहीच बोलत नाही. ते पाहून शेवटी तीच शांत झाली. मनातल्या मनात याला का सांगितले याचा पश्चाताप होत होता तिला. तिला मनोमन वाटले होते कि दादा साथ देईल तिची, तिला तो तरी समजून घेईल, पण तिचा हा अंदाज चुकला होता. असे कसे होऊ शकते यावर अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता. हे त्याला आवडले नाही असे आता तरी तिला जाणवत होते. पण का ते मात्र तिला कळत नव्हते. आता हा करेल ? घरी सांगेल का ? घरी सर्व काय म्हणतील ? मोठे भांडणच होईल . आई तर रडायलाच लागेल....कुणाला माझी बाजू पटणार का ?... मी घाई केली का ?... अजून तर सार्थकलासुद्धा काही माहित नाही... काय केले मी हे ?... ती अशा कितीतरी विचारांनी घेरली गेली होती. वरून शांत दिसत असली तरी मनातल्या मनात खूप सैरभैर झाली होती ती...आणि तेव्हा त्या क्षणाला तिला तिच्याही नकळत तिचा तो नवा मित्र आठवून गेला. तो असा न भेटताच कुठेतरी हरवून गेला असे तिला सारखे जाणवत राहिले. निहालच्या मतांची ,मदतीची तिला सवयच झाली होती आता जणू... ती स्वतःलाच विचारत होती कि त्याने असे दादाला लगेच सांगण्याचा सल्ला दिला असता ?एक मन म्हणत होते ... हो. कारण निहाल नेहमीच म्हणायचा कि अशा गोष्टींसाठी वेळ घालवायचा नसतो.... पण आता चुकले का माझे... 


निर्वी विचारांतून बाहेर आली आणि एका वेगळ्या आशेने दादाकडे पाहत होती. तो तल्लीन होता गाडी चालवण्यात. आता हायवे लागला होता अवघ्या काही मिनिटांवर घर होते. तिने कशीबशी पुन्हा हाक मारली , 
"दादा ... "
यावेळी त्याचा हुंकार कानांवर आला आणि तिला थोडे बळ आले. पण ती काही बोलणार त्यापूर्वी त्यानेच तिच्यासमोर प्रश्न टाकला . 
"ही गोष्ट आणखी कोणाला माहित आहे ?"
" दादा , कुणालाच नाही. अगदी खरे ."
" गुड. पण मग आता सांगायची. आजच घरी सांगूया आपण."निर्वी चक्रावलीच ते ऐकून. 
" नको नको... आज का ? इतक्या लवकर नको "
" अगं का म्हणजे? इतकी छान बातमी सांगितली आहेस तू. आणि अशा गोष्टींसाठी वेळ घालवायचा नसतो.लगेच कुठे  आपण. घरच्यांनाही  दृष्टीने  घेऊ दे की . पण त्यांना हे माहित हवे.त्यांच्यापासून हे असे लपवून ठेवणे मला पटत नाह. मी आज बाबांशी बोलून घेईन. मी समजावेंन त्यांना. मला खात्री आहे तेही मान्य करतील. कारण मुळात सार्थक खूप चांगला मुलगा आहे.ते घरही चांगले आहे .आणि विशेष म्हणजे आपण ओळखतो त्यांना. मला तर खूप आवडेल जर असे खरोखर भविष्यात घडून आले तर. "
हे ऐकले आणि निर्वीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने त्याही अवस्थेत आनंदाने तिच्या भावाला मिठी मारली. आणि लगेचच ती सावरली. 
" दादा , पण आता तू काही सांगू नकोस रे घरी."
"अगं , पण मी २ दिवसांनी परगावी जाईल तो थेट २ महिन्यांनी परत येईल म्हणून म्हणत होतो."
" हो दादा , मान्य आहे रे. पण माझा होकार अजून त्यालाही माहित नाही. तो पुढच्या महिन्यात येईल तेव्हा मी सांगणार आहे सर्व त्याला आणि मग त्यानंतर तू आलास कि पुढचे बघू. कारण जर आत्ताच सांगितले तर तुला माहित आहे ना आपल्या घरी कसे आहेत ते ... "
" हो बरोबर बोलतेस तू. याना सांगितले आणि मान्य असेल तर बाबा उद्याच जाऊन पोहोचतील त्यांच्याकडे.... तशीही त्यांना घाईच लागली आहे आता."
"काय... ???"
"काही नाही . तू सोड ते. मग मी आल्यावरच बघू आपण. तोपर्यंत तू याबाबत सांगू नकोस कुणाला. आणि खास करून तुझ्या वहिनीला. समजले ना ?
दादाने अगदी सहज विषय दुसरीकडे वळवला. निर्वी मात्र फार खुश होती. त्यानंतर तिने घर येईपर्यंत स्वतःला जागेपणच्या स्वप्नांच्या दुलईत सामावून घेतलं. 

घरात पाऊल टाकले आणि इतक्या वेळापासून शांत असलेले घर एकदम भरल्यासारखे वाटू लागले. आईने तिच्या आवडीच्या पुरणपोळीने तिचे स्वागत केले तर बाबांनी प्रवासातील चौकश्यांनी. वहिनीच्या प्रश्नांना तर तासभर उलटून गेला तरी पूर्णविराम लागत नव्हता. एव्हाना बरीच रात्र झाली होती. सकाळपासूनच्या मानसिक आणि शारिरीक उलाढालींमुळे तिचा जीव पार थकून गेला होता. ते आईच्या लक्षात आले आणि तिने साऱ्यांना झोपण्याचा इशारा केला. 

निर्वी झोपण्यासाठी गेली आणि अगदी क्षणभरासाठी तिला तिची मऊशार गुलबक्षी, गेले कित्येक दिवसांपासून असलेली सोबत आठवली ... पण अगदी क्षणभरासाठी. कारण आता ती जगातल्या सर्वात मौल्यवान कुशीत विसावलेली होती. ते जाणवले तशी तिने आईला घट्ट मिठी मारली. त्या उबदार स्पर्शाने तिला लगेच झोप आली आणि हळूच ती त्याच स्वप्नांच्या दुनियेत शिरली. दादाच्या संमतीने ही स्वप्नांची दुनिया आता अधिक उजळली होती. पण त्या प्रकाशात कितीतरी सावल्या तिला दिसत होत्या काही ओळखीच्या ... काही अनोळखी... आणि काही ओळखीच्या असूनही अनोळखी वाटणाऱ्या... 

- रुपाली ठोंबरे.

Saturday, May 19, 2018

तो आणि.... ती (भाग ५)

४ x ४ ची ती बंद जागा. आसपास कोणीच नाही. चारही भिंतींवर काचेच्या आणि निरनिराळ्या टाइल्सची खूप सुंदर रचना...एका भिंतीवर मधोमध एक आरसा तोही खूप सुंदर ... त्यावर त्यापेक्षाही सुंदर नक्षी... रंगसंगती तर अप्रतिमच... डोक्यावर आरशांचेच झुंबर... दिसायला झुंबरासारखे होते पण एक वेगळीच नक्षी होती ती ३D भासवणारी... ती एवढीशी जागा सुद्धा किती मन मोहवून टाकणारी....

... पण या क्षणी मात्र निर्वीला त्या कोणत्याच रचनेत किंवा नक्षीकामात रुची नव्हती...तो दोन मजल्यांच्या रस्तासुद्धा तिला खूप मोठा वाटत होता. घडयाळावर नजर जात होती तिची सारखी... आणि तेही उगाचच... तिलाही माहित होते कि तीची आज वेळेची स्पर्धा सुरु होती ती घड्याळाच्या काट्यासोबत नाही तर हृदयाच्या ठोक्यांसोबत.शेवटी तो काचेचा पडदा उघडला आणि ती जितक्या वेगाने शक्य होईल तितक्या वेगात तिच्या रूममध्ये आली. लॅपटॉप बाहेरच होता. तत्परतेने आधी लॅपटॉप आणि नंतर मेसेंजर सुरु केले तर नेहमीसारखीच आजसुद्धा तिच्या पदरी निराशाच आली. पण आज निर्वीने मनाशी चंगच बांधला होता जणू... आज काही झाले तरी सार्थकला मनातले सांगेलच असा. तिने फोन हाती घेतला आणि कसलाही विचार न करता 'सार्थक' या नावाशेजारचे कॉल चे बटण दाबले... दूरचा नंबर असल्याने अतिशय मंद आवाजात रिंग जात होती...त्या ध्वनीपेक्षा तिचे हृदयाचे ठोके अधिक वाटत होते. आणि एका क्षणाला तो काळजाचा एक ठोका चुकलाच ,
" हॅलो ... "
पलीकडून आवाज आला...  पण तो एका मुलीचा. हिने पुन्हा एकदा फोन नंबर तपासून पाहिला. नंबर तर बरोबर आहे .पण सार्थक कुठे आहे ? आणि ही कोण ? मनात हजार शंकांचे काहूर त्या एका क्षणात जमले. पलीकडून अजूनही ' हॅलो हॅलो ' असा आवाज येतच होता. हिने सावरले स्वतःला आणि त्याच्याबद्दल विचारणा केली.
" Ohhh ! Sir ? He is just busy in some important work. If anything urgent I will inform him . May I know with whom I am talking?Is it official ?"
मनात आले , अगं इम्पॉर्टन्टच आहे आता ... तुझा आवाज ऐकल्यावर तर आणखी इम्पॉर्टन्ट झालंय.किती चौकशा या मुलीला. तिने आपले नाव सांगितले आणि लवकरात लवकर त्याच्याकडे फोन देण्यास तिला विनवले.
" hallooooo... अगं निर्वी, काय मस्त सरप्राईझ दिलेस तू मला. Wow ! तुझा कॉल हा असा अचानक ? Can't imagine.तू बोल कशी आहेस ?"
" मी खूप छान होते पण आता नाही ."
"का गं ? काय झाले ?"
" आधी तू सांग , ती मुलगी कोण होती ?"
" ती ? ती उर्वी ... सध्याचं माझं शेपूट.... "
आणि सार्थक हसायला लागला. तो हसत होता पण ती मात्र फार गंभीर होती.
अगं , पूर्ण दिवस हल्ली तिच्यासोबतच जातो माझा म्हणून तर वेळ नाही मिळत . आणि आपल्याला बोलायलाही मिळत नाही... "
तो आपला बोलतच होता... त्याचा नवा प्रोजेक्ट... या प्रोजेक्टमधली ही नवीन आलेली मुलगी...तिच्याबद्दल बरंच काही...उर्वीच्या उल्लेखामुळे त्याची ही बालमैत्रीण कुठेतरी जळते आहे हे पाहून त्याला एकाप्रकारे छान वाटत होते... निर्वीला चिडवण्यासाठी सार्थक या उर्वीची स्तुतीफुले अधिकाधिक गुंफत राहिला आणि इथे त्याचे हे कुठेतरी फुलणारे प्रेम मात्र क्षणाक्षणाला तुटत होते ... ही फार संशयी होती असा भाग नव्हता मात्र अशा आतुर प्रसंगी या उर्वी नावाच्या नव्या नावामुळे काही अंशी तरी तिच्या आनंदावर विरजणच पडले होते. पण आज मनाशी ठरवलेच होते कि काही झाले तरी त्याला थोडीफार कल्पना तरी देऊयाच...आणि निर्वीने बोलण्याच्या ओघात असलेल्या सार्थकला आपल्या बोलण्याने थांबवलेच ,
" अरे , काय हे . फोन मी केलाय आणि कौतुक मात्र तुझ्याच कामाचं सुरु आहे. माहित आहे दुसरी मैत्रीण मिळाली आहे आता, पण तरी जुनी नाती विसरू नये ... ?"
पुन्हा तेच... खळखळून हसला तो पलीकडून. हसू आवरतच सार्थक पुढे बोलू लागला,
" आज पकडलं बरं का मी तुला ... अगं , तसं नाही गं .वेडी आहेस का तू ? मज्जा केली मी . ती उर्वी आणि तुझ्या जागी ? शक्य आहे का ? तू ही खूणगाठ बांधून घे मनाशी कि तुझी माझ्या मनातली जागा कोणीसुद्धा हिरावून घेऊ शकणार नाही या जगात. हे तुलाही माहित आहे आणि मलाही. तुझ्यावर प्रेम आहे गं माझे.. खूप.I always miss you and Love you a lot. पण काय करणार तुला समजत नाही ते."
" अरे तसे नाही रे.मला समजते सर्व. पण तू .. ... ... पण समजून घेत जा ना. मी असे लगेच कशी सांगू शकेन. मला तू आवडतोस अगदी खूप, म्हणूनच तर आज असे त्या मुलीचा आवाज ऐकला आणि वरून तू तिचेच कोडकौतुक करत होतास ते पाहून खूप वाईट वाटले...मी खूप संशयी वैगरे नाही बरे का.आणि तुझ्या मनात माझ्याशिवाय आणखी कोणी असूही शकणार नाही अशी खात्री आहे मला. बघ मला समजते सर्व ... पण तू... ... .. ... "
ती आपली बोलतच होती आणि मधूनच पलीकडून फक्त त्याची 'हॅलोSSS ...  हॅलोSSS .... ' अशी साद ऐकू येऊ लागली तशी ती थांबली. संपर्क तुटला होता हे तिला कळून चुकले... पण केव्हा ते तिलाही कळले नव्हते...  ती आपली बोलतच राहिली होती. पुन्हा फोन करावा का असा विचार करत असतानाच मोबाईलच्या स्क्रीनवर त्याचे नाव आले.. त्याने पुन्हा फोन केला होता . तिनेही तत्परतेने तो घेतला.
" अगं सॉरी. फोन कट झाला तेव्हा. मी नेमका लिफ्टमध्ये गेलो तेव्हा आणि...पण तू बोल आता... खूप काही बोलत होतीस तू तेव्हा... उगाच लिफ्टमध्ये गेलो आणि... बोल आता."
" अरे हो हो... पण मी काय सांगत होती बरे?..."
"अगं , तू सांगत होतीस कि तुला सर्व समजते... पण तू ...तू...  पुढे काय ?"
" अरे हां , ... पण तू असे सर्व बोलत जाऊ नकोस. मला नाही आवडत."   
निर्वी आपला लटका राग दाखवत बोलत होती. दूरवरचे संभाषण असल्याने फारच अस्पष्टसे बोल ऐकू येत होते. 
" नक्की कशाबद्दल बोलते आहेस तू ? काय नाही आवडत ?मी काय बोललो आता?"
" आता बघ. तेच जे आता बोलत होतास तू? यापुढे नको हां असे करुस ? खरे तर त्रास होतो त्याचा कधीकधी. मला माहित आहे तू समजून घेशील... "
" अगं, पण कशाचा एवढा त्रास होतो तुला. OK. कळले.सॉरी तुला इतका त्रास होत असेल तर मी पुन्हा नाही असा बोलणार. आता तुझीच वाट पाहीन मी त्यासाठी. चल आता ठेवतो मी. मिटिंग आहे लगेचच. बोलू पुन्हा कधीतरी.बाय. टेक केअर "

निर्वीला अजूनही खूप काही बोलायचे होते पण सार्थकने फोन कट केला होता. ती तसाच फोन हातात घेऊन बराच वेळ उभी राहिली... तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते... मनातली एक भावना त्याला बोलून दाखवल्याचा तो आनंद होता. ती असेच स्वप्नांचे मनोरथ रचत निद्रेच्या अधीन झाली.

तिथे सार्थक मात्र फार अस्वस्थ झाला होता. सुरु असलेल्या मीटिंगमध्ये त्याचे अजिबात लक्ष लागेना. तिचा किंचित राग सुद्धा येत होता. सारखे मनात विचारांचे थैमान सुरु होते. खरंच माझ्या प्रेमाची कबुली तिला इतका त्रास का ? हा प्रश्न न राहवून तो सारखा स्वतःलाच विचारात होता. पण तो खूप समंजस होता. त्याने विचार केला कि खरंच तिला हे असे सारखे बोलणे आवडत नसेल तर मी स्वतःवर थोडा संयम ठेवायला हवा. तिला हवा तेवढा वेळ द्यायला हवा. आज उर्वीबद्दलचे माझे बोलणे तिला खूप आवडले नाही असे जाणवले म्हणजे कुठेतरी ती माझा विचार करत असेलही त्यामुळे माझ्याकडून आता उगाच घाई नको. आता सरळ २ महिन्यांनी तिला भेटेन तेव्हाच हा विषय काढेन. पण तोपर्यंत ?.... संपर्क तोडायचा ? नाही नाही...अगदी नॉर्मल बोलेन... तिचे काम... इथले काम. त्याने असे खूप काही मनात ठरवले... ठरवतच होता आणि उर्वीचा आवाज त्याच्या कानांवर आला. मिटिंग संपून ५ मिनिटे होऊन गेली होती पण तो तरी तिथेच बसून होता त्याच्या विचारांच्या तंद्रीत.

सकाळ झाली .... अगदी नेहमी सारखीच. अलार्मच्या आवाजाने जाग ,नंतर काल रात्रीचा पसारा आवरून आणि स्वतःची तयारी करून निर्वी नेहमीप्रमाणे खाली लॉबी मध्ये आली. आज खूप म्हणजे खूप खुश होती ती आणि ती सर्व ख़ुशी तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होती . ब्रेकफास्ट करून ती रिसेप्शन च्या समोरच्या सोफ्यावर बसून तिचा रोजचा निरीक्षणाचा कार्यक्रम आणि तिच्या सहकाऱ्यांची वाट पाहण्यात मग्न होती . निहाल  तिला सकाळपासूनच दिसला नव्हता आणि ती त्याचीच आतुरतेने वाट पाहत होती कारण त्याला आनंदाची बातमी द्यायची होती ना ... आज एकदाचे मनातले सार्थक समोर बोलली होती ना ती...  तेही निहालने केलेल्या कानउघडणी मुळे...तेच सांगायचे होते त्याला. ती वस्तुस्थितीत होती ... रिसेप्शनवरच्या सर्व हालचाली पाहत... आमिरावर तिची नजर गेली आणि ती काही क्षण कालच्या संवादात, मनातल्या मनातच लुप्त झाली. ही आमिरा किती सुंदर दिसते ... फक्त आणि फक्त दोन डोळे आणि मनगटांपासून बोटांपर्यंतचा भाग आजवर पाहिला होता पण तरी ती सौन्दर्याची खाण होती...  पण त्या डोळ्यांत इतके दुःख लपलेले असेल ते नाही कधीच दिसले. काल  ऐकले ते खरे असेल का ... आणि असेल तर किती भयंकर... आमिरा एक १२-१३ वर्षांची तिच्या आईबापांची तिसरी मुलगी...अतिशय सुंदर ,निरागस अशी ती कोण्या एका सौदागाराला आवडली ... लगेच लग्न करून मोकळा झाला ... अवघ्या पंधराव्या वर्षी तिला आई करून सोडले... सोडले म्हणजे अगदी वाऱ्यावरच... इथे तलाक किती सोपा असतो... पण फक्त पुरुषांसाठी... स्त्रीची मात्र सर्वत्र एकच कहाणी...आईबापांचे तोंड काही पैसे देऊन गप्प केले... आणि आता ही मात्र त्या एवढ्याशा जीवासाठी रात्रीचे दिवस करत जगते आहे... पण तरी चेहऱ्यावर एखादे दुःखाचे निशाण नाही ... कायम एक स्मितहास्य खुलून असते त्यावर... तो निहाल एक ... स्वतःचे पहिले प्रेम अगदी डोळ्यांदेखत दुसऱ्याचे होताना पाहिले पण तरी चेहरा मात्र कायम प्रसन्न ...कस्से जमत असेल हे सर्व या लोकांना... खरंच यावेळी भेटलेले हे दोघे खूप काही नकळत शिकवून गेले... काल त्याने किती छान समजावले मला ... आणि सर्व किती सोपं झालं... इतके दिवस जमलेच नाही मला.... 
" अहो मिस एव्हरलॉस्ट ब्युटी , कुठे आहात तुम्ही ?"
मनात आठवण यावी आणि तो समोर यावा असा तो योगायोग. स्वतःचे हे नवे नाव ऐकून हसूच फुटले तिला. 
" काय म्हणालात ? एव्हरलॉस्ट .... (ती पुन्हा खूप हसली ) असलेल्या नावांना डावलून नवीन नावे देणे हा छंद कधीपासून जडला "
" मग काय तर ? जबसे आप मेरी जिंदगी में आये हो , सदाबहार. बरे ते जाऊ द्या . तुम्ही सांगा काल बोललात तुमच्या मिस्टर कॅलिफोर्नियाशी ?"
" हो तर "
" तर तसे वाटत तर नाही ."
"का ?खरेच काढला विषय मी..."
मग तुम्ही तरी का अशा हरवलेल्या... anyways तो काय बोलला? खुश झाला असेल ना खूप ?
"हम्म्म्म म्हणजे मी सांगितले थोडे ... अप्रत्यक्षपणे.  पण नंतर पुढे बोलताच नाही आले. त्याची मीटिंग होती तर तो निघून गेला."
"तरीच ... हे अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली हा काय प्रकार असतो बुवा ? प्रत्यक्ष बोलला असतात तर मन अधिक शांत झाले असते. पण असो , एक पायरी पुढे गेलात. All the Best ! मी येतो आता. आज बरेच काम आहेत ना? आज सर्व आटोपून लवकर घरी जायचे आहे. उद्याची तयारी पण करायची आहे ना. तसे आईने सर्व केले आहे पण तरी आपला काही हातभार हवा ना. आणि हो , तुम्ही याल ना नक्की? मी तशी तिकडची रूम कन्फर्म करतो. सकाळी शार्प सेव्हन .OK "
आणि निहाल निघूनही गेला . नवीन आलेल्या पाहुण्यांमध्ये गायब झाला कुठेतरी . निर्वीसुद्धा तिच्या कामासाठी निघून गेली.
  
रात्री बराच वेळ निर्वी मेसेंजरवर सार्थकची वाट पाहत राहिली पण तो आलाच नाही. कामात असेल खूप, असे समजून आणि उद्या लवकर उठायचे आहे हे उमगले आणि तिने लॅपटॉप बंद केले. पिकनिकच्या उत्साहात तयारीला लागली ती. 

दुसरा दिवस उजाडला तो एक नवीन पहाट घेऊन.तयार होऊन खाली आली. तो, त्याची आई , बहीण आणि एक छोटीशी चिऊ आधीपासूनच तिची वाट पाहत रिसेप्शन प्रभागात उभे होते. 
" या या मॅडम , झाली का  तुमची सकाळ ?आई , या आहेत आमच्या इथल्या पाहुण्या जिच्यासाठी तू त्या दिवशी पुरणपोळ्या केल्या होत्यास ना ?"
" अरे हो का ,हीच ती तुझी निर्वी मॅडम का ? छान छान ... मग आवडल्या ना पुरणपोळ्या तुला. ते काय आहे ना त्या दिवशी हा बोलला मला आणि मग मी म्हटलं ....  " आई आपली सुरु झाली लगेच. "
" आई हो हो , तुम्ही गाडीत बसा आधी. त्या आपल्यासोबत येत आहेत मग तिथे हव्या तितक्या गप्पा मारा. आणि निर्वीमॅडम , आता तुम्ही सुद्धा दोन दिवस मस्त एन्जॉय करा ... सर्व विसरून.आणि मग तुम्ही एकत्र या पुढच्यावेळी. खूप मस्त आहे दुबई. "
"एकत्र ... ? आणखी कोण ? " त्याच्या बहिणीला पडलेला प्रतिप्रश्न.
"अरे बाबांनो , मी म्हटले कि आता तुम्ही एकट्या फिरून घ्या आणि पुढच्यावेळी एकत्र सर्वाना घेऊन या ... अगं प्रियाताई , यांचे कॅलिफोर्निया मध्ये खूप महत्त्वाची माणसे असतात म्हणे. " 
निहाल नेहमीसारखा आपला हसत होता पण निर्वी मात्र कधी नव्हे ते आज प्रथमच लाजली. नंतर तीही त्या हसण्यात , गप्पागोष्टींत सामील झाली. आणि बोलता बोलता तिच्या एक लक्षात आले ... तिने वाकून पुन्हा एकदा नीट निरखून पाहिले. अरे हो हा तर तोच. ती परदेशात कोणीतरी ओळखीचा अचानक भेटून जावं तसं ती ओरडलीच ,
" अरे आप रेहमानजी ना ? आपने पेहचाना मुझे ?  मुझे यहा आपही लेकर आये थे . "
" जी मॅडमजी, पर सोचा आप शायद भूल गये होंगे तो कुछ कहा नहीं मैंने .आपको तो मैने बताई सारी बाते याद हैं .... ..  "
आणि मग अशा रीतीने रहमान सुद्धा त्यांच्या गप्पागोष्टींत सामील झाला. 

दुबई ... काय सुंदर जागा आहे ...अबब ! कित्ती त्या उंचच्या उंच इमारती! १२४ व्या मजल्यावरून दिसणारी दुबई तर काही औरच . तो जमैकाचा समुद्रकिनारा... त्या सप्ततारांकित हॉटेलमधलला अतिमहागडा नाश्ता केला पण तो फक्त त्या हॉटेलला जवळून अनुभवून घेण्यासाठी... वाळवंटातली गरमागरम वाळू आणि त्यातली ती उंटावरची सफर... रात्रीची मैफील... तिथल्या नृत्याची एक सुंदर झलक आणि काय त्या सौन्दर्याच्या खाणी ज्या डोळ्यांत अजूनही साठून आहेत... काय ते स्वादिष्ट जेवण ... काय ते गालिचे ... काय ती कलाकुसर ... त्या सुकामेवा ,मसाल्यांच्या विविध जागा ... आणि सोन्याचा बाजार... हो बाजारच सोन्याचा ... आपल्या इथे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी जशा राख्या दुकानांसमोर लडींमध्ये लगडलेल्या असतात तशाच इथे सोन्याच्या माळाच माळा दुकानांसमोर चकाकत असतात. सर्वच अद्भुत... 

तर अशी ही दुबईची सफर आता संपत आली होती. निहालच्या आई आणि बहिणीसोबत खूप मिसळून गेले होते. चिऊ तर इतर सर्वांपेक्षा तिच्याकडे जास्त राहू लागली. निर्वीही आता त्याच्या प्रियाताईला प्रियाताई बोलू लागली. प्रियाताईंकडूनच त्याच्या भूतकाळातली ती अधुरी राहिलेली प्रेमकथा समजली .आणि नकळत तिचेही डोळे पाणावले. त्याच्या आईची त्याच्याविषयीची चिंता जाणवली. निहाल लग्न करणारच नाही अशी शपथ घेतलेला भीष्म बनला होता ते काही केल्या त्या माऊलीला पटत नव्हते. ती त्याच्या विरोधात जाऊन हातपाय मारत राहायची पण तो मात्र सारेच डाव हाणून पाडायचा.... त्याचे हे वेगळेच रूप तिच्या डोळ्यांसमोर आज आले होते. एक वेगळाच तो... आईवर मनापासून प्रेम करणारा तरी आपल्या विचारांवर तटस्थ राहणारा. 

पुन्हा फिरून माघारी हॉटेलवर आली ती... खूप काही सांगायचे होते तिला. धावत पळत , सर्व बॅग्स सांभाळत ती रूममध्ये पोहोचली. लगेच फोन हातात घेतला आणि एका क्षणात रिंग पार सातासमुद्रापलीकडे कॅलिफोर्नियात वाजू लागली. पलीकडून आवाज सार्थकचाच होता पण खूप वेगळा... जणू कुठे तरी हरवत असलेला... पण तिला ते जाणवलंच नाही ... ती आपली दुबईची सफर , इथे भेटलेला नवा मित्र , त्याचे कुटुंब  हे सांगण्यात मश्गुल झालेली... खूप खूप बोलली ती ... त्याला काही  बोलायचे असेल याचे भानही नव्हते... पण तोही आज काहीच बोलला नाही ... फक्त ऐकून घेत होता ... ... बराच वेळ असे एकतर्फी संभाषण सुरु राहिले... निरोप झाला ... आणि तो संवाद थांबला. कॉल संपला होता. निर्वी तिच्याच मस्तीत होती पण नंतर जाणवले आज काहीतरी कमी होते त्या संवादात ... काय ?
ती आठवत राहिली ... ते दोन शब्द ... Miss You ! Love You !!

निर्वीला थोडे विचित्र वाटले पण ती आज धुंदीत होती कशाच्यातरी... मनात आले कि आता पुन्हा फोन करून मी ते कुठेतरी निखळून गेलेले शब्द पुन्हा जोडू का ... पण मग तिनेच विचार केला ... आता नको असे काही बोलायला.... त्यापेक्षा घरी जाईन... तोही येईलच ...  समोरासमोरच भेट घडून येईल आणि तेव्हाच सांगेन ... तेव्हा त्या चेहऱ्यावरचे भाव पाहणे हे आता तिचे एकमेव स्वप्न होते .... तेच पाहत निर्वीने तिचा थकलेला जीव त्या गुलबक्षी रंगात लपेटून घेतला . 
- रुपाली ठोंबरे. 






Thursday, May 10, 2018

तो आणि ... ती (भाग ४)


फोनवरच्या कर्णकर्कश गजराने ती पहाटे ठरल्या वेळीच उठली. डोळे उघडून आसपास नजर टाकली तर काल  रात्रीचा अस्ताव्यस्तपणा तसाच टिकून होता. ते कालचे विस्कटलेले कपडे ,लॅपटॉपच्या अस्ताव्यस्त  वायर्स, प्रेसेंटेशन्स चे सर्व पेपर्स सर्व तसेच निपचित पडून होते. तेव्हा तो सारा पसारा पाहून तिला आठवले , काल रात्री लॅपटॉप शट डाऊन केल्यानंतर ती बराच वेळ विचार करत तशीच  पडून राहिली होती. आणि नंतर केव्हा डोळा लागला ते कळलेच नाही. रात्रीच्या गोष्टी तिला जशाच्या तशा आठवत होत्या पण तिला आता पुन्हा त्यावर विचार करत बसण्याची इच्छा नव्हती आणि तिच्याकडे तितका वेळही नव्हता. तिने सर्व आवरले आणि ठरल्या वेळेनुसार खाली येण्यासाठी निघाली. एकदम फ्रेश होती ती आज.काल घडलेल्या संभाषण आणि त्यानंतर झालेल्या भ्रमनिराशाची एक हलकीशी खूण देखील त्या सुंदर चेहऱ्यावर नव्हती. 

काल संध्याकाळप्रमाणे आताही ब्रेकफास्टच्या ठिकाणी पोहोचलेली ती पहिलीच पाहुणी होती. सर्व टेबले अतिशय उत्तम पद्धतीने सजली होती. तिने एका टेबलवर आपली लॅपटॉपची बॅग ठेवली आणि हातात प्लेट घेऊन पुढे जाऊ लागली.  इतक्यात मागून ओळखीची हाक आली आणि ती तशीच मागे वळली. कालचा मॅनेजर व्यवस्था पाहण्यासाठी तिथे आला होता.
" हॅलो , गुड मॉर्निंग मॅडम . कशा आहात तुम्ही ? झोप व्यवस्थित झाली ना ? अजून काही त्रास तर नव्हता ना ? "
" अरे मॅनेजर साहेब , तुम्ही ? गुड मॉर्निंग . मी छान . सर्व अगदी व्यवस्थित . खरंच थँक्स . काल तुमची फारच मदत झाली . आता पुढे बघू काय नशिबात वाढले आहे ते .२ महिने काढायचे आहेत ना आता या बेटावर!"
"त्याची काही काळजी करू नका, मॅडम. न्याहारी तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. दुपारचे जेवण सुद्धा तुमच्या कंपनीकडून स्पेशल ऑर्डर देऊन बनवून घेतल्यामुळे तुमच्या पसंतीस पडेलच. आणि आता राहिला प्रश्न रात्रीच्या जेवणाचा. तर तेही मी जातीने स्वतः लक्ष देईल . आमचे पाहुणे खुश तर आम्ही खुश. So now Enjoy your breakfast . मी निघतो . लवकरच भेटू. "
आणि तो हसतमुखाने रिसेप्शनच्या एरियामध्ये निघून गेला. तीसुद्धा न्याहारीसाठी पुढे गेली. त्याने सांगितल्याप्रमाणे ब्रेकफास्ट खरंच उत्तम होता. तिला तिचे सहकारीदेखील तिथेच भेटले . त्यानंतर ती  कॉन्फरेन्स मिटिंगसाठी तिथून निघून गेली.

रात्रीच्या जेवणाच्या वेळी पुन्हा तो मॅनेजर भेटला. त्याने आज तिच्यासाठी खास भाजी आचाऱ्यांकडून कडून बनवून घेतल्याने आज अजिबात तक्रार नव्हती . अगदी मनसोक्तपणे स्वादिष्ट जेवणावर ताव मारल्यानंतर ती आज बराच वेळ लॉबी मध्येच बसून होती.... आसपासच्या कुतूहल वाटणाऱ्या वस्तू आणि व्यक्तींचे निरीक्षण करत. तिच्या या नजरेतून आज हा मॅनेजरसुद्धा सुटला नव्हता. ती बराच वेळ त्या मॅनेजरला टक लावून पाहत होती. शरीरयष्टीने चांगला उंच , रंगाने गोरा नसला तरी देखणा होता तो. एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते ते. निहाल... त्याच्या नावानेही तिला एक वेगळीच भुरळ घातली होती.अगदी शोभत होते त्याला ते नाव... सदा आनंदी ,समाधानी ,इतरांवर आपल्या आनंदाचा वर्षाव करणारा नवा ऋतूच जणू... या एवढ्या मोठ्या हॉटेलची जबाबदारी त्याच्यावर असली तरी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे टेन्शन दिसणार नाही. सदा हसतमुख. आज सकाळपासून आला आहे. १२ तास तर कधीच उलटून गेले तरी हा मात्र तितकाच उत्साही. सतत घाईगडबडीत. या हॉटेलच्या कामातसुद्धा कित्ती काम असते(स्वगतच मनात तिला तिचा IT मधला एका कॉम्पुटरसमोर संबंध दिवस बटणांची खाडखाड करणारा जॉब आठवला ). आज तर ती मुलगी पण नव्हती ना ! काय बरे तिचे नाव ?... ती मनाशीच आठवण्याचा प्रयत्न करत होती. ती ते नाव शोधण्यात गुंग होती आणि ती गुंगी क्षणात भंगली ,
" मॅडम , इथे काय करता तुम्ही ? जेवण तर छान झाले ना? निश्चितच आवडले असेल तुम्हांला. "
" हो . थँक यु सो मच. आज सहजच आले आणि बसले आहे इथे. रूममध्ये पण एकटीला कंटाळा येतो ना आणि आज काही विशेष कामसुद्धा नाही. खरंतर इथे आसपासची गंमत पाहण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे .तिचाच आस्वाद घेते आहे . "
"छान... !" तिच्या बोलण्यावर त्याला आणखी काही सुचलेच नाही.
" पण तुमची ड्युटी फारच मोठी असते हो . आणि विशेष म्हणजे अजूनही तुम्ही मात्र एकदम ताजे वाटत आहात.खूप छान "
" नाही असे काही नाही , मॅडम. आज आमिरा नाही आली ना आणि त्यात आज नवे बुकिंग्स पण खूप होते त्यामुळे... "
तिला त्या मुलीचे नाव कळले आणि न जाणे स्वतःलाच काय ते समाधान मिळाले तिला. ती पुन्हा ते नाव पुटपुटत होती.
" आमिरा... "
" हो ना ! तिच्या मुलाची तब्येत आज ठीक नव्हती म्हणून जरा सुट्टी घेतली तिने."ते ऐकले आणि ती उडालीच.
"काय ? तिचे लग्न झाले आहे ? किती लहान वाटते ती. पण असो. खूप सुंदर दिसते ना ती !"
निर्वीच्या या बोलण्यावर निहाल फक्त हसला आणि पुन्हा त्याच्या कामाकडे वळला. ती सुद्धा तिच्या रूममध्ये आली. लॅपटॉपवरचा थोडा टाईमपास , थोडे काम झाले आणि तिची नजर वळली मेसेंजरकडे. एकदोनदा बझ्झ केले , थोडी वाट पाहिली आणि तशीच झोपी गेली.

पुढे कित्येक दिवस तिची थोडीफार अशीच दिनचर्या असायची. त्या दोघांसोबत आता तिची चांगलीच गट्टी जमल्यामुळे ट्रेनिंग नंतरचा बाकी सर्व वेळ ती रिसेप्शनच्या इथेच असायची. रात्री उशिरापर्यन्त खालीच वेळ घालवल्यानंतरसुद्धा आल्यावर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे हा तिचा नित्यनियम असायचा. बऱ्याचदा तो उपस्थित नसायचा आणि कधी असलाच तर फार व्यस्त असल्याने काही मिनिटांतच तो संवाद संपायचा. पण आता ती त्या गोष्टीचा खूप विचार करत नसायची. तिच्या मनात आता त्या नवीन देशाने आणि तिथल्या नव्या माणसांनी एक नवेच घर निर्माण केले होते ज्यात रमणे तिला आता आवडू लागले होते.

एका संध्याकाळी निर्वी रूममध्ये पोहोचली आणि फोनची रिंग वाजली. रिसेप्शनवरून येणाऱ्या फोनची आता तिला सवयच झाली होती पण तरी हा फोन सुद्धा तितक्याच आतुरतेने आणि तत्परतेने तिने उचलला.
" मॅडम , आज पुरणपोळी खाणार का ?"
" अरे वा ! तुमच्या हॉटेलमध्ये हा मराठमोळा मेनू सुद्धा मिळायला लागला वाटतं. "
" अरे तसे नाही. घरून आणली आहे. त्या दिवशी तुम्ही पुरणपोळीची आठवण काढली आणि २ दिवसांपूर्वी अगदी सहज तुमचा विषय आमच्या घरी निघाला म्हणून आज आईने मुद्दाम बनवून पाठवल्या आहेत. या लवकर रिसेप्शनवर. मी वाट पाहतो आहे. "
तिने फोन ठेवला आणि आनंदाने आधी २-४ उड्या तिथे बेड वरच मारून घेतल्या. ती लगेच निघाली आणि अवघ्या काही मिनिटांत ती त्या निहालसमोर हजर होती.
" या या , आज तुम्हांला एकदम तुमच्या आवडीचे जेवण मिळेल . मी म्हटले होते ना कि तुमच्या जेवणाची काळजी आता आम्हांला. "
निर्वीने लगेच 'थँक यू , थँक यू ' म्हणत पुढे केलेल्या डब्यातून पुरणपोळी हातात घेतली आणि ती पूर्णपणे संपेपर्यंत पुढे तोंडातून एक ब्र सुद्धा काढला नाही . जणू त्या प्रत्येक घासाला ती मनसोक्तपणे अनुभवून घेत होती.पुरणपोळीचा शेवटचा घास फस्त केल्यावर ती आपले तोंड पुसून घेत सांगू लागली,
" मी सांगू शकत नाही मला कित्ती आनंद झाला ते! घराला खूप मिस्स करते आहे. आणि पुरणपोळी हा तर माझा सर्वात मोठा वीक पॉईंट. तुम्हाला सांगते, मागच्या ट्रीपच्या वेळी घरी पोहोचल्यावर काय हवे असे जेव्हा आईने विचारले होते तेव्हा मी पुरणपोळीच सांगितले होते. मला त्या दिवशी वाटले होते कि अजून दीड महिना तरी लागेल आता पुन्हा तो अनुभव घेण्यासाठी. पण तुम्ही खरंच खूप मोठ्ठ सरप्राईझ दिले मला आज. मावशींना खूप खूप धन्यवाद सांगा. "
" अरे परवा तुम्हीच सांगा तिला. इथे येणार आहे ती. ते काय आहे ना , माझी बहीण आणि तिची फॅमिली आली आहे भारतातून ...एरव्ही मी आणि आई आम्ही दोघेच असतो इथे... मी माझ्या कामात आणि तिलाही तिची पाळणाघराची कामे असतात... कुठे सहसा जाणे होत नाही... पण मग कोणी भारतातून इथे आले कि आमची दुबई सैर ठरलेली असते... आमचे सर्व पाहून झाले आहे पण तरी यावेळी मीच म्हणालो आईला कि घरीच एकटी काय करशील ... तू पण चल सोबत... सो, उद्या इथले सर्व व्यवस्थितरीत्या पार पडले कि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु होईल आमची दुबई ट्रिप... Full to enjoy !!!"
" wow ! कित्ती छान ! मला पण दुबई बघायचे आहे. मग माझ्यासोबतसुद्धा पुढची सैर करा...याल ना माझ्यासोबत ? "
" अहो पुढची कशाला ? आताच चला ना आमच्या सोबत.दोनच दिवसांत परत येऊ आम्ही. तिथे राहण्याची व्यवस्था आम्ही केली आहे , त्यातच तुम्हाला पण सामावून घेऊ. ती काळजी करू नका. फक्त तुमच्या कामाचे बघा. म्हणजे काही काम असेल तर. नाहीतर आमच्या सोबतच हा वीकेंड स्पेंड करा... आम्हालाही एक गोड कंपनी मिळेल. "
" अरे हो, आयडिया छान आहे.काम तसे नाही काही. आणि गोड कंपनी काय ?... anyways छान. थँक यू. उद्या सांगा कधी निघायचे असेल ते म्हणजे तशी तयार राहीन मी सकाळीच."
निर्वी खरंच खूप आनंदी होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता आणि तो पाहून निहालच्या चेहऱ्यावरसुद्धा आता उत्साह झळकला होता.


नेहमी प्रमाणे निर्वी आणि निहाल आजही त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन बसलेले होते. आता बरीच रात्र झाली होती पण गप्पा खूप रंगल्या होत्या. आज निहाल हॉटेलमध्येच थांबला होता. अगदी पहाटेच खूप सारे महत्त्वाचे पाहुणे तिथे येणार होते. आमिरा मात्र लवकरच निघून गेली होती. त्यांच्या बोलण्यात आज प्रथमच अचानक अमिराचा विषय आला आणि निहालने अमिराची कहाणी तिला सांगितली.ती ऐकली आणि निर्वीच्या पायाखालची जमीनच काही क्षणांसाठी नाहीशी झाल्याचा भास तिला झाला. ती काही वेळ तशीच शांत होती. तो सुद्धा शांतच ... समोरच्या संथ झालेल्या पाण्याकडे एकटक पाहत.अचानक एक हवेची झुळूक त्यांच्या दिशेने वाहून गेली आणि दोघेही त्या विचारातून बाहेर आले. पण कोणीच काहीच बोलत नव्हतं. मध्येच तिला काहीतरी  सुचले आणि ती शांतता सुद्धा शेवटी भंग पावली,
" माझी आई म्हणते कि लग्न हा खूप मोठा जुगार आहे. बरोबर पत्ते पडले तर सुखाचे दरवाजेच दरवाजे असतात समोर आणि चुकीच्या हातात पडलो तर वर्षांपासूनचे स्वर्गसुख क्षणात नाहीसे होऊ शकते.लव्ह मॅरेज असो वा अरेंज, सारखाच अनुभव....  "
निर्वी बराच काळ असेच बोलत राहिली. निहाल मात्र फक्त ऐकतच होता. कुठल्यातरी खोल विचारांमध्ये तो पोहोचलेला होता.तिच्या बोलण्यात 'प्रेम' शब्दाचा उल्लेख झाला आणि त्या कधीपासून स्थिर असलेल्या मुखातून शब्द बाहेर पडले.तो आकाशातील अगण्य ताऱ्यांना साक्षीला ठेवून बोलत राहिला.
" हो ना ! पण प्रेम ही खरेच या विधात्याने निर्माण केलेली किती अप्रतिम भावना आहे. प्रेमामध्ये एक विराट शक्ती असते. प्रेमामध्ये माणूस एकाच क्षणी हसू आणि रडूही शकतो. सर्व सुखच सुख. प्रेमाची खूप सुंदर रूपे असतात. प्रेम खरंच काय कमाल चीज आहे. माणसाला क्षणात बदलून टाकते. प्रेम मिळाले कि साधे आसपासचे जग सुद्धा तो इंद्रपुरीचा स्वर्ग भासू लागतो आणि.... ... "
" ... आणि आणि आम्हांला तुमचे गुपित कळले. अंधारात केले तरी उजेडात आले बरे का ! तर आमचे मॅनेजर साहेब कुणावर तरी प्रेम करतात. खूप छान. कोण आहे ती ... म्हणजे मला सांगू शकणार असाल तरच सांगा."
त्याने खोटे हसू चेहऱ्यावर आणले. 
" प्रेम..? आणि मी...? आता करत नाही. तो नाद केव्हाच मागे पडलाय...पण पूर्वी करायचो... अगदी खूप ... विश्वास उडाला आहे आता...तेच बोलत होतो आणि तुम्ही मध्येच नसत्या सुखाचे स्वप्न रंगवले... प्रेम मिळाले कि साधे आसपासचे जग सुद्धा तो इंद्रपुरीचा स्वर्ग भासू लागतो आणि तेच प्रेम दुरावले तर आसपास जग असूनही ते नसल्यासारखे वाटते, खूप एकाकी बनून जाते जीवन. पण प्रेम खरंच खूप काही शिकवून जाते...मग ते प्रेम आनंद देणारे असो वा दुःख देणारे , फसलेले असो वा हरवलेले... मी तर खूप काही शिकलो माझ्या प्रेमामुळे ...कोणताही निर्णय विचार करून पण त्वरित घ्यावा नाहीतर आधीच उसवलेले पाश खूप ताणून नंतर पुन्हा शिवून एकत्र आणण्याचा नव्याने केलेला प्रयत्न फेल ठरतो... काही अर्थ नसतो त्याला... "
तो बोलतच होता... मोकळा होत होता ... पण हे ऐकून ती मात्र पुन्हा शांतच झाली. काय बोलणार आता यावर? आणि एव्हाना ती स्वतःच तिने गुरफटून ठेवलेल्या तिच्या प्रेमकथेत शिरली होती.
(स्वगत)' मी त्याला सांगून टाकावे का ? पण त्याला कोणी भेटली तर नसेल. आणि खरेच मी लायक असेल त्याच्या '.
" असो. माझे जाऊ द्या. तुम्ही सांगा निर्वीमॅडम, मी तर खात्रीने सांगतो तुम्ही मात्र नक्कीच कोणाच्या तरी प्रेमात पडलेल्या आहात.... आहात ना ?"
त्याचा आधीचा आवाज तिच्या कानांत शिरलाच नव्हता. पण पुढे प्रश्नार्थकी चढवलेल्या त्याच्या आवाजाने मात्र तिची विचारांची तंद्री तुटली. ती भानावर आली. 
" काय ? सॉरी सॉरी... मी ना ... "
" आहात ना प्रेमात कुणाच्या तरी... चला आता सांगा लवकर कोण आहे तो. "
" मी ? छे ! छे ! काही काय ! आम्ही नाही असे प्रेमात पडत बिडत. "
" हो का ? मग असे बसल्या बसल्या , बोलता बोलता हरवून जाणे हा छंद आहे का तुमचा. जितके मला माहित आहे ही प्रेमाचीच लक्षणे आहे. आणि तुमच्यात ती सारी अगदी पहिल्या दिवसापासून पाहतो आहे मी. सदा कुठल्यातरी वेगळ्याच जगात हरवलेल्या असतात. आता सांगा. इतकी छान मैत्री झाली आहे आपली तर इतके नक्कीच शेअर करू शकता ."
खूप मोठ्या निरव शांततेनंतर तिने आयुष्यात प्रथमच कोणासमोर तरी हे कबुल केले, 
" हो...म्हणजे मलाच माहित नाही... हे खरेच प्रेम आहे का ... ... ...तो आणि मी ... दोघे फार वर्षांपासून ... ... ... "
ती बोलत राहिली...पुढे कितीतरी वेळ. शाळेचे दिवस...चॅटिंगमधले ते गोड कडू क्षण... भारतातली त्या हॉटेलमध्ये झालेली कितीतरी वर्षांनंतरची भेट...विमानतळावरची ती नाजूक भेट ... विमानातले तिचे ते २ तास...तिच्या मनातला कोलाहल... आणि काही दिवसांपूर्वी झालेले ते अर्धवट राहिलेले चॅट..... हे सर्व तिच्या आठवणींच्या कप्प्यातून एका पाठोपाठ एक तिच्या नजरेसमोर तरळत होते आणि पुढच्याच क्षणी ओठांतून त्याच्या मनापर्यंत पोहोचत होते... ती ते प्रसंग इतके हुबेहूब त्याच्यासमोर उभे करत होती कि त्या सर्व भावना जशाच्या तशा त्याला जाणवत होत्या... परंतु ते शेवटच्या चॅटचा अंत त्याला अज्जिबात पटला नाही.  त्याने तसे तिला बोलूनही दाखवले. 
" छान! कमाल  असते तुम्हां मुलींची. काय अर्थ होता का? कदाचित त्याने मजेत म्हटले असेल. इतके सर्व तुमच्यासाठी केले ते व्यर्थच का? मला तरी वाटतो कि काहीतरी गैरसमज होत असेल तुमचा... आणि प्रेमात गैरसमज म्हणजे विषाचे झाड... त्याला जितक्या लवकरात लवकर छाटून टाकाल तितके अधिक चांगले... नाहीतर एकदा का या झाडाची पाळेमुळे मनात घट्ट रुजून वाढत गेली तर वाढत जाणारे ते झाड नात्याला नेहमीसाठी नष्ट करेल. "
" हम्म्मम...तेही बरोबरच. पण करू काय ?"
" अरे, बोला त्याच्याशी. आता हेही आम्हीच सांगावे. By the way , असतात कुठे तुमचे हे साहेब ?"
" अमेरिका ...कॅलिफोर्निया "  
" Ok Ok ... छान... बोला त्याच्याशी , लवकर सांगून टाका आपल्या मनातले सर्व... मला माहित आहे तोही वाट पाहतच असेल...वेळ घालवू नका... मी तर म्हणतो , आत्ताच फोन करा ... आता सकाळ असेल ना तिथे ... छान Good Morning surprize असेल... एकदम खुश होऊन जाईल... तुमचा तो 'मिस्टर कॅलिफोर्निया'..."
"काय बोललात ? मिस्टर कॅलिफोर्निया ?...काही काय? सार्थक नाव आहे त्याचे."
" आता तुम्ही नाव सांगत नाहीत म्हटल्यावर आम्ही म्हटले आम्हीच नामकरण करू तुमच्या मित्राचे ."
हे लक्षात येता तिच्या नकळत तिची जीभ दातांमध्ये चावली गेली पण त्याने सार्थकचे केलेले हे नामकरण पाहून तिला हसूच फुटले.तिलाही ते पटले आणि खूप खूप हसले ते दोघे...ती खरे तर त्या नव्या सवंगड्याची सोबत खूप एन्जॉय करत होती.खूप रात्र झाली आहे आणि तो महत्वाचा फोन करायचा आहे अजून असे त्याने वारंवार सांगूनही ती तिथून उठण्याचे नाव घेत नव्हती. शेवटी पुन्हा निहालनेच आठवण करून दिली ,
" बघा हां , वेळ जातो आहे. लावा फोन आणि सांगा त्याला ..."
" अरे हो हो ... पुन्हा विसरलेच मी... जाते जाते... तुमच्याशी बोलण्यात ना सर्व राहून जाते ते हे असे..."
हसत हसतच खोटा राग दाखवत निहालचा निरोप घेऊन ती लगेच तिच्या रूमच्या दिशेने धावायलाच लागली. मध्ये एका ठिकाणी असलेल्या मोठ्या फुलदाणीला धडकली सुद्धा. सावरले तिने लगेचच स्वतःला. मागे वळून पाहिले एकदा. निहाल निर्वीकडेच पाहत होता...स्वतःशीच हसत होता. 
" अहो निर्वीमॅडम , जरा हळू हळू...माहित आहे प्रेमात हे असेच होते.पण तरी सावकाश. आज सांगूनच टाका त्याला....
 ' यही सच हैं , शायद ... मैने प्यार किया ... तुझसे ... मैंने प्यार किया'... "

निहाल गुणगुणू लागला तशी निर्वी पुन्हा मनसोक्त हसली.तिचेही ते आवडते गीत होते पण ती तिथे आता क्षणभरही थांबली नाही. लिफ्टच्या दिशेने झपाझप पावले टाकत पुढे निघाली. आता निहालसुद्धा माघारी फिरला होता ... त्याच्या रूमच्या दिशेने. पण कितीतरी दूरपर्यंत तो गुणगुणत असलेल्या त्या गीताची धून तिच्या कानांवर येतच राहिली. त्या निरव शांततेत ती शीळ तिच्या हृदयाला भिडत होती. काही विचित्र हालचाल झाली मनाच्या एका कोपऱ्यात. पण तिचे सर्व लक्ष केंद्रित होते बंद लिफ्टच्या दाराकडे... ते उघडले गेले आणि साराच मार्ग आता मोकळा झाला...मनाचा , भावनांचा, आकांक्षांचा... प्रीतीचा... 

- रुपाली ठोंबरे .

Monday, May 7, 2018

शुक्रतारा ...



मराठीतली भावगीते मला अतिशय प्रिय... आणि त्यांत सुद्धा ज्येष्ठ गायक, अरुण दातेंनी स्वरबद्ध केलेली गाणी म्हणजे तर एक सुरेल मेजवानीच...दोन पिढ्याच नव्हे तर पुढच्या कितीतरी पिढ्यांच्या मनांवर अधिराज्य गाजवेल असा तो आवाज...अतिशय हळवा, थरथरता , मिठास आणि लोभस असा तो स्वर ...  पार हृदयाच्या तारांना जाऊन भिडणारा...हलकेच अंतरंग हलवून त्यात भावनांची असंख्य तरंग वलये क्षणात निर्माण करणारा ... माझ्या जीवनात खरी मराठी गाण्यांची आवड निर्माण झाली ती या शुक्रताऱ्याच्या स्वरांनी...मला बहुतेकदा गाण्यातील शब्द अधिक भुरळ पाडतात पण अरुण सरांच्या आवाजात अशी काही मोहिनी होती कि मी फक्त शब्द आणि चालच नव्हे तर या आवाजाच्या खऱ्या प्रेमात पडायचे....त्यांची ती मधुर गाणी किती आणि ती कितीदा ऐकली असतील मी...काही गीते तर विशेष हृदयाला भिडून जायची.... ' या जन्मावर ... या जगण्यावर शतदा प्रेम करावे... ' या गीताच्या प्रत्येक ओळीत जगण्यावर भरभरून प्रेम करावे असेच वाटायचे, मनावर पांघरून घेतलेल्या उसन्या दुःखाचे ओझे काही काळ तरी हलके वाटायचे ...' देवाघरच्या फुला सोनुल्या , देवाघरच्या फुला...' ऐकले आणि आपलेच बालपण मनाच्या अंगणात रांगत येत असे... भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी आणि त्यांची अधुरी राहिलेली कहाणी...  मनात एक वेगळीच कालवाकालव करून जायची...याउलट येशील येशील येशील राणी म्हणत साखरचुंबन मागणारा तो आवाज नकळत मनाला वेड लावून जाई ...'जेव्हा तिची अन माझी चोरून भेट झाली... ' हे कानी आले आणि खरेच फुले कळ्यांत आणि झाडे भरात आल्याचा भास होत असे...'डोळे कशासाठी ? कशासाठी?... ' ऐकताना मनात विचार तरळून जायचा, हे गाणे कशासाठी? कशासाठी ? मनात साठवून भिजून जाण्यासाठी...त्यांचे एक गीत सांगते ,' शब्दमाळा पुरेशा न होती , स्पर्श सारेच सांगून जाती... ', पण त्या आवाजाची कमाल अशी होती कि गात्रात गायलेला तो एक झंकार सुद्धा त्या गीताचे सारे मर्म अचूक सांगून जाई... 'जपून चाल पोरी जपून चाल...' ऐकले की हासून होतेच मुलगी लाजून लाल... त्यांची गाणी ऐकताना वाटे ' आज मी तुझ्यासवे, तुझ्यात मी विसावले...' आणि या मधूर कर्णस्पर्शाने रात्र कुसुंबी बहराची होऊन जाई... दिल्या घेतल्या वचनांच्या बकुळफुलांची शपथ घालणारा हा आवाज....' दिवस तुझे हे फुलायचे ' म्हणत झोपाळ्यावाचूनच मनाला मनसोक्त झुलवायचा...'दिस नकळत जात गेले आणि दूरदूरच्या चांदण्यात मन असेच हिंडत राहिले...कधी ' धुके दाटलेले उदास उदास...' या शब्दस्वरांनी लक्ष भासांनी मन वेढले गेले...त्यांची गीते ऐकली कि मनोमन हेच वाटायचे कि आता ' सूर जुळले, शब्दही जुळले , जुळले मधुमय गीत...इतकेच काय तर 'श्री राम जय राम जय जय राम...' या सदासुखी रामनामास अविरत ओठी आणण्याचे पवित्र कामसुद्धा या आवाजाने केले आहे...'उघडा दार घराचे ,उघडा दार मनाचे' असे गात प्रत्येकाच्या हृदयातील आत्मारामाला जागे करण्याचे पुण्यकर्मही या वाणीने न्यायाने साकारले आहे... अबोला दूर करण्यासाठी स्वतःचा रंग आणि गंधही देणारा हा स्वर... संधीकाली धुंदलेल्या दिशादिशांमध्ये बावरलेली प्रीत जागवणारा हा स्वर... मलमली रात्रीची वाट पाहणारा हा स्वर...स्वरगंगेच्या काठावरती वचन घेणारा हा स्वर...माझ्यासारख्या सखी शेजारणीला हलकेच मनातल्या मनात हसवत राहतो आणि मग हास्यांत पळे आपसूकच गुंफली जातात...' ही पौर्णिमा , हे चांदणे येईलही पुन्हा , माझे तुझे गाणे परि उमलेल का पुन्हा ? असे विचारणारा तो 'मंदावणारा शुक्रतारा ...' आज ' डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी...' म्हणत समजावतो आहे...

असेन मी , नसेन मी, तरी असेल गीत हे 
फ़ुलाफ़ुलात येथल्या उद्या हसेल गीत हे 

- रुपाली ठोंबरे

Blogs I follow :